श्रीनिवास पेंढारकर - एक बाप - क्रमशः - भाग ३२

Submitted by बेफ़िकीर on 15 September, 2010 - 06:23

दुसर्‍या दिवशी संध्याकाळी साडे सात वाजता महेश घरात आला तेव्हा अनुराधा भाजी आणायला बाहेर गेली अन श्री कडाडला.

"महेश? तुला लाज वाटत नाही समीरला खायला न देण्याची? हेच शिकलो आपण इतक्या वर्षात? इतक्या रात्री तो आला होता. स्वतःहून खायला मागत होता. एखादा आगंतुक आला तरी आपण चहा विचारतो. आणि समीर स्वतःहून खायला मागत असून तू नाही म्हणालास? प्रमिलाकाकू अन मधूकाकाने आजवर तुझ्यासाठी जे केले त्याच्या बदल्यात तू असा वागलास? मला शरम वाटते तुझा बाप म्हणवून घ्यायला. खरच ओशाळला असशील तर जा... जा खाली अन समीरला सॉरी म्हण!"

भयंकर लज्जित मुद्रेने महेश नुसता उभा होता. बाबा इतके चिडू शकतात हे त्याने पहिल्यांदाच पाहिलेले होते. खरे तर त्याला मनातून अगदी बरे वाटत होते. आपले बाबाही रागवू शकतात, ओरडू शकतात हे वाड्याला समजावे असे वाटत होते. आपण समीरशी चांगले वागलो नाहीत याच्या शिव्या बसत आहेत हे सगळ्या वाड्याला कळावे असे वाटत होते. कारण त्यातूनच त्याला प्रायश्चित्त मिळणार होते. महेशच्या मनात खाली जाऊन समीरला भेटावेसे वाटत होते.

श्रीनिवासचा आवाज कधी नव्हे तो खोलीच्या सीमांना भेदून संपूर्ण वाड्यात ऐकू जात होता. पण तो आवाज एकटाच आवाज नव्हता. त्यात मधूसूदनचा तितकाच मोठा आवाज मिसळत होता. खाली त्याचवेळी मधूसूदन समीरला ओरडत होता.

"लाज वाटत नाही दारू पिऊन रात्री बेरात्री कुणाचेही दार वाजवायला? महेश म्हणजे आता तुझ्यासारखा सडाफटिंग आहे? लग्न झालं आहे त्याचं! बेशरम? खायला पाहिजे होते तर वेळच्यावेळी घरी का आला नाहीस? कुठे उकिरडे फुंकत बसला होतास? दारू दारू दारू! पहिले म्हणजे आजपासून पिणे बंद करायचे. या घरात यापुढे दारू पिऊन यायचे नाही. जा... जा महेशला अन त्याच्या बायकोला आधी सॉरी म्हण..."

समीर प्रचंड ओशाळलेला होता. काहीही झाले तरी मधूसूदन हा बाप होता. त्याच्यासमोर वाटेल तसे बोलणे शक्यच होणार नव्हते. आणि बाबा इतके ओरडत आहेत हे पाहून समीरसारखा मुलगा एरवी काहीतरी उद्धटासारखा बोलला असता. पण आज त्याला मानही उचलावीशी वाटत नव्हती.

समीरने दाराच्या बाहेर पाऊल टाकले. महेशने जिना उतरायला सुरुवात केली. दोघे एकमेकांकडे बघत होते. एकच क्षण! एकच क्षण असा आला की भावनातिरेकाने महेश खाली धावला आणि समीरही त्याच्याकडे धावला. त्याचवेळेस नेमकी अनु वाड्यातून आत आली. तिला दिसलेले दृष्य वेगळेच होते. समीर आणि महेशने एकमेकांना घट्ट मिठी मारलेली होती. आणि दोघेही गहिवरलेले होते.

अनुचा पारा चढला. अनु बाहेर गेल्यावरच श्रीने महेशला बोलायचे ठरवलेले होते. तिच्यासमोर तिच्या नवर्‍याचा अपमान नको म्हणून! आणि नेमका महेश ऑफीसमधून आला तेव्हाच ती भाजी आणायला निघाली होती, त्यामुळे ती गेल्यागेल्याच श्रीने महेशशी तो विषय काढला होता. पण ती परत आली तेव्हा हे दृष्य दिसले अन फणकार्‍याने वर निघाली.

समीरने झटकन तिला हाक मारली. समीर महेशहून मोठा असल्यामुळे अनुला वहिनी म्हणायचा नाही.

"अनुराधा .... काल... माझी चूक झाली... खूप मोठी... आय अ‍ॅम सॉरी... विसरू़न जा तू तो प्रसंग... पुन्हा होणार नाही"

एवढे शब्द बोलताना समीरला अजिबात आवंढे गिळावे लागले नव्हते. माफी मागायची म्हणजे स्पष्ट माफी मागायची. माफी मागावी लागत आहे यात कमीपणा वाटत असेल तर ती माफी कसली? समीर अत्यंत रोखठोक वागणारा मुलगा होता. पण.. तेच शब्द ऐकताना महेशला मात्र मेल्याहून मेल्यासारखे वाटत होते. आपण समीरदादाला वाटेल तसे वागवले अन तोच माफी मागतोय? पण अनुराधाच्या समोर जर आपण म्हणालो की 'दादा, तू कसली माफी मागतोयस? माझीच चूक होती' तर आपले तिच्याशी वाद होतील आणि तो ताण मुळीच सहन होणार नाही.

अनुराधा मात्र समीरकडे पाठ करूनच थांबलेली होती. वाड्यातील सगळेच ते दृष्य बघत होते. समीर असा अर्ध्या रात्री दारू पिऊन वाड्यात आला व गोंधळ झाला यामुळे शरमेने मधू व प्रमिलाच्या माना झुकलेल्या होत्या. श्रीनिवासचीही मान झुकली होती कारण महेश नीट वागला नव्हता.

अनुराधा आपल्याकडे पाहात नाही आहे याची जाणीव होऊनही समीरला तो त्याचा अपमान वाटत नव्हता. सर्वांदेखत समीर आज महेशशी बोलला. समीर एवढे बोलू शकतो हाच एक चमत्कार वाटत होता वाड्याला. अगदी मोठ्या माणसांसारखे!

"म्हशा... लहानपणी तुला आम्ही सर्कसला नेलेले नव्हते... आठवतोय तो प्रसंग? कारण त्या दिवशी बाबांकडे पैसे जरा कमी होते तिकीटाचे... आणि तुला नेताना तुझ्या तिकीटाचे पैसे श्रीकाकांकडे मागणे हे कधीच शोभून दिसले नसते... त्यामुळे इच्छा असूनही तुला सर्कसला नेता आले नाही... आल्यानंतर रात्री मी तुझ्या घरी आलो होतो.... श्री काका आणि तू खेळलेली सर्कस खोटी खोटी होती असे म्हणालो... मुद्दाम म्हणालो... का म्हणालो माहितीय? म्हशा... तुला वाटत असेल प्रत्येक वेळेस मी तुझ्यापेक्षा वरचढ आहे असे मी दाखवायचो... ते मी मुद्दाम करायचो... मेकॅनो पहिल्यांदा मलाच आणला, तोही मोठा... कॅरमही मलाच आणला.. तेव्हाचा तुझा चेहरा अजूनही आठवतो मला... केविलवाणा... मी, आई, बाबा आणि राजू चौघे कॅरम खेळत असताना खूप वेळ तू तो खेळ पाहिलास... आणि तुला कुणीच खेळायला घेत नाही असे बघून केविलवाणा चेहरा करून शेवटी कंटाळून तू जायला उठलास... त्याही क्षणी मी तुझ्याकडेच पाहात होतो.... थांब नाही म्हणालो तुला... संभाजी बागेत तू आमच्यामुळेच येऊ शकलास हे मी पदोपदी जाणवून दिले तुला... सुजातामधला वडा खातानाही तुझ्या चेहर्‍याकडे माझे नीट लक्ष होते.... माझ्या बाबांनी आणलेली सायकलच शेवटी तू वापरतोस हेही मी तुला कित्येकदा बोलून दाखवले..

.... हे सगळे मी का करत होतो माहीत आहे तुला????? तुझ्याचसाठी... श्रीकाका ऑफीसला गेल्यावर तू वाड्यात बिनदिक्कत कुणाकडेही असायचास, खायचास! आपल्याला काही अडी अडचणी, काही संकटे येऊ शकतात हे तुझ्या गावीच नव्हते... मी नेहमी मुद्दाम तुला मनस्ताप द्यायचो.. त्यातून तुला निदान इतके तरी कळावे की जेव्हा आपण मोठे होऊ, स्वतंत्र होऊ, तेव्हा सगळे जग आपल्याच बाजूने नसेल, लोक आपले वाईट चिंतणारेही असू शकतील... तुला वाटेल एवढे विचार मी त्या वयात कसे करायचो... पुरावा हवा असेल तर बघ.. मी माझ्या आईकडे पाठ करतो... कोणतीहि आखमिचौली करत नाही... तू सरळ तिच्याकडे जा आणि विचार... सर्कसला जायच्या दिवशी तुला नेणार नाही हे कळल्यावर मी आईला काय म्हणालो होतो ते विचार.... "

महेशने पांढर्‍या फटफटीत चेहर्‍याने प्रमिलाकाकूकडे पाहिले. सगळा वाडा स्टॅन्डस्टिल झालेला होता. जो तो आपापल्या जागी खिळून उभा होता. अगदी अनुराधाही जिन्यातच उभी होती. मात्र आता ती लक्षपुर्वक समीरचे बोलणे ऐकत होती. तसे भासवत नसली तरीही!

"नुसता बघू नकोस तिच्याकडे.. विचार तिला.. मी काय म्हणालो ते..."

प्रमिलाकाकूनेच उत्तर दिले..

"तो म्हणाला की गट्टूला घेऊन जा सर्कसला... मला बराच अभ्यास करायचाय... मी कधीही पाहीन पुन्हा सर्कस.."

गिल्ट! व्हॉट अ गिल्टी फीलिंग! वरून श्रीसुद्धा आश्चर्यचकीत झालेला होता. तो सर्कसचा प्रसंग, समीरने गट्टूचे मन रात्री येऊन दुखावणे, त्याला वास्तवाचे भान फार खोचक शब्दांमधे देणे आणि त्यानंतर श्रीचे बेशुद्ध पडणे!

"तुला खरे जग काय आहे त्याची जाणीव व्हावी म्हणून... कारण काकांबरोबर खेळलेल्या सर्कसमुळे तू कायम खोट्या आनंदात वावरला असतास... .. तुला कॅरम खेळायला घेतलं नाही... कारण मला महिनोनमहिने मागे लागून मिळालेला खेळ तुला माझ्यामुळे सहज मिळणार होता... पण त्याची किंमत तुला नसणारच होती... एखादी गोष्ट मिळायला काही प्रयत्न करावे लागतात या विचारापासून तू दूर गेलेला असतास... पण त्यानंतर प्रत्येक दिवशी फक्त तुलाच कॅरम खेळायला बोलवत होतो मी... आठवतंय??

त्याही वयात मी एवढे उदात्त विचार करणे हे तुला आज खोटे वाटेल.. पण एका प्रसंगावरून निश्चीत मान्य होईल तुला.. श्री काका रोज सकाळी दूध आणायला बाहेर जायचे.. त्या दिवशी मात्र ते... बाहेर न जाताच जिन्याशीच थांबून.. लगेच परत... घरात..."

खाडकन महेशने समीरदादाकडे पाहिले. आपण पैसे घेत असताना बाबा घरात येण्याचे कारण बाबा काहीतरी विसरलेले होते किंवा त्यांना स्वत:लाच आपला संशय आलेला होता असे नव्हतेच???? त्यांना हे समीरदादाने सांगीतले होते?? आणि .. एवढे होऊनही .. अनुसमोर त्या प्रसंगाचा उल्लेख नको म्हणून तो... अर्धवट आठवण सांगतोय??? काय आहोत आपण? या वाड्याने प्रेमाने जगवलेला पण त्या प्रेमाची काहीही किंमत नसलेला एक मुलगा?

मात्र अनु? अनु हा प्रसंग अर्धवट ऐकून गप्प बसणे शक्यच नव्हते. आधीच तिला हा प्रसंग महेश नेमका किती वर्षांचा असताना झालेला होता हे माहीत नव्हते. त्यामुळे तिला वाटत होते की बहुतेक नैना घरी आलेली असणार! त्यामुळे अनुने खाडकन समीरला विचारले..

अनु - काय.. काय झालं घरात त्या दिवशी? .... कोण होतं घरात??

आता समीरच्या लक्षात आलं! हिच्यासमोर आपण ती आठवण काढायलाच नको होती.

समीर - महेश लहान होता... तो अभ्यास करतो असे सांगून पत्यांचा डाव लावत बसायचा पहाटे...

'एवढंच होय'! अनुच्या मनात आलेला विचार! महेशची इज्जत पुन्हा एकदा समीरने वाचवली होती. अर्थात, ती चव्हाट्यावर येऊ शकेल असा प्रसंगही त्यानेच निर्माण केला होता.

मात्र आता अनु भडकली. सगळ्यांच्या समोर या माणसाने आपल्या नवर्‍यावर केलेल्या किरकोळ उपकारांचा पाढा वाचल्यामुळे तिचा अपमान झालेला होता. वयाला विसरून अनु बोलली.

अनु - मग? त्यात काय झालं? लहान असताना अभ्यासाची टाळाटाळ कुणीही करेल? हा निदान इंजीनीयर तरी झालाय.. तुम्हाला याच्या अभ्यासाची एवढी काळजी आहे तर.. तुम्ही स्वतः का नाही शिकलात?? आणि.. मुख्य म्हणजे.. काल रात्री असे कसे आलात घरी?? शरम नाही वाटली?? आज अगदी लहानपणापासूनचे उपकार ऐकवताय... या काकू वाटेल तेव्हा येऊन मला वाटेल ती कामे सांगतात... मधूकाका बाबांना कुठेही घेऊन जातात.. हे काय कमी चाललंय का??

समीर - माझ्या आई बाबांना मधे घेऊ नकोस तू...

अनु - आधी तुम्ही मला अरे तुरे करणं सोडून द्या...

महेश - अनुराधा.. तू बोलू नकोस..

अनु - का? मी बोललेलं तेवढं दिसतं?? कारण मी सून आहे ना? तीही नवीन सून? म्हणून बोलायचं नाही.. फक्त सोसायचं.. हो की नाही?? काल रात्री हे आलेले असताना या शिंदे काकू सगळ्या वाड्यादेखत मला नालायक मुलगी म्हणाल्या.. त्यांचा काय संबंध?? त्यांना यांना जेवायला वाढायचं असेल दिड वाजता तर वाढा की? मी कशी काय नालायक? मी माझ्या घरात माझ्या नवर्‍याबरोबर असताना कुणीही दारुडा येतो अन दार वाजवतो अन वर मीच नालायक काय? तुम्हाला कॅरम खेळायला घेतलं हा केवढा उपकार यांचा... म्हणून मी रात्री बेरात्री स्वयंपाक करून यांना जेवायला वाढू का? तेही हे असे दारू पिऊन गटारात लोळून आल्यावर? घर आहे का अड्डा आहे?? या काकू हवे तेव्हा येऊन मला कामे सांगतात.. स्वतःच्या मुलाचे जेवण करून जाता येत नाही का???

श्रीनिवास - अनुराधा... बास... जास्त बोलू नकोस... एक शब्द बोलू नकोस याच्यापुढे...

श्रीनिवास इतका जोरात ओरडल्याने अपमान झालेली अनुराधा रडत रडत पळत घरात गेली आणि भाजीची पिशवी टाकून पुन्हा पळत जिना उतरली अन वाड्याच्या बाहेर निघून गेली. सगळे बघतच राहिले. महेश तिला आणायला धावला तसा मग समीरही धावला. मधू अन श्री वाड्याच्या दारापर्यंत धावून जात या दोघा मुलांना ती सापडते की नाही ते बघायला लागले.

जवळपास अर्ध्या तासाने तिघेही परत आले. रडून रडून अनुराधा अर्धमेली झालेली होती.

श्रीनिवास - अनुराधा.. रडू नकोस.. रागाच्या भरात मी बोललो... पण नीट समजून घे... ही सगळी जी माणसे आहेत.. त्यांची आडनावे वेगवेगळी आहेत... त्यांच्या खोल्या वेगवेगळ्या आहेत.. पण रक्ताची नाती काय करतील असं हे सगळे जण एकमेकांचे करतात.. दास्ताने वाड्याच्या बाहेरची मदतच कुणाला लागणार नाही इतका हा वाडा स्वतंत्र आहे तो याच प्रेमळ माणसांमुळे.. तू म्हणतेस प्रमिला वहिनी तुला कामे सांगतात.. काय कामे सांगतात? की तू भाजी आणायला चालली असलीस तर त्या म्हणतात माझ्यासाठी पण कोथिंबिरीची एखादी जुडी आण.. किंवा त्यांना कुठे जायचे असेल तर त्या सांगतात मधूकाका येतील तेव्हा त्यांना फक्त चहा दे... हे त्या का सांगतात असा तुझा प्रश्न आहे... होय ना? मग ऐक.. हा जो पाण्याचा नळ आहे.. त्याला सकाळी दोन तास पाणी येते.. संध्याकाळी दोन तास... दास्ताने वाड्यातील जो माणूस या नळावर सकाळी पाणी भरायला येईल तो प्रत्येक माणूस त्यावेळेस वहिनींच्या घरात जाऊन बसतो अन चहा पितो.. आणि हे किती वर्षे चाललंय?? महेश जन्माला यायच्या आधीपासून.. हे घाट आजोबा.. माने आजोबा... निगडे काकू.. शीलावहिनी.. राजाभाऊ.. एवढेच काय? तुम्हाला दोघांना माहितही नसेल... कित्येक वर्षे मी वहिनींनी केलेला चहा पीत आहे पाणी भरायच्या वेळेस.. आणि मधूकाका त्याबद्दल एका अक्षराने बोलत नाहीत कुणाला.. उलट कित्येक वेळा मधूने चहा घेतला नसेल पण वाड्यातल्या सगळ्यांनी घेतला असेल असे घडलेले आहे...

अनुराधा.. तुमचे नवीन लग्न झालेले आहे.. तू ज्या घरातून आली आहेस तेथील अन येथील परिस्थिती वेगळी आहे.. येथे लोक तुलनेने गरीब आहेत.. पण अत्यंत प्रेमळही आहेत.. काल समीरने असे यायला नको होते हे खरे आहे.. त्याने चूक कबूलही केलेली आहे.. एवढेच काय? तर एकदा तो आल्यानंतर त्याला खायला न देता महेशने जाऊ देणे हेही चूक आहे.. महेशनेही चूक कबूल केलेली आहे.. आता तूही ते सगळे सोडून दे.. "

अनुराधा विषण्णपणे ऐकत होती. सासर्‍यासमोर आजवर तिने उलट शब्द काढलेला नव्हता. पण आज काढला. कारण समीरचे असे येणे यात कुणाला वाटायला हवी तितकी चूक वाटतच नव्हती.

अनु - बाबा.. मी सगळं सोडून द्यायला तयार आहे.. मात्र... यांनी पुन्हा आपल्या घरी दारू पिऊन आलेलं मला चालणार नाही..

हे खरे तर ठीकही होते. पण त्यात 'समीरने आता यापुढे घरी येऊ नये' असे ही कालची आलेली मुलगी बोलत असल्यामुळे दास्ताने वाड्याला ते वाक्य झोंबले. इतका वेळ शांत बसलेला समीर अचानक म्हणाला..

समीर - म्हशा.. मी आता नाही येणार तुझ्याकडे.. यांना सांग.. काळजी करू नका म्हणाव.. पण....

महेश अन अनु समीरकडे पाहात होते. प्रथमच अनुचा उल्लेख समीरने 'यांना' असा केल्यामुळे ती जरा शांत झाली होती..

समीर - पण काल रात्री मी येण्याची कारणे सांगायचीच राहिली... दोन... ... दोन कारणे आहेत... एक म्हणजे.. पाषाणची स्कीम वादग्रस्त जागेवर आहे... तेथे पैसे गुंतवू नका... आणि दुसरे म्हणजे....या......या तुझ्या मिसेस.. ज्या लायब्ररीत जातात... तिथे येणारा किशोर नावाचा कसबा पेठेतला एक मवाली यांची थटा करतो... तो यापुढे मान वर करूनही यांच्याकडे पाहणार नाही अशी व्यवस्था मी कालच केलेली आहे... बाय द वे... मी काल भरपूर जेवण करूनच तुझ्याकडे आलो होतो... शीलाकाकूला विचार.. तिने वाढलेल्या पानातील एक घासही मी खाल्लेला नाही...

अख्खा दास्ताने वाडा तीरासारखा बाहेर चाललेल्या समीरकडे बघत असताना.. महेश मात्र धक्का बसून अनुराधाकडे पाहात होता... आणि जागच्याजागी अदृष्य व्हावे अशी इच्छा होत असलेली अनुराधा... समीर नुकत्याच ज्यातून बाहेर पडला त्या वाड्याच्या दिंडी दरवाज्याकडे... !

============================================

सासू नाहीच! सासरा एकदम शांत स्वभावाचा, देवदेव करणारा आणि नवरा प्रेमळ! पण आजी? स्वतःची आजी तशी असायला हवी ना? अनुराधाची आजी, म्हणजे गोवित्रीकरांची आई ही सत्तरीच्या घरातली बाई गेल्या सहा महिन्यांपासून अनुराधाच्या मागे लागली होती. आता मुलाचा विचार करा, मूल लवकर झालेले बरे, म्हणजे मग त्याचे शिक्षण बिक्षण सगळे वेळेवर होते, मला सोळाव्या वर्षी मुलगा झाला पहिला.. या प्रसादचा सगळ्यात थोरला भाऊ.. पण जगला नाही..

आणि दुर्लक्ष तरी किती करणार? टाळाटाळ करूनच सहा महिने गेले होते. लग्नाला आता वर्ष होत आले होते. दास्ताने वाड्याच्या संस्कृतीशी अजिबात समरस होऊ शकत नव्हती अनुराधा! त्यामुळे सारखी माहेरी जायची! पण माहेरी गेली की आजी रटाळ चर्‍हाट लावायची. शेवटी एकदा तिच्या समाधानासाठी म्हणून अनुराधा आजीला अन आईला घेऊन वाड्यात आली अन हे त्रिकुट आज इथे कसे काय हे न समजल्यामुळे भर संध्याकाळी दास्ताने वाडा थबकला. महेश आणि श्री आधीच तयार होते. कुठे चालले होते सगळे काही समजत नव्हतं! मावशींनी मधेच दारात येऊन एकदा परिस्थिती न्याहाळली. पण अनुने त्यांची साधी ओळखही करून दिली नाही कुणाशी! त्यामुळे त्या पुन्हा मारक्या म्हशीसारख्या बघत स्वतःच्या घरात गेल्या. त्या गेलेल्या पाहून अनुने नाक उडवले अन तिच्या आईने 'या त्या आजीच ना? पवार आजी?' असे विचारले त्यावर अनुने 'हीच ती वैतागवाडी' अशा पद्धतीचा चेहरा केला. हे सगळे श्री किंवा महेश यांनी पाहिलेले नव्हते. पाहिले असते तरी श्री काही बोलला नसताच.

मग अर्धा तास अनुची आई व आजी यांची श्रीनिवासशी चर्चा झाली.

आई - काय ठरलंय मग? केलाय का बूक फोन? वर्ष होत आलं आता..
श्री - अरे हो. राहूनच गेलं ते... उद्याच्या उद्या करतो.. विसरलोच होतो..
आई - नाही म्हणजे तशी काही घाई नाही फार.. पण.. मुलीशी बोलता येतं एवढंच..
श्री - नाही नाही.. घ्यायचाच आहे.. विसरलो होतो फक्त...
आजी - गणपती आहे वाटतं देव्हार्‍यात...
श्री - आहे ना? गणपती आहे, देवी आहे... स्वामींचा फोटो आहे...
आजी - देवाचं इतकं करता ते चांगलंय... हल्लीच्या पिढीला काही राहिलेलं नाहीये आता..
श्री - तुमच्यासारख्या जुन्या लोकांचे संस्कार आहेत आमच्या पिढीवर... तब्येत कशीय आता?
आजी - आता ठीक आहे.. चालताना जरा त्रास होतो...
अनु - आई.. चहा घे...
आजी - निघायचं का आता??
अनु - हो.. चहा घेऊन निघू...

चहा घेऊन पाचही जण घरातून बाहेर आले व वाड्याच्या बाहेर न जाता आतच मागच्या बाजूला गेले त्यामुळे सगळेच उत्सुकतेने पाहू लागले व अंतर ठेवून त्यांच्या मागे मागे जाऊ लागले.

"सदानंद महाराज की जय"

श्रीने ठोकलेल्या आरोळीला अनुच्या आजीने हात जोडून प्रतिसाद दिला. अनुच्या आईला सदानंद महाराज हे एक थोतांड वाटत होते. पण सासूच्या हुकुमाची अंमलबजावणी करायला येणे आवश्यकच होते म्हणून ती आलेली होती.

महाराज आपल्या खोलीत प्रसन्न मुद्रेने शुन्यात बघत बसले होते. सर्वत्र धूप व कापराचा सुवास पसरलेला होता. देवी चंडिकेची सायंपूजा आत्ताच आटोपली असावी. हे लोक आल्याचे लक्षातच आलेले नसल्याचे महाराजांनी त्यांच्या देहबोलीतून सिद्ध केले. श्रीने आरोळी ठोकूनही ते शुन्यातच बघत सस्मित मुद्रा करून बसलेले होते.

श्री - महाराज... आपण सांगीतल्याप्रमाणे मुलाला, सुनेला अन सुनेच्या आई अन आजीला आणलेले आहे.

महाराजांनी अचानक 'जय चंडिके' असा जोरदार आवाज केला व बाहेरचेही लोक दचकले.

महाराज - या तीन माता कोण आहेत?
श्री - या दोघीच माता आहेत. या माझ्या सुनेच्या माता अन या त्यांच्या यजमानांच्या... ही सून आहे.
महाराज - चंडिकेच्या साधनेत व्यत्यय आणण्याचे काही पुरेसे प्रयोजन?
श्री - आजी.. तुम्ही सांगा ना..
आजी - मी वत्सला गोवित्रीकर...
महाराज - चंडिकेच्या भक्ताने प्रयोजन विचारले आहे.. लौकीक जगात वावरण्यासाठी घेतलेले नांव नव्हे
आजी - ही माझी नातसून.. अनुराधा...
महाराज - उपासनेच्या वेळेस येऊन आपण परिचयात का गढला आहात??
श्री - महाराज आपण भेटायची वेळ दिली होतीत... हा माझा मुलगा.. आपण ओळखताच.. महेश..
महाराज - चंडिके.. हे काही भक्तगण आले आहेत...

हे विधान साक्षात चंडिकेला उद्देशून असल्यामुळे एक भीषण शांतता पसरली. मिनिटभराने महाराज उद्गारले.

महाराज - चंडिकेने आदेश दिलेला आहे... तीन प्रकारची फळे व दोन नारळ समर्पीत केल्याशिवाय मी तोंड उघडू नये असा...!
श्री - महाराज ... ही दक्षिणा... फळे व नारळ यातून येतील..
महाराज - बोल बालिके...

बालिका या सदरात मोडणारी.. म्हणजे त्यातल्यात्यात मोडणारी, फक्त अनुराधा होती. ती कसे काय विचारणार मला मूल कधी होईल?

आजी - यांच्या लग्नाला वर्ष झालं....
महाराज - त्यात चंडिका काहीही करू शकत नाही...
आजी - नाही नाही... म्हणजे.. अपत्यप्राप्ती...
महाराज - आधीच झाली???
आजी - छे??
महाराज - अज्ञ पेंढारकर.. शंका काय आहे नेमकी यांची..??
श्री - अपत्यप्राप्ती कधी होईल असे विचारायचे आहे..
महाराज - नशिबात असेल तेव्हा होईल..
श्री - ते तर झालंच... आपल्याकडून काही पुढचे कळावे या उद्देशाने..
महाराज - पुढचे सांगण्याआधी मागचे पाहावे लागेल..
श्री - .. म्हणजे????
महाराज - मुलाने कधी अमावास्येला नेने घाटावरून चक्कर मारली होती??
श्री - काय रे?? तुला विचारतायत..
महेश - नेने घाट? .. गेलो असेन काही वेळा तिथून मी.. का???
श्री - नाही नाही .. अमावास्येला..
महेश - मला माहीत नाही तिथी वगैरे..
महाराज - काळाचे भान नाही अशा माणसाला भविष्याचे कुतुहल का असावे?
आजी - काही चूक झाली आहे का मुलाची?
महाराज - अज्ञ बालक आहे ते.. त्याला तिथीच माहीत नव्हती..
आजी - ....पण झालं काय?
महाराज - नेने घाटावरून संध्यासमयी भर अमावास्येला फिरल्याचा व्हायचा तोच परिणाम झालेला आहे.. अकराशे वर्षांपुर्वीच्या एका भयानक सासुरवास भोगलेल्या व नंतर आत्महत्या केलेल्या सवाष्णीने याला धरले आहे...

सगळेच हबकले. आता बाहेरची काही मंडळी सरळ आत आली. हा नवीनच प्रकार कळाला होता. आजवर चंडिकेचा उदो उदो करून महाराजांनी बरीच फळे व नारळ मिळवले होते. त्या चंडिकेची जादू ओसरलेलीही होती. आजवर पहिल्या दिवशी केलेला चमत्कार सोडला तर महाराजांनी काहीही जादू करून दाखवलेली नव्हती. त्यामुळे हा माणूस नुसताच बुवा आहे असे मत होऊ लागले होते. त्यात दोन वर्षांपुर्वी पाणी भरण्यावरून पवार मावशींचे अन त्यांचे भांडण झाले. महाराज आध्यात्मिक भाषेत भांडू पाहात होते. मावशींच्या दृष्टीने चंडिका ही भांडण या क्षेत्रात अ‍ॅप्रेंटिसशीप करण्याच्याही लायकीची नव्हती. त्यामुळे चंडिका अन महाराज यांचा कंबाईन्ड व भयानक पाणउतारा दास्ताने वाड्याने अनुभवला त्या दिवशी! त्या दिवसापासून महाराज मावशींच्या नजरेच्या ट्प्यातही येत नव्हते. त्यांच्या मनात तो अपमान सलत होता. पण जनमत आपल्या बाजूने नसल्यामुळे त्यांना मावशींना काहीच करता येत नव्हते.

पण आज हा महाराज काहीतरी वेगळे बोलत होता. महेशला भुताने धरलेले आहे असे म्हणत होता. काही दिवसांपासून महेशच्याही वागण्यात झालेला बदल लोकांना आता आठवायला लागला. त्याचा संदर्भ लक्षात येऊ लागला. तो हल्ली ओरडतो, चिडतो, भांडतो असे वाटायला लागले. त्याच्या नजरेतही एक वेगळीच झाक असते असे वाटू लागले. काही जण एकमेकांकडे पाहू लागले. सन्नाटा पसरलेला होता. ज्याच्या मिठीत आपण रोज रात्री विसावतो तो आपला नवरा बाधीत आहे ही कल्पना अनुच्या अंगावर शहारा आणून गेली. श्रीलाही क्षणभर विचित्रच वाटले. महेश हबकलेला होता. आपल्याला काहीही झालेले नाही हे सिद्ध करणे आता त्याच्यासाठी आवश्यक ठरले होते.

काहीतरी विचारायचे म्हणून अनुने बावळटासारखे विचारले.

अनु - अकराशे???

जणू पाचशे वर्षांपुर्वीची सवाष्ण असती तर फारसे बिघडत नव्हते.

पण या सगळ्यात एक गोची झालेली होती. महेशला बाधा झाल्यामुळेच मूल होण्यात अडचण आहे हा मुद्दा स्थिरावू पाहात होता. त्यामुळे पेंढारकरांवर गोवित्रीकरांचा एक पॉईंट सर होत होता व ते अनुच्या आईच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होते.

महाराज - तिच्या पाठीवर आसूड ओढलेले होते... तळहातांवर डागण्या दिलेल्या होत्या... ती भेसूर किंचाळायची.. दीर तिला बांधायचे... सासू फटाफटा मारायची... अन नवरा तिला जनावरासारखे राबवायचा...

अनुची आई - बाई गं.. .. मग?

महाराज - एवढेच नाही... सासरे ती झोपलेली असताना तिच्या तोंडावर गार पाणी फेकायचे.. पुतणे पाळलेल्या कुत्र्याला तिच्यावर भुंकायला सांगायचे....

श्री - पण... त्याचं... इथे काय??

महाराज - चंडिके....!!!

महाराजांना काही प्रॉब्लेम आला की ते चंडिकेला जोरदार हाक मारायचे.

महाराज - त्या सवाष्णीने स्वतःच्या दुर्दैवी जीवनाचा अंत केला...

आजी - राम राम..

महाराज - तेव्हापासून ती नेने घाटावरच आहे..

महेश - बाबा, मला काहीही झालेले नाही..

श्री - तू थांब जरा...

महेश - अहो थांब काय थांब?

महाराज - दर अमावास्येला दबा धरून बसते सायंकाळची! अशक्त मनाच्या व्यक्तीला धरते.. सोडत नाही..

अनु - (कुजबुजत) आई... जाऊ आपण...

अनुची आई - (कुजबुजत)- का?

अनु - हे सगळं खोटं वाटतंय.. असलं काही नसतं...

आजी - तू थांब गं.. मी स्वतः पाहिलेली आहेत झाडे.....

श्री - चला... निघू...

महाराज - कुठे चाललात??

श्री - महाराज... आम्ही अपत्यप्राप्तीचे विचारायला आलो होतो.. हा प्रकार निराळाच निघाला.. निघतो

श्री उठल्यावर महेश अन अनु ताडकन उभे राहिले. ते पाहून अनुची आईही उभी राहिली. आजी मात्र ढिम्म! हलेचना! तिला दोन, तीन वेळा 'चल, चल' म्हणूनही ती लक्ष देईना! महाराजांना टेन्शन आले होते. सगळे एकदम निघून गेले तर आपल्याला काय मिळणार? आता ते जरा सौम्य, मवाळ भूमिकेत शिरले.

महाराज - याला उपाय आहे...

'तिच्यायला काही झालंच नाहीये तर उपाय कशाचा करायचा??' .... मागे उभ्या असलेल्या समीरच्या मनात विचार आला.

श्री - कशाला उपाय आहे?

महाराज - या संकटाला...

श्री - आम्हाला संकट नाहीये काहीही... आजी.. चला...

महाराज - अज्ञान हाच जीवाचा सर्वात मोठा शत्रू!

श्री - असूदेत... चला आजी..

आजी - थांबा हो... काय उपाय आहे महाराज?

महाराज - येत्या अमावास्येला एका विधवेला वाड्याच्या चौकात रात्रभर उभी करून नावापुरते चाबकाचे फटके मारायचे सगळ्यांनी रात्रभर.. चाबूक खरा नाही... साधा नावापुरताही चालेल... ती विधवा त्या सवाष्णीला सासू वाटेल.. व सासूला झालेली शिक्षा पाहून ती हसत हसत या बालकाचे झाड सोडेल.. आम्ही मंत्र म्हणूच देवी चंडिकेचे....

सध्या विधवा दोनच होत्या तिथे! खुद्द अनुची आजी.....

.... आणि पवार मावशी!

त्यापैकी अनुची आजी त्या प्रयोगात असणे शक्यच नव्हते. कारण ती स्वतःच उपाय विचारत होती. वाड्यातील सगळ्यांच्या नजरा पवार मावशींकडे वळल्या. त्यामुळे अनुच्या आजीनेही त्यांच्याकडे पाहिले.

एक भीषण शांतता पसरली. पवार मावशी या व्यक्तीबाबत असे काही करण्याचा नुसता विचारही करणे कुणाला शक्य नव्हते. त्याचे भयानक परिणाम कोण भोगणार? मुळात महेशला बाधा झाली आहे यावरच कुणाचा विश्वास बसत नव्हता अनुची आजी सोडली तर! पण प्रकरणाने आता भलतेच वळण घेतले.

आजी - खर्च... साधारण..??
महाराज - हे शुभकार्य आम्ही विनामूल्य करावे असा चंडिकेचा आदेश आहे...

आजी हुरळली. पुन्हा मावशींकडे वळून पाहू लागली. लबाड हासली. पुन्हा दास्ताने वाड्यात एक भयाण सन्नाटा पसरला.

आजी - तुम्ही.. विधवा आहात ना?

अनुची आजी घोडचूक करण्याच्या दिशेने वेगात प्रवास करू लागली होती. परिणामांची कल्पना आता गणेश बेरीलाही आलेली होती. वर्ष होत आलं पण अनु अन तिच्या आईला 'पवार मावशी' या रसायनाचा भीषण स्फोट कधीच बघायला मिळालेला नव्हता.

श्री - हे असलं आपण काही करायचं नाही... चला चला... महेश.. चल तू घरी... अनुराधा.. चल..

पण आत्ता श्रीकडे काळं कुत्रंही पाहात नव्हतं! महेश अन अनुसकट सगळे निर्माण झालेल्या भयानक शांततेमुळे गंभीर होऊन मावशींकडे पाहात होते.

त्यातच आजी आणखीनच उत्साहाने बरळली.

आजी - राहाल का उभ्या??? ... खोटा खोटा चाबूक आहे...

'आणि बुद्ध हासला'!

"तुझी तिरडी केली उभी वाड्यात अमावास्येला?? तुझं माहेर स्मशानात जाळलं जिवंत... अन सासर पुरलं आप्पा बळवंत चौकात... अरबस्थानातून आयात केलेला घोडा लावला तुझा पितरांना.. हडळ कुठली नालायक... तुझा नवरा मेल्याचं कळलं नाही का तुला अजून?? स्वतः आहे विधवा अन तरी 'मला विझवा'?... तुलाच उभी करणार अमावास्येला... खरा चाबूक आणणारे खरा... धर रे मध्या तिला... नात दिली वाड्यात अन बुवा पाहिजे भाड्यात? .... उलटी रुतवली तुला नेने घाटावर... "

मावशींनी पुढे होऊन आजीच्या झिंज्या हातात धरल्या अन तिला फरफटायला सुरुवात केली. सगळेच मधे पडले. अनु अन तिची आई किंचाळून धावल्या अन मावशींचे हात त्यांनी धरले... आता अनुच्या आईचं काही खरं नव्हतं..

"ही एक चेटकीण... उलटी लटकते मसणात... स्वतःला एक मुलगी झालीय... अन मुलीला वर्षात मूल नाही म्हणून बसली त्या नाटक्यापुढे.... काय गं हिडिंबे??... वाडा तुझ्या बापाचाय का?? आं?? मला उभी करतीय तुझी सासू अमावास्येला?? तुझा नवर्‍याला... नागडा करून उभा करीन इथे मी.. मग मार चाबूक... या वयात बॉबकट अन ब्लाऊझ शिवला लोकट? दास्ताने वाडाय हा... पाय टाकायच्या आधी विचार करत जा.... पवार मावशी राहते इथे... तुझी थेरं तुझ्या बापाच्या घरी करायची... अजून फोन घेतला नाही का म्हणे... तुझा नाना बिल भरणारे का फोनचं??.... आं??... लग्नात अशी मुरडत होती जसं काही हिलाच उभं राहायचंय बोहल्यावर.... पूजा करतायत पूजा... या तुझ्या थेरड्या सासूला पूजा करून तुझा नवरा झालावता का?? तेव्हा कुणाला बडवलंवतं अमावास्येला?? तुझ्याच सासर्‍याला??? मला उभ्या करतायत... "

मावशी घणाघाती आवाजात बोलत असताना एक अन एक माणूस नुसता स्तंभित होऊन पाहात होता. अनेकांना अनुच्या माहेरच्यांची बोबडी वळलेली पाहून आसुरी आनंदही झालेला होता मनातल्या मनात! पण अनु? तिला कसा सहन होईल अपमान आईचा??

अनु - ओ... गप्प बसा... नालायकासारख्या बोलू नका...

'खाड'

काय झाले ते समजायलाच काही वेळ लागला लोकांना! पवार मावशींनी सरळ थोबाडात लगावली होती अनुच्या...

"तू कोण गं कालची चिमुरडी?? जीभ आलीय का अजून तोंडात?? तुझ्या नवर्‍याला शी शू कळत नव्हतं तेव्हापासून सांभाळतीय मी त्याला... अन मला बोलतेस?? थोबाड लाल करून अजून एकदा... पुन्हा माझ्यासमोर मान वर केलीस तर बघ... "

महेश मावशींना आवरायला धावेपर्यंत मावशी पुन्हा मागे गेल्या. आता सदानंद महाराजांची पाळी होती.

"काय रे बुव्या... चेटक्या... हरामखोर.. मला चाबूक मारणारेस काय??"

चंडिकेच्या फोटोवर एक भयानक लाथ बसली मावशींची! सदानंद रिसबुडांची हवा टाईट झालेली होती. पूजेचे साहित्य मावशींनी दुसर्‍या लाथेत उडवले अन महाराजांचे बखोट धरून त्यांना ओढत बाहेर आणले.

"मध्या... बांध याला... अन फोड चाबकाने... माने.. तू जा चौकीवर... बायाबापड्यांना जमवून अघोरी पूजा करायला सांगतो हा कामपिपासू... "

अनु अन अनुची आई रडत होत्या. अनुची आजी मृत्यू समोर दिसावा तशी हबकून डोळे वटारून बघत होती. अगदी खरेच सांगायचे तर श्रीनिवासच्या मनातील एक कोपरा खूप आनंदी झालेला होता. गोवित्रीकरांना एकदा मावशींचा झटका बसावाच असे त्याला खूप दिवसांपासून वाटायचे मनात! पण आत्ताचा प्रकार आणि मावशींचे रौद्र रूप इतके भयानक होते की आता त्याला गोवित्रीकरांची दयाच येऊ लागली होती. महेश अनुला समजावून सांगू पाहात होता. ती त्याचा हात झटकत होती.

फक्त दोन माणसे उघडपणे गालातल्या गालात हासत होती. समीर कर्वे... आणि... गणेश बेरी...!!

काही समजायच्या आत एक रिक्षा बोलवून अपमानीत झालेल्या अनु, तिची आई व आजी त्यांच्या घरी निघून गेल्या. मागोमाग महेश मोटरसायकलवरून धावला. श्री मावशींना शांत करत होता. तेवढ्यात शीलाकाकू उद्गारली...

"श्री भावजी.. झालं ते फार झालं खरं म्हणजे... पण.. त्या लोकांना एक झटका मिळायलाच हवा होता.."

===============================================

चितळे आजोबांशी झालेल्या ऐतिहासिक भांडणानंतर पहिल्यांदाच वाड्यात पोलीस आलेले होते. गोवित्रीकरांनी सरळ पोलिसकडे तक्रार केली होती. तक्रार नोंदवून घेण्याआधी काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी एक महिला पोलीस अन दोन पुरुष पोलीस येऊन गेले. त्यांनी मावशींना प्रचंड दम भरला. मावशी मारक्या म्हशीसारख्या फक्त पाहात बसल्या होत्या. पोलिसांसमोर मात्र काही बोलल्या नाहीत. शेवटी मधू अन श्रीने चिरीमिरी देऊन आणि खूप समजावून सांगून पोलिसांना परत पाठवले कसेबसे! दहा दिवस झाले अनु घरीच आलेली नव्हती. महेश रोज तिच्या माहेरी जाऊन तिला सॉरी म्हणत होता. त्याला सासरे अन सासू ओरडत होते. ते तो ऐकून घेत होता. तीनवेळा स्वतः श्रीनिवास जाऊन आला होता. त्यातील पहिल्यांदा एकटा, दुसर्‍यांदा मधूला घेऊन आणि तिसर्‍यांदा मानेकाकांना घेऊन! काहीच फरक पडला नव्हता. शेवटी आज श्रीनिवासनेही निकराची बातमी दिली गोवित्रीकरांना! आमच्या सुनेला परत पाठवताय की नाही ते एकदाच सांगा!

आणि गोवित्रीकर, त्यांच्या मिसेस, अनु आणि गोवित्रीकरांचे एक मोठे बंधू असे सगळे डिस्कशनसाठी श्रीच्या घरात जमले होते. श्रीकडून मधू आणि मानेकाका होते. राजाकाकाही आसपास येऊन जाऊन होता.

अनुचे बाबा - हे बघा पेंढारकर... आम्ही खरे तर मुलीला आणणार नव्हतो... मुलीने आजवर आमच्याही हातचा कधी मार खाल्लेला नाही.. तो इथे तिला खायला लागला.. तेही एका वेड्या बाईकडून... आणि तुम्ही अन महेश नुसते बघत बसलात.. माझ्या म्हातार्‍या आईला त्या मूर्ख बाईने ओढत आणले.. हिला वाट्टेल तशी बोलली.. सगळा वाडा मजा बघत बसला होता... पण शेवटी आमचाच हात अडकलेला आहे... आम्ही मुलीकडचे... घरात किती दिवस ठेवणार... म्हणून घेऊन आलो आहोत... तुमचं काय ठरलेलं आहे? ती बाई पुन्हा हस्तक्षेप करणार असेल तर आम्हाला मुलीला इथे ठेवणे शक्य नाही. त्या बाईचा एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय आहे??

नुसते मावशींनाच नाही, तर वाड्यातील नंदा, प्रमिला आणि शीला यांच्या घरातही सगळे ऐकू जात होते. कारण सगळ्यांचे लक्षही तिकडेच होते आणि गोवित्रीकरांचा आवाजही मोठा होता.

'त्या बाईंचा एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय आहे??'

या प्रश्नावर काय बोलणार श्रीनिवास? खरे तर त्याला वाटत होते की तुमची आई त्या बाईला वाड्यात उभी करून मारायचा प्लॅन करत होती त्या महाराजांच्या सांगण्यावरून.. ते शोभते का?

पण महेशला अनुबद्दल वाटणारे अतीव प्रेम व आकर्षण श्रीनिवासमधल्या बापाला जागे करत होते.

श्री - त्या ... जरा....

मानेकाका आणि मधू... दोघेही टक लावून श्रीकडे बघत होते.. काय सांगतोय हा...

श्री - त्या.. जरा थोडा परिणाम झालाय...

हे वाक्य संपताना अत्यंत अपराधी नजरेने श्रीने मानेकाकांकडे पाहिले. रागाने थरथर कापणार्‍या मानेकाकांना श्रीची अगतिकता समजली. क्षणात त्यांनी 'असुदेत रे.. मावशीला सांगू समजावून नंतर' असे हावभाव चेहर्‍यावर आणले. पण श्री? श्रीला स्वतःला काय वाटत होते?

'आईविना बाळ ते... कांद्याच्या... हक्काची मावशी शेजारी राहात असताना मी बरी ठेवून देईन ते बाळ कुणाकडे.. चल वर घेऊन ये त्याला'

रमा गेल्यानंतर गट्टूला पहिल्यांदा वाड्यात आणले त्या दिवशीचा मावशींचा हा डायलॉग... आत्ताही श्रीला आठवला... खाडकन त्याची नजर रमाच्या फोटोकडे गेली.. तिचे डोळे निस्तेज दिसत होते... निराश दिसत होते... भयंकर अपराधी फीलिंग आले श्रीला! मावशींना ... मावशींना आपण... या व्याह्यांसमोर... वेडी बाई ठरवले??? मावशींना?? ज्या पहिल्यांदा गट्टू आपल्या घरात झोपायला आला त्या दिवशी गॅलरीत बसून राहिल्या होत्या रात्रभर??

गोवित्रीकर - त्यांचे उगाच आमच्या मुलीला करायला लावू नका.. मला माहीत आहे की वाड्यातील सगळ्यांचे एकमेकांवर प्रेम आहे... पण ही जबाबदारी पुढच्या पिढीवर टाकणे किती योग्य आहे?? अनुची काय चूक आहे? तिला स्वतःचा संसार नाही का करावासा वाटणार???

मावशींना आपण वेडी बाई म्हणालो हे ऐकू गेलेले असणार हे श्रीला माहीत होते. त्याची मानच वर होत नव्हती. गोवित्रीकर काय बोलतायत यातले त्याचे लक्षच उडालेले होते. मानेकाका मात्र थरथर कापत होते रागाने! पण एक अक्षर बोलत नव्हते. गोवित्रीकर गेले की श्रीला उभा आडवा फायर करायचे ठरवले होते त्यांनी! पण आत्ता हसतमुख दिसणे आवश्यक होते. मधू मात्र पेटला होता रागाने! पण त्यालाही श्रीची भूमिका काहीशी समजत होती.

गोवित्रीकर - पेंढारकर.. गैरसमज करून घेऊ नका.. पण माझ्या म्हातार्‍या आईला असे फरफटवणे, माझ्या मिसेसला वाट्टेल ते बोलणे, मुलीला मारणे... हे प्रकार कोणतातरी मुलीचा बाप सहन करेल का? माझी एवढीच विनंती आहे की अनुला नीट सांभाळा! तुमच्या तिघांच्या संसाराचे ती सोने करेल! पण... सगळा वाडाच तिच्याकडून काही ना काही अपेक्षा ठेवतो हे चूक नाही का? मला वचन द्या.. पुन्हा तिला कुणीही मारणार नाही, आमच्या घरातल्यांचा अपमान तुम्ही होऊ देणार नाही.. देताय वचन???

श्रीनिवास - ... होय.. काळजी करू नका.. तुमची मुलगी माझीच मुलगी आहे... वचन देतो..

वातावरणातला ताण एकदम हलका झाला. अनुने महेशकडे हळूच पाहिले. दोघांनाही खूप बरे वाटत होते. श्रालाही जरासे मोकळे वाटले अन गोवित्रीकरांनाही...

गोवित्रीकर - पेंढारकर... तुमचे अनुवर बापासारखे प्रेम आहे हे मला माहीत आहे.. तीपण सांगते मला नेहमी.. पण हे असे.. वाड्यातले जे काही लोक असतात .. त्यांच्यामुळे केवढाल्ले प्रॉब्लेम्स होतात बघताय ना??

याही वाक्यावर मधू आणि मानेकाका काहीच बोलले नाहीत. नुसते बघत राहिले. राजाकाका मात्र छद्मी हासला. त्याच्याकडे कुणाचे लक्षच नव्हते म्हणून बरे! त्याच्या हासण्यात गोवित्रीकरांची लायकी काढल्याचा आविर्भाव होता.

गोवित्रीकर - आता तो महेशचा मित्र समोरचा...
मधू - माझा मुलगाय तो.. त्याला खूप ओरडलोय मी...
गोवित्रीकर - नाही नाही.. तसं काही समजू नका.. चूक होते.. पण...
मधू - इट्स ओके.. तो पुन्हा तसलं काहीही करणार नाही..
गोवित्रीकर - ओके मग! निघू पेंढारकर???
श्री - अरे?? .. चहा तरी.. अनु??... नाही.. मीच करतो...

काही का होईना, सगळे व्यवस्थित झाले या आनंदात मानेकाकांनी आपला मूड एकदम पालटला. आता ते मोकळे ढाकळे हासले. आणि एकदम म्हणाले..

मानेकाका - ए पोरी.. आता सगळं मनासारखं झालं ना?? आता चहा टाक बरं????

ते ऐकून अनुच्या चेहर्‍यावरचे बदललेले भाव पाहून गोवित्रीकरांच्या लक्षात आले. ज्या आजोबांच्या केव्हाही येऊन चहा मागण्याबाबत ही आपल्याला सांगते ते हेच आजोबा असणार!

गोवित्रीकर - अनु.. चहा जरूर कर... पण.. एक लक्षात ठेव.. दररोज काही जो येईल त्याने फर्माईश केली की लगेच चहा टाकलाच पाहिजे असे नाही बरं का? नाहीतर माणसं सोकावतात...

हे फार झाले होते. फार म्हणजे फारच झालेले होते. असह्य होते हे!

गट्टूचे इंटरेस्ट्स गुंतलेले नसते तर माने काकांनी गोवित्रीकरांना असा दम दिला असता की मावशी परवडल्या! एवढे सगळे करून पुन्हा गोवित्रीकर होते मुलीच्या बाजूचे! पण आपल्यामुळे कुणाच्या संसारात विघ्न नको यायला या एकाच विचाराने मानेकाका नुसतेच डोळे वटारून पाहात राहिले क्षणभर! गोवित्रीकरांनी उच्चारलेले वाक्य आपल्यासाठी आहे याची क्षणभरातच खात्री पटली त्यांना! तिकडे आत्तापर्यंत स्वतःचा ऐकू आलेला अपमान सहन करूनही जागच्या न हाललेल्या मावशी आता मात्र श्रीच्या दारात आल्या. महेशला प्रसंगाचे गांभीर्य जाणवले. आणि श्री?? श्री लहान मुलाने बापाकडे पाहावे तसा मानेकाकांकडे पाहात होता. त्याच्या नजरेतले भाव उघड होते. "काका, खूप खूप मोठ्या मनाने माझ्या घरात झालेला हा अपमान विसरा आणि माफ करा.. हे लोक गेले की तुमच्याकडे येऊन मी तुमचे पाय धरीन" असेच भाव श्रीच्या डोळ्यात होते. मधू दात ओठ खात होता आणि राजाकाकाने मूठ वळलेली होती.

मानेकाका?

मानेकाका हे नेमके काय रसायन होते कोण जाणे? क्षणात पुन्हा नियंत्रण आणले त्यांनी चेहर्‍यावर! आणि अनुला उद्देशून म्हणाले..

"बेटा.. मी गंमत केली हं? आता या वयात काय चहा सोसणार आहे का मला?? उगीच आपलं काहीतरी म्हणायचं.. पित्त होत हो हल्ली??.. असो.. श्री?? सगळं लागीलाग लागेल आता... हं? मी निघतो.. घर आवरायचं राहिलंय आज..."

जड झालेलं एकेक पाऊल उचलत दाराकडे जाताना एकदाच श्रीची अन मानेकाकांची नजरानजर झाली. मानेकाकांच्या नजरेत पराकोटीचे दु:खी भाव होते. श्रीला अक्षरशः उन्मळून पडावेसे वाटत होते. मानेकाका दारात गेले अन त्यांची अन मावशींची नजरानजर झाली. मावशी मृतवत नजरेने मानेकाकांकडे पाहात होत्या. गॅलरीत उभ्या राहिलेल्या मानेकाकांना वेगळेच दृष्य दिसले. घाटे, निगडे, शीला, प्रमिला, समीर, किरण... सगळे खालीच उभे होते... वर गॅलरीकडेच पाहात होते..

क्षणभर सगळ्यांकडे पाहात शेवटी प्रमिलाकडे पाहू लागले....

स्वर ओलावलेला होता. आजवर पाहिलेले ऐंशीच्या ऐंशी पावसाळे एकत्रच आवाजात आल्यासारखे मानेकाका म्हणाले..

"पमे... यापुढे.... यापुढे जर.... वाड्यातल्या कुणी माझ्यासाठी... चहा बिहा केला ना??... तर.. हा माने... हा दास्ताने वाडा......."

पुढचे सगळे शब्द अश्रूंच्या सरींमधे वाहून गेले. आपल्या घराकडे एकेक पाऊल कसेबसे टाकत जाताना पाठमोर्‍या काकांच्या पाठीवर , आयुष्यात पहिल्यांदाच... मावशींनी आपला उजवा हात ठेवला..

आणि त्या स्पर्शातील आत्मीयतेने एक डोंगरासारखा माणूस दवासारखा विरघळला...

एक मोठा भाऊ... एका लहान बहिणीच्या खांद्यावर मान टाकून... ओक्साबोक्शी रडताना पाहिला आज दास्ताने वाड्याने.. कधीच न पेटलेल्या दास्ताने वाड्याने!

एक स्वतः गोवित्रीकर अन त्यांचे थोरले बंधू सोडले तर कुणी चहाकडे ढुंकूनही पाहिले नाही. चार कप चहा ओतून द्यावा लागला अनुला! महेश आणि श्री या दोघांना स्वतःचाच तिरस्कार वाटत होता या क्षणी!

आणखीन काही वेळ बसून गोवित्रीकर कुटुंबीय निघाले. जाताना मधू अन राजाला 'येतो' म्हणून गेले. दोघांनी मानही तुकवली नाही. आणि ज्या क्षणी गोवित्रीकर दिंडी दरवाजातून बाहेर पडले...

..... श्रीनिवास पेंढारकर.... भावनातिरेकाने तीरासारखा मानेकाकांच्या खोलीकडे धावला..

मधू अन राजा अजून श्रीच्या खोलीपुढे गॅलरीत उभे होते... आता त्यांना अपेक्षा होती मानेकाकांच्या भयानक रागीट अशा फायरिंगची...

... पण... निराळे घडले...

"पिट्या S S S S S S S S"

श्रीनिवासची ती गगनभेदी हाक दास्ताने वाड्याच्या भिंतींना हादरा देऊन गेली...

हाक विरेपर्यंतच श्रीनिवास खोलीतून बाहेर आला होता काकांच्या....

सगळे त्याच्याकडे दचकून पाहात असताना तो मधूकडे पाहात ओक्साबोक्शी रडत ओरडत म्हणाला..

"पिट्या.... काका..... "

एक.... एक बुलंद आवाज गप्प झाला होता...

दास्ताने वाड्यासाठी आज काळ थांबला जणू....

"पमे, तुझ्या लग्नात सव्वा पाच आहेर केलावता मी... चहा टाक"

"काय गं? निघून जायला काही वाटत नाही?? लहान बहीण आहेस ना माझी??? तुझ्यासाठी काही आणलं नसेल का मी???"

"पूर्ण चाळीस जण जमले नाहीत तर हा माने हा दास्ताने वाडा....."

वाड्याचा कण अन कण आत्ता अश्रू पाझरत होता. किरणने प्रसंगावधान राखून काकांच्या भावाला फोन लावला.. तो सकाळपर्यंत येतो म्हणाला...

डेड बॉडी रात्रभर घरातच राहिली....

महेशने धावाधाव करून डॉक्टर आणले व सर्टिफिकेट घेतले... समीरने विश्रामबाग वाड्यामधून पास आणला... कुणीतरी सकाळी अ‍ॅंब्युलन्स यावी या खटपटीत गुंतले..

आणि बाकीचे?? बाकीचे अक्षरशः क्षणभरही हालले नाहीत काकांच्या पार्थिवापासून दूर! प्रमिला, शीला, नंदा, राजाकाका अक्षरशः चक्कर येईपर्यंत रडत होते...

मानेकाका.... मानेकाका गेले होते... एक पर्व.... कायमचे संपले होते...

सकाळी पावणे सहालाच भाऊ अन वहिनी आले... ओक्साबोक्शी रडत दोघांनी मानेकाकांच्या पार्थिवाला मिठी मारली... या दोघांचे इतके वाद असून हे इतके कसे रडतायत हेच कुणाला समजत नव्हते...

त्यांचा भाऊ रडत म्हणाला...

"आयुष्यभर गरीबीत राहिला... आई वडिलांच्या इस्टेटीतला एक पैसा घेतला नाही... हजार वेळा घे म्हणालो.. नाही घेतला.. कारंण एकदाच बाबा म्हणाले होते... स्वतःच्या पायावर उभा राहा अन मग सिनेमा बघ... तेव्हापासून नाही ते नाहीच...भाऊ... भाऊ... नको ना रे जाऊस... "

मानेकाका आजवर खोटे सांगत होते वाड्यात!

शववाहिका आली अन स्मशानात गेले सगळे! विद्युतदाहिनीऐवजी चितेवर अग्नी द्यायला हवा असे मानेकाकांचे बंधू म्हणाले..

त्यांनी स्वतः, श्री, मधू, निगडे, बेरी, घाटे अन राजाकाका या सगळ्यांनी अग्नी देण्याचे कर्तव्य बजावले.

सगळे वाड्यात परत आले. अर्थातच.... आता मानेकाकांची भूमिका ओघानेच मधूकडे आली होती... आता नेतृत्व त्याच्याकडे होते.. तो कसाबसा उभा होता एका कट्याला टेकून... मावशी त्यांच्या खोलीचे दार लावून आत जाऊन बसल्या होत्या..

सगळेच मधूकडे पाहात होते.... मधूने कसे बसे एक वाक्य उच्चारले...

"प्रमिला... ... पु.... पुन्हा दास्ताने वाड्यात जर..... कुणाकडे चहा केला.... त... तर ... हा मधूसूदन..... हा दास्ताने .... वाडा.... "

गुलमोहर: 

हुर्रे s s s s s s
आज परत माझा नंबर पहिला. कंसातले (अंतिम भाग) काढून टाकल्याबद्दल अनेक आभारी.
आता वाचते. अजून लिहित बसले तर पहिला नंबर जायचा. Happy

Sad Sad Sad फार, फार, फारच वाईट झाले हो... मी आत्ता काहीच नाही बोलू शकणार.... Sad भयंकर त्रास होतोय. मानेकाकांच्या आत्म्याला शांती मिळो...

बेफिकीर, एक विनंती, लवकरात लवकर पुढचा भाग लिहाल का? तोही जरा हलका-फुलका? नाहीतर मन दुसर्‍या कशात रमणारच नाही. सतत मानेकाकाच आठवत राहतील... Sad

बेफिकीर माने काका गेलेलं वाचुन "आपल्या घरातील कुटूंब प्रमुख" गेल्यावर वाटावं तसं वाटताय.
फार अस्वस्थ झालो आज.
एका कथेत मी एवढं कसं काय गुंतलो ?
छे. आता नाही वाचत पुढचा भाग.
सगळे भाग टाकुन झाले व कादंबरी संपली कि एकदाच वाचुन काढतो सगळं.
नको बाबा रोज रोज त्रास.

बेफिकिर, काहिच लिहु शकत नाहि, कि-बोड अंधुक अंधुक होत चाललाय, आज अक्षःरक्ष रडलो, हात थरथरताहेत लिहितांना, सलाम माने काका तुम्हाला Sad

माझ्या बायकोचं आजकालचं पेटंट वाक्यः "बेफिकीर म्हणजे माबोवरचा 'एकता कपुरच' भल्याभल्याना ईसिरीयलचं वेड लावलं"

मला खरच घरातलं कुणीतरी मोठा माणुस गेल्यासारखं वाटत आहे.

"माने काकांच्या आत्म्याला शांती लाभो"

आजी - मी वत्सला गोवित्रीकर...
महाराज - चंडिकेच्या भक्ताने प्रयोजन विचारले आहे.. लौकीक जगात वावरण्यासाठी घेतलेले नांव नव्हे
आजी - ही माझी नातसून.. अनुराधा..>>

अनूराधा नातसुन??? नात नाही का वत्सला गोवित्रिकरन्चि??

क्षमस्व! चूक झाली. पण आता बदल केला तर काय बदल केला हेच काहींना समजणार नाही कदाचित!

कृपया असेच लक्ष ठेवावेत.

सर्वच प्रोत्साहकांचे मनःपुर्वक आभार! आजवरच्या भागांपैकी हा भाग मला स्वतःलाच सर्वाधिक रडवून गेला.

-'बेफिकीर'!

सर्वच प्रोत्साहकांचे मनःपुर्वक आभार! आजवरच्या भागांपैकी हा भाग मला स्वतःलाच सर्वाधिक रडवून गेला. >>> मला पण...
लगेचच तुम्हाला नवीन भाग लिहिणे शक्य नाही हे माहिती असल्याने मी माबोवरील इतर साहित्य वाचून मन रमवते आहे. पण तरीही... मनातून इकडेच डोकावते आहे.

माझी ही रचना मानेकाकांना समर्पीत:

कित्येक भाग येऊन गेले
पण आज काही वेगळेच होते

बरेचसे दु:खही देऊन गेले
पण हे दु:खही वेगळेच होते

माने काकांची ताठ मान
झुकतांना पाहणे वेगळेच होते

दास्ताने वाड्याचा आत्मसन्मान
भंगतांना पाहणे वेगळेच होते

वाचता वाचता हरवत जाणे
भान हरपणे वेगळेच होते

त्रयस्तपणे सारे पाहणे
नि:शब्द होणे वेगळेच होते

कित्येक भाग येऊन गेले
पण आज काही वेगळेच होते
....आज काही वेगळेच होते Sad

बेफिकीर,
तुमचं कथा फुलविण्याचं कौशल्य अप्रतिम आहे.
पण एकंदरी सगळ्याच कादंबर्‍यांमधे मुख्य नायक व नायिकेची वॉट लावता राव तुम्ही.
आता बास करा.
पुढची कादंबरी लिहताना तेवढ जमेल का बघा.

कंसातले (अंतिम भाग) काढून टाकल्याबद्दल अनेक आभारी - सानी ला अनुमोदन
हा भाग वाचल्यावर १० मिनीटांनी प्रतिसाद देत आहे खरचं काही सुचतच नाहीये. Sad
तुमच्या वातावरण निर्मीती मुळे दास्ताने वाडयात सगळे काही डोळ्यासमोर घडत आहे असा भास होतो. तो दास्ताने वाडा तुमच्या कादंबरी स्वरुपात कधी संपु नये आणी आज मानेकाकां सारखी माणस सोडुन जाऊ नयेत अस वाटतं.
मला ही कादंबरी संपुच नये अस वाटत आहे.

सर्व प्रेमळ प्रतिसादकांचे मनःपुर्वक आभार मानतो.

मधुकर - वहिनींनी दिलेली कॉम्प्लिमेन्ट हा मी नम्रपणे माझा सन्मान समजतो. त्यांना नमस्कार सांगावात.

सानी - आपण या कथानकात घेतलेला रस कित्येकदा मला पुढचा भाग लिहायला प्रवृत्त करतो. आपली कविता प्रभावी आहे. तिसरी व चवथी द्विपदी जर वगळली तर एक स्वतंत्र कविता म्हणूनही तिला स्थान मिळावे.

खरे बघाल तर गोवित्रीकरांचे अगदीच काही चूक नाही. मुलीची इच्छा म्हणून तिचे गरीब घरात लग्न लावून दिले. त्यांच्या म्हातार्‍या आईला फरफटत आणले मावशींनी, त्यांच्या मिसेसला वाट्टेल ते बोलल्या आणि अनुला तर थप्पडच मारली. कोणत्या मुलीचा बाप हे सहन करेल, तेहीआजच्या जगात? पण त्यांना दास्ताने वाड्यातील लोकांचे एकमेकांवर असलेले निरतिशय प्रेमच समजले नाही हे त्यांचे दुर्दैव! ते त्यांना आणि अनुलाही समजले असते तर कदाचित महेश अन अनु हे सर्वात सुखी दांपत्य असते जगातील!

असो! सानी यांच्या कवितेमुळे, 'मानेकाकांच्या आत्म्याला शांती लाभो' या प्रार्थनेमुळे व मधुकर तसेच सर्वांच्या गुंतून गेल्यानंतर दिलेल्या प्रतिसादांमुळे मला ही पात्रे जिवंत झाल्यासरखे क्षणभर वाटले.

परेश - आपल्याला की बोर्ड दिसेनासा झाला. ज्या माणसाने गेले कित्येक दिवस हे कथानक कसेबसे रेटले आहे त्यालाही प्रत्येक भागातील काही ना काही दु:खद प्रसंग लिहीत असताना नेमकी हीच भावना यायची. परेश, मी ही कादंबरी लिहीताना स्वतः अनेकवेळा रडलो आहे. कारण त्यातील अनेक प्रसंग हे नुसतेच माझ्या आयुष्यातील होते असे नाही तर ते सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील घटनांचे प्रतिनिधित्व करणारेही होते. पण आपल्या प्रोत्साहनाने नेहमीच हुरूप येत गेला.

या कादंबरीचे संपूर्ण श्रेय केवळ प्रतिसादकांचे व वाचकांचे आहे हे मी मान्य करतो.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

तुमच्या वातावरण निर्मीती मुळे दास्ताने वाडयात सगळे काही डोळ्यासमोर घडत आहे असा भास होतो.
खरच कथा वाचताना वाड्यात वावरत असल्यासारखे वाटते.
खरे बघाल तर गोवित्रीकरांचे अगदीच काही चूक नाही. मुलीची इच्छा म्हणून तिचे गरीब घरात लग्न लावून दिले. त्यांच्या म्हातार्‍या आईला फरफटत आणले मावशींनी, त्यांच्या मिसेसला वाट्टेल ते बोलल्या आणि अनुला तर थप्पडच मारली. कोणत्या मुलीचा बाप हे सहन करेल, तेहीआजच्या जगात? पण त्यांना दास्ताने वाड्यातील लोकांचे एकमेकांवर असलेले निरतिशय प्रेमच समजले नाही हे त्यांचे दुर्दैव! ते त्यांना आणि अनुलाही समजले असते तर कदाचित महेश अन अनु हे सर्वात सुखी दांपत्य असते जगातील!

शेवट करताना महेश अन अनु हे सर्वात सुखी दांपत्य करा.

नमस्कार बेफिकिर जी,
मला या कादंबरीतील सर्वात आवडणार वाक्य ".......तर हा दास्ताने वाडा......पेट्वुन देईन."
ते वाचताना 'पेट्वुन देईन' या कोरस मधे आपण ही आहोत अस वाटायच....
'मानेकाका' एक बुलंद आवाज आज कायमचा विरला....."माने काकांच्या आत्म्याला शांती लाभो"
खुपच वाईट वाटल.
चार महिन्यांपुर्वी माझे आजोबा आम्हाला सोडुन गेले, त्याच दु:खा वरची खपली निघाली आज............................

खरतर छान म्हणाव का तेच नाहि कळत. लिहिता छान. पण प्रसंग डोळ्यात अश्रु आणणारे तेव्हा मस्त म्हणु का अरेरे तेच कळत नाहिये.