त्सोत्सि

Submitted by sunilt on 3 September, 2010 - 09:33

एक जेमतेम तीन महिन्यांचे मूल - तेही दुसर्‍याचे - एखाद्याच्या जीवनात किती बदल घडवू शकते? एखादा क्रूर, पाषाण्हृदयी गुन्हेगार एका चिमुरड्याच्या सानिध्यात, अवघ्या तीन-चार दिवसात किती आरपार बदलतो, याचे फार सुरेख चित्रण आहे, गेविन हूड दिग्दर्शित "त्सोत्सी" ह्या इंग्रजीमिश्रित झुलू भाषिक चित्रपटात.

झुलू भाषेत "त्सोत्सी" म्हणजे ठग.

लहानगा डेविड. रागीट बाप मृत्युशय्येवर पडलेल्या आईलादेखिल भेटू देत नाही. शेवटी तो घर सोडून पळून जातो. जोहान्सबर्गमधील एका झोपडपट्टीत लहानाचा मोठा होतो. चार जणांचे टोळके जमवून चोर्‍या-मार्‍या करायला लागतो.

असेच एकदा गाडीबाहेर पडलेल्या एका बाईच्या गाडीत शिरून गाडी पळवायचा प्रयत्न करतो. पकडायला आलेल्या त्या बाईला चालत्या गाडीतून लोटतो आणि गाडी घेऊन पसार होतो. काही अंतर गेल्यावर त्याला मागच्या सीटवरून रडण्याचा आवाज ऐकू येतो. मागे बेबी सीटवर असते एक लहान मूल!

मग सुरू होतो एक वेगळाच प्रवास!

सार्वजनिक नळावर पाणी भरायला आलेल्या, एक लहान मूल पाठुंगळीला बांधलेल्या विधवा तरुणीचा पाठलाग करून तिच्या घरात घुसणे. बंदुकीच्या जोरावर तिला धमकावून तिला त्या लहानग्याला पाजायला लावणे, मग त्या मुलाचे नैसर्गिक विधीने बरबटलेले कपडे बदलणे आणि ह्या सर्व प्रसंगातून स्वतःचे हरवलेले बालपण आठवणे.

शेवटी, तिच्याच आग्रहावरून ते मूल पुन्हा त्या दांपत्याला देण्यासाठी तो त्यांच्या घरी जातो तो प्रसंग तर खूपच छान आहे. घराच्या दरवाजाशी उभा असलेला त्या मुलाचा बाप आणि व्हीलचेअरमधील आई (जीला त्याने कारमधून ढकलून दिलेले असते) आपल्या हरवलेले मूल परत घेण्यासाठी आसूसलेले असतात. अवघ्या तीन-चार दिवसात लळा लावलेल्या लहानग्याची ताटातूट होणार म्हणून हा कासावीस झालेला असतो. सर्व बाजूंनी संगिनी रोखलेल्या पोलीसांचा गराडा पडलेला असतो. आणि तो ते मूल त्याच्या मूळ बापाला परत देतो आणि स्वतःला पोलीसांच्या हवाली करतो. ह्या संपूर्ण दहा-पंधरा मिनिटांच्या प्रसंगात डेविड उर्फ त्सोत्सी याची भूमिका वठवलेल्या प्रेस्ली च्वेनेयागी (Presley Chweneyagae) ह्याच्या तोंडी एकही संवाद नाही. आहे केवळ अप्रतिम अभिनय. केवळ ह्या प्रसंगासाठी चित्रपट पुन्हा पुन्हा पहावा असा!

अर्थात, चित्रपटात "मसाला" नाहीच असे नाही! धमकावले गेल्यामुळे एका अनोळखी लहानग्याला पाजायला लागले असले तरी, प्रत्यक्ष पाजताना कॅमेर्‍याकडे पाठ करून पाजणे अशक्य नसावे! पण असे प्रसंग अगदीच अपवादात्मक!

२००५ चे उत्कृष्ठ परदेशी चित्रपटासाठी अकादमी अवार्ड मिळालेला हा चित्रपट, संधी आल्यास जरूर पहावा.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेगळाच विषय. खरे तर कल्पक दिग्दर्शक, एखाद्या साध्या कथेत अनेक रंग भरु शकतो, तसेच झालेय इथे.