महाराष्ट्रातील किल्ले ... गतवैभवाचे मानकरी ... आजचे भग्नावशेष ... !

Submitted by सेनापती... on 16 September, 2010 - 09:12

संदर्भ ग्रंथ - 'सह्याद्री' - स. आ. जोगळेकर.

वस्तूतः दिल्ली व आग्रा येथील किल्ले हे राजवाडे आहेत. छावणीतल्या जनानखान्या भोवती रेशमी कनाती लावतात तशी ह्यांच्या भोवती देखणी तटबंदी आहे म्हणून त्यांना किल्ले म्हणायचे. त्यांची तटबंदी सूंदर लालसर दगडाची आहे. त्यांच्या कंगोऱ्याला किंवा महाद्वारावरील नक्षीलाही धक्का लागलेला नाही. कसा लागणार? त्या राजांची धर्मातीत व दुबळी स्वामीनिष्ठ प्रजा त्याभोवती छातीचा कोट करून उभी होती. ह्या किल्ल्यांच्या अंतर्भागात संगमरवरी महालांच्या रांगा आहेत. त्यांचे सौंदर्य अद्वितीय आहे. 'पृथ्वीवरील स्वर्ग तो हाच' असे त्यांचे वर्णन करण्यात आलेले आहे आणि असे काही ऐकले की उत्तर हिंदूस्तानातील लोक नि:श्वास सोडतात, तल्लीनतेने डोळे किलकिले करतात. त्यांच्या लक्ष्यातही येत नाही की हा स्वर्ग आपल्याच पुर्वजांच्या मुडद्यावर उभा आहे, या किल्ल्यांच्या अद्वितीय वैभवाचे अस्तित्व हे आपल्या नामुष्कीचे प्रतिक आहे. या महालांत पाउल टाकले की भासतात अत्तरांच्या फवाऱ्याचे सुगंध, मद्याच्या प्रवाहाचे दर्प आणि नर्तकींच्या नुपूरांचे झंकार. अधूनमधून कारस्थानाची कुबट घाणही प्रत्ययास येते. या किल्ल्यांनी प्रत्यक्षपणे मर्दुमकी कधी पाहिलेली नाही. येथे शस्त्राची चमक दिसली ति फ़क्त खुनी खंजीरांची, मसलती घडल्या त्या फ़क्त हिंदूंच्या नि:पाताच्या. या शाहीवैभवाला मोगलांच्या मर्दुमकीची प्रतिके मानता येणार नाही. शोभीवंत पण निरुपयोगी सोन्यारूप्याच्या तोफांप्रमाणेच यांचे ही फ़क्त कौतुक करायचे.

आग्र्याच्या किल्ल्यात कोणाची मर्दुमकी प्रकट झाली असेल तर ती श्री शिवछत्रपति महाराजांची. धन्य त्यांची की मोगल साम्राज्य वैभवाच्या कळसावर व सामर्थ्याच्या शिखरावर असताना आणि स्वतः एकाकी असताना त्यांनी शहेनशहाचा जाहीर निषेध केला. धन्य त्यांची की हे वैभव पाहून स्वदेशी परत आल्यावर त्यांनी मोगलांचे अनुकरण करून रंगमहल उठवले नाहीत, तर त्यांच्या प्रतिकारासाठी, त्यांच्याच मूलखातून गोळा केलेल्या लूटी मधून, स्वदेशाच्या स्वातंत्र्य-साधनेसाठी जागोजागी दुर्गम दुर्ग उभारले."

आपल्या रक्षणासाठी झगडलेल्या या किल्ल्यांची आजची अवस्था ढासळलेले बुरुज, माना टाकलेल्या कमानी, नामशेष इमारती, ओहोरलेली टाकी अशी असली तरी ती स्वदेश - स्वधर्म - स्वराज्य यांच्या रक्षणातून निर्माण झालेली आहे. दुर्ग - गड़ - किल्ले यांचा उपयोग मुख्यत: लढण्यासाठी असतो हेच विसरुन गेलेल्या सुंदर किल्ल्यांपेक्षा मला माझ्या महाराष्ट्रामधले ढासळलेले उध्वस्त गड्किल्ले भारुन टाकतात. त्यांचाच मला अभिमान वाटतो.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

म्हणून तर आपले महाराज, शिवाचा अवतार.. भणंग जोगी... महाल उठवणे जमलेच नाही कधी.

पण तरीही, सध्या आहेत, तितके भग्न नाही बघवत.. ते नांदते असताना, निदान चित्रात तरी बघायचे आहेत.

लेख काहीसा अर्धवट सोडल्यासारखा झाला आहे, सेनापती. म्हणजे तुम्हाला या विषयावर खूप काही लिहायचे होते {तुमचा येथील लेखनप्रवास पाहिला असल्यामुळे, त्या आधारे म्हणत आहे....} पण अचानकच तुम्ही त्याची व्याप्ती वाढविली नाही की काय अशी शंका येते.

झाले आहे असे की, थोरल्या महाराजांपासूनचा इतिहास पाहिला तर नक्की दिसून येईल की मराठेशाहीला कधीच 'स्थैर्य' लाभले नाही. रोजचा सूर्यनमस्कार घडायचा तोच मुळी तलवार हातात, ढाल पाठीवर आणि घोड्याचा लगाम हाती घेऊनच. रोजचे जगणे हे युद्धासाठीच तहहयात निश्चित झाले असल्याने दिल्ली परिसरातील वैभवाची चिन्हे ठरलेली बांधकामे या पठारावर कधीच उमलून आली नाहीत. "प्रजारक्षण" हेच प्रामुख्याने समोर असलेले कार्य असल्याने महाराजांनी [व नंतरच्यानीही] 'किल्ले बांधणे' म्हणजे 'संरक्षण तटबंदी' इतकाच हेतू मनी ठेवल्याचा इतिहास आहे.

सबब उत्तर भारतातील सम्राटांनी बांधलेल्या महालांशी, किल्ल्यांशी इथल्या बांधकामासमवेत तुलना केवळ अशक्य आणि स्थापत्यविशारदाच्या दृष्टीने अन्यायकारक मानली जाईल. तुलनाच होऊ शकत नाही या दोन अवस्थांमध्ये. शिवाय स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही त्या त्या ठिकाणाच्या स्थानिक सरकार, प्रशासनाचेही वास्तूजतन संदर्भातील कार्य अभ्यासले असता उत्तर भारतात ज्या पद्धतीने जतनाचे आदर्श असे कार्य गेल्याचा दाखला आहे तद्वत मायबाप महारष्ट्र सरकारची अगदी १९५० पासूनची या विषयातील अनास्था काय आहे वा होती, याची साक्ष हे भग्न किल्लेच देत आले आहेत.

"सुंदर किल्ल्यांपेक्षा मला माझ्या महाराष्ट्रामधले ढासळलेले उध्वस्त गड्किल्ले भारुन टाकतात. त्यांचाच मला अभिमान वाटतो...." ~ या वाक्यात तुमची भावुकता स्पष्ट प्रतीत होते, शिवाय हे मत आम महाराष्ट्रीयन जनतेचे असू शकते. उत्तर भारतातील तुमच्यासारख्या एखाद्या गडप्रेमीला त्याच्या भागात असलेल्या किल्ल्यांविषयी दोन्ही तर्‍हेने अभिमान वाटू शकेल....म्हणजे ऐतिहासिक महत्व तसेच आजही त्या किल्ल्यांची राखण्यात आलेली भव्यता.

स्थापत्यशास्त्राबद्दलही खुलासा व्हायला हवा.जोधपूरचा किल्ला आजही भक्कम वाटतो तसे मराठी मुलखातले गड वाटत नाहीत. माती निसटल्याने ढासळलेले दगड सर्वत्र दिसतात. उत्तर भारतातही खूप काही देखभाल होतेय असं समजण्याचं कारण नाही.

पेशवाई संपवल्यावर किल्ल्यांनी दिलेला 'त्रास' पाहून बहुतेक महत्वाचे सगळे गडकोट, सुरुंग लावून वा तोफांचा मारा करून इंग्रजांनी पाडून टाकले, असे कुठेतरी वाचनात आले होते.
इतर छोटे किल्ले जे मुख्यत्वे टेहेळणी व मार्गावरील जकातवसूली इ. साठी कामी येत, त्या व इतरही किल्ल्यांवर फक्त मोक्याच्या जागीच, म्हणजे जिथे चढून येणे शक्य, तितकीच तटबंदी करून बाकी कडे मोकळे सोडलेले असत. पैसे तिथे खर्च करण्यापेक्षा सैन्याच्या दाणापाण्यासाठी वापरणे जास्त महत्वाचे मानले गेले असे.
या बाबींची सत्यासत्यता जाणकारांनी सांगितली तर आवडेल.

सेना खास रे. महराष्ट्रातल्या किल्ल्यांचे सर्वात जास्त नासधुस ईंग्रजांनी केली.. कारण शेवट पर्यंत ईंग्रजांना भारतात विरोध करणारी एकमेव सत्ता म्हणजे मराठीशाही. अगदी, १८५७ला सुद्धा . त्याप्रमाणात, उत्तरेतील,किंवा अगदी दक्षिणेतही ईंग्रजांना फारसा विरोधच कुणी केला नाही