श्रीनिवास पेंढारकर - एक बाप - क्रमशः - भाग ३१ (अंतीम भागांपैकी पहिला)

Submitted by बेफ़िकीर on 14 September, 2010 - 05:47

या कादंबरीच्या या भागाच्या निमित्ताने थोडेसे...

कादंबरीचे अंतीम काही भाग राहिलेले आहेत. एक बाप हे कथानक कितीही वाढवता येईल. दास्ताने वाडा हे कथानकही कितीही वाढवता येईल. पण या आधीच्या भागावर आलेल्या प्रतिसादांमुळे मी ही प्रस्तावना लिहिण्याचे ठरवले. सतत दु:खी विषय हाताळल्यामुळे काहीतरी खुसखुषीत लिहावे या उद्देशाने तो भाग मी लिहीला होता. लिहीताना मलाही भान होते की मूळ कथानकाहून काहीतरी वेगळे आपण लिहीत आहोत. पण उद्देशच तसा होता. तेही कथेचे तीस मुद्देसूद भाग झाल्यानंतरच घेतलेले स्वातंत्र्य होते मी! असो! तरीही रसभंग झाला असल्यास मनापासून दिलगीर आहे.

अजून किती भाग होतील याचा मला स्वतःला नीटसा अंदाज नाही. पण बहुतेक चार किंवा पाच व्हावेत जास्तीत जास्त! या कथानकामधील काही भागांमुळे कंटाळा येत असल्यास क्षमस्व!

संपूर्ण मायबोली प्रशासन व सर्व प्रेमळ प्रोत्साहक, प्रतिसादक व वाचक यांच्या ऋणात राहणेच आवडेल. या निमित्ताने माझा एक जुना शेर आठवला.

मी हा असाच आहे, माझे असेच आहे
स्वीकार जे हवे ते, जेव्हा रुचेल तेव्हा

-'बेफिकीर'!

================================================

११ फेब्रुवारी १९९३!

रमाचा मोठाच्या मोठा फोटो लावलेला! श्रीनिवास पेंढारकर कृतकृत्य झालेले! आणि शिवाजीनगरचे रमा रमण कार्यालय ओसंडून वाहात असलेले!

गट्टू उर्फ महेश पेंढारकर यांचे लग्न होते आज!

अनुराधा प्रसाद गोवित्रीकर या मुलीशी!

अगदी नैनासुद्धा तिच्या 'कमल'ला घेऊन आलेली होती. तिकडे दास्ताने वाड्यात तिसर्‍यांदा रोषणाई झालेली होती इतिहासात! पवार मावशींचे महत्व या लग्नात अनन्यसाधारण होते. त्या खालोखाल प्रमिलाकाकू आणि त्या खालोखाल समीरदादा!

प्रमिला काहीशी उत्साहात तर काहीशी निराश अशी वावरत होती. समीर लग्न करायला नाही म्हणत होता. त्याचे उत्पन्न आता ठीक होते. मधू निवृत्त झालेला होता. आयुष्यभर राब राब राबून प्रमिला आता थकायला लागली होती. आणि समीरच्याच बरोबरचा असलेल्या महेशचे लग्न आज होते. समीर मात्र अजूनही लग्नाला नाही म्हणत होता. त्याच्या दारू पिण्यावरून आता मधू अन प्रमिलाही काहीही बोलत नव्हते.

पवार मावशी पंचाहत्तरीच्या घरात! मानेकाका सहस्त्रचंद्रदर्शनाच्या दिशेने जात असलेले! दोन बुलंद आवाज म्हातारे झाले असले तरी ठणठणीत होते.

महेशची मावशी तारा, मावसभाऊ सुमेध दोघेही आले होते. गेल्या चार वर्षांच्या कालावधीत घडलेली एक दु:खद घटना म्हणजे उषाआत्याने या जगाचा निरोप घेणे!

राजश्रीताई अन सर्व बेरी कुटुंबीय व त्यांचे व्याही आलेले होते. निगडेंचे भले मोठे कुटुंब, पुजारी काका व काकू, घाटेंचे सर्वजण, एवढेच नाही तर सुरुवातीला प्रचंड गाजलेले व हळूहळू जादू हरवून बसलेले सदानंद महाराजही आलेले होते. दास्तानेंचे महत्व मावशींइतकेच होते. कारण ते वाड्याचे मालक होते. नंदा आत्याला बी.पी.चा भयंकर त्रास होता. त्यामुळे तिला कुणीच काही काम पडू देत नव्हते.

कुमार आणि कोमल साने त्यांच्या तीन वर्षाच्या स्नेहल नावाच्या मुलीला घेऊन आलेले होते. किरण अन त्याची बायको प्राजक्ता हे त्यातल्यात्यात नवीन दांपत्य होते. वैशालीताई तिच्या मुलाला अन नवर्‍याला घेऊन आलेली होती.

अनुराधा प्रसाद गोवित्रीकर! गोवित्रीकर हे पटवर्धन बागेत राहात होते. टुमदार घर होते. बंगला नव्हता. पण एक बंगला दोन कुटुंबानी व्यापलेला होता. त्यामुळे म्हणायला बंगला म्हणता येतच होते. बाहेर छोटे अंगणही होते. भोसरीच्या न्यु टेक कंपनीत महेश जॉईन झाला त्यानंतर सहाच महिन्यांनी अनुराधा जॉईन झालेली होती व तिने चारच महिन्यात स्वतःच्या घरी सांगून टाकले होते की महेश पेंढारकर सारखे स्थळ तिला हवे आहे. खरे तर दोघंचे प्रेम वगैरे नव्हतेच! पण अनुराधाला मात्र महेशमधे इंटरेस्ट होता. कारण महेश हा एकुलता एक, दिसायला रुबाबदार, हुषार आणि अभियंता! नाही म्हंटले तरी ती हळूहळू तो केव्हा येतो, काय काय करतो, कुणाशी काय काय बोलतो, कुठे राहतो, कसा वावरतो या सर्व गोष्टींचे निरीक्षण करू लागली. आणि एक दिवस सहज बोलता बोलता म्हणाली...

"महेश, खरे तर कुठलीच मुलगी स्वतःच्या तोंडाने असे म्हणणार नाही.. पण.. तुला माझ्याबाबत काही वेगळे विचार येतात मनात? "

महेशने एकदम अपमान नको म्हणून 'अगदी तसंच नाही, पण काही वेळा वाटतं खरं.. तुझ्याशी बोलाव, तुला घरी सोडावं वगैरे' असं हसत हसत सांगीतलं! तिने ते गंभीरपणे घेतलं.

अनुराधा महेशहून दोनच वर्षांनी लहान होती. पण ती आता एकवीस वर्षांची असल्यामुळे तिच्या लग्नाची घरी जोरदार तयारी चालू होती. अशात तिला आता मनातले सांगण्याशिवाय पर्याय राहिलेला नव्हता. तिने विचारल्यापासून नाही म्हंटले तरी महेश थोडा कॉन्शस झालेला होताच. आता तिच्याशी बोलताना तो एका विशिष्ट बाबीचे बहन ठेवून बोलल्याप्रमाणे बोलायचा. अनुराधा दिसायला नीटस होती. फार काही लाखात एक वगैरे नाही! पण सहवासाने एकमेकांबद्दल ओढ निर्माण होऊ शकते या तत्वाला अनुसरून महेशही आता मधूनच तिच्याकडे चोरून बघू लागला होता ऑफीसमधे!

त्या दिवशी ते दोघे भोसरी एम्.आय्.डी.सी.तील एका छोट्या हॉटेलमधे कॉफी पीत बसलेले असताना अनुराधाने घरी लग्नाचा विषय जोरदार चर्चिला जात आहे हे सांगीतले.

महेश - लग्न?.. इतक्यात?
अनु - इतक्यात म्हणजे? आता बावीस वर्षांची होईन मी..
महेश - हो पण..
अनु - मी काय सांगू घरी??

हा प्रश्न फार विचित्र होता. काहीही झाले तरी मनातून नैनाचा विषय जाणे शक्यच नव्हते. आता नैना सासरी रुळलेली होती. तिचा मुलगाही आता साडे तीन वर्षांचा होता. संग्राम कदम आता नैनाला प्रेमाने वागवत होता. सासरचे लोक तिचे मत घेऊनच संसार चालवत होते. कुसूमचेही लग्न झालेले होते. लग्नानंतर माहेर सोडताना कुसूमने नैनाच्या गळ्यात पडून आजवरच्या चुकांची माफी मागीतली. स्वतः सासरी जाताना माहेरचा आधार तुटल्यावर कसे वाटते हा अनुभव आल्यामुळे कुसूमला ती उपरती झालेली होती. एवढे सगळे असूनही महेशच्या मनात नैनाचे अन नैनाच्या मनात महेशचे स्थान तेच राहिले होते. आता नैना वाड्यात येऊन महेशशी बोलली तर संग्राम किंवा अप्पा कदम यांनाही तशी फारशी अडचण नव्हती. हा सगळा प्रकार एकट्या समीरच्या दमदाटीमुळेच जहलेला होता असे मुळीच नाही. समीर केव्ळ निमित्तमात्र होता. मर्यादीत कालावधीपुरते सासरचे लोक नैनाला वचकून होते एवढेच! पण त्याही कालावधीत नैनाने मनापासून व प्रेमाने सगळ्यांचे केल्यामुळे त्यांची मते हळूहळू बदललेली होती. आता नैना घरातील एक महत्वाचे माणूस ठरत चाललेली होती.

अशा परिस्थितीत आज कॉफी पिताना प्रथमच महेशच्या मनात विचार आला. आजवर आपण एकटे होतो, त्यामुळे आपल्या मनात नैनाचे स्थान तेच राहिले होते. पण जरा त्रयस्थपणे विचार करायचा म्हंटले तर? नैना आज तिच्या संसारात नाही म्हंटले तरी रमलेली आहे. तिचा मुलगा आता बालवाडीत जात आहे. नवरा नैनाला योग्य तितके महत्व देत आहे. सासू सासरेही तिच्या कलाने घेत आहेत. नैनाच्या मनात आपला विचार किती वेळा येत असेल? पण असा प्रश्न पडणे हा आपल्या तिच्यावरच्या आणि तिच्या आपल्यावरच्या प्रेमाचा अपमान नाही का? पण क्षणभरासाठी तो विचार बाजूल ठेवला तर... आपण जेव्हा रात्री बेरात्री नैनाच्या आठवणिंनी व्याकुळ होत असतो त्याक्षणी ती तिच्या नवर्‍याच्या सहवासात रममाण झालेली असते. तिचे त्या वेळेस जगच वेगळे असते. ती संपूर्णपणे कदम असते त्यावेळेस! नाही शिंदे, नाही पेंढारकर! कदाचित ती त्याही क्षणी आपल्याला आठवत असेलही! पण तरीही तिला नवर्‍याला तसे दाखवता येणारच नाही. तिला कायम हेच भासवावे लागणार की ती त्याच्याशी एकनिष्ठ आहे. त्याच्याचसाठी जगत आहे अन झुरत आहे. मग???? मग आपले काय? कित्येक दिवसांपासून बाबांच्या तोंडातून हा विचार सतत प्रकट होताना दिसतो. आता वर्षभराने मुली पाहूयात बाबा तुला! एकदा सून आली की मी झालो मोकळा!

बाबांना आता काहीच झेपत नाही खरे तर! निवृत्त झालेत! वय वर्षे साठ! तरी आपण संध्याकाळी घरी गेलो की चहा टाकतात. पूजा करतात, पाणी भरतात, आपला सकाळचा डबा करतात अजून! का? तर म्हणे मी आता मोकळाच आहे. उलट काम केले की हातपाय चांगले चालतात म्हणून! आपले झालेले असते जागरण कुठेतरी रात्री! आपण सकाळी अगदी ऑफीसला जायच्या आधी तासभर उठणार, पेपर वगैरे वाचत चहा घेणार आणि मग ऑफीसला जाताना फक्त बाबांना 'येतो' असे म्हणणार! ते मात्र 'नीट जा हं?, गाडी हळू चालव, लवकर ये रे...' एवढे सगळे म्हणणार! 'लवकर ये रे'! किती बोलके शब्द असतात बाबांचे! खरे तर मी कधीच लवकर जात नाही घरी! घरी गेल्यावर चहा घेऊन फ्रेश होऊन जरा टी.व्ही. पाहतो! त्यावेळेस बाबा हजार चौकश्या करतात. आज गर्दी होती का? तुम्हाला गुड फ्रायडेची सुट्टी आहे का? भेंडीची भाजी चालेला ना? वगैरे वगैरे! साडे आठ वाजता आपण दोन घास खाऊन बाहेर पडतो ते थेट गुडलकला जाऊन बसतो मित्रांमध्ये! स्मोकिंग, चहा आणि गप्पा! जाताना पुन्हा बाबांना 'आलो मी थोड्या वेळात' असे म्हणतो अन रात्री पावणे बाराला घरी पोचतो. तेव्हा बाबा आपल्याला पाहून उठतात अन 'दूध घे रे झोपताना, किती वेळ फिरता तुम्ही सगळे, काळजी वाटते इथे' असे म्हणतात आणि पुन्हा आडवे होतात.

'सून आणणे किंवा सून येणे' ही .... बाबांची... गरज असेल का?

खरंच! आपल्याला हे आधीच कसे सुचले नाही. समीरदादाचे कुठे लग्न झालेय, मी आत्ताशिक तेवीस वर्षांचा आहे असे सांगून आपण बाबांचे म्हणणे हसण्यावारी नेतोय. पण 'आई' व 'बाप' या दोन्ही भूमिका आयुष्यभर केलेला माणूस दुप्पट थकला असेल हे आपल्या का लक्षात आले नाही?

लग्न? आपलं लग्न? नैनाशी लग्न करणे शक्य नसताना आपण लग्न करायचे? .... हं! करावे लागेलच! बाबांसाठी तरी करावे लागेल. मग... जर नैना नाहीच आहे तर...

.... मुलगी कोणीही असली तरी काय झाले????

आणि कॉफीचा शेवटचा घोट घेताना सुन्न होऊन बसलेल्या अन महेशच्या उत्तराला लागणारा विलंब पाहून निराश होत चाललेल्या अनुला महेश म्हणाला...

"घरी काय सांगायचंय त्यात? ... सांगायचं? म्हणाव महेश अन मी लग्न करणार आहोत"

त्यावेळेसचा अनुचा चेहरा पाहून 'नैनावर असीम प्रेम करणारा' महेशही क्षणभर मोहवला. काय लाजली ती! अत्यंत कुरूप स्त्रीसुद्धा जेव्हा लाजते तेव्हा नेहमीपेक्षा सुंदर दिसते. अर्थात, कुरूप किंवा सुस्वरूप असणे यात माणसाचा काहीच दोष नाही.

आणि तसेच लाजत लाजत अनुराधाने आपल्या आईला ते सांगीतले आणि बैठकीतच अनुराधाच्या आई वडिलांनी नाक मुरडले.

शनिवार पेठेतील एका सामान्य वाड्यातील फक्त एक खोली भाड्याने घेऊन राहणारा मुलगा? अनुराधाचे वडील सुदर्शन केमिकल्समधे फायनान्सचे ए.जी.म. होते. त्यांचे राहणीमान भलतेच वेगळे होते. अनुराधाची आई शिकलेली अन मधून मधून इंग्लीश वगैरे बोलणारी होती. पटवर्धन बागेतील अर्ध्या बंगल्यात राहणारे हे कुटुंब दास्ताने वाडा पाहून नाराज झालेले होते. जिकडे तिकडे जुनाटपणा! एक घर धड नाही. जमेल तसे डागडुजी केलेले! सगळ्या वाड्यातील सगळी माणसे कुठेही फिरतायत! आपल्या घराची प्रायव्हसी नावाचा प्रकारच नाही. त्यातच सायकली कशातरी लावलेल्या, कुणीतरी मोठ्यांदा रेडिओ लावून बसलंय! ती महेशच्या शेजारच्या खोलीत राहणारी म्हातारी तर बघूनच नको वाटते हे स्थळ!

पण! ...

श्रीनिवासने अनेक बाबींवर कमीपणा स्वीकारून बैठक पार पाडली. बैठकीच्या वेळेस त्याने महेशला तेथे बसायची परवानगी दिलेली नव्हती. त्यामुळे महेशला हे कधी समजलेच नाही की बाबांनी काय काय भूमिका घेतल्या अन केवळ आपल्या सुखासाठी ते काय काय बोलून बसले. मात्र अनुराधाला तिच्या आई वडिलांनी बैठकीला आणलेले होते. ते आले त्या आधीच महेश बाहेर गेल्याने व तेव्हा मोबाईल वगैरे कसलीच सोय नसल्याने त्याला पुन्हा घरी बोलावता आले नाही.

घरात फोन नाहीये??? - ... बूक करायचाच आहे या महिन्यात..
एका खोलीत राहण्याची हिला तेवढी सवय नाहीये - फ्लॅट बूक करतोच आहोत आम्ही.. दोन महिन्यातच
कुठे???/ - .. कर्वे रोडला...
अनु तसं घरकाम करते ... पण... तेवढी सवय... - छे छे! मी आहे की? आम्ही दोघे मिळून बघू...
वाड्यात काही प्रायव्हसी नाहीये नाही? - आता जुने लोक आहेत सगळे... पण फ्लॅट घ्यायचाच आहे..
लग्नानंतर तुम्ही??? ... म्हणजे.. झोपायला - मी हा पलीकडे.. ते माने आजोबायत ना? ते एकटेच असतात
अनुराधा नोकरी करणार म्हणतीय - अर्थात.. मुलींनी शिकल्यावर नोकरी करावीच..
घरात बाईमाणूस नसलं की घरपण वाटत नाही नाही? - आता मी प्रयत्न करतोय खरा...
आमचं सर्कल वेगळं पडतं.. सगळेच तसे... उच्चभ्रू... - अर्थातच... काही काळजी करू नका..
एकुलती एक मुलगीय... - महेशही एकुलता एकच आहे.. शिकलेला आहे.. चांगला जॉब आहे..
के. एस. बी. पंप्स मिडियम स्केल आहे ना? - .. हो..
कारण सुदर्शनएवढी नाही वाटत - ... नाही नाही .. तेवढी नाहीये.. पण फिनोलेक्सचं चाललंय त्याचं

श्रीनिवासला एवढा कमीपणा घेण्याचं खरे तर काही कारणच नव्हतं! पण घ्यावा लागला. मुलगा नैनाला हळूहळू विसरत आहे, या मुलीकडे ओढला जातोय, आपणही आता एवढं घरकाम सोसू शकत नाही, मुलाचे लग्न झाले की आपली जबाबदारी खूपशी संपेलच, मग नुसतं जपजाप्य करत बसायचं, रमाला दिलेला शब्द पाळायलाच पाहिजे, मुलगी पण चांगल्या घरातील आहे...

देण्याघेण्याच्या वेळेस मात्र 'हे मोठ्या कंपनीत असले तरी आमची परिस्थिती काही एवढी ही नाही' असे म्हणाल्या सुलभाताई! अर्थात, हवं कुणाला होतं काहि? श्रीने सरळ 'आमची पाने आम्ही अन तुमची पाने तुम्ही घालू' असा प्रस्ताव मांडला. त्यावर मात्र ती कजाग माउली अगदी निर्मळ हासली. पेंढारकरांपैकी मानपान फक्त दहा होते, तेही श्रीच बघणार होता. आणि मुहुर्त पाहून चक्क फेब्रुवारी महिन्यात, म्हणजे पुढच्याच महिन्यात लग्न ठरलेही. रमारमण बूक झाले अन त्याचाही खर्च डिव्हाईड करायचे ठरले.

मात्र! जशी नैना कार्यालयात आली.. महेशने आवंढाच गिळला. तिच्यासमोर कसे उभे राहणार आपण? ती आपल्याला पळून जाऊ म्हणत होती, उद्या लग्न अन आज चिठ्ठ्या पाठवत होती. आणि शेवटी आपण काहीच पुरुषार्थ न दाखवल्यामुळे तिला लग्न करावे लागले. आता आपण मोठ्या आनंदात लग्नाला उभे राहिलो आहोत. आणि ती बिचारी 'परक्याच्या लग्नाला यावे' तशी आली आहे. चेहर्‍यावर दिसतंय की? सरळ सरळ दिसतंय!

कुर्यात सदा मंगलम!....

अंतरपाट धरणारे गुरुजी माईकवर घसा खरवडून आक्रोश करत होते. उकडून जीव चालला होता. कालच सीमांतपूजनाला अनुराधाकडचे लोक पाहून महेश अन श्रीची छाती दडपली होती. बहुतेक सगळेच आपापल्या गाडीतून आले होते. त्यांचे राहणीमान यांच्यापेक्षा कितीतरी वरचे होते. मुलगा, त्याचे वडील अन वाड्यातले लोक पाहून त्यांच्या चेहर्‍यावरच्या बदलत्या भावांचा अर्थ न समजायला आता कुणीही दूधखुळे नव्हते.

तिथे उभे असताना महेशच्या मनात आईचा विचार आला. आज आपली आई असती तर तिला किती आनंद झाला असता! आता आपले लग्न झाल्यावर नाही म्हंटले तरी बाबा तसे एकाकी पडणार! बिचारे आजपासून मानेआजोबांकडे झोपायला जाणार आहेत. आयुष्यभर ज्या खोलीत आपल्याला झोपवले, थोपटले, मांडीवर घेऊन डोलवले, जमेल तशी अंगाई गायली, आपली वाट पाहिली, आपल्याचसाठी स्वयंपाक केला, आपले कपडे धुतले, घोडा घोडा करून आपल्याला पाठीवर बसवले...

आजपासून बाबा त्या घरात नाही झोपणार! का? कारण आपले नवीन लग्न झाले आहे. आपल्याला प्रायव्हसी आवश्यक आहे या कारणासाठी! व्वा!

मानेआजोबा मनाने चांगले आहेत म्हणून ठीक आहे. पण स्वभाव रागीटही आहेच त्यांचा! एखाददिवशी 'आजपासून इथे झोपत जाऊ नकोस' म्हणाले तर मग बाबा मधूकाकाच्या ओसरीवर किंवा सदानंद महाराजांकडे झोपतील. इतकं सगळं होत असेल तर... आपल्याला हे लग्न का करावसं वाटतंय?

मग त्याला आठवण आली. साखरपुड्याच्या दिवशी अनुराधा गुलाबी साडी नेसली होती. साखरपुडा झाल्यावर तिच्या श्रीमंत मैत्रिणींनी तिची थट्टा करून महेशच्या हिरो होंडा स्लीकच्या मागच्या सीटवर तिला बसवले.

हो! १९९२ साली हिरो होंडा स्लीक घेतली होती महेशला! पार भोसरीत जॉब मिळाला म्हणून!

आणि मग त्या थट्टेमुळे खुलून गेलेली अनुराधा महेशच्या मागे बसली आणि महेशने सरळ पॅगोडाच्या टेकडीपाशी गाडी थांबवली. त्या संध्याकाळी संधिप्रकाशाचा फायदा घेऊन अनुराधाचे पहिले चुंबन घेतले होते त्याने! नैनासारखा आवेग कुठेच नव्हता. पण वयाने आपली जादू दाखवली. आता अनुराधाबद्दलही आकर्षण निर्माण झाले होते.

लग्न करणे आवश्यक आहे अशी ओढ निर्माण झालेली होती. त्यात बाबांच्या शांततेची, समाधानाची होळी होणार होती हे स्पष्ट दिसत असूनही! पण 'वडिलांनी मुलांच्या सुखासाठी एवढा त्याग करायचाच असतो' हे वाक्य स्वतः महेशच स्वतःवर बिंबवत होता. आणि बाबा मात्र स्टेजपासून थोड्या अंतरावर एका डोळ्यात हसू अन एका डोळ्यात आसू घेऊन अक्षता टाकत होते.

तदेव लग्नं..

गुरुजी मंगलाष्टकांच्या भैरवीवर पोचलेले होते. अंतरपाट दूर झाल्या झाल्या एका रमणीचे सुखद दर्शन होणार होते. आयुष्याची गाठ बांधली जाणार होती. असे का होतेय? याही क्षणी आपल्याला... नैनाचीच आठवण का होतीय???

काहीही नियंत्रण नसल्याप्रमाणे महेशने डावीकडे लांबवर नजर टाकली. तीव्र धक्का बसला.

इकडे तिकडे बागडणारा आपला मुलगा आत्ता कुठे आहे हेही माहीत नसलेली ... आणि हातातल्या अक्षता आता एकदम सगळ्या टाकायच्या आहेत याचे काहीही भान नसलेली नैना...

नजर खिळल्यासारखी पांढर्‍या फटफटीत चेहर्‍याने महेशकडे लांबून बघत होती.. नजरानजर झाली अन लांबूनही महेशला तिचे डोळे ओले झालेले दिसले. एक खिन्न हसू तिच्या चेहर्‍यावर पिळवटून आलेले होते. महेशच्या दृष्टीने 'जगायलाच नालायक' अशी जगात आत्ता एकमेव व्यक्ती होती.

'महेश.. श्रानिवास .. पेंढारकर...'

शुभमंगलं... सावधान...

टाळ्यांचा कडकडाट! दोन मने आता कायमची जुळणार... दोन मने आता कायमची दुरावलेली.. एक बाप आता कायमचा तिर्‍हाईत होणार.... आणि.. गट्टूच्या संसाराला सुरुवात होणार धुमधडाक्यात....

लाजून व दागिने अन फुलांचे वजन सहन होत नसल्यामुळे खाली मान घातलेल्या अनुराधाने तसेच कसेतरी बघत महेशच्या गळ्यात हार घातला.. तेव्हा.. तिला नवर्‍याच्या चेहर्‍यावर कोणताही आनंद, कोणतीही उत्सुकता न दिसल्यामुळे ती मनातल्या मनात अवाक झालेली होती... आणि तिच्या मनात काय आहे याचे काहीही भान नसलेला महेश जणू सुतकाला आल्यासारखा तिच्या गळ्यात हार घालत होता....

श्रीनिवासने खाडकन रमाच्या फोटोकडे पाहिले... आज... आज रमाच्या डोळ्यांमधे त्याला एक वेगळीच चमक बघायची होती... आपल्या एकट्या पडलेल्या नवर्‍याने हिंमत दाखवून, आपल्या बाळाला इतके मोठे केले अन आज त्या बाळाचे लग्नही झाले... पण...

नेमके काय भाव तिच्या डोळ्यात आहेत हे समजायच्या आतच अनुराधाकडील एका कुणीतरी बाईने 'हा फोटो जरा इकडे ठेवूयात का?' असे म्हणून तो उचलून बाजूला ठेवला...

कै. सौ. रमा श्रीनिवास पेंढारकर... यांचे महेशच्या संसारातील स्थान हेच होते...

जणू 'मुलीचेच लग्न झाले आहे' असे वाटल्याप्रमाणे श्रीने हळूच डोळे पुसले.

पंगती बसायला एक तास होता! स्टेजवर आता नवदांपत्याला बसवण्यात आले. अनुची मावसबहीण तिच्या बाजूला तर समीरदादा महेशच्या बाजूला आहेर घ्यायला बसले होते. रांग लागली. अनुराधाकडील एकेक जण पॉश होता. त्याची ओळख करून दिल्यावर महेश हात जोडून अभिवादन करत होता. महेशकडीलही सर्वांनाच अनुराधा नम्रपणे हसून अभिवादन करत होती. पण अनुराधाकडचा आहेर भरभरून येत होता. दास्ताने वाडा, किर्लोस्करमधले जुने लोक आणि सुंदरम ऑटोचे लोक यांच्याकडून नुसतीच हलकी हलकी पाकिटे येत होती.

अनुराधाची आईही तिथेच उभी होती. पेंढारकरांकडील व आपल्याकडील आहेरांत असणारा फरक तिने चाणाक्षपणे ओळखला होता. आलेल्यापैकी दोन मोठे बॉक्सेस तिने मुद्दाम समीरच्या बाजूला ठेवले. दाखवायला! आमच्याकडच्या आहेराला जागा पुरत नाही. दास्ताने वाड्यातील कुणीही भेटायला आले की तिच्या आईच्या चेहर्‍यावर 'कमी आर्थिक परिस्थितीच्या माणसांना पाहिल्यामुळे' एक अस्वस्थता येत होती जी मावशी, प्रमिला, नंदा, स्वतः श्री व महेश या सर्वांना जाणवलेली होती. मात्र त्यांना हे माहीत नव्हते की ते समीरलाही जाणवलेले आहे. आणि शेवटी नको तोच प्रसंग उद्भवला. या प्रसंगाला सामोरे जाण्याचे धैर्य कशातही मिळू शकत नव्हते महेशला!

नैना!

नैना समोर आली. हिची काय ओळख करून द्यायची? हिची काही ओळख आहे? की ही म्हणजे मीच अन मी म्हणजे हिच असे खरे सांगायचे आपल्या बायकोला? उठण्याचीही ताकद नव्हती महेशमधे! नैना मात्र कधी नव्हे इतकी हसत हसत अनुराधाच्या चेहर्‍यावरून हात फिरवत होती.

महेश - ही.... ......... .... .... नैना...... ... नैनाय ही...

अनुराधाने जणू 'नैनाचे नांव तर मी कधीपासूनच ऐकून होते' असा चेहरा करून प्रेमाने हासली.

नैना - माझ्या लग्नात तू आला नव्हतास.... पण मी आले तुझ्या लग्नात....

समीरदादाही हादरावा असे वाक्य होते हे! समीर नि:शब्द होऊन नैनाकडे पाहात होता. आणि खरेच सांगायचे तर ... कार्यालयात सर्वत्र विखुरलेले दास्ताने वाड्यातील यच्चयावत लोक जमेल तिथून या प्रसंगाकडेच डोळे लावून होते....

महेश कसाबसा हासला. ही अजून का थांबलीय अन महेशच्या डोळ्यात इतके डोळे कसे काय मिसळून बघतीय हा विचार क्षणभर अनुराधाच्या मनात आला खरा... पण आत्ता त्यावर अधिक विचार करायला सवडच नव्हती...

नैना - महेश... तुला शोभेलशीच आहे अनुराधा... जगात... इतकी छान बायको नसती मिळाली तुला आयुष्यात....

आणखीन एक घाव! नशीब जणू परीक्षा पाहात होते. महेशचा चेहरा खाडकन पडलेला फक्त दास्तानेकरांनाच समजला.

नैना - अनुराधा... हा .. कमल... माझा मुलगा...

अनुराधाने कमलच्या गालांवरून कृत्रिम व प्रासंगीक आत्मीयतेने हात फिरवला..

नैना - घरी या हं दोघेही आता???

तेवढ्यात अनुराधाकडचे कुणीतरी महत्वाचे आले. क्षणभरच नैना आणि महेशचे डोळे एकमेकांत गुंतले. गोवित्रीकरांकडच्या कुणालाच त्यातील काहीच माहीत नसल्यामुळे ते आरामात होते.

नैना - संपलं आज सगळं... महेश... आता फक्त.... वाट पाहायची.... पुढच्या जन्माची... जाते मी...

नेहमी 'येते रे महेश' म्हणणारी नैना आज 'जाते मी' म्हणून गेली... आणि पायातले बळ गेल्याप्रमाणे महेश मटकन खुर्चीत बसला. समीरने सगळे जाणून त्याच्या खांद्यावर हात ठेवला. लांबवर कुठेतरी....

... सौ. नैना कदम... न जेवताच ... आपल्या मुलाचा हात धरून त्याला फराफरा ओढत... रमारमणच्या बाहेर चाललेली होती...

....

पेंढारकर देशस्थ असल्यामुळे रात्री वाड्यात गोंधळी आले होते. गोंधळ, पूजा सगळे झाले तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते. राजश्रीताई आणि वैशालीताई, तसेच अनुराधाच्या मैत्रिणींनी मधुचंद्राचा बेड सजवलेला होता.

सगळेच आटोपल्यावर अनुराधाची थट्टा करत वाड्यातल्या बायकांनी तिला खोलीत पाठवले...

आणि महेशला आत जाण्याचा आग्रह सुरू झाला... तो हसत होता... आणि हसता हसताच... त्याला दिसले..

आपले झोपायचे एक पांघरूण अन एक अंथरूण घेऊन..... बाबा माने आजोबांचा जिना चढत होते....

पेंढारकरांच्या दुसर्‍या पिढीच्या संसाराला त्या दिवशी सुरुवात झाली....

एक बाप... एक बाप खरे तर आनंदाने झोपला त्या रात्री... पण.... स्वतःच्या घरी नाही....

================================================

दुसर्‍याच दिवशी सकाळच्या बसने नवीन दांपत्य गोव्याला रवाना झाले. आणि मधुचंद्राचे आठ मधूर दिवस अन त्याहून मधूर रात्री आटोपून परत आले. आज खर्‍या अर्थाने संसाराला सुरुवात होणार होती.

अनुराधाला जाणवले. रात्री जरी सासरे झोपायला पलीकडे जात असले तरी दिवसभर ते घरातच असतात. सतत काही ना काही काम करत असतात. पहिल्यांदा तिला कीव आली. इतका मोठा माणुस बिचारा सारखा कामात असतो. त्यामुळे ती त्यांना मदत करायला लागली. श्रीनिवास तिला आपली मुलगीच समजत होता. तो स्वतःच पोळी करून तिला दाखवायचा... हे बघ.. इतकी वर्षे पोळ्या करतोय.. पण धड नाही पुणे जिल्हा.. धड नाही पाकिस्तान..खदखदून हसायची अनुराधा.. मग स्वतः पोळ्या करायला घ्यायची... तिच्या त्या इनिशिएटिव्ह घेण्यामुळे अत्यंत आनंदीत व्हायचा श्री! तिच्या त्या स्त्री सुलभ हालचालींमुळे त्याला रमाची आठवण यायची...

महेश साडे सात वाजता यायचा. बरेचदा तो आला की श्रीनिवास चहा करायचा. ते पाहून आता अनुराधाने चहा करायला सुरुवात केली. पेंढारकरांच्या खोलीत कित्येक वर्षांनी, खरे तर रमा गेल्यानंतर प्रथमच.. एका स्त्रीचा असा शिस्तबद्ध, आखीव रेखीव वावर होता व त्याच्या खाणाखुणा प्रत्येक गोष्टीवर दिसत होत्या. पान वाढले तरी इतके छान वाढायची ती! पोळ्या म्हणजे व. बा. बोध्यांच्या भाषेत 'ओठांनीच खाव्यात' अशा! मोनी या कामवालीचे अन अनुराधाचे चांगले जमले होते. सासरे रोज खूप वेळ पूजा करता, सासूबाइंच्या फोटोला हार घालतात अन तेथेही उदबत्ती लावतात हे पाहून तिला श्रीनिवासबाबत आदर निर्माण झाला होता.

पण! कुठेतरी माहेरचे वैभव आणि सासरची परिस्थिती यांची मनात तुलना व्हायचीच! एक मोठा घटक म्हणजे 'सासूरवास' हा प्रकारच नव्हता नशीबात! पण इतर अनेक घटक होते. शेजारच्या आजींकडे बघावे लागत होते. हा एक नवीनच प्रकार होता. ही बाई सतत गप्प असते, मारक्या म्हशीसारखी येणार्‍या जाणार्‍याकडे बघत असते. हिचे आपण का करायचे? सासरे का करतात हिचे इतके? तर म्हणे महेशला यांनीच लहानाचे मोठे केले आहे. ठीक आहे. पण आता महेश मोठा झाला आहे ना? आता मी त्याची बायको आहे म्हणून मलाही का ही जबाबदारी घ्यावी लागावी? हा विचार हळूहळू मूळ धरू लागला होता. मावशी एक शब्द बोलायच्या नाहीत. त्या जरा जरी बोलल्या असत्या तर निदान त्यांचा स्वभाव तरी अनुला समजला असता. पण त्या बोलतच नव्हत्या. मात्र सतत त्यांना 'कसे आहे विचारणे, निगडे आजी आलेल्या नसल्या तर आपण केलेल्या स्वयंपाकातील काही त्यांना नेऊन देणे, त्यांना उठवणे, बसवणे,' हे सगळे करावे लागत होते. एकट्या अनुला नाही. कधी महेश बघायचा तर कधी श्री! पण अनुकडून ती अपेक्षा मात्र होती त्यांची! आणि बायकांचे एक असते. त्यांचे मनापासून दुसर्‍या व्यक्तीवर प्रेम बसले तर त्या मायेने सगळे करतात. पण नाही प्रेम बसले तर त्या तिरस्कार करू लागतात. अनुच्या देहबोलीत आता फरक पडू लागला होता. एक औपचारिकता म्हणून ती मावशींना चहा नेऊन देत होती. त्यांच्याशी एक शब्दही न बोलता त्यांच्यासमोर चहा ठेवून घरात येत होती. मावशी काही दुधखुळ्या नव्हत्या. त्यांना हा फरक चांगला समजू लागलेला होता. पण शारिरीक दौर्बल्यामुळे त्या रागही प्रदर्शित करायच्या नाहीत. पण एक मात्र होते! आता त्यांनी चहा वगैरेच घेणे जरा बंद केले होते. उगाच या नव्या मुलीला माझ्यामुळे त्रास नको.

महेशला या गोष्टीचा काही सुगावाच नव्हता. श्रीलाही नव्हता.

त्यात आणखीन एक प्रकार होता. वाड्यातील कुणीही केव्हाही येऊन घरात बसायचे. हे आधी पण असेच असायचे हे ऐकून अनुला माहीत होते. पण आता तिला त्याचा वैताग येत होता. जरा पडणे शक्य नव्हते. कारण श्री दुपारी तिथे झोपायचा. सासरे तिथेच असताना आपण कसे झोपायचे? मग जरा वाचत बसावे तर अचानक माने आजोबा यायचे अन सरळ ठिय्या देऊनच बसायचे. चांगले खणखण्त आवाजात म्हणायचे...

"ए मुली...चहा टाक"

चहा काय टाक? मी म्हणजे काय हक्काची सून आहे यांची? पण अनु चडफडत चहा टाकायची. मग सासरेबुवाही आनंदाने चहा घ्यायचे अन माने आजोबाही! त्यांच्या गप्पा भलत्याच! दास्ताने असे आहेत अन भाजप तसा आहे अन काँग्रेसची चूकच झाली अन अडवाणींच्या रथयात्रेमुळे बहुमत मिळाले..

अनु आपली नुसती बसून राहायची.

हळू हळू परिस्थिती बदलू लागली. या सगळ्याचा उबग येऊ लागला. मधेच नंदा आत्या यायच्या अन सरळ काहीतरी उचलून घेऊन जायच्या! कधी कोथिंबीर, कधी मिरच्या, काहीही! नुसते आपले सासर्‍यांना सांगायच्या..

"श्री... आलं नेते रे जरा"

श्री काय श्री? शेजारच्या परक्या माणसाला अशी हाक कशी काय मारू शकतात हे लोक? आणि आलं न्यायचं असेल तर घरातल्या बाईमाणसाला सांगायचं का यांना? आणि मुळात विचारायला नको का? मी आलं नेऊ का? सरळ आपला हात घालतात अन उचलून नेतात म्हणजे काय?

त्या पमाकाकू तसल्याच! केव्हाही येतात अन म्हणतात जरा यांच्याबरोबर बॅकेत जाता का? यांना उन्हाने मधेच चक्कर वगैरे येते! माझे सासरे म्हणजे काय समाजसेवक आहेत? आणि तेही जातात लगेच! कशाचं काही नाहीच मुळी!

अनुच्या देहबोलीत, वागण्यात, सुस्कार्‍यांमधे अन नाक उडवण्यातल्या तीव्रतेमधे पडलेले फकर हळूहळू महेशला समजू लागले होते. पण श्रीला नाही! कारण ती त्याच्यासमोर अजून नाराजी व्यक्तच करायची नाही.

दोन महिने झाले तेव्हा तिच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. पडला कसला, अनेक प्रकाश पडले.

आपल्या नवर्‍याला या वाड्याने लहानाचा मोठा केलेला असल्याने इथे राहीपर्यंत हे असेच चालणार! पहिला प्रकाश! आपल्या नवर्‍याची ही जागा सोडून जाण्याची कोणतीही इच्छा नाही. दुसरा प्रकाश! आपल्या सासर्‍यांवर आणि नवर्‍यावर अमाप उपकार केलेले असल्यामुळे किंवा तसे वाटत असल्यामुळे वाड्यातील प्रत्येकाला मी हक्काची सून वाटते... तिसरा प्रकाश....

आणि... चवथा प्रकाश मात्र नको होता पडायला.... त्या दिवशी बाहेर गेल्यावर भांडणच काढले अनुने महेशशी!

गणेश बेरीचा अनुला अत्यंत राग यायचा! कारण एक तर तो अर्धवट वयाचा होता आणि कुणाकडेहि एकदम जायचा! त्याला काही वाटायचेच नाही. श्री घरात नसताना एकदा दुपारी अनु जरा पडली होती आणि वाड्यात दार लावायची प्रथा नाही हे घोकल्यामुळे तिने दार नुसतेच लोटले होते. त्यातच गणेश आला आणि 'काय वहिनी? झोपता काय दुपारच्या? आमच्या भावाला जेवायला वाढता की नाही?' असे त्याच्या नेहमीच्या थट्टेखोर स्वभावाने चेष्टेत म्हणाला. अनु भयंकर चिडली. एक तर मी या वाड्यात लग्न करून आले तशी आमच्या परिस्थितीतली कोणतीही मुलगी आली नसती. अन इथे हा चतकोर वयाचा मुलगा मला चेष्टेत असले प्रश्न विचारतो. 'तुला काय भानगडी रे दुसर्‍यांच्या? अभ्यास कर, अन यायच्या आधी दार वाजवत जा, हे घर म्हणजे धर्मशाळा नाहीये' अशी खेकसली. हे वाक्य मावशींना ऐकू गेले असेल याचा तिला अंदाजच नव्हता. मावशींकडे कुणी काही बडबडले तर आपल्याला ऐकू येते तसे आपल्याकडेचेही तिकडे ऐकू येत असेल एवढा विचार तिने केलेला नव्हता. गणेश एकदम अपमान झाल्यामुळे बाहेर पडला. त्यानंतर तो कधीच आला नाही.

आज दुपारी गणेश मावशींकडे आला होता हे तिला पलीकडच्या खोलीतील आवाजांवरून समजले. नेमका आजही श्री घरात नव्हता. ती कादंबरी वाचत पडली होती. तेवढ्यात तिला गणेशचे वाक्य ऐकू आले.

"या वहिनीपेक्षा नैनाताई कितीतरी चांगली होती दादासाठी"

झालं!

कमला नेहरू पार्कमधे झालेल्या दिड तासांच्या भांडणात सुरुवातीला महेशने 'छे? नैनाचा काय संबंध' असा, थोड्या वेळाने 'अगं वाड्यातले काहीही बोलतील, तुझा विश्वास आहे की नाही?' असा, त्यानंतर 'आम्हाला ही मुले उगाच चिडवायची फक्त' असा पावित्रा घेतला. त्या क्षणापासून नैनाबाबत अनुच्या मनात भयानक विचार सुरू झाले.

संसारातील शांतता आणखीन घटायला आणखीन एक कारण घडले.

अनु माहेरी गेलेली असताना तिने आईला बरेच काय काय सांगीतले! नैना हे प्रकरण सोडून! परिणामतः तिचे वडील श्रीला बाहेर भेटले.

वाड्यात कधीपर्यंत राहणार? फ्लॅट कधी घेणार? फोन तरी घ्या, आम्हाला मुलीशी बोलताही येत नाही असे प्रश्न विचारून अन सल्ले देऊन भंडावून सोडले. त्यांनी हेही सांगीतले की एवढ्याश्या लहान मुलीवर वाड्यातल्या अनेकांची उगीचच जबाबदारी पडत आहे.

हे ऐकून मात्र श्रीला प्रचंड वाईट वाटले. काय करायचे अशा विमनस्क मनस्थितीत असताना तो सरळ मावशींकडे आला.

मावशी - काय रे? घुबडासारखा का बघतोयस?
श्री - काही नाही...
मावशी - बोलायला पैसे पडतात का तुला?
श्री - आता.... काय सांगायचं??
मावशी - वेगळं राहूदेत त्यांना...

भयंकर धक्का बसल्याप्रमाणे श्री मावशींकडे पाहात होता. या माउलीला कसे समजले की मी काय बोलणार आहे?

याला म्हणतात प्रेम! नुसते दुसर्‍याकडे बघून समजले पाहिजे की त्याच्या मनात काय आहे? आणि असे प्रेम दास्ताने वाड्यातील प्रत्येक रहिवाशामधे होते. खूप वेळ मावशींना काय काय सांगत होता श्री! मावशी गपच होत्या. श्रीचा एक पॅरॅग्राफ झाला की त्या म्हणायच्या.. 'मी सांगीतलेलाच उपाय योग्य आहे'!

लग्नाला आता तीन महिने झाले होते. कुलदैवते, म्हणजे जेजुरीचा खंडोबा अन कोल्हापुरची अंबाबाई, तसेच मूळ कुलदैवत सातार्‍याची यमाई! यांचे मानपान काढलेले तसेच राहिले होते. श्री या तीनही ठिकाणी जायला निघणार तेव्हा प्रमिला अन मधू 'आम्हीही येतो' म्हणाले अन तिघांनाही खूप बरे वाटले. एकमेकांच्याच वयाचे, एकमेकांना आधार होतील असे आणि मुख्य म्हणजे... एकमेकांच्या अस्तित्वावर आपले अस्तित्व अवलंबून आहे याची यथार्थ जाण असणारे तिघे ट्रीपला जाणार होते.

गेले! सकाळीच नऊ वाजता गेले. खास एक गाडी केली होती. एवढेच काय माने आजोबाही गेले त्यांच्याबरोबर!

अनुने लाडीकपणे आग्रह करून करून महेशला आज सुट्टी घ्यायला सांगीतली होती. त्याने घेतलीही होती.

रोज रात्रीच्या तुटपुंज्या आणि श्री झोपायला इतरत्र गेल्याच्या उधारीवर मिळणारा सहवास आणि आजचा सहवास यात खूप फरक होता.

अनुने महेशला आज सकाळीच तृप्त करून सोडले होते. स्वयंपाकात आपले संपूर्ण कौशल्य वापरून जेवण केले होते. महेश आनंदाच्या शिखरावर होता.

दुपारी एकमेकांच्या मिठीत असताना बरोबर वेळ पाहून अनुने विषय काढला..

अनु - महेश... मला बोलायचंय रे तुझ्याशी... आपलं काही बोलणंच होत नाही...
महेश - बोल...
अनु - पाषाणला एक खूप मस्त अन इकॉनॉमिक स्कीम आहे...
महेश - कसली?
अनु - फ्लॅट्स..
महेश - हं...
अनु - बघायचं का जाऊन आज संध्याकाळी?
महेश - बघू की.... पण आत्ता घेणार कसे आपण फ्लॅट?
अनु - बूक करायचा रे नुसता... उडी मारल्याशिवाय काही होत नाही..
महेश - हप्ता किती बसेल याचा विचार तर केलाच पाहिजे ना?
अनु - .... बाबांशी बोललेय मी माझ्या...
महेश - .... काय?????
अनु - ते एक लाख द्यायला तयार आहेत...
महेश - तुझे बाबा???
अनु - हं..
महेश - का???
अनु - म्हणजे काय? आपल्या घरासाठी...
महेश - पण... आपण नाही का घेऊ शकत घर?
अनु - आपण कुठे घेऊ शकतोय?? ...
महेश - अगं आत्ता नाही.. पण पुढे मागे घेऊच की आपण??
अनु - मला इथे राहणे नकोसे झाले आहे महेश..
महेश - ... अनु.. असं काय म्हणतेस???
अनु - सगळ्यांना मी हक्काची वाटते.. या आजींना पॅरलिसीस झालाय... त्यांचं मीच बघयचं.. त्या पमाकाकू केव्हाही येऊन काहीही काम सांगतात... नंदा आत्या तशाच.. शीलाकाकू तशाच... माने आजोबा तर ठाण मांडूनच बसतात... सरळ म्हणतात... चहा टाक... मी काय राबायला आलीय का इथे फक्त? तू ऑफीसला गेलास की तू येईपर्यंत मला नको नको होतं रे...

अनुच्या स्वरांमधील लाडिकता, दु:ख, स्त्रीसुलभ अश्रूमिश्रीत आवाज आणि तिच्या सहवासाचा पसरलेला दरवळ...

सर्वांच्या एकत्रित परिणामाने काही क्षण महेशला फारच दु:ख झालं! त्याने तिला थोपटल्यावर तर ती त्याच्या कुशीत शिरून रडायलाच लागली. त्यामुळे तर महेशला फारच अपराधी फीलिंग आलं!

किंचित बदललेल्या महेशने तिला संध्याकाळी पाषाणला नेऊन आणले. गोवित्रीकरांनी एक लाख दिले तर प्रश्न बराचसा सुटणार होता. महेश अन श्री मिळून दिड लाख टाकू शकले असते. आणखीन चार लाखांचे लोन घेतले की साडे सहा लाखात दोन बेडरूम्सचा फ्लॅट झाला असता.

स्वप्न फारच गोंडस होते. विलोभनीय होते. त्यात बोलता बोलता अनुने 'आपल्याला बाळ झाले तर आणखीन जागेची गरज नाही का भासणार' असे उद्गार काढून तर महेशला सातव्याच आस्मानात पोचवले होते. आपण बाप बनू शकत आहोत आणि ती बातमी कोणत्याही क्षणी कळू शकते ही परिस्थिती त्याला अत्यंत सुखद वाटली होती.

महेश .. श्रीनिवास ... पेंढारकर... उर्फ.. गट्टू!

त्या दिवशी... किंचित दूर गेले आपल्या सर्व परिस्थितीपासून मनाने... त्यांच्यात बदल झाला..

आणि त्याला कारणीभूत रमाचे मरणे नव्हते, श्रीनिवासची गरीबी नव्हती, दास्ताने वाड्यातील सर्वांचे एकमेकांवर असलेले हक्कयुक्त प्रेम नव्हते, अनुचे लाडिक उद्गार नव्हते, गोवित्रीकरांचा आग्रह किंवा पैसा नव्हता, होऊ शकणार्‍या मुलाच्या आगमनाची ओढ नव्हती...

त्याला कारणीभूत होती तौलनिक परिस्थिती...

हाच विचार आपल्याबाबत आपल्या वडिलांनी केला असता... कायमचे आपल्या तारा मावशीकडे किंवा उषा आत्याकडे ठेवले असते, शाळेत घालायच्या ऐवजी बोर्डिंगमधे घातले असते... किंवा कदाचित... बायकोच्या मरणास कारणीभूत ठरल्याचा भयानक राग येऊन आपल्याला सांभाळलेच नसते... तर आपण अगतिक अवस्थेत कुणाकडे गेलो असतो??? हा विचार आत्ता मनात येऊ शकत नव्हता कारण आत्ता अगतिकता नव्हती.. आत्ता ताकद होती जवळ! आणि ही ताकद उपकारांची फेड उपकारांनी करावी या उक्तीची आठवणच होऊ देत नव्हती. आत्ता होता फक्त 'स्व'!

घरी यायच्या आधी फर्ग्युसन रोडवरील 'आम्रपाली' या पॉष हॉटेलमधील टेबलवर मेणबत्यांच्या प्रकाशात दोघांचेही स्वप्नील डोळे एकमेकांमधे मिसळले होते. फ्लॅट घ्यायचे जवळपास ठरलेले होते आज! उद्या बाबा आले की त्यांना विश्वासात घेऊन एक लाख रुपये मागायचे अन सरळ बुकींगचे पैसे भरून टाकायचे! आता सगळाच प्रश्न निकालात निघाल्यासारखे वाटत होते. त्यामुळे मने पिसासारखी तरंगू लागली होती. अनुच्या मादक डोळ्यांवर आता लज्जेचे हलकेसे आवरण विलसत होते. तिचे ते रमणीय भाव पाहून महेशलाही ओढ लागली होती जेवून कधी एकदा घरी जातो याची! कुजुबुजत बोलणे सुरू झाले.

महेश - जेवायला... हवंच आहे का?
अनु - .. म्हणजे?
महेश - घरी गेल्यावर रात्रभर पोट भरायचंच आहे की..

प्रश्नाचा रोख कळल्यामुळे सुखावलेली अनु लटक्या रागाने म्हणाली..

अनु - हं! रात्रभर.. उद्या कंपनीत काय माने आजोबा जाणार का?

खळखळून हासले दोघे! अनुचे हासणे त्या मंद प्रकाशात अधिकच मोहक दिसत होते. तिच्या डाव्या हाताच्या बोटांमधे आपल्या उजव्या हाताची बोटे गुंफवत महेश म्हणाला..

महेश - फ्लॅट घेतल्यावर तर काय? सगळं तुला हवं तसंच होणार....
अनु - ... काय?
महेश - पाहिजे तेव्हा मला तू जवळ घेणार...
अनु - .... काय???? नालायक?? तूच सोडत नाहीस... तुला नाही वाटतं वाटंत असं???

महेश हसत होता आणि अनुच्या नाकावर लटका राग आल्याने ते लालबुंद होऊ लागले होते.

भरपेट जेवून दोघे घरी आले आणि... लग्नानंतर आणि हनीमूननंतर पहिलिच अशी रात्र सुरू झाली की जिच्या आधीचा दिवसही तितकाच रम्य गेलेला होता...

आणि कधीतरी मध्यरात्री... एक दिड वाजता... दोघेही सुखाच्या परमोच्च पातळीवर असताना...

धाड धाड...

दार वाजले..

"म्हशा... ए म्हशा.. अरे झोपतो काय? दार उघड लेका... ए म्हशा..."

दचकून एकमेकांपासून बाजूला झाल्यावर महेशने अन अनुने आधी सर्व परिस्थिती व्यवस्थित केली अन मग महेशने दार उघडले..

भप्पकन दारूचा वास आत शिरला..

समीर - अरे एक हॉटेल उघडं नाही बाहेर... खायला आहे का रे काही?
महेश - ... दादा????

महेश अवाक झालेला होता. आतमध्ये अनुच्या डोळ्यांमधून अंगार बरसत होता.

महेश - .. दादा.. अरे... आत्ता.. आत्ता काहीच नाहीये रे...

समीर खूप जोरात हासला. त्याला भयंकर चढलेली होती.

समीर - च्यायला.. तू असं म्हणावंस?? काय दिवस आलेत राव?? ती बायको काय मखरात बसवायला आणलीयस काय? आं? उठ म्हंटलं की उठलं पाहिजे बायकांनी... सांग तिला जेवायला वाढायला..

भर वाड्यात असा अपमान झालेला पाहून त्वेषाने अनु दारात आली.

अनु - तुम्हाला लाज वाटत नाही का दारू पिऊन इथे यायला अन केव्हाही दार वाजवायला? स्वतः लग्न करा अन उठवत जा बायकोला.. पुन्हा माझ्या दारात तमाशा करायचा नाही.. निर्ल्लज्ज कुठले.. श्शी! काय माणसं आहेत इथे.. चला... चला चालते व्हा इथून..

समीर - ... ए.. भवाने... तोंड सांभाळ... हा तुझा नवराय ना नवरा... त्याला चड्डी घालता येत नव्हती तेव्हापासून मी त्याला खेळवलाय... काय समजलीस? तुझ्या माहेरचा थाट पाहिला लग्नात.. लेकाचा एक माणूस एका बापाचा वाटत नाही.. माझ्यासमोर तोंड सांभाळून बोलायचं...

आयुष्यात पहिल्यांदा... अक्षरशः पहिल्यांदा... मागचे पुढचे काहीही न आठवता...

गट्टू समीरदादावर ओरडला..

महेश - दादा.. माझ्या बायकोला वाटेल ते बोलायचे नाही.. जा तू इथून.. ही काय वेळ आहे का तुझी घरी यायची?? दारू पितोस तो पितोस.... आणि माझे लग्न आधी झाले म्हणून जळतोस??????

अवाक झालेला समीर लालबुंद डोळ्यांनी भिंतीचा आधार घेत महेशकडे कित्येक क्षण पाहात राहिला.

कित्येक क्षणांनी त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडले...

समीर - जळतो??? जळण्यासारखं आहे काय तुझ्यात??? एक छडमाड नोकरी.. अन ही फालतू छोकरी... चल फूट.. फूट.. दार लाव... मी राहीन उपाशी...

एकाचवेळेस दोन आवाज आले...

मावशी - समीर... इकडे ये... मी वाढलंय...

आणि एकेकाळी समीरच्या पाठीत काठीचा तडाखा देऊन स्वतःच्या मुलीला वाचवणारी शीलाकाकू खालून ओरडली...

शीलाकाकू - समीर... त्या नालायक मुलीच्या तोंडी लागू नकोस.. इकडे ये.. वाढलंय मी...

असल्या दारुड्याला आपला नवरा अगदी बरोब्बर बोलला असे वाटल्याने कौतुकाने महेशकडे पाहणार्‍या अनुला....

... भलतेच दृष्य दिसले...

रमाच्या फोटोच्या खालची भिंत आसवांनी ओली करून आपले डोके त्यावर आपटत ...

.... 'गट्टू... समीरदादाचा गट्टू' रडत होता...

गुलमोहर: 

मस्त....पुन्हा बेफिकिर टच....
बेफिकिरजी कितिहि भाग होऊ देत..आमच्यासाठी ते खासच असतील.

अप्रतिम बेफिकिर जी.....खरच रडवलत आज ही........
आणि या शिवाजींच्या 'मावळ्या'ला मोदक.... पहिला नंबर आला ना.....

फक्त अप्रतिम.......................................
शब्दच नाहीयेत................................

काहीही करून नैना आणि गट्टू ला एकत्र आणा हो.........
त्याशिवाय कादंबरी संपवू नका.......

plz ...............................

बेफिकिर, टायटल वाचुनच प्रतिसाद देत आहे, अहो काय हे? अम्हाला नविन आलेल्या बाबा चि गंमत वाचायलाच नाहि मिळालि :(. अहो १ जण म्हणतो आणि तुम्हि एकता, आनि बाकिच्यांना वार्‍यावर सोड्ता, हे काहि बर नाहि, अस मला वाट्त.

प्लिज अजुन फक्त १ भाग, सदानंद बाबा आणि वाडा वाचायला आवडेल, कारण खुप दिवसांनि हासायचा भाग आला होता(complete भाग, फक्त हसायचा :)).

प्लिज १ भाग करा ना,
माबोकर काय वाटतय?

खरच, खुप रडायला आल, आणि फ्फ्लॅट वाल्यांना काय कळणार वाडा संस्कति? अरे खरि आपुलकि तर तिथेंच असते, खुप वाईट वाचले वाचून,
कोणितरि तिला सांगा रेरेरेरेरे, कोणा कोणा साठै कोणि कोणि काय आणि काय केलय ते.............

>>बेफिकिरजी कितिहि भाग होऊ देत..आमच्यासाठी ते खासच असतील.

असेच .. भागांची काळजी नका करु, आम्ही वाचतोय Happy

रोहित,परेश, स्वप्नील, अनुमोदन!!!
बेफिकीर, आम्ही खरोखर कादंबरी खुप मनापासून एन्जॉय करतोय...कालचा भाग सुद्धा मला खरंतर अतिशय आवडला होता. परेश म्हणतायत तसा त्यावर अजून एखादा भाग नक्की चालला असता... एवढी वातावरण निर्मिती केली होतीत, तर एखादा भाग का नाही लिहिलात? कधी कधी अशा प्रतिक्रियांकडे दूर्लक्ष करत जा ना हो! Sad
आणि येऊ द्या अजून भरपूर भाग...प्लिज ते (अंतीम भागांपैकी पहिला) एडिट करुन काढून टाका....

Befikirji, pl. do not make this novel so short. I didn't mean by Sadanand's part that you should finish this novel. It's a human nature(for some people like me , I guess) to resist the changes (at least at my age Happy and "I was living"(really you make us part of the story) in "Dastane Vada" for so long with Shree, Karve, Pawar , Mane, Beri, Nigade etc. and then suddenly a new neighbour after so many yrs pops up so it was hard to accept him. Pl. write as many parts as you can because we all enjoy reading it.

ही कथा सगळ्याना आवडली. मला तर खुप भाग लेबर डे वीकेन्ड नन्तर एकदम वाचायला मिळाले. माफ करा, पण ज्याना आवडत नसेल त्यानी वाचु नये. ३० वा भाग छान होता. आता मलाही महेश- नैनाचा ट्रक नाही आवडला. पण लेखकाला स्वान्तत्र हे हवेच. उगीच ओरडा करुन कथा गुन्डाळायला लावु नका. बेफिकिर, तुम्ही छान फुलवा आणखी. महेश-अनु काय करतात बघु दे. प्लिज, ती कविता पुन्हा टाकता का. दुसरी कथा मात्र तयार ठेवा.गॅप नको वाचनात.

लग्न फार लवकर लावलंत बेफीकीर !

बाकी मस्त चालु आहे कादंबरी ......येवु दे !!!

पण एक खरं .....मला ना आताशा थोडं निराशावादी वाटायला लागलंय ....आता कदाचित .... गट्टु नवीन घर घेईल ...वडीलांना वृध्दाश्रमात पाठवेल ....पुढे मागे त्याला मुले होतील ...त्यांची निराळी कथा सुरु होईल ... ईकडे श्री मरुन जाईल ....पण ...पण ..

.आयुष्य चालत राहील ..ते कोणासाठीच थांबणार नाही .....असा काहीसा विचार मनात येतो मग सारं आयुष्यच प्रोग्रॅम्ड वाटायला लागंतं ....निरर्थक वाटायला लागंतं .........( अवांतर :आपण दासबोधातला तीसरा समास पहिले ५ दशक वाचलेत का हो कधी ????)

असो ......बघुया आपण कसा शेवट करता ते !!!

स्वप्नील, सानी आणि तृप्ती शी सहमत!

काही प्रतिक्रियांकडे दूर्लक्ष करत जा प्लीज!
>> प्लिज ते (अंतीम भागांपैकी पहिला) एडिट करुन काढून टाका....
सहमत,

खूप छान वाटत होत श्री च्या मनातील गोष्टी वाचताना.
पण तुम्ही आता त्यांना आणि आम्हाला पण रडवणार.

पण जर तुम्ही तसल्या काही प्रतिक्रियांकडे लक्षच देणार असाल तर शेवट सुखद व्हावा हीच रिक्वेस्ट. Sad

--अर्चना

बेफिकिरजी,
me aaplya sagalya kadambra vachalya aahet aani atishay guntavun thevanaare likhan aapan karatat.
ekach shanka, Anuradha lagna nantarhi job chalu thevanar ase baithkit zalelya bolanyatun vatate pan lagnanantar matra ti gharich aahe ase vatate? khoop mahtawacha mudda nahi, pan geli asati job var tar bakichyanna kami tras zala asata.

dhanyawad