श्रीनिवास पेंढारकर - एक बाप - क्रमशः - भाग २७

Submitted by बेफ़िकीर on 7 September, 2010 - 00:42

कॅफे सेन्ट्रल!

जंगली महाराज मंदिरासमोरचे एक इराणी हॉटेल! जे रात्री साडे बारा, एक पर्यंत व्यवस्थित चालू असायचे. इतर इराणी हॉटेल्सप्रमाणेच!

पुण्याच्या डेक्कन व आसपासच्या भागातील ती मजा, सहसा पुरुष लुटू शकतात, पण अफलातून मजा आहे.

समजा डेक्कन कॉर्नर केंद्रस्थानी गृहीत धरला, तर कर्वे रोडकडे यायला लागलात की विमलाबाई गरवारे प्रशालेसमोरचे केफे पॅरॅडाईज हे गेली ४० वर्षे अव्याहत चालू आहे असे जुने लोक म्हणतात. १९७९ पासून तर मी स्वतःच पाहतोय! यात तुम्हाला ऑम्लेट, बन मस्का, हाफ फ्राय, चहा, कॉफी, कोल्ड ड्रिन्क्स, बिस्कीटे, केक्स, क्रीम रोल्स हे सगळे मिळू शकते, अगदी उशीरापर्यंत! आणि या हॉटेलच्या अत्यंत जड अशा लोखंडी खुर्च्याही हॉटेल इतक्याच जुन्या आहेत हे शपथेवर सांगू शकतो मी!

कर्वे रोडकडे नाही यावंसं वाटलं अन संभाजी ओव्हरब्रिज क्रॉस करून लगेच उजवीकडे पाहिलेत की ...

हॉटेल लकी..

सेम पदार्थ, सेम टायमिंग! पण एक मोठा फरक! येथे चिकन पॅटीसही मिळायचे. 'मिळायचे'??? होय! मिळायचे! आता हे हॉटेल नाही. काळाच्या गर्तेत गेलं! दोन वेळा जळून खाक होऊनही ते उभं होतं! खूप चालायचं! पॉप्युलर होतं! पण आता नाही आहे.

पण लकी नसलं म्हणून काय? पुण्यातील यच्चयावत इराणी हॉटेल्सची राणी समोरच आहे ना!

कॅफे गुडलक!

कॅफे गुडलक इज अ लॅन्डमार्क! गुडलकवरून आत आलात ना? गुडलकचा चौक क्रॉस केलात ना? गुडलककडे पाठ करून पुढे शंभर पावले चाललात ना? गुडलक... गुडलक! इट इज रिअली अ लॅन्डमार्क!

तेथे तर 'फुल्ल' जेवणही मिळते. कित्येक दोस्ती तिथेच झालेल्या, कित्येक दोस्ती तिथेच संपलेल्या! कित्येक नाती वर्षानुवर्षे केवळ गुडलकच्या आधारावर!

आरसेच आरसे सगळीकडे! अरे हो! इराणी हॉटेल्सचा राजा या भागात नाही बरका? या भागात फक्त राणी! वजीर पार तिकडे... लकडी पूल क्रॉस केल्यावर... अलकाच्या चौकात... कॅफे रीगल! वीस पैसे देऊन हवे ते गाणे वाजवण्याची संधी देणारे त्या काळातले एकमेव हॉटेल!

आणि राजा?

कॅफे नाझ! आता कॅफे महानाझ! कॅम्प! अप्रतिम समोसे अन केक्स!

पण आपण इकडे चाललो आहोत नाही का? गुडलकवरून नटराज चौकात आलात की पहिली सलामी मिळते...

कॅफे सनराईझ! आता तिथे काय आहे काय माहीत? पण एक अत्यंत टापटीप असलेलं, इराणीच, पण भरपूर पदार्थ मिळणारं आणि ते पदार्थ स्वतः तिथेच बनवणारं असं हॉटेल! नंतर डोसा हट काय झाल, पिझा हट काय झालं! पण सनराईझ ते सनराईझ!

आणि सनराईझवरून.. अगदी पार संभाजी बाग, बालगंधर्व चौक वगैरेही पार करून, कलकत्ता बोर्डिंगमधील ताज्या कोळंबी मसाल्याचा वास नाकात भरून घेत पुढे पोचलात की एकदा डावीकडे बघून जंगली महाराज, पांचाळेश्वर वगैरे मंडळीना भाविकपणे नमस्कार करायचा अन लगेच त्यांच्याकडे पाठ फिरवून आत शिरायचे...

कॅफे सेन्ट्रल!

पुण्यातील डेक्कन व शिवाजीनगर विभागातील इराणी हॉटेल्सपैकी सर्वात सुमार दर्जाचे हॉटेल!

एका कटिंग चहावर तुम्ही दोन तास बसलात अन तुम्हाला उद्देशून कुणी नुसतं 'काय पाहिजे' असं वाक्य 'आता काहीतरी घ्या की? नुसते काय बसता' अशा अर्थाने विचारलं तरी बिनदिक्कत समजा... हे कॅफे सेन्ट्रल नसणारच!

तिथे वेटर्स अन मालक अन काउंटरवरचा इराणी ही सर्व मॅनेजमेंट नुसती एकमेकांत गप्पा ठोकत बसते. एखाद्या टेबलावरचा भरपुर धंदा सोडला तर बहुतांशी टेबले ही 'पडीक' पब्लिकने व्यापलेली असतात व त्या टेबलांवर दर पंधरा मिनिटांना कोणी ना कोणी एक चहा मागवतो. म्हणजे सहा जण बसले असतील तर त्यातला एक जण!

सिगारेटचे एक अख्खे पाकीट, सहसा दहा सिगारेटचे एक असते, तीन तासात एकाच माणसाने संपवले अशा गोष्टी इथे सहज घडतात. त्या तीन तासात त्या माणसाने केवळ चारच चहा घेतलेले असतात. किंवा सिगारेटचे एक पाकीट जर चार जणांच्या ग्रूपने आणले तर विसाव्या मिनिटाला काउंटरवर जोरात हाक मारून त्यातला कुणीतरी बोंबलतो.. दो लाईट किंगसाईझ! आधीच्या पाकिटाचा आता अ‍ॅश ट्रे झालेला असतो अन त्यात आधी असलेल्या सिगारेटींचा धूर केव्हाच जंगली महाराज रस्त्यावरून आकाशाकडे झेपावलेला असतो.

..... आत्ताही झेपावत होता...

महेश.. श्रीनिवास.. पेंढारकर.. यांच्या तोंडातून!

गेले तीन महिने.. तो प्रकार झाल्यापासून.. समीर अन महेशची लहानपणापासून असलेली अन समीरच्या बोचर्‍या वागण्याने अशक्तच राहिलेली मैत्री त्या दिवसापासून दास्ताने वाड्यातील दुसरी ऐतिहासिक मैत्री होण्याच्या मार्गावर होती. पिट्या अन श्री नंतर ही!

आणि 'समीर बरोबर फिरून येतो' या एकाच वाक्यावर महेश आता दररोज रात्री जेवणे वगैरे झाल्यावर दहा वाजता समीरसह चालत चालत किंवा सायकलवरून सेन्ट्रलला येत होता आणि गेल्या दोन महिन्यांपासून त्याला व्यवस्थित समजलेले होते की साठ पैशाला मिळणारी विल्स नेव्हीकट आत जाऊन अनेक दु:खांचा समाचार व्यवस्थित घेते. त्यामुळे आता तीन रुपये रोज रात्री असा खर्च वाढलेला होता अन कॉलेजमधे असताना रस्त्यावर चहा टपरीपाशी एखाद दोन चुकून ओढलेल्या विल्स गृहीत धरल्या तर साडे चार रुपयापर्यंत! आणि सिगारेटचा वास येऊ नये म्हणून दहा दहा पैशांच्या दोन बडिशोप खायच्या!

नैनाला कॉलेजला घेऊन जायची व आणायची जबाबदारी शीलाकाकूने नैनाच्याच वर्गातील मनीषा या जवळच राहणार्‍या मैत्रिणीवर सोपवली होती. ही मनिषा स्वभावाने अतिशय चांगली अन चांगल्या संस्कारांची मुलगी होती. तिला व तिच्या आईला शीलाकाकूने विश्वासात घेऊन सगळे सांगीतलेले असल्याने मनीषा नैनापासून अजिबात दूर होत नव्हती. इतकंच काय? नैना हातातील कागदाचा बोळा वगैरे कुठे फेकते का, काही खाणाखुणा वाटतील अशा अ‍ॅक्शन्स कुणाकडे पाहून करते का याकडे तिचे व्यवस्थित लक्ष होते. तेवढे सोडले तर नैनाला मान वर करून महेशच्या घराकडे पाहण्याचीही परवानगी नव्हती. एकदा ती घरात गेली की दुसर्‍या दिवशी सकाळपर्यंत दिसायचीच नाही. ती दिसते त्या वेळेला महेश काही ना काही कारण काढून तिला दिसेल अशा पद्धतीने उभा राहायचा. कधी खिडकीत तर कधी चक्क रस्त्यावर! पण एकदा राजाकाकानेच महेशला पाहिले अन सरळ श्रीला येऊन सांगीतले की तुमचा मुलगा रस्त्यावर माझ्या मुलीच्या मागे लागण्याचा प्रयत्न करतो. त्यावर श्रीने महेशला बरेच झापल्यामुळे महेश आता रस्त्यावर उभा राहण्यापासून दूरच राहात होता.

श्रीनिवासला महेशने समीरबरोबर रोजच रात्री फिरायला जाण्यात थोडेसे गैर वाटत असले तरी त्याला हेही जाणवत होते की महेश कोणत्या मनस्थितीत असू शकेल. महेशसाठी राजाकाकाबरोबर बोलणार होता. त्याला सांगणार होता की जातपात कसली पाळताय? दोघे एकमेकांना आवडतात. मुलगी समोरच राहील. महेश क्वालिफाईड झाला की त्याला उत्तम जॉब मिळेल. पण श्रीनिवास वेळ शोधत होता. कधीतरी राजाकाका छानपैकी एकटाच फिरायला बाहेर पडलेला दिसला की त्याच्याशी बोलायचं! आणि आश्चर्य म्हणजे ते टायमिंग गेल्या तीन महिन्यांत एकदाही जमलेलं नव्हतं. आणि नैनाच्या लग्नाबाबत कोणतीही विशेष खबर वगैरे नसल्याने श्रीनिवासला फारशी घाई नव्हती. त्याने गृहीत धरलेले होते की नैनाचे हे वर्ष संपल्याशिवाय काही लग्न होणार नाहीच आहे, तेव्हा घडलेल्या गोष्टींवर आणखीन थोडा काळ निघून गेला की बोचही कमी होईल अन राजाकाकाही नीट बोलेल.

शीलाकाकू वाड्यात अभ्यंकर आजी सोडून कुणाशीही बोलत नव्हती. आणि या गोष्टीचा अभिमान वाटल्यामुळे अभ्यंकर आजींनी जातपात, सोवळे बाजूला ठेवून सर्वांना दाखवण्यासाठी मुद्दाम शीलाशी घनिष्ट मैत्री केलेली होती. त्या बरेचदा शीलाकडे जायच्या यायच्या.

पण आज संध्याकाळी मात्र अत्यंत घाईघाईत राजश्री महेशकडे आली होती. श्री अजून यायचा होता. राजश्रीने महेशकडूनच समीरला हाक मारली व स्वरांमधली घाई लक्षात आल्याने समीर धावतच वर पोचला.

राजश्री - नैनाचा साखरपुडाय.. उद्या...

आकाश कोसळले होते महेशवर! हे हिला कसं कळलं?

महेश - तुला कसं माहीत?

राजश्री - राजाकाका केमिस्टच्या दुकानातून फोनवर कोणत्यातरी नातेवाईकाला आमंत्रण देत होते मगाशी! मी शेजारी आहे हे त्यांना माहीत नव्हतं. मी सगळं ऐकलं. नंतरही त्यांनी काही फोन केले. तुझ्या लक्षात येईल बघ! आज नैना कुठेच गेली नव्हती. शीलाकाकू मगाशी तिच्या त्या मैत्रिणीला घरात बसवून राजाकाकाबरोबर बर्‍याच पिशव्या घेऊन बाहेर गेलीय.

महेश - कुठे आहे साखरपुडा?

राजश्री - भोळे सभागृह..

महेश - ते कसब्यातलं?

राजश्री - हं!

सुन्न होऊन महेश समीरकडे पाहात होता. बराच वेळ तिघांची खलबते झाली. खलबते कसली? आपल्या असहाय्यतेवर चर्चा नुसती! काय करणार? वाड्यात कुणालाही काहीही माहीत नव्हते. तेवढ्यात श्री घरी आल्याने ही चर्चा एकदम थांबली. राजश्री निघून गेली. समीरबरोबर महेश फिरायला जायला खाली उतरला. त्यांना जाताना पाहून नेमके समोरून आलेली शीलाकाकू भोचक हासली. दोघेही वाड्याबाहेर निघून गेले.

अर्ध्या तासाने चर्चेतून काहीच निष्पन्न न झाल्यामुळे दोघेही घरी परत आले.

आता बाबांशी बोलणे खरोखरच आवश्यक होते.

महेश - बाबा...
श्री - हं..
महेश - तिचा साखरपुडा आहे उद्या...

श्री उडालाच! 'तिचा' म्हणजे कुणाचा हा प्रश्न विचारण्याची काही गरजच नव्हती. त्या दिवसापासून महेश कोणत्या विचारांमधे वावरतो हे त्याला दिसतच होते. 'अभ्यासावर लक्ष ठेव' या पलीकडे श्री त्याला काहीही बोलत नव्हता.

श्री - कोण म्हणलं?
महेश - राजूताई
श्री - तिला काय माहीत?
महेश - तिने ऐकल.. राजाकाकाने फोनवर कुणालातरी आमंत्रण देताना..
श्री - वाड्यात कुणालाच नाही बोलवलेलं..??
महेश - नसणार..

श्रीने निराश होत खांदे उचकले.

महेश - बाबा...

आपल्याच वडिलांना 'माझ्या प्रेयसीच्या वडिलांना भेटा' असे सांगणे किती अवघड असते याचा महेश अनुभव घेत होता. तेही या वयात सांगायचे?

महेश - ... तुम्ही एकदा.. भेटाल का राजाकाकाला?
श्री - .. .. भेटतो... लगेच भेटतो.. खरे म्हणजे आता वेळ हातातून गेलेली आहे.. पण तरीही भेटतो..

फक्त आपल्यासाठी आपले वडील कदाचित दुसरा अपमान सहन करायला, तेही मुलाचे वडील असताना, जाणार हे पाहून महेशला खरे तर वाईट वाटले. पण आता तो त्याच्या आयुष्याचा प्रश्न होता.

श्री चहाही न घेता प्रमिलाकाकूकडे गेला. शीला अन प्रमिला या दोघी आजवर खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. पवार मावशींचा तोफखाना अन अलीकडे कोमल सानेचा पोषाख हे त्या दोघींचे आवडते कॉमन विषय होते.

प्रमिलाशी श्री जवळपास दहा मिनीटे काहीतरी बोलत होता. महेश खिडकीतून पाहात होता. प्रमिला काकूची मान होकारार्थी हालल्याचे त्याने पाहिले अन त्याला जरा बरे वाटले. आत ते दोघे मानेकाकांकडे गेले. काहीच वेळात तिघेही जिना उतरत असताना पवार मावशींनी पाहिले. आपण मावशींना निदान हे सांगायला पाहिजे होते हे श्रीला जाणवले. तिघे वर आले. मावशींच्या घरात गेले.

श्री - मावशी.. नैनाचा साखरपुडा करतायत उद्या..
मावशी - ... काय सांगतोयस?
श्री - आम्हाला असं वाटतंय की राजाला एकदा भेटाव..
मावशी - उद्या साखरपुडा अन आज भेटणार?
श्री - आजच कळलं..
मावशी - मी येऊ का?
श्री - मावशी.. जरूर या.. पण.. तुमचा अपमान झाला तर मला आवडणार नाही..
मावशी - या दोघांचा झाला तर आवडेल का?
श्री - तसं नाही.. वहिनी अन शीला वहिनी मैत्रिणी आहेत.. मानेकाकांसमोर बोलायला राजा घाबरेल..
मावशी - ठीक आहे.. तुझ्या मनात नसेल तर नाही येत..
श्री - नाही नाही.. तसं मुळीच नाही... चला तुम्ही... पण.. तुम्हाला स्वतःला हे सगळं पटतंय ना?
मावशी - त्यात काय पटायचंय? मी स्वतः प्रेमविवाह केलेली बाई आहे त्या जमान्यात...

नैनाच्या घरात सगळे पोचले तेव्हा राजा अन शीला यांच्यावर जबरदस्त प्रेशर आलं.

प्रमिला - शीला वहिनी.. आम्ही विनंती करायला आलो आहोत. खरं तर.. अधिकार काहीच नाही आहे आमचा! हे आम्हालाही माहीत आहे. पण! महेशचं अन नैनाचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे. ते एकमेकांशिवाय नाही जगू शकायचे. तुम्ही प्लीज एक मिनीट विचार तरी करा. काय बिघडलं हे ब्राह्मण आहेत म्हणून? चांगला शिकलेला मुलगा आहे, मोठी डिग्री घेणार आहे. एकुलता एक आहे. सोनं होईल नैनाच्या आयुष्याचं! वहिनी, हा.. साखरपुडा... रद्द करा...

शीला अन राजा चमकलेच! हे चौघे आल्यावरच त्यांच्या मनात पाल चुकचुकली होती की साखरपुड्याचे वाड्यात समजले की काय? आणि आता प्रमिलाने सरळ प्रस्तावच मांडल्यावर त्यांना शॉक बसला.

शीला - हे पहा वहिनी.... तो विषय संपलेला आहे.. जातीबाहेर मुलगी दिली तर आमचे लोक हसतात आम्हाला.. थट्टा सहन करावी लागते.. मुख्य म्हणजे नैनाला एकसे एक स्थळं येत आहेत.. हे स्थळही खूप मोठं आहे.. नांव नाही सांगणार मी... पुण्यातलंच आहे.. पण सहा दुकानं आहेत त्यांची.. नैनाला बारावीच्या पुढे शिकवायला तयार आहेत.. तेव्हा आता हा विषय तुम्ही काढू नका अन आम्हालाही मनस्ताप देऊ नका.. खरे तर असे काही नसतेच तर तुमची हक्काने मी या कार्यात मदत मागीतली असती.. मागायची गरजच भासली नसती.. सगळा वाडाच धावला असता मदतीला.. पण वाडा आमच्या मुलीच्या सुखाच्या विरोधी चाललाय.. त्यामुळे मी कुणालाही निमंत्रण केलेलं नाही.. कृपया हा विषय काढून टाका डोक्यातून...

मावशी - शीला.. अगं त्या दिवशी झालं ते सोडून दे! वाड्यात भांडणं व्हायचीच! मी मराठी असून ब्राह्मणाच्या मुलाला लहानाचा मोठा केलाच ना? आमच्या जातीत कुणी हासल नाही मी मराठ्याशी लग्न केलं तेव्हा! मी तुला उपदेश करत नाही आहे.. पण असे विचार करू नकोस.. जात पात काही नसते. सगळी माणसे चांगली असतात. जितकं चांगल स्थळ आत्ता नैनाला चालून आलंय तितकच चांगलं स्थळ हेही आहे. राजा, तूही विचार कर! तुझं बाळ इथे वाड्यात, तुझ्या समोरच राहील कायम! मी तर म्हणते नवीन जागा घेतील अन राजाराणीचा संसार सुरू करतील फ्लॅटमधे! तुमच्या डोळ्यांचं पारण फिटेल.

राजा - नाही मावशी! तुम्ही म्हणताय आणि तुम्ही मोठ्या आहात.. आम्हाला तुमचा अपमान करायचा नाही.. पण आता हे शक्य नाही.. लग्नाची तारीखही ठरलेली आहे.. इतकं मोठं स्थळ आहे.. ते हातातून घालवणे शक्य नाही.. या पातळीला तर नाहीच नाही.. उद्या साखरपुडा अन आज कसा काय रद्द करायचा?

मानेकाका - अरे राजा! धाडस केलं तर सगळं शक्य आहे. आपण दोघे, तिघे त्यांना जाऊन भेटू हवे तर! पाय धरू त्यांचे! पण हे साहस करायला हवं तुला.. तुझ्या मुलीच सुख आहे त्यात.. आयुष्यभर ती तुला धन्यवाद देत राहील.. तुम्हाला दोघांनाही..

शीला - प्लीज.. आम्हाला माफ करा... हे आता शक्य नाहीये.. काहीही काय बोलता आहात? मुलीकडचे आहोत आम्ही.. आधीच ते जगतापांच स्थळ गेलंय.. हेही गेलं तर आमचं काय राहील?

श्री - राजा, आत्तापर्यंत मी तुला काहीच बोललो नव्हतो. आता बोलतो. मी मुलाचा बाप या भूमिकेतून बोलतो आहे. माझ्या मुलाचं तुझ्या मुलीवर निरतिशय प्रेम आहे. तिचंही त्याच्यावर तेवढंच प्रेम आहे. आपण सगळे मिळून कारण नसताना त्यांची ताटातुट करत आहोत. जात पात हे विषय पाळण्याची परिस्थिती आता राहिलेलीच नाही. कित्येक ब्राह्मण मांसाहार करतात, दारू पितात. कित्येक मराठा लोक कडक सोवळे पाळतात, शिकतात, नोकर्‍या करतात. ही सगळी चातुर्वर्ण्य व्यवस्था जेव्हा अस्तित्वात होती तेव्हा होती. ते युग वेगळं! हे वेगळं! कित्येक वर्षे मी आमच्या कंपनीतल्या देशमानेंचा अर्धा डबा खायचो. तेही माझा डबा खायचे. नैना अन महेश एकमेकांसोबत खेळलेले आहेत लहानपणापासून! त्यांचा जीव आहे एकमेकांवर! ती मुलगी आहे म्हणून जास्त बोलणार नाही. सोसत राहील. पण ते तुम्हाला जाणवणार नाही. की ती दु:खी आहे. कारण तुमच्यामते तुम्ही तिचं सगळं चांगलंच करत आहात. म्हणजे अर्थातच करत आहात, पण त्यात ही एक गोष्ट फार वाईट होतीय. एकदा माणूस संसारात रमला की पुर्वीचं सगळं विसरून जातो असं म्हणतात. पण नाही विसरता येत काही काही गोष्टी! लक्षात घ्या! वर्षसणांना, बाळंतपणाला नैना पुन्हा वाड्यात येणार! तेव्हा ती अन महेश एकमेकांना पाहणार! काय होईल त्यांच्या मनाचं? इतकं कुणी विसरू शकतं का सगळं? तुम्ही, आम्ही, सगळेच कुणावर ना कुणावर प्रेम करत असतातच. आपल्याला या प्रेमाचे महत्व माहीत असते. आपण त्या दोघांवर उगीचच अन्याय करत आहोत. अजूनही वेळ गेलेली नाही. साखरपुडा रद्द करण्यात तुमची बदनामी होण्याचा प्रश्नच नाही. कारण माझ्या मुलाचं स्थळ मुळात आहेच तुमच्याकडे! कोण कशासाठी करणार बदनामी? ही संधी शेवटची अन एकमेव संधी आहे राजा! यावेळेस माझं म्हणणं ऐक तू! तुझी मुलगी सून म्हणून घरात आल्यावर मी स्वतः तिला माझ्या मुलीप्रमाणे फुलासारखे जपेन! हवं तर लगेच यांचा साखरपुडा करू. हव तर महेशला डिप्लोमा झाल्यावर मी जॉब घ्यायला सांगतो. पार्टटाईम बी.ई. करेल तो! आज वेळ आहे हे सगळं करण्याची राजा! उद्या याच वेळेला तुझी मुलगी एका परक्या, अनोळखी मुलाशी कायमच्या नात्याने जोडली गेलेली असेल. तो मुलगा! ज्याच्याबद्दल तुम्हाला फक्त वरवर माहिती आहे. पुढे काय होणार ते माहीत नाही आहे. आपण दोघे वर्षानुवर्षे येथे राहतो. एकमेकांना ओळखतो. ऐक राजा, वहिनी, मी माझ्या मुलासाठी, त्याच्या सुखासाठी, मुलाचा बाप असूनही तुमच्याकडे हात जोडून आलो आहे. आजवरचे माझे वागणे तुम्हाला माहीत आहे. निर्व्यसनी, कष्टाळू, प्रामाणिक अन प्रेमळ असावे असेच संस्कार माझ्यावरही होते अन तेच महेशवरही आहेत. मी विनंती करतो, हात जोडून विनंती करतो.. एवढं माझं ऐका..

खूप वेळ सगळेच शांत बसलेले होते. खाली पाहात होते. कुणीच एकमेकांशी बोलत नव्हतं! फक्त मावशी एकट्याच अपेक्षेने शीलाकडे अन राजाकडे पाहात होत्या. बर्‍याच वेळाने राजाने तोंड उघडले.

राजा - ... नाही जमणार आता! दुर्दैवाने ती वे़ळ गेली श्रानिवास.. माफ करा आम्हाला.. शब्द दिलाय आम्ही मुलाकडच्यांना..

बाबांचा तेथून बाहेर पडतानाचा चेहरा पाहूनच महेशला खिडकीत उभा असतानाच समजले. अपयश पदरी आलेले आहे. त्याने बाबांना एका अक्षरानेही काहीही विचारायचे नाही असे ठरवले. किती त्रास द्यायचा त्यांना? काय तेच तेच सारखे विचारायचे? त्यांना त्यांच्या आयुष्यातील कोणत्या भावनिक गरजांसाठी आपली गरज भासते? कधीतरी ते म्हणतात का की महेश, जरा बस की इथे, आज फार एकटं एकटं वाटतंय! नैनापेक्षा, नैनाच्या प्राप्तीपेक्षा.. बाबा सुखी असणे सर्वात महत्वाचे आहे. आणि ते सुखी कधी होतील? जेव्हा आपण सुखी आहोत असे त्यांना दिसेल.

श्रीनिवास जिना चढून वर येताना त्याला 'महेशला हे कसे सांगायचे' ही काळजी अक्षरशः पोखरत होती तर ... आत जाऊन पाहतो तर महेश एकदम बाहेरचा शर्ट वगैरे घालून भांग बिंग पाडतोय अन गाणे गुणगुणतोय..

श्री - काय रे? कुठे चाललास?
महेश - मी इथेच.. समीरदादाबरोबर.. तुम्हाला इतका वेळ का लागला?
श्री - महेश.. त्यांना मान्य नाही आहे..
महेश - अहो मग साखरपुडा कोण मोडेल उद्यावर आलेला? मला वाटले कदाचित तुम्ही अन काही मोठी माणसे भेटलात त्यांना तर एखादी संधी आहे इतकेच.. मी कधीच त्याची आशा ठेवलेली नव्हती.. मी आल्यावर उशीरा जेवेन.. तुम्ही घ्या जेवून.. आणि बाबा.. एक सेकंड हॅन्ड टी.व्ही. आहे चार हजाराला.. मला वाटते घ्यायला हवा आपण ... बरं.. मला जरा उशीर होईल हां! साडे अकरा तरी वाजतील..

आरश्यात पाहात पाहातच महेश हे सगळं बोलत होता. आणि कोणत्या बापाला 'आपला मुलगा अभिनय करतोय' हे समजणार नाही? मग तो बाप कसला? श्रीला सगळे समजलेले होते. पायात चपला घालताना 'येतो हं' म्हणून क्षणभर महेशने श्रीकडे पाहिले. आणि श्रीने केविलवाणा चेहरा करून आपले दोन्ही हात फैलावले. तो क्षण! तो मात्र क्षण नाही जिंकता आला महेशला.. एखाद्या वर्षाच्या बालकाला आई दिसल्यावर ते आईकडे धावते तसा महेश बाबांच्या मिठीत शिरला. आता उंची दोघांची समानच होती. पण ... बाप मुलाचे नाते होते ते... अक्षरश: ओक्साबोक्शी रडत होता महेश! आणि श्रीच्या डोळ्यात पाणी नसले तरी घोर निराशा होती त्याच्या मनात! आपल्या मुलाला हव्या असलेल्या अनेक गोष्टींपैकी सर्वात महत्वाची गोष्ट, आयुष्याचा साथीदार आपण त्याला नाही मिळवून देऊ शकलो.

कित्येक.. कित्येक वर्षांनी बाबांना मारलेली ती मिठी! ती काय अशी सुटणार थोडीच?

आपल्याला वाचवण्याच्या प्रयत्नात आई जाणे, बाबांच्या डायरीत आपले उभे राहिल्याचे उल्लेख, आपल्याला आणलेली डबलडेकर, रागिणीच्या दहा पैशांवरून झालेले प्रकार, बाबांनी स्वतःला चटका लावून घेणे, आणलेला मेकॅनो, खोटीखोटी सर्कस, बाबांचा अ‍ॅक्सीडेन्ट, त्यात त्यांची तीन बोटे कायमची चिरडली जाणे, जुनी अन नवी सायकल, आपण केलेल्या चोर्‍या, त्यांचे पश्चात्ताप, मार्कशीट फाडून टाकणे, किर्लोस्कर कंपनीत जाऊन आपण बाबांच्या पाया पडणे, नैनासाठी बाबांनी केलेले सगळे प्रयत्न, सिगारेटची सवय.. सगळ्या सगळ्या आठवणी अश्रू होऊन पुरासारख्या वाहात होत्या श्रीच्या खांद्यावर गट्टूच्या डोळ्यातून.. शर्ट भिजून ओला झाला होता श्रीचा!

श्री - गट्टू..

ही हाक! ही हाक भावनांचा तीव्र कल्लोळ झाला असला तरच ऐकू यायची. 'गट्टू' म्हंटल्यावर महेश आणखीनच बिलगला बाबांना!

श्री - गट्टू.. मला नाही रे एवढं करता आलं तुझ्यासाठी... माफ कर..

प्रत्यक्ष जन्मदात्या बापाच्या तोंडून हे शब्द ऐकायची ताकद मुलात असू शकेल का कधी? महेश त्या खर्‍याखुर्‍या 'बापा'च्या अक्षरशः पाया पडला. कितीतरी वेळ दोघे नुसतेच समोरासमोर बसून होते. मग पुन्हा उठून श्रीने महेशचे डोळे पुसले. महेश अगदी स्वच्छ, स्वच्छ हासला. आता नैना मिळणार नव्हती. पण 'एक बाप' नव्याने मिळाला होता. नव्याने सापडला होता.

समीर बरोबर चालत वाड्यातून बाहेर पडला तेव्हा समीरने विचारले.

समीर - डोळे का रे असे?
महेश - .. अंहं
समीर - रडलास?
महेश - .. अंहं
समीर - हा हा हा!

आज कित्येक दिवसांनी समीर पुन्हा भोचक, बोचणारं हासला होता. असा का हासला काय माहीत? महेशला मनातून वाईट वाटले. पण समीरने गेल्या काही दिवसांत इतके सामर्थ्य दिले होते मनाला की आत्ताचे त्याचे ते तसे हासणे मनावरच घेतले नाही महेशने! खरे तर नैना या विषयाने त्याचे मन आत्ता इतके व्यापलेले होते की असले विचारच त्याला शिवू शकत नव्हते. समीरने रस्त्यातच घेतलेली सिगारेट चार झुरके मारून महेशकडे सरकवली. महेशने नकळत ती सिगारेट संपेपर्यंत ओढली. परत समीरला द्यायला हवी होती हे त्याच्या लक्षातच राहिले नाही. सामीर पुन्हा जोरात हसून म्हणाला.

"च्यायला संपवलीस होय रे बिडी? "

महेशला अपराधी वाटले. आता ते सेंट्रलला पोचलेले होते. आता दोघांच्याही समोर एक एक चहाचा कप अन बोटांमधे प्रत्येकी एक विल्स होती. पांचाळेश्वराच्या दिशेने आपल्या तोंडातील धुराची वलये जात असलेली पाहून महेशने तोंड वळवले. आणि.....

.... समीरने मगाचसारखच हसत हसत कॅफे सेंट्रलमधे बॉम्ब फोडला...

... " कदम आडनाव आहे त्यांचं! जाऊन भेटलो मगाशी.. म्हंटलं त्या मुलीचं आधीच वाड्यातल्या एकावर प्रेम आहे.. उगाच ती मुलगी सून करून आणू नका".....

कॅफे सेंट्रलचे आरसे तडकतील असे विधान होते ते!

आपले डोळे एवढे विस्फारता येऊ शकतात आणि अशी काही परिस्थिती निर्माण झाली तर तोंडातून एक अक्षरही न काढता आपण अर्ध्या तासात लागोपाठ तीन चहा घटाघटा पिऊ अन चार सिगारेटी फकाफका ओढू शकतो हे साक्षात्कार महेशला झाले.

आयुष्यातील पहिली शिवी त्याने आज अगदी नैसर्गीकपणे दिली. ती ऐकून तर समीर खदाखदा हसायलाच लागला. समीरवरील प्रेमातिरेकाने आणि क्षणात बदललेल्या परिस्थितीने महेशच्या तोंडातून ती शिवी अलगद बाहेर पडली होती. विल्सच्या अख्ख्या एका पाकीटाचा चुराडा करून ते निघाले तेव्हा महेशला समीरला डोक्यावर बसवून वाड्यात न्यावसं वाटत होतं!

पण! झोळीतून आणि रिक्षेतून न्यावं लागलं!

कारण वाड्यात ते पोचले तेव्हा खुद्द कदम, नैनाचे भावी सासरे अन त्यांचे बंधू शिंद्यांकडे आले होते. आणि सगळा प्रकार समजल्यामुळे मधूसूदन हातात काठी घेऊन उभा होता. आणि दिंडी दरवाजात समीर दिसताक्षणीच त्याने समीरच्या अंगावर अत्यंत क्रोधाने काठीचे तडाखे द्यायला सुरुवात केली होती. महेश, श्री अन मानेकाका समीरला वाचवायला धावत होते तर राजश्रीने तर स्वत:च दोन तडाखे खाल्ले होते. इतकेच काय, नैनाही ओरडून म्हणाली होती... मधू काका.. त्याला नका मारू! समीरच्या तोंडातून वेदनेचा एक उद्गारही निघत नव्हता अन प्रमिला गोठलेल्या डोळ्यांनी, मधूसूदनला काडीचाही विरोध न करता थिजल्यासारखी उभी होती.

समीरला दवाखान्यात न्यावे लागले. त्यावेळेस धावाधाव चाललेली असतानाएक क्षण असा आला...

की महेशला नैना कुणाचे लक्ष नाही असे बघून म्हणाली...

"एकदा भेट ना रे मला.. एकदाच भेटशील ना? एकदाच फक्त... पुन्हा नाही त्रास देणार"

नैनाचे लग्न समीरच्या आततायी प्रयत्नांनी मोडायला आलेले असताना मोडता मोडता वाचले होते.

या सगळ्या भयानक वळणांमधे एक गोष्ट कुणालाच समजली नव्हती...

...रामभाऊ कदम, नैनाचे भावी सासरे.. यांनी.. नैनाला महेशला उद्देशून ते वाक्य उच्चारताना स्पष्ट पाहिलेले आणि ऐकलेले होते........

गुलमोहर: 

<<<<<पायात चपला घालताना 'येतो हं' म्हणून क्षणभर महेशने श्रीकडे पाहिले. आणि श्रीने केविलवाणा चेहरा करून आपले दोन्ही हात फैलावले. तो क्षण! तो मात्र क्षण नाही जिंकता आला महेशला.. एखाद्या वर्षाच्या बालकाला आई दिसल्यावर ते आईकडे धावते तसा महेश बाबांच्या मिठीत शिरला. आता उंची दोघांची समानच होती. पण ... बाप मुलाचे नाते होते ते... अक्षरश: ओक्साबोक्शी रडत होता महेश>>>>>> अक्षरश:रडवलत हो आज.

मस्तच....अप्रतिम झालय हेही लिखाण....
त्यांना त्यांच्या आयुष्यातील कोणत्या भावनिक गरजांसाठी आपली गरज भासते?.........हं.....
अगदी खर आहे....विचार करण्यासारख आहे...

सावरी

बेफिकिर
खरंच आजचा भाग नेहमीप्रमाणे जास्त रंगला नाही! मला वाटतं कि कॅफे वर्णन अमंळ जास्त झाल आहे,
साखरपुड्याच्या प्रसंगानंतर मात्र तुम्ही परत नेहमीच्याच फॉर्म मध्ये आलात. तिथुन पुढे चांगली झाली अस वाटेस्तोवर संपली, म्हणुन असेल कदाचित! म्हणजे हे माझं आपलं व्यक्तिगत मत बरं!

रडवलतं आज.....अतिशय सुरेखं
श्रीच्या प्रयत्यांना यशं येऊ द्या.....

deeptiparab मनापासुन अनुमोदन..... <<<<<पायात चपला घालताना 'येतो हं' म्हणून क्षणभर महेशने श्रीकडे पाहिले. आणि श्रीने केविलवाणा चेहरा करून आपले दोन्ही हात फैलावले. तो क्षण! तो मात्र क्षण नाही जिंकता आला महेशला.. एखाद्या वर्षाच्या बालकाला आई दिसल्यावर ते आईकडे धावते तसा महेश बाबांच्या मिठीत शिरला. आता उंची दोघांची समानच होती. पण ... बाप मुलाचे नाते होते ते... अक्षरश: ओक्साबोक्शी रडत होता महेश>>>>>> खरच डोळ्यात पाणी आलं...... अप्रतिम बेफिकिर जी........

काही खरं नाही असं वाटत असतांनाच सकारात्मक नोटवर हा छोटासा पण नेटका भाग संपला...

तुमची आधीची "डिस्को" कादंबरी वाचत असतांनाच जाणवलेली तुमची पुण्याच्या 'चप्पे-चप्पेसे वाकिब' असलेली अचाट निरिक्षणशक्ती पुन्हा एकदा जाणवली. तुमचे 'कॉग्निटिव्ह मॅपिंग' अफाट आहे...मानलं तुम्हाला Happy

दिप्ती, तुम्ही quote केलेला पॅरेग्राफ खरोखर मनाला आरपार स्पर्श करणारा आहे. जेंव्हा जेंव्हा श्री आणि गट्टूचे असे प्रसंग लिहिलेले आहेत, त्या प्रत्येकवेळी ते मनाला असेच भिडले आहेत... नावाला जागणारी कादंबरी आहे ही अगदी!

खरय - रडवलत बेफिकीर . पवार मावशीन्चे गुढ कधीतरी सान्गा- त्या अशा का वागतात? पुर्वी त्या अशा विचीत्र वागण्यार्या नसाव्यात.

कॅफे वर्णन मधील वाक्यरचाना वाचकाला कथेचा बाहेर नते . ( मला गेला सराखे वाटले).
बकि कथा मस्त आहे.पुढे काय होणार याची उत्सुकता लागलीय.

सर्वांच्या प्रेमळ प्रोत्साहनाचे मनःपुर्वक आभार!

काही वर्णने उत्स्फुर्तपणे लिहीली गेली जसे इराणी हॉटेल्स! कारण ज्या ज्या गोष्टी माझ्या व्यक्तीगत आयुष्याशी निगडीत आहेत त्यावर थोडे जास्त व भरकटल्याप्रमाणे लिहीले जाते. क्षमस्व! यापुढे काळजी घेण्याची इच्छा! आहे.

कृपया असेच लक्ष ठेवावेत!

काही वाक्यांमुळे काही वाचकांचे डोळे ओलावले हे मी यश समजतो व त्याचे श्रेय त्याच वाचकांच्या संवेदनशीलतेला देतो.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

समिर दादा द हिरो, मस्तच रे.
Happy

गुड्लक, कॅफे सेन्ट्रल, पराडाईज, कलकत्ता, नाझ माहित होते पण नटराज आज नविनच कळाले, कलकत्ता बोडिग आता बंद झालय Sad