ओल्ड मंक लार्ज .... ऑन द रॉक्स - क्रमशः - भाग २

Submitted by बेफ़िकीर on 20 September, 2010 - 09:11

आत्मानंद - या ग्लासला एक प्रकारचा आंबुस वास येतोय....

संध्याकाळचे सात वाजले होते. तिघांपैकी एक जण जेवलेला नव्हता. सगळ्यांनाच झोपायची तीव्र इच्छा झालेली होती. आणि उठल्या उठल्याच आत्मानंदचे लेक्चर नको म्हणून रिकामा खंबा अश्क्याने पिशवीत लपवून ठेवला होता आणि इतर असोसिएटेड वस्तू, जसे खारे दाणे, विड्या, सिगारेटी आणि कच्चा कांदा वगैरे हे सर्व कचर्‍यात टाकून दिलेले होते. आणि मग तिघांनीही ताणून दिली होती. आत्मानंद स्वतःच लेकाचा सात वाजता उठला आणि डायरेक्ट पाणी प्यायला ग्लास उचलला त्याने! वास घेऊनच त्याने तो टेबलवर आपटला अन वरील वाक्य उच्चारले.

एक तर आधीच प्रचंड चढलेली! त्यात गाढ झोप लागलेली! अन त्यात हे असले पवित्र वाक्य! खाडकन जागेच झाले सगळे! दिल्या एक सोडला तर अश्क्या अन वनदासला हेच समजायला वेळ लागला की आपण आहोत कुठे? कारण दिल्या त्याच खोलीत तीन वर्षे होता. पण जसे समजले की आपण ताराबाई महाविद्यालयाच्या देसाई पुरुषांचे वसतीगृह या वास्तूत ओल्ड मंकची चव तोंडात रेंगाळत असतानाच जागे झालो आहोत आणि काहीही न खाल्ल्यामुळे डोके प्रचंड दुखत आहे, तिघेही भडकले. पण आत्मानंदसारखे पात्र रूम सोडून जाऊ नये म्हणून काही दिवस त्याच्या कलाने घेणे आवश्यक होते.

अशोक - कसला वास येतोय म्हणालात??

आत्मानंदला अशोक अहो जाहोच करत होता.

आत्मा - आंबुस आंबुस...

अशोक - आंबुस वास का बरे यावा त्या ग्लासला?? काही प्राथमिक अंदाज??

आत्मा - शी! नुसती धुराने खोली भरलीय! अहो... ती खिडकी उघडा की...

दिल्या ज्या भिंतीशी झोपायचा तिला त्या खोलीची एकमेव खिडकी होती. आणि ती त्याने कायमस्वरुपी बंद ठेवलेली होती. कारण ती उघडली की कुंपणाच्या पलीकडे असलेले लेडिज हॉस्टेल दिसायचे अन जिला बघून दिल्याने पहिले वर्ष पाण्यात घातलेले होते ती सुरेखा आता लास्ट ईयरला होती अन ती त्या खिडकीतून दिसायची! ती दिसून डोक्याला त्रास होऊ नये म्हणून दिल्याने ती खिडकी सुरेखा सेकंड इयरला गेली तेव्हाच कायमची बंद केली होती.

दिल्या! दिल्या एक भग्नहृदयी प्रेमवीर होता. त्याचे हृदय भग्न झाले त्याचदिवशी अख्या ताराबाई कॉलेजला दिल्या हा एक भयानक माणूस आहे हे समजलेले होते.

झाले काय की दिल्याने अ‍ॅडमीशन घेतली ती आमदारांच्या शिफारसीवरूनच! पास होणे काही शिफारसीवर शक्य नव्हते. पण निदान प्रवेश तरी घेतला. प्रवेश घेतला अन वर्गात आला त्या दिवशी कुणीही शपथेवर सांगीतलं असतं! की दिलीप हा अत्यंत साधा मुलगा आहे. आमदारांमुळे प्रवेश मिळालेला असला तरीही उगाच तसे बोलून दाखवत नाही. वर्गात काहीही समजत नसले तरीही बसून असतो. गडबड करत नाही.

दिल्या तेव्हा दारूही पीत नव्हता. सिगारेटही ओढत नव्हता. मस्तवाल शरीर आणि शार्प फीचर्स असलेला तांबुस रंगाचा दिल्या तेव्हा नेहमीच नजरांना आकर्षून घ्यायचा! मुलींच्याच काय? मुलांच्याही! हा असा तगडा नुसता! आणि त्याच आकर्षिल्या जाणार्‍या नजरांमधे एक नजर होती सुरेखा घोलपची!

वर्गात एकदम शांत असलेला दिल्या वर्गाच्या बाहेर पडला की मित्रांबरोबर भरपूर हास्यविनोद करायचा! त्याचे दाणगट शरीर, आकर्षक व्यक्तीमत्व आणि बेफिकीर वागणे हे मित्रांमधे त्यला पॉप्युलर करायला कारणीभूत झाले होते. पण त्या दिवशी... म्हणजे तब्बल साडे तीन वर्षांपुर्वी तो प्रसंग झाला.

वर्गात दिल्याच्या टेबलवर असलेली दिल्याची वही चुकून खाली पडली अन ती उचलायला वाकलेला दिल्या वही उचलून वर झाला तेव्हा गडबडीत त्याने शेजारच्या बाकावर बसलेल्या सुरेखाकडे पाहिले. तिच्या नजरेतून आणि झटकन लाजून मान फिरवून घेण्यातून त्याला समजले की ती आत्तापर्यंत त्याच्याकडे टक लावून बघत होती. झाले! आता वारंवार दिल्याचेही लक्ष तिच्याकडे जायला लागले. अन नेमके तो दहा वेळा पाहील त्यातल्या तीन ते चार वेळा तरी तीही त्याच्याकडे पाहायचीच!

एक नवीनच कारण निर्माण झाले वर्गात जायचे!

दिल्याच्या वेशभुषेत, राहणीत आता हळूहळू फरक पडू लागला. तो कॉन्शस होऊ लागला. त्याच्यातले ते बदल सुरेखालाही समजू लागले. तीही खुष झाली. आता तीही शायनिंग मारायला लागली. वर्गात मुली सहसा मुलांशी बोलत नव्हत्या. अगदीच काही कारण असले तर बोलायच्या! मोकळेपणा नव्हता असे नाही. पण भरपूर मुले अन भरपूर मुली असल्यामुळे मुद्दाम जाऊन मुलांशी बोलायची तशी काही गरज भासत नव्हती.

आमदारांचा भाचा असल्यामुळे सुरुवातीपासूनच त्याचे स्थान स्टाफच्या मनात किंचितसे वेगळे होते. नवनवे प्रोफेसर्स तर त्याला हात वगैरे करायचे. त्याच्याशी संबंध बरे असलेले बरे असे बहुतेकांना वाटायचे. दिल्या हा हुषार विद्यार्थी नसला तरीही प्रॅक्टिकल आणि ओरल एक्झॅम यात इन्टरनली बर्‍यापैकी मार्क्स मिळवायचा त्याचे कारण हेच होते.

परिस्थिती अशी झाली की दिल्याबाबत सगळे जरा सांभाळून, त्यामुळे नाही म्हंटले तरी दिल्याच्या वागण्यात एक पुरुषी बेफिकीरी आणि त्यात सुरेखाबद्दलचे क्षणागणिक वाढणारे आकर्षण!

त्यातच एक दिवस दिल्या मुद्दाम सर्वात शेवटच्या बाकावर बसला. सुरेखा तीन बाके पुढे बसलेली होती. दिल्याला द्यायची होती तिला चिठ्ठी! तेव्हा थोडीच एस.एम्.एस हा मार्ग होता? पण आता ती बरीच पुढे बसलेली असल्याने चिठ्ठी देणे अशक्य होते. त्याने चिठ्ठी पण काय लिहीली होती!

'तुला पाहिल्यापासून तुझ्याशिवाय दुसरा कोणताही विचार मनात नसतो, मला आज भेटशील का? अक्षय हॉटेल, फॅमिली रूम, सहा वाजता, वाट पाहतोय'

व्वा! पण ही चिठ्ठी देता येत नव्हती. सुरेखाला हे समजत नव्हते की तो मागे का बसला आहे. मग एक पिरियड संपल्यावर दुसरा सुरू व्हायच्या आधी सुरेखाने मागे बसलेल्या एका मुलीशी उगाचच काहीतरी विषय काढला. त्या निमित्ताने दिल्याकडे एक दोनदा बघता तरी येणार होते.

आणि झालीच नजरानजर! दिल्याने पटकन हातातला बोळा तिला दाखवल्यासारखे केले. नेमका सुरेखाला संदेश समजला. पण आता सरळ उठून मागे जाऊन बसणे अशक्य होते. सुरेखाही चालूच! तिने आपले दोन्ही हात वर करून चाप काढला अन केस मोकळे सोडले. बोंबला! हा संदेश रांगड्या दिल्याला कसा समजणार? मुली फार डोकेबाज असतात!

बाय द वे! मुलींच्या देहबोलीतील सुक्ष्म हालचालींचा अर्थ सहज सांगू शकण्याचे कसब मी आत्मसात केलेले आहे हे एक अवांतर मधेच! (मुलींच्या म्हणजे त्यात स्त्री ही आलीच! )

एकाच हाताच्या एका बोटाने दुसरे बोट घासत बसणे किंवा चोळत बसणे म्हणजे अस्वस्थता! ही अस्वस्थता बहुधा आवडत्या व्यक्तीबरोबर एकांत मिळत नाही आहे व सभोवताली अनेक जण आहेत यातून आलेली असते.

एकाच हाताने चेहर्‍यावर किंवा कानावर आलेले केस मागे सरकवणे म्हणजे 'मला माहितीय तू मला पाहतोयस'!

दुसरी मुलगी / स्त्री तिच्याशी नुसती बोलायला सुरू झाली तरी खळखळून हासून 'काय' या अर्थी भुवया उंचावणे म्हणजे 'बावळटच आहे, सारखा काय पाहतो काय माहीत'! त्या दुसर्‍या स्त्रीला वाटते की तिच्याच बोलण्याला दिलेली दाद आहे ती!

पापण्या पंचवीस टक्के मिटलेल्या असणे म्हणजे 'बुबुळे समोर असूनही' डोळ्यांच्या कोपर्‍यातून तिसरीचकडच्या दृष्याची नोंद घेणे किंवा घेऊ शकणे!

सरळ बघणे याचा अर्थ सरळ न बघणे!

उजव्या पायाच्या अंगठ्याने जमीन उकरणे म्हणजे 'आता बोल की काहीतरी? का जन्म नुसत्या बघण्यातच घालवणार आहेस???'

डाव्या पायाच्या अंगठ्याने जमीन उकरणे म्हणजे 'इथे कुणी नाहीये तरी लांबच बसलाय बावळट'!

तोंडात पेन किंवा पेन्सिल धरून तिसरीकडेच बघणे म्हणजे 'किती मस्त वाटतं नाही? तू माझ्याकडे असा टक लावून बघतोस आणि ते मला माहीत असतं ते???'

वरील रहस्यांपैकी काही फक्त विवाहीत स्त्रियांना अ‍ॅप्लिकेबल आहेत, तेव्हा ती कुमारिकांना लागू करून पाहणे ही वाचकाची वैयक्तीक जबाबदारी राहील.

अन सुरेखाने केस सोडले. आता तास संपल्यावर ही चिठ्ठी घेणार आहे हे दिल्याला कसे समजावे? तो वैतागलाच! सुरेखाही आता मागे पाहात नव्हती. या तासानंतर येणारा तास हा महाभयंकर विषय म्हणजे मॅथेमॅटिक्स टू चा होता. त्याला दिल्या बसणे ही अशक्य कोटीतील घटना होती. आणि दिल्या उठलाच तास झाल्यावर! सुरेखा नेमकी काहीतरी कारण काढून मागे यायला उठणार तेवढ्यात विरुद्ध बाजूने दिल्या तिच्या टेबलपाशी पोचला अन ती उठली आहे हे लक्षात यायच्या आधीच त्याने ती चिठ्ठी तिच्या बाकाखाली टाकली अन निघून गेला. सुरेखाने पाहिले. ती चिठ्ठी तिच्या शेजारी बसलेल्या नीता काळेने उचलली अन वाचून पटकन पर्समधे टाकली. आता धड नीताला विचारता येत नव्हते की बाईगं तुला काही चिठ्ठी वगैरे मिळाली का? कारण तसे विचारले तर नीताला सुरेखाचे रहस्य समजले असते. आणि धड दिल्याला जाऊन सांगता येत नव्हते की अरे ती चिठ्ठी मला मिळालीच नाही. हो! कोण जाणे? म्हणायचा तुला लिहीलीच नव्हती. म्हणजे झाला का अपमान? सुरेखा हादरून पुन्हा नीताच्या शेजारी येऊन बसली.

नीताच्या खडबडीत सावळ्या गालांवर आता लाजरं हसू उमटलेलं होतं! मॅथेमॅटिक्स टू हा विषय कोळून प्यायल्यासारखी ती आता हरवून प्रोफेसरांकडे बघत होती. सुरेखा नीताच्या चेहर्‍यावरील भावांमुळे प्रचंड हादरलेली होती. हिच्याचसाठी चिठ्ठी होती की काय? की चुकून हिला मिळाली अन नावच नसल्यामुळे हिचा गैरसमज झालाय. पण बघतो तर आपल्याकडे? मग हिला कशी काय चिठ्ठी? आपण अगदी उठल्या उठल्या चिठ्ठी टाकली. आपण कधी एकदा उठतोय असं झाल होतं की काय त्याला??

नीताचे जाम लक्ष नव्हते पिरियडकडे! केव्हा एकदा तो तास संपतो अन हॉस्टेलवर जाऊन आवरून सहा वाजता अक्षय हॉटेलच्या फॅमिलीमधे त्याला भेटतो असं तिला होऊन गेलं होतं!

तास संपल्यावर दोघीही उठल्या. रूमवर आल्या. दोघींच्या रूम्स वेगवेगळ्या होत्या. त्यामुळे सुरेखा पटकन आवरून तयार झाली होती आणि नीताच्या जाण्याकडे लक्ष ठेवून होती. नीता जाणार इतकेच तिला माहीत होते. कुठे जायचे आहे, काय ठरले आहे हे काहीच माहीत नव्हते. अन नीता बरोब्बर पावणे सहाला निघाली. व्वा? छानच दिसतीय की? सुरेखाच्या मनात विचार आला!

सुरेखा मागून निघाली अन नीताने सरळ शेअर रिक्षा केली. गेली की निघून? सुरेखाला काही समजेचना! तेवढ्यात मागून एक पोक्त प्रोफेसर आपल्या स्कूटरवरून आले. 'सर मला प्लीज पटकन लिफ्ट देता का' या प्रश्नावर ते हबकण्याआधीच सुरेखा मागच्या सीटवर बसलीही! निघाली वरात!

लांबवर कुठेतरी नीता रिक्षेतून उतरलेली पाहून सुरेखाही उतरली. गोंधळलेले प्रोफेसर निघून गेले तेव्हा तिने पाहिले. अक्षय हॉटेलमधे गेली होती नीता! आता काय करायचे?? हळूहळू पावले टाकत सुरेखाही हॉटेलपर्यंत पोचली.

इकडे दिल्या हादरला होता. फॅमिली रूमचे अर्धे दार उघडून एकदम नीता आत आलेली पाहून तो उडालाच!

दिल्या - ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ह्यॅ....
नीता - ही ही...
दिल्या - बसा...
नीता - हं...
दिल्या - तुम्ही....
नीता - तू म्हणा मला... (खाली बघत)
दिल्या - तू... इथे???
नीता - ... बोलवायचं अन म्हणायचं इथे?????
दिल्या - हॅ हॅ हॅ! (झालेला गोंधळ समजल्यामुळे व काहीच सुचत नसल्यामुळे)
नीता - ही ही
दिल्या - कॉ.... .... फी....???
नीता - हो....
दिल्या - दोन कॉफी...
नीता - एकच...
दिल्या - त्याला सांगतोय... मलाही हवीय ...
नीता - असं कसं आलं तुमच्या मनात एकदम???
दिल्या - हॅ हॅ हॅ....
नीता - कुणी पाहिलं असतं तर?? चिठ्ठी टाकताना???
दिल्या - हॅ हॅ हॅ...
नीता - .... खरं सांगू????
दिल्या - .... क.... काय???
नीता - मुली बोलत नाहीत म्हणून...
दिल्या - ... काय?? ...
नीता - मला.. केव्हापासूनच तसं वाटत होतं...
दिल्या - ... कसं??
नीता - खूपदा वाटायचं... तुमच्याशी बोलावं...
दिल्या - ... काय सांगता...
नीता - तुम्हाला???

आता आली का पंचाईत???

दिल्या - मला सगळ्यांशीच बोलावेसे वाटते...
नीता - .. हे काय गडे रुक्ष उत्तर???
दिल्या - गडे??? गडे काय गडे??
नीता - माझी आजी नेहमी म्हणते...
दिल्या - ... काय??
नीता - तुझा जीवनसाथी रुबाबदार आणि देखणा असेल...
दिल्या - अहो.. थांबा... तुमचा भयंकर गैरसमज झालेलाय...
नीता - ... कसला???
दिल्या - ती चिठ्ठी चुकून तुम्हाला मिळाली...

खाडकन उभी राहिली नीता! जळजळीत डोळ्यांनी दिल्याकडे पाहात म्हणाली...

नीता - मुली इतक्या स्वस्त वाटतात का?? चिठ्ठ्या टाकून भेटायला बोलवायला??
दिल्या - अहो.. पण... तुमच्यासाठी नव्हतीच ती चिठ्ठी....
नीता - भोगाल तुम्ही.. भोगाल हे पाप...

खाडकन दार उघडून नीता बाहेर गेली सुद्धा! तेवढ्यात वेटर आला..

वेटर - मॅडम गयी क्या??
दिल्या - अबे तू रख ना दो कॉफी.. पैसा दे रहा हूं ना...?? मॅडम गयी क्या म्हणे...

वेटर गेला अन खाडकन पुन्हा नीता आत आली.

नीता - होती कुणासाठी?? चिठ्ठी???
दिल्या - तुमचा काही संबंध आहे का त्याच्याशी?
नीता - सुरेखा??
दिल्या - कोण सुरेखा?
नीता - कोण सुरेखा?? वा वा? बिचारी चांगल्या घरची आहे...
दिल्या - चांगल्या घरची आहे म्हणजे??
नीता - तुमच्यासारख्या वासनांध पुरुषांच्या घाणेरड्या वासनां....
दिल्या - ए बये... जा की तू? आं? एकतर दुसर्‍याची चिठ्ठी उचलून येते नटून.. लाज नाही का वाटत?
नीता - बघतेच मी आता...
दिल्या - काय बघणार तू?

तेवढ्यात वेटर आला.

वेटर - साब... फॅमिली रूममे झगडा मत करो..
दिल्या - तू जातो का? आं?

नीता - तुमचं खरं स्वरूप मी आणणार आहे लोकांसमोर...

म्हणजे काय? च्यायला प्रेम नाही होय करायचं निरागसपणे एखादीवर? खरं स्वरूप काय त्याच्यात??

नीता बाहेर आली अन समोर एकदम सुरेखाच!

नीता - सुरेखा... तुझी काळजी होती म्हणूनच मी त्याला भेटायला आले..
सुरेखा - .... कु... णाला??
नीता - तो नालायक बसलाय आत.... जाऊ नकोस.. फार वाईट माणसं असतात ही..
सुरेखा - ... कोण बसलाय??
नीता - तो दिलीप...
सुरेखा - दिलीप??? मी कशाला भेटू त्याला???
नीता - तुझ्याच भल्याचं सांगतीय...
सुरेखा - नीते.. भलतं सलतं बोलू नकोस..
नीता - मग तू कशी नेमकी इथे?? चिठ्ठी तुला लिहिली आहे हे तो शपथेवर सांगतोय..

सुरेखाने एकदम मान खाली घातली. नीता फणकार्‍याने निघून गेली. ती लांबर गेलेली पाहून हळूच सुरेखा आत शिरली तर दिलीप जाण्याच्या बेतात असताना दारातच भेटला.

'तेरे दीदारको तरसे जान हम कबसे'

दिलीप एकदम विरघळला बिरघळलाच...

दिल्या - अरे??? आला...त???
सुरेखा - मी निघते... पुन्हा भेटू... तिला कळलंय सगळं...
दिल्या - सुरेखा.. तिचा काय संबंधय?
सुरेखा - ती पाताळयंत्री आहे.. माझ्या घरी पण सांगेल.. आजच सांगेल एखादवेळेस..

दिल्या बघतच राहिला. आली काय गेली काय??

आणि आला की सातार्‍याहून सुरेखाचा भाऊ दोन जणांना घेऊन दुसर्‍या दिवशी कॉलेजमधे! आला तो तडक कॅन्टीनमधे! दिल्या होता सतराच वर्षांचा! पण बाविशीचा वाटावा असा होता. चहा मारत बसलेला होता एका टोळक्यात! अचानक मागून खांद्यावर हात पडला.

"चल.. जरा बोलायचंय.... महत्वाचं"

दिल्याला घेऊन जाणारी माणसे कोणत्यातरी भलत्याच हेतूने आलेली आहेत हे समजलेली टोळक्यातील दोन तीन मुले उत्सुकतेने व दिल्याला मदत लागलीच तर म्हणून मागून हळूहळू गेली.

सुरेखाच्या भावाने दिल्याला बाहेर आणले अन पहिले म्हणजे खाडकन कानाखाली लावली.

इतकी जोरात मारल्यावर एखादा बावचळून किंवा त्या वयात असताना रडकुंडीला आला असता. दिल्या वेगळाच!

दिल्या - मारता मला पण येतं! तू कोण??

आणखीन एक बसली.

दादा - सुरेखाचा भाऊ मी! वर्गातल्या मुली बहिणी असतात हे शिकवायचे क्लासेस घेतो...

आणखीन एक बसली. दिल्या शांतच होता. अतिशय शांत चेहर्‍याने पाहात होता. आता टोळके सगळेच इथे आले होते. सुरेखा अन नीता तिथेच बाजूला उभ्या होत्या. कॉलेजचा पहिला पिरियडही चालू झालेला नसल्याने स्टाफपैकी कुणीच नव्हते. कॅन्टीनच्या मागच्या मोकळ्या जागेत दिल्याला तीन फटके बसले अन दिल्याने विचारले..

दिल्या - तिच्या मनात माझ्याबद्दल असलं तर तुला काय प्रॉब्लेम आहे??

आणखीन... आणखीन एक बसण्यासाठी सुरेखाच्या भावाचा वर गेलेला हात लटकल्यासारखा खाली आला... कारण त्याच्या पोटात दिल्याची एक भयानक लाथ बसली होती. त्या लाथेचा इंपॅक्ट आणि आवाज ऐकूनच दादाच्या बरोबरचे दोघे हबकले होते. पण त्यांना त्यांची भूमिका निभावायला हवीच होती. त्यांनी लगेच दिल्याला धरायचा प्रयत्न केला. दिल्याच्या अ‍ॅक्शन्स विजेसारख्या होत्या. एकाचे नाक फुटले अन एकाचा खांदा उखडल्यासारखा तो ओरडू लागला. तो पर्यंत भावाला समजले होते की याने आत्ता आपल्याला मारले.

आता त्याने दिल्याकडे झेप घेतली. पण हवेतच तरंगून खाली आपटला. सुरेखा धावलेलीच होती. मागून नीता ओरडली...

नीता - गुंडय तो गुंड.. सुरेखा... मी सांगत होते तुला...

त्या दिवशी दुपारी प्राचार्यांनी आमदारांच्या पी.ए.च्या फोनमुळे दिल्याला रस्टिकेट करण्याचा हुकूम मागे घेतला अन सुरेखाच्या भावाला सुरेखाच्या पूर्ण सुरक्षेची हमी देऊन परत पाठवले. सुजलेली नाके अन उखडलेले खांदे घेऊन तिघे परत गेले. आमदाराचे नाव ऐकल्यावर कोण उभे राहणार तिथे??

आणि संध्याकाळी नीतासमोर सुरेखाला दिल्या म्हणाला...

"फक्त दोन महिन्यांची नजरानजर आपली.... मला तू आवडलीस... तुलाही मी आवडलो हे मला माहीत आहे.. पण ते जाऊदेत.. हे मी केलेलं एक आणि एकमेव प्रेम... यानंतर मला एकही मुलगी आयुष्यात आवडणार नाही... माझ्या मनातील तुझी जागा कुणीही घेऊ शकणार नाही... या नालायक नीतामुळे हे सगळं झालं... पण तू आता, या क्षणापासून मोकळी आहेस... माझा त्रास संपला तुझ्या नशीबातील.. फक्त एक लक्षात ठेव... पुढे तुझं लग्नं होईल... त्यावेळेस तुझ्या माहेरच्यांचा तुझ्यावरचा हक्क संपेल... त्यानंतर तुझ्या सासरी जर तुला कुणी त्रास दिल्याचे समजले.. तर सरळ उचलून माझ्याकडे घेऊन जाईन.. हे वचन आहे माझे.... दिल्या म्हणतात मला ... दिल्या..."

त्या दिवसापासून एकाच वर्गात, दिल्या नापास झाल्यानंतर एकाच कॉलेजमधे असूनही दिल्या ढुंकूनही सुरेखाकडे पाहायचा नाही... सुरेखाही वचकून असायची.. तिच्या भावाला मारल्यामुळे खरे तर तिला राग आलेला होता दिल्याचा... आणि नीताचे बरोब्बर दोघांवर लक्ष असायचे.... आणि आज??

आज आत्मानंद म्हणतो 'ती खिडकी उघडा की हो???'

दिल्या - या खिडकीचं नाव काढलंस तर बांबू सारीन...

ही धमकी आत्मानंदच्या हजार पिढ्यात कुणी ऐकलेली नव्हती. तो आत्ताच टुणकन जागच्याजागी उडला. वनदास हसायचे की नाही या विचारात शकिलाच्या फोटोकडे पाहात असतानाच आत्मानंद म्हणाला..

आत्मानंद - या बाई अशा का बघतायत??

अशोक - त्या तुमच्यावर प्रसन्न व्हायच्या बेतात आहेत.. अजून काही वेळ पाहिलंत तर अत्यंत मादक हालचाली करत त्या आपल्या भरदार शरीराभोवती गुंडाळलेला तो टॉवेल हवेत फेकत आपल्या देखण्या व रुबाबदार पुरुषी सौंदर्यावर मोहीत होऊन आपल्याकडे झेपावतील...

आत्मानंद - अहो.. यांना म्हणाव माझी असली थट्टा नका करत जाऊ...

वनदास - मी का सांगू यांना??? यांच नाव अशोक आहे.. तुम्हीच सांगा...

आत्मानंद - अशोक... हे बरे नव्हे..

अशोक - खरे आहे... हे बरे नव्हे... पण त्या शकिलादेवी आहेत.. त्यांचीच मर्जी चालणार...

आत्मानंद - दुपारचे भोजन कुठे केलेत...

वनदास - केलेच नाही...

आत्मानंद - ... का???

अशोक - आपण निद्रीस्त होतात... मग आम्ही आपल्याला सोडून कसे भोजणार??

आत्मानंद - माझीच चूक झाली.. चला... हात पाय तोंड धुवा.. मी प्रार्थना करतो...

अशोक - घंट्याची प्रार्थना

आत्मानंद - घंटा नसली तरी चालेल... टाळ्या वाजवा

दिल्या - ए अरे याच्यात बेसिक प्रॉब्लेम्स आहेत....

आत्मानंद उठून उभा राहिला. बाथरूम लांब असल्यामुळे हात पाय तोंड धुण्याचा स्वतःचाच प्रस्ताव त्याने बाजूला ठेवला. त्याने हात जोडलेले होते. आढ्याकडे पाहून तो आता काहीतरी बोलायच्या आवेशात आलेला होता. वनदासला आता मात्र हसू आवरणे अशक्य झाले होते.

आत्मानंद - हे त्रैलोक्याधीशा.... म्हणा....

वनदास - हे त्रैलोक्याधीशा....

वनदासने कॉपी केल्यावर दिल्याने खुनशी नजरेने वनदासकडे पाहिले. हा फक्त पहिला दिवस होता या खोलीतला! चार वर्षात वेड लागायची पाळी आली असती हे माहीत होते तिघांनाही!

आत्मानंद - सर्व भुकेल्या सजीवांना...

अशोक - ओल्ड मंकची एकेक निप फुकट वाट....

आत्मानंद - काय वाट??

अशोक - गोमुत्र....

आत्मानंद - छे छे! अन्न मिळूदेत...

वनदास - अन्न मिळूदेत...

आत्मानंद - माझ्या सहवासात येणार्‍या प्रत्येक व्यक्तीला...

अशोक - 'गे' व्हायची इच्छा असूदेत...

आत्मानंद - काय व्हायची??

दिल्या - ए बास कर रे....

आत्मानंद - सांजसमयीचे वातावरण पवित्र करणारी ही प्रार्थना माझी स्वरचित आहे...

दिल्या - त्याला दोन घोट पाज रे...

अशोक - संपली बे मगाशीच...???

वनदास - रात्रीचं काय आहे??

दिल्या - भा*** मगाशी म्हणतो सहा महिन्यातून एकदा घेतो म्हणे मी....

आत्मानंद - तुम्हाला कुणालाच प्रार्थनेत रस नाहीये का....???

दिल्या - आम्हाला भरपूर रस आहे... पण आढ्याकडे बघण्यात नाहीये रस....

आत्मानंद - ईश्वर सर्वत्र आहे...

अशोक - मग या शकिलादेवीचा अनादर का करताय आपण??

आत्मानंद - कारण त्या अर्धवस्त्रा आहेत... स्त्रीने अंग झाकून घेणे ही आपली संस्कृती आहे... त्यांच्याकडे पाहून भक्तीभाव निर्माण होत नाही... एक प्रकारचा तिरस्करणीय असा वासनिक आवेग संचारतो मनातून आणि गात्रांतून...

दिल्याने हे वाक्य ऐकून स्वतःचा काचेचा ग्लास आपटून फोडला..

अशोक - तुमच्याही गात्रांतून संचारतो... ????

आत्मानंद - शेवटी मी ही एक पुरुषच...

अशोक - अरे तिच्यायला... हे एक नवीनच!

दिल्या - अश्क्या... तुला या ग्लाससारखा आपटीन...

आत्मानंद - अशोकराव... यांचा जमेल तितक्या लवकर उपचार व्हायला हवा.. या खोलीतील जिणे अवघड होत जाईल पुढे पुढे आपल्याला...

दिल्या धावला आत्मानंदकडे! आत्मानंद घाबरून पलंगावर चढला. अशोकने दिल्याला धरले व कुजबुजत सांगीतले 'एवढा चांगला टाईमपास मिळणार नाही, घालवू नकोस तुझ्यामुळे याला'! दिल्या तात्पुरता शांत झाला. वनदास उशी तोंडावर दाबून हसू आवरत होता.

आत्मानंद - हे असे आले की जणू महाराणा प्रतापच... काय घाबरलो मी...

वनदासकडे बघून म्हणाला...

आत्मानंद - आपण का हसताय??

वनदास - मी हसत नाहीये.. नुसता गदगदतोय.. हा एक योगप्रकार आहे..

आत्मानंद - मला इथून एक अत्यंत हीन स्वरुपाची वस्तू दिसत आहे यांच्या पलंगाखाली..

दिल्याच्या पलंगाखाली एक सिगारेटचे रिकामे पाकीट होते

आत्मानंद - धूम्रपानामुळे छातीचा कर्करोग होतो...

अशोक - कुणाच्या छातीला??

आत्मानंद - धूम्रपान करणार्‍याच्या चला... प्रार्थना पूर्ण करू... हे त्रैलोक्याधीशा... परस्त्रीबाबत कोणतेही वाईट साईट विचार माझ्या मनात येऊ देऊ नकोस..

अशोक - अहो परस्त्रीची आपली स्त्री होण्यासाठी तरी यायला हवेत ना आधी तसले विचार?

आत्मानंद - एक साधी प्रार्थना करू देत नाही तुम्ही? हे सारखे हासतात, ते भिंतीवर बुक्या मारतात, तुम्ही हा उत्तेजक फोटो लावून झोप उडवता....

अशोक - उतरा.. खाली उतरा.. बेल वाजली.. जेवायला हवे...

जेवताना चौघेही एक शब्दही बोलत नव्हते. कारण हे पात्र असं आहे हे इतर कुणाला कळू देणे योग्य नव्हते. नाहीतर सगळ्यांनी त्याला पिळायचे कंत्राट घेतले असते अन या तिघांचा काही हक्कच राहिला नसता त्या मनोरंजनावर!

जेवून झाल्यावर खोलीत आल्यावर दिल्याने बिनदिक्कत एक ब्रिस्टॉल पेटवली.

आत्मानंद - अशोकराव.. हेही एकदा तपासायला हवे.. यांचे धूम्रपानही बरेच आहे...

दिल्या - अश्क्या.. भ** तू म्हणतोयस मी गप बसतोय...

आत्मानंद - हे बोलतातही कसे नाही?

दिल्या - अश्क्या.. बाटली काढ दुसरी.. याची बडबड चालू असताना मला झोप यायची नाही....

आत्मानंद - लिक्विड औषध आहे का?

अशोक - होय...

अशोकने सामानातून एक नवीन खंबा काढला. दुपारीच फार झाल्यामुळे वनदास आता नाही नाही म्हणत होता. अशोक आपला दिल्याला कंपनी म्हणून एखादा पेग घेणार होता. आणि दिल्या झोप येईस्तोवर पिणार होता. हा आजच भेटलेला दिल्या, ज्याने आपल्या नडगीवर लाथ मारलेली आहे, तो या दारूचे पैसे तरी देणार आहे का हा विचारही अशोकच्या मनात आला नाही...

आत्मानंद - हे.. हे सगळे भयंकर आहे.... तुम्ही काय माणसे आहात का काय आहात?? मी उद्याच्या उद्या माझे वास्तव्य बदलणार आहे...

अशोक - आत्मानंदराव... एकाही खोलीत आता जागा राहिलेली नाही... आणि बत्तीसपैकी चोवीस खोल्यांमधे रॅगिंग चालते... ही खोली सेफ आहे...

आत्मानंद - बाबा.... बाबा बघताय का?? कुठे आलो मी हा??

वनदास - शकिला हालली रे आत्ता?

अशोक - चढलीय तुझी अजून दुपारची.. पंख्याच्या वार्‍याने हालतोय तो फोटो...

आत्मानंद - तुम्ही पण घेता??

वनदास - घेऊ नको का??

आत्मानंद - आता मी काय बोलू???

दिल्या - दोन घोट घे लेका तूही...

आत्मानंद - अभद्र... अभद्र! ईश्वरा... हे सगळं अभद्र आहे.... शिकायला येतो आम्ही.. आणि हे करतो??

दिल्या - धर रे त्याला.. तिच्यायला बकतंय काही पण.. धर ... धर धर धर...

आत्मानंदला कुठेच पळता येईना! दारात वनदास उभा! अशोक पकडायला धावतोय.. आणि दिल्याच्या हातात बाटली अन तोही धावतोय...

शेवटी पकडला गेला..

बोंब मारायच्या आधीच त्याच्या पवित्र मुखात त्याहून पवित्र जलाचे काही जळजळीत थेंब ओतण्यात आले.

त्या वेदना सहन न होऊन तो मुंडी कापलेल्या कोंबडीसारखा काही काळ नाचला. त्यानंतर शांत होऊन त्याने इकडे तिकडे बघितले... अन म्हणाला...

"बरी लागते तशी.... नाही?????? "

गुलमोहर: 

पुनश्च ''जबराट''... Happy

हसून पुरेवाट झाली.
अश्क्याचं कॅरॅक्टर माझ्या एका मित्रावरूनच घेतलंय की काय इतकं साम्य आहे...

परत एकदा पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत.......

"बरी लागते तशी.... नाही?????? "

खाड्कन डोक्याला ब्रेक लागला. मला वाटले तो आता ओरडतोय की काय? पण आत्मानंदने तर पावित्राच बदलला. खुप हसलो. मजा आली. लगे रहो.

मस्त... सुंदर...छान...विशेष म्हणजे सगळ्या कादंब-या वेगवेगळ्या मुडच्या असूनही बेफिकीरजी तितक्याच ताकतीने लिहीतात..ह्यातच त्यांच लेखक म्हणून मोठेपण....

मस्त... सुंदर...छान...विशेष म्हणजे सगळ्या कादंब-या वेगवेगळ्या मुडच्या असूनही बेफिकीरजी तितक्याच ताकतीने लिहीतात..ह्यातच त्यांच लेखक म्हणून मोठेपण....

बेफिकिर,
राव, शक्य नाहि राव, खुर्चि वर बसता येत नाहि, रुम वर असतो तर गडबडुन, लोळुन हसलो अस्तो.

आत्मानंद - घंटा नसली तरी चालेल... टाळ्या वाजवा
दिल्या - ए अरे याच्यात बेसिक प्रॉब्लेम्स आहेत.... >>> :))

वनदास - शकिला हालली रे आत्ता? >> चेअर मधे ऊडून ऊडून हसलो, बेफिकिर, हाफिसात अस काहि अलाउड नाहि हो आमच्या.

होस्टेल आणी काहि संध्याकाळ आठ्वल्या. Happy

मस्त Happy

लैssssssssssss भारी...........

आम्ही पण असेच म्हणतो....... की बेफिकिर म्हणजे

''बाप माणूस आहे''

हसून पुरेवाट झाली.

होस्टेल आणी काहि संध्याकाळ आठ्वल्या.

"बरी लागते तशी.... नाही?????? "

सरस..........

आज काही खर नाही आहे माझ...
हसून हसून वेडी होणार बहुतेक..नव्हे झालिच....]
मज्जाच मज्जा..

आँफिसात सगळे माझ्याकडेच बघतायेत्...बाप रे...काय हे....जादु आहे..

सावरी

Rofl

व्वा!!! खरंच मेजवानी आज.हसुन हसुन वाट लागली....खुप खुप खुप मस्त सुरुवात झालीये...येऊदे पुढचे भाग पटापट !!

मी पण खरं म्हणजे बेफिकीरजींना हेच सांगायला आले होते...पण आत्तापर्यंत टाईप करून ३ दा खोडून टाकले...विचार केला, त्यांनाही थोडा मोकळा श्वास घेऊ द्यावा...
मात्र पेज रिफ्रेश करणे सतत चालूच आहे.....

"बरी लागते तशी.... नाही?????? >>
पठ्ठ्याला पहिल्यांदाच रॉ बरी लागली ?
काही खरे नाही मग Proud

Pages