राजकोट डायरी

Submitted by लसावि on 21 September, 2010 - 05:56

राजकोटला नोकरीसाठी जायचे ठरवले तेंव्हा बिग इंस्टिट्युट, प्रोफ़ेशनल ग्रोथ, बेटर पे अँड पर्क्स इ.इ. लेबलच्या मागे ते गाव कसे असेल, लोक कसे असतील असला काही विचार अजिबातच केला नव्हता.
राजकोटमधली माझी मे महिन्यातली गरम, दमट पहिली सकाळ. नउ वाजेपर्यंत आरामात लोळून मग मी वर्तमानपत्र आणायला बाहेर पडतो, एक चौक मग दुसरा, त्याच्या पुढचा; चालतोय, चालतोय पण पेपरचा एकही स्टॉल दिसत नाही.शेवटी थकून परततो आणि बिल्डींगच्या वॉचमनला विचारतो; ’यहां पेपर नहीं मिलता है क्या?’ तो आश्चर्याने उत्तरतो, ’क्यों नहीं, सब मिलते है; शाम को!’ रविवारी सकाळी उठून पेपर कशाला वाचायचा, हा प्रश्न त्याच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत असतो. वेलकम टू राजकोट!
पुढच्या दोन वर्षाच्या वास्तव्यात राजकोटचा हा निवांतपणा पदोपदी अनुभवायला मिळाला.

या शहराला फ़ार मोठा, जुना इतिहास नाही. एकतर हे शहरच ठरवून वसवले गेले आहे. या शुष्क प्रदेशात भरपूर पाणी असलेली जागा पाहून जाडेजा घराण्याच्या राजांनी इथे राजधानी स्थापली. राजकोटच्या त्या काळाच्या फ़ारच थोड्या खुणा आता शिल्लक आहेत. ब्रिटीश राजवटीचा ठसा मात्र इमारतींच्या रुपाने अनेक ठिकाणी दिसतो. केवळ संस्थानिकांसाठी सुरु केलेले ’राजकुमार कॉलेज’ हे त्यातले सर्वात महत्वाचे मॉन्युमेंट. तिथे राजपुत्रांच्या घोड्यांसाठी बनवलेला ’पार्किंग लॉट’ देखील आहे.

गुजराती माणूस म्हणजे पैशाला चिकट, थोडा लबाड, अशी आपल्या मनात जी प्रतिमा आहे (मुख्यत: हिंदी सिनेमातील प्रोटोटाईपमुळे) तिचा इथे अजिबात अनुभव येत नाही. ल़क्षात घ्या, हा गुजरात नाहीए तर सौराष्ट्र आहे आणि इथे घाई नामंजूर आहे. पानपट्ट्यांचा अपवाद सोडल्यास बहुतेक दुकाने सकाळी दहा नंतर उघडतात, दुपारी एक ते चार बंद असतात आणि रात्री कितीही वाजेपर्यंत चालू असतात. धंदा करायचा जोश, कसही करुन गिर्‍हाईकाला गटवायची अहमहमीका कुठेही आढळत नाही. मात्र या निवांतपणाचा कळस जन्माष्टमीच्या दिवसात होतो. त्यावेळी गावात कर्फ़्यू असल्याप्रमाणे सर्व दुकाने पूर्ण आठ दिवस बंद असतात. या सुशेगाद कारभाराची दुसरी बाजू म्हणजे इथली प्रचंड महागाई. भाज्या, किराणा, कपडे सगळचं एकदम चढ्या भावात मिळतं. सगळ्या जगात मंदी येईल पण इथली अनाकलनीय महागाई अजिबात हटणार नाही.

इतरवेळी आरामात कामं उरकणारे हे लोक घाई फ़क्त एका गोष्टीत दाखवतात, गाड्या चालवताना. भारतीय ट्रॅफ़िकमधले सर्व अवगुण इथे एकवटले आहेत. बेशिस्त वाहतूकीची आपली मराठी व्याख्याच इथे बदलून जाते. पहिली गोष्ट म्हणजे इथे सरकारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अस्तित्वातच नाही. बहुतेक रिक्षा म्युझियममधे ठेवण्याच्या लायकीच्या आहेत आणि पेट्रोलसदृश कसल्याही द्रव्यावर चालतात.थोड्याफ़ार सी.एन.जीवाल्या रिक्षा वाट्टेल ते दर सांगतात (सगळ्या रिक्षात कॉमन असणार्‍या गोष्टी दोनच, 'अमिसा' पटेलचा फोटू आणि 'हिमेस'भाईचे गाणे). या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे प्रचंड प्रमाणात असलेली दोन आणि चारचाकी वाहने. शहरात २-३ ठिकाणीच सिग्नल आहेत, ट्रॅफ़िक पोलिस हा प्राणी फ़क्त काही मोठ्या चौकात आणि तो ही रविवारीच दिसतो. इथे गाडी चालवायची एकच रीत आहे ’घुसा’, कुठूनही, कसेही. पार्किंगची इथली पद्धत तर अद्वितिय आहे, गाडी बंद केल्यावर जिथे थांबेल तिथेच ती सोडून देतात मग ती रस्त्याच्या मधोमध का असेना. त्यात इतरांनाही काही वाटत नाही. त्या ’सोडलेल्या’ गाडीला वळसा घालून वाहतूक शांतपणे चालू राहते.
हे सर्व कमी म्हणून की काय पण संपूर्ण शहरात सर्वत्र गाई-गुरे फ़िरत असतात. यात विशेष ते काय असे तुम्हाला वाटेल, पण आहे! एकतर ह्या प्राण्यांची संख्या अतिप्रचंड आहे. दिवसरात्र ही गुरे गावभर चरत असतात आणि आख्ख्या गावाचाच एक गोठा करुन टाकतात. अर्थात हा गोठा बनवण्यात सर्व राजकोटी मनापासून सहभागी असतात. कचरा हा कचरापेटीत टाकायचा हेच यांना मान्य नाही. तो सरळ रस्त्यावर फ़ेकून देतात आणि ’गाय खा लेगी’ असं सांगून पुण्य मिळवल्याचे समाधान मिळवतात.

खाण्यापिण्याच्या बाबतीत हे एक अजब गाव आहे. सुरवातीला मला वाटले इतके कडक शाकाहारी गाव दुसरे नसेल. पिझ्झा हट सारख्या इंटरनॅशनल चेनमधे देखील नॉनव्हेज मेनू मिळत नाही आणि अधिकृतपणे नॉनव्हेज मिळणारी २-३च हॉटेल्स आहेत. पण नंतर लक्षात यायला लागले की हा निव्वळ दुटप्पीपणा आहे. राजकोटच्या मुस्लिमबहुल ’सदर’ भागात नॉनव्हेजची ’कॅरी होम पार्सल’ सेंटर्स आहेत आणि ती तुफ़ान चालतात, फ़क्त आपण हे खातो असे उघडपणे मान्य करायला सामान्य राजकोटी तयार नसतो. जुना वैष्णव सांप्रदाय आणि नविन स्वाध्याय परिवार, स्वामिनारायण पंथ इत्यादींचा हा एकत्रित प्रभाव आहे. ’पिण्या’च्या बाबतीतदेखील तोच प्रकार आहे. ड्राय स्टेट असल्याने सरसकट वाईन शॉप्स दिसणार नाहीत पण गरजूंना आपली तहान भागवणार्‍या जागा बरोबर माहिती असतात, सगळा उघड छुपा कारभार!

राजकोटच्या खाद्यसंस्कॄतीचे खरे वैशिष्ठ्य आहे तिथली आईस्क्रिम्स. इतकी फ़्रेश, चविष्ट आणि श्रीमंत आईस्क्रिम्स मी अद्याप इतर कोठेही खाल्ली नाहीत. आईस्क्रिममधे कसलाही इसेन्स अजिबात घालत नाहीत, जो काय फ़्लेवर असेल तो ओरिजनल, त्यामुळे मँगो आईस्क्रिम आंब्याच्या सिझनमधेच मिळणार. आईस्क्रिमचा जो काही प्रकार असेल ती गोष्ट त्याच्यात प्रचंड प्रमाणात सापडणार, म्हणजे अंजिर आईस्क्रिम घेतले तर त्यात अक्षरश: घासाघासाला अंजिर मिळणार, त्यात अजिबात कंजूषी नाही. उगीच दोन काजू, तीन मनुका आणि अर्धा अंजिर टाकून त्याला ’मस्तानी’ म्हणायचे हा प्रकार नाही!

माझ्या शिक्षकी पेशामुळे पालकांशी सतत संपर्क आला आणि राजकोटचा स्वभाव कळायला अजूनच मदत झाली. त्याआधी महाराष्ट्रात काही वर्षे काम केले असल्याने ’जागरुक पालक’ नामक प्राण्याची माझी चांगलीच ओळख होती, पण इथे सगळा उलटाच कारभार. एकतर तुम्ही इंग्रजीत बोललात की तुम्ही ग्रेट हे गृहीत धरले जाते (गुजरात्यांचे इंग्रजी हा एक चावूनचोथा झालेला विषय आहे त्यामुळे त्याबद्दल फ़ार काही लिहीत नाही. फ़क्त राजकोटमधल्या काही पाट्या जशाच्या तश्या लिहित आहे- ’ड्रीम होल’, ’सन कोमप्लेक्ष’, ’झेरोक्ष सेंटर’, ’हेर सलून’ इ.इ.). मुळात मुलाकडून यांच्या फ़ारश्या अपेक्षाच नाहीत. ’मी तुला म्हणतोय का की ६०% वगैरे मिळव, पण नीट पास तरी हो’ असं मुलाला अजिजिने सांगणारे बाप पाहिले की माझे मन भरुन यायचे! अगदी हुशार मुलांच्या बाबतीतही बहुतेक पालक उदासिनच असायचे, ’हां, म्हणतात सगळे की फ़ार हुशार आहे, बघू काय करतो ते’ अशी वृत्ती. कारण मुलगा फ़ार शिकला तर बिझनेस कोण करेल ही भितीही असतेच. कडवा पटेल समाजात तर घरटी एक माणूस ’फ़ोरेन’मधे आहे त्यामुळे मुलाने १२वी किंवा फ़ारतर डिग्री मिळवावी आणि मग यूएस, यूके, कॅनडा, गल्फ़, केनिया, अंटार्क्टीका इ.इ. ठिकाणी असलेल्या नातेवाईकाकडे जावे असा सरळ हिशेब. त्याला भारतातच शिकायचे असेल तर भरपूर पैसे घेउन वाट्टेल ती पदवी द्यायला महाराष्ट्र-कर्नाटकात काय कमी कॉलेज आहेत? अर्थात या सगळ्याला अपवाद आहेच आणि तो मुख्यत: मुलींचाच आहे.

माझ्या तिथल्या वास्तव्यात गुजरात विधानसभा आणि लोकसभा अशा दोन निवडणूकाही पाहता आल्या. दोन्हीही वेळा स्थानिक उमेदवाराचा चेहरा कुठल्याही पोस्टरवर कधीही दिसला नाही. सगळीकडे एकच चेहरा 'नरेंद्रभाई मोदी'. जणू आख्या राज्यात एकच माणूस निवडणूक लढवतोय. मोदींची एक 'लाईव्ह' प्रचारसभाही अनुभवली. आवाजावर प्रचंड प्रभुत्व, लोकांवर जादू करण्याची अफाट ताकद आणि त्याचबरोबर प्रत्येक आविर्भावातून प्रकटणारा उद्दाम आत्मविश्वास. संपूर्ण भाषणात त्यांनी उमेदवाराचा उल्लेख अशरशः एका वाक्यात संपवला आणि उरलेले सगळा वेळ फक्त 'मी, मी आणि मी, तुम्हाला मी हवा असेन तर याला निवडून द्या'
माझ्या मते भारतीय राजकारणात इतका पराकोटीचा आत्मकेंद्री आणि अनअपोलोजेटीक नेता दुसरा नाही.

वृत्तीने मला राजकोट-सौराष्ट्र कायमच औरंगाबाद-मराठवाड्यासारखे वाटले. अगदी स्मॉल-स्केल इंडस्ट्रीच्या अर्थकारणापासून ते ’अमदावादी-सुरती आमची उपेक्षा करतात’ या ’मुबै-पुणेवाले आम्हाला कमी लेखतात’ सारख्या तक्रारीपर्यंत! तोच निवांतपणा, जीवनाचा संथ वेग, आपुलकीने बसवून आदरातिथ्य करणारी माणसे.

दोन वर्षात या गावाने खूप काही दिले, शिकवले, मोठे केले. काही गावं पहिल्या भेटीतच मित्र होतात तर काहींच्या बैठकीतले व्हायला वेळ लागतो. राजकोटची आणि माझी ओळख अजून अपुरी असतानाच अनपेक्षितपणे महाराष्ट्रात परत यायची संधी मिळाली. राजकोटची साथ ठरवले होते त्यापेक्षा लवकर सुटली. आता उरलेल्या गप्पा मारायला या अघळपघळ मित्राची कधी गाठ पडणार याची मी वाट पाहतोय.

गुलमोहर: 

मस्त..आवडलं. फक्त मोदींबद्दलचं खटकलं. त्यांनी गुजरातला खूप डेव्हलप केलं आहे. काहीही न करता अहंकार दाखविणार्‍या नेत्यांपेक्षा असा अहंकार परवडला..बाकी लेख अत्यंत खुसखुशीत... Happy

मस्स्त लिहिलंय!... आमची गुजराथमधली १२ वर्षं आठवली.

तुझ्या वाक्यावाक्याला इथे प्रतिसाद द्यावासा वाटतोय.

रस्त्यांवर फिरणारी गाईगुरे आणि जिकडे तिकडे त्यांच्या शेणाची घाण - हे चित्र तिकडे सगळ्याच गावांमधे आहे.

प्रचंड पैसा पण शिक्षणाबद्दल अनास्था आणि गणित-इंग्रजीबद्दल भीतीयुक्त आदर ही पण गुजराथी माणसाची स्पेश्यालिटी. आमच्या अत्याधुनिक(!) काँप्लेक्समधे (४ इमारती, ६४ फ्लॅट्स) कॉलेजचं तोंड बघितलेली मी एकटी बाई होते. (मला उगीच 'वासरात लंगडी गाय...' झाल्यासारखं वाटायचं. :फिदी:)
मी माझ्या मुलाला 'ट्यूसन'ला पाठवत नाही, त्याला गणित घरीच शिकवते हे कळल्यावर त्या बायांच्या तोंडावर असा काही आदरयुक्त भाव प्रकट व्हायचा की विचारायची सोय नाही Lol ("आपको आता है मेथ्स?" असंही मला एकीनं विचारलं होतं एकदा. :हाहा:)
माझा नवरा 'पी.एच.डी.' झालाय म्हणजे नक्की किती शिकलाय हे त्यांना समजावून सांगायचा मी तपभर आटोकाट आणि अयशस्वी प्रयत्न केला. 'बी.एस.सी. ही शिक्षणातली सर्वोच्च पदवी आहे' हा त्यांच्या जनरल 'नोलेज'चा कडेलोट होता.

पानमसाला, मुस्लिमांचा पराकोटीचा आणि भयप्रद द्वेष आणि नरेंद्र मोदी या गोष्टी मात्र तिथे भरपूर चघळल्या जातात.

मुळात मुलाकडून यांच्या फ़ारश्या अपेक्षाच नाहीत. ’मी तुला म्हणतोय का की ६०% वगैरे मिळव, पण नीट पास तरी हो’ असं मुलाला अजिजिने सांगणारे बाप पाहिले की माझे मन भरुन यायचे!<<<<< Lol

मस्त जमलाय लेख, आगाऊ. Happy

लै भारी आगाव Happy
आक्खा लेखच भारी.

मलापण मोदी साहेबांबद्दलचं थोडंसं खटकलं..

लैच रच्याकः -
ववि किंवा कधी सगळे भेटलो तर गुर्जींचं लेक्चर आयकायचंय...

अरे आगावा, वविदिवशी सांगितलं की मी तुला - आम्ही १ वर्ष भरुचमध्ये आणि ११ वर्षं वापीत राहत होतो.
२००८ मध्ये गुजराथला टाटा-बाय बाय केलं. (बहुतेक कायमचं!)

सुंदर आणि मार्मिक वर्णन रे Happy

मोदींबाबतचं मलाही खटकलं.

>>मुळात निवडणुकींच्या प्रचारासाठी अस काहिस project व्हावं लागणं हे साहजिकच आहे.
त्याबाबत परेशला अनुमोदन.

त्यांनी प्रचंड काम केलंय तिथे. निवडणुका जवळपास नसतानाही 'मुलींना शाळेत पाठवा' यासारख्या मोहिमेत अगदी लहान गावातल्या झोपडीतही राहिला आहे हा माणूस.

>>मोदींचे विशेष हे की ते त्यांचा इगो जाहिरपणे प्रकट करायला नेहमीच तयार असतात.
याला कदाचित पारदर्शीपणा म्हणता येईल. बाकीचे बेरकी 'साहेब' कमी नाहीत आपल्याकडे Wink

मी पण २००५ साली तिथल्या इंजिनिअरिंग कॉलेजात गेलो होतो. तीन लाख रु. देऊन आमच्या हिंजवडीत दीड वर्ष रहा नि एम बी ए घेऊन जा, असे सांगायला.
सर्व मुले जमिनीवर बसली होती. मुली सर्व एका बाजूला नि मुले दुसर्‍या. ही सर्व इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील मुले मुली. मागे एकच खुर्ची होती तिथे एक माणुस बसला होता. तो बहुधा मास्तर असावा, म्हणून त्याला खुर्ची.
मी व माझ्या बरोबरचा प्राध्यापक यांनी आपले पाठ केलेले भाषण म्हणून दाखवले. सर्व भाषणात हिंजवडी च्या कॉलेजची इमारत कशी सुंदर आहे, आजूबाजूला कश्या अनेक आय टी कंपन्या आहेत, वगैरे वगैरे. अभ्यासक्रमांची नुसती नावे सांगितली.
मग मुलामुलींनी अभ्यासक्रमाबद्दल प्रश्न विचारायला सुरुवात केली. अतिशय हुषार मुले. नक्की काय शिकवतात, अभ्यासात, असे विचारत होती. अमुक तमुक विषयात कॉलेजमधे काय रिसर्च चालू आहे? मला या विषयात जास्त शिकायचे आहे, ते शिकायला मिळेल का? असे प्रश्न.

या उलट नागपूर, अहमदाबाद, जळगाव इथल्या मुलांचे ठराविक प्रश्न - "मला सेकंड क्लास मिळाला, तुमच्या कॉलेजात प्रवेश मिळेल का?" (तीन लाख रुपये दिले तर म्हशीला पण कॉलेजात घेऊ, असे सांगण्याचा अनावर मोह टाळला) "आत्ता खूप दा मुलाखती दिल्या, पण नोकरी मिळत नाही, तुमच्या कॉलेजात आलो तर नक्की मिळेल का?"

राजकोट ची जनता आहे तोपर्यंत भारताची उन्नतीच होईल, फक्त शहरांचे वारे लागू नये त्यांना.

छान लिहिले आहेस अगावा (ते अस्थानी मोदी वाक्य टाकून लै लोकांना खाद्य दिलेस. पण असो. शेवटी आपण भारतीय. कसलाही लेख असो, त्यात राजकीय मतप्रदर्शन नाही केले तर मग लिहिण्यात काय मजा Proud )

ते गाई-गुरांचे भारीच. गुजरात-राजस्थानात स्वप्नीलसुवर्णचतुष्कोण रस्त्यावरून जाताना सुद्धा गाव जवळ आले की गाईंचे कळपच्या कळप भर रस्त्यात मधे बसलेले दिसतील. लोकांनीच गाड्या सावधपणे चालवायच्या.

सौराष्ट्र-मराठवाडा तुलना भारीच. जगात प्रत्येक राजकीय-सांस्कृतीक भूभागात मला वाटते असे वरचढ-उपेक्षित भाग असणार, तशीच भांडणे असणार. हा आपल्या निसर्गदत्त स्वभाव आहे.

छान लिहिलयस Happy
भावनगरमधले दिवस आठवले.तिथलीही स्थिती अगदी लेखात वर्णन केल्याप्रमाणेच फक्त त्यावेळी नरेंद्र मोदी हा माणुस एवढा प्रसिद्ध नव्हता.

मस्त लेख... जबरदस्त वेगळेच दिसतय राजकोट Happy . आईस्क्रीमबद्दल वाचुन ... आहाहा!!!
महाराष्ट्र सरकार ने मोदींच्या गुजरातेसारखी सुधारण केली तर त्यांचे पण 'मी मी' ऐकायला काही वाटणार नाही.

छान लिहिलय Happy
एक एक महिना असे ३ वेळा राहावे लागले आहे तिथे. हे सगळे वाचून मलाही आता झब्बू द्यावासा वाटू लागलाय Proud

ते अस्थानी मोदी वाक्य टाकून लै लोकांना खाद्य दिलेस.>>> अरे त्या दोन्ही निवडणुका माझ्यासाठी फार नवा अनुभव होता त्यामुळे त्याबद्द्ल लिहिणे भाग पडले, आणि गुजरातेत निवडणुका म्हणजे मोदी. मोदींच्या कामाला कमी लेखण्याची चूक कोणीच करणार नाही, मी फक्त त्यांचे व्यक्तिमत्व मला कसे प्रतित झाले त्याबद्द्ल लिहीले आहे. निवडणुकासोडून त्याचे अजून किस्सेही आहेत पण ते इथे नको.

छान लिहिले आहे. फारश्या प्रसिद्धीत नसणार्‍या गावांबद्दल वाचायला मिळाले की मस्त वाटते. Happy

आगाऊ..सोप्या,साध्या,सरळ ,रोचक,भाषेत ,मला काहीच माहिती नसलेल्या अश्या गावाची छान ओळख करून दिलीस Happy

आगाऊ ... शिक्षक ... ?
तुला पाहिल्यावर तर कॉलेजचा विध्यार्थी वाटतोस ... Proud
असो .... लेख अतिशय मस्त ... !
तुझ्या लेखातले तेच मुद्दे घेऊन त्या शहराला शिव्या घालता येऊ शकतात ... पण तुझी मांडणी इतकी छान असल्याने ते शहर म्हणजे जुना जिवलग मित्र असावा असा फील येतोय .. Happy

तुझे आजवरचे लेखन पाहून तू एखाद्या गोष्टीला miss करत असशील असे वाटत न्हवते .... नवीन पैलू !

निळ्या, ज्या गोष्टी आपण फार तीव्रतेने मिस करतो त्याबद्द्ल अशा अलिप्ततेने लिहिता येत नाही असा माझा अनुभव आहे.
रच्याकने, आपण कधी भेटलोय का?

Pages