श्रीनिवास पेंढारकर - एक बाप - क्रमशः - भाग २९

Submitted by बेफ़िकीर on 10 September, 2010 - 02:11

बहुधा वाईट दिवस संपत असावेत! श्रीच्या मनात विचार आला. आपली नोकरी जाण्यामागे स्वतः बर्गेच आहे हे त्याला माहीत नव्हते. त्यामुळे दुसर्‍या दिवशी तो कंपनीत जाऊन आपला सगळा रिफंड एका चेकच्या स्वरूपात घेऊन आला. किमान पन्नास जणांचे डोळे ओलावले होते श्री गेट मधून बाहेर पडताना! स्वाती अन चिटणीस तर रडतच होते. सप्रेंनीही डोळे पुसले होते. हे सगळे झाले कसे हेच कुणाला समजत नव्हते. अशा पद्धतीने काढून टाकलेले असल्याने कुणालाही आपल्या भावना मोकळेपणाने प्रदर्शित करता येत नव्हत्या. चिटणीस, कोपरकर अन स्वाती संध्याकाळी घरी येणार असे म्हणत होते.

आणि तीन लाख सदुसष्ट हजार रुपयांचा धनादेश घेऊन पेंढारकरांनी एकदा मागे वळून कंपनीच्या गेटकडे पाहिले.

हीच ती कंपनी! जिथे माझे काळ्याचे पांढरे झाले. एका पैशाची अफरातफर केलेली नाही संपूर्ण कारकीर्दीत! आणि निष्ठावान नसल्याच्या कारणावरून हाकलून दिले. काल जे केले ते केवळ आपल्यावर प्रेशर आणले म्हणून! एकतर आधी बर्गेला मदत नाही केली अन त्याने वर काहीतरी खोटेनाटे सांगीतले तर कंपनीतून आपल्यावर प्रेशर येणार! बर्गेला मदत केली तरी हाकलून देणार! आपल्याला साधा साडे आठ हजार अ‍ॅडव्हान्स देणार नाहीत. आणि बर्गेने जॉब दिला, ज्या जॉबचा कंपनीच्या इंटरेस्टशी इंटरेस्ट क्लॅश होतच नाही, तर तो केला की हाकलून देणार! मग जगायचं कसं? यांच्या कॉन्फरन्सेसला एक तासाच्या कामासाठी दोन दोन दिवस फाईव्ह स्टार हॉटेल्स बूक करतात. साठ साठ जण पिऊन धिंगाणा घालतात. तीन तीन लाखाच्या खाली बिल येत नाही एकेक! पार भारतातले सगळे डीलर्स एकदम! तेही साध्यासुध्या नाही, चांगल्या खंडाळा, ऊटी अशा ठिकाणी!

मागच्या दिवाळीत तर मॅनेजरपासून वरच्या प्रत्येक संबंधिताला त्या पंजाबातल्या गुप्ता ऑटोने गोल्ड कॉईन दिले. अरे? यांचे पगार आधीपासूनच वीस वीस हजार आहेत. त्यांनाच गब्बर करताय! आम्ही गाढवासारखे राबतोय. खरे तर असे काही फुकटचे मिळावे अशी आशाही नाही. पण इतकी वर्षे काम केल्यानंतरही कंपनीने ऐन वेळेस साडे आठ हजार द्यायला नकार द्यावा? बर! तो मिळवण्यासाठी मी चांगला, पांढरपेशा मार्ग शोधून काढला तर मला ठेवणार नाहीत जॉबवर! अरे वा रे वा!

आपल्या हातून असे कृत्य झालेच कसे पण? आपण ठाम नकार का नाही दिला बर्गेला? आपले संस्कार, आपली बुळचट इमानदारीची धोरणे आपल्याला गोत्यात आणतात. इमानदारी काय? तर बर्गेने अ‍ॅडव्हान्स नऊ हजार दिलेले होते म्हणून त्या प्रेशरखाली येऊन आपल्याला त्याच्यासाठी काही तरी करायलाच पाहिजे असे वाटणे! मग त्याच्याकडे आणखीन सहा महिने फुकट राबायचे होते! पण त्यातून काय होणार होते? बर्गेचे उपकार स्मरून जर मिसमॅच बेअरिंग्ज मॅच करून देण्यासाठी लागणार्‍या बेअरिंग्जची व्हॅल्यू काढली तर आपले अख्खे आयुष्य बर्गेकडे 'सन्माननीय सदस्य' म्हणून राबण्यात गेले असते.

पण तरीही चूक ती चूकच! झाली खरी आपल्या हातून! जे पोराला शिकवले ते आपल्याला स्वतःलाच पाळता आले नाही. पण ही चूक कंपनीला माहीतच नाही आहे. असे कसे? बरोबर आहे. अर्धवट बेअरिंग्ज आली अशी बोंब बर्गे मारणार नाही, कारण त्याला अर्धवट सेट्सच हवे होते. आणि अर्धवट सेट्स बाहेर गेलेले आहेत हे वीकली रिकन्सिलियेशनशिवाय कंपनीत समजणारच नाही. मग? समजेल तेव्हा? तेव्हा ते आपण मुद्दाम केलेले होते हेही समजेल? की चुकून झाले असे समजतील? महिन्याचे सगळे कमर्शिअल क्लेम्स काढून पाहिले तर मिसमॅचच्या किमान चाळीस घटना घडतात. त्यात आपली खपून जाईल? की आणखीन काही अ‍ॅक्शन वगैरे घेतील? आता कसली बोडक्याची अ‍ॅक्शन म्हणा? आता आपल्या हातात चेक आहे तो आधी भरला पाहिजे. अकाउंटला एकदा क्रेडिट झाला की बाय बाय!

श्रीला मागे बघताना अजिबात रडू येत नव्हते. त्याच्या मनात दाटलेला होता तिरस्कार! सर्वदूर नाचक्की झालेली होती त्याची! आता त्याचे नाव 'पेंढारकर नाहीत का ते? बर्गेमधे जॉब करणारे, त्यांना जायला सांगीतलं' असंच घेतलं जाणार होतं!

आणि या परिस्थितीत आपल्याला वाचवू शकेल अशी एकच व्यक्ती श्रीनिवासच्या डोळ्यांसमोर होती. राजन बर्गे!

श्री सरळ बर्गे ऑटोमधे पोचला.

बर्गे - या या या साहेब, आज सकाळीच?

दुपारचा एक वाजलेला होता. बर्गेच्या दृष्टीने ती सकाळच होती. तो उठायचाच साडे नऊला!

श्री - सर... मला....जायला सांगीतलं?

बर्गेने खुर्चीतच तीनताड उडाल्याचा अभिनय केला. श्रीला खूप बरे वाटले. ज्या अर्थी या माणसाला इतके आश्चर्य वाटत आहे त्या अर्थी तो आपल्या बाजूने होणार अन आपल्याला येथे निश्चीतच ठेवून घेणार!

बर्गे - आय... आय कान्ट बिलीव्ह धिस.. हू आस्क्ड यू टू लीव्ह?
श्री - ई.डी.
बर्गे - .... पण... का पण?
श्री - इथे पार्टटाईम जॉब करतो हे समजल्यामुळे...
बर्गे - कसं समजलं?
श्री - कुणीतरी चहाडी केलेली असणार...
बर्गे - तुम्हाला कोण वाटतं?
श्री - खरच माहीत नाही मला..
बर्गे - धिस इज हॉरिबल...
श्री - काय करणार सर..!
बर्गे - मग??? .. आता??
श्री - .... आता... आता तुमच्याकडेच आलोय सर... आय नीड अ जॉब नाऊ... अ फुलटाईम जॉब..
बर्गे - ओह! आय विश आय कूड हेल्प यू....!!

श्री ताडकन उडालाच!

श्री - .... म्हणजे???
बर्गे - उद्यापासूनच एक फुलटाईम जॉबवर मुलगी येणार आहे.. मी तुम्हाला परवाच सांगणार होतो खरं तर!

एका क्षणात भवितव्य कळून चुकलं श्रीला! बर्गे ही एकमेव आशा होती. त्याने ऐनवेळेस पलटी मारली असेही म्हणता येत नव्हते. कोणताही माणूस आपल्या कंपनीत शेवटी पूर्णवेळ माणूस ठेवणारच की? पण.. पण वाटत होतं मनात... बर्गे निश्चीत आधार देईल या अवघड प्रसंगी! बर! बर्गेला श्रीच्या निष्ठेबद्दल काहीच म्हणता येत नव्हतं! बर्गेमुळेच श्रीच्या निष्ठेवर शंका उपस्थित झालेली होती. त्यामुळे श्रीला खूप अपेक्षा होत्या.

पण बर्गेने सरळ नाही म्हणून सांगीतलं!

काल परवा पर्यंत आपण इथे काम करत होतो अन अचानक कशी काय एक मुलगी ठेवली फुलटाईम कामाला? पण आपण कोण विचारणार?

बर्गेचा नकार फारच 'फर्म' होता.

म्हणजे असंही नाही की 'काही लागलं तर नक्कीच बोलवीन पेंढारकर साहेब मी तुम्हाला' वगैरे!

अत्यंत खिन्न मनाने श्री बाहेर आला.

३.६७ लाखांमधे निश्चीतच काही काळ आरामात गेला असता. पण हे पैसे असे वापरून टाकायचे नव्हते. यात महेशचे लग्न करायचं होत, स्वतःच्या आजारपणाची तरतूद करायची होती.

आता फ्लॅट हे स्वप्न नुसतं पाहण्यातही काही अर्थ राहिलेला नव्हता.

फूटपाथवरून काही वेडे कसे निरुद्देश फिरता तसा श्री फिरत होता त्या दुपारी! ऊन रणरणत होतं! घामाच्या धारा लागल्या होत्या. चालून दम लागत होता. पण पाणी प्यायला हवं हेही सुचत नव्हतं त्याला!

काय करायचं हे समजतच नव्हतं! अजून जवळपास दहा वर्षं सर्व्हीस करायची होती. काल रात्री त्याने महेशला काहीच सांगीतलेले नव्हते. आज एकदम बर्ग्यांकडच्या नोकरीचे पेढे देऊन मगच सांगायचे ठरवले होते त्याने! पण... बर्ग्यांनी नोकरीच दिली नाही.

रस्त्यावरून वाहने घोंघावत जात होती. फूटपाथवर असंख्य माणसे चालत होती. कुणी घरी जाण्यासाठी, कुणी कामावर, कुणी खरेदीला तर कुणी कुणाकडेतरी जायचं म्हणून! एक श्रीनिवासच असा होता जो कुठेही जायचं नाही म्हणून चालत होता. निष्कारण!

मधेच एखादं हॉटेल लागत होतं, एखाद थियेटर, दुकाने तर कित्येक होती. स्टॉल्स, ऑफिसेस, सगळं होतं! पण कुठेच या बिचार्‍या 'बापाला' जॉब नव्हता मिळणार!

घरी जाऊन काय करणार? आत्ता दुपारच्या वेळेला महेश नसणार घरी! मावशी उगाच काहीतरी विचारत बसतील. मधूला विचारायला हवं! ओळखीत कुणी आहे का जे नोकरी देऊ शकेल असं!

हळू व निरुद्देश चालत असल्यामुळे लोकांच्या शिव्या अन धक्के खात होता श्री! पण त्याचेही त्याला काही राहिलेले नव्हते.

इतकं एकाकी कसं काय होतं एखादं माणूस? श्रीच्या मनात हा प्रश्न सतत डोकावत होता. आईच्या मांडीवर डोके ठेवून थोडा वेळ पडावसं वाटलं तर आई नाही. आईच्या जागी पवार मावशींना मानलं तरीही शेवटी त्या परक्याच! मधूला स्वतःचा संसार आहे. उषाताई तिकडे! तारा नागपूरला! आपल्याला कुणीच नाही? खास आपल्यासाठी जगणारं म्हणून कुणीच नाही.

एकदा तर श्रीला वाटलं की सरळ महेशला इंजिनीयरिंग सोडून जॉब करायला सांगावं की काय? पार्टटाईम बी.ई. सुद्धा करता येईलच की त्याला? पण नाही. त्याच्यावर सगळं सोपवून आपण आरामात राहणं योग्य नाही. हे पुढे होणारच आहे. आज नाही तर दहा वर्षांनी! त्यावेळेस पाहू! आत्ता त्याला शिकवायचंच! शिकतोयही चांगला! हल्ली हल्ली तोंडाला कधीतरी सिगारेटचा वास येतो म्हणा! पण आता आपल्याकडून शिकवायचं ते आपण शिकवलेलं आहे. समजा आपण सांगीतलं की सिगरेट ओढू नकोस. अन त्याने बाहेर जाऊन आपल्या अपरोक्ष ओढली, तर आपण काय करणार? त्यापेक्षा त्याचं लग्न होईपर्यंत त्याला काय करायचं ते करूदेत. नंतर तो अन त्याची बायको सगळं व्यवस्थित करतीलच!

आत्ता हातात आलेल्या पैशातून त्याचं पुढचं शिक्षण, त्याचं लग्न आणि आपल्याला काही वैद्यकीय ट्रीटमेंट लागली तर होऊ शकेलच म्हणा! प्रश्न रोजच्या घर चालवण्याचाच आहे फक्त! त्यात काय? करायची कुठलीतरी नोकरी! जरासं खर्चांवर नियंत्रण येणार! पण जर आपणच आपल्याला धीर दिला नाही तर कोण देणार आहे? आणि मुख्य म्हणजे आपण आपल्यालाच धीर दिला नाही तर आपण महेशला काय शिकवणार आहोत?

एकला चलो रे... हा हा! एकटा! एकटा आहे मी एकटा! श्रीनिवास पेंढारकर - एक एकटा माणूस!

विचारांच्या नादात असतानाच मागून जोरात हाका ऐकू आल्या. बायकी हाका! अहो पेंढारकर, पेंढारकर, अहो पेंढारकर!

च्यायला! आपलंच आडनांव पेंढारकर आहे हेही कुणीतरी हाका मारल्यामुळे कळतंय! श्रीने दचकून मागे पाहिले. पन्नास एक फुटांवरून स्वाती धावत येत होती.

श्री - तू? ... आत्ता इथे कशी?

स्वाती धावल्यामुळे दमलेली होती. काही क्षण ती तशीच उभी राहिली. कंपनीत असायच्या ऐवजी ही आपल्याला शोधत का आली असावी हे श्रीला समजत नव्हते. काहीतरी आणखीन विचित्र तर नाही ना घडलं?

स्वाती - ... हे पहा.. हे हॉटेल.. चला कॉफी घेऊ...

ती का आली आहे हेच माहीत नव्हते. अन ती सरळ कॉफी घेऊ म्हणत होती. मुकाटपणे श्री त्या हॉटेलमधे गेला. समोरासमोर दोघे बसल्यावर उन्हामुळे कॉफीऐवजी लस्सीची ऑर्डर दिली अन वेटर निघून गेल्यावर श्रीने विचारले.

श्री - काय झालं काय?
स्वाती - ही लस्सी तुमच्यातर्फे...
श्री - का?? .. नाही म्हणजे पाजतो मी... पण झालं काय?
स्वाती - सुंदरम ऑटो स्पेअर्समधे जॉईन होणार तुम्ही म्हंटल्यावर निदान लस्सी तरी पाहिजेच की..
श्री - सुं....???? म्हणजे???
स्वाती - मार्केटिंगचे कांबळे नाही का तिकडे जॉईन झाले होते..?
श्री - हो... मग?
स्वाती - त्यांच्या कानावर घातलं मी सगळं...ते म्हणाले मुलाखतही द्यायला नकोय... सरळ जॉईन व्हा..

आणि बरोब्बर तीन तासांनंतर बर्गे ऑटोपेक्षा साईझने बर्‍याच मोठ्या असलेल्या, परंतु वेगळ्या स्पेअरपार्ट्सच्या बिझिनेसमधे असलेल्या सुंदरम या प्रोफेशनल पण खासगी कंपनीकडून 'उपव्यवस्थापक - स्टोअर्स' या पदवीचे नियुक्ती पत्र हातात घेऊन त्यावरील पगाराचा आकडा वाचताना श्रीनिवास पेंढारकर अवाक झालेले होते.

किर्लोस्करच्या जवळपास ७५ % पगार या कंपनीने दिला होता. किर्लोस्कर एवढा पगार देणे शक्यच नव्हते. पण केवळ कांबळे तिथे असल्यामुळे, नोकरी गेल्याच्या दुसर्‍याच दिवशी नवीन नोकरी लागली होती. असा चमत्कार कुठे होतो का?

त्या रात्री मात्र श्री ने महेशला सांगीतले. जॉब बदलावा लागला, कारण आधीच्या कंपनीत नको ते खोटे आरोप झाले.

आणि केवळ सहाच महिन्यात अत्यंत चांगले काम केल्यामुळे श्री कन्फर्मही झाला होता आणि दहा टक्के राईजही मिळाला होता. आता पगार जवळपास आधीच्याच पगारा एवढा होता आणि उलट कामाचा ताण कमीच!

स्वाती कारखानीस या बाईने केलेल्या या मदतीला काही मोलच नव्हते. आपल्याला कांबळ्यांची आठवण स्वतःहून झाली नाही याचे श्रीला आश्चर्य वाटायचे. पण मग त्याला समजायचे! आपल्याला होऊ शकत नव्हती म्हणूनच आपल्या आयुष्यात देवाने स्वातीसारखी माणसे पेरून ठेवलेली होती.

इंजिनियरिंगचे पहिले वर्ष संपले अन महेश चक्क ट्रेकला गेला. तीन मित्रांबरोबर! सिंहगड, राजगड शिवथरघळ, रायगड!

सुंदरम ऑटोचा मिश्रा शनिवार वाड्यापाशी राहायचा आणि स्टोअर्समधे तो श्रीला ज्युनियर होता. श्रीलाच रिपोर्ट करायचा. त्याच्याकडे एक स्कूटर होती. त्यावरूनच शेअर बेसिसवर जाणे येणे सुरू झालेले होते. खरे तर किर्लोस्करपेक्षा अधिक चांगले दिवस होते हे! दारातून दारात अशी स्कूटर सर्व्हीस होती. पगार आता जवळजवळ तेवढाच होता, सुट्या चक्क दोन होत्या आठवड्यातून आणि मुख्य म्हणजे अत्यंत सोपे व ताण नसलेले काम होते.

या सगळ्या सुदैवाचे आभार मानण्यासाठी श्री एकदा एकटाच अक्कलकोट आणि अष्टविनायक या यात्राही करून आला. त्याच्यात घडत असलेला बदल त्याला हळूहळू जाणवत होता. नोकरीची दगदग, रमाचे नसणे, महेश मोठा झाल्यामुळे बराचसा काळ बाहेरच असणे आणि घरी आले की नुसते पडून राहावेसे वाटणे! पुर्वीपेक्षा अधिक मन लावून पूजा करायचा श्री! देवाकडे मन अधिक ओढ घेत होते. बहुतेक.... आयुष्याची संध्याकाळ व्हायला लागलेली होती!

दास्ताने वाड्यात आता नवीन युगाचे वारे वाहात होते. जवळपास प्रत्येकाकडे टी.व्ही., फ्रीझ, फोन यातील सर्व किंवा निदान दोन तरी गोष्टी होत्याच. श्रीनेही एक रंगीत टी.व्ही. आणला सात हजाराचा! आरामात पलंगावर पडून टी.व्ही. बघायला मस्त वाटायचं! एकच चॅनेल! दूरदर्शन! त्यात तास तास भर व्यत्ययची पाटी! पण साप्ताहिकी, गजरा, छायागीत, चित्रहार आणि नवीनच सुरू झालेले रंगोली यामुळे मजा यायची.

आता एक मुलगी घरकामाला यायची. तिचे नाव होते मोनी! मोनी चुणचुणीत होती. असेल वीस एक वर्षांची! रुपाने सामान्य असल्याने व डाव्या हातात किंचित व्यंग असल्याने तिचे लग्न होत नव्हते. पण तिचा स्वभाव आणि उरक या दोन्ही गोष्टी चांगल्या होत्या. ती येऊन गेली की घर कसे लख्ख वाटायचे. त्यात परत श्रीला चहा करून द्यायची. कधी कधी स्वयंपाकालाही मदत करायची. मोनीला पाचशे रुपये द्यायचा श्री चक्क! एकच खोली! पण द्यावेच लागायचे. धुणी, भांडी, झाडू, फरशी अन श्रीकाका घरात असले तर त्यांना चहा करून देणे किंवा भाजी चिरण्यास वगैरे मदत करणे! तिनेही एकदा पवार मावशींच्या शिव्या खाल्याच होत्या. पवार मावशी!

वय वर्षे ६५! भांडायचे असेल तर तावातावाने बोलणार! अन्यथा गप्प बसून राहणार! गणेश बेरी अजूनही त्यांच्या घरातील हनुमानाला नमस्कार केल्याशिवाय वाड्याच्या बाहेर जायचा नाही. पवार मावशींच्या वाट्याला आता महेश जवळपास येतच नव्हता. कारण एकच खोली असल्याने बरेचदा महेश हॉस्टेलवर मित्राकडे राहायचा. अभ्यास म्हणा किंवा इतर काही कारणांनी! त्यात नैना निघून गेलेली असल्याने वाड्यात तसाही त्याचा जीव रमायचा नाही.

प्रमिला! प्रमिलाही आता थकल्यासारखीच दिसायची. मधूसूदन गप्प गप्प असायचा. भरपूर प्रयत्न करूनही समीर काही वळणावर येत नव्हता. घरात द्वाडपणा काहीच करायचा नाही. पण हे असलंच काहीतरी! याचं तिच्याशी जमवण्यासाठी उगाच काहीतरी खुळचट प्रकार कर, सिगारेटीच ओढ, दारूच पी, तासनतास टी.व्हीच बघ, अभ्यास नाही अन काही नाही. तयचे करिअर कसे असेल याची अंधुक जाणीव मधूला व्हायला लागलेली होती.

मानेकाका सत्तरीला पोचलेले होते. तेही सहसा भांडणाव्यतिरिक्त तोंड उघडायचेच नाहीत.

नवीन पिढी म्हणजे वैशाली, किरण, समीर, राजश्री, महेश आणि नैना! त्यातली वैशाली तर कधीच, तर नैना नुकतीच वर्षभरापुर्वी लग्न करून सासरी गेलेली होती. वैशालीला तर आता मुलगाही होता. माहेरी आली की किरणमामाकडेच बसायचा तो बराच वेळ! राजश्रीच्या लग्नाचं जोरात चाललं होतं! तीन, चार ठिकाणी दाखवलंही होतं! अजून म्हणे पसंती आली कुंणाचीच नव्हती, पण पाटसकर म्हणून एक स्थळ बहुतेक तिला पसंत करेल असं बेरी काका अन बेरी काकू सगळ्यांना सांगत होत्या.

आणि ???? केलं की??

कुमारी राजश्री बेरीची सौ. राजश्री सुहास पाटसकर होणार अशी पत्रिकाच डायरेक्ट वाटली बेरीकाकांनी वाड्यात! साखरपुडा म्हणे लग्नाच्या आदल्याच दिवशी! आणि लग्न कधी तर याच महिन्यात वीस दिवसांनी!

दास्ताने वाडा या वास्तूला सर्वप्रथम दास्तान्यांना जेव्हा पहिला मुलगा झाला होता तेव्हा लायटिंग करण्यात आले होते. त्या जमान्यातही! त्यानंतर ते आज झाले. राजश्रीच्या लग्नाच्या निमित्ताने!

राजूताई इतकी सुखात आणि आनंदात होती की तिचा मुळी उत्साहच बघावा नुसता! गणेशलाही त्या निमित्ताने स्वतःचे अनेक लाड पुरवून घेता आले. जेवणे चालू झाली, केळवणे चालू झाली. खरेद्या सुरू झाल्या. प्रमिलाकाकू अन नंदा आत्या यांश्याशिवाय आता बेरीकाकूंचे पान हलेनासे झाले.

महेशची परिक्षा संपलेली होती. त्यामुळे तो फुलटाईम 'लग्नमय' झालेला होता. बाहेरची सर्व कामे तो आणि समीरच करत होते. ते पाहून तरी मधूला खूप आनंद होता होता. इतर काही नसले तरी आपला मुलगा निदान स्वभावाने तरी चांगला आणि मदत करणारा आहे!

आणि आता महेश आणि समीर चोवीस तास राजश्रीची थट्टा करत होते. तिने नुसते मानेला झटका देऊन केस मागे सारले तरी कुणीतरी म्हणायचे...

"असलं चालणार नाही हां तिकडे.. ही असली शायनिंग माहेरी ठीक आहे.. "

की राजश्री अधिकच सुखावायची! मात्र गणेशने असली काही थट्टा केली तर त्याला लटक्या रागाने धपाटा घालायची. खरे तर गणेश एका अर्थाने तिच्याच अंगाखांद्यावर मोठा झालेला होता. त्याला सोडून जाताना कसं काय झेपणार होतं राजश्रीला काय माहीत? जसजसा लग्नाचा दिवस जवळ येऊ लागला, राजश्री आईबरोबरच झोपायला लागली. बेरी काकांच्या चेहर्‍यावर प्रचंड घाईने कामे उरकतानाही एक क्षणभर असे भाव यायचे की पाहवायचे नाहीत. पण आपली मुलगी आता दुरावणार याचे दु:ख करायलाही वेळ उरला नव्हता.

या सगळ्या कालावधीत नैना माहेरी आलेली नसली तरी शीला काकू - प्रमिला काकू - मावशी - बाबा अशा रूटने तिच्या बातम्या महेशला समजत होत्या. सासरचे कडक होते, पण घराणे मोठे होते वगैरे! श्रीमंतही होते. पाच किलोमीटरवर माहेर असून एकही वर्षसण वाड्यात का झाला नसावा हे कोण विचारणार शीला काकूला? नैनाच्या लग्नाला कुण्च गेले नसल्याने तिचे संबंध जरासे कमीच झालेले होते वाड्यात सगळ्यांशी! पण जागांचे भाव अन भाडी बेसुमार वाढल्यामुळे कुठेच शिफ्ट होता येत नव्हते. इतकेच की पुर्वीच्या घनिष्ट मैत्रीला स्मरून नंदा आत्या आणि प्रमिलाला काकू रोज एकदा तरी तिची आपुलकीने चौकशी करायच्या आणि तेवढेच शीला काकूला बरे वाटायचे. ती वाट पाहायची कधी या बोलतात आपल्याशी! पण नैनाचा विषय वाढू द्यायची नाही.

लग्नाला चार दिवस राहिलेले असताना मान्यांचे केळवण झाले अन त्याची जेवणे चालू असताना कसेबसे धाडस करून शीलाकाकूने सगळ्यांसमोर बेरी काकूंना विचारले...

"वहिनी.... आमच्याकडचं... उद्या करू का केळवण..."

हा प्रश्न विचारण्याचा शीलाला काहीही हक्क नव्हता. कारण तिला मानेकाकांनी केळवणाला मुळी बोलवलेच नव्हते. कुणीच तिला कुणाकडच्याच केळवणाला बोलवलेले नव्हते. हा प्रश्न विचारताना शीलाचा चेहरा अत्यंत लज्जित झालेला होता. तीन वेळा चाचरली होती ती बोलताना! आपला काहीतरी भयंकर अपमान होऊ शकेल याची शक्यता तिने आधीच गृहीत धरलेली होती. कारण नैनाच्या साखरपुड्यापासून 'राजश्रीला अद्वातद्वा बोलल्यामुळे' शिंदे आणि बेरी कुटुंबियांमधे वैर निर्माण झालेले होते. आणि त्या पार्श्वभूमीवर, तब्बल वर्षभराचा अबोला सोडून शीलाने सर्वांदेखत हा प्रश्न विचारण्याचे कारण इतकेच होते की 'माझ्याकडून मी विचारले हे सगळ्यांना कळावेही' आणि 'बेरीबाई वाट्टेल तशी बोलली तर सांभाळून घ्यायला प्रमिला वहिनी आहेत'. सर्वांनी आपल्याला पुन्हा सामावून घ्यावे ही इच्छा अतिशय तीव्र झालेली होती.

दास्ताने वाड्याच्या भिंतीही कान देऊन उभ्या राहिलेल्या होत्या. अख्खी पंगत स्टॅन्डस्टिल! हातातला घास हातात, तोंडातला तोंडात! मानेकाकांचे ब्लड प्रेशर प्रचंड वाढलेले होते. मागे कुठेतरी राजाकाका खजील व घाबर्‍या नजरेने बेरीवहिनींकडे पाहात होता. बेरीकाका पुतळ्यासारखे उभे होते... आणि...

बेरीकाकू ... त्यांच्या डोळ्यामधून जाळ येत होता जाळ! राजश्रीला आपल्या लग्नात शिंदे विरुद्ध बेरी हा वाद अजिबात उपटायला नको होता... आणि अचानक.. अचानकच बेरीकाकूंच्या डोळ्यातले ते भाव लोपले...

"याला काय विचारणं म्हणतात? नालायक? मी वाट पाहात होते केळवणाला कधी बोलवतीयस याची... आधी नाही आमंत्रण देता येत? बोलवलं नसतंस तुझ्यासाठी घेतलेली साडी देणारच नव्हते मी"

खूप खूप वर्षांपुर्वी एकदा वैशालीने खूप लहान असताना वाड्यात सगळ्यांना नाच करून दाखवला होता. झाली असतील वीस, बावीस वर्षे!

त्या प्रसंगानंतर दास्ताने वाड्यात उत्स्फुर्त टाळ्या आज वाजल्या.

उत्स्फुर्त!

भिंतींना कान होते, पण डोळे असते तर त्यांच्यावरूनही सरी ओघळताना दिसल्या असत्या. बेरीणबाई अन शीलाच्या घट्ट मिठीकडे पाहताना राजश्रीला हुंदके आवरत नव्हते. अगदी पुरुषांच्याही डोळ्यात पाणी आलं होतं!

एका जवळपास बहिष्कृत कुटुंबाला बेरीणबाईंच्या मोठ्या मनामुळे पुन्हा पुर्वीचे स्थान प्राप्त झाले होते.

आता मज्जाच येणार होती शीला अन राजाला! रोज वाड्यात येता जाता आपल्याकडे ढुंकूनही कुणी बघत नाही, जणू आपण आता या वाड्यात राहातच नाही आहोत असे भासवतात याची सवय त्यांना लागलेली होती. त्यामुळे त्यांचे आयुष्य त्यांच्या अडीच खोलीपुरते मर्यादीत झालेले होते. इव्हन वाड्यातही तसे सुतकीच वातावरण उरलेले होते. पण आज बेरीकाकांच्या वागण्याला शोभेल अशा बेरीकाकू वागल्या होत्या. शीला अन त्यांच्या साड्या एकमेकींच्या आसवांमुळे भिजत होत्या. प्रमिला अन नंदा दोघींना थोपटत होत्या. त्यातच राजाकाका मानेकाकांकडे आला. घाबरत घाबरत! वाड्याचे नेतृत्व मानेकाकांकडे असल्याने त्यांना भेटणे आवश्यक होते.

राजा - काका.. आमच्या सगळ्या... चुकाच.... सगळ्या चुकाच झाल्या आमच्या....!!!

आता बेरी कुटुंबियांचेही लक्ष मानेकाकांकडे लागले होते. हा डोंगरासारखा माणूस वाघासारख्या डरकाळ्या फोडतो अन दास्ताने वाडा हादरवतो याची सवय लागलेल्या सगळ्यांना एक अद्भुत चमत्कार पाहायला मिळाला..

मानेकाका - दास्ताने वाड्यात स्वतःची चूक स्वतःच्या तोंडाने कबूल करणारी माणसे राहणार असतील तर हा माने हा दास्ताने वाडा....

"पेटवून देईल"

हात उंचावून पोरासोरांसकट सगळ्यांनी कोरस दिला. वाड्याची जमीन सुद्धा उंचावून कोरस देत असावी असा भास झाला.

राजाकाकाने मिठी मारली मानेकाकांना! मग काय बहार विचारता? पंगतीच्या पक्वान्नांची गरजच भासली नाही असे वातावरण निर्माण झालेले होते. पंधरा मिनिटांनी राजाकाकाने मानेकाकांच्याच इष्टाईलमधे घोषणा केली...

"मी अन शीला बेरींना उद्या केळवण करत आहोत... काय वाट्टेल ते झालं तरीही सगळ्यांनी यायचं आहे... आणि एक माणूस जरी आला नाही असे दिसले तर हा राजाराम शिंदे हा दास्ताने वाडा... "

सगळे चुपचाप! अशी घोषणा करण्याचा हक्क फक्त मानेकाकांचा होता. त्यांच्याकडे बघत सगळे चुप बसलेले होते. मानेकाका स्वत:च हात उंचावत म्हणाले.. "पेटवून देईल"

नुसती धमाल चाललेली होती. फक्त! एका माणसाची मनस्थिती सोडली तर! कारण त्या माणसाला समजले होते. उद्यापासून तीन दिवस, म्हणजे राजूताईचे लग्न होईपर्यंत ... सौ. नैना संग्राम कदम वाड्यात राहायला येणार होती... माहेरी...

महेश.. आतडी पिळवटून निघत होती त्याची.. कशी दिसत असेल आता? बोलेल का आपल्याशी?

आणि दुसर्‍याच दिवशी नैनाचे दिसलेले ते रूप महेशला अंतर्बाह्य हादरवून गेले. तिला पाचवा महिना लागला आहे असे शीलाकाकूने प्रमिलाला सांगीतले. महेशनेही पाहिले. पोट दिसत होते. मात्र..... मात्र!

हा 'मात्र' फार भयंकर होता. नैनाच्या चेहर्‍याची रयाच गेली होती. म्हणतात की कॅरिंग असताना स्त्रीच्या चेहर्‍यावर एक वेगळी झळाळी येते. कसली झळाळी अन कसलं काय? नैना सुरकुतल्यासारखी दिसत होती. डोळे खोल गेलेले! कसंनुसं हासत होती. महेशच्या खोलीकडे तर पाहातही नव्हती. महेश वरूनच पाहात होता. राजूताई खाली धावत आली अन दोघींनी एकमेकींना मिठी मारली. खूप रडल्या. दोघींची रडण्याची कारणेच वेगळी होती. राजूताईला हा वाडा, ही जुनी मैत्रीण सोडून जायचे होते. आणि नैनाच्या आयुष्यात अनेक गोष्टी झालेल्या होत्या. महेशने नैनाला आता भेटण्यात शीलाकाकूला कसलीच हरकत नव्हती. राजूताईकडे गेलेल्या नैनाला पाहून समीरदादा अन महेशही राजश्रीकडे गेले. आणि ती नजरानजर...

... कसली ती नजरानजर...

महेशच्या डोळ्यांमधे जे भाव होते ते अवाक झाल्याचे, थक्क झाल्याचे.. इतके दिवस का आली नाहीस हा प्रश्नही विरला होता मनातल्या मनात...

आणि नैनाच्या चेहर्‍यावर कसंनुसं हसू होतं मगाचचच! मेलेली नजर, शरमलेला चेहरा! क्षणभर महेशला पाहून थोडंसं हसून तिने मान वळवली. चौघेही बोलायला बसले. राजश्री समीरला म्हणाली..

"दादा, हिला खूप छळतात...."

आणि मग नैनाने स्वतःच्या तोंडाने ती करूण कहाणी सांगीतली.

"साखरपुड्याच्या आदल्या दिवशी समीरदादा त्यांच्याकडे गेला म्हणून खरे खोटे करायला ते इथे आले होते.. तेव्हा मी महेशला 'एकदा भेटू' म्हणालेले आप्पांनी ऐकले होते... आप्पा म्हणजे सासरे.. रामभाऊ कदम... पण त्यांना सून हवी होती मूग गिळून गप्प बसणारी.. त्यामुळे त्यांनी मुद्दाम त्यावेळेस विरोध केला नाही..

लग्नाच्या दुसर्‍या दिवशीच आम्ही गोव्याला गेलो... यांच्या मित्राचे घर होते.. तो अन त्याची बायकोही होती.. आम्हाला कसलीच प्रायव्हसी नव्हती.. नुसतं आपलं म्हणायला हनीमून.. चार दिवसांनी परत आलो अन मी कामाच्या रगाड्याला लागले.. आई बाबा आले तर त्यांचा सरळ अपमान व्हायचा.. यांची बहीण कुसूम तर मला वाटेल ते बोलायला लागली... नापास झालेली नुलगी आणलीय, अडाणी मुलगी आणलीय... यांना मी काही सांगायला गेले तर मला थोपटून हे म्हणत असूदेत.. काही दिवसांनी सगळे नीट होईल.. कसलं नीट अन काय.. मला माहेरी सोडेनात.. सासू बाई एकावर एक काम टाकू लागल्या.. त्या दिवसापर्यंत कुणी हात उगारलेला नव्हता.. पण बाबा आले आणि मी धुणे धूत असताना बाबांना भेटायला म्हणून बाहेर आले.. आप्पा डाफरले.. दोन मोठी माणसे बोलताना तू यायचं नाहीस.. मी आत गेले.. चहा टाकला अन चहा बाहेर नेऊन दिला.. तोपर्यंत बाबा निघूनही गेले होते.. एक शब्द बोलता आला नाही मला... तुम्हाला आई बाबांनी काहीच सांगीतले नसेल..कारण त्यांना तोंडच नव्हते सांगायला... पण त्या दिवशी सासूने 'न विचारता चहा करत बसली अन धुणे तसेच राहिले' म्हणून सरळ एक रट्टा दिला.. मी खूप रडले आमच्या खोलीत रात्री.. तर हे मलाच सांगतात.. सुनेला एवढं सहन करावं लागतंच... तो रट्टा दिलेला पचला आहे पाहून मग हळूहळू छळ सुरू झाला.. येता जाता कुणीही बोलायचे.. थोरले दीर नागपूरला असतात.. त्यांची फॅमिली आली की जाऊबाईही थट्टाच करायच्या.. त्या मोठ्या घरच्या आहेत.. मोठे दीर श्रीमंत आहेत.. त्यांची दोन मुले.. म्हणजे माझे पुतणेही माझी थट्टा करायला लागले.. काहीही कामे सांगायला लागले.. एकदा खूप मागे लागून मी यांना आपण दोन दिवस कुठेतरी जाऊ असे म्हणाले.. कसे काय कुणास ठाऊक हे तयार झाले.. आम्ही चक्क महाबळेश्वरल गेलो.. खूप सुखात होते मी पहिल्या दिवशी.. पण दुसर्‍या दिवशी मी घरातला विषय काढला वेळ पाहून.. यांचा मूड पाहून.. तर हे तापलेच.. माझ्यावरच खेकसले.. मी पुन्हा पुन्हा सांगू लागले की मला उगीच छळतायत.. तर यांनी त्या ट्रीपमधे मला रूममधे एक तोंडात मारली.. कसली ट्रीप अन काय.. मला म्हणाले हेच सांगायला तुला यायचं होतं.. आम्ही परत आलो.. दिवस जात नाहीत यावरून टोमणे ऐकायला यायला लागले.. अजून सहा महिने नाही झाले लग्नाला तरी बोलायचे... मग कामांत वाढ झाली.. राब राब राबायला लागले.. यांच्या धाकट्या बहिणीला चहा नेऊन द्या... तिचा डबा भरा... कामाचं काही नाही... काम करावंच लागणार घरातलं... पण खायला नको काही माणसाला??... मला अर्धपोटी ठेवायला लागले... कित्येकदा वाटायचं महेश.. तिथून पळून यावं अन सरळ तुझ्याकडे यावं... पण.. प्रश्न असा असायचा की आई बाबांना उगाच परत ओझं.. तेही पळून आलेल्या विवाहीत मुलीचं... सोसत बसले.. तुझ्याकडे तरी कशी येणार...माझे हाल केले त्यांनी.. एका जेवणावर सगळं काम करत होते.. त्यातच मला दिवस गेले.. चार दिवस अगदी उदो उदो झाला येईल जाईल त्याच्या समोर माझा.. आई आणि बाबा त्या दिवशी पहिल्यांदा आमच्याकडे जेवले.. लग्नांच्या जेवणांनंतर.. सण नाही काही नाही.. दिवाळसणही नाही... आई बाबांनी मात्र पाळले.. ते प्रत्येक सणाला माझ्या सासरच्या सगळ्यांना... अगदी नागपूरच्या दिरांच्या मुलांनाही काहीतरी आणायचे रीतीप्रमाणे.. कुसूमला आणलेले ड्रेसचे कापड पाहून ती बाबांसमोरच म्हणाली... असले कलर चीप असतात.. आम्ही वापरत नाही.. हे स्वतःला आम्ही म्हणणारे कोण?... मी का हे सहन करायचं? पण मला वाटलं दिवस गेलेले पाहून मला चांगली वागणूक मिळेल.. काही दिवस मिळाली.. पुन्हा सुरुवात झाली छळायला... यांनाही काही वाटत नाही माझ्याबद्दल...मला व्यवस्थित मेडिकल ट्रीटमेंटही नाहीये... सासूबाई म्हणतात आमच्यावेळेस इतकं डॉक्टर डॉक्टर कुठे होतं? याला काही अर्थंय का राजूताई??... मला काय काय त्रास होतात.. समोरच्या एका सामान्य डॉक्टरकडे नेतात... त्याचा गायनॅकोलॉजीशी काही संबंधही नाही.. तो काहीतरी फालतू गोळ्या देतो.. शेवटी हे कळल्यावर बाबांनी एक डॉक्टर बाई लावली आहे.. ती घरी येऊन तपासते.. आणि समीरदादा.. त्यानंतर तो प्रसंग घडला.. हे बघ.. हे बघ माझ्या हातावरचा डाग.. मी मुद्दाम पदर सारखा उजव्या हातावर धरते.. आईला दिसू नये म्हणून.. यांनी मारलं .. का माहितीय? आप्पांनी परवा सगळ्यांसमोर सांगीतलं की ही साखरपुड्यानंतरही त्याला भेटली होती.. एकदा तरी भेटू शकलो का आम्ही? आता माझ्यावर संशय घेतात सारखा.. मला मरावंसं वाटतं महेश.. वाड्यातला समोरचा एक कॉलेजमधला मुलगा अगदी सहज माझ्याकडे पाहून कधी नव्हे ते हासला तरी मारलं मला.. या अवस्थेत मारतात... महेश.. माझ्या चिठ्ठ्या फेकल्यास ना रे? चुकूनही ठेवू नकोस हां... कधी त्यांना चुकून दिसल्या तर मला मारून टाकतील ते लोक "

कितीतरी वेळ नैना बोलत होती. रडत रडत सगळे सांगत होती. सगळेच हवालदिल होऊन बसले होते. चौघांच्याही मनात हाच विचार होता. महेश अन नैनाचे झाले असते तर किती बरे झाले असते. 'तू निघून ये' असेही समीरने सांगीतले नैनाला! पण नैनाने ते अशक्य असल्याचे सांगीतले. नैनाचे भवितव्य आता ठरून गेलेले होते. छळ सहन करून कदमांच्या मुलांना जन्म देत बसायचे!

पण... हे असलं सहन करेल तो समीर कर्वे कसला? त्याची झलक नंतर दिसणारच होती.

एकंदरीत राजश्रीचं लग्न मस्तच पार पडलं! स्वतःच्या सख्या भावाला, गणेशला भेटताना रडली नसेल इतकी समीरदादा अन महेशला भेटताना रडली.. तीच काय? सगळा वाडाच रडला... ते रडणे पाहून खरे तर तिच्या सासरचेही काही लोक रडले होते..

पवार मावशी अन प्रमिलाकाकूशी अधिक सख्य होते तिचे! राजश्रीच्या डोळ्यांचे पाणी खळत नव्हते. नैनाला दु:ख वेगळेच होते. पहिल्यांदा माहेरी आलेली! उद्यापासून पुन्हा सासरी जायचे! भयानक ताण होता तिच्या मनावर! सातव्या महिन्यात माहेर पाठवायला परवानगी देऊ असे म्हणत होते सासरचे! पाठवतायत की नाही कुणास ठाऊक असे तिला वाटत होते. कदाचित नात किंवा नातू झाल्यावर तरी त्याचा लळा लागून घरात आपले महत्व थोडेसे निर्माण होईल ही वेडी आशा होती तिला.. तिच्या सासरच्यांशी कधी संबंधच आलेला नसल्याने बेरींनी राजश्रीच्या लग्नात त्यांना बोलवण्याचा प्रश्नच नव्हता.

ब्राह्मण कार्यालयातून राजश्रीताई अन तिच्या पतीची सजवलेली 'जस्ट मॅरीड' वाली गाडी लांब लांब जाताना पाहताना महेशला जाणवत होते....

काळाच्या ओघात.. एकेक एकेक नाते संपत आहे... चितळे आजोबा गेले.. वैशालीताईचे लग्न झाले.. नैना तर आपल्याला जवळजवळ नष्ट करूनच गेली होती... आता.. एक राजश्रीताई होती.. जिच्याबरोबर आपण लहानपणापासून खेळलो ती... तीही गेली.. आता काय? आता समीरदादाचे अन आपले लग्न एकदा झाले की... प्रश्नच मिटला.. गेले लहानपण.. गेली ती दास्ताने वाड्याची मजा.. पण... पण आपण लग्न करायचं?? आपल्याला कसं रमता येईल कुणा दुसरीबरोबर????

गणेशच्या खांद्यावर हात ठेवून समीर अन महेश चालत चालत वाड्यात आले..

नैनाला न्यायला तिचा नवरा अन त्याची बहीण कुसूम येणार होते दोन तासांनी...

समीर 'आलोच रे' म्हणून बाहेर सटकला. नैनाशी थोडे आणखीन बोलून, तिला धीर देऊन महेश सिगारेट ओढायला बाहेर गेला.. वाड्यातील सगळ्यांनाच नैनाची करूण कहाणी कळलेली होती....

हळूहळू.... रडणार्‍या नैनाशी चार शब्द बोलायला, तिला धीर द्यायला सगळेच लहान मोठे तिथे जमा झाले.. चुकचुकत होते... हळहळत होते.. शीला स्वतःच्या कुमतीला दोष देत होती.. आता तोंडाने असे म्हणणे योग्य नव्हते म्हणून म्हणत नव्हती की यापेक्षा महेशने सुखात ठेवले असते हिला.. पण भाव तेच होते चेहर्‍यावर....

प्रमिलाच्या मांडीवर डोके ठेवून पडून राहिलेल्या नैनाला प्रमिला थोपटत होती. मानेकाकांचा संताप होत होता. पण आता काहीच पर्याय नव्हता.

दोन तासांनी संग्राम अन कुसूम आले. सगळ्यांकडे बघून त्यांना अंदाज आलाच! ज्या अर्थी नैना रडलेली आहे अन सगळे असे बसलेत त्या अर्थी नैनाने सासरची तक्रार केलेली असणार...

कुसूम - काय वहिनीबाई? झालं का माहेरपण? अगदी थोपटून घेताय काकूकडून? चला आता...

सगळे स्तब्ध बसलेले होते. संग्राम तुच्छपणे म्हणाला... "चल्ले... चल्ल???"

तरीही सगळे शांतच होते.

कुसूमने सरळ नैनाचा हात धरला. नैना गडबडून उठली. पण मावशीही उठल्या अन कुसूमकडे आल्या अन तिचा हात त्यांनी सोडवला.

कुसूम - अग्गोबाई.. राग येतो वाटतं सासरी चल म्हणाले तर...

मावशी आवाजावर नियंत्रण ठेवून म्हणाल्या...

"पाचवा लागलाय तिला... सांभाळून वागवा अशी विनंती आहे"

चक्रावून सगळे मावशींकडे बघत होते.. ही माऊली इतके नम्र शब्द कसे काय बोलली?

कुसूम - कळतं म्हंटलं आम्हाला... आमचं आम्ही पाहू.. भलत्यांनी मधे पडायचं कारण नाही..

राजाकाका मधे पडला.

"कुसूमताई.. चिडू नका.. या खूप मोठ्या आहेत... नैनाला घेऊन जा तुम्ही"

संग्राम - ए ऊठ गं... काय असेल ती पिशवी घे अन चल.. नटलीय कशी बघ कुस्मे..

तो एवढं बोलला अन मागून त्याच्या खांद्यावर हात पडला. संग्राम दचकून मागे वळला तर...

"माझी बहीण आहे... गर्भारशी आहे.. जपून.. काय??? जपून वागवायचं.. एक काम पडता कामा नाही.. एक शिवी बसता कामा नाही... फुलासारखी राहायला पाहिजे ती....या क्षणापासून... नाहीतर? नाहीतर तंगड्या तोडून हातात देईन तुझ्या.. दास्ताने वाड्याची मुलगी आहे ती.. आजपासून लक्ष राहील माझं तुमच्या घरावर.. एक जरी तक्रार आली तरी बाहेर पडशील तेव्हा सांभाळून.. अन चौकीवर तक्रार बिक्रार करू नको.. हे माझ्याबरोबर आलेत ते डिपार्टमेंटचेच आहेत.. मी आधीच सांगीतलंय त्यांना की या मुलीला सासरी छळतात... तुझ्या बापाला रास्ता पेठेतून फरफटत इथे आणीन अन तुडवीन.. तू तर छाडमाड आहेस.. काय?? समजलं काय?"

संग्रामने नुसतीच मान डोलावली.

चिंचेच्या तालमीतल्या एका मित्राला घेऊन समीर आला होता आणि खर्जातल्या आवाजात कोणताही शिवीगाळ न करता संग्रामला हग्यादम भरत होता.

कुसूमची अवस्था पाहण्यासारखी झाली. नैनाने जोरात झटका मारुन आपला हात तिच्या हातातून सोडवून घेतला.

"पुन्हा हात लावायचा नाही मला"

नैनाचे ते जहरी शब्द ऐकून कुसूम मुळासकट हादरली. संग्राम खाली मान घालून वाड्याबाहेर जाऊन थांबला.

"येते रे महेश" म्हणून नैना गंभीर चेहर्‍याने वाड्याबाहेर पडली तेव्हा त्यांच्या मागून मागून तो पहिलवान आणि समीर रास्ता पेठेपर्यंत गेले..

आणि मागे दास्ताने वाड्यात राहिलेल्या मंडळींपैकी कुमार साने ओरडून म्हणाला...

"अहो वहिनी.... मावशी पडल्या... मावशी पडल्या.."

गुलमोहर: 

मस्तच......... खरं सांगू का बिफिकीर , नैनाला सासरी त्रास होत असणार याचा अंदाज आलाच होता...

हा भागही मस्तच. नैनाचे हाल वाचून खूप वाईट वाटले.

खर सांगू का बेफिकीर जी.. ह्या सगळ्या कथांचे भाग वाचताना या गोष्टी अगदी कुठेतरी खरेच घडत आहेत असेच वाटते. असेच छान लिहीत रहा.

छान.

काळीज पिळवटून टाकणारा भाग होता हा आजचा... Sad बिचारी नैना Sad

पण समीरभाऊ,शाब्बास !!!! बहिणीच्या रक्षणाला धावून आलास, योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने... Happy

आणि पवार मावशींना काय झालं आता???? Sad

मस्तच... आवडला... असे पटापट भाग आले की वाचायला मजा येते..
नैनाचे हाल वाचून वाईट वाटले.. आणि मावशींना काय झालं.. Sad
मोनीला एका खोलीचे पाचशे जरा जास्तच होतात नै.. Proud

I have read all the episodes and liked them very much. However i just want to know if ciompany like Kirloskar pays so little to the employees that even after completing nearly 20 years of service (my guess), a family of two people has to live such a low life.

One more request please guide me on how to write the following characters in marathi launguage:
ट, ण, ळ

आर्निअस,
तुम्ही प्रतिसाद लिहिण्यासाठी ज्या बॉक्समधे टाईप करता, त्याच्याच वर काही टॅब्स आहेत, जसे B, I, म/E इ. तिथे सगळ्यात शेवटी एक असा '?' टॅब (प्रश्नचिन्ह टॅब) आहे. त्यावर क्लिक केले की तुम्हाला ह्याचे उत्तर मिळेल. Happy
शिवाय म/E ह्यावर क्लिक केले, की तुम्ही मराठी आणि english या दोन भाषांमधे toggle करु शकता.

सर्वांच्या प्रोत्साहनासाठी त्यांचे अनेक अनेक आभार! मी स्वतः १९९५ ते १९९९ त्या कंपनीत काम केलेले आहे व सिनियर इंजीनियर याच पदावर होतो. मला तेथील स्केल्स माहीत आहेत. त्यामुळे तसे लिहीले. काही चुकले असल्यास क्षमस्व!

पुन्हा धन्यवाद!

वा वा, समिर, भावा, १ च नंम्बर, पण नेना चे वाचुन वाईट वाट्ले, महेश संगे ख्ररच खुप सुखि राहिलि असति, आणि बेफिकिर, काय राव, तुम्हि नाहिच ना मिळवल ना महेश आणि नेना ला Sad