ओल्ड मंक लार्ज .... ऑन द रॉक्स - क्रमशः - भाग ९

Submitted by बेफ़िकीर on 29 September, 2010 - 02:55

"ही इज ओके नाऊ"

सापत्नीकर सरांचे हे शब्द ऐकल्यावर दीर्घ सुस्कारा सोडला सगळ्यांनी!

आत्मानंदने 'मला अलका आवडते' हे विधान केल्यानंतर हसताना ९६ किलोच्या अशोक पवारला अती धूम्रपानामुळे व अती मद्यपानामुळे अचानक घाम फुटला आणि हात पाय कापायला लागले. डावा खांदा दुखायला लागला आणि आधार घेतल्याशिवाय नुसते बसणेही अशक्य व्हायला लागले. वय १९! त्याच्याकडे लक्ष जाऊन त्याची परिस्थिती समजायलाच सगळ्यांना मिनिटभर लागले होते. मात्र त्याचक्षणी दिल्याने आपल्या अफाट ताकदीने त्याला लिटरली खेचत रूमच्या बाहेर आणला आणि बोंबाबोंब करून पोतनीस सरांना कारसकट आणायला काही जुन्या मुलांना पिटाळले. पोतनीस कॉलेजपासून फक्त एका मिनिटाच्या अंतरावर राहात. सापत्नीकर मात्र निवासी प्रोफेसर होते. काही शिक्षकांसाठी ज्या पाच, सहा खोल्या होत्या त्यातील एकात ते राहात होते. त्यांना आवाज आल्यावर ते लगेच धावले. सात, आठ मिनिटातच पोतनीसांची मारुती पोर्चमधे आली आणि जवळपास सहा मुलांनी मिळून अशोकला त्यात कोंबले. अशोक एक शब्द बोलू शकत नव्हता कारण तो बेशुद्ध पडला होता. आणि धाप लागल्यासारखा श्वास घेत होता. केवळ पंचवीस मिनिटात पोतनीसांनी रुबीला मारुती टच केली आणि रुबीच्या स्टाफने गांभीर्य ओळखून अतीदक्षता विभागात अशोकला हालवले.

पंधराव्या मिनिटाला सापत्नीकर जेव्हा बाहेर येऊन जमलेल्या पंधरा वीस मुलांच्या जमावाला 'ही इज ओके नाऊ' म्हणाले तेव्हा सगळ्याच घाबरलेल्या मुलांनी हुश्श केले आणि दिल्या, वनदास, आत्मानंद आणि सापत्नीकर स्वतः सोडले तर आता सगळेच निघून गेले.

अशोकच्या घरचा फोन नंबर वगैरे अशोककडेच होता. तो आत्ता आय सी यू मधे होता. त्यामुळे त्याच्या वडिलांना आत्ता काहीच सांगणे शक्य नव्हते. सापत्नीकरांनी थोडी कॅश दिल्याकडे दिली व काही वेळ थांबून तेही निघाले.

वनदास - दिल्या... ... अ‍ॅ... अ‍ॅटॅक आलाय का रे??
दिल्या - ............ हं..

दिल्याच्या हुंकारामुळे सन्नाटा पसरला. तिघांच्याही मनावर फार गंभीर परिणाम झाला होता या गोष्टीचा!

आत्मा - यांच्या.. घरी....
दिल्या - आपल्या कुणाकडेच नंबर नाहीये..
वनदास - मी सरळ रात्रीच्या बसने निघू का??
दिल्या - मलाही तेच वाटत होत... पण ... आत्ता अश्क्यापाशी थांबणं जास्त गरजेचं आहे... काही धावपळ करावी लागली तर...

अशा प्रसंगांमधे सरळ दिल्याकडे नेतृत्व द्यायचं असतं हे कुणीही न ठरवताही आपोआप ठरलेलं होतं!

वनदास - पैसे कुणी भरले?
दिल्या - सापत्नीकर..
आत्मानंद - अतीदक्षता विभागात जाता येत नाही..
दिल्या - एकाला थांबायची परवानगी आहे.. पण बाहेरच्या कॉमन हॉलमधे...
आत्मानंद - मी थांबतो... तुम्ही जा..
दिल्या - तू नको थांबूस.. मी थांबतो..
आत्मानंद - तुमच्या लक्षात येत नाहीये.. आत्ता काहीच करावं लागणार नाहीये.. उलट आत्ता तुम्ही विश्रांती घेतलीत तर उद्या सकाळी ताजेतवाने होऊन याल.. तुम्ही आलात की मी रूमवर जाईन..
पुन्हा दुपारी येईन...सगळ्यांनी एकदम दमणं योग्य ठरणार नाही..

दिल्याने काही वेळ विचार केला आणि सापत्नीकरांनी दिलेले दोन हजार रुपये आत्म्याकडे देत म्हणाला..

" आम्ही निघतो.. एक सेकंद झोपू नकोस... पहाटे चारला दोघेही येतो.. मग तू जा... समजलं का??"

दोघे निघून गेल्यावर आत्मानंदची नजर काही वेळ हॉस्पीटलवर भिरभिरली आणि आढ्यावर स्थिर झाली.

डॉक्टरांचे शब्द सगळ्यांनीच नीट ऐकले होते.

'ऑलरेडी ही इज सो ओव्हरवेट... अ‍ॅन्ड चेन स्मोकिन्ग... ड्रिन्क्स.. धिस हॅज टू हॅपन... नो मॅटर व्हॉट द एज इज गाइज....'

केविलवाणा झालेला आत्मानंद आज रात्री खूप विचार करू शकणार होता...

आणि ... करतही होता...

'बाबांना आपण केलेला फोन हे आपलं आयुष्यातील पहिलं वहिलं धाडस! तेही आपण केलं ते अशोकने घेतलेल्या बौद्धिकामुळे! काय बरोबर काय चूक तेच कळत नाही. बाबा निश्चीतच आपल्या भल्याचं सांगणार हे माहीत आहे. पण.. आपलं आयुष्य म्हणजे फक्त आईबाबांचं ऐकणं? असं कसं? सगळंच त्यांचं ऐकायचं असेल तर ही रूमच बदलायला पाहिजे आपल्याला! खरंच बदलावी का? उद्याच अर्ज करावा? ठीक आहे, सगळे मजा करतात, एकमेकांवर सगळ्यांच प्रेम आहे, पण... व्यसनं? इतकी व्यसनं?? आपण जालन्याला रात्री वाटेत लांबवर एखादा दारुडा दिसला तर रस्ता ओलांडून पलीकडून जायचो... नको उगाच शिवीगाळ ऐकायला म्हणून... आणि आज?? केवळ महिन्या दिड महिन्यात आपण स्वतःच प्यायला लागलो?? आपण सोडू शकतो हे बरोबर आहे...पण.. सोडू शकतो हा आत्मविश्वास आहे म्हणून प्यायला हरकत नाही असे कुठे आहे?? दिलीपचे ठीक आहे.. त्याची तब्येत, त्याचे वय पाहता तो अधिक पितो! वनदासही आधी प्यायचा हे ठीक आहे... पण अशोक?? अशोक म्हणतो की तोही प्यायचा.. पण इतकी? रोज? हे मनोरंजनाचे साधन आहे की व्यसन? व्यसनच असणार? का नाही एखादा दिवस हे सगळे असा घालवत जेव्हा म्हणतात की आज काही प्यायची वगैरे गरज वाटत नाहीये?? एक निश्चीत आहे.. आपल्यात आणि या तिघांमधे प्रचंड फरक आहे. आपण आजही दारू सोडू शकतो.. हे कुणीच नाही सोडू शकत! अर्थात, आता तब्येतीसाठी अशोकला सोडावी लागेल म्हणा.. सिगारेटही सोडावी लागेल.. पण.. पण असं म्हणतात की प्रत्यक्ष जो सिगारेट ओढतो त्याच्यापेक्षा आजूबाजूच्यांनाच अधिक... आपण... आपण तर बारा बारा चवदा चवदा तास धुरातच वावरत असतो... काय करायला हवं आपण? आपण इतके कसे बदललो?? बरोबर! बदलण्याचं कारण हेच आहे... आपल्याला स्वातंत्र्य मिळालं! घरात जर पहिला घोट घेतला असता तर... पहिला घोट घेतानाच बाबांनी भावनिक होऊन आपल्याशी अबोला धरला असता ... आणि... आपला विवेक जागा झाला असता... पण बाबा नव्हतेच ना रूमवर! आपण वेगळे राहात आहोत... बाबांना अजूनही आपल्याबद्दल तोच विश्वास आहे... की आत्मू काही पीत नसणार... पण भीतीही असेलच मनात.. आईशी बोलत असतील.. त्याचे सगळे मित्र पिणारे आहेत म्हणून... थोडक्यात काय... तर... आपल्याला आपणच सावरायचंय.. आई बाबांच्या शिकवणीचा रतीब संपलेला आहे... आता आत्मानंद ठोंबरे... अशोक म्हणतो त्याप्रमाणे .. एक स्वतंत्र माणूस आहे आणि... त्याचं भलं बुरं त्यालाच पाहायचं आहे... "

"अशोक पवार पेशंट... कोण आहे का????? "

खाडकन आत धावला आत्मानंद! नर्सने त्याला खालून आणखीन काही औषधे आणायला सांगीतली. रुबीचा केमिस्ट चोवीस तास चालू असायचा. आत्मानंदने त्वरेने सर्व औषधे आणून दिली अन विचारले..

"दोन मिनिटे बघू शकतो का? त्यांना?"

नर्स - तसं आत थांबायलाही हरकत नाही.. पण नुसतं शेजारी खुर्चीवर बसून राहायचं.. बोलायचं नाही अजिबात!

आत्मानंद अशोकच्या बेडपाशी पोचला. गोळ्यांच्या अंमलात शांतपणे निरागस झोपलेल्या अशोककडे पाहताना आत्मानंदला ढवळून येत होतं! किती हसवतो, किती दिलदार आहे, किती मस्त बोलतो, किती चैतन्यमय मन आहे त्याचं... असं कसं झालं.. असं व्हायला नको होतं!

कुणाचंच लक्ष नाही पाहून आत्माने अशोकच्या घामेजलेल्या कपाळावर हात फिरवायला सुरुवात केली. अजून त्याला स्वतःच्या तोंडाला मगाचच्या दिड दोन पेग्जचा वास येत होता. पण केव्हाच उतरलेली होती.

खूप वेळ तो अशोकच्या कपाळावरून हात थोपटत होता. मग पुन्हा विचार सुरू झाले.

' काय करतो नेमकं आपण? आई वडील अपेक्षा ठेवतात, इथे पाठवतात, जमवलेल्या पैशांचा एक मोठा भाग आपल्या शिक्षणासाठी वापरतात... काय करतो आपण? हे असे व्यसनी होऊन त्यांनाच उलट काळजी लावतो... आता उद्या याच्या वडिलांना समजले की ते बिचारे स्वत:चे वय विसरून कसेही धावत इथे येतील, याला बघेपर्यंत त्यांच्या जीवात जीव नसेल, इथे येऊन त्याला असा पाहून कोलमडतील मनातच, अशोक त्यांच्याकडे पाहू शकणारही नाही कदाचित, गुंगीतच असेल औषधांच्या, मग ते आपल्याकडे आशेने पाहतील, आपण त्यांना धीर देऊ, सगळं सोडून ते इथे बसतील, अशोकला क्षणभरही नजरेआड होऊ देणार नाहीत... आणि... अशोक पूर्ण बरा झाल्यावर ते निघून गेले की....

... सेलेब्रेशन म्हणून परत.... परत ... ओल्ड मंक... छे! हे काय खरं नाही... आपल्याला.... आज अशोकला जे झालंय ते जर.... आपल्याला झालं असतं तर?? निश्चीतच दिलीप, वनदास आणि अशोकने जीवाचे रान करून आपल्याला इथे आणले असते... पण... तसे मुळात होण्याला आणि आई वडिलांना घोर लावण्याला कारणीभूत कोण?? आपणच ना???

.... सोडली... आपण तरी दारू सोडली... सिगारेट तर ओढतच नाही आपण... दारू मात्र सोडली.. काय मिळतं पिऊन? एक तात्पुरता हलकेपणा... जो गेल्या गेल्या डोकं दुखायला लागतं... मग तसं होऊ नये म्हणून म्हणे दाबून खायचं... जेवण जातं कुठे प्यायल्यावर?? त्या सोड्यानेच पोट भरल्यासारखं वाटतं! कांदा, फरसाण अन दाणे खाउनच पोट भरतं! त्यानी आणखीन पित्तं! पण गुंगीमुळे झोप लागते. अन मग... जाग येते तेव्हा... प्रचंड डोकं दुखत असतं... उठवतही नाही...आवाज नकोसे होतात, सिगारेटचा वास नकोसा होतो, तोंडावरची चव नकोशी होते... कॉलेजला जावसं वाटत नाही, नुसतं पडूनही सहन होत नाही... आणि मग... कसाबसा दिवस काढला की.... संध्याकाळची थंड हवा पुन्हा... पुन्हा म्हणते.... घे रे?? त्यात काय एवढं? सुरुवातीला होतोच त्रास... पण ते दोन तीन तास कसं... मस्त वाटतं की नाही?? नाही... ते मस्त वाटणंच नेमकं त्यागायचं आहे आपल्याला... तेच.. तेच त्यागायचं आहे... '

आत्मानंद विचारात असताना अचानकच अशोकची झोप चाळवली. महत्प्रयासाने डोळे उघडले तर अशोकला आत्मा दिसला. खुणेनेच त्याने 'काय झालं' असं विचारलं!

आत्मानंदला एकदा वाटलं! अगदीच छोटासा अ‍ॅटॅक होता असं सांगावं! मग त्यातही त्याला क्रौर्य जाणवलं! याला आत्ता सांगणं योग्य नाहीच!

आत्मा - चक्कर आली होती तुला.. पित्त झाल्यामुळे.. खात नाहीस बरोबर.. झोप आता...

अशोकने पुन्हा डोळे मिटले. तेवढ्यात नर्स आली. नर्सला पाहून मात्र आत्मानंदचे विचार बदलले. तिचा झकपक पोषाख आणि कोरलेल्या भुवयांमुळे ती चांगलीच चटपटीत दिसत होती. अर्थात, तिला त्याची जाणीवही होती व असल्या नजरांची तिला किंमतही नव्हती. मात्र आत्मानंदने डोळे भरून तिला पाहून घेतलं! मग अचानक त्याच्या मनात अलकाचा विचार आला.

अलका देव! एक मान वरही न करणारी, स्वतःच्याच विश्वात रमलेली छोटेखानी दिसणारी मुलगी! आत्मानंदचे तिच्याकडे लक्षही गेले नसते. पण त्या दिवशी नेमके हे चौघे पार्किंगमधे असताना आत्मा ज्या सायकलला रेलून उभा होता ती तिची होती आणि ती त्यानेच तिला काढून दिल्यावर तिने आभार प्रदर्शक असे जे स्मितहास्य केले होते ते खास... अगदी खास आत्मानंदपुरतेच होते हे आत्माला माहीत होते! बाकी तिघांचे या घटनेकडे फारसे लक्ष नसले तरी एक मुलगी एकदम तिथे आल्यामुळे त्यांच्या आधीच्या गप्पांमधे खंड पडला होता. लगेच सभ्य गप्पा सुरू झाल्या होत्या.

त्या एकाच स्मितहास्याने आत्मानंदला आयुष्यात पहिल्यादाच प्रत्यक्ष जीवनातील एक मुलगी आवडली होती. आत्तापर्यंत शकिलाचा फोटो आवडायचा, सुवर्णा मॅडमना पाहणे आवडायचे! पण खास स्वतःसाठी अशी एक मुलगी आवडणे हा प्रकार पहिल्यांदाच झाला होता. आणि त्यानंतर तो बर्‍याचदा तिच्याकडे पाहायचा. पण ती मात्र स्वतःच्याच विश्वात मश्गुल असायची.

वनदास - दीपा या प्रेमकथेतील वळणे अभ्यासत अभ्यासत आपलीही प्रेमकथा पुढे न्यायची व ती व्यवस्थित पुढे जावी यासाठी सर्वात पहिल्यांदा आपले रहस्य या तिघांनाही सांगायचे असे ठरवून त्याने ते सांगून टाकले खरे! पण त्यानंतर पाचच मिनिटात अशोकसाठी धावपळ करावी लागली.

अलका देव! साध्याच घरातील असावी! दिसायला आपली चार चौघींसारखीच! पण कोणतीही मुलगी अप्सरा भासण्याचे आत्माचे वय! त्यामुळे तिचे ते स्मित हास्य त्याच्या मनात अगदी खोलवर रुतून बसले होते. पुन्हा एकदा तिच्या सायकलला रेलून उभे राहावे की काय असा त्याच्या मनात विचार येत होता. पण शाश्वती वाटत नव्हती! ती येईलच, आलीच तर पुन्हा आपण सायकल काढून देण्याची परिस्थिती होईलच, झालीच तर तिला कसलाही संशय न येता ती तशीच हसेलच आणि हसली की आपण दोन वाक्ये बोलू शकूच वगैरे!

रात्रीचे अकरा वाजले होते. हॉस्पीटलमधेही आता तशी सामसूमच झाली होती. काय करावे काही समजत नव्हते. नुसते अशोकपाशी बसण्यापेक्षा जरा हॉस्पीटलमधेच चक्कर मारून येऊ अशा विचारांनी आत्मा उठला. आय सी यू च्या बाहेर येऊन एक मस्तपैकी आळस देऊन जिना उतरून खाली आला. मस्त गार हवा पडली होती. स्टेशन परिसरातील ट्रॅफिक अजूनही बर्‍यापैकी चालू होते. हॉस्पीटलच्या गंभीर वातावरणात फिरण्यापेक्षा जरा स्टेशनच्या पुलापर्यंत चालून येऊ अन एखादी वडापावची गाडी दिसली तर वडापाव खाऊन घेऊ असा विचार करून आत्मा परत वर आला. नर्सला विचारले तर ती म्हणाली आय सी यू मधल्या पेशंटबरोबर कुणी नसले तरीही आम्ही सगळी काळजी घेतोच! तुम्ही या जाऊन! फक्त अर्धा पाऊण तासात परत या म्हणजे झालं! काही आणायला लागलं तर बरं!

आत्मानंद पाय मोकळे करायला रुबीच्या बाहेर पडला.

ट्रक्स आणि कार्स वेगात जात होत्या. तेवढी जाग सोडली तर एकही टपरी नव्हती. साधा क्रीमरोलही मिळणे शक्य नव्हते. उगाच काय फिरायचे, नाहीतरी खायला काही मिळणारच नाही असे वाटून आत्मा परत फिरणार तोच.... लांबवर ... कैलास... बार अ‍ॅन्ड रेस्टौरंट... अशी झगमगीत पाटी दिसली..

कैलास... बार अ‍ॅन्ड रेस्टौरंट... निळ्या, जांभळ्या आणि लाल अशा तीन रंगात झळकणारी ती पाटी पाहून आत्म्याला पोटात बरेच वेळापासून कावळे कोकलत असल्याची जाणीव झाली.

झपझप पावले उचलत तो तिथे पोचला आणि आत गेला... चिकन करी, फिश असे वास येत होते. आत्म्याला पोटात ढवळल्यासारखे वाटत होते. इथे काहीतरी शाकाहारी मिळेल की नाही ही शाश्वतीच नाही अश्या विचाराने तो निराश झाला होता. तेवढ्यात वेटरने 'अकेला है ना?' असे विचारून एका टेबलकडे बोट दाखवले. आत्मा मुकाट तिथे जाऊन बसला.

'आपण काय खातो आहोत ते जर दिसू शकले तर ते तोंडात घालावेसेच वाटणार नाही' याची खात्री असल्यामुळे की काय, हॉटेलमधले दिवे अत्यंत मंद होते. म्हणजे, ते दिवे लागले आहेत इतकेच कळत होते.

खाडकन आत्म्याच्या पुढ्यात पाण्याचा ग्लास आपटला आणि एका वैतागलेल्या वेटरने विचारले..

"बोलो... "

आत्म्याने दोन मिनिटे मागून घेतली अन मेन्युकार्ड चाळायला घेतले. पहिलेच पान होते.... बार मेन्यू!

अ‍ॅन्टीक्विटी - १६० ९० ५० ३०
ब्लेन्डर्स प्राईड - १५५ ८५ ४५ २८
रॉयल चॅलेंज - १४५ ७५ ३५ २२

क्वार्टर, हाफ क्वार्टर, सिक्स्टी आणि थर्टीचे भाव एका रांगेत आणि कॉलम्समधे सर्व प्रकारच्या दारूच्या ब्रॅन्ड्सची लिस्ट! व्हिस्की, व्होडका, जीन, ब्रॅन्डी, रम! शेवटी बीअरचा भाव बाटलीनुसार आणि कडकपणानुसार!

झटकन पान बदलले आत्म्याने! तरी त्यातही त्याला जाणवले. ओल्ड मंकची क्वार्टर येथे ६० रुपयांना होती. वाईन शॉपमधून आणलेला खंबा, म्हणजे चार क्वार्टर्स, फक्त दोनशे रुपयांना पडायचा! काय साले पैसे काढतात सर्व्हीस देणार म्हणून!

पुढच्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत असलेल्या संपूर्ण मेन्यूमधे चिकन, फिश आणि मटन यांनी ८५ % भाग व्यापलेला होता. काहीच नको खायला असा विचार मनात आला खरा, पण तेवढ्यात आठवलं! आता एकदा आत गेलो की पहाटेपर्यंत काहीच मिळणार नाही. त्यापेक्षा निदान भात तरी खावा!

मगाशी ऑर्डर ऐकण्यासाठी हातघाईवर आलेला वेटर आता मात्र कुठेच दिसत नव्हता. आत्म्याने बरेचदा सगळीकडे पाहिले. शेवटी, येईल तेव्हा येईल असा विचार करून... अगदी हळूच... मेन्यूचे पहिले पान पुन्हा उघडले... आणि शेजारून पुन्हा वेटरचा आवाज आला...

"जल्दी बोलो साब.. पौने बारा बजे गाडी जाता डिपार्टमेंटका यहांसे... "

केवळ अर्ध्या क्षणात कयामतच्या काळातल्या वादळी उलथापालथी अनुभवलेल्या आत्म्याने पुढचा मागचा कोणताही विचार न करता ऑर्डर देऊन टाकली....

"नाइन्टी ओल्ड मंक... हाफ राईस... आणि दाल!"

"सोडा?"

"सोडा... आईस..."

"लास्ट ऑर्डर है ना??"

"हां.. एक काम करो.... वन ट्वेन्टी ओल्ड मंक करो..."

हे शेवटचंच! आजची शेवटची! आता नाही! उद्यापासून हा विषयच नाही. आज आपण आधीच प्यायलेली आहे. अजून प्यायली काय आणि नाही प्यायली काय! एकच! आज एकशे वीसचे ४५ - ४५ असे तीन पेग करू... आणि संपलं! दारू हा विषय संपला!

आणि ४५ चा दुसरा पेग संपवून तिसरा पेग भरताना आत्म्याला भुकंपासारखा धक्का बसला.

मागच्या अंधार्‍या भागातून येऊन, आत्म्याला पास होऊन पुढे जाऊन, ते दोघे भरपूर प्यायलेल्या अवस्थेत बिल देऊन बाहेर पडत होते....

... दिलीप आणि वनदास.. !!!!

पाहिलं असतं तर? विषयच संपला असता आपला! पण किती मस्त वाटतंय! जणू समोरची सगळी माणसे म्हणजे आपले अनुयायीच! तिसरा ४५ चा पेग संपण्याआधी आत्म्याने कसेबसे भाताचे चार घास खाल्ले. सोडा प्यायल्यामुळे तेवढाही भात जात नव्हता. मग मस्तपैकी तिसरा पेग संपवून ....

... बुवा ठोंबरे या कीर्तनकारांचा मुलगा आत्मानंद...पुन्हा आय सी यू मधे अशोक पवारपाशी आला तेव्हा....

आपण येताना कॉमन रूममधे नेमकं ते पाहिलं की आपलं डोकं फिरलंय हेच त्याला समजत नव्हतं! पुन्हा अत्यंत त्वरेने तो कॉमन रूममधे गेला तर... खरोखरच... अलका देव आणि बहुतेक.. तिची आई... दोघीही मुसमुसत रडत होत्या आणि एक जोडपे त्यांचे सांत्वन करत होते....

ते पाहूनच आत्मा हादरला. आपण प्यायलेल्या अवस्थेत कसं विचारणार काय झालं? आधीच आपण आहोत हॉस्पिटलमधे! आपल्याला इतकं समजत नाही की कुणाला माहीत झालं की आपण पिऊन आलो आहोत तर आपल्याला हाकलून देतील. त्यात इथे ही?? काय झालंय काय?

आत्मा पटकन बाथरूममधे गेला. भरपूर चुळा भरून अन तोंडावर पाण्याचे कित्येक हबके मारून त्याने आरशात पाहिले. डोळे तर लाल दिसतच होते. पण.. निश्चीतच... वासही येत असणार! त्याने काही चुचत नस्ल्यामुळे साबणाए तोंड धुतले अन पुन्हा आरश्यात पाहिले. स्वतःला तरी काहीही फरक जाणवत नव्हता, इतकेच कीतोंड जरा स्वच्छ वाटत होते. पण... आत्ता या परिस्थितीत इतर काहीच करणे शक्य नव्हते. तो पुन्हा कॉमन रूमकडे धावला अन सरळ अलकाच्या समोर जाऊनच उभा राहिला.

आत्मा - काय झालं??

अलकाने, तिच्या आईने अन त्या जोडप्यानेही आत्माकडे पाहिले. पटकन अलका बोलून गेली.

अलका - बाबांना ..अ‍ॅटॅक आला..

दर अर्ध्या तासाला एक चक्कर अशोकपाशी आणि मधल्या वेळात अलकाच्या वडिलांसाठी जे जमेल ते आत्माने केले. कधी सांत्वन, कधी खालून औषधे आणून देणे तर कधी तिच्या वडिलांजवळ नुसतेच उभे राहणे!

आणि ... पहाटे चारच्या ऐवजी साडे पाच वाजता दिल्या आणि वन्या लालभडक डोळ्यांनी हॉस्पीटलमधे अवतरले तेव्हा....

"तुम्ही बसा आता अशोकपाशी... मी या अलकांना त्यांच्या घरी सोडतो अन कक्षावर जातो"

हे आत्म्याचे वाक्य ऐकून हसावं का रडावं हेच त्यांना समजेना! आणि ते अशोकपाशी पोचले तेव्हा अशोक म्हणाला..

"तिच्यायला इथे एक बिडीपण पीता येत नाय राव... कधी सोडणारेत... बाबांना सांगू नका हां?... एक बरं झालं.. मला इथे आणल्यामुळे त्या अलकाशी आत्म्याचं जुळलं... दिल्या... बिल मी हळूहळू करून फेडीन हां??...फार तर एखादा पेग कमी घेत जाईन... पण बाबांना सांगू नको...काय???? "

नग होता एकेक नग! रूम नंबर २१४ मधे!

दिल्या - झोप लागलीवती का?
अशोक - ह्यॅ! ... कसली नर्स होती राव.. गेली बहुतेक...
दिल्या - आत्म्या थांबलावता ना रात्रभर जवळ?? का घोरत होता??
अशोक - अबे सासर्‍याची काय सेवा केली लेकाने... सासू तर इतकी कौतुकाने बघत होती...
दिल्या - घरचा नंबर सांग...
अशोक - घरी सांगायचं नाहीये...
दिल्या - घरचा नंबर सांग.. डोकं फिरवू नको...
अशोक - वन्या.. याला सांग.. माझ्या बापाला आणखीन एक चिंता नकोय द्यायला...
वनदास - गप रे तू... त्यांना सांगायला नको होय? एवढं झालं तुला...
अशोक - काय झालंय मला??
दिल्या - ..... अश्क्या.... माईल्ड अ‍ॅटॅक आला लेका तुला..

खाडकन अशोकचा चेहरा उतरला. आत्तापर्यंतचा सगळा उत्साह आणि मूड एका झटक्यात गेला. पडलेल्या चेहर्‍याने दिल्याकडे बघत स्वतःच्याच बोलण्याचा विश्वास वाटत नसल्यासारखा म्हणाला...

अशोक - बंडला... मा... रतोयस ना??

दिल्याने मान खाली घातली. वनदासनेही मान खाली घातली. अशोकच्या डोळ्यात पाणी आलं! तिसर्कडे मान फिरवत रडवेल्या स्वरात महाकाय अशोक पवार म्हणाला...

अशोक - नाय पिणार... आयुष्यात हात नाय लावणार दारूला... बिडीपण नाय पिणार... दिल्या.. माझा जीव घेणारी व्यसनं मी नाय करणार ... आईशप्पथ... आईची कसली शप्पथ घेतोय मी.. ती तर गेलीच... बापाशप्पथ नाय करणार व्यसनं दिल्या... पण... फक्त एक कर.... माझ्या बाबांना... मला अ‍ॅटॅक आलावता हे... नको सांगूस.... प्लीज... त्यांना इंजीनीयर होऊन दाखवायचंय म्हणून दारू सोडणार मी... माझं काय रे?? माझं तर लग्नही होणार नाही इतका जाड आहे म्हंटल्यावर..पण.. दादा आणि वहिनी त्यांना सारखे बोलतात रे वाट्टेल तसे.. त्यांची आशा एकच आहे.. मी.. मी सगळं सोडलं या क्षणापासून दिल्या... ते मरेपर्यंत तरी जगलंच पाहिजे मला!

पहाडासारखा दिल्याही डोळे मिटून मान खाली घालून बसला होता. वनदास फक्त रडत नव्हता इतकंच!

वनदास - अश्क्या... काळजी कसली करतोस?? दारू काय? आपण मजा म्हणून प्यायचो... आजपासून रूममधे दारू येणार नाय... ज्याला प्यायचीय त्याने बाहेर जाऊन प्यावी... आणि... तुझ्यावर मी स्वतः लक्ष ठेवणार आहे... दारू अन सिगारेटला हात लावलास तर माझ्याशी गाठ आहे तुझी....

एक दिड महिन्यात मने इतकी जवळ येऊ शकतात? होय! चोवीस तासाचा सहवास असेल तर ते शक्य असते. त्यामुळेच... कदाचित.. होस्टेलची मैत्री कुणीच कधी विसरत नाही...

तीन दिवसांनीच अशोक रूमवर परत आला. कॉलेजला तो आणखीन एक आठवडा येणार नव्हता. तीनही दिवस रात्रीचा आत्मानंदच हॉस्पीटलवर होता. भावी सासरे आणि अशोक दोघांकडे तितक्याच आत्मीयतेने बघत होता. आणि मुख्य म्हणजे हळूच कैलास बारमधे १२० मार्न मग व्यवस्थित पान बिन खाऊन येत होता. दिवसा वनदास आणि दिल्या यायचे. ते सहापर्यंत बसायचे. मग आत्मा यायचा. नेमकी तेव्हाच कॉलेज संपवून अलकाही यायची. या तीन दिवसात अलकाशी आत्म्याचे अगदीच जुजबी बोलणे होत होते. कारण सतत तिच्याबरोबर कुणी ना कुणी असायचे आणि ती दहा वाजता घरी निघून जायची. त्यानंतरच आत्मा प्यायला बाहेर पडायचा. अशोककडे मात्र अत्यंत आत्मीयतेने पाहिले होते तिघांनीही! इतकेच काय? रूमवर आल्यापासून त्याची सेवा शुश्रुषाही केली होती. होस्टेलवरची अन कॉलेजमधली बरीच मुले त्याला भेटून गेली होती. एक दोन प्रोफेसर्सही येऊन गेले होते. साजिद शेखही येऊन गेला होता. आता रूमवर एक रेश्माचा फोटो सोडला तर काहीही नव्हते. नो दारू, नो सिगारेट!

मात्र, या तीन दिवसात दिल्याच्या स्पष्ट सूचनेमुळे एक विचित्र गोष्ट घडली होती. चक्क अशोक रूमवर परत आल्यानंतर त्याने स्वतःच वडिलांना फोन करून कळवले होते की त्याला दोन तीन दिवस बरे नव्हते, आता बरे आहे. एरवी हे कधीच झाले नसते. इतकी मोठी बाब लपवणे हा खरे तर भावनिक पातळीवरचा गुन्हाच मानायला हवा! पण तो गुन्हा केवळ त्या म्हातार्‍या बापाच्या काळजीखातरच केला होता सगळ्यांनी!

त्यातही ते पटकन आले. त्यांनाही बुवा ठोंबरेंप्रमाणेच आदर व प्रेम मिळाले. जाताना त्यांनी दिल्याकडे आणखीन काही पैसे देऊन ठेवले. त्यावर अशोकने 'दादा बोलला नाही ना काही पैशांबद्दल' असे विचारले. त्यावर मात्र अशोकला खरोखरच डोळ्यात पाणी येईल असे वाक्य त्याचे बाबा बोलले.

"बेटा.. मी बाप आहे तुझा.. तुझ्या मित्रांनी लपवलं असलं तरी डॉक्टर मला सांगणार नाहीत का?? सिगारेटी नको ओढत जाऊस.. दारूही पिऊ नकोस अजिबात... व्यायाम कर... तब्येतीची काळजी घे... मी काय? आज आहे उद्या नाही.. पण एक सांगून ठेवतो... यावेळेस मी निघताना तुझ्या वहिनीनेच मला स्टॅन्डवर सोडले.. काळजी घ्या म्हणाली... तिच्याही डोळ्यात पाणी आले होते अशोक.. ते दोघे वाईट नाहीत अजिबात... तू असा वागायचास म्हणून चिडायचे ते... हे जे पैसे मी याच्याकडे देतोय ना?? त्याच्यावरून तुझा दादा माझ्याशी अजिबात भांडणे शक्य नाही... कारण.. हे पैसे त्यानेच स्वतःहून दिले आहेत तुझ्या उपचारांसाठी... येतो मी... काळजी घे..."

वनदासच्या खांद्यावर डोके ठेकवून हमसून हमसून रडला अशोक त्या वेळी!

आपण आपल्या दादा अन वहिनीला काय समजत होतो? आपण व्यसनी असल्यामुळे ते बाबांना आपल्याला एकट्याला ठेवू देत नव्हते. म्हणजे.. म्हणजे... चूक आपली होती... दादाची नव्हती.. कधी एकदा जाईन आणि दादाला कडकडून मिठी मारीन असं झालंय...

अशोकच्या वडिलांनी होस्टेलच्या ऑफीसमधून आत्म्याच्या वडिलांना, बुवांना फोन लावला. त्यांना दारापर्यंत सोडायला गेलेल्या दिल्या, वन्या आणि आत्म्याने ते ऐकले..

"तुमचा मुलगा हिरा आहे हिरा.. सलग तीन रात्री जागून माझ्या मुलाला जगवलंय त्याने.. दुसरे दोघे आहेत तेही हिरे आहेत... त्यांनी दिवसच्या दिवस माझ्या मुलाच्या उशाशी बसून त्याचं सगळं केलंय.. पण लामखडेंकडे फोन नाही आहे आणि राऊत त्यांचा फोन नंबर देत नाही आहे म्हणून त्यांच्याकडे कळवू शकलो नाही... माझा मुलगा या खोलीतल्या त्याच्या मित्रांमुळे वाचला ठोंबरे.. मी तुमचे, तुमच्या संस्कारांचे उपकार नाही विसरू शकत.... "

दिल्या आणि वनदास त्यांना रिक्षेत बसवून परत आले तेव्हाही आत्मानंद खिळून फोनजवळच उभा होता.

'आपल्या वडिलांना ऐकायला मिळालेल्या या शुभ शब्दांइतकी आपली लायकी..... आहे???? अलका नसती तर आपण कदाचित कॉमन रूममधे झोपलोही असतो.... प्यायल्याशिवाय एकदाही हॉस्पीटलमधे गेलो नाही... खरे तर आपण नुसते होतो तिथे..... '

रूमच्या बाहेर जायचे असेल तर एकदम तिघांनी जायचे नाही असा नियम दिल्याने केलेला होता. अशोकपाशी एकाने तरी थांबायचेच!

आपले वडील आत्म्या आणि अश्क्याच्या वडिलांसारखे नाहीत याचे वैषम्य वाटत असल्याने वनदास नाराज होऊन स्वतःच्या पलंगावर नुसताच पडलेला होता.

दिल्या अशोकच्या वडिलांनी आणलेल्या करंज्या खाता खाता विचार करत होता.. आपल्या घरी फोन करून जर सांगीतलं असतं की आपण चांगले आहोत.. तर अश्क्याच्या बापावर आपलं अख्खं घर हसलं असतं....

... आणि त्याच वेळेस... दिलीप आणि वनदास अशोकबरोबर थांबलेले आहेत हे पाहून आणि घड्याळात रात्रीचे साडे आठ वाजलेले आहेत हे पाहून आत्मानंद म्हणत होता....

"मी..... जरा जाऊन येतो हां??... एक साधारण... अकरा पर्यंत येतोच...."

गुलमोहर: 

मी..... जरा जाऊन येतो हां??... एक साधारण... अकरा पर्यंत येतोच...."
>>>

म्हणजे हा परत नाईन्टी ऑन द रॉक्स टाकायला चालला की काय ??? Uhoh

बेफिकीर जी,
नर्सला पाहून मात्र आत्मानंदचे विचार बदलले. तिचा झकपक पोषाख आणि कोरलेल्या भुवयांमुळे ती चांगलीच चटपटीत दिसत होती...........
आपण काय खातो आहोत ते जर दिसू शकले तर ते तोंडात घालावेसेच वाटणार नाही' याची खात्री असल्यामुळे की काय, हॉटेलमधले दिवे अत्यंत मंद होते. म्हणजे, ते दिवे लागले आहेत इतकेच कळत होते. ..........................
...आणि असं बरचं काही हे जे detaling केलंय ना ते तुमच्या कथेत आणिक जान आणतयं !!!!!!

नमस्कार,
काद॑बरी वेगात चालू आहे. खिळवून ठेवणारे लिखाण.

आता पर्यत झालेले सर्व लिखाण वाचले. त्यातील काही स्त्री पात्रा॑ विशयी लिहावेसे वाट्ते आपल्या परवानगी नुसार आणि वेळेनुसार लिहिन.

पु ले शु

इतक्या लवकर...... कुठला माणूस..... व्यसनांच्या आहारी जाऊ शकतो हे पटायला खूप कठीण जातंय......

ते पण इतके संस्कार असताना........

नाही पटलं अजिबात...... Sad

वाहवा बेफिकीर..... खूप चाम्गली गुंफण अन भावनांचे कंगोरे..... ''बार'' च्या निमित्ताने का होईना माझे नाव या कथेत आले याचा आनंद झाला.... जोक्स अपार्ट.... आपण पहिल्या भागात नमुद केलेल्या हीरोची स्टोरी अजून सुरु नाही झाली..... त्याचीच उत्सुकता आहे.

कैलासराव,

खरोखरच त्या नावाचा बार आजही तेथे आहे. म्हणूनच मी ते नांव घेतले. (होप, आपला काही गैरसमज झालेला नाही.)

प्रसन्न अ - मनापासून आभार तुम्ही हा मुद्दा मांडल्याबद्दल! अ‍ॅक्च्युअली मला असे म्हणायचे आहे की आत्ता आत्मानंदला दारू व त्यामुळे येणारा एक हलकेपणा फक्त आवडत आहे. त्यामुळे त्याला प्यावीशी वाटतीय. पण काही चुकल्यासारखे वाटत असल्यास पुन्हा बघतो.

सुरश - (सुरश च ना? सुरेश नाही ना? ) आपल्याला वाटत आहे ते जरूर लिहावेत.

सर्वांच्या प्रेमळ प्रोत्साहनाचे मनापासून आभार!

-'बेफिकीर'!

खरच.. धन्यवाद...
मला फक्त स्पष्टीकरण हवं होतं....

तुम्हाला वाटेल तेच लिहा........
आम्ही वाचूच...........

गैरसमज नसावेत.....

तुमचा प्रचंड मोठा पंखा...;)

बेफिकिर,
ह्याला म्हणतात बेफिकिर ट्च, आज पर्यंत सगळ कस हलक फुलक होत आणि आज एकदम सिरियस, पंचेस खुप छान जमलेत. आत्मा ओव्हर कॉन्फिडंस मधे मरणार बहुतेक. चोघांचि एकमेकांमधलि ईनव्हालमेंट खुप छान मांडलित.

हो, इथले नाव सुरशच आहे. मराठी टाइपायला वेळ लागतो बाकी विषय मनात खुप आधी पासुन घोळतोय. नक्किच तुमच्या लिखाणाला पुरक असेल, कदाचित काद॑बरी नव्याने समोर येईल. प्रयत्न करेन

प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद

बेफिकीर जी...............झक्कास.

पु ले शु.....

अतिशय छान आहे कादंबरी. आवडली
हॉस्टेलच लाईफ कधी अनुभवल नाही... पण खरच असेल एकमेकांच्या संगतीत खुप काहि बदल होत असेल असो.
कादंबरीच्या विषयी बोलायच तर... तिघांच्या भुमिका अगदी अजूक मांडल्या आहेत, अशोकचा संवाद अगदी योग्य शब्दात मांडला आहे.

पण मला वाटत ईतक्या चांगल्या संस्काराचा मुलगा ईतका व्यसनाच्या आहारी जाईल का?
अशोकचा आत्म्याला मिळालेल्या उपदेशामुळे ईतका लवकर बदल होईल ?
कुठेतरी नक्की वाटत, ज्या मैत्रीमुळे त्याला ज्या वाटेवर चालला आहे तिच मैत्री त्याला परत चांगल्या मार्गाला आणेल.
पु.ले.शु. Happy

जुयी,

प्रामाणिकपणे सांगतो की मला तुमच्या प्रतिसादाचा आधार वाटतो व आजही वाटला. तुम्ही 'हे बरोबर नाही' असे जरी म्हणालात तरी मी लगेच लक्ष देतो की यात कशी सुधारणा करता येईल! एक लेखन करण्याचा प्रयत्न करणारा म्हणून हे चुकीचे असले तरी एक माणूस म्हणून मात्र माझे असे होते.

आभारी आहे आपला!

-'बेफिकीर'!

मंदार_जोशी | 29 September, 2010 - 15:06 नवीन

आवडली स्मित
>>>>

काय ?
कादंबरी ?
की अलका ?
की ओल्ड मॉन्क ??

Proud

प्रसन्न अ - एस.एस.एस. लिहीताना जुयी आणि सुजा यांनी खूप प्रोत्साहन दिलं होतं! ती माझी पहिली कादंबरी होती.

आपल्या प्रतिसादाचा का बरे नाही वाटणार आधार?

मंदार जोशी, प्रसाद, मनःपुर्वक आभार!

-'बेफिकीर'!

Happy
Happy
Happy
Happy
Happy

>> आता आत्मानंद ठोंबरे... अशोक म्हणतो त्याप्रमाणे .. एक स्वतंत्र माणूस आहे आणि... त्याचं भलं बुरं त्यालाच पाहायचं आहे...

एकदम पटले.
भिती वाटत होती की पालकांच्या ग्रुहितकांचा पिच्छा सुट्ल्यावर आत्मु मित्रांच्या ग्रुहितकांत वावरणारी
व्यक्ती तर होत नाही ना!
Twists बहोत खुब!

काय गंमत आहे नाही..
ज्या वेळी (२३:५५) हा भाग पोस्ट झाला बरोब्बर त्याच वेळी सावरीची पहिली पोस्ट(२३:५५) आणि ती ही पूर्ण वाचून झाली ?? Wink
बाकी कादंबरी वाचली नाही अजुन पण प्रत्येक भागात 'मी पहिली' ही ऑब्व्हियस प्रतिक्रिया बघून अगदीच रहावलं नाही!
असो, बेफिकिर यांच्या लेखनाला आणि फॅन क्लबला शुभेच्छा !

हे गं काय डीज्जे तु वर जे लिहिलेस तेच मी पण लिहायचे ठरवलेले आणि ही गोष्ट शोधून काढणारी "मी पहिली" अशी बतावणी पण करायची होती मला. काय नशिबात नाही पहिले येणे हेच खरे.

असो आता नवव्या पेगाचा आस्वाद घेत हे दू:ख विसरायला हवे!

ह ह Proud

Pages