श्रीनिवास पेंढारकर - एक बाप - क्रमशः - भाग २६

Submitted by बेफ़िकीर on 6 September, 2010 - 06:43

महेशने चकार शब्दही तोंडातून काढला नाही मात्र नैनाला भयंकर शिव्या बसल्या. हे मंगळसुत्र अर्चना नावाच्या मैत्रिणीचं आहे ही थाप काही केल्या पचेना! कारण तसं असतं तरी ते आत्ता तिच्या जवळ का होत? ते मगाशी तात्यासाहेबांसमोरच पडलं असतं तर काय झालं असतं? मैत्रिणीने स्वतःसाठी विकत आणलेलं मंगळसुत्र तुझ्याकडे कसं काय? आणि ते जवळ ठेवून का वावरतीयस? यातल्या एकाही प्रश्नावर समर्थनीय उत्तर नव्हतं नैनाकडे! ती सांगत होती. अर्चनाने ठेवायला दिलं होतं! ती आज दुपारी मला भेटणार होती तेव्हा मी तिला ते परत देणार होते. ते खोटं, स्वस्तातलं आहे. ती बहुतेक पळून जाऊन लग्न करणार आहे. म्हणून लपवायला म्हणून तिने माझ्याकडे ठेवायला दिले आहे. तुम्हाला इतरत्र दिसलं असतं तर गैरसमज झाला असता म्हणून मी ते जवळच बाळगत होते वगैरे!

एवढं सगळं सांगूनही प्रमिलाकाकू, पवार मावशी अन स्वतः शीलाकाकू यांच्या चेहर्‍यावरचा संशय काही जात नव्हता. ही एवढीशी मुलगी असं मंगळसुत्र घेऊन कशी काय हिंडेल अन यात काहीतरी गोम आहे हे त्यांच्या चेहर्‍यावरून स्पष्ट दिसत होतं! शीलाकाकुच्या दृष्टिने 'हा प्रकार' सगळ्यांच्या समोरच झाल्यामुळे आता लाज बाळगण्याचे काही कारणच नव्हते. ती सरळ म्हणाली...

शीला - चल मला घेऊन अर्चनाकडे.. तिचंच आहे का विचारू..कुठे राहते ती?

बोबडीच वळली नैनाची! आता काय करणार? अर्चना नावाची जी मुलगी होती ती अन नैना फार चांगल्या वगैरे मत्रिणी नव्हत्या. नुसती ओळख होती. मात्र अर्चनाचे घर तिला माहीत होते. पण अर्चनासारख्या मुलीबाबत आपण असे बोलल्यामुळे आता खरच तिच्याकडे जायची वेळ आली अन मुळात अर्चना अत्यंत चांगल्या वागणुकीची मुलगी आहे याचा विचार करून नैनाला रडू कधीच यायला सुरुवात झाली होती.

या प्रसंगातून सुटका कशी करावी हे नैनाला समजत नव्हतं! तिने मदतीसाठी बाबांकडे बघत त्यांना सांगून पाहिलं!

"आता जी मुलगी पळून जाऊन लग्न करणार आहे तिच्या घरच्यांना जाऊन मंगळसुत्राबद्दल बोलणे योग्य होईल का बाबा?"

पण तिच्या चेहर्‍यावरूनच अन घाबरण्यावरूनच शीलाकाकूला कसला तरी संशय येऊ लागला होता. नैना अशी मुलगीच नाही आहे. की जी आपल्यापासून काही लपवून ठेवेल. पण ही बाब अशी आहे की ज्यात या वयातील मुली तशा वागू शकतील. शीलाकाकूने प्रथम सर्वांना बाहेर जायची विनंती केली. महेशसकट सगळेच घराच्या बाहेर आले. महेश वर येऊन हळूच आपल्या खिडकीतून नैनाच्या घराकडे पाहू लागला. भांडणाचे, रडण्याचे वगैरे आवाज येत आहेत का हे तो तपासून बघत होता. मात्र अंतर असल्यामुळे काहीच लक्षात येत नव्हतं! टेन्शन वाढू लागलं होतं! वाड्यातील चक्रे जरी सुरळीत चालू झाली असली तरीही निगडे काकू, मानेकाका अन मावशी यांच्यात अजूनही तात्यासाहेबांची गुर्मी अन नैनाकडे मंगळसुत्र सापडणे यावर चर्चा चाललेलिच होती. त्यात आता नंदा, प्रमिला अन कोमलही सहभागी झालेल्या होत्या.

नैनाला मात्र तिची आई आतल्या खोलीत घेऊन गेली होती. तेथे राजाकाकालाही प्रवेश नव्हता.

शीला - नैना.. इकडे बघ... हे बघ.. रडू नकोस..
नैना - ......
शीला - इकडे बघ... हे बघ.. मला सांग.. तात्यासाहेबांकडचे स्थळ तुला नको आहे का?

नैनाने रडत रडतच नकारार्थी मान हालवली. शीलाचा स्वर अतिशय शांत व प्रेमळ होता. नैनाला हळूहळू धीर येऊ लागला होता.

शीला - ठीक आहे.. आमचा काहीच आग्रह नाही.. त्यात काय रडायचंय? अगं आता तर कितीतरी दिवस बदललेत. आमच्या दोघांचा संसार सोन्यासारखा झाला म्हणून! पण आमच्या काळात तर मुलींना अंतरपाट बाजूला झाल्यावर दिसायचा मुलगा! तोपर्यंत माहीतच नसायचं की मुलगा कसा आहे दिसायला! बघ किती विचित्र काळ होता तो.. आता तुम्ही मुली कॉलेजला जाता, वेगवेगळे ड्रेस घालता, नटता! आमच्यावेळेस लग्न झाल्यावरही नवर्‍याशी चारचौघांमधे बोललो तर लोक टोमणे मारायचे माहितीय? तू कशाला काळजी करतीयस? आपण तुझं लग्न जगतापांकडे नाही करायचं हं?

नैनाचे रडणे आता थांबले.

शीला - मला सांग... तू कोणत्या कारणासाठी त्यांना नकार देतीयस? घाबरलिस का? इतकं मोठं कुटुंब अन शिक्षण सोडावे लागणार म्हणून? की माने आजोबांना ढकललं म्हणून रागवलीस? हे बघ? ती जगताप लोकं जर अशि असतील तर मी माझ्या मुलीला अशा ठिकाणी पाठवीन का कधी नांदायला?

नैनाने आता शीलाला मिठी मारली.

शीला - रडू नकोस... वेडी आहेस का? अगं हे बघण्याचे कार्यक्रम असे होतातच! आमच्यावेळेस काही जणींचे तर कित्येक कार्यक्रम व्हायचे. पसंतच पडायच्या नाहीत काही ना काही कारणाने! मग त्यांचाही आत्मविश्वास जायचा! त्याही रडायच्या. तुझा तर आजचा पहिलाच प्रसंग! अन तू दिसायला नीटस आहेस. कुणालाही पसंत पडशील. इतकंच काय? जगतापांनाही होतीसच की पसंत? प्रश्न फक्त या तात्यासाहेबांचाच होता. पण असा माणूस घरात असेल अन त्याच्या तंत्रानेच सगळं चालणार असेल तर आम्ही कसं करू तुझं लग्न तिथे? रडू नकोस..

नैनाला आता खूपच धीर आला होता. मुख्य म्हणजे मंगळसुत्राचा विषय, ज्याच्यामुळे ती रडत होती, तो मागे पडलेला होता. पण नाही... आई ती आईच...

शीला - नैना.. घाबरू नकोस... मी काही म्हणणार नाही.. पण.. हे मंगळसुत्रं अर्चनाचं नाहीये ना?

अत्यंत उदास, फटफटीत चेहर्‍याने नैनाने आईकडे पाहिले. आईला आपल्या नुसत्या चेहर्‍यावरून अन देहबोलीवरून खरे खोटे समजलेले आहे याची जाणीव तिला झाली. मुख्य म्हणजे, आईने आपल्याला आत आणलेले आहे ते 'जगतापांचे स्थळ नकोच' हे सांगायला नाही तर मंगळसुत्राचीच चौकशी करायला आणलेले आहे ही भयावह जाणीवही झाली. तरीही नैना खोटे बोलली. यावेळेस तर तिचा खोटे बोलतानाचा आवाज सरळ सरळ 'खोटे बोलतीय' हे दर्शवणाराच होता.

नैना - तिचंच आहे... मग... कुणाचं?

शीला क्षणभर नैनाच्या केसांमधून प्रेमाने हात फिरवत राहिली.

शीला - माझ्याशी खोटं बोलतेस?

शीलाचा स्वर अजूनही शांत होता. मात्र नजर नैनाच्या नजरेत अधिकाराने मिसळलेली होती. केसांमधून फिरणार्‍या हाताचा वेग अर्ध्याहूनही कमी झालेला होता.

नैना - .. असं काय करतेस?

शीला - मला माहीत आहे...

नैना - ..क्...काय..?

शीला - ते मंगळसुत्र तुझं आहे ना?

नैना - माझं????? माझं कसं असेल???

शीला - तेच तर मला विचारायचंय??? घाबरू नकोस.. सांग मला.. अजिबात लाजायचं, घाबरायचं कारण नाही.. मनात कुणी असलं तर बिनदिक्कत सांग... दोन, चार वर्षे थांबूनही आपण तुझं लग्न करून देऊ शकतो... आम्ही घाई करत होतो ते जगतापांचं स्थळ मोठ स्थळ आहे म्हणून.. पण इतकी काय, मुळीचच घाई नाहीये आपल्याला.. सांग.... कोण आहे तो??

नैना - अगं काय बोलतीयस आई? हवं तर आत्ता अर्चनाकडे चल.. तीच तुला खरं खोटं सांगेल..

शीला - नको.. अर्चना की कोण ते मला माहीत नाही.. पण मी तिला या बाबत भेटणे चूक आहे.. आणि मुख्य म्हणजे.. मी तुला जन्म दिलेला आहे.. तुझ्या चेहर्‍यावर इतकासा जरी बदल झाला तरी मला तुझ्या मनात काय आहे ते समजते...

आता नैना पुन्हा रडू लागली.

शीला - तू उगीचच घाबरून रडतीयस.. अगं हे असं याच वयात होतं.. त्यात काय घाबरायचंय? आवडतंच कुणीतरी.... चांगल्या घरचा, चांगल्या वळणाचा.. व्यवस्थित मुलगा असला की झालं.. आम्ही काय तुझं सुख पाहणार नाही का?

आतल्या डायलॉग्जचा हा टप्पा आलेला ऐकून राजाकाकाही आत आला. वडिलांसमोर तर त्या मुलाचे नाव घेणे नैनाला शक्यच नव्हते. म्हणून शीलाने राजाकाकाला बाहेर जायला सांगीतले अन दार लावून घेतले.

बराच वेळ पलंगावर आडव्या झालेल्या अन हळूहळू रडायची थांबलेल्या नैनाच्या केसांमधून अजूनही तिची आई हात फिरवत होती. नैनाच्या चेहर्‍यावरून 'ती आता नक्कीच काही वेळात त्या मुलाचे नांव सांगणार आहे' याची शीलाला खात्री झालेली होती. त्यामुळे एक अक्षरही न बोलता ती फक्त नैनाकडे शांतपणे बघून तिच्या केसामधून हात फिरवत तिला थोपटत होती. तब्बल पाच, सात मिनिटांनी नैना उच्चारली..

नैना - कमावता नाही आहे.. शिकतोय...
शीला - कॉलेजमधे आहे का?
नैना - अंहं... तो इन्जीनीयर होणार आहे...
शीला - मग काय तर?.. कोण आहे तो?
नैना - तू ओळखतेस...
शीला - मी???? मी ओळखत??? कोण गं??
नैना - वाड्यातलाच आहे...

खट्ट! खट्टकन शीलाचा हात थांबला. नैनाने पराकोटीच्या भीतीने आईकडे पाहिले. आईचा डोक्यावरून फिरणारा हात असा खट्टकन थांबण्याचा अर्थ तिला व्यवस्थित समजलेला, जाणवलेला होता. वाड्यात सध्या इंजीनीयर होणारा आणि लग्न होण्यास काही काळ राहिलेला असा एकच मुलगा होता हे आईला व्यवस्थित समजल्याचे नैनाच्या लक्षात आलेले होते...

'महेश... श्रीनिवास... पेंढारकर..'

शीला - ... नैना.... तू... महेश????

नैनाने लाजून उलटीकडे मान फिरवली व उशीत डोके खुपसले. तिला जे नेमके नको तेच झालेले होते. महेशचे नाव घेताना आईचा आवाज असा काही झालेला होता जो नक्कीच सकारात्मक नव्हता. आणि तिला तिच्या अन महेशच्या बाबतीत नेमकी स्वतःच्या आईचिच सर्वाधिक भीती वाटत होती.

शीला - ... नैना.. इकडे बघ...

नैनाने शीलाच्या ताकदीने मान वळवण्यामुळे एकदा आईकडे पाहिले. प्रचंड घाबरलेली नैना आईच्या चेहर्‍यावर कुठेतरी महेशसाठी होकार दिसतो का हे शोधत होती. .. नव्हता... होकाराचा लवलेशही नव्हता...

शीला - एकदा तुझ्या तोंडून नाव घे त्याचं...

नैनाला लाज वाटली. आईसमोर आपल्या प्रियकराच नाव घ्यायचं अन तेही आईलाच ऐकायचं आहे म्हणून? याची काय गरज होती? पण एका आईच्या दृष्टीने हे अत्यंत महत्वाचे होते. आपल्या मुलीच्या बाबतीत आपली कोणतीही चूक, गैरसमज होऊ नये यासाठी प्रत्येक डिटेल्स तपासूनच पुढे जाणे आवश्यक होते.

शीला - नैना.. बोल...

नैना - काय बोलू आई.. तू ओळखलच आहेस की?

शीला - महेश?

नैना - हं!

शीला - ते ब्राह्मण आहेत नैना... हा विचार लवकरात लवकर सोड अन शिक्षणाकडे लक्ष दे... यापुढे ही चर्चा मला घरात नको आहे..

नैनाला होती तशी सोडून शीला बाहेर गेली खोलीच्या! यावेळेस मात्र तिला स्वतःच्या मुलीकडे, तिच्या मनाकडे बघावेसे वाटले नाही. यावेळेस तिला स्वतःचा इगो महत्वाचा वाटला.

....ते ब्राह्मण आहेत नैना....

..लवकरात लवकर हा विचार सोड.. यापुढे हा विषय काढायचा नाही...

तापलेले दाभण कानात घुसवावे तसे ते शब्द नैनाला ऐकू आले होते... येतच राहिले होते.. आणि.. ते शब्द पुन्हा पुन्हा जाणवत आहेत असा भास होऊन... नैना.. होती त्याच पलंगावर बेशुद्ध पडली.. जवळपास एक तास... शीला अन राजाकाका बाहेरच्या खोलीत चर्चा करत होते... महेश पेंढारकर हे स्थळ त्यांना कोणत्याच दृष्टीकोनातून मान्य होत नव्हते....वय, जात, शिक्षणाची पूर्तता व्हायला लागणारा काळ, नोकरी लागायला लागणारा काळ, आर्थिक परिस्थिती.. अनेक घटक... सगळेच घटक विरुद्ध होते... दोनच सोडून.. एक म्हणजे महेश दिसायला नैनाला शोभणारा होता.. आणि पेंढारकर पिता पुत्र दोघेही वागायला अत्यंत चांगले आहेत हे राजाकाका अन शीलाकाकूला माहीत होते... पण त्या बेसिसवर लग्न ठरवणे शक्यच नव्हते.. कारण ते घटक अधिक इतर कित्येक घटक चांगले असलेली कित्येक स्थळे मिळाली असती... मुख्य म्हणजे .. जातीतली.. आणि हे सगळे चाललेले असताना नैना आत बेशुद्ध पडलेली होती हे त्यांना माहीतच नव्हते. संध्याकाळच्या चहाच्या वेळेस ते शीलाकाकूच्या लक्षात आले. तिने पाणी मारून नैनाला उठवले. त्या रात्री नैनाचे नखही महेशच्या नजरेस पडले नाही.

दास्ताने वाड्यात त्या रात्री झोपायच्या वेळेस अनेक माणसे दु:खी झालेली होती. मानेकाका, कारण त्यांना ढकलून दिले होते सकाळी तात्यासाहेबांनी! निगडे काकू अन मावशी! कारण शीलाने रागाच्या भरात दोघींचा अपमान केला होता. शीला अन राजाकाका! कारण जगतापांचे इतके चांगले स्थळ गेलेले होते.. अर्थातच, तात्यासाहेबांच्याच खोटारडेपणामुळे, हे त्यांना मान्य होते! नैना! कारण तिचं तर सगळं आयुष्यच संपल्यात जमा होतं! तिला तर 'आपण खूप रडावं' असंही वाटत नव्हतं! ती आता फक्त पांढर्‍या फटफटीत चेहर्‍याने समोर शुन्यात बघत बसली होती. तिच्या नेहमीच्या खोलीतील खिडकीतून ती पेंढारकरांच्या खिडकीकडे बघू शकत असेल याचा अंदाज संध्याकाळीच शीलाकाकूला आला होता. तिला पुसटशी महेशची आकृतीही तिथे उभी असल्यासारखे वाटले होते.

आणि महेश? श्री येईपर्यंत खिडकीतून जरासाही हालला नव्हता. काय चाललंय तेच समजत नव्हतं! शीलाकाकूने नैनाशी खासगी बोलण्यासाठी जिथे आजीलाही घरातून बाहेर जायची विनंती केली तिथे आपण कसे काय जाणार हे त्याला समजत होतं! पण क्षनोक्षणी वाटत होतं की तिथे जावं, दार वाजवावं अन विचारावं! विचारावं कसलं? सांगावंच! तुमच्या नैनाशी मी लग्न करणार आहे...

पण ही हिम्मत होणे शक्यच नव्हते. अजून महेशला वाड्यात कुणी सिरियसली घेणेच शक्य नव्हते. त्यात श्री असताना महेशचे बोलणे कोण मनावर घेणार?

साडे नऊ वाजता शिंद्यांकडचा स्वयंपाक झाला अन शीलाने नैनाला जेवायला बोलावले. नैना अक्षर बोलत नव्हती की प्रतिसाद देत नव्हती.

शीला - नैना.. चल आता.. विचार करू नकोस..
नैना - ....
शीला - अगं असली आकर्षणं होतातच या वयात... पुढे खूप मोठं आयुष्य आहे... प्रेम म्हणजे असं नसतं.. ज्याच्याशी आपली गाठ बांधली जाते ना? त्याच्यावर असतं तेच खरं प्रेम.. चल.. विचार करू नकोस.. हळुहळू सगळ्याचा विसर पडेल..
नैना - ...
शीला - चलतीयस का? थांबलोयत आम्ही..
नैना - ......
राजाकाका - चल बाळ.. दोन घास खाऊन घे... बाकीचा सगळा विचार उद्या करूयात...
नैना - ....
शीला - अगं तुला समजत नाहीये का? आम्ही तुझे शत्रू आहोत? आम्ही करू ते तुझ्याच चांगल्यासाठी करू ना? तो मुलगा अजून शिकतोय, इंजीनीयर होणार की डिप्लोमाच राहणार ते माहीत नाही, नोकरी कुठे, कशी लागणार, केव्हा लागणार, काही माहीत नाही..अशाबरोबर आत्तापासून नातं ठरवून ठेवायचं अन उद्या काही भलतंसलतं झालं तर? विश्वास ठेव! आम्ही कित्येक पावसाळे जास्त पाहिलेले असतात नैना.. आईवडिलांनी! ही असली, या वयातली प्रेमं अन त्यांचे परिणाम सगळं भोवताली बघितलेलं असतं! लग्न झाल्यावर तुलाच वाटेल.. आपण महेशवर प्रेम बिम काहीही करत नव्हतो.. हे साधं आकर्षण असतं नैना.. बाकी काहीही नाही..चल.. चल आता जेवायला..

नैना - तुम्ही जेवा.. मला भूक नाही..
शीला - असं नाही करायचं.. बघ बाबा थांबलेत जेवायचे..
नैना - तुम्ही घ्या गं जेवून...
शीला - तू काय करणारेस? अशीच एकटी कुढत बसणारेस? आम्हाला गोड लागेल का घास?
नैना - मी अशीच बसणार नाहीये...
शीला - ..मग?
नैना - मी अन महेश पळून जाणार आहोत.. संधी मिळेल तेव्हा..

खाड! खाडकन आवाज झाला! तेवढा मात्र अख्ख्या दास्ताने वाड्याने ऐकला. महेश खिडकीत उभा होताच! घरी केव्हाच आलेल्या श्रीला सकाळचा प्रसंग जरी मावशींनी सांगीतलेला असला तरी नैनाकडचे मंगळसुत्र आपल्या दिव्य वंशाच्या दिव्याने दिलेले असेल याची सुतराम कल्पना नव्हती श्रीला!

साडे नऊ वाजताच्या शनिवार पेठीय शांततेत तो आवाज घुमला मात्र नैनाच्या तोंडातून एक अक्षरही उमटले नाही. ती तशीच शांतपणे बसलेली होती. मात्र शेजारच्या घरातून नंदा अन इकडून प्रमिला बाहेर येऊन भययुक्त कुतुहलाने शिंद्यांच्या घराकडे बघत होत्या. दार बंदच होते. पुढे कसलीच बडबड, आवाज नसल्याने नंदा अन प्रमिला दार वाजवण्याच्या भानगडीतही पडत नव्हत्या. आणि तेवढ्यात...

तेवढ्यात तो प्रकार झाला... अचानक दार उघडले नैनाच्या घराचे.. आणि ओक्साबोक्शी रडत नैना दाराबाहेरच्या मोकळ्या जागेत असलेल्या एका कट्यावर डोके ठेवून रडू लागली. आज किरण ऑफीसमधून उशीरा आला होता. आल्यावर त्याने दिंडी दरवाजा आतून लाव्न घेतला होता अन मागे वळून पाहतो तर नैना रडतीय! त्याला काहीतरी विचित्रच शका आली म्हणून तो धावत शिंद्याच्या घराच्या दारापर्यंत गेला. तोवर प्रमिला अन नंदा नैनाकडे धावल्या होत्या. नैना अन महेश हे प्रकरणच कुणाला माहीत नव्हते. आणि ते कुणाला माहीत व्हावे अशी शीलाकाकुची अजिबात इच्छा नव्हती. खरे तर कधीच कुणाला माहीत होऊ नये अशी तिची इच्छा होती. आणि नैना धडपडत बाहेर येऊन रडण्याचे कारण वेगळेच होते. आईने मारल्यावर क्षण, दोन क्षण तशिच बसलेली नैना 'पळून महेशकडे जायचे वेडे साहस करण्यासाठी' म्हणून दाराकडे धावायला उठली तेव्हा शीलाशी तिची झटापट झाली होती अन त्यात शीलाचा हात झिडकारून ती सरळ दार उघडून बाहेर पडली मात्र.... !

बाहेर पडल्यावर क्षणात तिला सगळीच जाणीव झाली. हे जग म्हणजे फक्त आपण आणि महेश नाही. यात एक दास्ताने वाडा आहे. त्यात आपलेच सगळे लोक राहतात. सगळ्यांसमोर आपण या वयात महेशला हाक मारणे अन तेही रडत रडत हे अत्यंत चुकीचे ठरेल. त्यात आपल्याच आईवडिलांची नाचक्की आहे. यामुळे एकदाही महेशच्या खिडकीकडे न बघता ती हमसून हमसून रडत होती.

मात्र! हा प्रकार वाड्यातील यच्चयावत माणसे, अगदी विद्याचा तीन वर्षांचा अभिरामही पाहात होता. नाचक्की ऑलरेडी झालेलीच होती. सगळे बाजूने जमलेले होते. श्री सुद्धा वरून पाहात होता. त्याला हे सगळे अचानक घदलेले अन त्यामुळेच अनाकलनीय वाटत होते. मात्र महेश झपझप खाली उतरत होता.

आणि प्रमिलाने नैनाशी बोलायला सुरुवात केली. शीलाकाकू अन राजाकाका धावत तेथे येऊन तिला ओढून न्यायचा प्रयत्न करत होते अन ती आत जायला अजिबात तयार नव्हती. तिला वाचवायचा प्रयत्न प्रमिला अन नंदाआत्या करत होत्या. त्यात आता विद्याही मधे पडली अन म्हणाली 'हिला का मारताय'!

राजश्रीताई धावत तिथे येन पोचली. समीरदादा आधीच तेथे उभा होता. नैना ही एक मुलगी असल्यामुले तो मधे पडला नव्हता एवढंच!

राजश्रीने अणूबॉम्ब फोडला! बिनदिक्कत! तिची भूमिका सरळ होती. एक समवयीन मुलगी असूनही तिला नैनाची नाचक्की करतोय असे मुळीच वाटत नव्हते. तिचा हेतू अत्यंत चांगला होता. नैनाचे अन महेशचे एकमेकांवर प्रेम आहे हे जाहीर करून ती सगळ्या वाड्याचा सपोर्ट त्या गोष्टीसाठी मिळवणार होती.

"मला माहितीय हिला का मारतायत.. त्यांना हिचं लग्न महेशशी होऊ नये अस वाटत असणार बहुतेक"

या वाक्याचा अर्थच नीटसा समजायला त्या वाड्याला काही क्षण लागले.

हिचं लग्न महेशशी? हे काय भलतंच? आपल्या वाड्यात एक प्रेमकहाणी होती?

वरून श्री तीरासारखा धावला.

श्री - काय म्हणालीस????
राजश्री - काका.. हे दोघं एकमेकांवर भयंकर प्रेम करतात... तुम्ही यांच्या बाजूनेच व्हा..
श्री - महेश????

ती नजरानजर! केवळ क्षणार्धापुरती झालेली ती नजरानजर!

मुलाने बापाच्या नजरेला दिलेली ती नजर! एका वयात आलेल्या मुलाने आपल्या प्रेमाचा भांडाफोड वडिलांसमोर झाल्यानंतर वडिलांच्या नजरेला दिलेली ती नजर!

श्री एखाद्या पुतळ्यासारखा स्तब्ध होता. फक्त! तो पाहात महेशकडे नव्हता. तो पाहात होता त्याच्या जीवलग मित्राकडे! आधारासाठी! पिट्याकडे... मधूसूदन कर्वेकडे..!

मधू धावला!

मधू - महेश... हे खरंय का?

वडिलांना उत्तर देण्यापेक्षा हे खूपच सोपं होतं! क्लेष तरी कमी होणार होते. महेशने मधूकाकाच्या नजरेला नजर देऊन सांगीतले..

महेश - हो..

जे धाडस नैनाने केलेले होते तेवढेच, किंबहुना त्याहूनही जास्त धाडस महेशने केलेले होते. नैनाने ते फक्त आपल्या आईला सांगीतलेले होते. महेशने अख्ख्या वाड्याला! वडिलांसमोर!

श्रीनिवास हतबुद्ध होऊन प्रमिलाकडे पाहात होता. तेवढ्यात कुणीतरी विधान केले.. ओह! कोमल! कोमल बिनधास्त होतीच!

कोमल - वाईट काय आहे म्हणते मी ? इन फॅक्ट इट्स अ व्हेरी गुड मॅच..

तिचं इंग्लीश वाक्य समजलं नसलं तरी बहुतेकांना हे समजलेलं होतं की ती या गोष्टीच्या बाजुने आहे. श्रीला भूमिकाच ठरवता येत नव्हती. त्याच्या दृष्टीने हे जे काही चाललेले आहे ते अत्यंत धक्कादायक होते. महेशचे अजून वयच नव्हते. त्याचे शिक्षण खूप व्हायचे होते. पण.. शिक्षणात तो मागे मुळीच पडत नव्हता हेही श्रीला आठवत होते. फक्त, ही परिस्थिती अशी विचित्र पद्धतीने समोर यायला नको होती. वास्तविक पाहता, नैना शिंदे या मुलीवर श्रीचेही मनापासून प्रेम होते. कारण! लहानपणी कित्येकदा श्री वाड्यात नसताना महेश तिच्याच बरोबर तासनतास असायचा. एक प्रकारचा आधारच होती ती महेशचा! मात्र त्यांचे हे प्रकरण कधीच कसे डोळ्यात आले नाही हेच त्याच्या लक्षात येत नव्हते.

राजश्रीताईने लहान तोंडी मोठा घास घेतला.

राजश्री - कोमलकाकू म्हणते तेच बरोबर....

बेरीकाकूंनी राजश्रीताईच्या पाठीत जोरदार धपाटा मारला. राजश्री अपमानाने रडू लागली. त्यामुळे तिचा धाकटा भाऊ गणेश नुसताच बावरून बघत राहिला. बेरीकाकांनी राजश्रीला 'यात तू बोलू नकोस' असे सांगीतले. तेवढ्यात कुमार बोलला...

कुमार - आय अ‍ॅग्री टू... वाईट काय आहे?

मधूने श्रीकडे पाहिले. श्री अजूनही खिळूनच उभा होता.

राजाकाका आता जबाबदारीने पुढे आला. शीलाकाकू हिंस्त्र चेहरा करून अबोलच झालेली होती. नेमके नको तेच झाले होते. राजश्रीमुळे सगळ्यांनाच हा प्रकार समजला होता. बदनामी झालेली होती. बेरीबाईंनी राजश्रीला मारलेला धपाटा ही शिक्षा शीलाला अत्यंत नगण्या वाटत होती. एक समवयीन मुलगी असूनही राजश्रीने केलेल्या या घोर अपराधासाठी शीला तिला थोड्याच वेळात चांगलीच शिक्षा देणार होती.

राजा - पेंढारकर, सॉरी, हे मलाच माहीत नव्हते.. नाहीतर वेळीच काळजी घेतली असती..

मुलीचा बाप असून हा माणूस इतका नम्रपणे का वागतो आहे हे शीलाला समजेना! ती पुढे झाली.

शीला - सॉरी कसलं सॉरी? तुम्ही यांना सॉरी म्हणताय? बदनाम केलं यांच्या मुलाने आपल्या मुलीला? तुम्हाला काही समजतंय का? इतकी नालायक माणसं आहेत या वाड्यात हे माहीत असतं तर राहायलाच आलो नसतो... आयुष्य नासलं माझ्या मुलीचं!

नैना आता आणखीनच रडू लागली. आयुष्य नासण्यासारखं काहीच झालेलं नसलं तरी एकदोनदा ती अन महेश खरच भेटले होते एकांतात!

शीलाचं बोलण ऐकून श्रीनिवास हादरला.

राजा - अगं शीला.. हे सभ्य गृहस्थ आहेत.. अन तू महेशलाही काय आज ओळखतेस का? हे सामोपचाराने मिटू शकतं! हे नुसतं आकर्षण आहे पेंढारकर.. तुम्ही तुमच्या मुलाला समजावा, आम्ही आमच्या मुलीला समजावतो..

अभ्यंकर आजी - पण हे या वयात असले उद्योग? श्री, तू असतोस बाहेर, मुलगा वाया जाईल.. इतरांच्या मुली बदनाम होतील..

अभ्यंकर आजी या स्वभावाने वाईट होत्या. उगाचच देव देव करून सोवळ्यात राहायच्या! मधूसूदन रागावला.

मधू - आजी.. तुम्ही यात पडू नका..
अभ्यंकर आजी - तू कोण रे टिकोजीराव मला सांगणारा? नाही मुलाचा बाप नाही मुलीचा?

शीलाला अभ्यंकर आजींचा फार मोठा आधार वाटला. किरण महेशकडे गेला.

किरण - महेश.. अजून शिक्षण भरपूर आहे.. ते सगळं झालं की मग या गोष्टींचा विचार करायला हवा खरा तर.. पण आता तुमच्या दोघांच्या मनात असेल अन घरच्यांची परवानगी असेल तर काही वर्षे थांबून लग्न करायला हरकत नाही.. हवं तर साखरपुडा आधी करून घेता येईल..

श्रीनिवास - महेश, हे सगळं कधीपासून चाललंय?

महेश - ....

श्री - काय विचारतोय मी?

महेश - दोन.. वर्ष!

सगळेच हादरले. दोन वर्षे एह दोघे एकमेकांवर प्रेम करतायत? आणि कुणालाच कळलं नाही?

अभ्यंकर आजी - हे कळलं कसं नाही गं शीले तुला..
शीला - या बेरीण बाईच्या मुलीला माहिती असेल की? त्याशिवाय का गरळ ओकली तिने? जसे आईबाप तशी मुलगी...

वास्तविक बेरी काकू अन बेरी काका अत्यंत शांत स्वभावाचे होते. पण आत्ता बेरी काका चिडून बोलले.

बेरीकाका - शीला वहिनी.. राजश्रीला नका बोलू.. करायचे ते प्रताप तुमच्याच मुलीने केलेत..

हे वाक्य ऐकून 'बघ, बघ, जग कसं बोलतंय, ऐकलंस ना?' असे विचारत शीलाने नैनाला आणखीन धपाटे घातले. ती आणखीनच रडू लागली. महेश मधे पडने शक्य नव्हते. समोर आपले वडील उभे आहेत म्हंटल्यावर त्याचे साहसच झाले नसते. नंदा आत्या, प्रमिला काकू अन राजाकाकाने शीलाकाकूला आवरले.

शीला मोठ्याने रडू लागली. भर वाड्यात रात्री दहा वाजता आपल्या मुलीच्या इज्जतीचा पंचनामा होत असताना पाहून तिला आत्ता नष्ट व्हावेसे वाटत होते.

नंदा आत्या - शीला, रडण्याचं कारण नाही. श्रीचाच मुलगा आहे तो.. अत्यंत चांगलं घर आहे.. इंजिनियर होणार आहे.. रडतीयस कशाला? मान्यता दे की?

शीला - नाही.. मी माझ्या मुलीचं लग्न गरीबाघरी का करू? मला हवं तिथेच करणार मी..

अधिक तमाशा नको म्हणून आता राजाकाका नैनाला उठवून घरी घेऊन जायला लागला. शीलालाही तेच हवं होतं! एका रात्रीत नैनावर घरातल्या घरात प्रेशर आणून वगैरे तिचं मन बदलून उद्यापासून तिच्यासाठी ताबडतोब स्थळ शोधायचं शीलाने मनात आखलेलं होतं.

'गरीबाघरी'! श्रीचा असा उल्लेख केलेला पाहून खरे तर मधूसूदन भडकलेला होता. पण प्रमिला शांत स्वरांमधे म्हणाली.

प्रमिला - वहिनी, भावजी गरीब नाहीयेत.. भरपर्‍ सेव्हिंग आहे त्यांचं! तुमची मुलगी सुखात राहील, वाड्यातच, तुमच्या डोळ्यांसमोरच राहील. आणि.. मुख्य म्हणजे मनाने खूप श्रीमंत असलेले लोक आहेत ते!

शीला - तुम्ही नका हो सांगू काही.. तुम्हाला स्वत;ला मुलगी असती म्हणजे मुलीच्या आईचं दु:ख कळलं असतं!

एवढं बोलणं होईपर्यंत राजाकाकाने नैनाला घरच्या दारात नेलेलं होतं आणि शीलाही हळूहळू घराकडे सरकत होती. महेशला समजले. हा डाव आहे. वाड्यातील कुणाचेही प्रेशर येऊ नये म्हणून एकदा हिला आत नेली की मग कुणी मधे पडूच शकणार नाही. महेशने तातडीच्या मदतीसाठी राजश्रीताईकडे पाहिले.

राजश्रीला ते समजले. ती धावली अन नैनाच्या दारात उभी राहिली. आता नैना अन राजाकाका आत अन शीला काकू बाहेर अन राजश्री मधे अशी परिस्थिती निर्माण झाली.

राजश्री - नैना.. तू एकदा सांग तोंडाने.. महेशशी लग्न करायचं आहे म्हणून.. कुणी अडवू शकत नाही..

कधीही कुणीही न पाहिलेली गोष्ट घडली. एखादा स्फोट व्हावा तसा राजाकाका ओरडला..

राजा - का आमच्या मागे लागलायत? स्वतःचे उद्योग सोडून? माझं घर म्हणजे काय वाटलं? कुणीही यावं अन काहीही बोलावं? माझी मुलगी आहे! काय करायचं ते मी बघेन.. तू कोण गं चिमुरडी माझ्या दारात येऊन हिला अक्कल शिकवणारी..??

एवढे होईपर्यंत बेरी काकूंनी राजश्रीला फटाफटा मारत मागे ओढले होते.

सगळी परिस्थितीच उलटतीय ह पाहून शेवटी महेशने अंतीम अस्त्र काढले. अगदी बिनधास्तपणे तो ओरडला.. आत असलेल्या राजाकाका, नैना अन आत आत जाऊ पाहणार्‍या शीलाकाकूला ऐकू जाईल अशा आवाजात....

महेश - बाबा... आमचं लग्न झालेलंय... मी तिला मंगळसुत्र घातलंय..

वीराचा मारुतीसुद्धा दचकेल असं वाक्य होतं ते! क्षण, दोन क्षण अंगात जीवच नसल्यासारखे सगळे मृतप्राय नजरेने महेशकडे पाहात होते. ते वाक्यच तसं होतं!

राजाकाका तीरासारखा धावत आला अन त्याने कुणाला काहीही कळायच्या आत महेशच्या खाडकन कानाखाली आवाज काढला. आता श्री मधे धावला. खरे तर त्यालाही महेशला मारावेसेच वाटत होते! पण ते स्वतः! राजाकाकाने नाही. श्रीने राजाकाकाकडून महेशला बाजूला घेतले अन थोबाडून काढला. या संधीचा फायदा घेत नैना पुन्हा सगळ्यांच्या समोर आली. तिच्याकडे आत्ता कुणाचे लक्षच जात नव्हते. महेशला पडणारा मार पाहून मावशी मधे पडल्या.

मावशी - का मारतोयस याला? काय चुकलं त्याचं? लग्नच केलंय ना? पळवून नेलं नाही ना? सांगतोय ना तोंडाने? अभ्यास करतोय, मार्कं मिळवतोय, इंजिनीयर होणारे, वाड्यात कुणाला नसेल अशी नोकरी त्याला लागेल.. त्याला का मारतोयस?

हे मावशींचं अंध प्रेम होतं! शीलाने आता नैनाला मारायला सुरुवात केली. आता तिला राजाकाकाही वाचवायला गेला नाही. उलट त्यानेच तिला फटके मारले. हे पाहून प्रमिला अन मधूने त्या दोघांपासून तिला वाचवायचा प्रयत्न केला.

"थांबा"

गगनभेदी आवाज आला तसे सगळेच दचकले. मानेकाका इतका वेळ बोललेले नव्हते. चितळे आजोबा गेल्यापासून वाड्याचे अलिखित नेतृत्व त्यांच्याकडे असल्यामुळे व दुर्दैवाने हा खासगी प्रश्न सार्वजनिक पातळीवर निघाल्यामुळे मानेकाकांची भूमिका काय आहे हे पाहण्यात सगळ्यांनाच इंटरेस्ट होता.

मानेकाका - महेश, तू किती वर्षांचा आहेस?
महेश - .. अठरा पूर्ण होऊन सहा महिने झाले..
मानेकाका - आणि तू?
शीला - ती अजून सतरा वर्षांची आहे..
मानेकाका - तुम्ही विचारल्यावर बोला हो..श्री.. तुझं काय म्हणणं आहे?
श्री - .. म्हणजे?
मानेकाका - तुझा होकार आहे का?

सगळ्यांचे, अगदी दास्ताने वाड्याच्या भिंतीचेही लक्ष श्रीनिवास पेंढारकरांच्या चेहर्‍याकडे लागले.

श्री - .... महेश.. अजून लहान आहे.. इतक्यात लग्नं...
मानेकाका - लग्न इतक्यात का नंतर तो प्रश्नच वेगळा आहे.. तुझं म्हणणं काय आहे?
श्री - ... म्हणजे काय म्हणताय तुम्ही?
मानेकाका - मुलगी पसंत आहे का?
शीला - त्यांच्या पसंतीचा प्रश्नच कुठे येतो??
मानेकाका - शीला.. तू आत्ता गप्प बस.. तुला विचारीन तेव्हा बोल..
श्री - .. मला.. मला काय? महेशचे सुख हेच.. माझं सुख..
मानेकाका - म्हणजे तुला पसंतय!
श्री - ... हो..

महेशला एक बाजू जिंकल्याचा आनंद झालेला होता. मात्र त्याला अन नैनाला हे सगळे असे मुळीच व्हायला नको होते. हा तमाशा नैना रडत बाहेर आल्यामुळे अन राजश्रीताई उगीचच काहीतरी बकल्यामुळे झालेला होता. पण तरीही दोघांनाही राजश्रीचा रागच आलेला नव्हता. कारण ती बोलल्यामुळे निदान प्रश्नाला वाचा तरी फुटली होती. राजश्रीताईला बेरीण काकूंनी आता धरून ठेवलेले होते नुसतेच!

श्रीनिवासला आपण काय बोलतोय तेही समजत नव्हतं! एकदम सून? आपल्याला? त्याच्या दृष्टीने अजून कितीतरी काळ लागणार होता या विषयावर बोलायला! पण हे सगळं अचानक अन दुर्दैवी पद्धतीने झालेले, चाललेले होते.

मानेकाका - राजा.. तुझं काय म्हणणं आहे..???
राजाकाका - तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही. तुम्ही कोण? ही मुलगी आमची! आम्ही पाहून घेऊ! खड्यात गेली पसंती नापसंती!

पहिल्यांदाच शीलाला राजाकाकाने घेतलेल्या त्या रौद्र रुपाचा अभिमान वाटला.

मानेकाका - तुला गं?
शीला - मला काय मला? मला अरे जारे करणारे तुम्ही कोण? आमच्या मुलीचं आम्ही पाहून घेऊ!
मानेकाका - काय पाहून घेणार आहात? लग्न आधीच झालंय! मी तुम्हाला दोघांना अन श्रीला हे विचारतोय की तुम्ही घरात ठेवणार आहात की नाही दोघांना? नाहीतर माझ्याकडे राहतील!
शीला - असं कसं लग्न होईल? ही अजून लहान आहे वयाने! काय गं? काय महापाप केलंत तुम्ही?

नैना पुन्हा रडू लागली व म्हणाली 'लग्न झालेलं नाहीये... नुसतं मंगळसुत्र घातलं त्याने'!

शीला अन राजाकाकांनी नि:श्वास सोडला. श्रीनिवासलाही बरंच वाटलं! प्रकरण हाताबाहेर गेलेलं नव्हतं! बाकी काही झालेलं नसली की मिळवली एवढंच त्याच्या मनात होतं! महेश अन नैना जोडी त्यालाही चालली असती, आवडली असती! पण या वयात काही भलतं सलतं होऊ नये इतकंच त्याला वाटत होतं!

इतका वेळ शांत बसलेल्या निगडे काकू म्हणाल्या..

निगडे - पण अडचण काय आहे? अनुरूप आहेत की दोघे?

शीला चवताळली.

शीला - अनुरूप अनुरूप अनुरूप! तुम्ही आहात कोण सगळे? तुम्हाला आमचे घर म्हणजे काय मंडई वाटली? कुणीही यावं अन काहीही बोलाव? बामण आहेत हे बामण! बुळचट! माझी मुलगी असल्या पुचाट लोकांकडे देणार नाही मी! माझी मुलगीय ती! तिला तोलामोलाचंच घर पाहिजे! आमच्या जातीतलं पाहिजे! तुम्ही कोण विचारणारे सगळे?

खरे तर 'तुम्ही कोण' हा प्रश्न विचारताना स्वतः शीलालाच स्वतःची निंदा करावीशी वाटत होती. 'हे सगळे कोण' याचं उत्तर तिला व्यवस्थित माहीत होतं! रक्त आटवून प्रत्येकाने वेळोवेळी केलेली मदत, आपल्याला सामावून घेताना कुठलाही जातीयवाद मनात नसणे, अक्षरशः रात्र रात्र जागून एकमेकांची आजारपणे काढणे! दास्ताने वाडा हे एक जग होतं! या जगात होती फक्त माणूसकी अन प्रेम! 'तुम्ही कोण' हा प्रश्न विचारणार्‍याला येथे स्थान नव्हते. आपण घोडचूक करत आहोत हे शीलालाही ठाऊक होते. पण तिच्या तोंडातून ते वाक्य आधीच निसटलेले होते.

शीलाच्या त्या प्रश्नावर इव्हन मानेकाकाही हतबुद्ध झालेले असतानाच शीला नैनाला ओढत आत नेऊ लागली.

मावशी कडाडल्या.

मावशी - जात? जात काढतेस तू? मी कोण आहे हे माहीत नाही इथे कुणालाही! माहेरची आपटे आहे मी आपटे! कोकणस्थ ब्राह्मण! त्या काळात यांच्याशी माझं प्रेम जमलं होतं आमच्या आळीत! शिक्षण नसल्यामुळे मी बावळट वाटत असेन तुम्हाला! पण एकापेक्षा एक विद्वान आमच्या घरात येऊन जाऊन असायचे. तरीही जातपात न बघता यांच्याशी त्या वेळेस माझं लग्न लावून दिलं वडिलांनी! ही अभ्यंकर आजी काय पाळत असेल असं सोवळं असलेल्या घरातून आलेली मी? मासे तळायला शिकले! मधू... मधू... माझं... माझ्या आयुष्यात सगळं वाईटंच बघितलं रे मी... त्यामुळे.. त्यामुळे माझं बोलणं, वागणं असं आहे... नाहीतर... मी अशी नाही रे स्वभावाने...

प्रमिलाने अन नंदाने मावशींना जवळ घेऊन खूप सांत्वन केले. मानेकाका, अभ्यंकर आजी अन सगळ्या वाड्याला हा धक्काच होता. पवार मावशी आपटे होत्या?

मावशी - त्यावेळेस कोकणस्थ ब्राह्मण असून जातपात न पाळणारे आम्ही! अन तू आज जातपात पाळतेस?

शीला - मावशी! आजवर तुम्हाला वचकून मी काही बोलायचे नाही. पण हा माझ्या घराचा प्रश्न आहे. यात तुम्ही तुमचं तोंड अजिबात मधे घालायचं नाहीत. सांगून ठेवते.

'तुम्ही मधे बोलायचं नाहीत' हे वाक्य उच्चारायला दास्ताने वाड्याच्या घटनेत मंजुरी नव्हती.

राजाकाका शांत स्वरांमधे बोलू लागला.

राजाकाका - मानेकाका, मावशी, निगडे काकू, वहिनी.. मी तुमचा सगळ्यांचा आदर ठेवतो.. पण एक गोष्ट तुम्ही सगळ्यांनी पण लक्षात ठेवा. हा विषय असा जाहीर निघाल्यामुळे माझ्या मुलीची, माझ्या घराची बदनामी झालेली आहे. आता तिचं लग्न करताना सतराशे साठ विघ्नं येणार आहेत. हे सगळे तुमच्यामुळे, अगदी या वाड्यातल्या राजश्रीसारख्या लहान मुलांमुळेसुद्धा झालेले आहे. ही सर्व जबाबदारी तुमची आहे. माझ्या घरातील खासगी बाबींवर जाहीर निर्णय घेण्याचा तुमच्यातल्या एकालाही अधिकार नाही. तेव्हा शेवटचं सांगून ठेवतो. यापुढे तुमचे आमचे सगळ्यांचे संबंध संपले. महेश, तू माझ्या मुलीचा नाद सोडून दे! पेंढारकर, मला तुम्ही व्यवस्थित माहीत आहात. अतिशय सभ्य आहात. मला तुमच्याबद्दल आदर व महेशबद्दल प्रेमच आहे. मात्र हा विषय आमच्या घरातील आहे. तुम्हाला हा प्रस्ताव मान्य असला तरी मुलीचा बाप म्हणून मी तुमचे स्थळ नाकारत आहे. लवकरच आम्ही नैनाचे लग्न करून देऊ! वाड्यातील कुणालाही बोलवणार नाही. आणि शक्य तितक्या लवकर ही जागा सोडून देऊ! कृपया आमच्या खासगी बाबतीत ढवळाढवळ करू नका अशी विनंती! आणखीन एक विनंती मी माणूसकीच्या दृष्टीकोनातून करत आहे. आजवर तुम्ही सगळ्यांनी केलेत तसे आम्हीही तुमच्यावर प्रेमच केलेले आहे. तेव्हा आज झाले त्याची वाच्यता कृपया माझ्या मुलीला स्थळे येतील त्यांच्याशी ओळखी काढून करू नयेत व आमच्या मुलीचे लग्न होऊ द्यावेत. आता आम्ही नैनाला घरात घेऊन जात आहोत..

अक्षरशः हंबरडा फोडला नैनाने! महेशकडे तिने पाहिले अन त्याने तिच्याकडे! जाऊन तिचा हात धरला तर बाबा मारतील म्हणण्यापेक्षाही वाड्यातले कुणीच आपल्याला ते करू देणार नाहीत हे त्याला माहीत होते. तिला तिच्या घरात आत जात असताना जमेल तितका वेळ पाहाणे इतकेच आपल्या हातात आहे हे त्याला समजत होते. आणि नैना ? नैना अर्धमेली व्हायला आली होती. आपली सगळी ताकद वापरून ती महेश नजरेआड होऊ नये याचा प्रयत्न करत होती. आत गेल्यावर आई आपल्याला खूप मारणार आहे याची तिला जाणीव होती. पण त्यापेक्षा भयानक जाणीव होती ती ही की यापुढे आपले अन महेशचे सगळे काही संपले!

राजाकाका कसाबसा तिला ओढत असतानाच...

समीर रागातिरेकाने तिथे धावला.. गट्टू मोठा झाल्यापासून त्याला गट्टू ऐवजी 'म्हशा' म्हणणारा समीर राजाकाकाच्या पकडीतून नैनाला झटकन सोडवून किंचाळत म्हणाला..

"म्हशा... धर... धर हिला अन धाव वाड्याच्या बाहेर.. तिच्यायला तुमचं लग्न कोण होऊ देत नाही ते मीच बघतो... धाव म्हशा.. धाव.."

राजाकाका हतबुद्ध होऊन पाहात होता. नैनाला 'समीर' ही काय चीज आहे हे आज समजले होते. आणि महेशच्या मनातील समीरची कित्येक वर्षांपुर्वीची डागाळलेली प्रतिमा, लख्ख, लख्ख अगदी लख्ख उजळलेली होती... आणि त्याचवेळेस... आपल्या मुलाच्या प्रतापाने हादरलेले प्रमिला अन मधू मनात समीरच्या धाडसाचे कौतूक करत होते अन श्रीला वाटत होते की महेशने नैनाला बाहेर न नेता मावशींकडे गेहून जावे... नाट्यमयता पराकोटीला पोचलेली असतानाच समीरच्या प्रचंड ओरड्याने धाडस मिळाल्यामुळे महेश नैनाला धरण्यासाठी धावला अन नैनाही त्याच्याकडे धावायला निघतानाच...

खण्ण!

शीलाकाकुला मिळालेल्या लाकडी काठीने तिने समीरच्या पाठीत पूर्ण ताकदीनिशी वार केला अन तो कोसळला.. समीरदादाला काय झाले हे पाहण्यासाठी क्षणभर नैना अन महेश थांबलेले असतानाच...

शीलाने कुणाला काहीही समजायच्या आतच नैनाला आत नेले अन खाडकन दार लावून टाकले..

पोलीस केसही केली नाही मधूने!

समीर दोन, तीन दिवसात बरा झाला असताच...

तब्बल एक तास आपापसात कुजबुजत चर्चा करून एकेक जण पांगायला लागला अन श्रीही महेशला गेहून वर आला..

महेशशी श्रीनिवास एक शब्दही बोलत नव्हता. फक्त त्याने एकदाच महेशला थोपटले. 'झोप आता, उद्या पाहू' असे म्हणून श्री स्वत:च्या बेडवर झोपला खरा.. पण तळमळत तोही जागाच राहिलेला होता...

आणि 'उद्या पाहायचे काय राहिलेले आहे आता' हा विचार मनात वारंवार येणारा महेश.. 'आज बाबा आपल्याला खिडकीत उभा राहिलेला बघतील की काय' याची अजिबात भीती न वाटता खिडकीत उभा राहून एकटक नैनाच्या खिडकीकडे पाहात होता... चिडीचूप अंधार होता त्यांच्या घरात.. वाड्यातील हळूहळू सगळेच दिवे मालवले जात होते...

आणि कुठून कुणास ठाऊक.. बहुतेक किरणच्या खोलीतल्या रेडिओमधूनच असावे... ते सूर ऐकू येत होते... सगळ्या वाड्यालाच येत होते.. त्याअर्थी नैनालाही येत असणार होते...

मीनाकुमारीचा दु:खाने काळा ठिक्कर पडलेला विदीर्ण चेहरा.... लताचा हृदयाला चिरून जाणारा आवाज...

आणि... ते शब्द.... ऐकवत नव्हतं ते.. गाणं....

मुबारके तुम्हे के तुम नया जहाँ बसाओगे
ये शाम जबभी आयेगी तुम हमको याद आओगे
अजीब दास्ता है ये कहाँ शुरू कहाँ खतम
ये मंझिले है कौनसी न वो समझसके न हम

गुलमोहर: 

मित्रांनो,
मी पहिला, मी पहिला असं करु नका रे! अगोदर वाचा नि मग त्याविषयी प्रतिक्रिया द्या! अशाने लेखकाला वाईट वाटु शकते.
बेफिकिर,
कथा बाकी नेहमीच्याच स्पीडने चाललेली आहे! असाच स्पीड तुम्ही कथा पोस्ट करण्यासाठी ठेवावा ही विनंती!

मस्त जमलय. तो सात्वीक राग आणि दोघांच प्रेमप्रकरण वाड्याला कळल्यावर सगळ्यांची प्रतिक्रिया, अपेक्षित होत्या.

मी पहिला, मी पहिला असं करु नका रे! अगोदर वाचा नि मग त्याविषयी प्रतिक्रिया द्या! अशाने लेखकाला वाईट वाटु शकते.
मला खात्री आहे की बेफिकिरजींना अजिबात वाईट वाटणार नाही. आपल्या कादंबरीची किती आतुरतेने लोक वाट पहात असतात याच उत्तम उदाहरण आहे हे. वाचायला सुद्धा नंबर लागलेले असतात हे त्यांना माहिती आहे. चुभुद्याघ्या.

राग येण्याचा प्रश्नच नाही. वरील सर्व प्रतिसादांमधे व्यक्त झालेल्या भावना खर्‍या आहेत असे मी मानतो.

मनःपुर्वक आभारी आहे.

-'बेफिकीर'!

मला खात्री आहे की बेफिकिरजींना अजिबात वाईट वाटणार नाही.
मलाही ही खात्री आहे. पण... तरी सुद्धा... माझं म्हणणं एवढच की अगोदर वाचा नि मग प्रतिक्रिया द्या... जाउदेना आपण कादंबरीचा आनंद घेउयाना! काय!

वरील सर्व प्रतिसादांमधे व्यक्त झालेल्या भावना खर्‍या आहेत असे मी मानतो.

बेफिकिरजी आमच्या सगळ्यांच्याच भावना अतिशय खर्‍या आहेत. आम्ही सगळेच तुमच्या कथेच्या नविन भागाची नेहमीच आतुरतेने वाट बघत असतो.

प्रेमविवाहावरूनचा दोन घरातील संघर्ष चांगलाच रंगवलाय. जणू तो प्रसंग समोर घडतोय असं वाटलं.
यात श्रीची भूमिका महत्वाची ठरेल. सही आहे हा पण भाग.

सहीच, नेहमीप्रमाणे..:)

प्रेमविवाहावरूनचा दोन घरातील संघर्ष चांगलाच रंगवलाय. जणू तो प्रसंग समोर घडतोय असं वाटलं.>>
अनुमोदन.

मस्त म्हणाव कि वाईट कळत नाही..एव्हढ या कथेत गुंतलोय...हा तिढा आता कसा सुटणार...

अय्याईई ग्ग्ग्ग्...काय हे, अर्चना तीच मंगळसुत्र नैनाला कशाला देईल? Happy असो थाप होती म्हणून बरे.

हा भागही मस्तच. इथे मारामारी थोडी जास्तच झाली. वाचताना प्रसंग प्रत्यक्ष घडत असल्यासारखेच वाटले.

पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत.

--
अर्चना

मी प्रत्यक्ष पाहिलेल्या प्रसंगाशी खूप मिळताजुळता प्रसंग रंगवलाय. कथा उत्कंठावर्धक आहे.

आत्ता वाचला मी हा भाग... मस्तच हं एकदम! सुंदर पद्धतीने रंगवलेला, सुरुवातीपासून शेवटपर्यंत उत्कंठा वाढवत नेणारा... खुप आवडला. Happy

अर वा. आज मजा आहे, खुप सारे भाग अपलोड झाले आहेत. Happy
बेफिकिर, तुम्हि प्रसंग खुप मण्हजे खुप छान रंगवता, खुप मस्त जमलाय हा भाग, महेश चा खरच राग आला, श्रि च्या मनात आल्या प्रमाणे त्याने मावशि कडे च जायला पाहिजे होते, Sad
प्लिज त्या दोघाना वेगळ करु नका. प्लिज.

काहि कारणास्तव मागचा आठवडा ओनलाईन येऊ नाहि शकलो, पण खरच खुप मिस केल मि ग्ट्टु आणि नेना ला, सारख वाटायच काय झाले असेल आनि काय नाहि, बेफिकिर, सलाम. Happy