ओल्ड मंक लार्ज .... ऑन द रॉक्स - क्रमशः - भाग १४

Submitted by बेफ़िकीर on 6 October, 2010 - 06:08

"काय तब्येत करून घेतलीयस रे नंदू"

आत्मानंदची आई एकटीच आत्म्याला नंदू म्हणायची! बाकी सगळे 'आत्मू' अशी हाक मारायचे. बहीण त्रिवेणी सोडून! ती दादा म्हणायची!

आत्मा घरात प्रवेशल्या प्रवेशल्या त्याच्या आजीने त्याला आंघोळ करायला पिटाळले. आणि त्रिवेणीने त्याचे सामान उघडायला सुरुवात केली. अत्यंत काळजीपुर्वक वागून आत्म्याने दारूची शंका सुद्धा येणार नाही अशी तयारी केलेली होती. अर्थातच दारू त्याच्या पिशव्यांमधे नव्हतीच! त्रिवेणी बघत होती की तिला काय आणलंय! आणि आंघोळ करून, सगळ्यांना नमस्कार करून आत्मा चहा घ्यायला स्वयंपाकघरात आल्या आल्या आईने हे वाक्य उच्चारले!

"काय तब्येत करून घेतलीयस रे नंदू"

त्रिवेणी - दादा... मला काय आणलंस?
आत्मा - तुला ड्रेसचे कापड आणले आहे..
त्रिवेणी - कुठंय..??
आत्मा - ती हिरवी पिशवी उघड.. त्यात आहे...

आजी आणि आजोबा आता स्वयंपाकघरात येऊन बसले.

आजी - काय रे?? मधेअधे सुट्टी नाही का मिळत??
आत्मा - नाही.. खूप अभ्यास आहे...
आजोबा - पण गुण चांगले मिळवतोयस याचाच आम्हाला आनंद आहे.

तेवढ्यात काही गोड पदार्थ आणण्यासाठी बाहेर गेलेले बुवा ठोंबरे परतले.

बुवा - आत्मू..तुला आवडतात म्हणून गुलाबजाम आणले..
आत्मा - बाबा... मी तुमच्यासाठी छोटा गणपती आणलाय...
आजी - आणि म्हातार्‍या आजीसाठी??
आत्मा - गजानन विजयची पोथी हवी होती ना तुला?? ती आणलीय..
आजोबा - बरं झालं! आता आम्ही दोघेही वाचत जाऊ ती..
आत्मा - आजोबा... हे घ्या.. तुम्हाला जपाची मोठी माळ...
त्रिवेणी - दादा... छानच आहे रे कापड... पुणं खूप मोठंय का रे??
आत्मा - खूपच... जालन्याच्या पाचपट असेल..
त्रिवेणी - म्हणजे औरंगाबादहूनही??
आत्मा - होय....
आई - चहा घे... आईला विसरलेला दिसतोस...
आत्मा - काय बोलतेस आई?? हे तुला पातळ... मला माहीत नाही आवडेल की नाही...

भांडकुदळ आईने ते पातळ पाहून मात्र आत्म्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला.

आईचा स्पर्श! सहा महिन्यांनी झालेला! ज्या स्पर्शाने भल्याभल्या काळज्यांचे हरण होते तो स्पर्श!

आत्म्याला खूप बरे वाटले.

बुवा - आता पड जरा... संध्याकाळी एकदम जेवायलाच ऊठ...
आत्मा - ठीक आहे..

पहाटेपासून प्रवास केलेला आत्मानंद पेंगुळला होता. स्वतःच्या खोलीत जाऊन तो पेपर वाचत पडला. आणि बघता बघता झोप लागली.

संध्याकाळच्या जेवणाला तो उठला तेव्हा अंधार झालेला होता. साडे सात वाजलेले होते. आजी आणि आजोबा देवासमोर बसलेले होते. बुवा पोथी वाचत होते. आई सोवळ्यानेच स्वयंपाक करत होती. त्रिवेणी अभ्यास करत होती. आणि आत्मा?????

आत्म्याच्या मनातले विचार जर कुणाला समजले असते तर भांडणेच झाली असती.

साधारण या वेळेला किंवा आणखीन एक तासाभराने आपण रोज मस्तपैकी एखादा पेग लावतो. ज्यादिवशी रूममधले कुणीच पिणार नसेल त्या दिवशी आपण रात्री अंधार झाला अन सगळे घोरायला लागले की मस्तपैकी लपवून ठेवलेल्या निपमधील एक पेग स्टीलच्या ग्लासमधून घेतो. किती छान, तरल वाटते! आता महिनाभर घरी राहायचे म्हणजे तो आनंद गेलाच की! इथे असताना अजिबात शक्य नाही मद्य घेणे!

आह! काय तो अनुभव! पहिला घोट जरासा कडवट! मग सवय होणे! आणि मग ग्लास संपता संपता सर्व शरीरभर एक सुखद, तरल संवेदना! हवेत असल्यासारखे वाटते. मग काय? मग सगळ्या जगाचे राजे आपणच! पण ते सगळे विसरायला हवे! आपले घर काय, संस्कार काय, सोवळे किती! येथे ते विचार करणे हीसुद्धा मानसिक पातळीवरची प्रतारणाच आहे.

आपण काय केले वर्षभर? इथून पहिल्यांदा निघालो तेव्हा आईची मिठी सोडवतही नव्हती. बाबांना नमस्कार करून निघताना डोळ्यात आलेले पाणी आपण लपवत होतो. कारण त्रिवेणी आणि आई रडू नयेत म्हणून! आजीचा थरथरता हात आपल्या केसांमधून फिरला तेव्हा आपल्याला शिक्षणाला रामराम ठोकून घरीच बसावेसे वाटत होते. कुण्णाकुण्णाला सोडून जावेसे वाटत नव्हते. पण... जायला तर लागणारच होते. शेवटी अभियंता व्हायचे स्वप्न आपणही पाहिले होते अन आपल्या बाबांनीही! त्यामुळे कसेबसे आपण निघालो. होस्टेलवर पोचलो तर आपल्या आजवरच्या सर्व संस्कारांची थट्टा उडवणारे वातावरण! काय ते दिलीप! धड कपडे नाहीत अंगावर! बुक्या काय मारत! चटके काय लावून घेत! सिगारेटी काय ओढत! शिव्या काय देत सारख्या! सतत दारू काय पीत! आणि मामा राजकीय नेते असल्यामुळे तीन तीन वर्षे नापास होऊनही त्याच कक्षात काय राहात होते! काय ते वागणे! ते अशोक काय? दारू प्यायची म्हणजे किती प्यायची? काय शिव्या, काय फोटो त्यांच्या सामानात बायकांचे! ते वनदासही तसेच!

आणि मग आपण प्रयत्न केला कक्ष बदलण्याचा! यश मिळालं नाही. त्या शिर्केसरांच्या कन्येचे अन दिलीप यांचे मोठे प्रकरण झाले. आपण दिलीप यांना मार बसला म्हणून वाईट वाटल्यामुळे त्यांना मलमपट्टी केली. मग हळूहळू एकेकाचे अंतरंग समजायला लागले. सगळेच आपल्याचसारख्या पार्श्वभूमीचे होते! कुणी गुंड नव्हता, कुणी मुळचा मवाली नव्हता, कुणी व्यसनी वडिलांचा मुलगा नव्हता. पण केवळ मिळालेले स्वातंत्र्य, हातात काही पैसे असणे आणि आयुष्याची मजा लुटण्याचे वय असणे या तीनच गोष्टींमुळे सगळे वाहवत गेलेले होते.

हळूहळू एकमेकांवर प्रेम बसायला लागले सगळ्यांचे! मग बाबांचे येणे! त्यांच्यासमोर केलेल्या निर्मळ वागण्याच्या अभिनयाला त्याच रात्री तडा जाणे! मग अशोक यांनी घेतलेले बौद्धिक! आपल्या विचारांमधे आमुलाग्र बदल घडायला सुरुवात होणे! आपल्यालाही स्वातंत्र्याची हाव वाटणे! त्यातून मद्याची मजा समजणे! मग 'आज नको, आज नको' करत करत शेवटी रोज एखादा तरी पेग घेण्याच्या पातळीवर येणे! हे सर्व होत असताना अशोक यांना आलेला हृदयविकाराचा झटका, अलका देव बाबत आपल्या मनात एक गुलाबी कोपरा निर्माण होणे, नंतर तिनेही आपल्याला आणि आपणही तिला दुर्लक्षित करणे, सुरेखा आणि दिलीप यांचे जुळणे, आपल्यामुळे ते होणे, दिलीप आणि त्यांच्या मातु:श्रींचे आपल्यामुळेच जुळणे, कक्षातील सर्व चौघे पास होणे, त्याचेही श्रेय आपल्यालाच मिळणे, वर्धिनी अन सुवर्णा मॅडम अशा शिक्षिकांबाबत प्रथमच आपल्या मनात आदराव्यतिरिक्त काही भावना निर्माण होणे आणि हे सगळे होत असताना नियमीतपणे मद्याचा प्याला सोबतीला असणे!

आणि आज?? आज आपण पुन्हा जुन्या घरात आलो आहोत तर किती परके परके वाटत आहे इथे! वाटत आहे की किती बुरसटलेली माणसे ही! जो दिसत नाही त्या देवासाठी हजार व्रते करतील! पण जो दिसत आहे त्या माणसाला मात्र शिस्तीने वागायला सांगतील! त्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणतील! त्याला आपल्याला हवे त्या शैलीने जगायला भाग पाडतील! त्याची कुचंबणा करतील! आयुष्य म्हणजे कय हे समजून घ्यायच्या पात्रतेचा त्याला कधी करणारच नाहीत. कायम त्यांच्याच विचारांनी चालायचा आग्रह धरतील! तसे नाही झाले तर ओरडतील, चिडतील, रागवतील, अबोले धरतील अन काय काय करतील? का? कीर्तन करून, उपास तापास करून आणि आजन्म निर्व्यसनी राहून नेमके काय मिळवले या लोकांनी! कोणते दु:ख टाळले? कोणते असे सुख मिळवले जे इतरांना मिळू शकत नाही?

विचारांमध्येच आत्मा जेवला. हात धुवून 'जरा पाय मोकळे करून येतो' असे म्हणून बाहेर पडला. कोपर्‍यावर उजवीकडे वळले की रसना बार होता. आज त्याला तो आठवला. या बारच्या बाहेर आठवड्यातून किमान चार वेळा दारुड्यांच्या मारामार्‍या होतात म्हणून घाबरून आत्मा आणि त्याचे मित्र लांबून जायचे. रस्ता क्रॉस करून जायचे! आज मात्र आत्माने थांबून त्या बारकडे पाहिले. मनात विचार आला. या सुट्टीत ज्या दिवशी बाबा कीर्तनाला लांबच्या गावाला जातील, तेव्हा या रसना बारमधे नाही, पण जालन्यातील खूप लांबच्या अशा एखाद्या बारमधे जाऊन आपण एखादा पेग घ्यायला हरकत नाही तशी! कारण आपला कक्षच वेगळा आहे झोपण्याचा! आणि आईला काही वास बिस येणार नाही. आजी आजोबा झोपलेलेच असतील आणि त्रिवेणी तर काय? अजून तिला 'आपल्यासारखीच माणसे दारूपितात' हेही माहीत नसेल!

फिरत फिरत घराकडे आला आणि आपल्या खोलीत जाऊन झोपायची तयारी करू लागला. तेवढ्यातच आत्म्याला एक मुळापासून हालवणारं दृष्य दिसलं! त्यांच्या घराच्या शेजारच्या घरात राहणार्‍या नाटेकर काकू खिडकीचा पडदा न लावताच चेंज करत होत्या. आजवर रूम नंबर २१४ मधे फोटो अनेक पाहिले होते आत्म्याने..... पण.....

प्रत्यक्ष टॉपलेस बाई आज पहिल्यांदा बघितली त्याने आयुष्यात!

============================================

कुणाला कोण आवडेल काही सांगता येत नाही. अशोक पवार सारखा पाच तीन उंचीचा आणि पंचाण्णव किलो वजनाचा अन केवळ एकोणीस वर्षांचा मुलगा बसमधे शेजारी बसल्यावर खरे तर ती जराशी वैतागलीच! आधीच रस्ता नुसता खड्या खड्यांचा! त्यात सीट एवढीशी! त्यात हा मुलगा इतका जाङ! आणि त्यात हा पार कराडपर्यंत बरोबर असणार आणि आपल्याला जायचंय निप्पाणीला! म्हणजे पुढचे किमान साडे चार तास हा त्रास सहन करावा लागणार! बघू! मधे एखादी जागा रिकामी झाली तर तिथे बसू! असा विचार करून ..........

............ रशिदा..... हं! तिचं नांव रशिदा बेगम! रशिदा खिडकीतून बाहेर बघत बसली! गाडी सातारा रोडला लागली तसा उकाडा जरासा कमी झाला आणि चेहर्‍याला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून तिने आपली ओढणी नाकापर्यंत गुंडाळून घेतली.

अशोकने नारायण धारपांची एक कादंबरी सामानातून काढून वाचायला घेतली. काही वेळाने गाडी पद्मावतीच्या पुढे पोचली आणि आता कुठे जरासा प्रवासाचा वेग गाडीने धारण केला.

अशोकचे शेजारी लक्षच नव्हते. शेजारची व्यक्ती मुसलमान आहे हे त्याने बसताना एकाच नजरेत पाहिले होते तेवढेच! बाकी नंतर त्याने तिच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. आणि तिनेही! गाडीच्या धक्यांमुळे एकमेकांना एकमेकांचे काही स्पर्श होत होते ते सोडले तर काही संबंधच नव्हता खरे तर!

पण नशीबात असते ते होते!

कात्रज घाट उतरून गाडी सरळ रस्त्याला लागली तशी सगळ्याच प्रवाश्यांच्या डोळ्यावर झोप यायला लागली. त्यावेळेस आत्तासारखा सिक्स लेन हायवे नव्हता. तरीही रस्ता सरळ अन बर्‍यापैकी, मगाचचे धक्के आता फारसे बसत नव्हते, फार ब्रेक दाबले जात नव्हते आणि भन्नाट गार वारा खिडकीतून येत होता. अशोकही किंचित पेंगुळला. रशिदा तर केव्हाच झोपून गेलेली होती. आणि तो प्रकार घडला...

खंबाटकी घाट अजून जवळपास तीस किलोमीटर लांब असतानाच .... समोरून अचानक जोरात आलेल्या ट्रकपासून आपली बस वाचवण्याच्या प्रयत्नात ड्रायव्हरने एस्.टी. जोरात डावीकडे घेतली अन तोल गेला. गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या पंधरा एक फूट खोल उतारावरून सरळ खाली गेली अन काही कळायच्या आतच एका मोठ्या झाडात अडकली.

किंचाळ्यांनी ती बस दुमदुमलेली होती. डुलकी घेत असणार्‍या प्रवाश्यांना काय झाले आहे तेच समजत नव्हते. प्रचंड मार लागलेले पाच, सहा जण किंचाळत होते. वर ठेवलेले सामान बर्‍याच्य जणांच्या डोक्यात पडले होते. अनेकांना काही ना काही दुखापत झाली होती. आणि रशिदा?? रशिदा अक्षरशः बोंबलत होती. त्या बोंबलण्यात दुखापतीचा भाग कमी अन भीतीचा अधिक होता. कारण ती ज्या खिडकीत होती तो बसचा भाग तरंगत होता. होता जमीनीपासून दोन एक फुटांवरच! पण हवेत! कारण पुढचा भाग झाडात अडकला होता आणि मागचा भाग उचलला गेलेला होता. त्यातच तिच्या अंगावर अशोकचे सगळे वजन पडलेले होते. त्यामुळे अधिकच घाबरून ती किंचाळत होती.

तीन ते चार सेकंदात सगळ्यांनाच क्लीअर झाले की झाले काय आहे? आता खरे तर धोका काहीच नव्हता. कारण बस जमीनीपासून फक्त एखाद दोन फूट अंतरावर होती एवढेच! फक्त दारातून पटापटा उड्या मारल्या की झाले. बस तिरकी झालेली होती. त्या तिरक्या बसमधेच अशोक तिरका होऊन उभा राहिला. रशिदा रडत होती. जो तो आपापले बघत होता. कुणी सामान काढतंय तर कुणी ओरडतंय! जवळपास प्रत्येकाबरोबर कुणी ना कुणी होते. अशोक आणि रशिदाबरोबर जसे कुणीच नव्हते तसे बसमधे आणखीन दोन तीनच प्रवासी होते.

काय करावे ते अशोकला समजेना! त्याच्या पाठीत प्रचंड चमका येत होत्या. पण त्याही तो सहन करू शकत होता. मात्र ही बाई इतकी भयानक का ओरडत असावी हे त्याला समजत नव्हतं! हो... ती बाईच होती! चक्क पंचवीस वर्षांची!

बर्‍याचशा सावरलेल्या अशोकने सरळ रशिदाला उठवून नीट बसवले अन म्हणाला...

" काही झालं नाही आहे हो... सगळं ठीक आहे...रडू नका..."

ते ऐकून रशिदा आणखीनच ओरडू लागली.

अशोकने बॅगेतले पाणी तिला दिले. तिने ते प्यायले. आता बरेचसे सावरलेले प्रवासी आपापल्या पिशव्या घेऊन लटकलेल्या दारातून बाहेर उड्या मारत होते. अशोकही दाराकडे सरकू लागला. पण मग त्यालाच वाटले! आपण उडी मारायची अन मग ही बाई काय करणार?

अशोक - चला... बसमधून बाहेर पडूयात...
रशिदा - आपको कुछ एहसासभी है कौनसी हालत मे हूं मै???
अशोक - मै... मेरा हाथ... हाथ पकडके उठो...

त्याही परिस्थितीत रशिदाने अशोकचा हात झिडकारला. मग ती बाई एकटीच आहे हे समजल्यावर बसमधल्या दोन तीन बायकांनी तिथे धाव घेतली. त्यांनी तिला कशीबशी उठवली अन उभी केली. ती अजून बोंबलतच होती. तिने कसेबसे सांगीतले. कंबरेला काहीतरी प्रचंड दुखापत झाली आहे आणि डावा खांदा हालवताही येत नाहीये इतका दुखतोय!

त्या अपघाताच्या प्रसंगात अजून स्वतःच धड भानावर न आलेल्या माणसांचे आता रशिदावरचे लक्ष जरा कमी झाले. तरी तिला कसेबसे धरून दोन बायकांनी दारातून खाली ढकलले अक्षरश! ती खाली पडून आणखीनच ओरडायला लागली.

आता अशोकने खाली उडी मारली. हायवेवरची अनेक वाहने थांबली होती हा प्रकार पाहून! काही लोक मदतीला धावले होते. अशोकच्या हातात स्वतःची बॅग आणि रशिदाचीही बॅग होती. मागून आलेल्या एका राज्य परिवहन मंडळाच्या बसमधे एकंदर तेरा अपघातग्रस्त प्रवासी कोंबण्यात आले. पुढच्या बसची सगळे वाट पाहू लागले. अशोकने विचार केला. आपल्या पाठीत काहीतरी प्रचंड वेदना होत आहे. उपचार करायलाच हवे आहेत. इथून सातार्‍यापेक्षा पुणंच जवळ आहे. तो रस्ता क्रॉस करून पलीकडच्या बाजूला उभा राहिला. येणार्‍या बसेसना हात करू लागला. खासगी बसेस अर्थातच थांबून जेमतेम एखादा प्रवासी घेत होत्या. खासगी कार्स तर थांबून लगेच निघूनही जात होत्या. तीन चार कार्स मात्र थांबलेल्या होत्या. पाच ते सात मिनिटांनी अशोकच्या प्रयत्नांना यश आले. एक फियाट थांबली. त्यात एक जोडपे होते. अशोकने पुण्यापर्यंत सोडायची विनंती केली. एकंदर परिस्थिती पाहून ते हो म्हणाले. तिकडे रशिदा 'मेरी बॅग, मेरी बॅग' म्हणून ओरडत होती. अशोकने रस्त्याच्या पलीकडून तिला बॅग दाखवली अन 'इकडे या' अशा अर्थाची खूण केली. खरे तर तो एकटा जाऊ शकला असता. पण आपल्यामुळे या बाईंना काहीतरी झालेले आहे ही जाणीव त्याला होती. रशिदाने विचार केला. आपल्याला प्रचंड वेदना होत आहेत. कुठेतरी एकदाचे जायलाच हवे आहे. त्या गाडीत एक बाईही दिसत आहे. सेफ आहे सगळे! आपण आपले पुण्यालाच जावे हे बरे!

रशिदाने कुणाच्यातरी मदतीने रस्ता क्रॉस केला. आता त्या फियाटपाशी 'आम्हाला न्या, आम्हाला न्या' अशी विनंती घेऊन आणखीन काही जण धावले. पण गाडीचालकाने 'आधीच यांना हो म्हणालो आहे' असे म्हणून दिलगीरी व्यक्त केली. पण आता एक वेगळीच अडचण निर्माण झाली. रशिदा बसू शकत नव्हती. म्हणजे मागची संपूर्ण सीट तिला झोपायला लागंणार होती. मग अशोक बसणार कुठे?? बर! ती गाडीचालकाची बायको काही मागे येऊन बसणार नाही. शेवटी अशोकला तो ड्रायव्हर 'तुम्ही दुसर्‍या गाडीने या' म्हणाला! अशोकनेही विचार केला. इतकी अडचण करून बसायचे अन त्यामुळे आणखीनच पाठ दुखायची! आपला अन या बाईचा संबंध काय? अपघात झाला याला काही आपण जबाबदार नाही. जाउदे या बाईला! रशिदा कशीबशी मागच्या सीटवर प्रवेशून कण्हत कण्हत आडवी झाली. तेवढ्यात अशोकने स्वतःच्या पाठीवर हात फिरवून वेदनेने तोंड वेडेवाकडे केलेले तिने पाहिले. आता तिलाच वाईट वाटले. या माणसाला स्वतःला जाता येत असताना हा आधी आपल्याला पाठवतोय!

रशिदा - आप... देखिये... यहां बैठ सकते है... तो...

अशोकने जरा विचार केला. तास सव्वा तास होईल त्रास! पण आपल्याला पुन्हा दुसरी गाडी मिळतीय की नाही, वेदना सहन होणार आहे की नाही सगळंच अन्प्रेडिक्टेबल! त्यापेक्षा जाऊ याच गाडीतून कसेतरी! रशिदाच्या पायांपाशी कसातरी फियाटमधे घुसत एकदाचा बसला तो!

आणि पुण्याच्या हॉस्पीटलमधे पोचून दोन तास झाल्यानंतर जेव्हा 'जगात फक्त आईच असलेल्या' रशिदाच्या निपाणीच्या घरी तिच्या आईला फोनवरून अशोकने 'विशेष काही झाले नाही आहे, कुणाबरोबर तरी इकडे या आणि यांना निपाणीला घेऊन जा' असा निरोप दिला आणि स्वतःच्याही 'आजच्याऐवजी उद्या येत आहे' असे सांगीतले तेव्हा....

.... रशिदा आणि तो स्वतः... दोघांनाही एकमेकांमधील असलेली धर्माची, वयाची आणि सामाजिक स्टेटसची सर्व अंतरे माहीत असूनसुद्धा ते एकमेकांना खूप खूप आवडलेले होते... हे त्यांच्या नजरेतून एकमेकांना समजत होते.

मात्र मनातून 'हे विचार करणे चुकीचे आहे, हे असले कधी शक्यच होणार नाही आहे' हे दोघेही स्वतःलाच सांगत होते. पण असल्या गोष्टी ऐकेल तर ते मन कसलं??

रशिदाच्या शेजारचे एक मेहबुबचाचा आणि तिची आई जाहिरा बी यायला रात्रीचे आठ वाजले. तोवर रशिदा आणि अशोकने भरपूर गप्पा मारल्या होत्या. एकमेकांची खूप माहिती विचारली होती.

अशोकचे काम फक्त थोडासा शेक आणि पेन कीलर्स यावर भागले होते. रशिदाच्या कंबरेत अगदीच मायनर असलेल्या क्रॅकमुळे तिला येथे चक्क पाच दिवस राहावे लागणार होते. तिचा खांदा मात्र लगेच बरा होणार होता.

रशिदा एक परित्यक्ता होती. तिला वडील नव्हते. भाऊ बहीणही नव्हते. आईने ती वयात आल्यावर तिचे लग्न निपाणीच्याच एका मुसलमानाशी लावून दिले होते. पण सासरी अतोनात छळ झाला. शेवटी आठ वर्षे मूल झाले नाही या कारणावरून तिला सोडून देण्यात आले. आईला खरे तर मुलगी घरी आल्यामुळे आधारच मिळाला. या खुल्या जगात एकट्या मुलीचे कसे होणार ही काळजीही मिटली. पुण्यातील एका मुस्लिम संस्थेत तिला काम देणार होते. ही संस्था महिलांचीच होती. त्या संस्थेतच ती आली होती मुलाखतीला! आणि तिथे जॉईन व्हा असे पत्र घेऊन ती निपाणीला परत चालली होती. ती आता आईला घेऊन पुण्याला शिफ्ट व्हायच्या विचारात होती. बारावीपर्यंत शिकलेली रशिदा अजून भर तारुण्यात होती. मुस्लिम स्त्रियांचे बहुतेकदा असतात तसे तिचे एकदम शार्प डोळे होते.

आपला भार पडल्यामुळे या बाईला वेदना होत आहेत याचे वैषम्य वाटत असल्यामुळे तिचे जमेल ते सहाय्य करता करता अशोकला रशिदा खरच आवडू लागली होती. आणि 'अपघात झाला त्यात याची काहीही चूक नसतानाही किती निरपेक्षपणे हा मुलगा मदत करत आहे' हे पाहून रशिदाला अशी माणसे असलेली घरे कुठे असतात आणि असे घर आपल्या नशीबात का येऊ नये असे विचार येत होते.

अर्थातच, रशिदाच्या मनात अजूनही कुठलाही इतर विचार नव्हता. पण नेमके मेहबुब चाचा आणि आई आले आणि ते आल्यानंतर सगळी माहिती देऊन अर्ध्या तासने अशोक निघाला तेव्हा मात्र...

..... एकदाच..... फक्त एकदाच तिला वाटले... या मुलाने मागे वळून पाहावे आणि म्हणावे...

"मै दुबारा आउंगा मिलने आपसे"

पण ही अपेक्षा तिने मनातच गाडली होती. अशी अपेक्षा करणे चूकच होते तिच्या दृष्टीने!

आई उगाचच 'आईये कभी निपाणी' वगैरे म्हणत होती. मेहबुब चाचा 'ये बच्चा था इसलिये बिटियाकी सारी मदद होसकी... वर्ना' असे पुटपुटत होते. निघताना मात्र अशोकने 'येतो' अशा अर्थी मान डोलावून रशिदाकडे पाहिले तेव्हा का कुणास ठाऊक.. वाईट तर त्याला स्वतःलाही वाटत होते... पण त्याला.. रशिदाच्या डोळ्यातही कसलीतरी अनामिक आतुरता असल्याचा भास झाला... आणि कोणताही मागचा पुढचा विचार न करता तो एकदम म्हणून गेला....

"मै सिर्फ घर जाके दुबारा कल शाम यहा आरहा हूं... जबतक आप निपाणी सहीसलामत नही पहुंचती... मुझे चैन नही मिलेगा...."

एकदम! एकदम रशिदाच्या डोळ्यातील भाव बदलले. आता हा क्षण निरोपाचा वाटतच नव्हता. हा वाटत होता एका मधुर प्रतीक्षेचा क्षण! ती अगदी मनमोकळे हसली आणि म्हणाली....

"प्लीज आना... इंतजार कर रही हूं..."

काय वाक्य होते ते! आयुष्यात अश्क्याने असले वाक्य ऐकले नव्हते. अती जाड कॅटेगरीतला हा मुलगा कुणाच्या ध्यानीमनीहि असणे शक्य नव्हते. पण आज केवळ त्याच्या मनावर एक स्त्री भाळली होती. ती स्वतःही काही फार सुंदर नव्हती! पण त्या वयाला कसल्या अटी?? व्यक्ती आवडली की आवडली! एवढेच!

ते वाक्य मोरपीसासारखं मनाव्र फिरलं तसा खुष झालेला अशोक पुन्हा तिच्याकडे एक स्नेहार्द्र कटाक्ष टाकून ... कराडला जायला निघाला.....

रूम नंबर २१४ मधल्या सर्वात वादळी प्रेमकथेला आज सुरुवात झाली होती.....

================================================

"दादा आला"

अल्लड वनिताचे उत्साहाने भरलेले ते शब्द घरासमोरच्या अंगणात घुमून माळापर्यंत त्यांचा एको गेला तेव्हा एक कृश अंगकाठीची पंचावन्न वर्षांची शांताबाई नावाची महिला दुनियेतला सगळा आनंद एवढ्याश्या मनात साठवून तुफान वेगात धावत येत होती. जणू पान्हाच फुटला होता तिला! वनदास लामखेडे! सहा महिन्यांनी परत घरी आले होते.

'आपले घर'! काय संकल्पना असते ही! फिंगरटीप्सपाशी असलेल्या इम्टरकॉमच्या बटनांवरून पन्नास नोकरांना कामाला लावून एक क्लब सॅन्डविच विथ कॅरट ज्यूस या ब्रेकफास्टची ऑर्डर देता येत असलेल्या सप्ततारांकित हॉटेलच्या तुलनेत आईने 'दोन घास खाऊन घे बाळा... उनाडतोयस कधीचा' असे म्हणून समोर ठेवलेले धिरडे अनंत पटींनी गोड लागते!

वनदास लामखेडे! आल्या आल्याच त्याच्या हातातल्या सामानाच्या वजनाची फिकीर न बाळगता लाडकी बहीण वनिता त्याला मारलेली घट्ट मिठी! आणि लांबून धावत येणारी आई ! हे दृष्य रूम नंबर २१४ मधल्या सर्व आनंदापेक्षा लाखो पटींनी आनंददायी होते!

वनदास नुसताच हसत होता. सामान तसेच टाकून त्याने वनिताला उचलून गरागरा फिरवले. इतकी काही लहान नव्हती ती! पण बहीण ती बहीणच!

तो पर्यंत आई आली. वनदासने पटकन तिला नमस्कार केला. आईनेही आपला बाळ आता खूप मोठा झालेला आहे हे समजून उगाच त्याला जवळ बिवळ न घेता नुसताच त्याच्या चेहर्‍यावरून हात फिरवला.

वनदास - आबा??
आई - शेताचा तुकडा इकनार म्हनत्यायत.. नगरला ग्येलंयत..
वनदास - का????
आई - हिच्या लग्नाचं सोनं तुझ्या कालिजला नाय व्हय वापरल??
वनदास - अन मग मी नोकरी करून पैसे नाय होय द्यायचा हिच्या लग्नाला..
वनिता - मल लगीन नाय करायचंन..
आई - आत्ता नाही ग बया... अजून सात वरीस हायेत...
वनदास - आई खोट सांगतीय... दोन महिन्यात हाय लगीन तुझं..

खट्टू झालेल्या वनिताने वनदासला थपडा मारायला सुरुवात केली तसे आई अन मुलगा हसायला लागले.

आई - त्याला आत बी नाय व्हय येऊ दिलंस वन्ते... पानी आन जा...

वनदासची भाषा अन त्याच्या घरच्यांची भाषा यात असलेला फरक वनदासच्या शिक्षणामुळे निर्माण झालेला होता.

आत गेल्यावर वनदासला थंड थंड वाटलं! वनिताने दिलेल्या लोटीतले सगळे पाणी पिऊन त्याने सामान खोलले. सगळ्यांसाठीच त्याने काही ना काही आणलेले होते. वनिता गळ्यातले आणि एक ड्रेस पाहून हरखून गेली. आई चहा करायला बसली...

वनदास - हे गं काय आये?? हाताला काय झालं??

चूपचाप दोघी!

आई - काय न्हाय... चुलीतलं लाकूड उलटं बसलं मनगटावं..

वनदासला खरं वाटलं! तेवढ्यात वनिता पचकली...

वनिता - दादा... आबानं मारलंय.. त्याची खुन हाये ती.. लय मारत्यो तिला रोजचा....

एकदम डोळेच भरून आले वनदासचे!

काय करतो आपण पुण्याला? आपली फी भरण्यासाठी एवढसंसं सोनं विकलं म्हणून आई इथे रोज मार खातीय! अगदी रोज! अजूनसुद्धा! हा हातावरचा चटकाही त्याचाच! इतकं सहन करतीय! आणि आपण??

आपण करतो दीपावर कविता... आपण दारू पितो... सिगारेटी ओढतो... पास होतोय हे ठीक आहे.. पण ते तरी किमान व्हायलाच हवं म्हणून होतो... बाकी काही नाही...

वनदासने पाणी भरलेले डोळे तसेच ठेवत नेहमीच्या जागेची तेलाची बाटली काढून आईच्या मनगटावर तेल चोळलं! वर्षभर खाल्लेल्या सगळ्या माराचं औषध एका क्षणात मिळालं त्या माउलीला! हमसून हमसून रडत तिने वन्याला आपल्या मिठीत घेतलं अन म्हणाली...

"बाळा... लय शिक हां??? लय शिक.... मी खाईन मार... काही व्हत नाय... आपलंच कुकू हाय.. तेवढा अधिकार हायंच त्यांचा... पर तू लय शिक.. लय मोटा व्हं.... मोटी नोकरी कर... आन भनीच्या लग्नाचं समदं सोनं दामदुपटीनं दे बापाला हां?? तेवढीच आशा हाय माझ्या मनात.... होशील ना व्हं मोटा?? ऐकशील ना एवढं??"

शुद्ध आईपणाचे ते शब्द! वनदास आणि आईचे अश्रू एकमेकांत मिसळलेले होते. त्यातच वनिताही दोघांना मिठी मारून रडत होती.

वनदास - तू नाय होय गं आबाला आवरत?? आं??
वनिता - माझं ऐकनार हाय त्ये?? मलाबी बडिवतायत येता जाता..
वनदास - ... का??
वनिता - ... मी.... मुलगी हाय म्हून...

आता वनदासने बहिणीला जवळ घेतले. तिच्यायला काय सालं आयुष्यंय??? एक व्यक्ती केवळ मुलगी आहे म्हणून मार खाते? का तर हुंडा द्यावा लागणार! परक्याचं धन! त्यापेक्षा मी झाल्यावर हिला जन्मालाच घालायला नको होतं ना मग??

वनदास - मी बघतोच आबाकडं आज आलं की...

आई एकदम दचकली.

आई - न्हाय... तू शबूद बोलू नगंस.. तुलाबी मारंल त्ये... अन तू गेल्यावर पुन्हा आम्हाला..
वनदास - असा बरा मारंल.... इंजीनीयर हाये मी आता...

चहा घेऊन विश्रांती होतीय तोवर आबा आला. आला तोच वैतागलेला होता. शेताला भावच येत नव्हता. पार त्या अब्दुल शिंप्याकडच्या बाजूचा अर्धा एकराचा तुकडा विकायचं त्याच्या मनात होतं! का तर म्हणे वनिताच्या लग्नाला तेवढेच पैसे! अजून लग्नाला कितीतरी काळ होता. पण डोकंच चक्रम!

वनदासने आबाला नमस्कार केला.

आबा - आलास व्हय?? कॉलेज संपलं काय??
वनदास - एक वर्षं संपलं...
आबा - आन अजून किती हायत मंग??
वनदास - तीन..
आबा - फीला पैका मिळायचा नाय.. आजच सांगतोय..
वनदास - आबा.. फी आपण चार वर्षांची भरलीय... आपल्या परिस्थितीकडे बघून कॉलेजने ते मान्य केलं..
आबा - त्योच तर घोळ झालाय.... तुझ्या कालिजामुळे पोरगी घरात कुजायची वेळ येणार आहे...
वनदास - आबा... ह्यं घे... तुला आणलं..
आबा - काये त्ये??
वनदास - धोतराची पानं हायत... दोन..
आबा - घाल त्या चुलीत... तिच्यायला सोनं आण आधी वसूल करून समदं...
वनदास - आबा.... मला एक.... बोलायचं होतं.....
आबा - ये भवाने.. थोबाड काय बघतीयस??? चहा टाक..

वनदासची आई लगबगीने उठली.

आबा - काय बोलतूस??? आनि सोनं पाहिजे तुझ्या मढ्यावं घालाया????
वनदास - आबा... माझ्या आईवर....

खटकन आबाची मान वर झाली. आजवर तो वनदासच्या तोंडातून 'आई' हा शब्द ऐकून होता. 'माझी आई' हा शब्दप्रयोग आज पहिल्यांदाच ऐकला. प्रकरण निश्चीत गंभीर आहे हे त्याला वन्याच्या डोळ्यातूनच समजत होतं!

आबा - ...... काय???
वनदास - आईवं पुन्हा हात टाकायचा नाय...

खाडकन उठून आबाने वनदासच्या कानाखाली वाजवण्यासाठी हात उचलला अन तो हात....

.... हवेतच राहिला....

वनदासच्या मजबूत पकडीत तो हात होता...

वनदास - इंजीनीयर होतोय मी... मला मारतुस व्हय?? पुन्हा आईच्या अंगावर हात टाकलास तर बघच... बाप बघायचो नाय अन पोरगा बघायचो नाय... केस करंल केस... काय?? ही धमकीच हाय... पाहू नको माझ्याकडं असा.... आनि ही माझी भैन.... तिलाबी काय होता कामा नय.... तिच्या लग्नाची सगळी जबाबदारी माझी हाय... तुझी नाय... तवा चूपचाप रहा... आन तुझं सोनं दील मी दामदुपटीनं परत.... तोवर आई अन वनेच्या अंगावर तुझा शबूद पी पडता कामा नाय...

साठ वर्षाच्या प्रौढ माणसाची ताकद काही झाले तरी एकोणीस वर्षांच्या तरण्याबांड पोरापुढे कमीच पडणार!

आजवर न झालेला प्रकार घडत होता आज... आबा भर बाजारात नागडा करून धिंड काढल्यासारखा चेहरा करून आपल्याच रक्ताच्या स्वरुपाकडे पाहात होता....

आई आणि वनिताही थक्क झालेल्या होत्या...

वनदास - आन वने... मी आज तुला माझा होस्टेलवरचा फोन नंबर देतो... मी गेल्यावं रोज संध्याकाळी सात वाजता तुझा फोन आला पायजेल मला त्या नंबरवर... वाडीतल्या वाण्याकडून करायचा... काय?? आन फोनवर सांगायचं...आज आबाने आईला आन मला काहीबी केलं नाही... ज्या दिवशी तुझा फोन नाय यायचा.. त्या दिवशी तिकडं पुण्यालाच कंप्लेन करीन मी... समजलीस काय??? तुझा फोन नाय आला तर मी कंप्लेन करीन चौकीवर कंप्लेन... आन आबा.. श्येत माझ्या आज्याचंय... तू कोन इकनारा???

वनदास लामखडे आज घरातला कर्ता पुरुष आणि तोही अत्यंत चांगल्या मनाचा कर्तबगार पुरुष झाला होता......

================================================

"आम्हाला जरा ठरवूदेत आता पुढचं... धनू... जा हिला कोल्हापूर दाखवून आण.... आणि येताना जेवूनच या..."

आईसाहेबांनी केलेली ही प्रेमळ आज्ञा पथ्यावरच पडणारी होती.

'छे छे, तसं काही नाही काही' अशा आविर्भावात दिल्या उठला आणि पाठोपाठ सुरेखाही उठली.

साडे तीनच्या बुलेटचे धुड क्षणात गिरकी घेऊन गेटबाहेर काढत दिल्याने सुरेखाकडे पाहिले. आज पहिल्यांदाच ती भावी पतीच्या मागे बसणार होती. 'मला तसा काही इतका इंटरेस्ट नाहीये मागे बसण्यात' असे भाव चेहर्‍यावर ठेवत दादाला आणि वडिलांना व आईसाहेबांना हात करत ती एकदाची बुलेटवर बसली.

कोल्हापूर! एक मस्त, मस्त, मस्त शहर!

दिलदार स्वभावाची पण मजा मजा करणारी माणसे, रंकाळ्यावरचे धारोष्ण दूध, खासबाग किंवा आहारची तर्री आणि कट यांनी नटलेली लालभडक झणझणीत मिसळ, अत्यंत उत्तम दुधाचा चहा, शुद्ध पाणी, भन्नाट आणि तब्येत सुधरवणारी हवा, अख्या देशात मिळणार नाही असं लुसलुशीत घरगुती मटन, पन्हाळा आणि... गगनबावडा!

जूनच्या तिसर्‍या आठवड्यात वडील आणि मोठ्या भावाबरोबर घरी आलेल्या सुरेखाला भर पावसाळी हवेत दिल्या बुलेटवरून चक्क गगनबावड्याला घेऊन निघाला होता.

हवेत एक प्रणयी गारवा, ओलेपणा, रस्ते मोकळे ढाकळे आणि बुलेट!

अजून काय पाहिजे????

शहर मागे पडल्यावर हळूच सुरेखाने आपला उजवा हात दिल्याच्या खांद्यावर ठेवला. त्या स्पर्शाने दिल्याला आणखीनच चेव आला. बुलेटच्या वेगात काही के.एम्.पी.एच. ची भर घालून ती जोडी सुसाट निघाली. तशी सुरेखा आणखीनच बिलगली दिल्याला!

लग्न ठरवण्याचा सर्वात पहिला आणि अत्यंत महत्वाचा फायदा दिल्या आज अनुभवत होता. लग्नापुर्वी बायकोला टू व्हीलरवरून फिरवणे!

वातावरणाची नशा आता मनांवर उतरू लागली. दिल्याच्या खांद्यावर आपली हनुवटी ठेवून सुरेखा दिल्याच्याच उडणार्‍या केसांनी होणार्‍या गुदगुल्यांनी बेजार झाली. मग त्याचा सुड म्हणून तिने त्याच्या कानांचा चावा घेतला. त्यामुळे आणखीनच उत्तेजित होऊन दिल्या मागे रेलला. तिने त्याला पुढे ढकलले. मग दिल्या मुद्दाम बुलेट उजवीकडे, डावीकडे पुन्हा उजवीकडे अशी वळवत तिला घाबरवू लागला. खरोखरच घाबरल्यामुळे तिने दिल्याला घट्ट धरले. धरल्यानंतर दिल्या मिश्कील हासलेला पाहून तिने त्याला मागून बुक्या मारल्या. आणि अत्यंत मनोहारी प्रवासाचा शेवटचा व त्याहून मनोहारी टप्पा दृष्टीपथात आला.

गगनबावडा!

देशातील विक्रमी पाऊस होणार्‍या ठिकाणांपैकी एक!

कोल्हापूर गोवा रोडवरील हा अतिशय उंचीवरचा असा स्पॉट! येथून जो घाट सुरू होतो तो थेट कोकणात, म्हणजे सिंधुदुर्गमधे उतरतो आणि तिथून तो रस्ता पुढे गोव्याला जातो.

एक अप्रतिम घाट! एकीकडे भुईबावडा, एकीकडे गगनबावडा!

गगनबावड्याला शासकीय विश्रामस्थळ आहे. आणि घाटात धबधबेच धबधबे!

सुरेखा बघतच राहिली ते निसर्ग सौंदर्य! आणि दिल्या 'हे' निसर्ग सौंदर्य बघत राहिला. अनिमीष लोचनांनी दरीकडे पाहणारी सुरेखा ओलेत्या हवेमुळे आत्ता विलक्षण सुंदर दिसत होती. तिचे दिल्याकडे आणि त्याच्या नजरेकडे लक्षच नव्हते. अचानक ती म्हणाली...

"काय वातावरण आहे नाही???"

असे म्हणून दिल्याकडे पाहते तर तो आपला नजर तिच्या चेहर्‍यावर खिळवून उभा! पुतळ्यासारखा!

'हट' म्हणून त्याच्या गालावर टिचकी मारून हसत सुरेखा घाटातून काही पावले चालून पुढे गेली अन माकडांची एक मोठीच्या मोठी फलटण समोर आली.

घाबरून सुरेखा धावत पुन्हा दिल्यापाशी आली.

'माकडे काही करत नाहीत' ही माहिती दिल्याने पुरवली तरी आता तिला तिथे जायचेच नव्हते. ती होती तिथेच उभी राहिली.

लांबवरून... खूप खूप लांबवरून एक ढग जवळ येताना दिसत होता.

ही अशी दृष्ये गगनबावडा, राजमाची (राजमाची म्हणजे लोणावळ्यातील राजमाची पॉईंट नव्हे, तिथुन जे राजमाची गाव दिसते ते गाव) येथे सहज दिसतात.

आणि अशा ढगांचा 'आपल्याला वाटतो' त्यापेक्षा खूपच जास्त वेग असतो. पाहता पाहता तो ढग येऊन कोसळूही लागला.

एक प्रेमी युगुल नखशिखांत भिजत होते. आणि भिजता भिजताच एकमेकांकडे हासून पाहत होते. शेवटी पावसाचा जोर इतका वाढला की मार लागू लागला. थांबताच येईना!

बुलेट कशीबशी काढत दिल्या आणि सुरेखा परत निघाले. अंधारून आलेले होते. शासकीय विश्रामगृहात नेऊन बुलेट थांबवून दोघेही धावत त्यातील रेस्टॉरंटमधे गेले. कुणीच नव्हते एका म्हातार्‍याशिवाय!

"दादा, चहा मिळेला का???

"हा... मिळेल.. बसा.... हितं शेकोटी केलीया... आंग पुसायचं आसंल तर थिकडं खोली हाय..."

सुरेखा खोलीत गेली. ती आल्यानंतर दिल्या गेल्या. नंतर मस्त वाफाळणारा चहा घेत घेत दोघे बसून राहिले पाऊस थांबण्याची वाट बघत! म्हातारा म्हणाला...

"हितलं करडू कुटं गेलं???"

"आम्हाला काय माहीत??"

"मी बघून येतो... तवर कोन आलं तर थांबवून ठिवा... काय??"

"होय..."

म्हातारा निघून गेला आणि.....

... दोघांची नजरानजर झाली....

सुरेखा - ... काय बघतोस...??
दिल्या - तुला...
सुरेखा - .... का?? इथे इतका सुंदर निसर्ग आहे की...
दिल्या - त्याच्याहून तू सुंदर आहेस...
सुरेखा - असुदेत.. नजर लागेल.. बघू नकोस...

मात्र तिच्या अपेक्षेप्रमाणेच दिल्या उठला. त्याने तिच्या खांद्यांना धरून तिला उभे केले. एकमेकांच्या डोळ्यात डोळे असे मिसळले जणू भारलेल्या हालचालीच!

मग हळूच दिल्याने तिला जवळ घेतले... आणि.........

लग्न करण्याचे मगाचच्या कारणापेक्षाही कितीतरी महत्वाचे कारण तो आज शिकला.....

देअर इज नथिंग लाइक किसिंग युअर लव्हर.. इन द रेन्स ऑफ गगनबावडा...

गुलमोहर: 

एकदम मस्त. आवडले.
बेफिकिरजी, तुम्हि कशाला इतका विचार करताय ....तुम्हि लिहित जा ..आम्हि रसिक वाचत जातो...
पु. ले.शु.

खरच छान...... पु ले शु
बेफिकिर जी, तुम्ही लिहित रहा जे तुमच्या संवेदनशील मनाला पटत, ते तुमच व्यक्तिस्वातंत्र्य आहे.....
आणि तुम्हाला समाजातील विविध पैलुंची ऊत्तम जाण आहे ते तुमच्या लेखणीतुन पोचलय आमच्यापर्यंत.
तुम्ही लिहित रहा, खात्री आहे तुम्ही या generation चे उत्तम लेखक ठराल........
खुप खुप शुभेच्छा..........................

वाहवा....... कधी हा भाग संपला हे कललं सुद्धा नाही.... लै भारी भूषणशेठ.. Happy

हे तर मलाही पटलं तुम्ही लोकांची लैच "फिकीर" करताय. सोडून द्या की.
त्याचप्रमाणे असं लिहीले पाहिजे होतं तसं लिहीले पाहिजे होतं ह्या लोकांची मला भारी मजा वाटते.
एकदा माझ्या आजीला चायनीज करुन खायला दिले तर प्रतिसाद बघा.
कांदा आणि भोपळी छान शिजवायला हवे होते पोरी.
दोरया (नुडल्स) जरा बारीक कापायला पाहिजे होत्या.
मसाला जरा आंबट झाला.
गरम मसाला आणि लाल मिरची थोडी जास्त वापर.
वरुन नारळ आणि कोथिंबीर पेरायला पण विसरलीस बघ.
थोडक्यात काय तर आपल्याच इच्छेप्रमाणे आणि आवडीप्रमाणे लोकांनी वागायचे, असले ऐकून हसून सोडून द्यायचे अजुन काय.

बाकी वनदास लामखेडे आज लै बेस वाटला.

खुप लिहायचय पण सवडीने.....
बाकी नेहमीप्रमाणे......सरस..............

सावरी

मैत्री आणि प्रेम........
प्रत्येकाला आपल्याशा करणार्या...माणसान्मधे अमुलाग्र बदल घडवुन आणतात या...
जगातील सगळ्यात अनमोल गोष्टी....छान गुम्फन घातलीत.....खुप गोड...

असच लिहीत रहा...

सावरी

अहो बेफिकीर तुम्हि काय सगळा महाराष्ट्राचा नकाशा पाठ केला आहे का? कोणत्यहि जागेचे वर्णन तुम्ही असे करतात जसे तुम्हि रोज तिथे फिरायला जातात. छान मस्त....>>अगदी अगदी!

पुढचा भाग येउ द्यात लवकर

>>काय राव... तुम्ही लोकांची लैच "फिकीर" करताय .....>> हो हेही खर्रर्रच आहे... Happy

परेश...
मी मुम्बईत असते.....

खर म्हणजे काय? खरचचच...........
आणि मला महित नाहि ना तुम्हि कुठे असता (म्हणजे पुणे, भारतात कि आणि कुठे), तुम्हाला सांगु काय मस्त वाट्ल, माझ्याकडे शब्द नाहित, त्यांना भेटल्यावर पुर्ण संध्याकाळ मि माझ्या आवडत्या ठिकाणावर घालवलि. ईतका विनम्र आहे हा माणुस, काय सांगु ......
स्पिचलेस..

ईतका विनम्र आहे हा माणुस, काय सांगु ........त्यान्च्या लेखणातुन ते जाणवतच्...शिवाय आपल्या प्रतिसादाना उत्तरे देतानाही हे दिसत....

मलाही खुप आवडेल भेटायला बेफिकीरजीना....आणि लवकरच भेटणार आहे.....

सावरी

"बाळा... लय शिक हां??? लय शिक.... मी खाईन मार... काही व्हत नाय... आपलंच कुकू हाय.. तेवढा अधिकार हायंच त्यांचा... पर तू लय शिक.. लय मोटा व्हं.... मोटी नोकरी कर... आन भनीच्या लग्नाचं समदं सोनं दामदुपटीनं दे बापाला हां?? तेवढीच आशा हाय माझ्या मनात.... होशील ना व्हं मोटा?? ऐकशील ना एवढं??"
वा बेफिकिरजी!!!!!!!!!!, रडवलत मला, थोड्यावेळ वाटलेकी तुम्ही माझीच कहाणी सांगत आहात. जणू काही माझीच आई सांगत आहे.

असं कस म्हणता बेफिकीरजी तुम्ही तुमच्या लिखाणात वाचकाला रडविण्याची व हसविण्याची ताकद आहे,तरी तुम्ही म्हणता की हे लिखाण दर्जेदार नाही.

बेफिकिर,
मी तुमचे लिखाण नेहमी वाचते. कधीमधी प्रतिसादही देते. तुम्ही खुप छान लिहिता. सहसा प्रत्येक लेखकाचा एक बाज असतो विनोदी वगैरे, पण तुम्ही मात्र सगळ्या प्रकारच लिहिता. फक्त एक वाटत approach जरा negative aahe. जीवन सन्घर्षपुर्ण असत मान्य पण कथानायक त्यावर मात का नाही करु शकत. थोडासा positive द्रुष्टिकोन असला तर उत्तम. वाचकाना प्रेरणा मिळेल.

या क्षणी लिहीत आहे. दहा मिनिटे लागावीत. ही प्रतीक्षा सरळ सरळ खरी समजून मी स्वार्थीपणे स्वत:लाच शाबासकी देत आहे.

मनःपुर्वक आभार!

-'बेफिकीर'!

असे नाही ओ,
सकाळ पासुन मी किती वेळा येउन गेले आहे तेच मला समजत नाही.
म्हणुन.
आता पुन्हा दोन दिवस नाही येता येणार...........
लवकर लवकर लिहा प्लिझ.

मी ही कादंबरी वाचलीच नव्ह्ती, २ दिवसात सगळे भाग वाचले.
वाचताना फार ह्सलीय्, रडलीय आता तर पुढच्या भागाची फार उत्सुकता ही वाढली आहे.
खरच खुप खुप खुप छान लिहिता तुम्ही ,
फार आवडली. मस्त

ह्या एकाच भागात किती ते प्रसंग गुंफलेत तुम्ही, बेफिकीरजी... अगदी गुंतून गेले... अशोकची फुलणारी प्रेमकथा, वनदासचे घरातल्या जबाबदार पुरुषाची भुमिका स्विकारणे आणि निभावणे, दिल्या आणि सुरेखाचे ते पावसातले भेटणे... अहाहाहा Happy
आणि कोल्हापूरविषयी तुम्ही दिलेली माहितीही अगदी नवीन माझ्यासाठी... तिकडचा प्रसिद्ध पांढरा आणि तांबडा रस्साही अजून कधी खाल्लेला नाही...आता हे शहर पहावेसे वाटतेय... बघू कधी जमते ते... Happy

सर्वांच्या प्रेमळ प्रोत्साहनाचे मन:पुर्वक आभार!

१. दिल्या सातार्‍याचा होता - होय! मी खरे तर ऑनलाईन डायरेक्टच लिहीत असल्याने असे काही संदर्भ चुकतात. लक्षात आणून दिले की बरे वाटते. आता प्रॉब्लेम असा झालाय की कोणत्या भागात तो सातार्‍याचा होता असे लिहीले आहे तेच आठवत नाही आहे. ते तपासत बसावे लागेल. असो. त्यामुळे आता चूक दुरुस्त करत नाही.

२. बार्बी - आपले प्रतिसाद अनेक मुठी मांस चढवून गेले. आपले विशेष आभार मानतो.

३. खरे तर सर्वांचेच विशेष आभार! आधीच्या काही प्रतिसादांनी मी वैतागलो होतो त्यामुळे तसे लिहीले होते. पण माझ्या लेखनासाथी इतके आवर्जुन सगळे धावून आले म्हंटल्यावर मी नम्रपणे आभार मानत आहे. या जनरेशनचे उत्तम लेखक ही कॉम्प्लिमेन्ट मी खरी समजून स्वतःला आज एक कॉकटेल डिनर देणार आहे. खरच!

४. आजम - आपल्याला एका संवादातून काही प्रसंग आठवले हे मी आपल्या संवेदनशील मनाचे यश समजतो.

सारा, सावरी, कैलास, संदिप, सनि, सानी, स्वप्नसुंदरी, श्वे, बार्बी, पाषाणभेद, एक पाकळी, साची, तृप्ती, रोहित ८३, परेश, स्मिता बिनिवाले, तृष्णा, सिंदरेला, दीप्स, वीरा, मावळा रोहित, शैलेश, मंदार जोशी, विद्या बालन, आर्या १२३, मोनालिप, सुरश, रचु, पारिजातक, सुमेधा, चिनुक्स, निवांत, फुलपाखरू, निलिमा, दीपान्त, वाकडी तिकडी आणि जुयी,

आपल्या सर्वांचे मन;पुर्वक आभार!

लोभ असाच राहील अशी आशा!

-'बेफिकीर'!

कोल्हापूर! एक मस्त, मस्त, मस्त शहर!

दिलदार स्वभावाची पण मजा मजा करणारी माणसे, रंकाळ्यावरचे धारोष्ण दूध, खासबाग किंवा आहारची तर्री आणि कट यांनी नटलेली लालभडक झणझणीत मिसळ, अत्यंत उत्तम दुधाचा चहा, शुद्ध पाणी, भन्नाट आणि तब्येत सुधरवणारी हवा, अख्या देशात मिळणार नाही असं लुसलुशीत घरगुती मटन, पन्हाळा आणि... गगनबावडा!

देअर इज नथिंग लाइक किसिंग युअर लव्हर.. इन द रेन्स ऑफ गगनबावडा
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

मस्त मस्त मस्त....
बेफिकीर राव ईतक भारि कोन लिहित का हो????

Pages