ओल्ड मंक लार्ज .... ऑन द रॉक्स - क्रमशः - भाग १२

Submitted by बेफ़िकीर on 4 October, 2010 - 08:40

अत्यंत गंभीर चेहरे धारण करून होस्टेलवरची सोळा मुले रूम नंबर २१४ मधे उभी होती. प्लस मूळचे त्या रूममधले चौघे होतेच! एका मुलाने एक चित्र काढलेले होते ते अशोकने लावलेल्या तीन चित्रांच्या बाजूला चिकटवून ठेवण्यात आले होते. चार सिगारेटी पेटवून त्या चित्राशेजारी उदबत्ती म्हणून खोचण्यात आल्या. निरांजन म्हणून काडेपेटीची काडी पेटवायची, दोन चार वेळा ओवाळायची आणि विझली की दुसरी पेटवायची या कामावर आत्मानंदची नेमणूक सर्वानुमते झालेली होती. कारण त्याचे वडील कीर्तनकार होते. अशोक सर्वात पुढे हातात एक रिकामी ओल्ड मंकची बाटली व एक चमचा घेऊन उभा होता. हे टाळ होते. बाटलीवर ठेक्यात चमचा वाजवून तो आवाज करणार होता. आणि वनदासने आपली संपूर्ण काव्यप्रतिभा एम्प्लॉय करून जी आरती रचलेली होती ती सुरू झाली. सर्वजण टाळ्या वाजवू लागले. अत्यंत गंभीरपणे! संध्याकाळचे साडे सात वाजलेले! ही आरती झाल्यानंतरच जेवायला जायचे असा आजपासून नियम करण्यात येत आहे अशी घोषणा वनदासने प्रत्येक रूममधे जाऊन केल्यामुळे दिडशेपैकी सोळा जण भक्तिभावाने आलेले होते.

आरती सुरू झाली.

जय देवी जय देवी वर्धिनी देवी
कशा सांभाळशी एवढ्या ठेवी
जय देवी जय देवी!!

पावली पावली भक्त गण जमले
स्वप्नात देवीला आणूनी दमले
पेटले पेटले शेवटी शमले
इतरांना बघता थोडे वरमले

जय देवी जय देवी!!

शिर्डी रामेश्वर मथूरा काशी
तीर्थस्थळे सारी होस्टेलपाशी
यौवनाची भक्ती, तारुण्य राशी
देव शोधायास तू कुठे जाशी

जय देवी जय देवी!!

बोला.... वर्धिनीदेवीचा..... विजय असो!

वर्धिनीच्या भक्तांचा ..... विजय असो!

प्रसाद म्हणून गुटख्याचे एक एक पाकीट वाटण्यात आले. मग उदबत्यांपैकी एक एक एकेकाने उचलली अन फुंकत फुंकत आपापल्या खोलीत गंभीरपणे निघून गेला.

आत्मानंद - कसं प्रसन्न वाटतं नाही आरती केली संध्याकाळची की?
अशोक - हो ना! मन फुलून येतं! ..... पावित्र्याने...
आत्मानंद - आता??? .... आता काय करायचं??
अशोक - आता प्रसाद वाटून झालेलाच आहे सगळ्यांना... तीर्थ घ्यायचं आता...
वनदास - ए... आता प्यायला नको... फार होते आपली...
अशोक - ते मात्र खरंय वन्या... मी तर घ्यायलाच नको...
दिल्या - सर्व नालायक फुटकळ हरामखोर वर्धिनी भक्तांनो...
अशोक - .......
दिल्या - नवीन नियमानुसार आजपासून या खोलीत दारूचा विषय बंद...
अशोक - अरे.. एवढं काही नाही माझ्या तब्येतीचं...
दिल्या - जाड्या... तुझ्या नसलेल्या तब्येतीसाठी हा नियम नसून हा माझा नियम आहे...
वनदास - म्हणजे कधीच प्यायची नाही??
दिल्या - नाही..
वनदास - का पण हा घोर अन्याय??
दिल्या - सुरेखा...
वनदास - काय सुरेखा??
दिल्या - सुरेखाने आजच मला शपथ घातली आहे...
वनदास - कसली??
दिल्या - पुन्हा दारूला शिवलास तर मला विसर...
वनदास - हे ती कधी म्हणाली..
दिल्या - आज दुपारी कॅन्टीनमधे...
वनदास - तिच्यायला... तुम्ही भेटलात??
दिल्या - तिच्या आईला नाही भेटलो... ती आणि मी भेटलो..
अशोक - दिल्या??? तू अन सुरेखा भेटलात???
दिल्या - का? होणार्‍या बायकोला भेटू नये???
अशोक - अरे पण... तू...
दिल्या - काय तू??
अशोक - ..... तू... म्हणजे एकदम....सगळ्यांदेखत कॉलेजमधे तिला...
दिल्या - तिचाच निरोप होता...
अशोक - कुणी दिला निरोप??
दिल्या - स्वाती शानबाग...
अशोक - कधी??
दिल्या - आज सकाळी...
अशोक - हे.. हे सगळं तू सांगत नाहीस हां दिल्या..
दिल्या - तुम्हा हरामखोरांना सांगूच कशाला पण मी?? आणि आत्ता सांगतोय ना??
अशोक - काय म्हणाली ती??
दिल्या - ती म्हणाली दारू किंवा ती...
अशोक - दारू किंवा ती???
दिल्या - ... हा!
अशोक - मग??
दिल्या - मी म्हणालो तू....
अशोक - दिल्या.... तू दारू सोडलीस??
दिल्या - आज दुपारीच... तुम्हाला माहीत नाही?
अशोक - दिल्या... हल्ली तुझ्या विनोदांचा दर्जा घसरू लागलाय...
दिल्या - कणीक तिंबून हवी असेल तर पुढचे वाक्य बोलशील...
वनदास - अरे पण ... तिला समजलं कसं?? तू पितोस ते??
दिल्या - तिला पहिल्या वर्षापासूनच माहीत होतं... तुम्ही आजची पोरं आहात..
वनदास - दिल्या... तू काही दारू सोडत नाहीस.. बेट लागली...
दिल्या - बेट गेली तेल लावत.. दारू सोडली मी... आणि पुन्हा इथे असल्या आरत्या करायच्या नाहीत..
अशोक - का?
दिल्या - ही खोली आमच्या पवित्र प्रेमाचं प्रतीक आहे...
आत्मानंद - यांच्या भाषेत आमुलाग्र बदल झाल्याचं जाणवंत नाहीये का तुम्हाला??

हा मुद्दाच अजून कुणी ध्यानात घेतलेला नव्हता. आई, बहीण, विविध जनावरे यांच्या उल्लेखाने नटलेल्या शिव्यांच्या ऐवजी दिल्या आता हरामखोर, नालायक वगैरे अत्यंत सौम्य शिव्या देत होता. आज आल्यापासून त्याने एकही बुक्की मारलेली नाही हेही सगळ्यांना आत्ताच जाणवले. टेन्शनच आले सगळ्यांना! गेला की काय कामातून?

अशोक - दिल्या... थट्टेला लिमिट असते...
दिल्या - तेच तुला सांगतोय... पुन्हा माझ्या प्रेमाची थट्टा करू नकोस..
वनदास - अश्क्या.. लेका बाटली काढ... याला चढलीय...

दिल्या वनदासला मारायला उठला अन लगेच थांबून म्हणाला..

दिल्या - आजपासून हिंसक वागणे बंद ...!

हा असला वाघाचा बकरा होणे कुणालाच पसंत नव्हते.

वनदास - म्हणजे... मी...मी जर... कविता ऐकवली तर...चा..चालेल????
दिल्या - खुश्शाल... सगळ्यांना स्वातंत्र्य आहे... एवढंच काय... तुला म्हणून सांगतो..
वनदास - ... क... काय??
दिल्या - प्रेम जुळलं की कविता करावीशी वाटतेच माणसाला...
वनदास - ... दिल्या.... हे.... हे तू बोलावस???
दिल्या - बोलावस?? भिकार...सॉरी... शिवी द्यायची नाही नाही का?? मी चार वर्षांपुर्वीच...
वनदास - ....काय .... काय केलंवतंस चार वर्षांपुर्वी...

एवढा तगडा दिल्या लाजताना कुणीच आजवर पाहिलेले नव्हते.

दिल्या - चार... चार ओळी लिहिल्या होत्या सुरेखावर...

फारच भीषण शांतता पसरली. आणि तीन चार सेकंदातच अशोक खदाखदा हसायला लागला. त्याचे ते हासणे पाहून दिल्या त्याला बुकलायला उठला पण लगेच बसला.

आता सगळेच हसायला लागले. दिल्याची कविता ही कल्पनाच सहन होत नव्हती कुणाला!

आत्मानंद - ऐकवा की...

यावर आणखीन शांतता पसरली. खरंच ऐकवतो की काय? तर दिल्याने खरच कपाटावरून काहीतरी जुनाट सामान काढून त्यातून कशातूनतरी एक कागद काढला की?? जुनाट, फाटायला आलेला!

तो हातात घेऊन दिल्या पलंगावर बसला. सगळ्यांच्या चेहर्‍याकडे पाहून त्याने खात्री करून घेतली. की कुणी हसणार बिसणार तर नाही ना?

दिल्या - वाचू का??

सगळे मारायला आणलेल्या कोंबड्यांसारखे बघत होते. आता दिल्याने परवानगी विचारणे म्हणजे विनोदच होता! पण चेहरे पाहून तरी दिल्याला वाटले, 'हो' म्हणत असावेत.

दिल्या - नीताने आमच्या प्रेमाला नाट लावल्यानंतर सुचलेल्या या चार ओळी आहेत... नीट ऐका...

ही धमकी फार भयंकर होती.

"कोयनेच्या धरणाखाली होतो तसा भुकंप झाला आज सुरेखा..
.... आकाशातल्या घारीने जमीनीवरच्या सापाला उचलावे तसे माझे काळीज हरवले..
...लांडग्याने मेंढीचा लचका तोडावा तसे नीताने तोडले आपले नाते...
..... पण मी येईन... आणि येईन तेव्हा.... सर्व जग नष्ट करून तुला माझी करेन..."

रामसेच्या पिक्चरमधले भूत बोलते तशा आवाजात दिल्याने या चार ओळी वाचल्या. ही कविता होती की धमकी हेच कुणाला कळेना!

टाळ्या तर वाजवायला हव्याच होत्या! आत्मानंदने चष्म्यातून अतीगंभीर डोळे करून टाळी वाजवली. मग वनदासने आणि शेवटी अशोकने! कवितेवर कुणीच बोलेना!

दिल्या - कशी वाटली??
वनदास - भयंकर..... ...भयंकर छान आहे..

खरे म्हणजे 'भयंकर आहे' असेच म्हणायचे होते त्याला! पण क्षणात दिल्याचा हिंस्त्र झालेला चेहरा पाहून त्याने त्याची दाद संपादीत केली.

आत्मानंद - पण त्या तुम्हाला मद्यपान करू नको म्हणाल्या की या खोलीत??
दिल्या - दोन्ही..
आत्मानंद - म्हणजे इतरांना स्वातंत्र्य आहे ना?
दिल्या - घंट्या... आपलं ... नाही आहे स्वातंत्र्य...
आत्मानंद - या निर्णयाचा फेरविचार कराल का?

पुन्हा दिल्याचा चेहरा बदलला तसा आत्मानंद मागे सरकला.

अशोक - माझं काय म्हणणं आहे दिल्या...
दिल्या - ..... बोल...
अशोक - आम्ही प्यायला काय हरकत आहे??
दिल्या - कोचा.... सॉरी... तुम्ही प्यायलीत तर मला नाही का वाटणार प्यावीशी??
अशोक - मग पी की?
दिल्या - अश्क्या... आता मात्र सभ्यपणा सोडून बांबू...
अशोक - ऐक तर माझं?? तू पिणार नाहीस ना?
दिल्या - अजिबातच नाही...
अशोक - मग प्रश्नच काय उरलाय? ज्याला जे करायचं ते करूदेत? मी म्हंटलो तर तू पिणार आहेस का?
दिल्या - लेका तुला मनाई आहे प्यायला..
अशोक - पण या गरीब बिचार्‍या वन्याचं काय चुकलं?? त्याने का नाही प्यायची??
दिल्या - वन्याला गरीब म्हणणार्‍याच्या... वन्या गरीब आहे??
अशोक - नसेल गरीब... पण.. त्याने प्यायली तर काय झालं? तुझं नियंत्रण आहे ना मोहावर??
दिल्या - ठीक आहे... प्या भड... आपलं... प्या....

यावर एकच कल्ला झाला.

पण आज मात्र प्यायची नाही यावर अशोक आणि वनदास ठाम होते. त्यामुळे आत्मानंदची गोची झाली.

आत्मानंद - माझ्या मनात एक विचार आला..
अशोक - बका.... बका बका... लवकर बका तो विचार...
आत्मा - हे दोघे आज भेटले... ही एक शुभच बाब आहे...
अशोक - मग??
आत्मा - त्या निमित्त आपण एक ... म्हणजे तोंड गोड करण्यापुरतं तरी..
अशोक - वन्या... ल्येका बघता बघता हेच पियक्कड होत चाललंय...
आत्मा - तुम्ही माझी प्रतिमा अशी मलीन करू नका....
अशोक - आता प्रतिमा कोण?? च्यायला कालपर्यंत तर अलका होती...
आत्मा - शी! काय बोलता... दिलीप... यांना सांगा की??
अशोक - तो काय बोलणार? त्याचा उतरवलाय नक्षा त्या मुलीने...
दिल्या - अश्क्या... आईशप्पथ मार खाशील तू माझा...
अशोक - हिंसा वाईट बरं?? हिंसा वाईट!
दिल्या - नाय नाय! हिंसा किती वाईट तेच कळेल तुला आता..
अशोक - आम्ही वहिनींना सांगू... तुझी जबाबदारी आमच्यावर आहे...

हे ऐकल्यावर मात्र दिल्या खरच उठला. अशोकही उठून पलिकडच्या पलंगावर पळत जाऊन बसला. शिव्या द्यायच्या नसल्यामुळे दिल्या नुसताच पुटपुटत रागाने पाहात होता अशोककडे!

दिल्याची ताकद त्या शपथेत अडकल्याचे सिद्ध झाल्यावर आता अशोक आणि वनदास मोकळेपणाने हसायला लागल. यापुढे त्याचा मार खावा लागणार नव्हता.

वनदास - सिगारेटचं काय म्हणाली ती??
दिल्या - सिगारेट साखरपुड्यानंतर सोडायची असं ठरलंय...
आत्मा - तुम्ही मद्य सोडलंत, सिगारेटही सोडणार, लग्नानंतर काहीतरी सोडायल ठेवा की?
दिल्या - लग्नानंतर तुझं थोबाड पाहणं सोडणार आहे मी...
आत्मा - वनदास.. तुम्हाला रस आहे का मद्यपानात?
वनदास - आज नाय..
आत्मा - तुम्हाला??
अशोक - मला आहे... पण आज नाही घ्यायची...
आत्मा - ठीक आहे.. म्हणजे मला एकट्यालाच माझी साथ द्यावी लागणार...
अशोक - आत्म्या... मुर्खासारखा वागू नकोस... तू फारच प्यायला लागला आहेस..
आत्मा - हे ज्ञान आपणंच दिलंत मला..

आत्मानंदने सरळ अशोकच्या पिशवीत हात घालून एक अर्धवट उरलेली बाटली काढली. त्याला व्हिस्की, जीन, रम अशा प्रकारांबाबत काहीही देणे घेणे नव्हते. ज्याच्यातून नशा येते ती दारू एवढेच समजलेले होते.

त्याने सरळ एक पेग भरला. तिघेही त्याच्याकडे पाहात होते. मग काय झाले कुणास ठाऊक! तो एकटा पीत आहे हे अशोकला बरोबर वाटले नाही. त्याने एक स्मॉल भरून घेतला. मग वन्याने नाही नाही म्हणत एक लार्ज भरून घेतला.

आत्मा - तुम्ही दोघांनी माझी साथ द्यायची ठरवलीत त्याचा आनंद वाटला.
अशोक - आत्म्या.. आता पुढचे पंधरा दिवस तू घ्यायची नाही आहेस...
अशोक - का?
अशोक - लेका मी तुला लेक्चर दिलं ते फक्त तुझ्यातून तुझे स्वतंत्र व्यक्तिमत्व जागू शकते हे सांगण्यासाठी.. तू तर ल्येका बसलासच की रोज प्यायला... आं??

खाडकन आत्मा भानावर आला. केवळ आठ दहा महिन्यात आपल्यात केवढा हा फरक??

मी जसा झालो तसे मी व्हायचे होते कुठे?
चाललो आहे कुठे मी, जायचे होते कुठे?

सगळेच गप्प गप्प होते. कुणीच बोलत नव्हते. प्रत्येक जण आपापला विचार करत होता. एकाच खोलीत असूनही काही वेळा माणसे खूप एकटी एकटी असतात. एकटेपण अनुभवतात. अशी वेळ होती ती! आत्मानंद अजूनही पीतच होता. पिता पिता तसाच झोपला. पण झोपण्यापुर्वी त्याच्या मनात दोन विचार आले होते जे त्याचं डोकं प्रचंड फिरवून गेले होते....

एक म्हणजे.... या तिघांकडून जर विरोध होणार असेल तर.... आपण रोज पिणार कसे???

आणि..... आपण... रोज पिणार?? आपल्याला रोज प्यावीशी वाटते?? असं कसं झालं????

==============================================

रिझल्ट लागला! वर्गात आत्मानंद आठवा! सगळी तोंडेच बंद झाली. मग कळलं की अशोकला ५७ % आणि वनदासला ७१ % मिळाले होते.

बापाचा विरोध पत्करून शिकायला आलेल्या वनदासने संधीचे सोने केलेले दिसतच होते. माईल्ड अ‍ॅटॅक येऊनही आणि भरपूर दारू पिऊनही अशोक व्यवस्थित पास झाला होता. तो हुषार कधीच नव्हता. त्याच्या वडिलांनी हेफ्टी डोनेशन भरले म्हणूनच तो इथे येऊ शकला होता. आणि त्यावरूनच त्याच्या भावाचे आणि वडिलांचे वाद झाले असे त्याला वाटत होते. पण नंतर समजले होते की दादाला आपण खूप पितो अन तेही या वयात हे माहीत होते म्हणून तो बाबांशी भांडला होता.

रूमवर जायच्या आधीच आत्म्याने घरी फोन करून सांगीतले तिकडे बुवा ठोंबरे कृतकृत्य झाले. अशोकच्या वडिलांनी सगळ्यांनाच अभिनंदन सांगीतले. अशोक पास झाल्याचा त्यांना प्रचंड आनंद झाला होता. अर्थातच होणार! ज्या मुलाला या वयात हार्ट अ‍ॅटॅक आला तो पास झाला म्हणजे खूप मोठी बाब होती.

प्रॉब्लेम वेगळाच होता. वन्याच्या घरी फोन नव्हता आणि जवळपासही कुणाकडे नव्हता. मग वन्या म्हणाला 'मी पत्र पाठवेन'! आत्मानंद आणि अशोकला वाईट वाटले. त्याला आपल्या घरी हवे तेव्हा बोलता येत नाही याचे! पण वन्या निकाल चांगला असल्यामुळे आनंदात होता.

मात्र! रूमकडे जाताना सगळेच गंभीर झाले. दिल्याला आपला निकाल सांगून दु;ख द्यायचे नाही असे त्यांनी ठरवले होते. पहिल्या वर्षाचे आठ महिने झाले होते. अजून एक सेमिस्टर झाली की दिल्याचा सहवास फक्त रूममधेच मिळणार होता. वर्गात नाही. कारण हे तिघेही पुढच्या वर्गात जाणार होते.

"काय झालं रे चिलटांनो???"

हल्ली दिल्याच्या शिव्या बदलल्या होत्या. दिल्याचा हा प्रश्न कानावर पडताच सगळे एकदम गंभीर झाले.

अशोक - ह्याला.. आत्म्याला चांगले पडले मार्क्स... आम्ही काय.. जेमतेम....
दिल्या - पास झालात ना???

सगळ्यांनीच मान खाली घातली. दिल्याने विल्सचा एक प्रदीर्घ झुरका घेतला आणि आढ्याकडे बघत धूर सोडत म्हणाला....

"तिच्यायला मीही पास झालो राव......"

ते विधान ऐकणे, ऐकून समजणे, समजून खरे वाटणे आणि खरे वाटून पूर्ण पचणे या प्रक्रिया व्हायला जे काही दोन, तीन सेकंद गेले असतील तेवढीच शांतता!

नंतर नुसता धिंगाणा झाला धिंगाणा रूम नंबर २१४ मधे! आज अश्क्याने बुक्या मारल्या! आत्मानंद ही ही करून पहिल्यांदाच खूप जोरात हासला. तो जोरात हासल्यावर कसा दिसतो हे तिघांनाही आजच समजले.

अशोक - दिल्या... आज तुझी प्रेमातली शप्पत बिप्पथ काशीत घालायची...
दिल्या - नाय नाय... असलं नाय...
अशोक - असलं नाय अन तसलं नाय चालायचं नाय... प्यायलीच पाहिजे..
दिल्या - नाय लेका तुम्ही प्या...
अशोक - जमणार नाय... वन्या... आज आर सी पाहिजे...
वन्या - माझ्याकडे चाळीस आहेत फक्त... मनी ऑर्डरच करत नायत च्यायला घरचे....
आत्मा - माझ्याकडे पन्नास ...
अशोक - माझ्याकडे सत्तर..
आत्मा - केवढ्यालाय??
अशोक - काय केवढ्यालाय??
आत्मा - ते आर सी का काय ते...
अशोक - पावणे दोनशे..
आत्मा - मग जमतायत की..१६० झाले...
अशोक - वरचे??
आत्मा - दिलीप देतील की..
दिल्या - कानाखाली आवाज काढीन... मी दारू पीत नाय अन प्यायला पैसे देतही नाय...
आत्मा - तुम्ही पास झालात हा आनंद निश्चीतच त्या पात्रतेचा आहे..
दिलीप - तुझी भाषा कॉलेज सोडायच्या आधी बदलून दाखवीनच मी....

शेवटी 'जीव गेला तरी सुरेखाला कळू द्यायचं नाही' अशा शपथा सगळ्यांनी खाल्यावर मग दिल्या 'हो' म्हणाला आणि आज पहिल्यांदाच... चौघांनीही... अ‍ॅन्टिक्विटी नावाची आजवर प्यायलेल्या सर्व ब्रॅन्ड्सपेक्षा भारीची व्हिस्की विकत आणली... तीनशे चाळीसला खंबा! वरचे सगळे पैसे दिल्याचे! चकण्याचा दर्जा मात्र तोच ठेवला होता. दाणे, कांदे आणि फरसाण! जोडीला विड्या आणि गप्पा!

अशोक - दिल्या... मला एक समजत नाही... तू नीट बघितलायस ना निकाल??

यावर दिल्याने एक पेग बरेच दिवसांनी झालेला असल्यामुळे किंचित सैलसर वागणे सुरू झालेले असल्यामुळे एक अस्सल कोल्हापुरी शिवी हासडली. ती शिवी ऐकून तिघांनीही त्याला त्याच्या शपथेची आठवण करून दिली. मग पुन्हा गप्पा सुरू झाल्या.

वनदास - हा चमत्कार घडला कसा पण??
दिल्या - हा भाडखाऊ मोठ्यांदी नाय होय वाचत सगळं रूमवर.. तेच आलं पेपरात.... कानावर यायचंच!

अशोक आणि वन्याच्या नजरा आत्मानंदकडे अत्यादराने वळल्या. अत्यंत जाड भिंगाच्या चष्म्यातूनही आत्मा लाजल्याचे तिघांना जाणवले.

तेवढ्यात आरती करायला काही मुले आली.

वनदास - आज आरती नाहीये बे... आज वर्धिनी देवींना बरं नाहीये..

चेकाळल्यासारखी हसत पोरं निघून गेली.

आत्मा - मी आज पहिल्यांदा त्यांना जरा निरखून पाहू शकलो...
अशोक - कुणाला?
आत्मा - वर्धिनी मॅडम यांना..
अशोक - मग?? आपले अनुभव कथन करा की?
आत्मा - गरीब आहेत स्वभावाने..
दिल्या - ह्याच्यायला ह्याच्या...
आत्मा - हे अजूनही शिव्या देत आहेत हे नमूद करतो मी या निमित्ताने..
दिल्या - सोलून काढीन तुला.. ती दिसते कशी तर म्हणे स्वभावाने गरीब आहे..
आत्मा - आज त्यांनी हिरवे पातळ परिधान केले होते..
अशोक - बर..
आत्मा - त्यात त्यांचा दाक्षिणात्य सावळा तुकतुकीत रंग खुलून दिसत होता..
अशोक - बर...
आत्मा - एवढे पाहून मी नजर वळवली..
दिल्या - कामाचं नाय हे ... नाय कामाचं..
आत्मा - तुम्हाला माझ्याकडून त्यांच्या अगप्रत्यंगांचं वर्णन ऐकायच आहे... ते मी होऊ देणार नाही..
वनदास - तिचा स्वभाव बिभाव ऐकायचा नाहीये.. गप्प बस तू...
आत्मा - तुमचं पुढे काय झालं हो??
वनदास - कसलं??
आत्मा - त्या... दीपाताई आणि तुम्ही..??
वनदास - ते सांगायला... मला हा पेग संपवून पुढचा भरणं आवश्यक आहे...

वन्याने तो पेग संपवला आणि निवांत दुसरा पेग भरून तो लांब जाऊन बसला. तो लांब गेला की तो कविता ऐकवणार असे एक समीकरण दृढ झालेले होते.

वनदास - एक ऑफर आलीय मला...
अशोक - कसली??
वनदास - गॅदरिंगच्या संयोजन समितीत ती आहे.. मला कविता वाचायला सांगीतली आहे...
दिल्या - मग वाच की??????

दिल्याच्या तोंडून हे उद्गार ऐकताच पाघळलेला वनदास टुणकन उडी मारून परत पहिल्या जागी बसला आणि दिल्याला म्हणाला..

वनदास - तुला राग नाही आला??
दिल्या - त्यात कसला राग?? पण जर का त्या कवितेत टिळक आणि झाशीची राणी आली ना तर मात्र..
वनदास - नाही नाही... ती एक शृंगारीक कविता आहे...
अशोक - ऐकव ना आत्ता..
वनदास - अजून पूर्ण नाही झाली...
आत्मा - मीही नाव नोंदवलंय....
अशोक - कशात???
आत्मा - स्नेहसंमेलनातील विविध गुणदर्शनासाठी....
अशोक - तू काय करणार बे??
आत्मा - व्याख्यान...
अशोक - व्या.... कसलं??? कशावर???
आत्मा - मुलींच्या वसतीगृहासाठी आचारसंहिता या विषयावर...

दिल्याने कित्येक दिवसांनी एक उत्स्फुर्त बुक्की मारली भिंतीवर! वनदासचा नेहमीचाच प्रॉब्लेम झाला. धड घोट घशातून आत जाईना धड बाहेर येईना!

अशोक - आत्म्या... साल्या .... मार खाशील मार तिथे...
आत्मा - मुळीच नाही.. माझे विचार अत्यंत पवित्र असून ते मी धीटपणे मांडणार आहे..
दिल्या - ऐकव बरं एखादा विचार...
आत्मा - उदाहरणार्थ.. मुलींनी नाहिल्यावर गॅलरीत येऊन केस वाळवू नयेत व विंचरू नयेत...
अशोक - ..... का बे??
आत्मा - ते पाहून मुलांच्या नीतीमत्तेत घट होते....
दिल्या - खरंच मार खाणार आहे हे..त्या दिवशी...
आत्मा - आणि... मैत्रिणींबरोबर चालताना खिदळू नये..
वनदास - ... का? ... आं???
आत्मा - त्या मधूर नादाने चित्तवृत्ती प्रफुल्लीत होऊन लक्ष उडते...
अशोक - पुढे???
आत्मा - कॉलेज ही शैक्षणीक संस्था आहे...
अशोक - हे आंगनमधून पडणार्‍या हाडांवर जगणार्‍या कुत्र्यांनाही माहीत आहे..
आत्मा - या पवित्र वास्तूत मोगर्‍याचा गजरा माळून भावना भडकवू नयेत..
दिल्या - म्येला... म्येला हा गॅदरिंगमध्ये...

ऐन रंगात आलेली पार्टी अ‍ॅन्टिक्विटीच्या बाटलीत थेंबही उरलेला नव्हता तेव्हा संपवावी लागली.

एकमेकांकडे बघून, दिल्याही पास झाल्याच्या आनंदात, सगळे हसून थट्टामस्करी करत असताना दिल्याने फार गंभीरपणे ते वाक्य उच्चारलं....

"आत्मा नसता तर मी पास झालो नसतो.... साला स्वतः प्यायला लागलाय... पण मला पास केलं.. माझ माझ्या आईशी परत जुळवून दिल... अन त्यामुळे सुरेखा माझी होणार हे निश्चीत झालं... आत्म्या.... आयुष्यात तुला केव्हाही काहीही लागलं तरी हक्काने दिल्याकडे यायचं पहिल्यांदा... नाही हा शब्द ऐकायला मिळणार नाही...."

हे वाक्य संपलं तेव्हा सगळेच आत्म्याकडे पाहात होते. प्रचंड लाजलेला आत्मा आता झोपणार होता.

पहिल्या वर्षी दिल्याचे आयुष्य स्थिरस्थावर केले होते त्याने! पुढच्या दोन वर्षात वन्या आणि अश्क्याचे आयुष्यही तोच स्थिरस्थावर करणार होता....

.... अशा रीतीने रूम नंबर २१४ चा हिरो होणारा आत्मानंद ठोंबरे... स्वत: मात्र चवथ्या वर्षापर्यंत......

..... एक झिरो होणार होता..... एक.... झिरो......

गुलमोहर: 

लै भारी...... धन्यवाद भूषणराव....... दोन भागांची मेजवानी दिलीत.

एकदम छानं.....पण बेफिकीर जी एक कळकळीची विनंती आहे....please please ह्या तरी कथेचा तरी शेवट गोड करा...आग्रहचं असा नाही... पण मला गोड शेवट आवडेल Happy

मला आम्ही कॉलेजला असताना दिव्या भारतीच्या निधनाची शोकसभा घेतली होती त्याची आठवण झाली.

चान्गला आहे भाग!

"आत्मा नसता तर मी पास झालो नसतो.... साला स्वतः प्यायला लागलाय... पण मला पास केलं.. माझ माझ्या आईशी परत जुळवून दिल... अन त्यामुळे सुरेखा माझी होणार हे निश्चीत झालं... आत्म्या.... आयुष्यात तुला केव्हाही काहीही लागलं तरी हक्काने दिल्याकडे यायचं पहिल्यांदा... नाही हा शब्द ऐकायला मिळणार नाही...."

बेफिकीर जी,

ग्रेट.............!!

पु ले शु.....

नमस्कार बेफिकीर जी ,मला तुमचं लिखाण खूप आवडतं.
हा भाग खूप छान झालाय. दिल्या सुधरत आहे वाचुन बरं वाटलं...
पु ले शु.....

प्लिज बेफ़िकिरजि तुम्हास कळकळिचि विनंति आहे त्तुम्हि आत्मानंदाचा शेवट म्हनजे या कथेचा शेवट दु:खद करु नका रोज जे जिवन जगतो ते काय कमि दु;खि असते प्लिज या कथेचा शेवट सुखद असावा हि विनंति आहे
आशा आहे मान्य कराल बाकि नेहमि प्रमाणे या कथेसुधा गुंतले आहे

प्लिज बेफ़िकिरजि तुम्हास कळकळिचि विनंति आहे त्तुम्हि आत्मानंदाचा शेवट म्हनजे या कथेचा शेवट दु:खद करु नका रोज जे जिवन जगतो ते काय कमि दु;खि असते प्लिज या कथेचा शेवट सुखद असावा हि विनंति आहे
आशा आहे मान्य कराल बाकि नेहमि प्रमाणे या कथेसुधा गुंतले आहे

या कथेचा शेवट दु:खी नाहीच आहे.

आपल्या सर्वांचे प्रतिसादाबद्दल व प्रोत्साहनाबद्दल मनापासून आभार!

-'बेफिकीर'!

मस्तच झाला हा भाग.. खुप आवडला..
खरच संगत बिघडवतेही आणि सुधारतेहि Happy
<<या कथेचा शेवट दु:खी नाहीच आहे. >> अरे वा मग लवकर लवकर पुढचे भाग येऊ देत की Happy

अरे वा, मज्जाच कि, दिल्या पास झाला,

पण राव वनदास चि कविता नाय वाचायला भेटलि, मि अगदि चहा घेऊन बसलो वन्या च्या ह्या वाक्यानंतर (वनदास - गॅदरिंगच्या संयोजन समितीत ती आहे.. मला कविता वाचायला सांगीतली आहे...
) Sad Sad

बाकि ग्रेट.

बरं झालं समजलं, या कथेचा शेवट दु:खी नाहीये.... पण आत्मानंद झिरो होणार असेल, तर शेवट आनंदी कसा? झिरो झालेल्या आत्मानंदमधे परत सुधारणा झाली आणि अशोक त्याला कारणीभूत झाला, असं जर दाखवणार असाल, तर, शेवट गोड होईल Happy कारण आत्मानंदमधल्या ह्या बदलालाही अशोकच कारणीभूत आहे ना...
बाकी हाही भाग छानच! Happy