श्रीनिवास पेंढारकर - एक बाप - क्रमशः - भाग ३०

Submitted by बेफ़िकीर on 13 September, 2010 - 05:17

नुसती धमाल चाललेली होती. रिसबूड या माणसामुळे दास्ताने वाडा पुण्याच्या इतिहासात निदान पितळाक्षरांनी तरी कोरला जाईल अशी परिस्थिती आलेली होती.

सदानंद रिसबुड! वय साठ! हा स्वतःला सदानंद महाराज म्हणवून घ्यायचा. निगड्यांच्या शेजारची कित्येक वर्षे एका विशिष्ट कारणाने रिकामी राहिलेली एक अत्यंत अंधारी अन दुर्लक्षित खोली या माणसाने दास्तान्यांकडून भाड्याने घेतली होती अन वाड्यात चर्चेला ऊत आला होता.

दास्तानेंनी मधेच येऊन निगड्यांना सांगीतले की उद्यापासून येथे एक जण राहायला येणार आहेत भाड्याने! खरे तर दास्तानेंना हे निगड्यांना सांगायची काहीच गरज नव्हती. निगडे एक भाडेकरू! दास्ताने वाड्याचे मालक! पण त्या खोलीबद्दल असलेल्या वदंतांमुळे दास्ताने वाड्यातील प्रत्येक खोलीचे भाडे शनिवार पेठेतील इतर वाड्यांच्या खोल्यांपेक्षा किमान वीस टक्के कमी यायचे.

भूत!

त्या खोलीत भूत आहे असा एक समज पसरलेला होता. पण ते का आहे, खरच आहे का आणि असे कसे काय आहे वगैरे प्रश्न इव्हन पिट्या अन श्रीलाही कधी पडलेले नव्हते. अभ्यंकर आजींनी म्हणे एका विधवेला तिथे भेसूर हासताना वाट्टेल तेव्हा पाहिलेले होते. प्रत्यक्ष भूत पाहिलेली एकमेव व्यक्ती हयात होती आज! पवार मावशींना भूत या संकल्पनेबद्दल काहीही कुतुहल नव्हते. कारण मुळातच त्यांच्या मते प्रत्येक हयात व्यक्ती ही हयात नसून ते त्या व्यक्तीचे भूतच होते. मानेकाकांना भूताची भीती वाटणे त्यांच्या यावेळच्या जन्ममृत्यूच्या फेर्‍यात तरी शक्य नव्हते. कारण भी आणि ती ही दोन अक्षरे सलग उच्चारणे ही बाब ते शिकलेलेच नव्हते. त्यांना भीती फक्त एकाच गोष्टीची वाटायची. ती म्हणजे त्यांचा सख्खा भाऊ जर मेला तर त्याची बायको 'उरलेली' सगळी इस्टेट हडप करेल. बाकी संपूर्ण विश्व हे त्यांना किरकोळ वाटायचे. 'भूत आहे काय? असूदेत की मग? बसेल आपले निवांत त्या खोलीत!' असे ते म्हणायचे.

प्रमिला, शीला असल्या 'कालच्या सुनांना' तर हा प्रकार कधी तरी दोन वर्षात एखादेवेळेस डिस्कस झाल्यामुळे कानांवर यायचा. पिट्या, मधू हे 'विधवा हासण्याच्या कालावधीत' अत्यंत लहान असल्यामुळे ते तर हल्ली तो विषय निघाला की हसायचेच! म्हणजे हसण्यावारी न्यायचे. किरण तर त्यांच्याहीपेक्षा खूपच लहान! तो तर थुंकायचाच त्या खोलीकडे बघून! घाटे काका अन घाटे काकू हे वरकरणी सात्विक वगैरे असल्यामुळे ते जरा हबकलेले असायचे. पण 'ती खोली' हा विषय फार फार पुर्वी 'डिस्कस होणे' थांबलेले असल्यामुळे त्यांना आता काहीच वाटायचे नाही. निगडे कुटुंबाच्या खोलीला लागूनच ती खोली होती. पण निगड्यांच्या अफाट लोकसंख्येमुळे निगडे कुटुंबियांना 'भूत आले तरी घाबरून धावत सुटेल' अशी खात्री वाटायची. चितळे आजोबा मात्र हयात असताना त्या खोलीकडे पाहून काही मंत्र वगैरे पुटपुटायचे. पण नेमकी ती खोली पुर्वेला असल्यामुळे बर्‍याच जणांना ते सूर्याची प्राथना करत आहेत असा भास व्हायचा. नंदा तशी जुनी होती. पण ती स्वभावाने फारच 'ठमी' होती. उजवा पाय आपटून 'भूत कसलं आलंय, निगड्यांचं रात्री बिनसलं की असले आवाज येतात' असं म्हणायची अन स्वतच तोंडाला (स्वतःचा) पदर लावून हसायची.

दास्ताने वाडा या खोलीला कधीच विसरला होता. पण... दास्ताने ती खोली विसरणे शक्यच नव्हते. कारण एक खोली फुकाफुकी बिनभाड्याची राहात होती वाड्यात! त्यामुळे ते अशा व्यक्तीच्या शोधात होते जिला भाड्याने खोली तर हवी आहे पण भूताची भीती वाटणार नाही.

सदानंद रिसबुड! हा माणूसही अशा खोलीच्या शोधात होता की जी भाड्याने तर मिळेल पण तो तेथे राहायला गेल्यावर त्याचे महत्व प्रचंड वाढेल.

आणि दोघांची काही ना काही कारणाने ओळख झाली अन करार झाला अन दास्तानेंनी येऊन निगड्यांना अत्यंत आनंदात सांगीतले की 'एक जण उद्यापासून येथे राहायला येणार आहेत'.

यावर निगडे काकूंनी काहीही प्रतिक्रिया जरी दर्शवली नसली तरी दास्तानेंचा पाय वाड्याच्या बाहेर पडताक्षणी त्यांनी बोंबलून वाडा जमा केला अन ही 'अघोरी' बातमी सांगीतली. आपापली कामे सोडून यच्चयावत वाडा तिथे बसला अन मानेकाकांनी मीटिंग घेतली.

मानेकाका - बंधुंनो आणि भगिनींनो, आपण सर्व दास्ताने वाड्याचे भाडेकरू! मालक दास्ताने! वाड्यातील कोणती खोली कुणाला भाड्याने द्यायची हा हक्क दास्तानेंनाच! त्यावर आपण अक्षर बोलू शकत नाही. मात्र ही जी एक विशिष्ट खोली आहे ती भारलेली आहे. त्यात झाड आहे असे मी पुर्वीपासून ऐकलेले आहे. रात्री बेरात्री भीषण किंकाळ्यांनी हा परिसर यापुर्वी अनेकदा हादरलेला आहे. खुद्द अभ्यंकर आजींनी एका भयानक बाईला त्या खोलीच्या दारात बसून भेसूर हासताना स्वतःच्या डोळ्यांनी कित्येकदा पाहिलेले आहे. ही बाई विशिष्ट वेळेलाच दिसेल असे नाही. ती दिसणे हे सर्वस्वी तिच्या स्वतःच्या मतावर अवलंबून आहे. या बाईवर मानवी योनीतल्या कोणाचेही नियंत्रण नाही. अगदी वाड्याचे मालक असूनही दास्तानेंचेही! या बाईने म्हणे आपण सर्व येथे राहायला येण्यापुर्वी त्याच खोलीत काही भीषण कृत्ये केलेली आहेत. त्यात खून, मंत्रतंत्र, करण्या, भानामती, चकवे, फुंकणे, बाहुल्या, रिंगण, हाडांची वाद्ये बनवणे, असे काही प्रकार समाविष्ट आहेत असे खात्रीलायकरीत्या समजते. या बाईला नाव नाही, गाव नाही. ती तिथेच का आहे याचे कोणतेही समर्थनीय स्पष्टीकरण दास्तानेंकडे नाही. ती जवळच असलेल्या ओंकारेश्वरामागे चालणार्‍या एखाद्या दशक्रियाविधींमधून स्वतः जात असताना मधेच पळून दास्ताने वाड्यात आलेली असावी व मोघे गुरुजींना याचा पत्ताच लागलेला नसावा असा एक शास्त्रीय सिद्धांत काही जुन्यांनी पुर्वी मांडलेला होता. मोघेही हल्ली विधी सांगताना झोपतात हा एक वेगळा विषय आहे. त्यामुळे प्रेताभोवती फिरणारे आत्मे तिष्ठत असतात व त्यातील काहींना मोघेंची झोप व त्यामुळे होणारा विलंब असह्य झाल्यास ते पुण्यातील काही वास्तूंमधे स्थलांतरित होतात यावर दुमत असण्याचे कारण नाही. मला एखाद्या माणसाने भूत होण्यात व्यक्तीशः हरकत घेण्यासारखे काहीही वाटत नाही. (हे वाक्य मावशींकडे बघत!) पण म्हणून रात्री बेरात्री अभद्र किंकाळ्या फोडणे, स्त्रिया, लहान मुले यांचे जिणे मुश्कील करणे, एखादे झाड धरणे हे प्रकार बिनबोभाटपणे करणार्‍या भुतांविरुद्ध मोहीम ही आखायलाच हवी. समोरच वीराचा मारुती आहे. तोही मूग गिळून गप्प बसलेला आहे. शंकरासमोर मारुती काय करणार म्हणा? शंकर लेव्हलने रामाच्या, म्हणजे विष्णूच्या तोडीचाच आहे. अशा भयानक अवस्थेत आपण एकजूट दाखवणे आवश्यक आहे. यावर मतभिन्नता नसणार हे आजवरचा इतिहास पाहता म्हणावेसे वाटते. आपण एक शिष्टमंडळ स्थापन करू व आत्ताच्या आत्ता दास्तानेंना भेटून येऊ व आपले निषेधपत्रक त्यांच्या हातात देऊ! या खोलीला पुन्हा उर्जितावस्था आणण्यात दास्तानेंचा काही वाईट हेतू आहे असे आपल्या कुणालाच वाटत नाही. मात्र तसे केल्याने वाड्यातील समाजमनावर जे विकृत परिणाम होतील त्याची जबाबदारी आहे तरी कुणाची? मालक म्हणून त्यांचीच! तेव्हा आपण या खोलीत भाडेकरू आणण्यास विरोध करण्यासाठी आपल्यातीलच एक समीती नेमू असे माझे आवाहन आहे. आता या समीतीत कोण असावे हे मधूसूदन व श्रानिवास यांनी ठरवावे असे म्हणून मी माझे दोन शब्द संपवतो.

येथे टाळ्या वाजल्या. 'असे म्हणून मी माझे दोन किंवा चार शब्द संपवतो' असे स्मशानात जरी कुणी म्हणाले तरी नुकत्याच जाळलेल्या प्रेतांसकट सगळे टाळ्या वाजवतात असा एक शुद्ध पुणेकर म्हणून पुण्याबाबत माझा सिद्धांत आहे.

मधू अन श्रीपुढे भयानक प्रश्न निर्माण झाला. सगळेच त्यांच्या तोंडाकडे बघत होते. हे ज्यांची नावे घेतील ते खुष अन बाकीचे भांडणार हे निश्चीत होते. त्यामुळे दोघांना टेन्शन आलेले होते. पवार मावशींचे नाव समीतीत घालणे अशक्य होते. कारण त्यांना वर्षभरापुर्वी आलेल्या पॅरॅलिसिसच्या झटक्यात त्यांचा डावा हात लुळा पडलेला होता आणि आता पुर्वीची सर्व दुष्मनी विसरून निगडेकाकू दिवस दिवस पवार मावशींच्या घरात त्यांच्या मदतीसाठी राबत होत्या. 'वयं पंचाधिकं शतम' या उक्तीला सर्वोत्कृष्ठ न्याय जर जगात कुठे मिळत असेल तर तो दास्ताने वाड्यात! प्रमिला, शीला अन नंदा थक्क होऊन निगडे काकूंचे पावशींवरचे प्रेम बघायच्या. या तिघींनी खरे तर 'मावशींची जबाबदारी आम्ही घेऊ' असे सर्वांना सांगीतले होते. पण निगडे काकू असताना काही करावे लागले तर जबाबदारी घेणार ना? आजवर लोकसंख्या वाढीस जबाबदार म्हणून पवार मावशींनी केलेली हेटाळणी पदोपदी सहन करणार्‍या निगडे काकुंनी इतके केले, इतके केले की पवार मावशींसारखी बाई हॉस्पीटलमधून परत आल्याच्या पाचव्याच दिवशी रडत रडत स्वतःच म्हणाली सर्वांदेखत...

पवार मावशी - या निगडीणीला किती बोलले मी... माझी जीभ झडो या डाव्या हाताबरोबर.. ही धरणी माता मला पोटात घेवो... लाज वाटते हिच्याकडून सगळं करून घ्यायची...

आणि त्यावर निगडे काकू म्हणाल्या...

निगडेकाकू - का हो मावशी? लाज वाटते ना? मग माझ्या विनायकच्या आजारात रात्रीचा दिवस अन दिवसाची रात्र करताना मला नसेल का लाज वाटत?

होय! त्या दिवशी पवार मावशी पडल्या आणि त्यांचा डावा हात लुळा पडला. त्यावर काहीही इलाज नसूनही निगडे काकू रोज मसाज करायला यायच्या. दिवसभर मावशींकडेच बसायच्या. पाच दिवस रुग्णालयात होत्या मावशी! अख्खा दास्ताने वाडा सतत फेर्‍या मारत होता. मानेकाका तर अक्षर बोलत नव्हते कुणाशीही! सतत हॉस्पीटलच्या लॉबीत बसून राहायचे. नंदा किंवा शीला रात्रीच्या झोपायला असायच्या तेव्हाही मानेकाका खाली बसूनच डुलक्या घ्यायचे. दिवसा प्रमिला आणि घाटे काकू असायच्या. निगडे काकू तेव्हा नुसत्याच येऊन जाऊन असायच्या. पण मावशी वाड्यात परत आल्यावर मात्र त्यांच्या सेवेचे सर्वाधिकार निगडे काकुंनी घेतले अन सगळे बघतच राहिले. श्रीनिवासनेही सहा महिने अक्षरशः मुलासारखी सेवा केली मावशींची! महेशलाही चैन पडायची नाही. दिवसातून किमान तीन वेळा तो आजीची चौकशी करून यायचा. मावशींना आता स्वयंपाक जमायचा नाही. तीही जबाबदारी प्रमिला, श्रीनिवास आणि निगडे काकूंनी पंचवीस, पंचवीस व पन्नास टक्के अशी विभागून घेतलेली होती.

श्रीनिवासला समजलेले होते. आजवर या माउलीने आपल्या बाळाला लहानाचे मोठे करण्यापर्यंत सगळे सगळे केले. आता आपल्या कर्तव्याची सुरुवात झालेली आहे. त्याने महेशलाही समजावून सांगीतले होते. आजी ही यापुढे आपल्या दोघांची जबाबदारी आहे. पण सौ. निगडेकाकू या साधारण समवयीन स्त्रीने बहुतांशी जबाबदारी उचलल्यामुळे या दोघांना तितके खरे तर पडतच नव्हते. आता दिवस दिवस मावशी अन निगडे काकू गप्पा मारायच्या. पण स्वभाव तो स्वभाव! आजही कित्येकदा काही चुकले बिकले तर मावशी निगडे काकुंना अशा काही बोलायच्या की निगडे काकुंच्या जागी दुसरी कुणी असती तर पळूनच गेली असती. मावशींच्या स्वभावात उलट वाढच झाली होती. डाव्या हातातील सर्व गेलेली शक्ती जिभेला मिळालेली होती. त्या आणखीनच चिडक्या झालेल्या होत्या. पण निगडीण बाईवर रागावल्यानंतर दोन एक तासांनी त्या पुन्हा तिला 'चुकले मी' म्हणायच्या. निगडे काकू मुळी त्यांच्या रागावण्याकडे लक्षच द्यायच्या नाहीत. स्वतः निगडे कित्येकवेळा मावशींसाठी काही ना काही घेऊन यायचे. तसे तर काय? आता वाड्यातील सगळेच त्यांच्यासाठी झटतही होते अन त्यांच्या शिव्याही खात होते.

राजश्री सासरी सुखात होती. पण खरी मजा नैनाची होती. समीरदादाने भरलेल्या दमाची मात्रा इतकी लागू पडली होती की साध्या साध्या कार्यक्रमालाही आता कर्व्यांना आमंत्रण यायचे नैनाच्या सासरहून! पण नैना गर्वाने फुगली नव्हती. उलट अजूनही ती कुसूमचा डबा भर, तिच्या ड्रेसला इस्त्री कर हे सगळे करत होती. पण नैनाच्या त्या आत्मीयतेच्या वागण्याने सासरच्या लोकांमधे थोडासा बदल झाला होता. समीरच्या भीतीमुळे थोडा अन तिच्या वागण्यामुळे थोडा! आणि मुख्य म्हणजे नैनाला मुलगा झाला आणि त्याचे 'दुसरे' नाव तिने कमल ठेवले होते. कुणालाही समजले नसेल तरी महेशला ते समजले होते. मुलाचे नाव कसे काय कमल? असा प्रश्न इतर जण विचारत असताना त्याला तो 'सागर' मधला कमल हासन म्हणून 'कमल' आहे हे माहीत होते. नैनाच्या सर्व चिठ्ठ्या आणि रुमाल त्याने अजून जपून ठेवलेले होते. त्याला वाटायचे की त्या रुमालाला अजूनही तिचा सुगंध येतो.

किरणनेही एक मुलगी बघितलेली होती. त्याचे लग्न सहा महिन्यांनी होते.

कोमल साने प्रेग्नंट होती. पण ते दोघे काही महिन्यांनी जागा सोडून जाणार होते. कारण त्यांचा फ्लॅट तोपर्यंत तयार होणार होता.

या वर्षात झालेली एक दु:खद व त्याचवेळेस सुखद घटना म्हणजे समीरने महाविद्यालयीन शिक्षणाला शेवटच्या वर्षात असताना रामराम ठोकल्याबद्दल सगळ्यांच्या शिव्या खाणे मात्र त्याचेवेळेस चक्क स्वतः काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन भरवून त्यातून सुप्रसिद्ध होऊन आता प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणून नाव कमावणे! हा चमत्कार वर्षभरात झाल्यामुळे मधूसूदन अन प्रमिला आता अभिमानाने वाड्यात फिरत होते. कारण एक दोनदा समीर कर्वे हे नाव पेपरातही छापून आले होते अन आता वाड्यात काही 'चित्रांचे कंत्राट देणारे' अशा लोकांची हळूहळू आवक जावक होऊ लागली होती. पुस्तकांवर मुखप्रुष्ठासाठी लागणारी चित्रे, काही फ्रेम्ससाठी लागणारी चित्रे वगैरे चित्रांची मागणी यायला लागली होती आणि कोणताही कोर्स न करता या दिव्य रत्नाने हे यश कसे काय कमावले यावर लुळा पडलेला डावा हातही मावशी तोंडाला लावायला लागल्या होत्या. पण समीर स्वभावाने अजून तसाच होता. रोखठोक! जे पटेल ते करायचे अन जे बोलू तेच करायचे! दमदाटी करण्यात त्याचा आत हातखंडा झालेला होता. स्वतःही तालमीत जात असल्यामु़ळे तिथले मित्रही भरपूर झाले होते अन शरीरही दणकट होत होते. समीर आता राजबिंडा दिसायला लागला होता. त्याचे पुरुषी सौंदर्य पाहून काहीवेळा प्रमिलालाही खुषी व्हायची. किती मोठा झाला आपला मुलगा! किती स्मार्ट दिसतो. पण तो भरपूर प्यायला लागला होता. त्यामुळे बरेचदा मधूच्या शिव्याही खायचा अन बरेचदा मित्राकडे वगैरेच झोपायचा. महेशशी दोस्ती अजून तशीच होती, खरे तर अधिक गहिरी झालेली होती. पण त्याचे पिणे लक्षात घेऊन महेश आता किंचित लांब राहायला लागला होता.

महेशने इंजिनियरिंगची शेवटची परिक्षा दिलेली होती. या निकालानंतर नोकरी सुरू करायची होती. आत्तापासूनच तो टेल्को, बजाज, बजाज टेम्पो, रस्टन अशा ठिकाणी अर्ज करू लागलेला होता.

श्री अजूनही मिश्राच्या स्कूटरवरून सुंदर ऑटोत जाय येत होता आणि व्यवस्थित जम बसल्यामुळे किर्लोस्करला विसरूनही गेलेला होता. स्वाती मात्र अधेमधे भेटायची! कधी रस्त्यात तर कधी घरी यायची.

आणि हे सगळे चाललेले असताना अचानक न्यूज मिळाली. 'भूत का कमरा ऑक्यूपाय होने वाला है'!

आणि या मीटिंगमधे समीती नेमायची भूताहून भयानक जबाबदारी पडल्यामुळे श्री अन मधू हवालदिल झालेले होते.

मधू - आम्ही काय ठरवणार? तुम्ही मोठे आहात, तुम्हीच सांगा...
श्री - तेच ना..
माने - अरे बोला ना पटापट..
नंदा - मी सांगते..
माने - बर चल तू सांग...
नंदा - समीती तीन जणांची असावी...
माने - अगं आधी नावं सांग... वादाचा मुद्दा तो आहे..
नंदा - सौ. घाटे..
घाटे काकू - छ्छे: ! .... मी नाही हं येणार यात?
नंदा - सौ. घाटेंऐवजी स्वतः अभ्यंकर आजी.. कारण त्यांनी ती बाई पाहिलेली आहे..
अभ्यंकर आजी - पाहिली आहे म्हणजे काय? ही अशी पाहिलीय...
माने काका - अजून?
नंदा - हा मधू...
मधू - ... म्मी????
नंदा - का?
मधू - मी कशाला?
नंदा - समीतीत आहेस तू... आणि किरण..
किरण - मी?
श्रीनिवास - ठरले.. आजी, मधू अन किरण..
पवार मावशी - माझा या प्रस्तावाला दुर्दम्य विरोध आहे...

झालं! बोंबललं! विरोध आहे म्हंटले की भांडणे सुरू होणार. आणि त्यात मावशींचा विरोध आहे म्हंटल्यावर तर कुणी मधेच पडणार नाही. हा विचार करून मानेकाका म्हणाले..

मानेकाका - तुझ्यामते काय समीती असावी ते सांग.. तीच फायनल..
मावशी - मी अध्यक्ष!
मानेकाका - पुढे?
मावशी - ही अभ्यंकर थेरडी उपाध्यक्ष!
मानेकाका - पुढे?
मावशी - अन ही पांढरी पाल कार्यकारी अधिकारी...
मानेकाका - वाड्यात पांढरी पाल कोण आहे?

मानेकाकांचा हा प्रश्न अनाठायी होता. मावशी सटकल्या.

मावशी - तुझी आई आहे... म्हणे पांढरी पाल कोण आहे.. ही दिसत नाही का प्रमिटली?? नटून फिरते या वयात ती? मुलाचं लग्न व्हायची वेळ आली... अजून याच गजरे माळतायत... नालायक कुठली! चाळ बांध पायात आता... वय माझं छप्पन्नं तरी चालू उत्पन्नं??

प्रमिलाने काल रात्री प्रेमाने आणून दिलेल्या काकडीच्या कोशिंबिरीत मीठ कमी पडल्यामुळे तिला आत्ता शिव्या खाव्या लागत होत्या. आणि त्याचे कुणालाही काहीही वाटत नव्हते. एक शीला आणि दुसरी कोमल सोडून! शीलाला अजूनही मावशींचा धसकाच बसलेला होता. आणि कोमलला तर आयुष्यात कधीच मावशी ही बाई समजणे शक्य नव्हते.

मानेकाका - बर मग तुम्ही तिघी जाताय का दास्तानेंकडे?
मावशी - टांगा लागेल..
मानेकाका - टांग्याचा जमाना गेला..
मावशी - मग रिक्षा आण..
मानेकाका - रिक्षा??
मावशी - कर्वेरोडला राहतो तो मांत्रिक..
मानेकाका - कोण मांत्रिक?
मावशी - दास्तान्या..
मानेकाका - रिक्षेचे पैसे कोण देणार?
मावशी - वर्गणी काढा... तोंड वर करून मला विचारू नकोस... अध्यक्ष आहे मी...
मानेकाका - किती होईल रे मधू रिक्षेचं?
मधू - होतील की बारा रुपये..
मावशी - यायचे जायचे दोन्ही वेळचे...
कुमार - व्हॉट इज द डिस्कशन अ‍ॅक्च्युअली?
मावशी - ए झग्यातल्या.. तोंड बंद ठेव... बायकोला लागले डोहाळे अन नवर्‍याला इंग्रजीतुन उमाळे??
कुमार - व्हाय डझ शी ऑल्वेज फाइट विथ एव्हरीवन??
मावशी - ए माने... या बाटलेल्या बामणांना मधे बोलू दिलंस तर उधळलेला बैल सोडीन वाड्यात..
माने - तू त्यांच्यावर चिडू नकोस... वाड्यातील प्रत्येकाला बोलायचा हक्क आहे..
मावशी - शिंग उगारतो साने अन शेपूट घालतो माने...
प्रमिला - तुम्ही रागावू नका... प्रश्न वेगळाच चाललाय..
मावशी - कोशिंबीर कशी करतात शिकवलं नाही का माहेरी? मला सांगतीय..
मानेकाका - ठीक आहे.. किरण? रिक्षा बोलाव...
किरण - निषेधपत्र लिहीलंय का पण?
मानेकाका - अक्षर कुणाचं चांगलंय?
मावशी - हस्ताक्षराची स्पर्धाय का ती? काही पत्रं बित्रं नकोय... काय बोलायचं ते मी बोलेन..
गणेश बेरी - उधळलेला बैल वाड्यात आणताच कसा येईल?
मावशी - ए बेरणे... या नतद्रष्टाला वेळेसच आवर... नाहीतर उलटा टांगीन त्याला...
माने काका - तू काय बोलणार आहेस त्यांच्याशी?
मावशी - बोलणार? बोलतीय कसली? गचांडी धरणार त्याची अन खोली द्यायची नाही सांगणार...
अभ्यंकर आजी - माझं काय म्हणणं आहे ऐकतंय का पण कुणी?
शीला - काय?
अभ्यंकर आजी - ती जी विधवा आहे तिला मी तीनवेळा बघितलंय आजवर...
माने - मग?
अभ्यंकर आजी - भूत बघण्याचा सर्वात अधिक अनुभव मला आहे..
माने - मग?
अभ्यंकर आजी - अध्यक्ष मी व्हायला पाहिजे...
मावशी - आम्ही तुला बघतोय ना पण रोज! त्याचं काय?
अभ्यंकर आजी - म्हणजे????
मावशी - यायचं तर उपाध्यक्ष म्हणून ये... नाहीतर बस जप करत...

शेवटी प्रचंड गदारोळानंतर तिघी रिक्षेत बसून निघाल्या. प्रमिला चाचरून कशीबशी बसली होती. अभ्यंकर आजी उदासपणे जप करत बसल्या होत्या. आणि पवार मावशी कित्येक दिवसांनंतर रिक्षेत बसल्यामुळे रिक्षेवाल्याला 'या व्यवसायात पडल्याचा पश्चात्ताप होईल' याची खातरजमा करत होत्या.

"कर्वे रोडला जायला नारायण पेठेतून रस्ता नाही का रे शुंभा? आं? बालगंधर्ववरून न्यायला जक्कलची तिरडीय का ही? खड्यातून जाताना हळू नाही करता येत? भाड्याने आणली रिक्षा, आम्हालाच झाली शिक्षा?? हळू ....हळू! तो समोरचा सायकलवाला सरळ उलटा येताना दिसून वाट्टेल तसा चालवतोस? रिक्षाय का चेतक घोडा? एक पैसा देणार नाही मी! घरी आई बहिणी नाहीत? मागे वळून बघतोस ते? काही अब्रूच नाही राहिलेली हल्ली बायकांची! हे मीटर आहे का घड्याळ? पुढे बघ?? उजवीकडे वळायचंय... नाहीतर जाशील पुन्हा लकडी पुलावरून दास्ताने वाड्यात! माझा डावा हात नसला तरी उजव्या हाताने झिंज्या खेचेन मी! नुसते गोल गोल फिरायला वाड्यात पैशाचं झाड नाहीये आमच्या... "

पुण्यातील रिक्षेवाल्यांचा एक कंबाईंन्ड असा स्वभाव असतो. मात्र हा रिक्षेवाला तुलनेने नवा असावा. तो इतका भीषण आवाज ऐकून काहीही न बोलता आपला स्वप्ननगरीपाशी जाऊन थांबला..

"साडे अकरा"

"मोंगलाई वाटली का? दहा रुपये घे अन निमूट निघ.. बालगंधर्ववरून आणलंस... पुणे दर्शन नाही करायचंय... चल चल.."

त्याच्याकडे ढुंकूनही न बघता मावशी सरळ स्वप्ननगरी इमारतीत गेल्या अन हबकलेल्या अभ्यंकर आजी अन प्रमिला मागून तुरूतुरू आल्या. रिक्षेवाला अवाक होऊन निघून गेला.

"स्वतः कसा श्रीमंतीत राहतो बघ हा नालायक दास्ताने!"

हे वाक्य मावशींनी दास्तानेंच्या फ्लॅटची बेल दाबल्यावर उच्चारल्यामुळे प्रमिला आणि आजींना आधीच तेथून काढता पाय घ्यावा असे वाटू लागले. दास्तानेंच्या बायकोने दार उघडले. ती असेल पन्नाशीची! वाड्यातल्या सगळ्यांना ओळखायची. हसतमुखाने "या" म्हणाली.

मावशी - आलोच आहोत.. या काय या? कुठे आहेत यजमान?
सौ. दास्ताने - बोलावते...

हादरून ती बाई आत गेली. आज मावशींचा मूड भयंकर दिसत आहे एवढेच नवर्‍याला सांगून ती चहा टाकायला स्वयंपाकघरात धावली. तातडीने दास्ताने आले. त्यांना वाड्याचे मालक असल्याने मावशींची भीती खरे तर काहीच नव्हती. पण मावशींच्या आवाजामुळे कुणीतरी सोसायटीत आपली तक्रार करेल अशी भीती होती. दास्ताने हा एकच पुरुष असा होता जो मावशींना ज्ञात असूनही त्या त्याचा उल्लेख 'तो थेरडा' वगैरे निदान त्याच्यासमोर तरी करायच्या नाहीत. त्याचे एकच कारण होते. उद्या 'जागा सोडा' म्हणाला तर या वयात जायचे कुठे??

दास्ताने - अरे? नमस्कार नमस्कार! या या.. बसा...

सगळ्याजणी बसल्यावर दास्तानेने बिचकून एकदा मावशींचा मूड पाहिला. मावशींची नजर घरावरून फिरत होती. हा माणूस आपल्याकडून भाडे घेऊनच एवढा श्रीमंत झालेला आहे हे त्यांचे जुने गृहीत होते.

दास्ताने - काय म्हणताय मावशी?
मावशी - तो भगत आला नाही पाहिजे वाड्यात..
दास्ताने - भगत???
मावशी - तो कोण येणार आहे त्या खोलीत उद्यापासून तो... मुलं बाळं असतात वाड्यात..
दास्ताने - रिसबुड?
मावशी - रिसबुड असो नाही तर बिनबुड.. तो येता कामा नये राहायला..
दास्ताने - ... का???
मावशी - तो मांत्रिक आहे..
दास्ताने - रिसबुड मांत्रिक आहे?
मावशी - होय.. तो करण्या करेल आमच्यावर...
दास्ताने - ह्यॅ! काहीतरी काय?

आपण 'तुम्ही कोण मला सांगणार्‍या' असे म्हणू शकतो हेच दास्तानेंना आठवत नव्हते.

मावशी - आम्हाला सगळ्यांना माहीत आहे..
दास्ताने - अहो तो संत माणूस आहे... सदानंद महाराज आहेत ते...
मावशी - त्या खोलीत भुतानंद महाराज आहेत.. ते त्याला मारतील अन त्या सदानंद महाराजाचे भूत होईल....
दास्ताने- छे हो... ए.. अगं ... चहा टाक.. मावशी आल्या आहेत..
सौ. दास्ताने - टाकलाय...
मावशी - चहा बिहा नकोय.. काय ठरलं तुमचं?
दास्ताने - अहो कर्वे वहिनी.. तुम्ही सांगा ना यांना.. तो माणूस उलटी भुतं काढतो...
मावशी - उलटी भुतं काढतो म्हणजे?
दास्ताने - उलटी भुतं नाहीत... भुतं काढतो तो..
अभ्यंकर आजी - असाही एक माणूस पाहिजेच वाड्यात नाही का गं पमे?
मावशी - ए .. तू गप्प बस... भुतं काढणारा अन भुतं भरणारा कुणीच नकोय वाड्यात..
दास्ताने - अहो पवार मावशी.. मी माझी खोली किती दिवस बंद ठेवायची?
मावशी - त्या खोलीत भूत आहे.. या म्हातारीने पाहिलंय कित्येकदा..
दास्ताने - नाही हो.. तिथे वावर उरू झाला की ती खोली उजळेल..
मावशी - काही उजळत नाही..
दास्ताने - चहा घ्या..
मावशी - काय ठरलं ते आधी सांगा...

आता दास्ताने चिडले. इतका वेळ आपण का चिडत नव्हतो तेच त्यांना समजलं नाही.

दास्ताने - हे पहा... इतकं निकरावर येऊन बोलणार असाल तर मीही जरा स्पष्टच बोलतो.. त्या खोलीचं मला महिना सहाशे भाडं मिळणार आहे.. तुमच्या आग्रहाखातर ती खोली बंद ठेवायची असेल तर तुम्ही तिघी प्रत्येकी दोन दोनशे देणार आहात का महिन्याचे अ‍ॅडिशनल?

अभ्यंकर आजी - छे! मला आहे तेच भाडं परवडत नाही...
प्रमिला - दोनशे... एकतर दोनशे म्हणजे फार आणि... आम्ही कसे काय देणार?
दास्ताने - मग? मी काय म्हणून खोली बंद करायची? भूत बित काही नाहीये तिथे...

दास्ताने दोनशे रुपये महिना असा चक्रव्यूह टाकल्यामुळे मावशींची बोलती बंद झाली होती. त्या अत्यंत निराश चेहर्‍याने चहा पिऊन उठल्या. पण स्वभावाप्रमाणे एक वाक्य ऐकवून गेल्याच दास्तानेंना!

"त्या माणसाने कोणतेही अघोरी, भयानक प्रकार केल्याचे मला समजले तर तुमच्याविरुद्ध तक्रार करेन मी"

आता ही बाई एवढी मोठी, एवढी जुनी भाडेकरू! त्यामुळे दास्तानेंनी ते मनावर घेतले नाही. त्यांना मावशिंचा स्वभाव माहीत होता. पेंढारकरांच्या मिसेस गेल्यानंतर त्यांच्या मुलाचे अगदी तान्हा असल्यापासून सगळे या बाईने केले आहे हे त्यांना माहीत होते. त्यांच्या मते याचाच अर्थ ही बाई मनाने चांगली होती. तस्च, तिचा अन त्यांचा भाडे वसूल करणे याशिवाय काही संबंधच यायचा नाही. त्यामुळे त्यांनी मावशिंशी स्वतःच्या फ्लॅटमधे भांडण वाढवूच दिले नाही.

आणि निराश मनाने आलेल्या त्रिसदस्यीय समीतीचा वृत्तांत ऐकून सदानंद रिसबुड हा माणूस येणारच याची दास्ताने वाड्यातील सर्वांना खात्री पटली आणि चोवीस तास उलटायच्या आत.. म्हणजे दुसर्‍या दिवशी सकाळी सात वाजताच केवळ एक लंगोटी नेसून, अंगाला भस्म लावून आणि हातात एक कमंडलू, पायात खडावा आणि दुसर्‍या हातात पोथ्या व काही कपडे असलेली एक झोळी घेऊन तोंडाने 'जय चंडिकामाता'चा उच्चारवाने जयघोष करत एक गृहस्थ बिनदिक्कत वाड्यात प्रवेशला व दास्ताने वाडा दचकला.

हे असे अर्धनग्न म्हणण्यापेक्षा पाऊणशे टक्के नग्न सोंग इथे राहायला लागले तर पोरीबाळींना वावरायचे कसे हा प्रश्न सगळ्यांनाच पडला. त्यातच पहिलं घर नंदाचं! नंदाचं अन त्या माणसाचं वय साधारण एकंच! पण तो म्हणाला...

"बालिके... निगडे आडनावाचे कुणी वास्तव्यास असतात त्यांच्या पावन व मंगल वास्तूला लागून असलेली वास्तू चंडिकेच्या या भक्ताला त्याच्या क्षुल्लक भक्तीमुळे आशीर्वाद म्हणून लाभलेली आहे... ती कुठे आहे ते सांगून पथ दिग्दर्शन करण्याइतके मनाचे मोठेपण दाखवशील काय?"

नंदा आतच पळाली. ते पाहून शीला अन प्रमिलाही आत पळाल्या. मावशी मात्र वरून डोळे प्रचंड वटारून बघत होत्या. पण महाराजांना समोर घाटे दिसले...

"मृगाला पारधी दिसावा तशा या बालिका धावल्या आपापल्या वास्तूत... प्रिय बाळ, तू सांगशील काय?"

घाटे - क... काय... काय सांगू?
महाराज - चंडिकेच्या या नादान भक्ताची सोय कुठे करण्यात आली असावी?
घाटे - कोण चंडिका...

खेळणे म्हणून मिळालेला बाजा कॅडबरी समजून खाऊ पाहणार्‍या वर्षाच्या बालकाकडे पाहून क्षमाशील हसावे तसे हसत महाराज म्हणाले..

महाराज - कोण चंडिका... चंडिका तुझी आई.. माझी आई.. या धावणार्‍या बालिकांची आई...
घाटे - पुढे व्हा...

घाटेंना हा सकाळीच आलेला भिकारी वाटला.

महाराज - येथून मला हाकलून देणे हे जरी तुझ्या हातात असले तरी चंडिकेच्या मनात ते नाही..
घाटे - अहो मानेकाका.. हे बघा हे कोण..जात नाहीयेत...

मानेकाका आपल्या खोलीतून बाहेर आले अन ते ध्यान पाहून हादरलेच! तावातावाने खाली धावत आले अन म्हणाले...

मानेकाका - काय हो? बायामाणसं असतात इथे... ही काय तुमची वाड्यात येण्याची पद्धत आहे? चला व्हा बाहेर.. पुन्हा येऊ नका..

महाराज - क्षुद्र पाडसा... येथील एक यक:श्चित आसरा माता चंडिकेने आम्हाला प्रदान केलेल्या काही नाण्यांच्या बदल्यात आम्ही भाड्याने घेतलेला आहे...

या संपूर्ण वाक्यातला 'भाड्याने घेतलेला आहे' हा तीन शब्दांचा भाग मानेंना समजला व त्याची लिंक त्यांनी बरोब्बर काल झालेल्या मीटिंगमधल्या विषयाशी लावली. हा माणूस कोण असणार हे त्यांना समजले.

मानेकाका - अच्छा! ... तुम्हीच रिसबुड काय?

पुन्हा क्षमाशील हसत महाराज म्हणाले.

महाराज - रिसबुड, सामक, कुलकर्णी, गजेंद्रगडकर, औरंगाबादकर, वगैरे सर्व सामान्य आयुष्यात परिचयापुरती घ्यावी लागणारी नावे आहेत मूढा...
मानेकाका - आपण नवीन भाडेकरू आहात का?

महाराज कोणत्याही प्रश्नाला सरळ उत्तर देण्याच्या विरोधात होते.

महाराज - मी फार जुना भाडेकरू या विश्वाचा...
मानेकाका - (किंचाळून) अहो दास्ताने वाड्यात नवीन आहात का?

आता सगळेच भोवताली जमले होते. गणेश बेरी खुसखुसून हसत होता. त्याच्यामते अशा अवस्थेत एक माणूस बिनदिक्कत फिरतो हा एक मोठाच विनोद होता. मावशी मात्र अजून वरूनच पाहात होत्या.

महाराज - होय ... आमचे निवास कुठे आहे?
मानेकाका - तुम्ही हे असे वाड्यात फिरत जाऊ नका..
महाराज - आम्ही फिरणारच नाही आहोत ... वाडाच फिरणार आहे आमच्याभोवती...
मानेकाका - म्हणजे?
महाराज - आम्ही या वाड्यातून पिशाच्चाला घालवण्याची आज्ञा चंडिकेकडून घेऊन आलो आहोत... यापुढे ही वास्तू पावन होईल, मंगल होईल, येथे सर्व शुभ होईल, सनया वाजतील, वेली फुलतील, मोर नाचतील, पोपट बोलतील, हरणे धावतील, गाई दूध देऊ लागतील, फुले उमलतील..

रिसबुडांना आदल्या दिवशी घाईघाईत भेटून दास्तानेंनी 'भुताची खोली' हे प्रकरण नीट समजावून सांगीतलेले होते व कोणता पावित्रा घ्यायचा हे रिसबुडांचे ठरलेले होते. त्याचा नीट वापर करून महाराजांनी हातातील भस्म सर्वत्र उधळून सर्वांना अचंबीत व पवित्र केलेले होते. त्यातच त्यांनी त्यांची झोळी सर्वांसमोर सरळ उलटी केली. त्यातून पोथ्या व जपाच्या माळा खाली पडल्या. आता त्यांनी झोळी मुद्दाम सर्वांसमोर झटकून झटकून दाखवली. रिकामी झोळी हातात लटकत असतानाच त्यांनी ती गरागरा फिरवली व पुन्हा सर्वांसमोर त्यात हात घालून अचानक एक कुंकवाने भरलेला करंडा काढून दाखवला. ही हाथसफाई होती.

महाराज - या वास्तूतील अज्ञ जीवांनो, खुद्द माता चंडिकेचा एक तुच्छ भक्त या ठिकाणी आता आलेला आहे. हे चंडिकेचे स्वतःचे कुंकू जे आत्ताच माझ्या प्रवेशाचे बक्षीस म्हणून तिने दिलेले आहे. हे मी सर्वत्र फुंकत आहे. आता या वास्तूतील प्रत्येक कणाकणावर अधिराज्य आहे ते सर्वात मंगल, सर्वात पवित्र अशा देवी चंडिकेचे! समूळ नाश होणार आहे आता सर्व पिशाच्चांचा! पिशाच्चाही प्रमुख वास्तव्य असलेली खोली कोणती?

भारावून गेलेल्या भक्तगणांनी तिकडे हात दाखवला. महाराज खोलीकडे निघाले. कुणीतरी त्यांच्या पडलेल्या पोथ्या वगैरे उचलल्या व त्यांच्यामागून धावले. कुणीकुणी त्यांना हात बित जोडले. एकट्या पवार मावशी खालीही उतरलेल्या नव्हत्या अन अजूनही रागातच महाराजांकडे बघत होत्या. मगाशी धावणार्‍या हरिणी म्हणजे नंदा, प्रमिला अन शीला आता बावचळून व आदराने महाराजांकडे पाहात होत्या. समीर मात्र तटस्थ नजरेने पाहात होता.

कुमार साने - व्हू इज ही?????

महाराजांनी मागे वळून पाहिले. त्यांच्या चेहर्‍यावर आत्मिक शांती वगैरे काहीतरी विलसत असावे. कुमार दचकला. ते त्याच्याचकडे पाहात होते.

महाराज - आय जस्ट वर्शिप गॉडेस चंडिका... शी इज द मदर ऑफ धिस एन्टायर युनिव्हर्स... अ‍ॅन्ड शी हॅज डेलिगेटेड द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ एनर्जायझिंग अ‍ॅन्ड प्युरिफायिंग धिस लोकेशन विथ हर इमेन्स अ‍ॅन्ड अनइमॅजिनेबल ऑस्पीशियस पॉवर्स!

कुमार अन कोमलसकट हादरलेला दास्ताने वाडा त्या आधुनिक साधूकडे अत्यादराने बघत होता.

घाटेकाका आणि निगडेकाकांनी 'भुताची खोली' साफ वगैरे केली. महाराज तोवर निगडेकाकूंकडून स्वतःची पूजा वगैरे करून घेत होते. 'त्यांना यानंतर आमच्याकडे आणा' असे जो तो निगडे काकुंना सांगत होता. मावशी एक पायरीही उतरलेल्या नव्हत्या. समीर सरळ बाहेर जाऊन निवांत सिगारेट फुंकून परत आला.

दूध, फलाहार वगैरे होत असताना महाराजांशी सर्वांनी स्वतःचा परिचय करून घेतला. शीलाकाकूला मात्र काहीतरी जाणवले. महाराजांची नजर जरा 'हीच' आहे असे तिचे मत झाले होते. पण ते बोलण्याचे धाडस ती कधीच करणार नव्हती. मानेकाकांना स्वतःची भूमिकाच ठरवता येत नव्हती. शेवटी त्यांनी ठरवली.

त्यांनी परत एक मीटिंग घेतली. महाराजांना त्या मीटिंगमधे मानेकाकांच्या शेजारची खुर्ची मिळालेली होती. बाकी सगळे समोर बसून होते. मानेकाकांनी उभे राहून बोलायला सुरुवात केली.

मानेकाका - आपल्याला जे वाटत होते त्याहून खूप वेगळे, खूप चांगले असे काहीतरी घडत आहे असे जाणवले. खरे तर वाड्याचे मालक दास्ताने यांचे आपण आभार मानले पाहिजेत की आजवर आपल्याला जी खोली भारलेली वाटायची तिथे अशा ऋषीतुल्य आत्म्याला त्यांनी आणले व वास्तू पावन केली. महाराज सदानंद स्वामी यांचा पावन प्रवेश आपल्या वाड्यात झालेला आहे. महाराज सदानंद स्वामी हे काहीही करू शकतात याची प्रचीती आपल्या सर्वांना मगाशीच आलेली आहे. खरे तर हे आपण सर्वांनी आपले भाग्य मानले पाहिजे. त्यांच्या वेशभुषेवरून त्यांच्याबाबतीत कोणतेही मत करण्याची घाई न करता माझे येथील सर्व स्त्री पुरुषांना आवाहन आहे की त्यांनी महाराजांच्या पवित्र अस्तित्वाचा खरे तर लाभच घ्यावा. महान विभुती अशाच असतात. गजानन महाराजांची तर कित्येकदा 'नागवा गोसावी' म्हणून संभावना झालेली आपण गजानन विजय मधे वाचलेले आहे. खुद्द समर्थ रामदास स्वामी हेही अशाच वेशभुषेत वावरायचे हेही येथे ध्यानात ठेवले पाहिजे. या युगातही आपल्या सहवासात अशा विभुतींप्रमाणेच एक आहे यासाठी आपण वीराच्या मारुतीचे आभार मानले पाहिजेत. आज रात्री साडे नऊ वाजता सर्वांनी याच चौकात जमून 'देवी चंडिकायै नमः' हा जप प्रत्येकी तीनशे वेळा करायचा आहे. मला खात्री आहे की महाराजांच्या अस्तित्वाने या वास्तूतील सर्व दोष नष्ट होतील व दास्ताने वाडा हे एक तीर्थस्थळ बनेल. देवी चंडिकेचा....

"विजय असो"

"सदानंद महाराजांचा"

"विजय असो....."

सर्व जण पुढे येऊन महाराजांना नमस्कार करून आशीर्वाद मागायला लागले. मधेअधे महाराजही विचारत होते. "तुझी काय इच्छा आहे बाळ? " वगैरे! कुणी काही मागत होते कुणी काही!

श्रीनिवास नमस्कार करून बाजूला झाला होता. श्रीला महाराजांनी काहीच विचारले नाही. महेश तिथेच उभा होता. भारावून जाऊन तो पुढे झाला.

महाराज - ... तुला काय पाहिजे बाळ???

महेशने अवाक्षर काढले नाही. तो नुसताच हात जोडून समोर उभा राहिला.

महाराज - बोल? बोलत का नाहीयेस??

महेश अजूनही काहीही बोलेना..

महेश पुढे सरकेना म्हणून मागचे खोळंबले होते. आणि महाराज त्याच्याशी बोलत आहेत हे पाहून सगळेच संवाद ऐकत होते. श्रीला वाटत होते आपण महेशला सुचवावे की नोकरीसाठू आशीर्वाद द्या. महेशही खरे तर 'चांगली नोकरी लागुदे' असे म्हणायला ओठ उघडणारच होता...

तेवढ्यात बेफिकीर समीर म्हणाला...

"त्याला वडील आहेत... ते बिचारे राब राब राबतात... पण आई नाहीये... त्याला आई मिळेल का???"

गुलमोहर: 

मस्तच!!! बेफिकीर समीरने पुन्हा एकदा एक संवेदनशील काम केले Happy

आजचा भाग एकदम विनोदी होता. प्रत्येकाचे भुताविषयीचे मत खुप मस्त पद्धतीने मांडले आहे. खुप हसू आले आज... Lol

आज मला विशेष नाही वाटला, उगीचच एक पात्र वाढवले गेले (although the maharaj's character is special) व लाम्बवल्यासारखे वाटले. कदाचीत महेश -नईना (येत नाही लिहीता नईना) चे फारसे न समजल्यामुळे मला असे वाटले असेल.

मीरा, नैना असे टाईप करायचे- nainaa.
प्रतिसाद लिहीता, त्या बॉक्सच्या वर एक प्रश्नचिंन्ह आहे. त्यावर क्लिक करा, म्हणजे परफेक्ट आणि अ‍ॅक्युरेट टाईप करता येईल. Happy

क्षमस्व! गेले दोन तीन भग गंभीर झाल्यामुळे मला हा भाग रचावासा वाटला. दिलगीर आहे.

स्पष्ट प्रतिसाद व प्रेमळ प्रोत्साहन असेच राहिल्यास अधिक सोयोग्य लिखाण होईल असे वाटते.

त्यामुळे आपल्या सर्वांचे मनःपुर्वक आभार!

-'बेफिकीर'!

आज मला विशेष नाही वाटला, उगीचच एक पात्र वाढवले गेले व लाम्बवल्यासारखे वाटले------ अनुमोदन.

आता कादंबरीला वेळेवर आटोपत घ्यायची वेळ आलेली आहे..................

बेफिकीर .............. तुम्हाला आणि तुमच्या लेखणीला सलाम...............

आता कादंबरीला वेळेवर आटोपत घ्यायची वेळ आलेली आहे..................>>>>>
नाही हं प्रसन्न, अजून भरपूर कथानक बाकी आहे. तुम्ही बेफिकीरजींची ह्या कथानकावरची कविता वाचलीये का? ह्याच कथेच्या कोणत्यातरी भागात त्यांनी दिलीये.
चेंज म्हणून हा मजेशीर भाग त्यांनी लिहिलेला आहे, हे वर स्पष्ट केलेच आहे.

नाही हं बेफिकीर जी...

मुळीच आटोपते घेउ नका. लिहीत रहा. मस्त १०० भाग येउ देत. आम्ही तय्यार आहोत वाचायला.

तुमच्या कथांचा प्रत्येक भाग मस्त असतो . असेच लिहीत राहा. पुलेशु.