श्रीनिवास पेंढारकर - एक बाप - क्रमशः - भाग ३४ - अंतीम भागाच्या आधीचा भाग!

Submitted by बेफ़िकीर on 17 September, 2010 - 06:26

डबलडेकर मावशींकडे ठेवली श्रीनिवासने! सकाळपासून त्या भंगारवाल्याच्या फेरीची वाट पाहात होता. आलाच नाही तो! दुसर्‍या दिवशी मात्र पुन्हा आला त्या रस्त्यावर! 'हाच का तो' असेही अनुला विचारायची इच्छा नव्हती श्रीची! त्याने भंगारवाल्यालाच विचारले. परवा या वाड्यातून तुम्ही काही वस्तू घेतल्यात त्यात एक लाकडी बस आलीय का? भंगारवाला हो म्हणाल्यावर श्रीने त्याला पन्नास रुपये देऊ केले. 'काहीही करा पण ती बस ज्याला कुणाला दिली असेल त्याच्याकडून गेहून या'! त्यावर तो हसत हसत म्हणाला 'कुणाला देणार साहेब? माझाच दोन वर्षांचा मुलगा खेळतोय, पण त्या बसमधे असं आहे काय?'! भंगारवाल्याचा अंदाज काहीतरी वेगळाच होता. बहुधा त्या बसमधे काहीतरी मौल्यवान असणार ज्याच्यासाठी हा माणूस स्वतःहून पन्नास रुपये देऊ करतोय! श्री म्हणाला 'त्यात काहीही नाही आहे, पण.. त्याच्यात माझ्या सगळ्या आठवणी आहेत, जेथून माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली त्या क्षणापासूनच्या सर्व आठवणींचे प्रतीक आहे ती बस!' यावर भंगारवाल्याला काहीच न कळल्यामुळे त्याने नुसतीच मान हलवली व दुसर्‍या दिवशी सकाळी खूप वेळा ती बस खालून वर नीट तपासून श्रीकडे आणून दिली व ओशाळे हसला. श्रीने आणखीन पंचवीस रुपये दिले व पटकन ती बस मावशींकडे ठेवली. मात्र.. व्हायचे ते झालेच!

वाड्याच्या दारातून बस घेऊन ती मावशींच्या घरात घेऊन जाताना अनुने राजश्रीच्या घरातून पाहिले. बेरीकाकू तिला एक नव्या प्रकारचे लोणचे शिकवणार होत्या म्हणून ती तिथे गेली होती. नेमके नको तेच झाले!

आजवर घरात भांडण झालेले नव्हते. आज तेही झाले.

संध्याकाळी महेश आल्यावर बाबा घरात असूनही आज पहिल्यांदाच अनुने विषय काढला.

अनु - महेश.. बाबांनी ती लाकडी डबलडेकर परत आणली त्या भंगारवाल्याकडून.. अन आजींकडे ठेवलीय..

या विधानावर घरात एकदम घनघोर शांतता पसरली. एक तर श्रीनिवासला हे माहीतच नव्हते की ते अनुला माहीत झालेले आहे. आणि महेशच्या दृष्टीने दोन शंका महत्वाच्या होत्या. एक म्हणजे ती बस परत कशाला आणायची? आणि दुसरे म्हणजे समजा आणली तर अनुला काय प्रॉब्लेम आहे?

अनु स्वयंपाक करत असताना तिने हे वाक्य उच्चारले अन महेश अन श्री एकमेकांकडे बघतच बसले. श्रीनिवासच्या चेहर्‍यावर अपराधी भाव होते. अपराधी भाव असण्याचे एक महत्वाचे कारण होते. बस परत आणणे हा काही अपराध नव्हता. इतका मोठा अपराध तर मुळीच नव्हता. पण ती चोरासारखी आणून आजींकडे ठेवणे हा प्रकार विचित्र होता. त्यामागच्या श्रीनिवासच्या भावना समजण्यासारख्य नव्हत्याच! स्वतःचे हक्काचे घर असताना मुलाला अन सुनेला माहीत होणार नाही अशा पद्धतीने ती बस मावशींकडे ठेवणे हे श्रीचे काम नक्कीच परकेपणाचे वाटणार होते मुलांना! असे का केले असे ती विचारणारच होती! पण महेश शांतपणेच विचारत होता.

महेश - ... का हो?? ...
श्री - ..
महेश - ... तुम्ही बस आणलीत?
अनु - आणली की... मीच पाहिलं आणताना..
श्री - हो.. ती बस म्हणजे आठवण आहे माझी.. तू लहान होतास ना .. तेव्हा..
महेश - मला माहितीय हो ते... पहिलं खेळणं आहे ते... तेच तेच सांगत बसतात...

श्रीला दु:ख झाले. एवढ्यावरच चर्चा थांबली असती. पण अनुला सोक्षमोक्षच लावायचा असावा.

अनु - माझं काय म्हणणं आहे? बस त्या घाणेरड्या माणसाकडून कशाला परत आणायची पण??
श्री - अगं आणली म्हणून काय झालं? कुणाला काही त्रास आहे का?
अनु - त्रासाचा काय प्रश्न आहे? जुन्या वस्तू आपण त्याला देतो त्याच्याचकडून पुन्हा आणतात का?
श्री - हे बघ.. ती बस माझ्या आठवणींपैकी एक आहे... आणि इथे ठेवलीय का मी ती?
अनु - तो आणखीन एक मुद्दाय माझा! त्यांच्याकडे काय म्हणून ठेवता ती बस?
श्री - का?
अनु - का काय का? त्यांचे अन आपले संबंध तरी आहेत का?

हा आणखीन एक धक्का होता श्रीला! पवार मावशींचे अन आपल्या घराचे संबंध नाही आहेत हे वाक्य आपल्या घरात उच्चारले जाईल असे त्याला कधीच वाटले नव्हते.

आता श्रीसुद्धा चिडला.

श्री - हे पहा अनुराधा.. त्या मावशी आमच्या दोघांसाठी काय आहेत ते तुला आज समजायचे नाही...

फणकार्‍याने अनु महेशकडे पाहात म्हणाली..

अनु - बघितलंस? हेच मी तुला सांगत असते. आमच्या दोघांसाठी, आम्ही दोघे, आमचे, आमचे! सारखं आपलं आमचं अन आमचं! मी नाहीये का कुणी घरात? तू आता का बोलत नाही आहेस?

महेश - अनु... तू उगाच ओरडू नकोस..

अनु - उगाच ओरडतीय मी? उगाच?? हजार वेळा तू मान्य केलेलं आहेस की बाबा चुकतात बोलायला..

महेशने खाडकन श्रीकडे पाहिले. श्री रोखून महेशकडे पाहात होता. अत्यंत नाजूक क्षणी अनुराधा अन महेशच्या एक दोनदा झालेल्या संवादाला 'हजारवेळा' असं विशेषण लावून तिने आत्ता पेश केलं होतं! ती असं करेल असं वाटलंच नव्हतं महेशला! तो एकदम तोंडघशीच पडला होता.

श्री - हे पहा अनुराधा... ती बस आपल्याला विकायची नाहीये.. आणि मावशींकडे ठेवण्याचे कारण म्हणजे तुम्हाला जुन्या गोष्टी खोलीत आवडत नाहीत ठेवलेल्या.. म्हणून तिकडे ठेवली...

अनु - बघ महेश.. हे असं करायचं नाहीये... ते तसं करायचं नाहीये.. हेच ऐकायचं का मी कायम? मला काय स्वातंत्र्य आहे मग?

महेश - अनुराधा... तू उगीच एवढ्याचं तेवढं करतीयस... त्या बसने तुला काय प्रॉब्लेम होतोय??

अनु - तुलाही आता काही वाटत नाही माझं! म्हणजे एक डबडा, मोडलेली घाणेरडी खेळण्यातली वीस वर्षांपुर्वीची बस मी विकू शकत नाही? ती विकली तर हे परत आणतात.. आणि तू म्हणतोस मला काय प्रॉब्लेम आहे?? मग मी काय फक्त यांचं ऐकायचं?? मनाप्रमाणे काहीच करू शकत नाही मी?

"अनुराधा"

श्री ओरडला.

"तुला भांडण काढायचंच आहे असं दिसतंय मला.. हे असलं चालणार नाही... काय प्रॉब्लेम झाला मी बस आणली तर ?? इथे ठेवलीय का? तुझे अन मावशींचे नसतील संबंध.. पण माझ्यावर त्यांचे अनंत उपकार आहेत.. तुला काय स्वातंत्र्य नाही आहे? काय स्वातंत्र्य नाहीये तुला? हवे तेव्हा माहेरी जातेस, सासू नाहीच आहे तुला, खोली रंगवून घेतलीस, परस्पर तीन हजारांचा निर्णय घेतलात तुम्ही दोघांनी.. पैसे तुम्हीच घातलेत ते ठीक आहे.. पण मग तुम्हाला काय वाटते? माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मी रंगवत नव्हतो खोली?? मी एक एक पैसा साठवतोय अजूनही.. तुम्हाला हे माहितीय का की मी साने आजींच्या वाड्यात जाऊन बालवाडीतील जी मुले येतात त्यांच्याबरोबर रोज दुपारी दिड तास बसतो?? माहितीय? का बसतो माहितीय?? कारण त्याचे मला महिना सातशे रुपये मिळतात. मी निवृत्त झालो तेव्हा माझा पगार दहा हजार होता.. मला सातशे रुपयांचं काय कौतुक असणार आहे?? पण मी ते करतो ते याच्यासाठी की माझेही हातपाय चालत रहावेत आणि जमतंय तोपर्यंत थोडे थोडे पैसे मिळवत राहावेत.. पण तू रंग लावून घेतलास.. मी अक्षर बोललो त्याच्याबद्दल?? उलट कौतुक केलं तुझं सगळ्यांमधे.. तुझ्या बाबांना फोन करून सांगीतलं.. सोन्यासारखी सून आहे आमची म्हणून.. काय स्वातंत्र्य नाहीये तुला??

महेश - बाबा.. तुम्ही शांत व्हा...

अनु - नकोच्चे मला असलं स्वातंत्र्य...

श्री - म्हणजे काय?

अनु - आम्ही फ्लॅट घेणारोत...

महेश - अनु...

श्री - आम्ही म्हणजे??

अनु - आम्ही दोघे..

श्री - कुठे????

अनु - नव्या पेठेत...

श्री - नव्य... महेश??? तुम्ही फ्लॅट बूक केलायत??

महेश - ..... चाललंय बूक करायचं...

अनु - का?.. तुम्हाला आता काय प्रॉब्लेम आहे??

श्री - मला प्रॉब्लेम?? मला कसला प्रॉब्लेम मूर्ख मुली?? मला अत्यानंद झालाय.. आयुष्यात एक तेही मोठं स्वप्न होतं माझं! स्वतंत्र अपार्टमेंट घेण्याचं! कधीच पूर्ण होऊ शकलं नाही ते... तुमच्यामुळे पूर्ण होतंय.. अन मला वाइट वाटेल?? अभिमान वाटतोय मला तुमचा...

अनु - बाबा.. ते....

अनुचा खर्जातला आवाज ऐकून महेश चरकला.. श्री अन महेश दोघेही खाली मान घालून चोरट्यासारखे बोलणार्‍या अनुकडे पाहू लागले...

अनु - ... ते... तुमचं नाहीये ते स्वप्नं.... ... आमचंय...

दास्ताने वाड्यात आज भूकंप झाला होता. भूकंप!

मावशींना एक अन एक शब्द ऐकू गेलेला असूनही त्या त्यांच्या खोलीत गप्प बसून होत्या.

श्री - ... तुम... आमचंय... आमचंय म्हणजे????

श्रीने अनु काहीच बोलत नाही हे पाहून महेशकडे पाहिले. महेशची मान वर होत नव्हती...

श्री - ... काय रे?? ... महेश.. काय म्हणतीय ही...

महेश - ... बाबा.. आम्ही... आम्ही नाही नेऊ शकत तुम्हाला तिथे....

श्रीनिवास पेंढारकर - एक बाप!

आपल्या वंशाच्या एकमेव दिव्याकडे थिजून बघत होता तो बाप! अनुची मान वर झालेली होती नवर्‍याबद्दलच्या 'सार्थ' अभिमानाने.. महेशला मात्र या क्षणी पहिल्यांदाच आत्महत्या करावीशी वाटत होती ते वाक्य बोलल्यावर...

दास्ताने वाड्यामधे वाहणारी हवा थांबली होती क्षणभर!

पण..... क्षणभरच.....

कधी नव्हे इतका दिलखुलास हसत श्री पुढे आला आणि महेशला गदागदा हलवत ओरडत म्हणाला...

श्री - गट्या... लेका... भारीचेस तू... एकदम फ्लॅट??? आं?? अरे काय हे??? ... अतिशय सुंदर बातमी... आणि मान काय खाली घालतोयस?? तुमचा संसार चालू होईल आता.. त्यात काय मला म्हातार्‍याला यावसं वाटणार आहे??? इतका अपराधी चेहरा करताला लाजा वाटत नाहीत?? लेका ... हक्काने सांगायचं... बाबा... आम्ही दोघे आता तिकडे राहणार आहोत... मूर्खा... तू म्हणालास तरी मी येईन त्या फ्लॅटमधे?? आं?? अरे मला काय समजत नाही का? मी नाही का तुझ्या आईबरोबर इथे माझ्या आई वडिलांना सोडूनच राहिलो?? अरे असंच असतं...आणि मी आहेच की इथे?? काय?? आणि अजून तर फ्लॅट बूक व्हायचाय... बर मला सांग... पैशांचं काय??? मी किती घालायचेत???

अत्यानंद झालेली अनुराधा सासर्‍याच्या अती प्रेमळ रुपाकडे हसून बघत होती. महेशची मात्र....

... अजूनही मान वर झालेली नव्हती...

अनु - बाबा... मी ओरडाआरडी केली म्हणून सॉरी हं??

श्री - छे छे? अगं घरात वादावादी होणारच...

अनु - ... आम्हाला.... तीन लाख....

श्री - ... त... तीन......... .... ओके?? डन... तीन लाख दिले..

महेश धक्का बसून बाबांकडे पाहात होता. किर्लोस्करमधून मिळालेले ३.६७ लाख, सुंदरममधुन निवृत्त होताना मिळालेले सत्तर हजार आणि आजवर जमवलेले साधारण चार लाख सोडले तर बाबांकडे काहीच पैसे नसणार हे त्याला माहीत होते. त्यातलेही एक लाख लग्नात खर्च झालेले होते आणि ३.६७ लाखांमधले तर जवळ जवळ एक लाख रुपये महेशच्या शिक्षणात अन हिरो होंडा घेण्यात वगैरे गेलेले होते. म्हणजे सहा, साडे सहा लाखांमधले तीन लाख बाबा आपल्याला देतायत?? हा कुठला हिशोब झाला? की आपण त्यांचे तीन लाख घ्यायचे आणि... त्यांनाच येऊ नका म्हणायचे???

ओशाळणे म्हणजे काय याचा साक्षात अनुभव घेत होता आता तो! लज्जित होणे म्हणजे काय याचा!

पण त्या दिवशीची जेवणे अफाट झाली. अनुने पटकन शेवयांची खीर केली. मस्त गप्पा मारत मारत जेवणे झाली. श्रीने हेही सांगीतले की महाराष्ट्र आणि कॉसमॉस बॅन्केत ठेवलेल्या रिसिट्स तो, फ्लॅट निश्चीत झाला की लगेच मोडेल.. पण.... बोलता बोलता अनुने एक चूक केली.. ती आनंदात असताना अचानक म्हणाली..

"एकदाची या वाड्यातून अन या शेजारच्या मारक्या आजींपासून सुटका होईल माझी"

हे वाक्य ऐकलं आणि... अत्यंत.. अत्यंत हिडीस आणि भेसूर चेहरा घेऊन मावशी दारात उभ्या राहिल्या.. आणि मावशींनी तोंडाचा पट्टा सुरू केला तसा अख्खा दास्ताने वाडा गॅलरीत जमा झाला.. जिच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीमुळे वाड्यात मावशींसाठी पोलिस आले होते त्याच मुलीशी मावशी आज पुन्हा दोन हात करायला उभ्या राहिल्या होत्या.

"काय म्हणालीस?? माझ्यापासून सुटका होईल तुझी?? तुझ्या आई वडिलांनी तुला .... .... "

मावशी बोलत असले शब्द नेहमीसारखे नव्हते. एकही म्हण नव्हती. काहीही अभद्र नव्हते. काहीही अश्लील नव्हते. बीभत्स नव्हते. पहिल्यांदाच, आयुष्यात पहिल्यांदाच सगळेजण मावशींना इतके व्यवस्थित शब्द योजून बोलताना पाहात होते. मावशींमधे पडलेला हा फरक पोलिसांच्या भीतीमुळे नव्हता. हा फरक का होता ते फारसे कुणाला समजले नव्हते. पण हा फरक फार विचित्र कारणामुळे होता. आजवर झालेली भांडणे ही मावशींच्या दृष्टीने भांडणेच नव्हती. ती वादावादी होती. मारामारीही असेल! पण त्यात एकमेकांबद्दल असलेले प्रेम होते. एक सदानंद महाराजांकडे अनुच्या आजीला फरफटवले ते भांडण सोडले तर! पण आजच्या भांडणात मावशींना अनुबद्दल सुतरामही प्रेम नव्हते. त्यांच्या दृष्टीने अनुराधा ही अत्यंत पाताळयंत्री व घरभेदी बाई होती. व ते त्या प्रसंगाप्रसंगा नुरूप सांगत होत्या. आवाज वरच्याच पट्टीतला होता. पण अत्यंत मुद्देसूद बोलणे होते ते!

ते बोलणे ऐकून अनुच्या तळपायाची आग मस्तकाला भिडलेली होती. मावशी श्वास घेण्यासाठी क्षणभर थांबल्या तेव्हा श्री त्यांना थोपवायला व समजवायला म्हणून दाराकडे निघाला.. नेमकी तेव्हा अनु ओरडली...

अनु - तुमच्यासारख्या घाणेरड्या आणि थर्डक्लास बाईला या दोघांनी आजवर का ऐकून घेतलं हेच मला समजत नाही. चालत्या व्हा आमच्या घरातून.. चालत्या व्हा.. मला तुमचे तोंड पाहायचे नाहीये..

आता श्री उलटीकडे धावला. "अनुराधा' म्हणून ओरडत तो अनुला गप्प बसण्याच्या खुणा करू लागला. तेवढ्यात प्रमिला काकू पुढे आली मावशींना बाजूला सारून!

प्रमिला - काय गं? कुणाला चालत्या व्हा म्हणतीयस?? यांना?? या नसत्या तर तुझ्या सासर्‍याचं काय झालं असतं आज माहितीय का??

अनुने कानांवर हात ठेवून हिंस्त्र चेहरा करत ओरडत वाक्य उच्चारले..

अनु - नाही ऐकायचंय मला.. हजारदा ऐकलंय तेच तेच... तेच तेच वर्षानुवर्षे ऐकतीय मी.. यांनी आमचं काय केलं अन त्यांनी आमचं काय केलं.. मी लग्न करून आलीय या घरात... आता हे घर माझंय... आता ते पुर्वीचे लाड मी खपवून घेणार नाही....

प्रमिला - खपवून घेणारी न घेणारी आहेस कोण तू? आणि घर माझंय म्हणायला सासरे हयात नाहीयेत का तुझे?? भावजी असताना तुझी जीभ चालते कशी त्यांच्यासमोर??

अनु - तुम्ही कोण आहात मला बोलणार्‍या?? कवडीचा अधिकार नाहीये तुमचा.. तुम्ही पण जा..

रागाने थरथर कापत महेश किंचाळला... "अनुराधा... गप्प बस..."

अनुराधा पलंगावर पालथी पडून रडू लागली. तिचे ते रडणे पाहून मात्र महेशला वाईट वाटले..

महेश - काकू.... तू... तू आत्ता कशाला बोललीस हिला..?? आजीचं अन तिचं चाललंय ना??

श्री हतबुद्ध होऊन हे सगळे पाहात होता. आता तो म्हणाला..

श्री - हा वाडा हे एक कुटुंब आहे.. इथे सगळ्यांचा सगळ्यांवर हक्क आहे...

अनु उसळून ओरडली...

अनु - नाही चालणार मला असलं.. माझ्यावर कुणाचाही हक्क नाही.. मी महेशशी लग्न केलंय... माझा अन त्याचाच फक्त एकमेकांवर हक्क आहे..

मावशी इतका वेळ गप्पच होत्या. त्या आत आल्या.

मावशी - महेश... तू हिला घेऊन दुसरीकडे राहणे उत्तम! श्रीनिवासच्या डोक्याला शांतता लाभेल..

हा सल्ला अनावश्यक नव्हता. अत्यावश्यक होता. पण तो देणारी व्यक्ती अनुच्या दृष्टीने अनावश्यक होती.

अनु - तुम्ही पहिल्यांदा घरातून बाहेर व्हा...

श्रीने सरळ अनुवर हात उगारला...आणि महेश ओरडला.. "बाबा"

लहान मुलीवर हात उगारण्याची श्रीला काही हौस वगैरे नव्हती. पण अनुराधाची जीभ वाट्टेल तशी चालत होती. पण झाले भलतेच... मावशींना महेशचे बाबांवर ओरडणे खपलेच नाही...

अख्ख्या दास्ताने वाड्याच्या साक्षीने मावशींनी महेशच्या खाडकन कानाखाली वाजवली. त्या पाठोपाठ मावशी कडाडल्या...

मावशी - माझा मुलगा असतास तर हाकलून दिले असते तुला घरातून.. नालायक... बापावर आवाज चढवतोस?? ... माफी माग... आधी माफी माग त्याची...

आधी नेमके काय झाले हेच झिणझिण्या आल्यामुळे महेशला समजले नव्हते. ते समजेपर्यंत मावशी माफी मागायला सांगत होत्या.

आजवर दास्ताने वाड्याने न पाहिलेले रूप पाहिले महेशचे.... दोन अडीच वर्षांमधे अनुराधाने तयार करत आणलेला त्याच्यातील राक्षस जागा झाला आत्ता...

महेश - तू मला मारलंस?? तू कोण मला मारणारी??? आहेस कोण तू? एक शेजारीण?? तुझं अन आमचं नातं तरी आहे का? जात तरी एक आहे का?? खेळायला तुझ्याकडे यायचो त्याचे एवढे उपकार??? अनु म्हणते तेच बरोबर आहे... तुला आधार व्हावा हा स्वार्थ होता तुझा मला स्वतःकडे ठेवण्यात?? मला या वयात मारलंस तू? मी काय करू शकेन समजत नाही तुला??? मी माझा तुझ्याशी असलेला सगळा संबंध आज संपवत आहे.. सगळा.... काहीही संबंध राहिला नाही आता आपला... जा तू... तुझ्या घरात जा... मी तुला तुझ्या म्हातारपणी सांभाळेन अशी चुकीची अपेक्षा ठेवू नकोस.. कारण ...

.....कारण...

तो पुढे काय बोलणार आहे ते खरे तर त्यालाच बोलवत नव्हते.... पण तरीही त्याने हिम्मत केली....

"कारण.... त्....तुझी ... तेवढी लायकीच... ना... हीये.."

जगातले सगळे पाण्याचे तलाव आटावेत... सर्व मांगल्य.. सर्व पावित्र्य नष्ट व्हावं.... अभद्र अभद्र व्हावं वातावरण.. तसं.... तसं?? अंहं... तसंही नाही... शब्दात नाही सांगता येणार ते.... जाणवेल निश्चीत.... भाषा या माध्यमाचा जेथे काहीही उपयोग होऊ शकत नाही अशा पातळीवरची मनस्थिती झालेली होती.... एक... एक अंतर्बाह्य पवित्र आणि शुद्ध असलेलं नातं आज.... भंगलेलं होतं... संपलेलं होतं....

'गट्टू'...... आज ... गट्टू आजीला म्हणाला होता... मी तुला आधार देण्याची तुझी लायकी नाही...

लायकी.... बापरे! केवढा मोठा हा शब्द! .... लायकी...

आपल्याला पाळण्यात का ठेवतायत आणि पाळण्यातून काढून मांडीवर घेऊन पेज का भरवतायत हेही समजण्याची लायकी नव्हती ज्याची एकदा.... तो म्हणत होता.... 'तुला मी सांभाळण्याइतकी तुझी लायकी नाही'!

ज्याला जर त्यांनी 'लायकी नाही' असे म्हणून वाढवायला, सांभाळायला, आधार द्यायला नकार दिला असता तर ज्याची आज हे वाक्य बोलण्याचीसुद्धा लायकी राहिली नसती तो म्हणत होता.... तुझी लायकी नाही...

वा पेंढारकर वा! कसल्या मुलाला जन्म दिलात?

नेमके काय झाले आहे ते लक्षात येत नव्हते अनुच्या! पण... काहीतरी... भयंकर.. भीषण असं वळण लागलेलं सगळ्यांच्याच चेहर्‍यावरून तिला जाणवत होतं! पवार आजी सगळ्यांना वाटेल तशा बोलत असताना महेश एखादं वाक्य बोलला तर या सगळ्यांना प्रॉब्लेम का येतो हेच तिला समजत नव्हतं! पण ती भेदरलेली होती... फार... फार स्फोटक परिस्थिती असावी आजूबाजूला एवढंच तिला जाणवत होतं! काय होणार ते माहीत नव्हतं! मधूकाकाच्या चेहर्‍यावरून तरी असं वाटत होतं की आपल्या सासर्‍यांनी आपल्या नवर्‍याला जन्म दिला ही आपल्याच सासर्‍यांची चूक आहे. प्रमिला काकूच्या चेहर्‍यावरून वाटत होतं की आत्ता तिला शक्य असतं तर तापलेल्या उलथ्न्याने तिने डाग दिला असता आपल्या नवर्‍याला! मागे समीर उभा होता आणि तो ज्या नजरेने पाहात होता त्यावरून तो महेशला बडवून काढतो की काय असं वाटत होतं! राजाकाका इतका कडवट चेहरा करून उभे होते की जणू मी आणि महेश म्हणजे माणसेच नाही आहोत. शीलाकाकू तर कायम भडकलेल्याच असतात आपल्यावर! किरणदादा असा बघत होता जसे काही सासर्‍यांचे अन आपले काहीतरी नाते आहे म्हणूनच आपण वाचलोयत... नाहीतर त्याने आपल्याला अद्दलच घडवली असती.

श्रीनिवासला मात्र ते सहन झाले नाही. एक डाव्या हाताच फटका काडकन महेशच्या गालांवर लगवावा असे वाटत असूनही त्याला इतका तीव्र धक्का बसलेला होता की तो पलंगावर मटकन बसलाच! आता मावशी काय करतात तेच बघायचे होते. बहुधा त्यांनी आज अनुची कातडीच सोलून काढली असती. पण नाही...

मावशी - बरं झालं सांगीतलंस... माझी लायकी नाही ते....

मावशी शांतपणे अन भेसूर चेहरा करून उलट्या वळल्या अन पुन्हा थांबून मागे वळून म्हणाल्या...

मावशी - एक लक्षात ठेव महेश... तुला सांभाळलं कुणीही असतं... पमेने.. निगडीणीणी... कुणीही.. मी तुला सांभाळलं, वाढवलं.. यात विशेष काहीही नसेलही.... पण....

सगळे त्या 'पण' नंतर काय या भीतीयुक्त उत्सुकतेने मावशींकडे पाहात होते...

"तुझ्या बायकोला सांग... की दास्ताने वाडा जर नसता... तर तुझे अन तुझ्या बापाचे हाल कुत्र्याने खाल्ले नसते... आणि.. असे कधीच होऊ नये... पण होतेच प्रत्येकाचे.. जेव्हा केव्हा स्वर्गात जाऊन आईला भेटशील ना स्वतःच्या.... काय??? .... जेव्हा तू तुझ्या आईला भेटशील ना??? ... तेव्हा रमा.. तुझी आई.... तुझ्यावर थुंकेल... थुंकेल ती तुझ्यावर... आणि मग .. स्वतःवरही... असला मुलगा जन्माला घातला म्हणून.... ही.... आयुष्यात कधीही काहीही चांगले न झालेल्या एका विधवेची शापवाणी आहे... "

===============================================

किरणचा आणि आपला मुलगा श्रीनिवासकाकांसारख्या म्हातार्‍याच्या सहवासात रमतो हे किरणच्या बायकोसाठी एक सुखद आश्चर्य होते. ती आपले कधीही त्या बालकाला यांच्याकडे सोडून जायची... जशी आज गेली होती....

आणि... का कुणास ठाऊक.... आज महेशने रजा काढली होती.... का रजा काढली विचारले तर तो वडिलांना काही उत्तर देत नव्हता समाधानकारक... उगाच काहीतरी कारणे सांगत होता.. अनुराधा मात्र खुषीत होती...

मावशींना 'तुझी लायकी नाही' हे म्हंटल्याला आता दोन महिने झालेले होते... त्या क्षणापासून दास्ताने वाड्याने पेंढारकरांपैकी 'श्री' सोडला तर या दोघांशी संबंध पूर्ण बंद केलेले होते. कुणीही यांच्याशी बोलत नव्हते. हेही कुणाशी बोलत नव्हते. श्रीचे अनु आणि महेशशी बोलणे जरूर व्हायचे. पण ते दोघे जरा कोरडे कोरडेच वागायचे श्रीशी! अजून फ्लॅट बूकही केलेला नव्हता. पण आज महेश रजा काढून सारखा दारात चकरा मारत होता.

श्रीनिवासला किरणचा मुलगा दिनेश उर्फ बबडू याचा लळा असल्याने आज दुपारी श्री बबडूला घेऊन घरी आला होता. थोडा वेळ महेशही त्याच्याशी खेळला. अनु मात्र त्या बबडूकडे ढुंकूनही बघायची नाही. आता बबडूने घोडा करायचा आग्रह केला.

श्रीने बबडूच्याच घरात जाऊन लाकडी घोडा आणला. महेशने पटकन तो घोडा पाहिला.

हाच तो घोडा... कित्येक वर्षे आपण यावर खेळलो... खरे तर समीरदादाचा आहे हा... पण समीरदादाला कंटाळा आल्यावर आपल्याला आणून दिला.. अजून हा घोडा इतका कसा काय व्यवस्थित?? रंग बिंग गेलाय म्हणा.... पण... चांगला डुगडुगू हालतोय की...!!!!

पण बबडूला असला घोडा नको होता. मग श्रीनिवास रांगायला लागले. त्यांच्या पाठीवर बबडू आनंदाने चढला.

"ओबा गोलायत" असे आनंदाने म्हणून महेशकाका आणि अनुकाकूला सांगू लागला. 'ओबा गोलायत' म्हणजे 'आजोब घोडा आहेत'. त्या दोघांनाही त्या खेळण्यात मिळणारा असीम आनंद पाहून एका क्षणात महेशचे मन भूतकाळात गेले.

आपण याच वयाचे असताना बाबा रात्री झोपायच्या वेळेला चादरी घालताना ओणवे व्हायचे तेहा आपण त्यांच्या पाठीवर चढून बसायचो आणि घोडा घोडा खेळायचो.

काय केले नाही बाबांनी आपल्यासाठी? घोडा झाले, सर्कशीतला जोकर झाले, भूभू झाले, वाघ झाले, हत्ती झाले! बेशुद्ध होऊन पडले! ट्रीपला पाठवलं आपल्याला! आपण 'माझा बाप कंगाल आहे' म्हणालो त्यानंतर ट्रेकला पाठवलं! मेकॅनो घेतला! सायकल घेतली! ती हप्त्याने फेडली. शिक्षणाचा केवढा खर्च! त्यांना कोण होते?

आपण आजीला असे कसे म्हणालो?? असे शब्दच आपल्या तोंडातून कसे बाहेर आले? शाळेतून आल्यावर आपण आपल्या घरी न येता तिच्या घरी जाऊन सगळे डबे काढून बसायचो! तेव्हा आपल्याला तिने 'तुझी लायकी नाही' असे म्हंटले असते तर? तिची माफी मागायची इच्छा असूनही आपल्याला साहस का होत नाही?

अनुमुळे सगळे झाले आहे का? पण अनुचा काय दोष आहे? तिला तरी सगळ्यांचे का पडावे? तिला नाही का वाटणार स्वतंत्र घर अन स्वतंत्र संसार असावा असे??

विचारांच्या गर्दीत असतानाच बाबांनी आपल्याच दोन्ही हातांना हत्तीच्या सोंडेसारखा आकार देत 'चीं चीं' असा आवाज केला.

बाबा! आपले बाबा! अजून मन रमवतात कसेबसे! हा बबडू नसताच आत्ता यावेळेस ते काय करत असते? कदाचित... पडून राहिले असते किंवा .... मधूकाकाकडे जाऊन बसले असते...

आजही आईचा फोटो कपाटातच आहे. रोज काढून त्याच्याकडे एकदा डोळे भरून पाहतात अन मग झोपायला जातात बाबा मानेआजोबांच्या खोलीत! चष्म्याचा नंबर वाढलाय! पण उगीचच नवीन चष्मा आणत नाहीत. पैशांचा काही प्रश्नच नाहीये! कंटाळा करतात. काय करायचंय नवीन चष्मा घेऊन म्हणतात! मी कुठे जाणार आहे बाहेर? मी असतो वाड्यातच!

पण.... आपण... एखाददिवशी ... एखाद्या रविवारी.. त्यांना घेऊन जाऊन का नाही आणला चष्मा नवीन?

आपल्याला सुट्टीच्या दिवशी अनुबरोबर वेळ व्यतीत करायचा असतो .... म्हणून!

महेश ओशाळलेल्या चेहर्‍याने श्रीनिवास अन बबडूच्या धांगडधिंग्याकडे बघत असतानाच....

ज्यासाठी त्याने रजा काढलेली होती ते कारण निर्माण झाले, सत्यात आले आणि ...

... नुसता जल्लोष झाला..

"वी आर प्लीझ्ड टू अपॉईंट यू अ‍ॅज द ग्रूप ऑफीसर इन द सर्व्हिस डिपार्टमेंट अ‍ॅट अवर न्यू लोकेशन... '

जल्लोष! केवळ जल्लोष!

बबडू बघतच बसला त्या जल्लोषाकडे!

श्रीनिवासला प्रथम अनु आणि महेश या दोघांना काय झाले तेच समजले नाही. समजले तेव्हा त्याला प्रथम दु:ख झाले. हे नियुक्तीचे पत्र येणार म्हणून हा घरी थांबला होता? मग आपल्याला का नाही सांगीतले??

पण ते दु:ख निमिषार्धात नष्ट होईल असा आनंद निर्माण झालेला होता.

महेशने बाबांना त्यांचे गुडघे हातात धरून उचलले व नाचू लागला. गॅलरीतून जाणारे बेरी काका प्रथम हे अभुतपुर्व दृष्य पाहून दचकलेच! नंतर त्यांना समजले की हा कशाचातरी आनंद व्यक्त होत आहे. मग ते थांबले अन त्यांनी हळूच पमाकाकूला वर बोलावले. मग एकेक जण करत सगळेच आले. पलीकडच्या खोलीत मावशींना सगळेच आवाज येत असूनही त्या जागच्या हालल्या नव्हत्या.

महेश ओरडत होता.

"बाबा... बाबा... बघा... काय सॉलीस जॉब मिळालाय... महिन्याला चाळीस हजार पगार... आता सगळेच प्रॉब्लेम्स संपले बाबा... बोला... तुम्हाला तुमच्या लाडक्या मुलाकडून काय हवंय...?????"

श्रीनिवास उचलला जाऊन गरागरा फिरत असताना नुसता उत्साहाने चार्ज झाला होता. ओरडाआरडा ऐकून दचकून दारात आलेल्या किरणच्या बायकोला आणखीन एक अभुतपुर्व दृष्य दिसले. कधीही बबडूला हातही न लावणार्‍या अनुने 'काका मला पन उतल की' असा महेशला उचलून घेण्याचा आग्रह करणार्‍या बबडूला चक्क स्वतः उचलले होते आणि हसत हसत त्याला फिरवत होती अन तोही हासत होता.

पेंढारकरांच्या त्या बारा बाय चवदाच्या खोलीत आज आनंदाची ही भली मोठी लाट शिरली होती. पत्र घेऊन आलेल्या पोस्टमनला महेशने चक्क पन्नास रुपये बक्षिसी दिली होती.

महेश आणि अनुने श्रीनिवासला आणि देवाला नमस्कार केला. श्रीनिवासने पहिल्यांदा देवापुढे साखर ठेवली. त्यानंतर रमाचा फोटो बाहेर काढून त्याच्यापुढेही साखर ठेवली. मग त्याने गणेश बेरीला पेढे आणायला पिटाळला. आणि महेशने काय करावे?? तो अनुला म्हणाला... "अनु... आज तरी आजीला भेटलेच पाहिजे मला..."

अनुला त्या गोष्टीत काहीही इंटरेस्ट नव्हता. तिला त्याही परिस्थितीत महेशचा रागच आला. पण जो आनंद आज मिळालेला होता त्यापुढे या गोष्टीचे दु:ख अगदीच किरकोळ होते.

दारातील सगळ्यांचे कडे तोडत, सगळ्यांना आश्चर्यचकीत करत महेश मावशींच्या दाराकडे धावला.

धाड धाड मावशींचे दार वाजवत 'आजी, आजी' म्हणून हाका मारू लागला. ती दार उघडत नाही हे पाहून क्षणभर सगळेच स्तब्ध झाले. तेवढ्यात आतून आजीचा आवाज आला.

"महेश... तुला असेच सोन्यासारखे दिवस लाभोत... असेच यश मिळव... आयुष्यवान, कीर्तीवान हो, आई वडिलांचे नाव उज्वल कर.... माझे आशीर्वाद आहेतच.... फक्त .... मला अजिबात भेटू नकोस महेश... कारण... माझी तुझा आनंद सहन करण्याची लायकी नाहीये....."

इतक्या निर्भेळ आनंदातही आजीने विषच कालवले हे पाहून चिडलेला महेश स्वतःच्या घरात आला व आजीला आणखीनच मनस्ताप व्हावा म्हणून प्रमिला काकूला उद्देशून म्हणाला...

"काकू... आज सगळ्या दास्ताने वाड्याला माझी अन अनुची पार्टी... अंगणात... काय समीरदादा? कशीय आयडिया?? "

कोणत्याही निमित्ताने का असेना, महेश आणि अनु पुन्हा हसून आणि नीट बोलतायत तर त्यांचा कशाला हिरमोड करायचा असा विचार मधूसूदनने खाली गेल्यानंतर सर्वांसमोर मांडला आणि....

.... रात्री आठ वाजता पार्टी ठरली....

गोवित्रीकरांकडचेही आले होते सगळे... मावशी खाली उतरलेल्या नाहीत हे पाहून अनुची आई जरा शांत झाली...

पत्र आल्यापासून महेश ते खिशात ठेवून पार्टीच्या तयारीला इकडेतिकडेच हिंडत होता...

पार्टी सुरू झाली. कडवटपणाच्या वास्तवतेवर तात्पुरत्या हासरेपणाच्या झालरी बसवून सगळे वावरू लागले.

पंजाबी मेन्यू होता. सूप, सॅलड्स, नान, दोन भाज्या, दाल, पुलाव आणि आईसक्रीम!

बबडूच्या दृष्टीने ही पर्वणीच होती! त्याच्याच काय? वाड्यातील कित्येकांनी पंजाबी मेन्यू पहिल्यांदाच चाखला खरे तर! अनुच्या आईने सुचवलेल्या केटररकडून आलेला होता.

'वागण्यामधे प्रचंड मोकळेपणा' या सिमेंटवर दास्ताने वाडा उभा राहिलेला असल्याने निगडे काकांनी सरळ सर्वांदेखत महेशला विचारले.. जो प्रश्न ऐकून अनुच्या आईच्या कपाळावर आठ्या आल्या...

"किती देणार म्हणतायत रे??? ... पगार??? "

मात्र महेशला या प्रश्नाचे उत्तर सर्वांना ऐकवायची घाईच झालेली होती... कुणीच आत्तापर्यंत न विचारल्यामुळे खरे तर तो जरा नाखुषच होता...

"चाळीसपर्यंत होईल...चाळीस हजारापर्यंत.."

दचकलेच सगळे! या चिमुरड्याला इतक्यात एवढा पगार कसा?? तेवढ्यात नवर्‍याच्या कौतुकाने मोहरलेल्या अनुराधाने सगळ्यांदेखत महेशला विचारले....

"चाळीस हजार म्हणजे.. नेमकं सांग ना... डॉलर्स किती ते.... "

श्रीनिवास - ड... डॉलर्स म्हणजे????????

श्रीनिवास पेंढारकर ... जणू याच प्रश्नाचे उत्तर ऐकण्यासाठी जगत होते....

.. त्या प्रश्नाचे उत्तर ऐकून एक अनुकडचे अन एक महेश सोडला तर... बाकीच्यांसाठी ती पार्टी श्राद्धाच्या जेवणासारखी झालेली होती क्षणातच....

"बाबा.... जॉब यू.एस.ला आहे.... मी.... मी अन ही... तिकडे चाललोयत.... कायमचे....."

गुलमोहर: 

बेफ़िकिर आपले लिखान चान्ग्ले च असते पण आज श्रिनिवासचा अपमान झाला आनि तो पन गटुटु ने केला अजिबात नाहि आवड्ले प्लिज तुम्हि या कथेचा शेवट बद्ला

रंगासेठ , आर्यांना अनुमोदन...

बेफिकिर कधी पासून मनात येत होत की ... 'हाफ राईस...... मधला दिपू आणि या कथेतला महेश यांचे नशिब यातील थोड्याफार फरकाने सारखेच आहे असे सांगितलेले, पण मला तर या कथेत श्रीनिवांसांची दया येते, एवढ आयुष्य कष्टाच काढून शेवटी त्यांच्या जवळ काहिच रहात नाही... Sad

वाईट गोश्ट आहे. सन्स्कार म्हणजे काहीच नाही का? हा श्री चा पराजय होतोय. आईविना मुलाला नीट सान्भाळता आल नाही असा अर्थ होतो आणि कादम्बरी फसते इथे. सगळा इफेक्ट जातो. माफ करा पण महेशच वागण पटत नाहिये. तो पवारआजीशी असा कसा वागु शकतो. मग आजी आणि श्री चुकले का त्याला मोथा करताना.अनेक प्रश्न्न पडले आजचा भाग वाचताना. शेवट करण्याआधी जरा शन्कानिरसन कराल का?

तुमच्या लिखाणाचे व्यसन लागले आहे. हि कादम्बरि सम्पल्यावर लगेच दूसरी चालू करा. नाहितर मला
Withdrawal Symptoms यायला लागतील.

फारच typical शेवट आहे. श्रीनिवांसांची दया नाही कीव येते आहे. मी अजिबात ह्या कथेचा शेवट वाचणार नाही.....
माझ्या मते आता अस करा महेश च्या मुलाचे character निर्माण करा आणि तो दोघान्ना कसा वागनुक देतो ते सान्गा.
माफ करा पण मला तुमच्या कडून असा एकेरी शेवट अजिबात अपेक्षित नाहिये.

मला वाटत नाहीये हे एकांगी लिखाण आहे. आपल्या आजूबाजूला नजर टाकली तर अशी अनेक उदाहरणे पहायला मिळतील. आई-बाप आपल्या तोंडाने कबूल करणार नाहीतच पण दिसून येतेच ही गोष्ट. आजकाल कृतज्ञता नावाचा प्रकार फारच दुर्मिळ झाला आहे. आणि मुलांना नात्यांपेक्षा व्यवहार जास्त कळायला लागला आहे. माझ्या पाहण्यात कितीतरी उदाहरणे आहेत की आई वडीलांनी जीवाचे रान करून वाढवलेली मुले अत्यंत निष्ठूर अंतकरणाने त्यांना अडगळ समजून दूर लोटतात.
मलाही हा भाग वाचल्यानंतर खूप त्रास झाला. पुढे आपले मुलांनी करावे यासाठी आपण मुलांचे कोडकौतुक करत नाही. तो एक आनंदाचा समाधानाचा भाग असतो. पण ही उदाहरणे पाहिल्यानंतर जीव धसकतो. आपला मुलगा उद्या असे वागला तर काय? आताचे आईबाप हुशार आहेत, ते त्यांच्या पेन्शनची, उदानिर्वाहाची सोय करून ठेवतात, मुलांवर अवलंबून रहात नाहीत. पण मानसिक आधाराचे काय?
ते कुठे विकत मिळत नाही अजूनतरी.

तत्वांपेक्षा जेव्हा पैशाचे मूल्य अधिक वाटायला लागते आणि लोभ जेव्हा संस्कार भेदायला सुरुवात करायला लागतो तेव्हा अशा घटना घडतच राहणार.शेवटी हा ज्याच्या त्याच्या संस्काराचा, मनाचा आणि तत्वांचा प्रश्न आहे.

घरातील वडीलधारे, नातेवाईक, शाळा-क्लासमधील शिक्षक, कॉलेजमधील प्राध्यापक अशा चढत्या क्रमाने मुलांच्या मनातील आदर कमी होताना जाणवतोय. मुले जसजशी मोठी होत आहेत, तसा पूर्वापार ज्यांना आदराचे स्थान द्यावे अशी शिकवण घराघरातून मिळायची, त्याच व्यक्तींबद्दलची ही भावना या मुलांच्या मनातून नष्ट होत आहे, तर समवयस्क, वयाने लहान यांच्याबरोबरचे त्यांचे नातेसंबंध कसे काय टिकतील?

कुठलाही संबंध टिकवायला त्याला प्रेमाची, आपलेपणाची जोड असणे आवश्यक असते. पूर्वीच्या काळाचा विचार केला तर साधे एखादे फाऊंटनपेन, घडय़ाळ अशा वस्तूंबद्दलही किती आपलेपणा जपला जात होता! किती परीक्षा, किती घटनांच्या या वस्तू साक्षीदार आहेत, असे मानले जात होते. पण लहानपणापासून ही मुले ‘वापरा आणि फेकून द्या’ या विचारांत वाढली आहेत.हाच नियम त्यांच्या बुद्धीच्या चौकटीत इतका पक्का बसलाय की, आता हळुहळू वस्तूंवरून ते व्यक्तींवर आलेत का? उपयुक्त असेल ते ठेवायचे आणि निरुपयोगी टाकायचे हीदेखील मानसिकता यात डोकावताना जाणवते. मोबाइल, कॉम्प्युटरचा सतत वापर करून ‘डिलीट’ हा शब्द त्यांनी भावनांनासुद्धा वापरायला सुरुवात केली आहे का? या घटनांना, मानसिकतेला कुठे तरी आपणही जबाबदार आहोत का? मोबाइलपासून कापर्यंत कुठलीही गोष्ट आपण भावनेने बांधली नाहीय. तिने नीट ‘सेवा’ पुरवली नाही की ती बदलायची, हे पाहून ही मुले शिकत आहेत का? या मुलांना संयम, सहनशीलता शिकवायला आपण कुठे तरी कमी पडलो आहोत का? या विचार करण्याच्या गोष्टी आहेत.आयुष्यातील सगळ्या बेरजा-वजाबाकी या बुद्धीच्या आणि विचारांच्या जोरावर चालत नाहीत तर भावनांच्याही ताकदीवर चालतात, हे त्यांना माहीत नाहीय. एक व्यक्ती आयुष्यातून वजा झाली की, तिची जागा भरून काढायला दुसरी मिळवायची ही त्यांची मानसिकता आह. पण या मानसिकतेला बदलवण्यासाठी त्यांना हे सतत शिकवायला हवं की, व्यक्ती एक तर कधीच बदलता येत नाही. एखादी व्यक्ती बदलण्यापेक्षा आहे ती टिकवण्यासाठी जास्त ताकद लागते. कारण ती टिकवण्याच्या मुळाशी प्रचंड सहनशीलता, संयम, त्याग आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीबरोबर असलेल्या नात्यातून आलेले आदरयुक्त प्रेम असते. या गोष्टींची जाणीव या मुला-मुलींना वेळेतच करून देणे आवश्यक आहे.
ही जर जाणीव त्यांना आपण खरोखर करून देऊ शकलो तर त्यांच्या विचारात हा आमूलाग्र बदल नक्की होईल. कारण ही पिढी बदलांनाही सामोरे जाणारी, स्वीकारणारी आहे!

Source - http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=917...

शी............ आजचा भाग फारच भयानक होता. महेशला दोन्-तीन थोबाडीत द्याव्याशा वाटल्या, हेच जर असे चालणार असेल तर ही कादंबरी संपलेलीच बरी..............

Arere!!
Srinivas Pendharkaran baddal vaait vaatatay. gattu ne aapalya vadilancha faar apamaan kela..

....असाच असणार हे अपेक्षित असूनही आजचा भाग वाचून प्रमाणाच्या बाहेर त्रास झाला, पण चर्चा फारच सुंदर झाली. हे या भागाचे यश आहे.
आजूबाजूला अगदी अश्शीच उदाहरणे दिसून येतात हे अगदी खरे आहे. मुलींची सासरी आल्यामुळे आपल्या आई-वडिलांचे करण्यापासून 'अलगद सुटका' होते, त्यामुळे त्यांना माहेरचा वाईटपणा मिळत नाही. मुलांना मात्र हे शक्य नसते. म्हणून बायकोवर सगळा वाईटपणा सोपवून तेही आपली सुटका करुन घेतातच...हेही अगदी खरे आहे. कितीही कटू वाटले तरीही ते सत्यच आहे.
हे जळजळीत सत्य आजच्या भागातून फार फार परिणामकारकरित्या समोर आलेले आहे.

************************************************************************************************************************

ह्या भागाच्या निमित्ताने मुद्दाम सांगावेसे वाटते आहे. माझ्या आई-बाबांच्या माझी बहिण आणि मी- दोघीच मुली. आम्हाला भाऊ नाही. आई बाबा नुकतेच रिटायर झालेत. त्यांचे उतरते वय सुसह्य व्हावे, त्यांना शक्य तितकी आमची सोबत मिळावी ह्यासाठी आम्ही दोघी बहीणी प्रयत्न करणार आहोत आणि आम्हा दोघींचे जीवनसाथीसुद्धा त्याला साथ देतील याची आम्हाला खात्री आहे. ह्या कथेच्या निमित्ताने ही एक पॉझिटिव्ह साईड माझ्याकडून सांगत आहे. Happy

हा शेवट अपेक्षीतच होता, तो कसा मांडताय याची जास्त उत्सुकता होती. मला अजीबात एकांगी वगैरे वाटलं नाही लिखाण..हे अगदी जळजळीत वास्तव आहे! आजुबाजुला नीट पाहिलं तर कळेल..अनेक श्रीनिवासांची अशीच परिस्थिती आज आहे Sad

आपण असे का वागतो/ वागलो..
हा प्रश्न वागुन झाल्यावर बरयापैकी प्रत्येकालाच पडतो... पण खरेच " ती त्या क्षणाची गरच होती" असे म्हणुन त्याचे समर्थन होवु शकते का ?
मला तरी वाटते की प्रत्येक पात्राला आपापल्याजागी योग्य न्याय दिला गेला आहे..