गर्दी

Submitted by आद्या on 1 September, 2010 - 03:14

गावात माकडांची गर्दी बरीच झाली
माझी भविष्यवाणी आता खरीच झाली

बागेतली गुलाबी झाडे मलूल झाली
मीही तसाच झालो, तीही तशीच झाली

आव्हान देत होती ही जात देवतांना
स्वर्गात माणसांची चर्चा बरीच झाली

वाडे उभारताना झाडे जळून मेली
देवास मानवाची बुद्धी उगीच झाली

काळोख वासनांचा भारी मुजोर होता
बेधुंद लांडग्यांची नुस्ती सुगीच झाली

केल्या कितीतरी मी पायी बळेच यात्रा
कोटी उपासनांची भक्ती फुकीच झाली

मी भूतकाळ होतो, कोणी न भीक घाली
प्रीती कधी कुणाची माझ्यावरीच झाली ?

मी पाहिला दिखावा खोटाच भोवताली
अंगात लक्तरांची मारे जरीच झाली!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

<< आव्हान देत होती ही जात देवतांना
स्वर्गात माणसांची चर्चा बरीच झाली

वाडे उभारताना झाडे जळून मेली
देवास मानवाची बुद्धी उगीच झाली >> एकदम छान!!!

रचना छान. आशय उत्तम!!!

विनंती...
बरीच झाली
खरीच झाली

इथे तुमच्या गझलेच्या प्रत्येक शेराचा शेवट "अरीच झाली" असाच होणार हे नक्की झाले आहे. नंतर आपण सुगीच, उगीच घेतले आहे ते योग्य नसावे असे वाटते. कृपया जाणकारांना विचारून घ्यावे.

इथे तुमच्या गझलेच्या प्रत्येक शेराचा शेवट "अरीच झाली" असाच होणार हे नक्की झाले आहे. नंतर आपण सुगीच, उगीच घेतले आहे ते योग्य नसावे असे वाटते. कृपया जाणकारांना विचारून घ्यावे -

जाणकार नसतानाही लिहावेसे वाटले, माझ्या मते अलामत "ई" हा स्वर आहे..... च झाली ही त्यानंतरची अक्षरे प्रत्येक शेरात तीच आहेत

-विजय दि. पाटील

धन्यवाद लोकहो!!

अलामतीचा विचार करून 'ई' सांभाळण्याचा प्रयत्न केला आहे. आता अलामत जर फक्त स्वरचिन्ह न राहता अक्षरसमूह येणार असेल तर 'ह. बा.' म्हणत आहेत ते योग्य ठरेल असं वाटतं.

आनंदयात्री,

फार नाही. सुरेशभट.इन या संकेतस्थळावर लिहितो कधीकधी. पण अजून लिहायची इच्छा आहे.!!
अभिप्रायाबद्दल धन्यवाद!!