सम्भाजी राजे.

Submitted by dreams.jhep on 31 August, 2010 - 11:39

सम्भाजी राजे.
.
लहानपण

संभाजीराजांचा जन्म मे १४, इ.स. १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. संभाजीराजांच्या आईचे, सईबाईंचे निधन राजे अगदी लहान असताना झाले. त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ नावाची स्त्री त्यांची दूध आई बनली. त्यांचा सांभाळ त्यांची आजी जिजाबाई यांनी केला. सुरुवातीच्या काळात त्यांची सावत्र आई, सोयराबाई यांनीदेखील त्यांच्यावर खूप माया केली.

अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते. राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले. मोंगल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले. त्यावेळी संभाजीराजे ९ वर्षाचे होते. शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजी राजांना सोसली नसती आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते.त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना मोरोपंत पेशव्यांच्या मेहुण्याच्या घरी मथुरेला ठेवले. मोंगली सैनिकांचा संभाजीराजांच्या मागचा ससेमिरा थांबवण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी संभाजीराजांचे निधन झाल्याची अफवा पसरवून दिली. ते स्वराज्यात पोहोचल्यानंतर काही काळाने संभाजीराजे सुखरूपपणे स्वराज्यात येऊन पोहोचले.

तरुणपण व राजकारण्यांशी मतभेद
.
१६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते.त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना जिंकून घेतले.

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर १२ दिवसात जिजाबाईंचे निधन झाले. त्यानंतर संभाजीराजांकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही. शिवाजी महाराज स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणावर गुंतले होते. १६७० मध्ये सोयराबाईंचा राजाराम हा पुत्र जन्मल्यावर त्या संभाजीराजांचा द्वेष करू लागल्या. भविष्यात संभाजीराजे गादीवर बसले तर राजारामला त्यांचा चाकर म्हणून रहावे लागेल आणि त्याला कधीच सत्ता मिळणार नाही असे सोयराबाईंना वाटले.

सळसळत्या रक्ताच्या तरुण संभाजीराजांचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनुभवी मानकर्‍यांशी अनेकदा मतभेद होऊ लागले. काही इतिहासकारांच्या मते शिवाजी महाराजांचे अमात्य अण्णाजी दत्तो यांची कन्या हंसाबाईने संभाजीराजांवरील एकतर्फी प्रेमातून आत्महत्या केली. तसेच संभाजीराजांचा अण्णाजी दत्तोंच्या भ्रष्ट कारभाराला सक्त विरोध होता. शिवाजी महाराजांनी अनेकदा अण्णाजी हे अनुभवी आणि कुशल प्रशासक असल्यामुळे त्यांच्या भ्रष्ट कारभाराकडे दुर्लक्ष केले. पण संभाजीराजांना ते मान्य करणे कठीण होते. एकदा भर दरबारात अण्णाजी येताच संभाजीराजांनी, 'आबासाहेब, हे बघा आपले लबाड अमात्य आले' असे उद्गार काढल्याचे इतिहासात नमूद केले आहे. या कारणांमुळे अण्णाजी दत्तो आणि इतर अनुभवी मानकरी संभाजीराजांच्या विरोधात गेले.
सोयराबाई आणि दरबारातील काही मानकरी संभाजीराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले. त्यांच्या विरोधामुळे त्यांना शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण हिन्दुस्थानच्या मोहिमेवर जाता आले नाही. तसेच शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजीराजांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधानमंडळाने नकार दिला. त्यामुळे शिवाजी महाराजांना कोकणातील शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजीराजांना पाठवावे लागले. अफझलखान, शाहिस्तेखान यांच्यासारख्या बलाढय शत्रूंना खडे चारणारे युगपुरुष शिवाजी महाराज घरातील भाऊबंदकीपुढे दुर्दैवाने हतबल ठरले. आपल्याला दक्षिण हिन्दुस्थानच्या मोहिमेपासून जाणीवपूर्वक दूर ठेवले गेल्याचा सल संभाजीराजांच्या मनात कायम राहिला.

शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजीराजांनी दुष्काळग्रस्त प्रजेकडून एक वर्ष करवसुली न करायचा निर्णय घेतला. तेव्हा सोयराबाई आणि दरबारातील मानकर्‍यांनी संभाजीराजे हे बेजबाबदार प्रशासक आहेत आणि राज्याचे वारस म्हणून योग्य नाहीत असा प्रचार सुरू केला. सोयराबाईंची अपेक्षा होती की शिवाजी महाराज राज्याचे वारस म्हणून राजारामांचे नाव जाहीर करतील.पण तसे घडले नाही.
मोगल सरदार
.
या सगळ्या घडामोडींमुळे संभाजीराजे अत्यंत व्यथित झाले आणि त्यांनी शिवाजी महाराजांचे स्वराज्य सोडून औरंगजेबाचा सरदार दिलेरखानाला सामील व्हायचा निर्णय घेतला. त्यांना पुढे करून दिलेरखानाने स्वराज्यातील भूपाळगड या किल्ल्यावर हल्ला केला. किल्लेदार फिरंगोजी नरसाळाने किल्ला नेटाने लढवला पण शत्रुपक्षात युवराज संभाजीराजे आहेत हे कळताच शरणागती पत्करली. संभाजीराजांनी गडावरील सैनिकांना सुरक्षितपणे जाऊ द्यायची मागणी दिलेरखानाकडे केली. पण विजयोन्मादाने हर्षभरित झालेल्या दिलेरखानाने ७०० मराठी सैनिकांचा प्रत्येकी एक हात तोडायचा आदेश दिला. संभाजीराजांना त्याचा भयंकर संताप आला. त्यानंतर दिलेरखानाच्या सैन्याने अथणीवर हल्ला करून तेथील जनतेवर अनन्वित अत्याचार केले. संभाजीराजांनी दिलेरखानाकडे या अत्याचारांचा जाब विचारला. पण दिलेरखानाने त्यांना जुमानले नाही. संभाजीराजांना त्यांची चूक कळली आणि ते विजापूरमार्गे स्वराज्यातील पन्हाळगडावर येऊन दाखल झाले. ते स्वराज्यापासून सुमारे एक वर्ष दूर होते.

संभाजीराजांचे स्वराज्य सोडून जाणे शिवाजी महाराजांना जिव्हारी लागले. त्यांनी त्यांची पन्हाळगडावर भेट घेतली. त्यांनी संभाजीराजांना शिक्षा केली नाही. संभाजीराजांची त्यांनी स्वतः समजूत काढली. मात्र संभाजीराजांच्या स्वराज्य सोडून जाण्यामुळे त्यांच्यात आणि सोयराबाई, अण्णाजी दत्तो आणि इतर मानकर्‍यांमधील दरी अजूनच रूंदावली. सोयराबाईंनी संभाजीराजांना राजारामच्या विवाहासाठी रायगडावर बोलावले नाही. शिवाजी महाराजांचे राजारामच्या विवाहानंतर काही दिवसात निधन झाले. ही बातमी सोयराबाईंनी संभाजीराजांना पन्हाळगडावर कळवलीच नाही.
सोयराबाई आणि अण्णाजी दत्तो यांनी संभाजीराजांना पन्हाळगडावर कैद करायचा हुकूम पन्हाळ्याचा किल्लेदारास सोडला. त्यांना कैद करून राजारामांचा राज्याभिषेक करायचा त्यांचा डाव होता. या अवघड प्रसंगी सरनोबत हंबीरराव मोहिते यांनी संभाजीराजांची बाजू घेतली. वास्तविक हंबीरराव मोहिते हे सोयराबाईंचे सख्खे बंधू होते. पण संभाजीराजे हे गादीचे हक्काचे वारसदार होते. तसेच शिवाजी महाराजांच्या अखेरच्या दिवसात लवकरच औरंगजेब सर्व सामर्थ्यानिशी स्वराज्यावर हल्ला करणार अश्या बातम्या येत होत्या. अशा प्रसंगी संभाजीराजांसारखा खंबीर राजा गादीवर असणे गरजेचे होते. राजारामासारखा अननुभवी राजा अशावेळी असणे दौलतीसाठी हानिकारक ठरेल याची हंबीररावांना जाणीव होती. हंबीररावांनी सैन्याच्या मदतीने कट उधळून लावला आणि अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पेशव्यांना कैद केले. मोरोपंत पेशव्यांना त्यांच्या इच्छेविरूद्ध सोयराबाई आणि अण्णाजी दत्तो यांनी कटात सहभागी केले होते.

छत्रपती
.
जानेवारी १६८१ मध्ये संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला. त्यांनी उदार अंतःकरणाने अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पेशव्यांना माफ केले आणि त्यांना अष्टप्रधान मंडळात पुन्हा स्थान दिले. मात्र काही काळानंतर अण्णाजी दत्तो आणि सोयराबाईंनी पुन्हा संभाजीराजांविरुद्ध कट केला आणि त्यांना कैद करून राजारामांचा राज्याभिषेक करायचा घाट घातला. तेव्हा संभाजीराजांनी अण्णाजी दत्तो आणि त्यांच्या सहकार्‍यांना हत्तीच्या पायी देऊन ठार मारले.

औरंगजेबाने १६८२ मध्ये स्वराज्यावर हल्ला केला. औरंगजेबाचे सामर्थ्य सर्वच बाबतीत संभाजीराजांपेक्षा जास्त होते. त्याचे सैन्य स्वराज्याच्या सैन्याच्या पाचपटीने जास्त होते तर त्याचे राज्य स्वराज्यापेक्षा कमीतकमी १५ पटींनी मोठे होते. जगातीला सर्वात शक्तिशाली सैन्यांमध्ये औरंगजेबाच्या सैन्याचा समावेश होत होता. तरीही संभाजीराजांच्या नेतृत्त्वाखाली मराठयांनी हिमतीने लढा दिला. मराठयांच्या प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंझारपणाचे ठळक उदाहरण म्हणजे नाशिकजवळील रामशेज किल्ल्याचा लढा! औरंगजेबाच्या सरदारांची अशी अपेक्षा होती की तो किल्ला काही तासांतच शरणागती पत्करेल. पण मराठयांनी असा चिवट प्रतिकार केला की तो किल्ला जिंकण्यासाठी त्यांना तब्बल साडेसहा वर्षे लढावे लागले. संभाजीराजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिर्‍याचा सिद्दी आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला की त्यांची संभाजीविरूद्ध औरंगजेबाला मदत करायची हिंमत झाली नाही. यांपैकी कोणत्याही शत्रूचा पूर्णपणे बिमोड करणे संभाजीराजांना शक्य झाले नाही. पण त्यांपैकी कोणीही त्यांच्याविरूद्ध उलटू शकला नाही. संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठयांनी सर्व शत्रूंशी एकहाती झुंज दिली.

१६८७-८८ मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला.त्यामुळे परिस्थिती कठीण झाली. त्यातच संभाजीराजांच्या पाठीत खंजीर खुपसायला अनेक फितुर सदैव तत्पर होते. संभाजीराजांच्या दुर्दैवाने त्यांचे सख्खे मेहुणे-- गणोजी शिर्के, महादजी निंबाळकर आणि हरजीराजे महाडिक काही गावांच्या वतनासाठी शत्रूला सामील झाले.

दगाफटका
१६८९ च्या सुरवातीला संभाजीराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले. ती बैठक संपवून संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत असतानाच त्यांचा मेहुणा गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांनी संगमेश्वरवर हल्ला केला. या कारवाईसाठी गणोजी शिर्केने कमालीची गुप्तता बाळगली आणि सर्व कारवाईची आखणी खूपच काळजीपूर्वक केली. मराठयांत आणि शत्रूचे सैन्यात चकमक झाली. मराठयांचे संख्याबळ कमी होते.प्रयत्‍नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहित. शत्रूने संभाजीराजांना जिवंत पकडले.

शारीरिक छळ व मृत्यू
.
त्यानंतर संभाजीराजे आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादूरगड येथे आणण्यात आले. औरंगजेबाने संभाजीराजांना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन करून धर्मांतर केल्यास जीवदान देण्याचे मान्य केले. पण संभाजीराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. औरंगजेबाने संभाजीराजे आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून धिंड अत्यंत मानहानीकारक अशी धिंड काढण्यात आली. तरीही संभाजीराजांनी शरणागती पत्करण्यास आणि धर्मांतर करण्यास नकार दिला. तेव्हा औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारायचा आदेश दिला. सुमारे ४० दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही.

मार्च ११, १६८९ रोजी संभाजीराजांची शिरच्छेद करून भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरील तुळापूर येथे हत्या करण्यात आली. महाराष्ट्रातील जनतेने स्वधर्म आणि स्वराज्यासाठी केलेल्या सर्वोच्च बलिदानाबद्दल त्यांना धर्मवीर ही सार्थ उपाधी दिली

धर्मवीर संभाजीराजे !
औरंगजेबाला २७ वर्षे उत्तर हिंदुस्थानापासून दूर ठेवणारे संभाजीराजे

संभाजीराजांनी जी अलौकिक कामे त्यांच्या अल्पायुष्यात केली,
त्याचा दूरगामी परिणाम संपूर्ण हिंदुस्थानावर झाला. त्यामुळे
त्यांच्याविषयी प्रत्येक हिंदु बांधवाने कृतज्ञ राहिले पाहिजे. त्यांनी
औरंगजेबाच्या आठ लाख सैन्याला न डगमगता तोंड दिले आणि कित्येक मोगल
सरदारांना लढाईत पराभूत करून त्यांना पळता भूई थोडी केली. त्यामुळे
औरंगजेब दीर्घकाळ महाराष्ट्रात लढत राहिला आणि संपूर्ण उत्तर हिंदुस्थान
त्याच्या दडपणापासून मुक्‍त राहिला. ही संभाजीराजांची सगळयात मोठी
कामगिरी म्हणावी लागेल. त्यांनी औरंगजेबाबरोबर तह केला असता, त्याचे
मांडलिकत्व स्वीकारले असते, तर तो दोन-तीन वर्षांत पुन्हा उत्तरेत गेला
असता; परंतु संभाजीराजांच्या संघर्षामुळे २७ वर्षे औरंगजेब दक्षिणेत
अडकून राहिला आणि त्यामुळे उत्तरेत बुंदेलखंड, पंजाब आणि राजस्थान या
ठिकाणी हिंदूंच्या नवीन सत्ता उदयाला येऊन हिंदु समाजाला सुरक्षितता
लाभली.

संभाजीराजांच्या सामर्थ्याची पोर्तुगिजांना भीती
संभाजीराजांनी गोव्यावर आक्रमण करून धर्मवेड्या पोर्तुगिजांना
नमवले. त्यांच्याशी तह करून त्यांना बांधून टाकले. गोव्यातील
पोर्तुगिजांच्या धर्मप्रसाराला संभाजीराजांनी पायबंद घातला, त्यामुळे
गोवा प्रदेशातील हिंदूंचे रक्षण झाले, हे विसरणे अशक्य आहे. पोर्तुगीज
संभाजीराजांना प्रचंड भीत असत. त्यांनी इंग्रजांना लिहिलेल्या पत्रात
नमूद केले आहे, ``सध्याच्या परिस्थितीत संभाजी महाराज हेच सर्वशक्‍तीमान
आहेत, असा आमचा अनुभव आहे !'' शत्रूचे हे प्रमाणपत्र महाराजांच्या
सामर्थ्याविषयी कल्पना देणारे आहे.
हिंदूंच्या शुद्धीकरणासाठी सदैव दक्ष असलेले संभाजी
शिवाजी महाराजांनी नेताजी पालकर यांना पुन्हा हिंदु धर्मात
घेतल्याची हकिकत सर्वांना माहीत आहेच; परंतु संभाजीराजांनी
`शुद्धीकरणासाठी' आपल्या राज्यात स्वतंत्र विभाग स्थापन केला, हे विशेष
महत्त्वाचे आहे. हरसूल गावच्या कुलकर्णी आडनावाच्या ब्राह्मणाची कथा
संभाजीराजांच्या इतिहासात नोंदवलेली आहे. जबरदस्तीमुळे मुसलमान झालेला हा
कुलकर्णी हिंदु धर्मात परत येण्यासाठी खूप प्रयत्‍न करत होता; परंतु
स्थानिक ब्राह्मण त्याला दाद देत नव्हते. शेवटी हा ब्राह्मण
संभाजीराजांना त्या धामधुमीच्या काळात भेटला आणि त्याने आपली व्यथा
आपल्या राजासमोर मांडली. महाराजांनी ताबडतोब त्याच्या शुद्धीकरणाची
व्यवस्था करून पुन्हा त्याला स्वधर्मात प्रवेश दिला. राजांच्या उदार
धोरणामुळे कित्येक हिंदू पुन्हा स्वधर्मात आले !

संभाजीराजांचा जाज्वल्य धर्माभिमान !
संभाजीराजांच्या बलीदानाचा इतिहास लोकांना नीट माहीत नाही. १
फेब्रुवारी १६८९ या दिवशी सख्खा मेहुणा गणोजी शिर्के याच्या फितुरीमुळे
संगमेश्वर या ठिकाणी संभाजीराजे काही वतनदारांची गाऱ्हाणी ऐकत असतांना
पकडले गेले. त्या वेळी मोगलांनी लाखो सैनिकांच्या बंदोबस्तात राजांची
धिंड काढली. त्यांना शारीरिक आणि मानसिक यातना दिल्या. विदूषकाचा पोषाख
घालून, लाकडी सापळयात हातपाय अडकवण्यात आले. रक्‍तबंबाळ अवस्थेतील
संभाजीराजांचे तत्कालीन चित्रकाराने रंगवलेले चित्र नगर येथील
संग्रहालयात आजही आहे. असंख्य यातना सहन करणार्‍या या तेजस्वी हिंदु
राजाची नजर अत्यंत क्रुद्ध आहे, असे त्या चित्रात दिसते. संभाजीराजांच्या
स्वाभिमानाचा परिचय त्या क्रुद्ध नजरेवरूनच होतो.
१५ फेब्रुवारी १६८९ या दिवशी औरंगजेबाबरोबर राजांची दृष्टीभेटपेडगावच्या किल्ल्यात झाली. `काफिरांचा राजा सापडला' म्हणून औरंगजेबाने नमाज पढून अल्लाचे आभार मानून अत्यानंद व्यक्‍त केला. त्या वेळी संभाजीराजांना औरंगजेबाचा वजीर इरवलासखान याने शरण येण्याचे आवाहन केले. संतप्‍त संभाजीराजांनी औरंगजेबाला मुजरा करण्यास नकार दिला. तो एकनिर्णायक क्षण होता. महाराजांनी वैयक्‍तिक सुखाच्या अभिलाषेपेक्षा हिंदुत्वाचा अभिमान महत्त्वाचा मानला. आपल्या वडिलांनी निर्माण केलेली स्वाभिमानाची महान परंपरा त्यांनी जपली. यानंतर दोन दिवसांत औरंगजेबाच्या अनेक सरदारांनी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्‍न केला. त्यांना `मुसलमान झाल्यास जीवदान मिळेल', असे सांगण्यात आले; परंतु स्वाभिमानी संभाजीराजांनी या मुसलमान सरदारांचा सतत अपमान केला.

धर्मासाठी बलीदान करून इतिहासात अमर झालेले शंभूराजे
शेवटी पापी औरंग्याने त्यांचे डोळे फोडले, जीभ छाटली तरीही राजांना मृत्यू स्पर्श करू शकला नाही. दुष्ट मोगल सरदारांनी त्यांना प्रचंड यातना दिल्या. त्यांच्या दिव्य धर्माभिमानाबद्दल त्यांना हे सारे भोगावेच लागले. १२ मार्च १६८९ या दिवशी गुढीपाडवा होता. हिंदूंच्या सणाच्या दिवशी त्यांचा अपमान करण्यासाठी ११ मार्चच्या फाल्गुन अमावस्येला संभाजीराजांची हत्या करण्यात आली. भाल्याला त्यांचे मस्तक टोचून मोगलांनी त्याची धिंड काढली. अशा प्रकारे १ फेब्रुवारी ते ११ मार्च असे ३९ दिवस यमयातना सहन करून संभाजीराजांनी हिंदुत्वाचे तेज वाढवले. धर्मासाठी
बलीदान करणारा हा राजा इतिहासात अमर झाला. औरंगजेब मात्र राजधर्म पायदळी तुडवणारा इतिहासाच्या दरबारातील गुन्हेगार ठरला.
संभाजीराजांच्या बलीदानानंतर महाराष्ट्रात क्रांती घ
संभाजीराजांच्या या बलीदानामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून
उठला आणि पापी औरंग्याबरोबर मराठ्यांचा निर्णायक संघर्ष सुरू झाला.
`गवताला भाले फुटले आणि घराघरांचे किल्ले झाले, घराघरातील माता-भगिनी
आपल्या मर्दाला राजाच्या हत्येचा सूड घ्यायला सांगू लागल्या', असे त्या
काळाचे सार्थ वर्णन आहे. संभाजी महाराजांच्या बलीदानामुळे मराठ्यांचा
स्वाभिमान पुन्हा जागा झाला, ही तीनशे वर्षांपूर्वीच्या राष्ट्रजीवनातील
अतिशय महत्त्वाची बाब ठरली. यामुळे इतिहासाला कलाटणी मिळाली. जनतेच्या
पाठिंब्यामुळे मराठ्यांचे सैन्य वाढत गेले आणि सैन्याची संख्या दोन
लाखांपर्यंत पोहोचली. जागोजागी मोगलांना प्रखर विरोध सुरू झाला आणि अखेर
महाराष्ट्रातच २७ वर्षांच्या निष्फळ युद्धानंतर औरंगजेबाचा अंत झाला आणि
मोगलांच्या सत्तेला उतरती कळा लागून हिंदूंच्या शक्‍तीशाली साम्राज्याचा
उदय झाला.
२७ वर्षे औरंगजेबाच्या पाशवी आक्रमणाविरुद्ध मराठ्यांनी
केलेल्या संघर्षात हंबीरराव, संताजी, धनाजी असे अनेक युद्धनेते होते;
परंतु या लढ्याला कलाटणी मिळाली ती संभाजीराजांच्या बलीदानातून झालेल्या
जागृतीमुळेच.

शेर शिवा का छावा था ।
देश धरम पर मिटनेवाला
शेर शिवा का छावा था ।
महापराक्रमी परमप्रतापी,
एक ही शंभू राजा था ।।

तेज:पुंज तेजस्वी आँखे,
निकल गयी पर झुका नही ।
दृष्टी गयी पर राष्ट्रोन्नती का,
दिव्य स्वप्न तो मिटा नही ।।

दोनो पैर कटे शंभूके,
ध्येयमार्ग से हटा नही ।
हाथ कटे तो क्या हुआ,
सत्कर्म कभी भी छुटा नही ।।

जिव्हा काटी खून बहाया,
धरम का सौदा किया नही ।
शिवाजी का ही बेटा था वह,
गलत राह पर चला नही ।।

रामकृष्ण, शालिवाहन के,
पथसे विचलित हुआ नही ।।
गर्व से हिंदू कहने मे,
कभी किसी से डरा नही ।।

वर्ष तीन सौ बीत गये अब,
शंभू के बलिदान को ।
कौन जिता कौन हारा,
पूछ लो संसार को ।।

मातृभूमी के चरण कमल पर,
जीवन पुष्प चढाया था ।
है दूजा दुनिया में कोई,
जैसा शंभूराजा राजा था ।।

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कृपया... आपला लेख 'इतिहास' ह्या सदरात समाविष्ट कराल का??? वाचकांना शोधताना सोपे पडेल... Happy

असेना का विकी वरून घेतलेला. स्फूर्तिदायक आहे, नाहीतर लोक कशाला विकी वर जाऊन संभाजी महाराज शोधतील?

पण लक्षात घ्या, की संभाजीमहाराजांचा पराभव परकीयांनी केला नाही तर
१. सोयराबाइ, जिला स्वतःच्या मुलाला सिंहासन हवे होते, स्वातंत्र्याचे काही का होईना, इतकी स्वार्थी वृत्ति! तसेच भ्रष्टाचारी अण्णाजी दत्तो!

२. गणोजी शिर्के! प्रत्यक्ष मेहूणे, पण स्वार्थासाथी, खोट्या मानापमानाच्या कल्पनेपायी राज्याचे नुकसान करून शत्रूला सामिल झाले! छी: छी: !!

यातून शिकण्यासारखे एव्हढेच की स्वार्थ, खोट्या मानापमानाच्या कल्पना, या पेक्षा स्वातंत्र्य, स्वराज्य मोठे. लहानपणापासून मुलांना शिकवायला पाहिजे हे चरित्र!!!

विकीपिडीयावरून कॉपी करून इथे का चिकटवला आहे लेख? >>> लेखाचा फक्त सुरुवातीचा भाग विकीपिडीयावरून उचलला आहे असं दिसतंय.

संभाजी राजांच्या जीवनाचा हा धावता आढावा छान आहे. Happy

असे म्हणतात की शिवाजी महाराजान्नी सगळ्या मिळून जेवढ्या लढाया/युद्धे केली त्यापेक्षा जास्त लढाया/युद्धे सम्भाजी महाराजान्नी केवळ नऊ वर्षात केली! Happy त्याची आकडेवारी कुठे मिळाली तर हवी आहे - अफाट अन अविश्वसनीय असेच हे कर्तुत्व होते!

चान्गले लिहीले आहे Happy

चांगल लिहिल आहे. रविवारी पुरंदरला जाण्याचा योग आला तिथे जन्मस्थळ आहे छत्रपती संभाजी महाराजांचे. अतिशय पराक्रमी राजा.

अचूक माहितीसाठी अभ्यासू लोकांनी वा.सी.बेंद्रे यांचे 'छत्रपती संभाजी' वाचावे...

नुसते 'छावा' आणि 'संभाजी' या कादंबऱ्यांवर समाधान मानू नये.

खालील कविता माझे स्नेही 'संभाजी चव्हाण' यांनी लिहिलेली आहे.

यातून शिकण्यासारखे एव्हढेच की स्वार्थ, खोट्या मानापमानाच्या कल्पना, या पेक्षा स्वातंत्र्य, स्वराज्य मोठे. लहानपणापासून मुलांना शिकवायला पाहिजे हे चरित्र!!!
झक्की अनुमोदन !
खास लेख
धन्यवाद !

श॑भूराज्या॑चे थोडक्यात जीवन चरित्रावर आधारीत लेख, खुपच छान , पर॑तु श॑भूराजा॑बद्दल लोका॑मधे असलेले गे॓रसमज दुरहोण्यासाठी आणखी लिखान आवश्यक आहे. बाकी लेख खुपच छान.

भटक्या,
तुमच्या मित्रवर्यांना म्हणावे कविता छान जमली आहे. Happy

पण चित्र पाहून वासुदेव बळवंत फडक्यांची आठवण झाली. हे संभाजी राजांचे चित्र आहे का? आधी कुठे असे चित्र पाहिल्याचे स्मरणात नाही. Uhoh

चित्रकार कोण आहे हे ठावूक नाही. चित्राखाली असलेली सही सहजपणे वाचता येत नाही. चित्र संभाजी राजांचे म्हणूनच काढले आहे हे निश्चित.

फारच सुंदर लेख आहे.छान लिहिले आहे
संभाजीराजांनी
`शुद्धीकरणासाठी' आपल्या राज्यात स्वतंत्र विभाग स्थापन केला, हे विशेष
महत्त्वाचे आहे.

फारच ओघवत्या शैलीत संभाजीराजांचा इतिहास आपण सादर केलात.

असे म्हणतात की शिवाजी महाराजान्नी सगळ्या मिळून जेवढ्या लढाया/युद्धे केली त्यापेक्षा जास्त लढाया/युद्धे सम्भाजी महाराजान्नी केवळ नऊ वर्षात केली! त्याची आकडेवारी कुठे मिळाली तर हवी आहे >>>>>>>> माझ्या वाचनात आले होते ते म्हणजे १०८ लढाया/युद्धे (चु.भू.दे.घे.)

छान लिहिलय शंभुराजांबद्दल.म्हनुनच असे म्हणतात की जगावे तर शिवबा सारखे व मरावे तर संभाजी सारखे. जय जिजाऊ! जय शिवराय! जय संभाजी!

निंबुडा...अगदी अगदी फोटो पाहून मलाही तेच वाटले...
माझ्या माहीती नुसार वासुदेव फडके यांचे अशाच स्वरुपाचे एक चित्र आहे.

Pages