अशीही जाहिरातबाजी!

Submitted by संयोजक on 2 September, 2010 - 15:55

2010_MB_MadAds-Poster.jpg

"आई, यावेळच्या वाणसामानाच्या यादीत तो नेहमीचा पकाऊ साबण न टाकता लक्स टाक ग."
"अगं पण पिंकी, आपल्या ह्या साबणात काय वाईट आहे? इतकी वर्ष आपण तोच तर वापरतोय."
"वाईट नाहीये पण ती ऐश्वर्या बघ लक्स वापरते. आता त्यांना काम मिळवण्यासाठी सुंदर दिसणं भाग आहे की नाही? मग ती बेस्ट साबणच वापरणार. ए आपणही आणूया ना. बघ मग मलाही या वर्षी कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये नाटकात भाग घेण्यासाठी मागे लागेल तो नेहमीचा गृप."

अशा प्रकारचे संवाद कुठल्या ना कुठल्या तरी घरात नक्कीच झडत असतात. फार फार तर वस्तू बदलत असतील. आज जाहिराती आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत आणि त्यात अंगाला लावायच्या साबणापासून ते एनर्जी ड्रिंकपर्यंत सगळं काही येतं. चालायचंच, अहो हा जमानाच जाहिरातींचा आहे. इथे बोलणार्‍याची मातीही विकली जाते. आता प्रीती झिंटाचं उदाहरण घ्या. रोज तिची केशरचना करायला दोन बायका हाताशी असतील, ही जाणार आहे का केसांचे तेल विकत घ्यायला दुकानात?? पण तिने जाहिरात केली की तमाम पोरीबाळींना ते तेल आणायचे डोहाळे लागतात आणि त्याही प्रीतीप्रमाणे केस उडवत हिरोबरोबर पबमध्ये गाणी गात असल्याची स्वप्नही बघायला लागतात.

तर या भागात तुम्हांलाही अशाच जाहिराती करायच्या आहेत. उत्पादन आणि जाहिरात करणारी व्यक्ती अशी एक जोडी दर तीन दिवसांनी प्रसिद्ध केली जाईल.

स्पर्धेचे नियम :

१. ही स्पर्धा फक्त मायबोलीकरांसाठी आहे.
२. ह्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. एका सभासदातर्फे एका विषयासाठी एकच प्रवेशिका स्वीकारण्यात येईल.
४. आपली प्रवेशिका [काल्पनिक संवाद] स्पर्धेच्या त्या त्या विषयाच्या धाग्यावर आपण स्वतः प्रकाशित करावी. एकदा प्रकाशित केल्यानंतर प्रवेशिकेमध्ये कोणत्याही स्वरुपाचे बदल करु नयेत, केल्यास स्पर्धेसाठी ती प्रवेशिका ग्राह्य धरली जाणार नाही.
५. जाहिरात वर्तमानपत्र, मासिकं किंवा अंतर्जाल इ. साठी आहे असे समजून बनवायची आहे. त्यासाठी फोटोशॉप किंवा तत्सम सॉफ्टवेअर वापरण्याची परवानगी आहे.
६. जाहिरातीसाठी मजकूराबरोबरच स्वत: काढलेले चित्र/छायाचित्र याचा समावेश करु शकता. मजकूरासाठी शब्दमर्यादा १५० शब्द आहे.
७. अंतिम विजेता वाचकांच्या मतदान पद्धतीने ठरविला जाईल.
८. विषय जाहीर झालेल्या दिवसापासून ते अनंतचतुर्दशीपर्यंत प्रवेशिका स्वीकारण्यात येतील.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

अशीही जाहिरातबाजी - स्पर्धा क्रमांक १
अशीही जाहिरातबाजी - स्पर्धा क्रमांक २
अशीही जाहिरातबाजी - स्पर्धा क्रमांक ३
अशीही जाहिरातबाजी - स्पर्धा क्रमांक ४

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users