ओ कलकत्ता!

Submitted by ज्योति_कामत on 18 September, 2010 - 12:42

गेल्या वर्षी युनियनच्या कॉंफरन्सच्या निमित्ताने कलकत्त्याला गेले होते. बरोबर 2 मैत्रिणी होत्या. वास्को- हावडा एक्सप्रेसने आम्ही कलकत्त्याला पोचलो. महिला वर्गासाठी रहाण्याची उत्तम सोय गुजरात समाजाच्या लॉजमध्ये केली होती. तर कॉन्फरन्स “महाजाति सदन” मध्ये बडा बाजार रस्त्यावर होती. बाजूलाच मेट्रो स्टेशन आहे. सकाळी ते पाहिलं.
कॉंफरन्स सुरू झाली. नाश्ता जेवण सगळं वेगळ्याच बंगाली चवीचं पण स्वादिष्ट होतं. दिवसभर भाषणं वगैरे झाली. रात्रीच्या जेवणाची व्यवस्थाही तिथेच, म्हणजे महाजाति सदन मध्ये होती. रसभरे रसगुल्ले खाउन रसना तृप्त झाली. जेवण जरा जास्तच झालं. आम्हाला गुजरात लॉजकडे पोचवण्यासाठी बसेस ठेवल्या होत्या. बस यायला थोडा वेळ होता. म्हटलं थोडे पाय मोकळे करूया. मी आणि माझी मैत्रीण रस्त्याच्या बाजूच्या फूटपाथवर चालायला लागलो.
मेट्रो स्टेशन ओलांडून थोडं पुढे गेलो. काही अंतरावर फूटपाथवर बस स्टॉपचा एक आडोसा होता. वरचा लाईट बंद होता. त्या अर्धवट उजेडात नीट पाहिलं तर एक म्हातारा, एक म्हातारी आणि एक मध्यमवयीन पण उतारवयाचा माणूस, तिघंजण जीर्ण मळकट कपडे पांघरून फूटपाथवर कोंडाळं करून बसले होते. नीट पाहिलं तर त्यांच्या मधोमध एक पत्रावळ होती. वर थोडासा भात, आणि त्या भातावर दिसेल न दिसेलसा डाळीचा पिवळा ठिपका. ते तिघेही बाकी सगळ्या जगाला विसरून ते जेवत होते.
हे दृश्य पाहून थोड्या वेळापूर्वी पोटात गेलेलं सुग्रास अन्न टोचायला लागलं. मी माझ्या मैत्रिणीकडे फक्त पाहिलं. आणि आम्ही दोघी एकही शब्द न बोलता तिथून मागे फिरलो. महाजाति सदनमध्ये ५०० लोक जेवून उरलेल्या अन्नाचे ढीग काउंटर्सवर अजूनही तसेच होते. बाजूलाच स्थानिक कार्यकर्त्यांसाठी कागदाच्या खोक्यांमध्ये जेवणाची पार्सलं नीट तयार करून रचून ठेवली होती. आम्ही दोघीनी त्यातली दोन खोकी उचलली आणि परत त्या म्हातार्‍यांच्या दिशेने निघालो.
परत त्यांच्यापर्यंत पोचताच ती खोकी त्यांच्याजवळ ठेवली. एकाने उघडून पाहिलं आत काय आहे ते. आणि त्यानी खायला सुरुवात केली. ना कोणी एकही शब्द उच्चारला, ना आभारप्रदर्शनाची भाषणं झाली. आम्हालाही त्यांच्या डोळ्यांकडे पाहायचंसुद्धा धाडस राहिलं नव्हतं.

*****************
रात्र काहीशी अस्वस्थ गेली. सकाळी ब्रेकफास्टनंतर परत तिकडे जाऊन बघितलं, पण ते तिथे नव्हते. दिवसाची बस स्टॉपची नेहमीची वर्दळ होती. परत कॉंफरन्स सुरु झाली. रुटीन भाषणं, माहितीची देवाण घेवाण सगळं त्या दिवसापुरतं संपलं. त्या दिवशीही इतरांशी बोलता बोलता बसमधून राहण्याच्या जागेकडे निघालो. बसने आम्हाला मुख्य रस्त्यावर उतरवलं. तिथून गुजरात लॉजकडे थोडं चालत जावं लागत होतं. आम्ही सगळ्या बायका घोळक्याने बडबड करत चालत होतो. अचानक रस्त्याने वळण घेतलं आणि बाजूच्या फूटपाथवर एका लाकडी पेटीवर झोपलेला ८/९ वर्षांचा लहान मुलगा दिसला. अंगावर पांघरूण नाही. हातापायांची जुडी केलेली. हवा तशी बर्‍यापैकी थंड होती. सगळ्या बायका बोलता बोलता गप्प झाल्या. बहुतेक प्रत्येकीला आपल्या आपल्या घरी झोपलेल्या लेकरांची आठवण आली असावी.
ते लेकरू, तशा सुनसान रस्त्यावर, एकटं झोपलेलं.... आपल्या आईची वाट पहात उपाशी झोपलं होतं? का दिवसभर काम करून दमून झोपलं होतं? वाट चुकलेलं म्हणावं तर चांगलं झोपलेलं होतं आणि जवळच मुख्य रस्त्यावर पोलीस चौकी होती. कोणीतरी दुकानदाराने नक्कीच पोलिसाना कळवलं असतं. काही कळेना. आम्ही तशाच लॉजवर गेलो. राहून राहून त्या झोपलेल्या मुलाची आठवण येत होती. दुसर्‍या दिवशी कॉंफरन्स संपली. आम्ही सगळ्यांचा निरोप घेऊन निघालो. राहिलेल्या एका दिवसात कालीघाटावर जाऊन आलो. जमेल तशी सायन्स सिटी पाहिली. कोणी साड्या खरेदी केल्या. मग हावडा वास्को एक्सप्रेसने परत घरी.

*****************
पण अजूनही, कलकत्ता म्हटलं की, तिथल्या प्रसिद्ध साड्या, बंगाली मिठाया, कालीघाट, किंवा सायन्स सिटीच्या आधी आठवतात ते, एका पत्रावळीत जेवणारे ते तीन म्हातारे. आजही कधीतरी झोपलेल्या मुलांच्या अंगावरची पांघरुणं नीट करताना डोळ्यासमोर येतं, ते फूटपाथच्या कडेला लाकडी पेटीवर अंगाची जुडी करून झोपलेलं लेकरू.

या अस्वस्थतेच्या शापातून सुटका नाही!

गुलमोहर: 

कलकत्त्याला दोनदा जायचा योग आला. तिथे मध्यमवर्ग अत्यल्प प्रमाणात आहे असे वाटते. अतिशय गरीब आणि अतिश्रीमंत असे दोन वर्गच प्रामुख्याने पहायला मिळतात. तफावत अतिशय ठळकपणे दिसून येते.

अश्विनीशी बाडिस......सही लिहिलय्स ग......अस्वस्थतेच्या शापातुन सुटका नाही..........

मी अमि,
कलकत्त्यात मध्यम वर्ग भरपूर प्रमाणात आहे, पण तुम्ही शहराच्या कुठल्या भागात आहात यावर तुम्हाला आसपास काय दिसतंय ते अवलंबून आहे.

कलकत्त्यात गरीबी बकाली खूप आहे आणि ती आपल्यापेक्षा जास्त visible आहे. कारण तिथे रस्त्यावर रहाणं आपल्यापेक्षा स्वस्त आहे. रस्त्यावर गंगेच्या भरतीचं जादा पाणी वाहून जावं म्हणून ब्रिटिशकाळापासून पंप्स बसवलेत. त्यामुळे पाणी फुकट. रस्त्यावर ७-८ रुपयाला भात-मच्छी ची थाळी मिळते!
शिवाय कलकत्ता सोडलं तर आणी आता बर्‍यापैकी भुवनेश्वर सोड्लं तर पूर्व भारतात व्यवस्थित मोठी शहरं नाहीत. आपल्याकडे मुंबई, पुणे - नंतर नागपूर, औरंगाबाद, जळगाव, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, नांदेड, लातूर अशी कितितरी शहरं आहेत जिथे काहीतरी रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. आणी जर खूप बारकाईने पाहिले तर कळतं की कलकत्त्यात रस्त्यावर रहाणार्‍यांमधे बंगाली लोकांचं प्रमाण कमी असतं. असतात ते बिहारी आणि बांगलादेशी. कारण त्यांना नशीब काढायला दुसरी जागाच नाही. बंगाली खेडेगावांमधून मात्र पश्चिमेकडचा आदिवासी भाग सोडल्यास फारशी अन्नाची ददात नाही.
आणि बांगलादेशींचा प्रश्नही आता फार किचकट झालाय. मुळात राजकीय इच्छाशक्ती नाही. आणि कायदेशीर रीत्या आलेले, ये जा करणारे बांगलादेशी ही खूप असतात. त्यामुळे कोण घुसखोर कोण नाही हे ठरवणं डोकेदुखीचं आहे. अनेकांची अजूनही निम्मी कुटुंबं इकडे आणि निम्मी तिकडे असतात. शिवाय आपली ही सीमा पाकिस्तानच्या सीमेसारखी पूर्ण अभेद्य होऊ शकत नाही, कारण भौगोलीक परिस्थिती! उदा: सुंदरबन मधे तुम्ही सीमाराखण करणं फारसं सोपं नाही.

पहिल्या पहिल्यांदा कलकत्त्यात खूप मानसिक त्रास व्हायचा अशा गोष्टी पाहून. आता मन थोडं निर्ढावलंय... पण याच अशाच गोष्टी मी पूर्वी दिल्लीत ४ वर्षं राहिले तेव्हा पाहिल्यात आणि मुंबईत पण पाहिल्यात. शेवटी दक्षिण आशियातील शहरीकरणाचा हा भेसूर चेहरा सगळीकडे सारखाच आहे.... कुठे कमी दिसतो कुठे जास्त!!!

अगदी खरं. आजकाल मुंबईत सुध्दा रस्त्यावरून जाताना कुठे काय दिसेल नेम नाही. एक वाईट अस्वस्थता, आपण काही करू शकत नाही ह्याची खंत, चिडचिड ह्याचं एक विचित्र मिश्रण १-२ दिवस जाणवत रहातं. आपण पुन्हा स्वतःच्या आयुष्यात मग्न होणार आहोत ह्याबद्दल स्वतःचीच चीड येते मग. राजपुत्र सिध्दार्थच्या बापाने त्याला जगातल्या दु:खापासून दूर ठेवायचा यत्न केला होता तो त्याचा बाप अश्यावेळी शहाणा वाटायला लागतो. Sad