हितगुज दिवाळी अंक २०१० - मुखपृष्ठासाठी आवाहन

Submitted by संपादक on 10 September, 2010 - 11:29

नमस्कार,

कुठलंही पुस्तक, दिवाळी अंक हाती घेतला की आधी सामोरं येतं ते त्याचं मुखपृष्ठ! ते जितकं लक्षणीय, जितकं चपखल तितकं चटकन वाचकांचं लक्ष त्याकडे आकृष्ट होणार. मुखपृष्ठ म्हणजेच अंकाचं ’फर्स्ट इम्प्रेशन’. ऑनलाईन अंक असला तरी मायबोली दिवाळी अंकाचं मुखपृष्ठ हे याला अपवाद कसं असेल?

दिवाळी वा अंकाच्या संकल्पनेला अनुलक्षून आतापर्यंत, पणत्या-गेंदेदार झेंडूची फुलं ते निसर्गातल्या हिरवाईचा ताजेपणा मिरवणारं जलरंगातलं चित्र, सुलेखन अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टींनी मुखपृष्ठावर हजेरी लावून अंकाची शोभा वाढवली आहे.

यंदाच्या दिवाळी अंकाची नांदी झाली, आपण सर्व ज्याची आतुरतेनं वाट पाहत होता ती विस्तृत घोषणाही झाली. त्यात वर्णिल्याप्रमाणे प्रथमच चार संकल्पनांवर आधारित अंक आम्ही आपल्यासाठी घेऊन येणार आहोत.

आपल्याकडून साहित्यासाठी भरघोस प्रतिसाद यायला सुरुवात झाली आहे. लेखण्या सरसावल्या आहेतच, पण या आगळ्यावेगळ्या अंकाला सुयोग्य आणि समर्पक मुखपृष्ठाचे कोंदण मायबोलीकरांकडून लाभावे, यासाठी ही जाहीर घोषणा! जगभरात पोचलेल्या मायबोलीच्या वाचकवर्गाच्या नजरेत प्रथमदर्शनीच हा अंक भरावा, म्हणून आपलं कलाकौशल्य वापरून आपण मुखपृष्ठ नक्कीच पाठवाल, ही खात्री आहे.

मुखपृष्ठ पाठवताना लक्षात घ्यायच्या बाबी:

१. मुखपृष्ठाची संकल्पना घोषणेत नमूद केलेल्या या अंकाच्या एका वा सर्व संकल्पनांशी सुसंगत असावी. म्हणजेच, आपण आपापल्या पसंतीनुसार यांची व्याप्ती ठरवू शकता, यातील एखाद्याच संकल्पनेला अनुसरून मुखपृष्ठ बनवू शकता.

२. आपल्याला मुखपृष्ठाकरता माध्यमाचे स्वातंत्र्य आहे. आपण आपापल्या आवडीनुसार रंग, रेखाटन, प्रकाशचित्रे, सुलेखन इत्यादी माध्यमे वापरू शकता.

३. प्रवेशिकेच्या चित्राभोवती घन (सॉलिड) रंगाची बारीक कड ठेवून द्यावी (शक्यतो पांढर्‍या रंगात किंवा चित्रातील पार्श्वभूमीला मिळत्या-जुळत्या सॉलिड रंगात). त्यायोगे मुखपृष्ठाच्या पानाचा पार्श्वरंग (बॅकग्राऊंड कलर) जुळवणे सोपे होते व भिन्न रिझोल्यूशनांच्या ब्राउझरांमध्येही मुखपृष्ठ नेटके दिसायला मदत होते. प्रवेशिका JPEG किंवा PNG फॉर्मॅटात पाठवाव्यात. अंतिम फायलीचे आकारमान १२० kB पेक्षा छोटे असावे.

४. ८०० x ६०० पिक्सेल रिझोल्यूशनाच्या पडद्यावरील इंटरनेट एक्स्प्लोरराचं पान व्यापेल इतपत चित्राचे आकारमान असावे. अर्थातच यापेक्षा अधिक रिझोल्यूशनाच्या पडद्यांवर मुखपृष्ठ आपोआपच मावू शकेल.

५. प्रवेशिका पाठवण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर, २०१० ही आहे. मुखपृष्ठाच्या निवडीबाबत अंतिम अधिकार संपादक मंडळाचा राहील. निवडल्या गेलेल्या मुखपृष्ठात संपादक मंडळास थोडे बदल/फेरफार करून हवे असल्यास निवडल्या गेलेल्या मुखपृष्ठकाराची तसे बदल करून देण्याची तयारी हवी.

६. प्रवेशिका पाठवताना त्यासोबत आपला मायबोली आयडी नमूद करणं बंधनकारक आहे.

७. आपली प्रवेशिका आपण संपादक मंडळाला sampadak@maayboli.com पत्त्यावर पाठवू शकता.

आपणास काही प्रश्न असल्यास याच पत्त्यावर संपादक मंडळाशी कृपया संपर्क साधावा.

आपल्या मनोवेधक, अंकाला देखणं रूप प्राप्त करून देतील अशा प्रवेशिकांची आम्ही वाट पाहत आहोत. धन्यवाद.

आपले आभारी,
संपादक मंडळ,
हितगुज दिवाळी अंक, २०१०.

विषय: 

३) नंबर काहि नीटसा कळला नाही पहिल्यांदा. खरे तर अर्धा मराठीत , अर्धा ईग्रजीत. चांगले २-३ वेळा वाचून कळले.
विचार करणार नक्कीच.