ओल्ड मंक लार्ज .... ऑन द रॉक्स - क्रमशः भाग ७

Submitted by बेफ़िकीर on 27 September, 2010 - 15:34

दोस्ती का हाथ मिलाने आया हूं!

दारात उभे असलेल्या मुलाचे हे वाक्य दिल्या सोडला तर कुणाच्याही डोक्यात प्रवेशले नव्हते. कारण बुवा ठोंबरेंना 'आपण दिवसभर फसवले जात होतो' ही जाणीव झाल्यावर त्यांचा जो चेहरा झालेला होता तो पाहून आत्मानंदच काय, अशोक अन वनदासही कधी नव्हे इतके ओशाळलेले होते. आणि त्यात हा मुलगा अचानक येऊन म्हणतो मैत्री करूयात!

अशोक - तू कोण?

साजिद शेखचेही इतरांकडे लक्ष नव्हते. तो रोखून फक्त दिल्याकडेच पाहात होता.

दिल्या - याच्याच मित्राने मार खाल्ला माझा मगाशी!

आत्मानंदला अचानक आठवले की आपले बाबा इतक्या उशीरा तसेच निघून गेले. जेवणार कुठे? स्वारगेटला कसे जाणार? आणि गाडी असेल की नसेल जालन्याला जायला?? तो धावत दाराबाहेर गेला. बर्‍याच वेळाने, जवळपास अर्ध्या तासाने तो परत आला तेव्हा त्याला वेगळेच दृष्य दिसले.

धनराज गुणेची गॅन्ग रूममधे होती आणि आधीच बीअरच्या पाच बाटल्या सात जणांमध्ये संपलेल्या होत्या.

अशोक - भेटले?
आत्मा - नाही...
अशोक - म्हणजे?
आत्मा - दिसलेच नाहीत
अशोक - चौकशी करायचीस ना टपरीवर
आत्मा - ते म्हणतात की एक गृहस्थ चालत चालत गेले. खूप जोरात चालत होते.
अशोक - ही ... चूक झाली कशी पण?
आत्मा - ही चूक तुमच्या कुणाचीच नाहीये! ती पिशवी बाबांनी स्वतःच उचलली, नंतर यांनी घेतली.

खूप काहीतरी गमावल्यासारखे चेहरे झाले होते दिल्या, अशोक, वनदास आणि आत्माचे! इतर चौघांना प्रकरण माहीत नव्हते.

दिल्या - हाच तो.. याच्याच वडिलांना बोललास तू...

पटकन धनराज गुणे पुढे झाला. आत्मानंद दारापाशीच उभा होता... त्याचा डावा हात आपल्या उजव्या हातात घेत म्हणाला...

गुणे - माफी पाहिजे... चूक झाली... डोकं कामातून गेलंय माझं...

आत्मानंदला 'धोतर' हा प्रकार माहीतच नव्हता.

आत्मा - हे कोण आहेत?
गुणे - धनराज गुणे... एस. ई. इलेक्ट...
आत्मा - कसली चूक झाली?
गुणे - बाबा.. तुझ्या बाबांची चुकून चेष्टा केली मी..
आत्मा - तुम्ही? ..... काय चेष्टा केलीत??

गुणेने मान खाली घातली. काय चेष्टा केली हे दिल्याला माहीतच होते. त्यामुळे ते न सांगण्यात काहीच अर्थ नव्हता.

गुणे - धोतर... नेसलेवते ना ते??... त्यावरून..
आत्मा - मग.. मी काय करायला पाहिजे?
गुणे - म्हणजे?
आत्मा - तुम्ही त्यांच्या वेशभुषेवरून थट्टा केलीत... मी... माझ्यावर केलेल्या संस्कारांची...

आता अशोक मधे पडला.

अशोकचे तर्कशास्त्रच वेगळे होते. हा प्राणी इतके बोलू शकतो हे कुणालाच माहीत नव्हते. अशोकने बोलायला सुरुवात केली.

"आत्मा.. बस.. मी काय बोलतो ते ऐकून घे... पूर्ण... पूर्ण ऐकून घे... मधे बोलायचं नाही.. कुणीच...

विषय काहीतरी गंभीर आणि वेगळाच आहे इतके गुणेला समजले.

अशोक - काय आहे आत्मा... आपण स्वतःला एक व्यक्ती समजतो.. काहीही असो, स्त्री, पुरुष! फक्त माणूस! आपण स्वतःला माणूस समजतो ते यासाठी की आपण जसजसे मोठे होतो ना? आपल्याला हेच सांगण्यात येतं! आपण माणूस आहोत... ती बघ चिऊ, हा काऊचा घास.. रडू नको उंदीर पळाला.. माऊ आली का रे? वगैरे वगैरे! कळत न कळत आपल्यावर थर बसत जातात कल्पनांचे, गृहीतांचे, व्याख्यांचे! काय होत असते माहितीय खरे तर? खरे तर आपण जे नसतो ते आपण स्वतःला समजायला लागलेलो असतो... वळसा खूपच लांबचाय आत्मा... पण... तू ऐकून घे.. वरवर पाहायला हे सगळं अनावश्यक, असंबंध वाटेल आत्ता तुला..

माणूस असणे व माणूस समजणे यात गैर काहीच नाही... पण विचार कर... एखाद्या जन्माला आलेल्या मुलाला... तो मुलगा पाच वर्षाचा होईपर्यंत फक्त माणूसच दाखवला तर?? इतर काहीच दाखवले नाही अन एखाद दिवस समोर एकदम कुत्रा आला तर? किंवा फुलपाखरू आले तर? त्याच्या मनातील भावना काय असतील? सर्वप्रथम भीती, भीती जर नष्ट झालीच किंवा भीती बाळगण्यासारखे काही नाही याची खात्री पटलीच तर कुतुहल, कुतुहल शमवण्यासाठी शंका विचारणे आणि त्यानंतर आवड निर्माण होणे हे ज्ञान प्राप्त करण्याची... याच स्टेप्स असणार ना? फार तर ज्ञान प्राप्त करण्याची आवड निर्माणच होणार नाही.. कुतुहल शमले की संपेलही विषय!

असे का होईल याचा विचार करू शकतोस तू? याचे कारण एकमेव आहे आत्मानंद.. ते म्हणजे आपली गृहीतके! पाच वर्षांचा होईपर्यंत त्या बालकाला हेच माहीत नसते की आपल्यासारखे नसणारेही काही सजीव अस्तित्वात असतात. त्याच ही गृहीतके चुकीची आहेत हे त्याला समजते तेव्हा आपोआप काहीसा धक्का, मग भीती, मग भीती नष्ट करण्याची उपाययोजना, मग कुतुहल, मग अधिक ज्ञान अशा स्टेप्स येतात. संशोधकांचे अर्थातच वेगळे असू शकते. त्यांची उपजत प्रवृत्तीच गृहीतकांच्याच मुळाशी जाते. पण आपण आपल्यासारख्यांचेच बोलू!

हे एक्ग्झॅगरेशन होतं! कसलं माहितीय? त्यासाठी आणखीन एक गंमत ऐक! शास्त्राच्या नियमाप्रमाणे प्रत्येक दोन गोष्टींमध्ये, ऑब्जेक्ट्समध्ये आकर्षण असतं! गुरुत्वाकर्षण! जी वस्तू जड आहे किंवा अधिक वस्तूमानाची आहे ती दुसरीला आपल्याकडे खेचते. तुझ्यापेक्षाच काय, इथे जमलेल्या प्रत्येकापेक्षा माझं वजन बरंच जास्त आहे. मी तुमच्यातल्या प्रत्येकावर माझ्या गुरुत्वबलाचा प्रभाव टाकत आहेच. तुमच्यात आपापसातही ते होतंच आहे. मात्र.. ते आपल्या जाणवू शकतच नाही, कारण पृथ्वीचे वस्तूमान इतके अफाट आहे की तिचे आपल्यावर असलेले आकर्षण बघता आपले एकमेकांमधले आकर्षण क्षुल्लकसुद्धा ठरू शकत नाही.

हे सांगण्याचं कारण म्हणजे... पाच वर्षाच्या मुलाला आयुष्यात पहिल्यांदा मानवेतर सजीव असणे हे ज्ञान प्राप्त होणे किंवा हा धक्का जर पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण असे गृहीत धरले, तर दोन एकाच रक्ताच्या, एकाच कुटुंबातील, कधी कधी तर जुळ्याही असलेल्या माणसांची एकमेकांबद्दलची गृहीते चुकणे किंवा नवे ज्ञान प्राप्त होणे हे आपल्यासारख्यांचे एकमेकांमधील असलेले आकर्षण होईल!

इतका फरक आहे असे मी म्हणत होतो. आता मुद्यावर येतो.. तुला जन्म देण्याआधी तू मुलगा आहेस की मुलगी हे तुझ्या आई वडिलांना माहीतच नव्हते. सर्व योजना तू जन्माला आल्यानंतर ठरणार होत्या. म्हणजे मुलगी असली तर दर महिना थोडं थोडं सोनं घ्यायचं तिच्या लग्नापर्यंत वगैरे! मुलगा असला तर चांगल्यात चांगले शिक्षण मिळावे यासाठी पैसे साठवणं! ही फक्त उदाहरणे आहेत. मुलीही खूप शिकतातच आता!

तू जन्माला आल्यावर मग पुढच्या योजना सुरू झाल्या. तुझा जन्म होण्याची कारणे दोनच, एक म्हणजे मूल व्हावं अशी आई वडिलांची इच्छा किंवा नको असताना झालेलं मूल!

बघ आता! तू हवा होतास हेही ठीक आहे. पण तू मुलगा असशील की मुलगी हेच माहीत नाही. तू मुलगा म्हणून जन्माला आल्यानंतर घराण्याला वंशज मिळाला म्हणून आनंदी आनंद साजरा करायचा! आणि तू जगलाच नाहीस तर? मग जीव लावायचा! इतकंसुद्धा काही तुला होऊ नये यासाठी वाट्टेल ते करायचं आणि तुला जगवायचं! तू एक अविकसित मेंदू असलेलं मूल असणार! मग तू म्हणजे काय? फक्त एक शरीर, जे एका अर्भकाचे शरीर आहे. मग लळा लागणार! मग कौतुके होणार! मग तुझे डोळे उघडणार, तुला आवाज फुटणार, तुला दात येणार, तू रांगणार, तू पहिले पाऊल टाकणार, दुडुदुडु धावणार, बुदुककन पडणार, हसणार, रडणार, बोबडे बोलणार, मग विनोदी बोलणार, मग खाऊ मागणार, मग हट्ट करणार आणि एक दिवस शाळेत जाणार!

आणि मग बरेच वर्षांनी इथे येणार शिकायला!

हे सगळं का? तर एक तर तू नको असताना जन्माला आलास, ज्याचे चान्सेस जवळपास लाखात एक किंवा दुसरे म्हणजे, खरे तर जवळपास एकमेव कारण म्हणजे, तुझ्या पालकांना एक मूल हवे होते म्हणून हे सगळं!

त्यांना हवं होतं आत्मानंद हे? हे सगळं त्यांना हवं असतं! ते प्रत्यक्षात आल्यानंतर मात्र जन्माला आलेल्या जीवालाही हवंस वाटायला लागतं! हे निसर्गचक्रच आहे रे! हे तोडावे असे कुणाला वाटेल? शक्यच नाही...

... पण.... प्रॉब्लेम काय आहे माहितीय का आत्मानंद?? हे सगळे होत असताना तुझे पालक म्हणून तुझ्यावर त्यांचा जो जो हक्क प्रस्थापित होतो ना, त्याच्यातून ते तुझ्यावर बंधने आणतात, नियंत्रण आणतात, तुझ्याकडून अपेक्षा ठेवतात, तुझ्यावर संस्कार करतात आणि सरतेशेवटी....

... गृहीतके! गृहीत धरतात की माझा आत्मानंद अशा अशा सिच्युएशनमधे असा असा वागेल!

आपल्याकडे हे अधिक किंवा आपल्याकडेच चालतं असं म्हणावं लागेल! इतर देशांमधे कदाचित नसेलही!

पण आत्मानंद, ही आणि हीच अत्यंत गंभीर बाब आहे! दुसरा माणूस कसा वागावा याबाबत पहिल्याच्या मनात इच्छा निर्माण होणे साहजिक आहे. पण माझे अपत्य कसे वागावे ही इच्छा मात्र अपत्याच्या एका विशिष्ट वयानंतर नष्ट करणे आपल्या आई वडिलांना नाही जमत! ते त्यातच आयुष्यभर अडकून पडतात. सांग ना? सुनेला छळले, हा प्रकार का होतो माहीत आहे? आपल्या बायकोवर घरातल्या कुणीही हात उगारल्यावर जर तो हात नवर्‍याने हवेत अडवला आणि नवरा म्हणाला की उघड्यावर संसार थाटू पण इथे राहणार नाही, तर हे प्रकार खूप कमी होतील. पण नवरा अप्रत्यक्षरीत्या स्वतःच्या संस्कारांचा, घराण्याचा इगो सांभाळून त्या बिचार्‍या सुनेचा छळ होऊ देतो. अप्रत्यक्षरीत्या तो आई वडिलांची गृहीतके खरी ठरवत असतो.

लक्षात घे! आत्ता तुझे बाबा इथून भयंकर व्यथित होऊन निघून गेले! त्यांची कल्पना काय होती माहितीय? कल्पना म्हणण्यापेक्षा खात्रीच! की 'माझा आत्मानंद दारूला शिवणारही नाही'! आणि... त्यांची अपेक्षा काय होती माहितीय? जी त्यांच्या तुझ्याबाबतच्या गृहीतकावर आधारित होती? ती म्हणजे ते इथे आल्या आल्या तू त्यांना खरे खरे सांगून टाकावेस की या खोलीतील तू सोडून सर्वजण रोज पितात आणि हे सगळे आत्ता तुमच्यासमोर खोटे वागत आहेत...... हीच त्यांची अपेक्षा होती आत्मा!

ही अपेक्षा तू पूर्ण केली नाहीस. आता ते दु:खी झाले. ते निघून गेल्यावर तुला दु:ख झाले. तू धावलास! तुला ते दिसलेच नाहीत. आता त्यांचे पत्र येईल किंवा फोन! तीव्र अपेक्षाभंग झाला असं ते सांगतील! तू धाय मोकलून रडशील! काय होतास तू, काय झालास तू असे तुलाच वाटेल.

हे चक्र आयुष्यभर चालत राहील आत्मा! आयुष्यभर! तुझे लग्न झाले, तुला मुले झाली, ती कॉलेजला गेली तरीही बुवा ठोंबरे तुझ्याकडून जुन्याच अपेक्षा करतील! प्रॉब्लेम तो मुळीच नाहीये! प्रॉब्लेम आहेत ते हे की त्यामुळे तुझ्यासाठी सर्वस्व सोडून येणारी तुझी बायको कधीच तुला पूर्णपणे स्वतःचा मानणार नाही आणि एवढं सगळं करूनही...... दारू तू कधीच प्यायलेली नसशील!

ओल्ड मंक लार्ज, विथ सोडा... दोन आईस... चीअर्स... तू हे कधीच म्हणू शकणार नाहीस! मात्र, आयुष्यातील चार वर्षे अत्यंत दारुड्या मित्रांच्या संगतीत काढलेली पाहून बुवा ठोंबरे कायम व्यथीतच राहतील. त्यांची व्यथा ते दाखवत राहतील. तुला काळजी वाटत राहील. तू गृहीतके खरीच ठरवत बसशील!

आत्मा! या सगळ्यात काय होईल माहितीय? आत्मानंद ठोंबरे हा माणूस कधीच जगलेला नसेल! जगलेला असेल त्या नावाचा बुवा ठोंबरे यांचा मुलगा! ज्याला जन्मालाच बुवांनी यासाठी घातले आहे की त्यांना मूल हवे'च' होते आणि ते त्याच्याकडून आयुष्यभर अपेक्षाच ठेवणार ज्या तो पूर्ण करणार असा मुलगा!

वा आत्मानंद वा! बाबा दारातून बाहेर जाताना एका शब्दाने म्हणाला नाहीस ना? की बाबा, मी घेतलेलीच नाही. हे सगळे घेतात, पण हे चांगले आहेत स्वभावाने! नाही म्हणालास तू! तेवढे धाडस झाले नाही तुझे! तू घेतलेली नसूनही नेमक्या क्षणी ते सिद्ध करण्याची संधी दवडलीस! आता बुवा ठोंबरे जालन्याला कीर्तन करताना रात्री अकरा वाजता मनात विचार करत राहणार! आत्मू पीत असेल आत्ता! आणि आम्ही तिघे तर काय? बदनामच!

तू आता असं कर! उद्याच्या गाडीने जालन्याला जा! बाबांचे पाय धर! नाक घास! त्यांना म्हणाव की दुर्दैवाने मिळालेल्या त्या खोलीत मी राहतोय! बाकीची मुले कशीही असली तरी मी पवित्र आहे. मी थेंबालाही शिवलेलो नाही. खोली बदलून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. मात्र तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. तुमचा आत्मू कधीही वाममार्गाला लागणार नाही. तुमचे धोतर पाहून थट्टा करणारा एकटा धनराज गुणेच दोषी नाहीये...

..... दिल्या, वनदास आणि अशोक पवार.... तिघांनीही काल मध्यरात्रीपासून या क्षणापर्यंत जे वातावरण या खोलीत निर्माण केलेले होते... ज्या तिघांना स्वतःचे वडील या खोलीत काही तासांसाठी आल्यासारखे वाटत होते, ज्यांनी माझ्याप्रमाणेच तुम्हाला वाकून नमस्कार केला, ज्यांनी खोलीतील सर्व हीन वस्तू काटेकोरपणे, फक्त तुम्हाला बरे वाटावे म्हणून काढून टाकल्या, ज्यांच्या प्रत्येक शब्दामधून तुमच्याबद्दल आदर आणि प्रेम ओसंडत होते आणि ज्यांना तुम्ही आणलेले उकडीचे मोदक पाहून, घरचे काहीतरी खायला मिळाले म्हणून अक्षरशः गहिवरून आलेले होते..... ते तिघेही धनराज गुणेने केलेल्या थट्टेपेक्षा कितीतरी हीन, घाणेरडी थट्टा करत होते बाबा तुमची दिवसभर!

जर तुला तुझ्या पालकांचीच गृहीतके खरी ठरवायची असतील ना आत्मानंद... तर या उघड्या जगात त्यांच्याशिवाय, एकटा जगायला तू नालायक आहेस हे लक्षात ठेव...... आणि जर तुला......

......................... आत्मानंद ठोंबरे म्हणून जगायचे असेल ना.... तर.... आई बापांवर जीवापाड प्रेम करूनही... त्यांची सगळीच गृहीतके खरी नव्हती हे त्यांनाही शिकव..... कारण त्यांनी जन्माला घातलेल्या तू त्यांना ते शिकवले नाहीस ना?? तर जगातले कोणतेच आई बाप कधीच काही शिकणे शक्य नाही....

बाकी आमचं तिघांचं म्हणशील तर...... उद्या सकाळपासून आजूबाजूच्यांच्या रूममधे... त्यांना रोज दारूचे आमीष दाखवत.... आम्ही राहायला लागू... या खोलीत नाय राहणार.... खरे तर महिन्या पंधरा दिवसांच्या सहवासात तुझ्यासारख्या ठोंब्या पोरासाठी असला त्याग करायची आम्हाला काही गरजच नाहीये...... पण..... आईने चकल्या स्वतः केल्या होत्या ना??? त्यातून मीठ गेलंय पोटात आमच्या... तुझ्या आईबापांची गृहीतके आमच्यामुळे नकोत खोटी ठरायला....

.... फक्त एक लक्षात ठेव.... हे मी जेव्हा बोलतोय.. तेव्हा मी दिल्याकडे पाहिलंही नाहीये... तो इथे तीन वर्षं राहतोय.... पण त्यानेही या खोलीतून बाहेर पडावे असे वाक्य मी जर एरवी बोललो असतो ना आत्मा?? तर त्याने नेहमीसारखी लाथ घातली असती मला.... पण आत्ता मला माहितीय.. तो काय अन वन्या काय.... तुझ्यासारख्या सुरक्षाकवचात वावरणार्‍याबरोबर राहण्यापेक्षा इतरत्र दाटीवाटीत राहतील सगळे.....

आणि आत्मा.... हे असे वागणे... हे आमच्या आई वडिलांचे आमच्याबद्दल असलेले गृहीतक नाही बरं??? हे आमचेच विचार आहेत... बापाने फुल्ल पैसे भरूनही दुसर्‍याच्या खोलीत तिसर्‍याच्या मनःशांतीसाठी राहायला जिगर लागते जिगर..... आणि तुझ्या माहितीसाठी.... ती जिगर निदान मला तरी....

ए वन्या... भडव्या भर की पेग?? च्यायला तुमच्या... बघ आत्म्या... ती जिगर मला तरी ना??? या ओल्ड मंकमुळे मिळते ओल्ड मंकमुळे.... चीअर्स दिल्या.... "

सुनसान शांतता! टाचणी पडली तर कानठळ्या बसतील अशी शांतता! महाकाय अशोक पवारच्या पहिल्या पाच दहा वाक्यांनंतरच गुणे गॅन्ग रूममधून कटलेली! दिल्या आढ्याकडे बघत हातात पेग धरून बसलेला! वनदासच्या हातात चाळा म्हणून ओल्ड मंकचा भरलेला खंबा असूनही स्वतःच्या पेगमधलाही एक थेंबही न घेता तो तसाच बसून राहिलेला! बोलणे संपल्यानंतर अशोकने एक लार्ज पेग विथ पाणी फक्त तीन घोटांत ढकललेला व पुढच्याचे दोन घोट झालेले..........

......... आणि आत्मानंद ठोंबरे?????

त्यांच्या आयुष्यातील सर्वात वादळी टप्याच्या उंबरठ्यावर उभे होते... मागे होती आई बाबांची गृहीतके... पुढे होती जिगर! डोळ्यांमधले पाणी केव्हाच थांबलेले होते गळायचे... गालांवर सुकलेले होते...

..... आधी काय झालं तेच कुणाला समजलं नाही... म्हणजे... आवाज ओळखीचा होता... पण... संदेश मुळीच ओळखीचा नव्हता....

हळूहळू ... फार हळूहळू लक्षात आले... विश्वासच बसेना....

दिल्याला परिस्थिती समजल्यावर त्याने आज भिंतीवर रेकॉर्ड दहा बुक्या सलग मारल्या अन दोन चटके लावून घेतले.....

अशोकने स्वतःच्या ग्लासातला उरलेला अर्धा पाऊण पेग तिथूनच रेश्माच्या फोटोवर अत्यानंदाने फेकला....

...... आणि... आत्मानंदच्या गळ्यात गळा घालून वनदास निव्वळ उड्या मारत होता.....

व्यथित झालेल्या बुवा ठोंबरेंना नागपूर नाईट क्वीन ही रात्री दहा वाजताची बस स्वारगेटवरून मिळत असताना......... आत्मानंद ठोंबरे यांनी स्वतःच्या घराण्यात इतिहास रचला होता... देसाई होस्टेलच्या रूम नंबर २१४ च्या भिंतींवर ते वाक्य आदळल्यावर पसरली एक मस्त... हलकी हलकी... तरल.. झिंग!

आजपासून खरी मैफील सुरू होत होती.

"ओ.... ओ.... ओल्ड ... मंक..... ला...लार्ज.... विथ....सोडा..... आणि... आईस..."

गुलमोहर: 

व्वा!!!
आजपासून खरी मैफील सुरू होत होती. >> या क्षणी कथेला खरी सुरुवात झाली अस वाटतय.

पुढील भागांच्या प्रतिक्षेत.

अरेरे!!! हे काय झाले... Sad
मुळात आई-वडिलांच्या गृहितकाप्रमाणे चालणारी मुले कमीच...त्यातून आत्मानंदसारखी आदर्श मुले तर फारच थोडी...
मित्रांच्या सहवासाने बिघडणारी मुले अशी सुद्धा भरपूर उदाहरणे आहेतच, पण आत्मानंद त्याच्या सात्विक सहवासाने इतरांना सुधारणार आणि हा प्रवास आम्ही अनुभवणार अशा आगळ्या-वेगळ्या कथानकाचे गृहितक मी मनात बाळगले होते...
पण असो, बेफिकीर, तुम्ही मात्र तुमच्या गृहितकानुसार लिहा. आमच्या गृहितकांची फिकीर करु नका. तसेही आम्हाला तुम्ही कथा पुढे कुठल्या वळणावर नेणार आहात हे कुठे माहितीये... तुम्ही हसवता, रडवता याचा अनुभव आहेच, आज आश्चर्यचकीतही केलेत...छान! पु.ले.शु. Happy

क्या बात है!!!!
अशोक असे काही बोलु शकतो हे फार छान आहे....

आत्मानंद आणि बाबांची पुढील भेट पहायला आवडेल.... किंवा खरं तर याची उत्सुकता लागलीय.

ऊफ्फ्फ्फ..........
अनपेक्षित धक्का......
काय लिहाव हेच कळत नाहीए..........सुन्न झालय......
आत्मानंदने घेतलेला पवित्रा पाहुन्...असो.....असेच आणि याही पेक्षा वेगवेगळे पैलु या कादम्बरीचे पहायला मिळतील अशी आशा..........प्रसन्गी आसु आणि हसु ही तुमच्या लिखणाची खासियत....येऊ देत अशीच कडु गोड भागान्ची ठेव..........

स्वागत आहे......

सावरी

शाब्बास रे अशोक!! (infact वाहवा बेफिकीर...) मानलं बुवा...किती सहज लिहीलतं तुम्ही.... असे संवाद बरेचदा स्वगत असतात जे कागदावर उतरवण फार कठीण असतं....
almost every one in their own life goes through this kind of 'transition' phase. And the moment at which ones decides to stick to live up life as per the parent's expectation or not to is very important...from that points onwards life completely changes....and i think it's a kind of gambling...if your decision and the up-coming situations are on one side then you won or else just have to regret throughout the life....
off-course हे माझे विचार आहेत....तुम्ही सहमत नसाल ही कदाचित....पण आजचा भाग वाचुन हे सगळ लिहावसं वाटलं....काही कमी-जास्त लिहील असल्यास माफ कराल...तुम्हाला hurt/argue करण्याचा मुळ्ळीच हेतु नाही Happy

बेफिकिर,
अशोक कहि मते पटली, काहि नाहि पटली, आणि संगत कशी हि असो, त्या संगतित राहुन आपल्याला वाईट वळण लागणार नाहि ह्याचिच फक्त काळजि घ्यायचि असते(हे आपल माझ मत), ओकेजन असतात आणि हे सेलेब्रेट पण करायचे असतात(आता प्रत्येकाचि पद्धत वेगळी असते). पण होस्टेल ला रहायच म्हण्ल्यावर रुम मेट च्या कला ने घेण हे ओघाने आलेच(कधिकधि).

बेफिकिर, गुणे कसा बदलला हो, दिल्या ने डॉलि ला झापल्या मुळे का? खरच समजल नाहि.
बाकि संवाद तर तुम्हि खुपच छान मांडता, मग तो मिना-मिना चि आई असो, अबु-गणपत चाचा असो किवा श्रि-महेश असो, बेफिकिर त्याबद्द्ल तुमला सॅल्युट.

मी मयुरी - आपण फार मस्त लिहीलंत! पूर्ण पटलं! आत्मानंदला पश्चात्तापच होणार आहे या कथानकात!

परेश - गुणे अजिबात बदललेला नाही . ही एक खेळि आहे.

सर्वांचे मनःपुर्वक आभार!

-'बेफिकीर'!

ज्या मजेला सुरवात झालीय ती नंतर सजा होउ शकते !!!! होतेच बाकी तुम्ही अगदी तंतोतंत होस्टेल उभं केलंत त्याबद्दल अभिनंदन ! मला तुमच्या कथा ह्या नेहमी उपदेशपर वाटत आल्या आहेत, मागे मी तुमच्या २०३ डिस्को, बुधवार पेठ ह्या कथेला एक अभिप्राय दिला होता. कि तुमची कथा ही कॉलेजला (खास करुन ईजिंनियरिंगला) होस्टेल मधे राहणार्‍या मुलांना प्रथम वषर्र्रात वाचनासाठी देण्यात यावी, काय आहे ना त्याने संपूर्र्ण समाज सुधारला जाईल अशी बाळबोध अपेक्शा नाही, पण किती नाही होणार या पेक्शा किती होईल हे महत्वाचं !!! आणि ज्यांचा ह्या प्रकारच्या साहित्यप्रकाराचा पिंड नाही तरी फक्त शिर्र्षकाने आकर्र्षित होउन संपूर्र्ण स्टोरी वाचणारे तुम्हांला एथे भेटले हेच तुमच्या कथेचं ख्रर यश.... जर हे होऊ शकतं तर मी म्हणतो तेही होउ शकेल. आपल्याकडे गुरु-शिष्य परंपरा होती ती आता नाही ( फक्त ईग्रंजानी आपल्या टॅलेन्टंच केलेलं खच्चीकरण ) नाही तर आपणही नाकारली. आज कोणाचा गुरु ह्या शब्दांवर विश्वासच नाही. त्यामुळे चांगले काय वाईट काय कोणी सांगायचे? निती कोणी शिकवायची? ..... ते शिकण्यांच न घड्ण्याचं एक वय असतं (आपल्याकडे प्रथा आहे बघा म्हणायची आता बिघडलाय लग्नानंतर आपोआप सुधारेल) पण बिघडूच दिलं नाही तर..... ती ताकद आपल्या लेखणीत आहे. बेफिकरजी, काय वाटतं?

संदिप आहेर,

१. मनःपुर्वक आभार!

२. होस्टेलचे वर्णन तंतोतंत आहे ही मी स्वार्थीपणे फार मोठी काँप्लिमेन्ट समजतो.

३. लेखणीची ताकद वगैरे शब्द माझ्यासारख्याला शोभत नाहीत. या विधानात उपहास नाही. खरे सांगतो आहे. मी जे लिहीत आहे ते उत्स्फुर्तपणे लिहीत आहे. मी जर खूप विचार करून लिहीले तर ती बेफिकीरी नसेल!

पुन्हा मनापासून धन्यवाद!

-'बेफिकीर'!

मी मयुरी - आपण फार मस्त लिहीलंत!>> Happy माझा आजचा दिवस एकदम मस्त जाणार :)))))))
i have been or rather I am going through this pahse....may be thats why i could actually feel what Aatmaram must have felt at that point
पण मी आज हे लिहू शकले ते फक्त तुमच्यामुळे...तुमच्या लिखाणामुळे.. Thank you for helping to pen down my feelings Happy

संदिप आहेर,

ही खुप छान बाब लक्षात आणुन दिलीत आपण........

कि तुमची कथा ही कॉलेजला (खास करुन ईजिंनियरिंगला) होस्टेल मधे राहणार्‍या मुलांना प्रथम वषर्र्रात वाचनासाठी देण्यात यावी, काय आहे ना त्याने संपूर्र्ण समाज सुधारला जाईल अशी बाळबोध अपेक्शा नाही, पण किती नाही होणार या पेक्शा किती होईल हे महत्वाचं !!! आणि ज्यांचा ह्या प्रकारच्या साहित्यप्रकाराचा पिंड नाही तरी फक्त शिर्र्षकाने आकर्र्षित होउन संपूर्र्ण स्टोरी वाचणारे ..........अगदी खरय

ताकद आपल्या लेखणीत आहे. बेफिकरजी, काय वाटतं?
.....अनुमोदन...खरय गरज आहे आज.....

सावरी

मी मयुरी, खरच खुप छान लिहिलत, Happy
मि लिहितांना तुमचा प्रतिसाद नव्हता तिथे, i think we're reading at same time.
Jar dicision chukale tar apan shano shani aplyala ch dosh det suto, jar tase kele aste tar bare jhale aste manun. tumche manne agdi patle

संदिप आहेर,

ही खुप छान बाब लक्षात आणुन दिलीत आपण...

कि तुमची कथा ही कॉलेजला (खास करुन ईजिंनियरिंगला) होस्टेल मधे राहणार्‍या मुलांना प्रथम वषर्र्रात वाचनासाठी देण्यात यावी, काय आहे ना त्याने संपूर्र्ण समाज सुधारला जाईल अशी बाळबोध अपेक्शा नाही, पण किती नाही होणार या पेक्शा किती होईल हे महत्वाचं !!! आणि ज्यांचा ह्या प्रकारच्या साहित्यप्रकाराचा पिंड नाही तरी फक्त शिर्र्षकाने आकर्र्षित होउन संपूर्र्ण स्टोरी वाचणारे तुम्हांला एथे भेटले हेच तुमच्या कथेचं ख्रर यश.... जर हे होऊ शकतं तर मी म्हणतो तेही होउ शकेल.....अगदी खरय......

मित्रा...अनुमोदन.....

सावरी

आधीच्या कादंबर्‍या ठीक होत्या.. पण ही ज्या वळणाने चाललीये ना.. अजिबात आवडत नाहीये.. रोज दारू घेणारे कॉलेजवीर, त्यांची ती भाषा .. असलं वातावरण असत होय हॉस्टेलवर? असेल - नसेल, काही असो खराब वाटतय वाचायला.. अन आश्चर्य प्रतिक्रियांच जास्त वाटलं ..
खुप छान
मस्त
मजा आली
खुप हसले (दारूडे हसवतात ही? )

बेक्कार... Sad

छान आहे हा पण भाग.
>>अशोकची काही मते पटली, काहि नाहि पटली, आणि संगत कशी हि असो, त्या संगतित राहुन आपल्याला वाईट वळण लागणार नाहि ह्याचिच फक्त काळजि घ्यायचि असते<< सहमत.

पु.ले.शु.

सर्वांचे पुन्हा आभार!......क्या बात....व्वा बेफिकर...

लिहीत रहा...........

सावरी

सानी....
ईथे जर कुणाशी मह्त्वाचे बोलायचे असल्यास काय करायचे...
माहीत असल्यास कळव प्लिज....

सावरी