ओल्ड मंक लार्ज .... ऑन द रॉक्स - क्रमशः - भाग ६

Submitted by बेफ़िकीर on 27 September, 2010 - 07:53

"पांडुरंग हरी... प्रसन्न वाटलं... आत्मू... शीण आला होता बरं प्रवासाचा... पण गेला... तुला पाहून आणि तुझ्या या सहाध्यायींना... सगळेच आध्यात्मिक, अभ्यासू आणि ईश्वराच्या प्रार्थनेत रस घेणारे आहेत हे पाहून अगदी योग्य जागी आलास असे वाटले बरं... अरे वावा? बजरंगबली का? वा! आता या शेजारच्या खिळ्याला गोपाळकृष्णाचा एक फोटो आणलाय तो लावून टाक... कृष्णाचा फोटो असावा एक कक्षात.... मन प्रसन्न राहतं....."

इथे काहीच तासांपुर्वी मन अधिकच प्रसन्न करणारा एक फोटो होता हे आठवून आत्म्याने आवंढा गिळला.

वनदास आणि अशोक नम्रपणे उभे होते. दिल्या एका खुर्चीवर अपराधी चेहरा करून बसला होता.

डोक्याला गांधी टोपी, गळ्यात अनेक माळा, कपाळावर गंध, चेहर्‍यावर 'हे विश्व मीच निर्मीले आहे' असे स्मितहास्य किंवा ज्याला 'अतीक्षमाशील व कीव करणारे म्हणता येईल असे स्मितहास्य', हातात एक पिशवी, धोतर आणि जुनाट चपला! रंग गव्हाळ, उंची आत्म्यापेक्षा थोडी कमीच!

"मी बुवा..... बुवा ठोंबरे... आत्मा माझाच मुलगा... चुकला माकला तर सांभाळून घ्या... उभे का? तुमच्या साधनेत व्यत्यय नाही ना आला?? मी नेमका अभ्यासाच्याच वेळेला आलोय..."

'तिच्यायला आपण या वेळेला घोरत असतो अन रात्री दिड वाजता टाकून झोपतो' असा विचार दिल्या, अशोक व वन्या यांच्या मनात एकाचवेळी आला.

अशोक - छे छे... काका... बसा ना...
बुवा - बुवाच म्हणा मला....
अशोक - चहा... आणू का??
बुवा - आत्ता मिळेल??
अशोक - म्हणजे... बाहेर जाऊन बघतो...
बुवा - छे छे.. तू अभ्यास कर बाळ... मी थोड्या वेळाने जाऊन घेऊन येईन चहा....
वनदास - पाणी...
बुवा - ........ ..... हं... शीतल आहे... आत्मा अभ्यास करतो ना? की टंगळमंगळ??
अशोक - उलट त्याच्यामुळे आम्हालाही अभ्यासाचे वातावरण मिळते...

आत्ता आत्मानंदने बिथरून अशोककडे पाहिले. अशोक अन दिल्यामुळे आपल्याला कोणते वातावरण मिळते हे बाबांना कळू नये ही त्याची प्रामाणिक इच्छा होती.

बुवा - आत्मू... परिचय???
आत्मानंद - हे वनदास लामखडे... हे कर्जतचे आहेत...
बुवा - सुंदर नाव आहे.... वनदास... मला वाटते... विष्णूचेच असावे....
आत्मानंद - हे कविता करतात...
बुवा - अरे वा? वा वा? ऐकवा बरं? आत्ता नको हवं तर... दुपारी ऐकू... आत्ता अभ्यास असेल ना?
आत्मानंद - यांच्या कवितेत शृंगारापासून वीररसापर्यंत सर्व रस ओतप्रोत भरलेले असतात...
बुवा - वा वा... केव्हापासून करतोस बाळ कविता??
वनदास - दीपा.. आपलं... इथे आल्यापासूनच....
आत्मानंद - हे अशोक... अशोक पवार... यांचे पणजोबा दिवाणजी होते...
बुवा - हो का? अरे वा?
आत्मानंद - हे अतिशय सुंदर मराठी बोलतात.. यांच्याकडे बंदुक आणि काळवीटही आहे...
बुवा - बापरे... म्हणजे ... कुणाला...शिकारीचा वगैरे नाद???
अशोक - पणजोबांनाच होता... नंतर नाही कुणाला..
बुवा - गरीब पशू बिचारे... असो... आपल्या पणजोबांबद्दल मला आदरच आहे...
आत्मानंद - यांना आई नाहीये...
बुवा - ओहोहो... ओहो... माफ करा.... हे छत्रं कधीच जायला नको शिरावरून.. पोरकं वाटतं...
आत्मानंद - हे दिलीप राऊत.. हे बलोपासनाही करतात..
बुवा - वा वा वा वा! दिसतंच आहे.. शरीराला मंदिर मानणारे दिसता आपण..
दिल्या - .... आत्मानंद.... बलोपासना म्हणजे काय??
अशोक - व्यायाम व्यायाम...
आत्मानंद - व्यायाम...
बुवा - दणकट शरीर हीच मोठी ठेव....
आत्मानंद - सर्व महाविद्यालयात यांचा दबदबा आहे... सर्वांना यांचा आधार वाटतो..
बुवा - अर्थात...
आत्मानंद - यांचे सख्खे मामा आमदार आहेत....
बुवा - मोठं घराणं... मोठं घराणं....
आत्मानंद - तुम्ही कसे आहात बाबा??
बुवा - बाळ... आनंदात आहे... तू इकडे आलास.. खूप वाईट वाटतं रे... पण काय करायचं??

या वाक्यावर मात्र अशोक आणि वन्याने मान खाली घातली. वाईट तर त्या दोघांनाही वाटत होत. पण अशोकच्या वडिलांना वाईट वाटतं हे सांगणं म्हणजे आणखीन एक भाम्डण करावं लागलं असतं त्यांना मोठ्या मुलाशी! आणि......

.... वनदासच्या वडिलांना वाईट वाटतंच नव्हतं! मुलगा कुठेतरी एकदाचा गेला हेच बरं होतं त्यांच्यादृष्टीने! मात्र जाताना घरातील सोनं विकून कॉलेजच्या फिया भरून गेल्यामुळे संतापही झालेला होता.

आणि... आत्म्याच्या वडिलांना वाइट वाटत होतं मुलगा इकडे आल्यामुळे...

काल रात्री ताडकन उभे राहून खोली आवरायला सुरू करणारे तिघेही दोन वाजता झोपले अत साडे तीनला उठले व आवरून बसले. झोपण्यापुर्वी खोलीतील यच्चयावत बाटल्या, थोटके अन सिगारेटी या सर्वांची योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली. एक अर्धी बाटली अन काही सिगारेटची पाकीटे एका प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून वन्याच्या पलंगाखाली ठेवण्यात आली. उदबत्या लावण्यात आल्या. शकिलाला दुसर्‍या एकाच्या रूमवर एक खिळा मिळाला बसायला टेंपररी तत्वावर! आणि लाल भडक डोळे घेऊन आत्ता तिघेही आत्मानंदच्या वडिलांसमोर उभे होते. डोळे लाल होण्याची कारणे दोन! दारू आणि जागरण! आणि अर्थातच बोलले की तोंडाला कालच्या दारूचा थोडासा वास येतच होता. पण तो त्यांचा त्यांनाच जाणवत होता. कारण प्रत्येकाने दोन दोन तीन तीनदा दात घासलेले होते. आणि आत्ता दोन उदबत्या लावलेल्या होत्या.

बुवा - मी जरा पडतो.... तुम्ही अभ्यास सुरू ठेवा...

दिल्याने या वर्षीचे पहिल्यांदाच पुस्तक हातात घेतले. आत्ता त्याने व्यवस्थित शर्ट व पँट घातलेली होती. हळूहळू होस्टेलला जाग आली. यांचे आधीच आवरून झालेले असल्यामुळे आता यांना पेंग येऊ लागली होती.

आत्मानंदला एक सवय होती. तो अभ्यास करताना मोठ्याने वाचायचा! पाठ करायचा. तो तसे करत असल्यामुळे कुणालाच कदाचित स्वतःचे पुस्तक वाचता येणार नाही असे वाटून बुवांनी एकदा त्याला विचारले. पण आत्म्याच्या आधीच सगळ्यांनी जोरात उत्तर दिले की असेच चालूदेत!

मळकट आणि कळकट्ट अशा एका गादीवर बुवा लवंडले आणि पाच मिनिटांतच घोरू लागले. आत्मा एका पलंगावर बसून मोठमोठ्याने वाचत होता. आता दिल्यने हळूच अश्क्याकडे पाहिले. अशोकचीही नजर दिल्याकडे वळली. आता तिघेही एकमेकांकडे पाहू लागले. आत्मानंदला असं कसं विचारायचं की हे कधीपर्यंत आहेत. मग अशोकने शक्कल लढवली.

अशोक - आत्मा... मला काय वाटतं..
आत्मा - काय?
अशोक - बाबांना आरामात वास्तव्य करता यावं म्हणून... मी आणि दिल्या... शेजारच्या रूममधे राहावे...
आत्मा - का??
अशोक - तू, वनदास आणि बाबा येथे राहा...
आत्मा - छे छे... त्यांना कसली अडचण.. आणि.. मी नाही का जाणार दुसर्‍या रूममधे...तुम्हाला का त्रास?
अशोक - अरे तसं नाही.... आता चार पाच दिवस राहायचं म्हणजे जरा व्यवस्थित नको का असायला??
आत्मा - चार पा... चार पाच दिवस कसले?? बाबा निघाले संध्याकाळी...

आज फिर जीनेकी तमन्ना है...
आज फिर मरनेका इरादा है...

तिघांच्याही तोंडात अशाच स्वरुपाचे गीत उमटले.. पण मनातल्या मनात...

अशोक - लगेच जाणार??
आत्मा - होय.. उद्या जालन्यात कीर्तन आहे...
अशोक - आत्मा.... अरे त्यांना राहूदेत ना... माझे काय बाबा येणार नाहीत कधीच.. त्यांना तरी राहूदेत..

अशोकच्या या वाक्यावर पहाटे पहाटेच एक सन्नाटा पसरला. हे वाक्य मात्र अशोकने मनापासून उद्गारलेले होते. दिल्याने आत्म्याच्या बाबांना जाग येणार नाही अशा रीतीने एक बुक्की मारली भिंतीवर! पण ती हसण्याचा पर्याय नव्हती. दुसर्‍याच कोणत्यातरी भावनेचा पर्याय म्हणून मारली गेली होती. वनदास मात्र कोरडा ठण्ण होता. बापावर प्रेम असू शकते हे त्यला तसे नवीन होते.

आत्मा - नाही.. ते जाणारच.. आपले ऐकणार नाहीत ते...

दोन तासांनी सगळेच उठले. सात वाजले होते. भुका लागल्या होत्या. साडे सात वाजता कॅन्टीन उघडायचे. पण आज दिल्या सातलाच कॅन्टीनला गेला. आणि कॉलेजमधल्या जनतेला एक अभुतपुर्व दृष्य पाहायला मिळालं! साडे सातच्या आधीच दिल्याचा वचक असल्याने कॅन्टीनवाल्याने जो चहा दिला होता तो किटलीत घेऊन दिल्या चक्क स्वतःच्या रूमकडे आला होता. आला तेव्हा आत्म्याचे बाबा उठलेले होते. आणि ते अशोक आणि वनदासशी बोलत होते. दिल्याला दारात चहा घेऊन आलेला पाहून मात्र वनदास हडबडून उठला...

वनदास - अरे?? मला नाही का सांगायचंस??
अशोक - थांब थांब.. मी घेऊ का किटली??

चहाचे वाटप झाले. आत्मानंदच्या वडिलांना काहीच माहीत नसल्यामुळे ते अत्यंत आनंदीत होते. पण आत्म्याला मात्र आश्चर्याचा तीव्र धक्का बसला होता. आपल्या अंगावर धावून येणारा, वाट्टेल त्या शिव्या देणारा, सतत पिणारा दिलीप आपल्या बाबांसाठी चहा घेऊन आला??

आत्मानंद हादरून पलंगावर बसलेला होता. यांच्यापैकी कोण अचानक शिवी बिवी देईल अन कोण एकदम विडी ओढेल काही सांगता येत नव्हतं खरं तर! पण आत्ता तरी सगळे एकदम मस्त वागत होते.

बुवा - आत्मा... हे काही खायचे पदार्थ आणले आहेत... सगळे मिळून खा....

'सगळे मिळून खा' वर वनदासला पहिल्या दिवशीचा डायलॉग आठवला.

'मी घरून खायला आणलं होतं ना? ते सगळं याने खाल्लं' असं वन्याने अशोकला सांगीतले होते. त्या आधी, म्हणजे अशोक यायच्या आधी दिल्याने होस्टेलचे तत्व सांगीतले होते.

'जे आहे ते समोर ठेवायचं... उरलं तर स्वतःही घ्यायचं'

वनदासने खाडकन दिल्याकडे पाहिले. दिल्या अजिबात वरमला नव्हता. पण खायचे पदार्थ मात्र भारीच होते. उकडीचे मोदक, बाकरवडी आणि चकली! पुन्हा चहाची एक राउंड झाली. यावेळेस आत्म्याने आणला चहा!

बुवा - आवडले का... मोदक???

हा प्रश्न दिल्याला होता. कारण त्याने कुणाकडेही न बघता दहा पैकी पाच मोदक एकट्यानेच उडवले होते. आता हो म्हणणे तर आवश्यकच होते. पण तसं म्हणण्याची लाजही वाटत होती आता...

दिल्याचा झालेला प्रॉब्लेम पाहून आत्मा म्हणाला...

आत्मा - आमचा अक्षरशः कालच विषय झाला.. तेव्हाच हे म्हणत होते... उकडीचे मोदक हा यांचा सर्वात आवडता पदार्थ!

नऊ वाजता मात्र दिल्यालाही आज कॉलेजला जावंच लागलं! करणार काय? रूममधे बसून बुवांचे कीर्तन ऐकण्यापेक्षा एखाद दोन पिरियड अटेंड केले तर दोन तास जातील अन मग निवांत कॅन्टीनमधे बिड्या तरी फुंकता येतील असा त्याचा विचार होता. कॅन्टीनमधे धूम्रपान करू नये असा नियम अजून झाला नव्हता हे दिल्याच्या दृष्टीने बरे होते. पण लवकरच होणार आहे असे कानावर येत होते.

बुवा इनोसन्ट होते. ते आपले अकरा वाजता सरळ प्राचार्यांना भेटायला गेले. आधी त्यांना आत जाऊ देईनात! नंतर कशीतरी परवानगी मिळाली तर प्राचार्यांनी दोन मिनिटे अगत्याने बोलल्यासारखे करून त्यांना घालवून दिले. बुवांची कॉलेजमधून फिरताना मात्र थट्टा सुरू झाली. सिनियर विद्यार्थी त्यांना पुढे गेल्यावर मागून काहीतरी हाका बिका मारू लागले. बुवांना ते समजत नव्हते असे नाही. पण ते दुर्लक्ष करत होते.

पण.... या बुवांमुळे .... ओल्ड मंक लार्ज चा एक भयानक अध्याय मात्र चालू झाला....

गुणे! डिप्लोमा करून डायरेक्ट इलेक्ट्रिकलच्या सेकंड इयरला आलेला धनराज गुणे हा एका व्यावसियाकाचा अत्यंत बिघडलेला, अतिशय श्रीमंत, देखणा व मवाली मुलगा होता. पिरियड्स ऑफ ठेवून तो बहुतेकदा कॉरिडॉरमधे उभा असायचा आपल्या तीन मित्रांबरोबर! साजिद शेख, शेखर नैन आणि कुमार हर्ष! तिघेही आधीच्या महाविद्यालयात गुणेबरोबरच होते. गुणेकडचा अफाट पैसा आपल्यावर उधळला जावा या हिशोबाने ते कायम त्याला सपोर्ट करत असायचे. ते तिघेही घरचे बरेच होते. पण गुणे इतके नाही. कर्मधर्मसंयोगाने आधीच्या कॉलेजमधे इतके मार्क्स मिळाले होते की नवीन कॉलेजमधे डोनेशन भरून का होईन पण अख्खा ग्रूप तसाच्या तसाच आला होता.

आणि पहिले वर्ष जस्ट चालू झालेले असल्यामुळे इतक्यात अभ्यास करायची गरजही नव्हती. आत्ताही ते मस्तपैकी कॉरिडॉरमधे उभे राहून येणार्‍या जाणार्‍या पोरीबाळी निरखत होते. अजून कुणावर कॉमेंट करावी इतके धैर्य जरी होत नसले तरी त्यांच्या नजरेकडे पाहूनच मुली दहा फूट लांबून जात होत्या.

आणि मुलींकडे बघण्याचे कारणच उरू नये असे पात्र बघायला मिळाले त्यांना! बुवा!

आधीच कॉलेजच्या वातावरणात बुवांचा पेहराव भलताच विसंगत! त्यात ते कुतुहल म्हणून नुसतेच कॉलेज बघत फिरत असल्यामुळे त्यांच्या नजरेत काहीसे नावीन्याचे भाव! गुणे असा माणूस सोडेल तर तो गुणे कसला??

गुणे - नमस्ते महाराज....

गुणेने लांबूनच हाक टाकली. शेखर नैन सोडला तर कुमार आणि साजिद हसले नाहीत. हसले असते तर या सोंगाने दुर्लक्ष केले असते हे त्यांना माहीत होते. मग मजाच गेली असती. बुवांनी लांबूनच दोन्ही हात जोडून सस्मित चेहर्‍याने मान तुकवून नमस्कार केला व हळूहळू चालत त्या टोळक्यापाशी पोचले.

गुणे - किसीको ढुंढ रहे है क्या??
बुवा - नाही बेटा... सहज बघतोय कॉलेज...
गुणे - अ‍ॅडमिशन घ्यायचीय का कुणाला??
बुवा - माझा मुलगा इथेच असतो...
गुणे - कोण??
बुवा - आत्मानंद ठोंबरे... प्रॉडक्शनला आहे..
गुणे - ओह.. मला नाही माहिती अजून प्रॉडक्शनची मुले...
कुमार - मुली म्हणाल तर सांगू शकेल..

कुमारच्या या जोकवर शेखर खळखळून हासला. बुवा मात्र क्षणात गंभीर झाले.

गुणे - धोतर सेफ असतं नाही का??

पुन्हा शेखर हसला. बुवा जायला लागले. आता खरे तर हवी तेवढी मजा झालेली होती. गुणेला कंडच जास्त!

मागून ओरडला. इतरही काही मुलांनी ऐकलं अन तेही हासले.

गुणे - काय रांव तुम्ही... धोतराच्या सोग्यात भरपूर कमावलं... अन बाईच्च्या नादानं.... सारं..

बुवा पाठीमागे वळले. तसा मात्र ग्रूप गंभीर झाला. बुवा पुन्हा ग्रूपपाशी आले.

बुवा - बेटा... दुसर्‍याचा अपमान करणं सहज सोपं असतं! खोटा किंवा खरा मान देणंही सोपंच असतं! पण.... स्वतःचाही मान राहील अशा पद्धतीने दुसर्‍याला मान देणं... हे खूप अवघड असतं...

साजिद - अंकल... आप जाईये.. ये मजाक कर रहा था.. फिर नही होगा ऐसा..

साजिदला एका विद्यार्थ्याच्या वडिलांची थट्टा व्हावी हे खरे तर आवडले नव्हते.

बुवा - होय... मी जातच होतो... जातोही आहे... मला काहीच तक्रार नाही... तुमचं तुमच्यापाशी... तुम्हाला सद्बुद्धी मिळो....

साजिदने उगाचच मधे आपल्यापेक्षा अधिक अक्कल दाखवली व त्यामुळे आपण उडाणटप्पू ठरलो हे न आवडलेला गुणे हे सहन करू शकत नव्हता. नेमकी एक फरशी पुसणारी म्हातारी पुढे चालत होती आणि वळलेले बुवा तिच्यापासून चार हात अंतरावर होते.

गुणे - किसके पीछे जा रहे हो ओ महाराज???

आजूबाजूची अनेक मुले हासली. ते पाहून गुणेला स्वतःचा अभिमान वाटला. इतकंच काय दोन मुलीही एकमेकांकडे पाहून हळूच हसल्याचे त्याने पाहिलेले होते. त्या मुलींमधली एक त्याला फार आवडली.

बुवांना मात्र असली थट्टा सहन करता येत नव्हती. तातडीने रूमवर चालत गेले ते! रूमवर कुणीच आलेले नव्हते. आत्म्याची किल्ली आज बुवांकडेच होती. बुवा आत जाऊन पडून राहिले. रात्रभर प्रवास झालेला असल्याने त्यांना झोप लागली.

कधीतरी दुपारी चार वाजता जाग आली तेव्हा एकटा दिल्या परत आला होता.

बुवा - काय झालं? बाकीचे कुठे आहेत??
दिल्या - येतायत... अजून एक तास आहे
बुवा - तू आधी आलास?
दिल्या - हो.. मला तो विषय नसतो...
बुवा - इथून.. स्वारगेटला रिक्षा मिळेला ना सात वाजता?
दिल्या - कशाला? .. मित्राची मोटरसायकल आहे त्याच्यावरून सोडेन की??
बुवा - फारच उत्तम!

दिल्याची वेगळीच कुचंबणा होत होती. या खोलीत आले की त्याला घरी आल्यासारखे वाटायचे. मग मस्त पंखा लावून उघ्ड्याने पलंगावर पडून एक विल्स शिलगावायची अन सुरेखाचे विचार करत बसायचे. पण आज तसं करता येत नव्हतं!

साडेपाच वाजता सगळेच आल्यावर बुवांनी इन्फॉर्मल कीर्तन चालू केलं!

"पांडुरंग हरी.. राम कृष्ण हरी... तुमच्या सर्वांची मैत्री पाहून खूप बरं वाटलं... असंच अभ्यासू राहा.. निर्व्यसनी राहा... बलोपासना करा... प्रार्थना करा... मिळून मिसळून राहा...आम्ही काय... फक्त हालहवाल बघायला येतो तुमचा... स्वतःच्या पायावर उभे राहा... मोठे व्हा... सारखं सारखं येणं काही जमणार नाही... काही लागलं तर मात्र कळवा.... अर्ध्या रात्री येऊ... एकमेकांची काळजी घ्या... "

वनदासने सगळ्यांसाठी उपीठ आणलं होतं! उपीठ आणि चहा झाल्यावर बुवांनी आत्मानंदला चारशे रुपये दिले.

"काही लागलं तर ठेव... तू पैसे उधळणार नाहीस हे माहिती आहे... पण आपलं बापाचं मन म्हणून सांगावसं वाटतं... अनाठायी खर्च करू नये... लक्ष्मी चंचल.. हं?? निघू मी??"

आत्मानंदने बाबांना वाकून नमस्कार केला. का कुणास ठाऊक... अशोकलाही वाटलं.. आपणही नमस्कार करावा...

अशोकने केल्यामुळे मग वनदास अन दिल्यालाही करावा लागला.. बुवांनी सर्वांना तोंडभरून आशीर्वाद दिले...

आत्मानंद - दिलीप... तुम्ही कशाला त्रास घेताय बाबांना सोडण्याचा... जातील ते रिक्षेने!

'दिलीप' ही हाक ऐकायची सवयच नव्हती दिल्याला! आत्मानंदमुळे ती एक सवय लागली होती. आपल्याला 'दिलीप' असेही म्हणतात!

दिल्या - त्रास कसला...

दिल्याने बुवांची पिशवी उचलल्यावर आत्मानंदने घाईघाईने ती उचलली. दिल्या मोटरसायकलची किल्ली घ्यायला मित्राकडे गेला अन तिथून वाहनतळावर! तोवर सगळे जण पार्किंगमधे आले होते. आत्मानंदच्या चेहर्‍यावर बाबांच्या तुटपुंज्याच मिळालेल्या भेटीचे दु:ख आणि आत्ताच त्यांनी पाठीवरून फिरवलेल्या हाताच्या स्पर्शाची ऊब मिळण्याचे सुखही दिसत होते. दिल्याने किक मारली....

..... बुवा ठोंबरे दिलीप राऊत या अत्यंत निर्व्यसनी व अभ्यासू माणसाच्या मागे बसून... कॉलेजमधून बाहेर पडले.... आणि मेन रोडला लागणार्‍या कॉर्नरवरच दिल्याच्या कानावर ती हाक पडली....

"ए धोतर........."

काचकन ब्रेक दाबला दिल्याने! एका चहाच्या टपरीवर गुणेचे टोळके उभे होते. नाही म्हंटले तरी दिल्याकडे पाहून गुणे जरा चपापलाच होता. दिल्याच्या नजरेत अत्यंत थंड खुनशी भाव होते. पण आत्ता आत्म्याचे बाबा बरोबर असताना नाटक नको व्हायला, नंतर बघू या विचाराने तो पुन्हा सुसाट सुटला स्वारगेटच्या दिशेने!

सातला वीस कमी असतानाच दिल्याच्या अफाट वेगामुळे स्वारगेटला आलेले बुवा हादरून दिल्याकडे पाहात होते.

बुवा - फारच वेगात चालवतोस...

दिल्याला यावर काय बोलावे ते सुचेना! एखादा मित्र असे म्हणाला असता तर तो काहीतरी सॉलीड बोलला असता. पण हा माणूसच वेगळा होता. दिल्याने मान तुकवून 'येतो' असे सांगीतले अन आधीच्यापेक्षा तुफान स्पीडने कॉलेजकडे आला. त्याला ते टोळक्यातील मुलाला जाऊन फक्त इतकेच म्हणायचे होते की

'का रे बाबा.. धोतर नेसलं तर तुझ्या बापाचं काय गेलं???"

फारच सौम्य प्रश्न होता हा दिल्याच्या मानाने! बुवांच्या वास्तव्याचा झालेला प्रभाव थोडाफार टिकलेला असल्यामुळे त्याने एवढंच विचारायचं ठरवलं होतं! पण टोळकं जागेवर नव्हतं! शेवटी दिल्या पुन्हा कॉलेजमधे आला आणि गाडी पार्किंगमधे टाकून किल्ली मित्राला द्यायला जाणार तेवढ्यात त्याला लांब कॅन्टीनपाशी ते दृष्य दिसले.

शिर्के त्या मगाचच्या टोळक्यातल्या त्याच मुलाशी काहीतरी तावातावाने बोलत होता. दिल्या तातडीने तेथे पोचला. तेव्हा त्याला दिसले की काही अंतरावर डॉलीही उभी आहे. गुणेला दुपारी आवडलेली मुलगी हीच!

शिर्के - हे शिकायला येतोस का इथे?? आं?? तुझे वडील ओळखीचे आहेत म्हणून तक्रार करत नाहीये.. पुन्हा माझ्या मुलीकडे मान वर करून पाहिलंस तर बघ...

गुणे 'नाही नाही' करत घाबरून मान खाली घालून उभ होता. डॉली शिर्केची मुलगी आहे हे त्याला माहीतच नव्हते. पुन्हा पुन्हा सॉरी म्हणत होता.

कुणीतरी विचारलं... "काय झालं हो??"

शिर्के - मागे लागतोय मुलींच्या...

दिल्या सटकन्न पुढे झाला. साजिद, कुमार आणि शेखर मान खाली घालून गुणेच्या शेजारीच उभे होते. दिल्याने कुणाचीही पर्वा न बाळगता खण्णकन कानाखाली आवाज काढला गुणेच्या....

" XXXXX पोरींना छेडतोस??? XX XXXX"

फारच मोठा आवाज होता तो! गुणे तर बधीरच झालेला होता. साजिद, कुमार आणि शेखर खवळून दिल्याकडे पाहात होते. पण आत्ता स्टाफमधला शिर्के तिथेच असल्यामुळे अन डॉलीही असल्यामुळे तमाशा नको म्हणून गप्प बसायचे ठरवले होते त्यांनी!

दिल्या आता डॉलीकडे वळला... नेमका दिल्याच्या फटक्यामुळे एक मोठा जमाव जमा झाला होता... शिर्के डोळे फाडून दिल्याकडे बघत होता...

दिल्या सर्वांना ऐकू जाईल अशा आवाजात डॉलीला म्हणाला...

"या छपराट बापाच्या सांगण्यावरून मला स्वतः येऊन धक्का दिलास तू... अन उलटी कंप्लेन्ट केलीस... तुझा बापच जिथे स्वतःच्या मुलीला मुलांना धक्के द्यायला शिकवतोय.. तिथे तुझ्याकडे कोण नीट पाहील???.. मी आहे म्हणून एक लक्षात ठेव... पुन्हा हा छकडा तुझ्याकडे बघणार नाही मान वर करून... अन दुसरं म्हणजे.... निर्लज्जासारखी मला रस्त्यात धक्के देत जाऊ नकोस बापाने सांगीतलं म्हणून..... "

दिल्याच्या भाषेत डॉली अन शिर्केचा पार कोचा झालेला होता कोचा! पण हे प्रकरण गुणे टोळक्याला नवीनच होतं! आणि आज दिलीप राऊत आणि धनराज गुणे यांच्यातील शतृत्वाची मुहुर्तमेढ झालेली होती.

रूमवर आले तर वेगळेच दृष्य!

आत्म्याचे वडील जाऊण जवळपास अर्धा पाऊण तास झाला असूनही एकही सिगारेट पेटलेली नव्हती. एक दिवसाच्या त्यांच्या वास्तव्यामुळे सगळ्यांनाच खूप पवित्र वाटंत होतं!

दिल्याने आल्याआल्या सर्वांना तो प्रसंग सांगीतला.

आत्मा - तुम्ही... त्यांना मारलंत???
दिल्या - मग??
आत्मा - हे चांगलं नाही...

त्याचे वडील आता रूममधे नव्हते. आता दिल्या कसाही वागायला, बोलायला मोकळा होता.

दिल्या - अय मच्छर... कोचा करीन कोचा....

'कोचा करीन कोचा' वरून सगळे एकदम पुर्वीच्या मूडमधे आले.

वनदास मोकळेपणाने हासला तसा मग अश्क्याही जरा सैलावला!

आत्मा - हे पुन्हा बदलले बघा...

अशोक - बदलू देत हो... ए वन्या.. अरे ती शकिला आण ना परत...

आत्मा - हे मात्र बरोबर आहे... आपल्या वस्तू आपण आणायलाच पाहिजेत परत....

स्फोटक हासले तिघेही! दिल्याने तीन बुक्या मारल्या.

अशोक - अहो आत्मानंद... तुम्ही पण बदललात की??

आत्मा - छे छे! मी फक्त वस्तूबाबत म्हणालो..

अशोक - पण मला एक सांगा... तुमचे तीर्थरूप येऊन गेले... त्यांना कणभरही शंका आली नाही की अपेयपान, अभक्ष्यभक्षण व शिवीगाळ असे प्रकार येथे चालत असतील.. हो की नाही??

आत्मा - अर्थात...

अशोक - मग याचे श्रेय आम्हाला का देत नाही आहात???

आत्मा - अर्थातच देतोय.. तुमचेच श्रेय आहे सर्वांचे...

अशोक - मग हे सेलिब्रेट नको का व्हायला????

आत्मा - छे छे! तुमचे साजरीकरण फार भिन्न असते... आपण श्रीखंडाचा एक डबा आणू फार तर...

दिल्या - श्रीखंडाचा डबा??? XXXX...... ए वन्या.... तो अर्धा खंबा राहिलाय तो काढ अन आणखीन एक घेऊन ये...

आत्मा - अहो... नका ना पिऊ पुन्हा... एक दिवस राहिलात ना मद्याशिवाय....

अशोक - दिलीपराव... ऐका ना त्यांचं जरा....

दिल्याने एम्.टू.चे पुस्तक हाताशी होते ते जीव खाऊन अश्क्यावर फेकले. अश्क्याने ते कसेबसे चुकवले एवढा जाड असूनही!

तेवढ्यात वनदास बाटली काढायला उठला...

वनदास - घेणार का???

आत्मा - मी??..... काय बोलता काय??

अशोक - वन्या... बाटलीला हात लावायच्या आधी माझी शकिला परत आणून दे.. झोप येणार नाय मला..

वन्या शेजारच्याच्या रूममधे गेला अन एक भलताच फोटो घेऊन आला... रेश्मा नावाच्या तशाच नटीचा!

अशोक - वन्या... ही कोण... शकिला कुठेय????

वन्या - तो म्हणाला एक्स्चेंज करू पंधरा दिवसापुरती....

अशोक - पंधरा दिवसांनी शकिला आली नाही ना??? काय रे दिल्या?? कोचा करीन कोचा...

वन्या - देईल रे बाबा....

आत्मा - या कोण आहेत??? कोणी वेगळ्या आहेत का??

अशोक - होय... या रेश्माताई आहेत...

आत्मा - ताई?? बहीण मानण्यासारखे यांचे वर्तन तरी आहे का???

अशोक - बघा ना राव.... काय दिवस आलेत..

आत्मा - आता काही दिवस या असणारेत का इथे??

अशोक - होय....

आत्मा - आणि मला एक समजत नाही.....

अशोक - काय????

आत्मा - आपली आपली आंघोळ करायची तर लोकांकडे बघून ओठ मुडपून नाहतायत....

अशोक - सवय....

आत्मा - माझ्यामते हे छायाचित्र अधिक उत्तेजक आहे....

अशोक - ते कसे काय??

आत्मा - त्या आधीच्या कोण त्या???

अशोक - शकिलाताई...

आत्मा - हां.... त्यांची निदान आंघोळ झालेली तरी होती....

अशोक - मग???

आत्मा - यांची चाललीय.....

वन्या - अश्क्या.. इथली पिशवी कुठंय...

अशोक - ती काय लेका....

वन्या - ...... ए अरे XXXXनो.... ही या आत्म्याच्या बापा.... वडिलांची पिशवीय....

आत्मा - अरे??? बाबा पिशवी इथेच ठेवून गेले????

दिल्या ताडकन उभा राहिला होता हातातली सिगारेट फेकून!

तेवढ्यात दार वाजले. दिल्याने उघडले. दारात आत्मानंदचे बाबा!

"माझी पिशवी इथेच राहिली... ही चुकून माझ्याबरोबर आली...गाडी चुकली... पण... मिळेल दुसरी.."

स्वतःची पिशवी घेऊन आत्मानंदशीही एक शब्दही न बोलता......

..... बुवा ठोंबरे.... मान खाली घालून खोलीतून निघून गेले होते.... त्यांना थांबवावे, कसे चालले आहेत ते विचारावे... हा विचारही मनात न येता.....

आत्मानंद इथे आल्यापासून प्रथमच विदीर्ण चेहर्‍याने दिल्याकडे पाहात होता...

..... आणि... त्याचवेळेस... उघड्याच असलेल्या दारामधे....

साजिद शेख उभा होता....

गुलमोहर: 

मी पहिली..सावरी...
आहाहाहाहाहाहा...

सावरी...

सावरी...मी दुसरी
आहाहाहाहाहाहा...

Happy Happy Happy

हेहेहेहे....
हाय्...काय गम्म्त आहे नाही.....मज्जा आली....आपण दोघी पहील्या...

चल निघतेय आता घरी...
उद्या भेटुयात.....बाय...

ध्न्यवाद बेफिकीर,

सावरी

हे काय राव, आधि वाचायचे आणि मग पहिला, दुसरा ठरवायचे, तसा मिच पहिला होतो, असो.

बेफिकिर, ग्रेट,
पण.... या बुवांमुळे .... ओल्ड मंक लार्ज चा एक भयानक अध्याय मात्र चालू झाला.... >>> वाचुन असे वाट्ले, कि आता बुवा च अ‍ॅडमिशन घेतो कि काय?

किति खर लिहिता राव तुम्हि, आम्हि पण असेच उभे राहायचो कोणाचे आई बाबा आले कि, आणि असे वागायचो कि जणु मित्राचि नाहि आपलिच आई आलिय, काय ति विचार्पूस, काय ते मित्राच कौतुक, तो किति चांगला, किति आभ्यासू, किति प्रेमळ, तो किति हे, तो किति ते(जे आठवेल ते, लिमिट नाहि) आणि प्रत्येक विशेषणाच एक उदाहरण(जे खरतर अगदि विरोधाभासि आसायचे), मित्राच्या डोळ्यातिल अरे आवरत घे, जास्त होतय, चे भाव, आणि त्याचि कातिल स्माईल(आई जाऊदे बघतो तुझ्याकडे).

आणि एक, बुवां नि 'रेश्माताई' चे चित्र पाहिल असेल का?(असल्यास किस्साच झाला म्हणा कि)

शेवटच वाक्य .......... , आता राडा होणार हे नक्कि.

बेफिकीर, फार छोटा, पण छान भाग होता आजचा... बुवांची चेष्टा असलेला प्रसंग वाचून मन विषण्ण झाले Sad

बुवा - बेटा... दुसर्‍याचा अपमान करणं सहज सोपं असतं! खोटा किंवा खरा मान देणंही सोपंच असतं! पण.... स्वतःचाही मान राहील अशा पद्धतीने दुसर्‍याला मान देणं... हे खूप अवघड असतं...
बुवांच्या तोंडी घातलेलं हे वाक्य म्हणजे लाखात एक!!!

बुवांनी 'ती' पिशवी उघडून पाहिली असेल ना? Sad एवढा प्रयास करुन लपवलेले बिंग फुटलेच शेवटी.... Sad

पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहतेय....

परेश केंद्रे, तुमचा प्रतिसाद खुप छान आहे. Happy

सावरी, हो ना! मजा येते ना हे असे पहिली, दुसरी सारखे बालिश खेळ खेळायला... लहान झाल्यासारखे वाटते एकदम Happy लहान मुलांच्या निरागस विश्वात परत गेल्याचा फील येतो... हो..भेटू या उद्या. टाटा Happy

आणि... त्याचवेळेस... उघड्याच असलेल्या दारामधे....

साजिद शेख उभा होता....

भागाचा शेवट चटका लावून गेला...... भूषणराव.... पुढच्या भागासाठी अजुन जास्त आसुसलो हो..
कधी येईल..? Uhoh

छान. Happy

मस्त..