वाचाल तर वाचाल!

Submitted by kadamb on 12 October, 2010 - 15:11

काल फेसबुकवर आमच्या शाळेच्या माजी विद्यार्थी मेळाव्याचे फोटो पहात होते. अचानक प्रधानबाईंचा फोटो पाहिला. क्षणभर गोंधळलेच. खूप फरक झाला आहे इतक्या वर्षात. होणारच! पण त्या काळातल्या घटना अगदी झरझर काल घडल्यासारख्या डोळ्यांसमोरून गेल्या.

आम्हाला मराठी शिकवायच्या त्या! 'अरे वाचा रे आणि तुम्हाला काय वाटतं ते स्वतःच्या शब्दात मांडा.' असं कानी कपाळी ओरडायच्या. 'प्रश्नांची उत्तरं लेखकाच्या शब्दात नकोत. उत्तराच्या शेवटी स्वतःचं मत येऊ दे. त्यातून जे लिखाण होईल, ते तुमचं स्वत:चं असेल. ते वाचताना तुम्हाला स्वतःला आनंद व्हायला हवा.' आता विचार केला तर वाटतं किती मोलाचा होता हा उपदेश! दहावीत असताना हे कौशल्य आत्मसात करणं अवघड वाटत होतं .....वाचन सोपं पण लिखाण? मग अशा अनेक शिक्षकांची आठवण आली ज्यांनी जाणीवपूर्वक स्वतःच्या संग्रहातली पुस्तकं दिली. आमच्या हडपबाई पार कल्याणहून मुलुंडपर्यंत येताना सकाळी आठवणीने एखादं मोठं पुस्तक घेऊन यायच्या, पुष्कळदा पु.लं.ची असायची पुस्तकं! मग वाचून त्याच्याबद्दल काहीतरी लिहायला सांगायच्या. सातवी आठवीत असताना एका कोळियाने, प्रिय बाईंस, अपूर्वाई , पूर्वरंग अशी अनेक पुस्तकं त्यांनी वाचायला लावली. नववीत तर मुळ्ये सरांनी एक यादी दिली पुस्तकांची...दिवाळीच्या सुटीचा अभ्यास म्हणून, आणि पाच वाक्यात रसग्रहण लिहायला सांगितलं प्रत्येक पुस्तकाचं. या माणसाशी मी कायम वाद घातला असेल, परंतु गणित आणि रसायनशास्त्र शिकवणार्‍या माणसाने हा गृहपाठ दिला याबद्दल तेव्हा आश्चर्य आणि आता कौतुक वाटतंय.

काही दिवसापूर्वी मुलाच्या शाळेतून वाचनकौशल्य कितपत अभ्यासलंय याची चाचणी झाली . निकाल आला. 'ज्या पातळीचं वाचन तुमचं मूल करू शकतं त्या काठिण्यपातळीची पुस्तकं वाचनालयातून घेत जा' असं पालकांना सांगण्यात आलं. मनापासून जाणवलं, वाचनाची सवय मुलाना लागावी यासाठी किती पद्धतशीर प्रयत्न होतायत आता! संगणक आल्यानंतर तर क्रांतीच झालीय. चित्रं असलेली पुस्तकं, शब्दावर टिकटिकवलं की वाचून पण दाखवतात. दुर्मिळ पुस्तक असेल तर त्याची प्रत एखाद्या संस्थळावर उपलब्ध असते. वेळ मिळेल तेव्हा वाचा., ते देखील मोफत!

आमच्या शिक्षकांनी प्रयत्न केले, पण ते चाकोरीबाहेर जाऊन. यातलं काही पाठ्यक्रमात नव्हतं. उत्तरपत्रिका लिहिलेय म्हणजे प्रश्नपत्रिका वाचली असावी हे गृहितच! संस्कृत मात्र संधी सोडवून वाचता आलं नाही तर पुढचा आनंदी आनंदच!

बी. एड्. करायला लागल्यावर बरेच शोध लागले स्वतःलाच! वाचन कौशल्य शिकवायचं म्हणजे काय? लिहिलेली लिपी, त्याचं उच्चारण (एनकोडिंग- डिकोडिंग), अर्थ समजून वाचणं, विरामचिन्हांचा वापर स्वरांच्या आरोह अवरोहावरून जाणवून देता येणं, नाट्य उतारा असेल तर एखाद्या नटाच्याप्रमाणे वाचणं, पात्रानुसारी आवाजात बदल करणं ह्या सगळ्या मुद्यांचा विचार करावा लागतो. वाचन प्रगट, मूक, सावकाश, जलद, अतिजलद असू शकतं. वाचनाचा वेग कसा वाढवावा, अभ्यास म्हणून वाचन करताना, मुद्यांचे ग्रहण करत वेगाने कसे वाचावे हा खरोखर एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे.

विरामचिन्हांचा वापर...याबाबत एक किस्सा आठवतो...मागे एकदा एका व्याख्यानात हा मुद्दा ऐकला होता. लतादीदींचे गायन, स्वर सारे आपल्या मनाला भिडते, आवडते, पण त्यांनी गायलेली कविता असो, गीत असो, त्यातली र्‍हस्व-दीर्घ, नुक्ता, इतकंच नाही तर स्वल्पविराम, पूर्णविरामही गायनातून जाणवतो. याला म्हणतात अचूकता! लतादीदींच्या गायनाचं हे अपूर्व रसग्रहण आज इतक्या वर्षानी अचानक आठवलं.

मुलांनी खूप शिकावं, कर्तृत्ववान व्हावं म्हणून सगळे आई बाप धडपडत असतात, उत्साहाने पुस्तकं आणून देत असतात. 'वाचाल तर वाचाल' हे मुलांच्या मनावर ठसवण्यात आधी यशस्वी व्हायला हवं.

गुलमोहर: 

वा! मस्तच लेख आहे kadamb Happy एकदम शाळेचे दिवस आठवले...

आमच्या एक बाई होत्या...धाडणकर म्हणून... त्यांनी आमचे मराठी सुधारावे, यासाठी खुप वेगवेगळे उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला... अक्षर सुधारण्यासाठी तर आगळावेगळा उपाय केला...८ वी ९ वी च्या इयत्तेतल्या विद्यार्थ्यांना दुरेघी वहीवर अक्षरे गिरवायला लावली... मी १० वी त गेले, तेंव्हा माझे अक्षर अचानक मोत्यासारखे झाले... इतक्या वळणदार अक्षरामुळे न जाणो बाकी विषयातही मला एरवी मिळाले असते त्याहून नक्की जरा जास्त गुण केवळ शुद्धलेखनामुळे मिळाले असतील... त्या सर्व गुणांचे श्रेय आमच्या धाडणकर बाईंनाच... Happy

अशा काही शिक्षकांमुळे आपल्या आयुष्याचे किती कल्याण होते, नाही का?

छान... आमच्या शिक्षिकेने पुलंचं लिखाण , 'ते काय? विनोदी आहे.. एकदा घरी वाचून टाका..,' असं म्हणून बाद करून टाकलं होतं. 'भ्रमणमंडळ' हा धडा होता.. आणि 'सारथी आणि घोडे' शिकवत बसल्या होत्या महिनाभर.. Sad