श्रीनिवास पेंढारकर - एक बाप - क्रमशः - भाग २३

Submitted by बेफ़िकीर on 31 August, 2010 - 04:58

"पूर्ण चाळीसच्या चाळीस माणसे भरणार नसतील तर हा माने हा दास्ताने वाडा पेटवून देईल"

एक भयानक गर्जना करून मानेकाका सर्व जमलेल्यांकडे जिवा काटदरेच्या आवेशात पाहू लागले अन त्यांच्या त्या रौद्र रुपातली हवा पवार मावशींनी पार काढून टाकली.

"पेटव... बरीच वर्षं ऐकतीय वाडा पेटवण्याचं... पेटव आज"

वाड्यातला चार वर्षाचा मुलगाही त्यावर हसला. आता मोजणी सुरू झाली.

पवार मावशी - १
बेरी - ४
माने काका - १
पेंढारकर - २
कर्वे - ३
शिंदे - ३
अभ्यंकर आजी - १
नंदा - १
घाटे - ५

"घाटेंकडे पाच कोण?" - मावशींनी तेल ओतले.

घाटे काकू - तुम्हाला काय उद्योग? मी, हे, अतुल अन माझा भाचा अन त्याची बायको येणारेत..
पवार मावशी - त्यांची वर्गणी?
घाटे काकू - देऊ आम्ही.. भिकेला नाही लागलेलो..
पवार मावशी - जीभ हासडून शनिपारावर वाळत घालीन जास्त बोललीस तर...

ही धमकी आजवरच्या सर्व धमक्यांमधली नवीन धमकी होती. त्यामुळे ती किती भयानक होती याचा विचार करण्यात घाटे काकूंचे तीन, चार क्षण गेले तेवढ्यात मोजणी पुढे सुरू झाली.

निगडे - ??

मावशी - निगड्यांची येणारी नका मोजू, न येणारी मोजा..
मानेकाका - का?
मावशी - ती शुन्य असतील.. मोजायला सोपी! येणारी असतील बारा..
निगडे काकू - मावशी.. तुम्ही असे सारखे अपमान करणार असाल तर आम्ही येऊ शकत नाही..
घाटे काकू - नाहीतर काय?
पवार मावशी - येऊ नका..
निगडे काका - काय??? तुम्ही कोण सांगणार्‍या?
पवार मावशी - अरे गप्प?

निगडे काका सोक्षमोक्ष लावायच्या आवेशात उभे राहिले.

निगडे - समस्त दास्ताने वाड्यातील बंधू आणि भगिनींनो.. गेली कित्येक वर्षे ही भयानक बाई या वाड्यातील माणसांना वाट्टेल तशी वागवत आहे. सळो की पळो करून सोडलेले आहे तिने सगळ्यांना! यापुढे या बाईचे असले वागणे सहन केले जाणार नाही. यासाठी मला सामर्थ्य व साथ हवी आहे ती तुमच्या सगळ्यांची.. बोला.. पवार मावशी... अरे बोला? पवार मावशी???? म्हणा मुर्दाबाद! म्हणा???

सगळेच चेहरे पवार मावशींना बिचकून 'आम्ही ना ब्वॉ त्यातले' असे भाव आणून बसलेले असल्यामुळे निगडे काकांचा चेहरा खर्रकन उतरला. त्यांनी हादरून मावशींकडे पाहिले.

मावशी 'पारध्याला चिमणी दिसावी' तशा त्यांच्याकडे पाहात होत्या. आता आपले काही खरे नाही असा विचार करून निगडे खाली मान घालून बसले. पवार मावशी घशाच्या शिरा ताणून ओरडल्या.

पवार मावशी - माने... हा निगडे जर मला तिथे दिसला तर तुझ्या घरावरून नांगर फिरवीन मी..
मानेकाका - माझा काय संबंध?
पवार मावशी - संबंध गेला कढईत! विरंगुळा म्हणून चौदा मुले झाली याला! अन वर मी मुर्दाबाद काय? आणीबाणी आली नसती तर वाड्यात पहाल तिथे एकेक नागडा निगडे फिरताना दिसला असता. तुला सामर्थ्य अन साथ हवी काय रे सांडा? मीच देते तुला साथ मलाच मुर्दाबाद करायला! तुला स्मशानात नेला तर तिथली प्रेतं जिवंत होऊन पळत सुटतील असलं थोबाड? सोडत नाही पिच्छा अन पुढे यायची इच्छा? तेरा हजार घुबडं मेली तेव्हा हा एक निगडे जन्माला आलाय! म्हणे पवार मावशी मुर्दाबाद! पवार मावशी मुर्दाबाद अन बाळंतविड्यांनी घर आबाद! देश बरबाद! भाड्याने कंस आणून याची पोरं जन्माला आल्या आल्या आपटायला हवी होती. परवा चितळ्यांकडून बाकरवडी आणली तर तुकडा दिला का वाड्यातल्या एकाला? मग या पमीकडे येऊन चहा ढोसायला लाजा वाटत नाहीत? मध्या, परत या निगड्याला चहा पाजलास तर मंत्र टाकीन! तुझ्या बापाची दौलत वर आली म्हणून शेफारू नकोस! काय गं पमे? खाली काय बघतेस? वर बघ? माझ्याकडे बघ! पुन्हा घरात या निगड्यासाठी आधण टाकलेलं मला समजलं तर विष कालवीन त्या चहात! समजलीस काय?

प्रमिलाने आपली 'नुकतंच लग्न झालेल्या बावरलेल्या प्रियेप्रमाणे' होकारार्थी मान हालवली. जिथे प्रमिलाचेच काही धाडस होत नाही तिथे शीला तर बसल्या जागीच गळाठलेली होती. अख्खा दास्ताने वाडा थरथर कापत मावशींकडे पाहात होता. आणि ही 'आयडिया' काढून 'कॉलनीत सम अ‍ॅक्टिव्हिटी हॅज टू टेक प्लेस' म्हणून शायनिंग मारणारा, नव्याने आलेला कुमार साने अन त्याची फॅशनेबल बायको कोमल हे तर मेणबत्तीचे मेण थिजावे तसे थिजलेले होते.

एखादी वीज कोसळून जावी तसे मावशींचे बोलून झाल्यावर सुनसान शांतता पसरली.

पण काही जुन्यांना मावशींच्या त्या वागण्यात काहीही नवीन नव्हते. मानेकाका त्याच जुन्यांपैकी!

माने काका - श्री, तू कर यादी... ही अशीच बोलणार..

मावशींनी मानेकाकांकडे जळजळीत नजरेने पाहिले. पण या माणसाशी वाद काढायला त्याही जराशा बिचकायच्याच!

श्री - साने व आधीचे धरून २१ अन निगडे धरून तेहतीस, निगड्यांकडचे बारा आहेत.
पवार मावशी - अर्धे पैसे निगड्यांनाच भरावे लागणार..
निगडे काकू - भरू हो? भरू!
माने काका - बस किती जणांची आहे?
कुमार - चाळीस..
माने काका - मग? आपण तेहतीसच आहोत..
कुमार - बट मिनिमम फॉर्टी पीपल आर नेसेसरी टू..
घाटे - हे सहलीत सारखे इंग्रजी बोलणार आहेत का?

कुमार साने व कोमल साने यांच्याबाबत वाड्यातील प्रौढ स्त्री पुरुषांमधे कुतुहलयुक्त कुतुहल होते. कारण एक तर दोघेही फॅशनेबल कपडे वापरायचे, स्टायलिश राहायचे, कुमार बरेचदा इंग्लीश बोलायचा आणि कोमल नखरे करायची. पण स्टायलिश राहण्यासारखे दोघेही दिसत असल्यामुळे, म्हणजे व्यक्तीमत्वाला तसे राहणे शोभत असल्यामुळे त्यांची टिंगल करण्याची कुणाची हिम्मत होत नव्हती अजून! त्यातच कोमलने सकाळी पाण्याच्या नळावर घाटे काकांना सकाळी सकाळी गाऊनमधे येऊन 'हाय' केल्यापासून घाटे काकू काकांना पाणी भरायला पाठवत नव्हत्या. घाटे काकांमधे नवयौवन संचारल्याप्रमाणे ते इकडे तिकडे फिरू लागले होते. कोमलच्या त्या एकाच मधाळ 'हाय' वर अख्खे आयुष्य कुर्बान केल्यासारखे ते घाटे काकूंशी वागू लागले होते.

इतके दिवस मुमताझ आणि रेखा यांची अभिलाषा धरणार्‍या किरणला आता कोमलसारखी पत्नी हवी होती. जी चोवीस तास नखरेल वागते व नवर्‍याशी सर्वांदेखत सलगीने वागते.

वाड्यात हळूहळू असंतोष पसरू लागला होता. मुख्यतः स्त्रियांमधे! कारण काही स्त्रिया तर इतक्या जुन्या होत्या की चारचौघांमधे नवर्‍याशी बोलायच्याही नाहीत. त्यात ही गाऊन घालून वाड्यात फिरणार! साधं वाण्याकडून खोबरेल तेल आणायचं तरी अशी काही नटून जाणार जणू फंक्शनला चाललेली आहे. आता सगळेच जण तिच्याकडे बघू लागले होते. पहिल्या दिवशी साने दांपत्य अवतरले तेव्हाच तमाम निधड्या छातीच्या पुरुषांच्या हृदयात खळबळ झाल्याचे त्यांच्या त्यांच्या बायकांना समजलेले होते. कोमल कुणाशीही बोलायची. कुमार एकदम टापटिपीत वावरायचा. सेंट वापरणारा माणूस व बाई दास्ताने वाड्यात त्यांच्या रुपाने प्रथमच अवतरले होते. आजवर सकाळी आंघोळ झाली की डोक्यावर खोबरेल तेलाची बाटली उपडी करून डोके शांत करणारे लोक आता विविध प्रकारचे साबण आपल्याला परवडू शकतील का याचा विचार करू लागले होते. प्रमिला, शीला आणि नंदा, आता ही नंदा अविवाहीत असूनही, शांपू वापरू लागल्या होत्या. 'नीट राहिलो तर आम्ही तर कितीतरी आकर्षक दिसतो' असा संदेश या तिघींच्या अन विद्याच्या आविर्भावातून ओसंडू लागला होता. मात्र काही केल्या कुमार अन कोमल यांच्याशी तुलना करण्याइतक्या काही त्या दिसेनात! त्यामुळे आता कोमलवर आतल्याआत टीका सुरू झाली.

नंदा - चालली मीनाकुमारी..
प्रमिला - काय नटते नाही?
नंदा - इथे तर जायचंय.. चांभाराकडे..
शीला - साडी बघा वहिनी..
प्रमिला - मी नाही बाई असल्या साड्या नेसत...
नंदा - मीही..

असले संवाद आता सुरू झालेले होते. आणि राहायला आल्याच्या केवळ दहाव्याच दिवशी कुमारने सर्वांना ऐकू जाईल अशा आवाजात मानेकाकांना सांगीतले होते...

'कॉलनीत.. सम अ‍ॅक्टीव्हिटी हॅज टु टेक प्लेस माझ्यामते...'

दास्ताने वाडा या वास्तूला कुणी कॉलनी म्हणेल याची कल्पनाच नसल्यामुळे पण 'मला इंग्रजी व्यवस्थित कळते' हे दाखवायचे असल्यामुळे मानेकाकांनी पाणी भरता भरता 'येस्स... येस्स येस्स' म्हणून टाकले होते.

वास्तविक त्यांना काहीही समजलेले नव्हते. पण तेवढ्यात कुमार पुढे म्हणाला..

"सोशल व्हायलाच पाहिजे .."

मानेकाका - सोशलच काय, काश्मीरही व्हायला पाहिजे
कुमार - काय?
मानेकाका - यू आर राईट..
कुमार - काय राईट?
मानेकाका - सोशल व्हायलाच पाहिजे..
कुमार - काश्मीर फार लांब पडेल.. सेम डे रिटर्न ठेवू आधीची ट्रीप...

'ट्रीप' हा शब्द मात्र आजूबाजूच्या सगळ्यांना समजला. त्यावर मुले नाचू लागली.

आणि एक संपूर्ण दिवसभर 'कोमल साने' या गुलाबाच्या फुलाचा सुगंध जाणवत राहील अशा आचरट कल्पनेतून दास्ताने वाड्यातील तमाम पुरुषांनी 'सहल' या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले. दास्ताने वाड्यातील सर्व बायकांना त्यामुळे भलताच उत्साह आला. आपल्याला कधी संभाजी बागेतही न नेणारा आपला नवरा आता सहलीला कसा काय तयार झाला हे नीटसे समजत नव्हते. पण त्या निमित्ताने खानापूरला जाऊन येता येणार होते..

खानापूर... !

'माय ऑन्ट्'स फार्महाऊस इझ देअ.. वि कूड गो देअ..'

कोमलने निगड्यांकडे पाहात मानेला हेलकावे देत लिपस्टिक न बिघडू देता उच्चारलेल्या या वाक्यातील ओ का ठो निगड्यांना समजलेले नव्हते. पण इतक्या लाडिकपणे म्हणतीय म्हणजे काहीतरी चांगलंच असणार अशा समजुतीने त्यांनी प्रभावित होऊन तिच्याकडे बघत नकळत होकारार्थी मान हलवली. या गोष्टीमुळे घाटे न निगडे यांच्यात एक शीतयुद्ध सुरू झाले.

घाटे - हॅ हॅ हॅ... निगडे .. तुमचं शिक्षण पाचवी.. माना काय डोलवताय...

कुमार आणि कोमल यांना या वाक्याचा रिलेव्हन्सच समजला नाही.

निगडे - तुमचं काही बिनसलंय का घाटे? दोन माणसे बोलत असताना मधे मधे का नाक खुपसताय?

कोमल साने या बाईच्या मावशीचे खानापूर येथे असलेले फार्म हाऊस दिवसभर वावरायला मिळेल या बातमीने दास्ताने वाड्यात एकाचवेळेस आगीही लावल्या अन पावसाच्या सरीही बरसवल्या.

निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या फार्म हाऊसमधे कोमलकडे बघत बघत एक दिवस घालवता येईल या विचाराने अगदी राजाराम शिंदेंनीही पटकन प्रस्तावाला अनुमोदन दिले. तर या बाईचा नखरा सहन करत बसावा लागेल या धास्तीने तमाम स्त्री वर्गाने त्यात काही ना काही उणीवा शोधल्या.

मात्र शेवटी सहल हा प्रस्तावच इतका नावीन्यपूर्ण व टॉनिकप्रमाणे होता की मुलांचा अन नवर्‍यांचा आग्रह पाहून स्त्री वर्गाने नाके मुरडत शेवटी मान्यता प्रदर्शित केली अन आज सगळे माणसांची यादी करायला बसले होते. सहलीला जायला केवळ एक दिवस मधे उरलेला होता. कुमारने कंपनीतील ओळखीच्याची एक बस सांगीतलेली होती अन ती चाळीस माणसांची असल्याने अन तेहतीसच्या पुढे संख्या जात नसल्याने आता प्रश्न निर्माण झाला होता. आजवर ज्या पुजारी दांपत्याच्या वार्‍याला कुणी उभे राहायचे नाही त्यांना आता सन्मानपुर्वक बोलावून मीटिंगमधे आणण्यात आले. त्यांचे तीन मेंबर होत होते. पण पुजारी अत्यंत लोभी व भयानक संशयी!

पुजारी - वाड्यातील सगळ्यांनी आम्हाला का घेरलेले आहे..
माने काका - घेरलं बिरलं नाही बे.. ट्रीपला बोलावतोय तुला..
पुजारी - कसली ट्रीप?
श्री - कोमल वहिनींच्या फार्महाऊसवर जायचंय परवा, खानापूरला..
कोमल - इट्स नॉट माईन.. मावशीचंय ...
पुजारी - काय???
श्री - अहो यांच्या मावशींचं फार्म हाऊस आहे..
पुजारी - फार्म हाऊस म्हणजे?
श्री - शेतातलं घर..
नंदा - अय्या हो का? मला वाटलं फार्म हाऊस म्हणजे ...

आपला अडाणीपणा दिसेल म्हणून नंदाने कोमलकडे पाहात जीभ चावली.

पुजारी - बर मग?
श्री - तर तुमच्या तिघांची नावे घातलेली आहेत यात.. हे सांगायचं होतं...
पुजारी - न विचारताच?
श्री - आता वाड्यातले आपण सगळे एकमेकांचे बांधव..
पुजारी - मी नाही येणार...
श्री - अहो असं काय करताय?
पुजारी - छे छे.. मला पूजा आहेत चार त्या दिवशी..
मावशी - अमावास्या आहे त्या दिवशी... तू काय अघोरी पूजा करतोस का?
पुजारी - बघा.. बघा या कशा बोलतात.. म्हणूनच मी येत नाहीये..
श्री - नाही हो.. रागवू नका.. त्यांना मी सांगतो...तुमच्या तिघांचे मिळून नव्वद होतात...
पुजारी - काय नव्वद?
श्री - रुपये..
पुजारी - कसले?
श्री - वर्गणी.. ट्रीपची..
पुजारी - कोण येतंय ट्रीपला पण? वर्गणी देऊन तर मुळीच येणार नाही.. तसंच यायचं असलं तर बोला..

मानेकाका भयानक भडकले.

मानेकाका - लाथा घाला या बामणाला.. चल रे हाकल.. तिच्यायला.. फुकटात यायला बघतंय.. कुमार.. आपण अकरा जणांचे पैसे वाटून घेऊ.. पण या असल्या टुकार पब्लिकला न्यायचं नाही.. नाहीतर हा माने हा दास्ताने वाडा...

पुजारी - मी कुठे म्हणतोय पण मी येणारे म्हणून..???
मानेकाका - अरे चल्ल?? थांबतोस कसा इथे?

तेहतीसच जण होत असल्यामुळे आता सात जणांचे भाडे वाटून घ्यावे लागल्यावर निगड्यांना आपण स्वतःचे कुटुंब फारच वाढवले याचा पश्चात्ताप झाला.

निगडे - माझं काय म्हणणं आहे? ते जे सात जणांचे एक्स्ट्रॉ होतायत ना ते कुटुंबांमधे वाटा...
श्री - म्हणजे काय?
निगडे - म्हणजे आम्ही, घाटे, मावशी, काका. कर्वे, शिंदे, आजी, साने अन पेंढारकर..
श्री - म्हणजे?
निगडे - म्हणजे नऊ वाटे होतील..
श्री - मग?
निगडे - तेहतीस जणांवर वाटले तर तेहतीस वाटे होतील ना..

मावशींना पॉईंट लक्षात आला.

मावशी - काढायचीच नाहीत ना आधी एवढी पोरं...

हे वाक्य ऐकून कोमल कुमारच्या खांद्यावर डोके टेकून हासली. तिची ही अदा पहावी की मावशींवर चिडावे याचा निर्णय न करता आल्यामुळे निगडे कापलेल्या बोकडासारखे मृतवत पडून राहिले.

मावशींनी फारच घनघोर शैलीत निगडेंच्या वर्मावर बोट ठेवले होते. निगडे काकू संतापल्या.

निगडे काकू - हिचा नाही संसार! कुणाला माहिती पवार माहेरचं नाव आहे का सासरचं? नवरा मेला असेल हिची भाषा ऐकून..

मावशी ताडकन उठून उभ्या राहिल्या. श्री अन मधू धावले व त्यांनी मावशींना शांत केले. त्यामुळे निगडे काकू बचावल्या. नाहीतर त्यांची काही धडगत नव्हती. तेवढ्यात मागून गणेश बेरीने महेशला विचारले.

"दादा, किती पोरं काढली तर ट्रीपला चालतात?"

झालं! आता अगदी निगडे काकूही हसल्या. राजश्रीताई अन तिची आई अशा दोघींनीही गणेशला प्रत्येकी दोन दोन धपाटे घातल्यावर त्याला आपली काही तरी सांस्कृतिक चूक झालेली असावी असे वाटले. स्वतः बेरींना मात्र गणेशवर हात उगारायचेही धाडस व्हायचे नाही. कोमल अजूनही हसतच होती. तिच्या हसण्याने वातावरण सुगंधी झाल्यामुळे पुन्हा लोकांना मूड आला.

शेवटी तेहतीसच वाटे करायचे ठरले अन कोमलसमोर नाचक्की नको म्हणून निगडेंनी तयारीतर दाखवलीच उलट तिच्याकडे बघत सगळ्यांना उद्देशून म्हणाले..

'सहलीचा आनंद महत्वाचा.. काय कोमलबाई? पैसा काय? येत जात राहतोच..'

कोमल अगदी 'स्वप्नातल्या राजकुमाराने चारचौघांमधे प्रपोज केल्यावर राजकुमारी लाजेल' तितके लाजत कुमारकडे बघत पुटपुटली..

'मी काही बाई नाहीये..'

राजाराम शिंदे - आँ?????
शीला - अहो... बाई नाहीये म्हणजे अजून इतकी मोठी नाहीये असं म्हणायचंय तिला.. तुम्हाला काय झालं आश्चर्य करायला?
कोमल - आपण ज्या फार्म हाऊसवर जाणार आहोत ती माझी मावशीच अजून पंचेचाळीस वर्षांची आहे..

समीर - मै नही आ सकता पारो...
अभ्यंकर आजी - हा कुणाशी बोलतोय?
प्रमिला - पिक्चरचा परिणाम.. अभ्यासाच्या नावाने बोंब नुसती.. समीर.. ट्रीपला यायचंय हं?
समीर - नही मां... नही... तुम मुझे मजबूर मत करो...
मधू - प्रमिला.. याची भाषा बदल हं? सांगून ठेवतोय..
समीर - पिताजी... मेरी मां से कुछ मत कहिये.. ये मेरी मां है...
मधू - ते मला माहितीय.. ती 'मा' का आहे तेही मला माहितीय... मी बाप आहे तुझा..
समीर -सच??? कई सालोंके बाद आपका बिछडा हुवा बेटा...
मधू - गप रे?

नैना, महेश अन राजश्री हासत होते.

बेरी - मी काय म्हणतोय..
मानेकाका - जा रे बाबा, ये जाऊन लवकर.. याचं आपलं नेहमी एकच असतं..
बेरी - नाही हो.. त्याच्याबद्दल नाही म्हणत आहे मी..
मानेकाका - मग?
बेरी - तिकडे दरी वगैरे नाहीये ना?
कोमल - कुम.. व्हॉट इज दरी?
कुमार - व्हॅली.. दरी मीन्स व्हॅली..
कोमल - ओह.. छे छे!

नवर्‍याला चारचौघात 'अहो' असे संबोधायलाही लाजणार्‍या दास्ताने वाड्यातील गृहिणी अवाक झालेल्या होत्या. 'कुम???' मधू अन श्रीने एकमेकांकडे पाहिले. दोघेही गालातल्या गालात हासले. प्रमिलाने दोघांना हसताना पाहिले. बायकांना रहस्ये ऐकायची फार ओढ असते. प्रमिलाला काही स्वस्थ बसवले नाही.

प्रमिला - काय हो? ...का हसलात?
मधू - मी? छे...
प्रमिला - सांगा ना...
मधू - अगं मी नाही हसलो.. काहीतरी काय?
प्रमिला - भावजी.. का हसले हो हे?
श्री - नाही हो.. कुठे कोण हसलं??
प्रमिला - भावजी.. तुम्हीसुद्धा हासलात..

आता मधू पुन्हा हसायला लागला. श्रीपण हसायला लागला.

प्रमिला - काय झालं सांगा ना??

श्रीने मधूकडे पाहिले. मधूने घाबरल्याची अ‍ॅक्शन करत 'नको नको' ची खूण केली अन पुन्हा हसायला लागला. आता श्रीलाही मूड आला.

श्री - वहिनी.. पिट्या कॉलेजला होता ना..
गणेश - समीर दादा? तुझ्या बाबांना पिट्या म्हणतात?

गणेशला पुन्हा धपाटा मिळाला व वर सल्ला! श्रीकाका अन मधूकाका जुने मित्र आहेत. फक्त श्री काकाच त्यांना तसं म्हणतात!

ही माहिती शिंदे अन साने यांनाही नवीन होती.

शिंदे - म्हणजे तुम्ही दोघे लहानपणापासून या वाड्यात राहता?
मावशी - व्रात्य होते दोघेही ... त्यातल्या त्यात हा तर फारच...

मधूकडे बोट करून मावशींनी उच्चारलेले हे वाक्य ऐकून प्रमिला फिदीफिदी हसू लागली.

प्रमिला - अजूनही आहेत.... हसायला झालं काय पण?
श्री - अहो याच्या कॉलेजमधे एक मैत्रिण होती याची?
प्रमिला - आं????????
मधू - अगं ते झालं आता केव्हाच... त्यानंतर दहा वर्षांनी आपलं लग्न झालं...
प्रमिला - मला सांगीतलं नाहीत ते??
मधू - आता त्यात काय सांगायचंय..
श्री - तिचं नाव कुसूम..
प्रमिला - मग?
श्री - हा तिला लाडाने 'कुम' म्हणायचा ते आठवलं म्हणून हसलो दोघं..
प्रमिला - लाडाने??????
श्री - अहो वहिनी या जुन्या गोष्टी आहेत.. मजा म्हणून सांगीतलं..
प्रमिला - 'कुम' काय.. ?? बघतेच मी आता...
मधू - आता काय बघणारेस तू?? तिच्या मुलांची लग्नंसुद्धा झाली असतील आता..
प्रमिला - तिचंही प्रेम होतं का हो तुमच्यावर??
मधू - नसाव..
प्रमिला - कशावरून?
मधू - नाहीतर आपलं लग्न झालं असतं का?
प्रमिला - काय??????
मधू - अगं शक्यंय का.. ती बडी माणसं... आपण आपली साधी...

प्रमिलाचा तो फणकारा पाहून सगळेच हसू लागले. अगदी मधू सुद्धा!

समीर - मां... ये पहले मुहब्बत का दर्द दिलसे हरगीज मिटता नही है मां...

मधूने समीरच्या पाठीत धपाटा मारल्यावर गणेशला 'धपाटा मिळण्यात आपल्याला एक साथीदार मिळाला असून धपाटा मारण्यास वयाची अट नाही' या दोन गोष्टी क्लीअर झाल्या व त्याच्या चित्ताचे समाधान झाले.

अभ्यंकर आजी - खायला काय काय घ्यायचंय बरोबर?
मावशी - या वयात हिचा मोह बघा.. दुसरं काही सुचतच नाही..
अभ्यंकर आजी - ही काही म्हणाली का गं नंदे मला?
नंदा - नाही ... त्या म्हणाल्या त्या करंज्या आणणारेत..
मावशी - ए नंदटले... करंज्या तुझा काका आणणार आहे... मी एकशे चार रुपये दिलेले आहेत मोजून..
मानेकाका - ए मावश्ये.. तू बटाट्याच्या लाट्या आण.. बर्‍या करतेस..

एकेक पदार्थ आणायचा ठरला. अभ्यंकर आजी अती सोवळ्याच्या असल्यामुळे त्यांच्यासाठी फक्त नंदा अन प्रमिला जे करतील तेव्हढेच होते. त्यात पुर्‍या अन कोशिंबीर होती. पण त्या सहलीच्या आनंदात भांडल्या नाहीत.

मात्र, त्या रात्री झोपताना कोमल अन कुमार दोघांनाही पवार मावशींची रास्त भीती बसलेली होती. ही बाई कुणालाही काहीही बोलते याचा अनुभव गेल्या दहा दिवसात त्यांना आलेलाच नव्हता. कारण बहुतांशी मावशी एकट्याच, गप्प गप्प बसलेल्या असायच्या. कोमलला तर धडकीच भरलेली होती.

दुसरा संपूर्ण दिवस नुसता तयारीत अन उत्साहात गेला. पोरे टोरे जमून चर्चा करत होती. राजश्री, गणेश अन महेश तिघेही आज समीरदादाकडेच झोपणार होते. कारण त्याचे पहाटे चारला उठायचे ठरलेले होते. पाच वाजता बस येणार होती. राजश्रीने नैनाला समीरकडे झोपायला येण्याचा खूप आग्रह केला. पण नैना हसत हसत नाही म्हणत होती. एकदा तर महेशही म्हणाला.. 'येतीयस का?' त्यावर नैनाने हसत नकारार्थी मान हलवल्यामुळे तो निराश झाला.

सहलीचा दिवस उजाडला... ! उजाडला म्हणजे? अजून उजाडायचा होता.. पण साडे तीन वाजताच सगळी मोठी माणसे जागी झाली. आंघोळी पांघोळींची घाई सुरू झाली. नळ यायला अजून तीन तास अवकाश होता. बहुतेकांनी पाणी कालच भरून ठेवले होते. समीरकडे झोपलेली मुले मात्र स्वतःच साडे चारला उठली. आणि मग त्यांच्यात आवराआवरीची गडबड उडाली.

बरोब्बर पावणे पाच वाजता तमाम दास्तानीय मंडळी मुख्य चौकात जमा झाली. मोजणी सुरू झाली. एकेक जण अंधारातच एकेकाकडे बघत होता.

मानेकाकांनी ठेवणीतला, अत्यंत जुनाट, एकमेव असलेला काळा कोट घातला होता. त्यात ते नेहमीपेक्षा अधिक रुबाबदर दिसत होते हे खरे असले तरी तो कोट घालावा असे त्यांनाही आता वाटेनासे झाले होते. सहलीचे नेतृत्व त्यांच्याकडे होते. काही औषधे, काही जरूरीच्या वस्तू असे सर्व काही त्यांनी घेऊन ठेवलेले होते.

अभ्यंकर आजी नऊवारी नेसून जप करत बसल्या होत्या. त्यांच्याजवळ त्यांची एक पिशवी होती. त्यात सोवळ्याला चालतील असे काही पदार्थ, प्यायचे उकळलेले पाणी, एक पोथी व जपाची माळ असे साहित्य होते.

पवार मावशी एक पोते घेऊन आलेल्या होत्या. त्या पोत्यात अनेक खाद्यपदार्थ होते. ऐनवेळी फक्त बाट्याच न करता त्यांनी दिलदारपणे अनेक कोरडे पदार्थ विकत आणून बरोबर घेतले होते. त्यामुळे बहुतेकजण आता मावशींशी दोस्ती करण्याच्या प्रयत्नात होते. बस असल्यामुळे वजन कुणालाच होणार नव्हते. मावशींची एक स्वतःची पिशवी होतीच.

निगडे कुटुंबीय मात्र प्रचंड होते. संख्येने! प्रत्येकाच्या हातात एक एक पिशवी!

प्रमिला, नंदा आणि शीला यांनी माळलेल्या गजर्‍यांमुळे वातावरण आधीच सुगंधी झालेले होते. महेश हळूच नैना कुठे दिसत कशी नाही याचा अंदाज घेत होता. घाटे कुटुंबियांनी आपला भाचा व त्याची बायको आलेले नाहीत असे जाहीर करून टाकले. त्यांचे पैसे आधीच घेतलेले असल्यामुळे सगळ्यांना या बातमीचा आनंदच झाला. घाटेंनी कुरकूर करून पाहिली. पण सहलीच्या सुरुवातीलाच वाद नकोत या विचाराने गप्प बसले.

बेरी काका शुचिर्भूत होऊन आध्यात्मिक गुरूच्या वेषात प्रकट झालेले होते. सतत आकाशाकडे बघून हात जोडून काहीतरी पुटपुटत होते.

मानेकाका - ए बेरी... काय पुटपुटतोयस सारखा?
बेरी - लांबच्या प्रवासाआधीची प्रार्थना आहे ही..
मानेकाका - लांबचा प्रवास? या इथे आहे ते खानापूर... च्यायला...

त्या पहाटेच्या मंजूळ, पवित्र वातावरणात मानेकाकांचा पहिला 'च्यायला' ऐकल्यावर कशी जान आली. आता दास्ताने वाडा दास्ताने वाडा वाटू लागला.

नैना का दिसत नाही आहे हा प्रश्न कुणाला विचारावा हे महेशला समजत नव्हते.

तेवढ्यात......

कुमार आणि कोमल साने आले.

त्यांना पाहताच घाटे आणि निगडेंनी त्वरेने 'गुड मॉर्निंग' विश केले. कोमलचा अवतार पाहून प्रमिला, शीला अन नंदा अवाकच झाल्या.

त्या जमान्यात तिने स्किन टाईट जीन्स घातलेली होती. वर निळा टी. शर्ट.!

अभ्यंकर आजी - हा कोण आहे गं? घाट्यांचा भाचा काय?

प्रमिला खुदकन हासली.

मावशी - ती सान्यांची कोमल आहे...
अभ्यंकर आजी - हो का? काय बदलले नाही दिवस?

इतक्या पहाटे सांस्कृतीक वाद पेटू नये म्हणून श्री व मधूने वेगळा विषय काढला. कोमल अन कुमार आल्यापासून त्यांच्या सेंटचा वास सर्वत्र भरून राहिला होता. ते एगदी एकमेकांना चिकटूनच उभे होते. सगळे मधून मधून डोळे फाडून कोमलकडे बघत होते. प्रमिला, शीला अन नंदा तर नाराजच झाल्या होत्या. 'ही असली थेरं कशी बाई सुचतात यांना काही कळत नाही' असे तिचा पोषाख बघून त्यांच्या मनात येत होते.

कोमल अन कुमार यांचा आधुनिकपणा पाहून बहुतेकांना आपल्या पोषाखाचा, वागण्याचा कॉम्प्लेक्स यायला आत्ताच सुरुवात झाली. या कॉम्प्लेक्समुळे मने पहाटेच बिनसली. पण सहलीचा अमाप उत्साह पाहता या गोष्टीकडे आत्ता कुणाचे लक्षच नव्हते. पण बर्‍याच जणांच्या मनात येत होते की कोमलचा जमेल तेव्हा जरासा पाणउतारा करायला पाहिजे. पण तिच्याच काकूच्या फार्महाऊसवर जायचे असल्यामुळे तेही शक्य नव्हते.

पाच वाजून पाच मिनिटे झाल्यावर मानेकाका दिंडी दरवाजातून बाहेर जाऊन रस्त्यावर उभे राहिले. लांबवर कुठल्याही गाडीचा आवाज झाला की घाटे काकू आपल्या चारही पिशव्या घेऊन उभ्या राहायच्या. गाडी निघून गेली की निराश होऊन बसायच्या.

पाच वीसला मानेकाका आत आले.

मानेकाका - कुमारराव? काय झालं गाडीचं?

'बस' ही जबाबदारी कुमारची होती! पण मानेकाकांचं टायमिंग मुख्यमंत्र्यांसारखं होतं! पाच दहा मिनिटे चुळबुळून कुमार म्हणाला..

कुमार - कॅन आय मेक अ कॉल...
मानेकाका - अं?
कुमार - कॉल .. कॉल..
मानेकाका - तेच ना... कॉल करूनही येत नाहीत वेळेवर....
कुमार - फोन करू का?
मानेकाका - कुणाला?????

'फोन करू का' या प्रश्नाशी मानेकाकांच्या रक्तदाबाचा जवळचा संबंध होता. पण फोन केल्याने आपलेच ताटकळणे बंद होणार आहे याची जाणीव झाल्यावर मग ते म्हणाले..

मानेकाका - ओके...

इतक्या अत्याधुनिक जोडप्यालाही शेवटी आपल्याकडच्या फोनची गरज भासली यामुळे मानेकाका मान ताठ करून सर्वत्र वावरू लागले. कुमार त्यांच्या घरी जाऊन फोन करून आला.

कुमार - स्वीटहार्ट..

कोमलने 'स्वीटहार्ट' हे बारश्यातील नांव असल्याप्रमाणे लगबगीने कुमारच्या जवळ जाऊन 'जणू धरण फुटल्यानंतरही तो बचावून परत आला आहे' अशा आविर्भावात त्याला विचारले..

कोमल - इज एव्हरीथिंग फाईन कुम???

हे दोघे काय बोलत आहेत याची वाड्यातल्या एकालाही सुतराम कल्पना नव्हती. पण आविर्भावावरून काहीतरी भयानक घडले की काय असे त्यांना वाटत होते.

कुमार - ड्रायव्हर सेज ही वॉज नॉट इन्स्ट्रक्टेड अ‍ॅट ऑल..
कोमल - ओह माय गॉड...

हे 'ओह माय गॉड' फक्त बर्‍याच जणांना कळलं! मानेकाका लगबगीने जवळ आले.

मानेकाका - व्हॉट...????
कुमार - येतोय...
मानेकाका - मग झालं काय?
कुमार - कुठे काय?
मानेकाका - मग या का किंचाळल्या?
कुमार - शी एक्स्क्लेम्ड.. नॉट शाऊटेड...
मानेकाका - अच्छा अच्छा!

एक्स्क्लेम्ड आणि शाऊटेड हे दोन्ही शब्द माहीत नसल्यामुळे 'अच्छा अच्छा' म्हणणेच बरे पडले मानेकाकांना!

पण सहा वाजले तरी बसचा पत्ता नाही. इकडे महेशला काळजी वेगळीच.. नैनाचाही पत्ता नाही अन सगळ्यांसमोर विचारताही येत नाही.

पण आता असंतोष पसरू लागला. कारण किर्र काळोख जाऊन आता सूर्यनारायणाची चाहूल लागली होती. यावेळेस खडकवासला धरण क्रॉस व्हायला हवे होते तर अजून दास्ताने वाड्याचा दिंडी दरवाजाही क्रॉस झालेला नव्हता.

पण कुमार अन कोमलच्या फर्ड्या इंग्रजीमुळे त्यांच्याशी बोलायची भीतीच वाटत होती सगळ्यांना!

सव्वा सहा झाल्यावर मात्र मानेकाकांचा पेशन्स संपला..

मानेकाका - कुमारराव, गाडी कुठून येणार आहे...
कुमार - स्टेशन..
मानेकाका - मग पोचली का नाही अजून..
कुमार - आय थिंक आय नीड टू कॉल हिम अगेन...
मानेकाका - म्हणजे काय?
कुमार - पुन्हा फोन करायला हवा बहुधा..

मानेकाकांना हे मंजूर नव्हते.

मानेकाका - अजून काही वेळ पाहू वाट! पमे.. तू चहा टाक...
प्रमिला - किती?
मानेकाका - माझा तर टाक आधी.. मग बघू बाकीच्यांचं...
प्रमिला - नाही.. म्हणजे सगळेच घेणार असतील तर दूध आणायला लागेल..
मावशी - मी घेणारे...
अभ्यंकर आजी - कसलं चाललंय गं?
मावशी - चहाचं! शीला करतीय..
अभ्यंकर - मला नको..

शीला ब्राह्मण नसल्यामुळे अभ्यंकर आजी कटाप झालेल्या होत्या. आणि प्रमिला ऐवजी शीला चहा करतीय हे मुद्दाम सांगून मावशींना अभ्यंकर आजी या नालायक बाईला चहा न मिळू दिल्याचा असुरी आनंद झाला होता.

शेवटी मधूने सरळ एक लिटर दूध आणले. सात वाजता सर्वांचे चहापान झाले अन फटफटीत उजाडलेले असल्यामुळे आता सगळेच एकमेकांना दिसू लागले. ट्रीपच्या निमित्ताने नेसलेल्या नव्या साड्यांची चौकशी झाली. ही यांनी त्यांच्या त्या कार्यात दिली, ही मला त्यांच्याकडून आलीय वगैरे!

आणि सव्वा सात वाजता मात्र मानेकाका कडाडले.

मानेकाका - ए कुमार....

आत्तापर्यंत वाड्यात कुमारला कुणी ' ए' अशी हाक मारलेली नव्हती. वास्तविक तो सगळ्यात लहान होता. पण तरी 'अहो' म्हणायचे सगळे त्या दोघांनाही! आता तो दचकला. मानेकाकांचा आविर्भाव पाहून तो पटकन दिंडी दरवाज्याकडे पळाला. पुन्हा आत आला. मानेकाकांची किल्ली घेऊन पुन्हा फोन करून आला.

मानेकाका - काय झालं?
कुमार - निघतोय म्हणाला..
मानेकाका - निघतोय म्हणजे?
कुमार - इथे यायला...
मानेकाका - मग आत्तापर्यंत काय करत होता??
कुमार - तेच ना..
मानेकाका - तेच ना काय? तुला विचारतोय? पैसे भरलेत आपण गाडीचे.. दोन दोन फोन करून माझा रुपया घालवलास अन अजून ड्रायव्हरचं काय चाललंय त्याचाच पत्ता नाही म्हणजे काय?

कुमार आता दचकला. वाड्यात खोली घेतल्यापासूनचे बारा दिवस बरे गेले होते. तेराव्या दिवशी पहिलं पाणी चाखायला मिळालं सकाळी सकाळीच! अजून मानेकाकापर्यंतच प्रकरण होतं हे त्यातल्या त्यात बरं होतं! मावशी सुरू झाल्या तर काय झालं असतं याची त्याला कल्पनाच करवत नव्हती.

श्री - मी.. पटकन बघुन येऊ का स्टेशनवर....
प्रमिला - भावजी तुम्ही कशाला?? आधीच दम लागतो तुम्हाला...

प्रमिलाला आपली अजून इतकी काळजी आहे हे बघून श्रीच्या मनात सकाळी सकाळीच चांदणे पडले.

अभ्यंकर आजी - गाडी आली नाही काय अजून?
मावशी - आली की कधीच?
अभ्यंकर - मग? थांबलेत कशाला सगळे?
मावशी - तुमचा जप चाललाय ना...

सगळे हासले. आजींना कळले. ही चेष्टा होती. त्या रागारागाने जप करू लागल्या.

आता मावशींच्या पोतडीतून बाकरवड्या काढून पोरांना वाटण्यात आल्या.

मानेकाका - भूक लागली च्यायला..

ते बिनदिक्कत असे म्हणाल्यामुळे सर्ळ नाश्ताच केला सगळ्यांनी! अजूनही नैनाचा पत्ता नव्हता. कोमल 'आपल्या नवर्‍याचा क्षणाक्षणाला वाढता अपमान होतोय' या भावनेने काळवंडलेली होती.

तेवढ्यात वाड्याच्या दरवाजासमोरच एक बस थांबली. सगळे भराभर उठले. कुमारच्या जीवात जीव आला. तो धावत वाड्याच्या बाहेर गेला. सगळे हसून खेळून आता पिशव्या घेऊन बाहेर पडू लागले दारातून.

तेवढ्यात बस निघून गेली.

मानेकाका - हे काय? बस का गेली?
कुमार - पत्ता विचारत होता..
मानेकाका - कुठला?
कुमार - त्याला बॉम्बेला जायचं होतं...
मानेकाका - म्हणजे?
कुमार - आपली नव्हती ती बस...

"अरे मग आपली बस कुठंय" मानेकाकांनी अक्षरशः किंचाळून विचारले तसा वीर मारुतीही दचकला.

दोन मिनिटांनी कोमलने कुमारच्या गालावरून आपला नाजूक रुमाल फिरवला. तिच्यामते त्याला फारच कष्ट पडले होते सगळं अ‍ॅरेंज करताना! अन वर लोक बोलत होते त्यालाच!

कोमल - हाऊ कॅन ही शाऊट अ‍ॅट यू?

हा प्रश्न त्याला विचारताना ती त्याचा गाल पुसत असल्याने कुणालाही 'ती त्याला काय विचारते आहे' यात इंटरेस्टच नव्हता. बायकांनी एकमेकांकडे पाहिले. महेशने पटकन समीरकडे पाहण्यासाठी मान फिरवली आणि...

चाँदसी मेहबुबा हो मेरी.. कब ऐसा मैने सोचा था??
हां तुम बिलकुल वैसी हो... जैसा मैने सोचा था....

क्रीम कलरच्या प्लेन पंजाबी ड्रेसमधे, ड्रेसहून सुंदर असलेल्या आपल्या रंगाच्या अंगाला झाकत... समोरून महेश आपल्याकडे थक्क होऊन बघतोय याची सार्थ जाणीव ठेवून मिश्कीलपणे जीभ गालात घोळवत... राजश्रीकडे बघून हसत, दोन्ही हातांमधे ओढणीशी चाळा करत अन आपल्या नितंबाना लाडीक हेलकावे देत... मेहबुबा बाहेर आलेली होती.. नैना... राजाराम... शिंदे!

सरांउंडिंग परिस्थितीतला सगळा इंटरेस्टच गेला महेशचा! आता फोकस फक्त एकच... नैना.. नैना!

नैना काय करतीय? कुणाशी बोलतीय? काय बोलतीय? हसताना कशी दिसतीय? ड्रेस किती मस्त दिसतोय? आपल्याकडे बघतीय का? आपल्यावर तिचं लक्ष आहे का? आपण काय काय जोक्स करतोय त्यावर चोरून हसतीय का? आता आपण काय केल्यास ती आणखीन इम्प्रेस होईल?

लहानपणी एकत्र खेळूनही नात्यात काहीही मोकळेपणा उरलेला नव्हता. इसीको कहे जवानी... !

बस का येत नाही आहे, आली काय अन नाही आली काय! कशाकडेही लक्ष नव्हतं आता महेशचं! राजश्रीताई अन नैना एकमेकींबरोबर बसलेल्या असल्यामुळे आता राजश्रीशीही काही बोलता येत नव्हतं! बाकीची सगळी पोरेच काय, मोठी माणसेही वैतागून काळवंडलेली असताना महेशचा एक अन नैनाचा एक असे दोन चेहरे अधिकाधिक उजळत चाललेले होते. हिला बाहेर यायला उशीर का झाला असे कुणीतरी विचारले त्यावर शीलाकाकूने 'अभ्यास करत होती' असे उत्तर दिलेले महेशने ऐकले.

'जीव घेतात च्यायला वाट लावायला पाहून'!

महेशच्या मनात विचार आला.

आणि बस आली.

सकाळी नऊ वाजता बस आली अन ड्रायव्हर म्हणाला डिझेल भरून येतो तासाभरात!

मानेकाकांनी त्याला शनिवार पेठेतील येणार्‍या जाणार्‍या सर्व स्त्री पुरुष बालक यांच्यासमोर त्याच्या गेल्या तीन पिढ्यातील व्यक्तींना शांती लाभणे शक्य होणार नाही अशा शिव्या दिल्या. दास्ताने वाडा मानेकाकांच्या त्या रौद्र रुपाकडे पाहून थक्क झाला होता. ड्रायव्हर तर 'हे येणार असतील तर मी येणारच नाही' म्हणून निघून चाललेला होता. शेवटी बायाबापड्यांनी त्याला खूप समजावून सांगीतल्यावर त्याने गाडी स्टार्ट केली.

सामान आणि माणसे आत ढकलण्याची जबाबदारी श्री अन मधूने घेतली होती. सर्व जण स्थानापन्न होत असतानाच महेशला आठवले की त्याच्याकडे असलेलं गाण्यांच्या भेंड्यांचं रद्दीतून घेतलेलं एक पुस्तक वरच राहिलेलं आहे. ते आणायला तो वर धावला. मधू आत चढला. ड्रायव्हरच्या केबीनमधे कुमार बसलेला होता. पहिल्याच सीटवर मानेकाका बसलेले होते. त्यांचे अन ड्रायव्हरचे आणखीन प्रेमळ संवाद होऊ नयेत म्हणून मधू त्यांच्या शेजारी बसला व आधीच तिथे बसलेल्या घाटेकाकांना मागे बसा म्हणाला. त्यावर घाटेकाकांनी तीव्र नाराजी दर्शवली पण ते मागे बसायला गेले. बेरीकाकांच्या शेजारची जागा मोकळी होती कारण या निरुपद्रवी माणसाच्या शेजारी बसणे हा दास्ताने वाड्यातील माणसे आपला अपमान समजत होती. तेथे घाटेंना बसावे लागले. शीला नंदाबरोबर बसल्यामुळे राजाराम शिंदेंना निगडे काकांबरोबर बसावे लागले व राजश्री गणेशच्या शेजारी बसल्यामुळे नैना पार मागे जाऊन खिडकीत बसली.

जिना उतरून धावत खाली येत असलेल्या महेशला पाहून सुटकेचा निश्वास टाकून शेवटी श्री बसमधे चढला. कारण महेशला आणखीन उशीर झाला असता तर मानेकाकांनी त्याच्यावर तोफ डागली असती.

बसमधे चढल्यावर पुढच्या भागातील एकही सीट मोकळी दिसेना त्यामुळे श्री वैतागला. शेवटी एक सीट मोकळी दिसली. ती सीट मोकळी आहे हे श्रीला कळलेले आहे हे पाहून त्या सीटच्या शेजारच्या सीटवरच्या व्यक्तीने खिडकीतून बाहेर नजर वळवली...

सौ. प्रमिला मधूसूदन कर्वे यांच्याशेजारी... श्री. श्रीनिवास पेंढारकर स्थानापन्न झाले आणि स्थानापन्न झाल्याझाल्याच मोगर्‍याच्या सुवासाने त्यांची फुफ्फुसे ओसंडून वाहू लागली.

महेशला न घेताच गाडी चार फूट पुढे सरकली हे पाहून पुढच्या सीटवरचा मधूसूदन उठून ड्रायव्हरला ते सांगणार तेवढ्यात महेशने चालत्या बसमधे उडी घेतली अन दरवाजा लावून घेतला.

"दास्ताने वाड्याचा.... विजय असो"

ही आरोळी तीनवेळा दुमदुमली अन बस ओंकारेश्वराला पास करून बालगंधर्व पुलाला लागली तेव्हा..

बराच शोध घेऊन महेशला शेवटी 'एकच सीट मोकळी असल्याचा' साक्षात्कार झाला आणि...

आपण कोणत्या शुभक्षणी जन्माला आलो असू हे त्याला कळेनासे झाले...

नैना राजाराम शिंदे... यांच्या शेजारची सीट आता महेश श्रीनिवास पेंढारकर यांनी व्यापलेली होती.

दोन नजरा आता कायमस्वरुपी खिडकीबाहेर लागलेल्या होत्या अन दोन नजरा शेजारच्या लावण्याचा विचार घडोघडी मनात येत असल्यामुळे बावचळलेल्या होत्या...

दास्ताने वाड्याची ही पहिली.... व कदाचित अखेरची सहल सुरू झालेली होती.

पहाटे चार साडे चारलाच उहून बसलेले असल्यामुळे, दांडेकर पूल येइपर्यंतच गार वार्‍याचा परिणाम होऊन जवळपास सगळेच आता डुलक्या घेऊ लागले होते. एकटा कुमार जागा होता कारण त्याला मागे बसलेल्या मानेकाकांची भीती बसलेली होती. कोमल खिडकीवर डोके टेकून डुलक्या घेताना पाहणे कितीही सुखद असले तरीही घाटे अन निगडे यांना स्वतःची झोप आवरत नव्हती.

आणि.. कोणत्यातरी क्षणी... बसच्या धक्यांनी हालता हालता...

प्रमिलाची मान अलगद श्रीच्या खांद्यावर टेकली.. मोगरा! मोगरा आणखीनच निकट आला...

श्रीची झोप उडणारच अर्थातच! उडालीच....

समोर पाठमोर्‍या मधूचे डोके नियमीत हलताना दिसत होते. त्याचा अर्थ तोही झोपला होता. त्याच्या मागच्या सीटवर किरण आणि समीर होते, तेही झोपलेले दिसत होते. पुढील भागातले सगळेच झोपले होते. शेजारच्या सीटवरच्या मावशी अन घाटे काकूही झोपलेल्याच होत्या. फक्त मागे पाहाणे शक्य नव्हते. कारण मागे पाहायला खांदा वळवला अन.... प्रमिला जागी झाली तर???

संपलंच की सगळं! मग? आपले चिरंजीव आपल्याकडे पाहात तर नसतील ना? पण आता ते पाहाणे शक्य नव्हते. हालल्यामुळे प्रमिलाला जर असे वाटले असते की आपल्याला तिचा राग आला आहे तर ती संकोचून तर गेलीच असती पण पुढे कधीच मोकळेपणा राहिला नसता. आणि मुख्य म्हणजे...

कित्येक... कित्येक वर्षांनी... खरे तर दिड दशकाहूनही अधिक काळानंतर... प्रफुल्लीत करणारा स्त्रीचा इतका निकटचा सहवास श्री अनुभवत होता.. शरीरातून वणवे पेटू लागले होते.

हे कसे काय झाले? नेमके आपण प्रमिला वहिनींच्या शेजारी कसे आलो? हा विचार आता मनात येत नव्हता. तिचे उडणारे केस कानांना अन गालांना स्पर्श करत होते. तिच्या केसांचा गंध श्रीला वेड लावत होता.

प्रमिलाचा डावा खांदा श्रीच्या उजव्या दंडावर रेललेला होता. गाडीच्या धक्यांबरोबर हालत होता.

संपूर्ण देहातून उलथापालथ होत होती श्रीच्या! पण त्याच वेळेस महेश बघत आहे की काय याची काळजी वाटत होती. हे सगळं योग्य नाही हे त्याचं मन त्याला सांगत होतं!

पण महेश यातलं काहीच बघत नव्हता. शक्यच नव्हतं बघणं! कारण सावरून बसता बसता नैनाच्या ओढणीचा काही भाग महेशच्या मांडीवर पडला होता अन 'माझ्या काही लक्षातच आलेलं नाही' असं दाखवत त्याने आपला डावा हात आपल्याच डाव्या मांडीवर ठेवल्यामुळे नैनाला आता ओढणी ओढून काढावी लागणार होती मात्र.... तिने ती अजिबात ओढलेली नव्हती...

तिला काहीही माहीत नाही असे समजून महेशच्या डाव्या हाताची बोटे आता तिच्या ओढणीवरून फिरत होती. तिच्या ओढणीच्या स्पर्शातही जगावेगळी जादू होती. दोघांच्या मधल्या जागेमधे नैनाने आपला एक हात ठेवला होता. स्वतःच्या मांडीवरचा हात आपण काढला तर ती ओढणी ओढून घेईल असे वाटल्याने सुरुवातीला हात न काढणार्‍या महेशचे लक्ष तिच्या नाजूक उजव्या हाताच्या पंजाकडे गेले अन त्याने मोह होऊन हळूहळू आपला डावा हात तिच्या हाताच्या शेजारी ठेवला. काही मिनिटांमधेच तिच्या पंजाला महेशची दोन बोटे स्पर्शू लागली. गाडीच्या धक्यांमुळे किंचित अधिकच वारंवार! तिने महेशच्या विरुद्ध दिशेला मान कलवून ठेवलेली होती. महेश नैना झोपली आहे असे समजत होता. पण त्याला स्वतःच्या गृहीताला सिद्ध करून बघावे असे सारखे वाटत होते. हळूच मान कलवून त्याने तिच्याकडे पाहिले तर...

ती अजिबात झोपलेली नव्हती... तिच्या केसांमुळे तिचे डोळे आधी दिसतच नव्हते... पण झुकून पाहिल्यावर दिसत होते... ती टक्क जागी होती आणि बाहेर पाहात होती.

हादरलाच महेश! पटकन त्याने आपली बोटे जवळ ओढली.

काय वाटले असेल तिला?

या विचाराने तो प्रचंड ओशाळला होता. मात्र नैनाला डोळ्यांच्या कोपर्‍यातून त्याने आपल्याकडे पाहिल्यानंतरच हात लांब केलेला आहे हे समजलेले होते. दोन एक मिनिटांनी ती अचानक त्याच्याकडे वळून म्हणाली...

नैना - किती मस्त झाडी आहे नाही का इकडे सगळीकडे???
महेश - हं!
नैना - मला निसर्गसुंदर दृष्य फार आवडतं! .... तुला???
महेश - मला पण..
नैना - हे बघ.. नवीन घड्याळ घेतले काल..

नैनाने आपणहून स्वतःचा उजवा हात इतका पुढे केल्यावर साहजिकच घड्याळ बघण्यासाठी महेशने तिचे मनगट हातात धरले. घड्याळावर दोन तीन वाक्ये बोलून मग बोलणेच बंद झाले तेव्हा महेशला एकच गोष्ट जाणवली...

नैनाने आपले मनगट सोडवून घेतलेच नाही. आपणच सोडले ते...

मग त्याने पुन्हा तिचा हात हातात घेतला... अगदी बिनदिक्कत.. तिने हळूच त्याच्याकडे पाहिले..

नैना - काय रे??
महेश - तुझ्या हातापेक्षा माझा हात किती मोठाय..

नैना खुसखुसत हासली. आता दोघांच्या मधल्या जागेत दोन्ही हात होते... आणि ते....

..... एकमेकांमधे गुंफलेले होते....

आता कुठे जरा ती हातात हात देते
जाणार जन्म अवघा या साहसात माझा....

आर्मी इन्स्टिट्यूटचा खडबडीत रस्ता आला अन धक्याने प्रमिला एकदम जागी झाली...

खटकन श्रीकडे पाहून ओशाळली. क्षणात सावरली.

श्री - हे... राहिलं ... चुकून..

श्रीने स्वतःच्या खांद्यावर चिकटलेले एक मोगर्‍याचे फूल तिला दिले...

प्रमिला श्रीच्या डोळ्यात डोळे मिसळून खदखदून हसली अन आपण काय वेड्यासारखे हसलो असे वाटून स्वतःशीच लाजली. श्री तिचे ते क्षणाक्षणाला रंगांचे वैविध्य दाखवणारे विभ्रम बघत होता. आपली मुले आहेत, याच गाडीत आहे.. सगळे क्षणभर विसरायला झाले होते दोघांना..

कोमलच्या मावशीचे फार्म हाऊस अक्षरशः भन्नाट होते. गणेश बेरी तर उड्याच मारायला लागला. जिकडे तिकडे हिरवीगार झाडे, एक झोपाळा, भरपूर मोकळी जागा, मागच्या जागेत मिरच्या, टोमॅटो. भेंड्या अन कोथिंबीर लावलेली, एका खुराड्यात कोंबड्या, एका खुराड्यात दोन ससे, काही शेळ्या! नुसती धमाल चाललेली होती.

लहानांनाच काय, पण मोठ्यांनाही भुरळ पडलेली होती. निघायला किती उशीर झाला, काय झाले याची कशाचीही आठवण येत नव्हती कुणालाही!

ऊन असून जाणवत नव्हते. तिथल्या विहीरीतील पाणी सगळे जण प्यायले. इतकी गोड्या पाण्याची विहीर कुणी आजवर पाहिलेली नव्हती. एकीकडे पोलादी योद्ध्यासारखा सिंहगड, एकीकडे खडकवासल्याच्या जलाशयाकडून येणारा गार वारा! व्वा!

अभ्यंकर आजीसुद्धा कधी नव्हे त्या शीला अन राजारामने दिलेले पदार्थ खाऊ लागल्या होत्या. मानेकाका नेतृत्व करत असल्यामुळे 'माझ्यामुळे तुम्हाला हे सगळे बघायला मिळत आहे' अशा चेहर्‍याने वावरत होते खरे, पण मनातून तेही हरखलेलेच होते.

फार्म हाऊस बघून झाल्यावर सगळे ओसरीत आले अन गोल करून बसले. शंकर नावाच्या केअरटेकरने तोपर्यंत भजी व चहा आणून ठेवले होते. साडे अकरा वाजलेले असून सगळ्यांनी भजी खाल्ली व चहा प्यायला. आता कोमल अन कुमारचे कौतूक सुरू झाले. सर्वांनी त्या दोघांनाही मनापासून धन्यवाद दिले. मानेकाकांनीही त्याच्या पाठीवर हात ठेवून 'सकाळी रागावलो ते विसरून जा हां' असे सांगीतले. कोमल आता खुषीत आली. इतके दिवस नखरेल वागणारे व इंग्लीश झाडणारे हे जोडपे आता स्वतःहून सगळ्यांमधे छान मिक्स झाले. आता विनोद सांगणे सुरू झाले. मग गोष्टी! मग नुसत्याच गप्पा! श्री अन मधूचे कॉलेजमधले किस्से ऐकून तर महेशला खरेच वाटेना की आपले बाबा इतके धुमाकूळ घालणारे होते. श्री अन मधू टाळ्या देऊन देऊन हसत होते अन बोलत होते. त्यांच्या दोघांचे किस्से मुळी संपेचनात! एरवी जेमतेम एखाद दोन वाक्ये बोलणारे हे दोघे एकमेकांचे इतक जिवश्च कंठःश्च मित्र आहेत हे बर्‍याच जणांना त्याच दिवशीच समजले.

दोघांनी पहिला पिक्चर कसा पाहिला, पहिली सिगरेट कशी ओढली, मुलींबद्दल काय काय बोलायचे. मग वाड्यातील किस्से!

आता आजूबाजूचा परिसर पाहायला सगळे उठले. जवळपास एक तासभर सगळे हवे तिकडे फिरत होते. फार्म हाऊसच्या आजूबाजूचा परिसरही निवांत, थंडगार आणि असीम शांतता असलेला निसर्गरम्य परिसर होता.

एक तासाने सगळे पुन्हा ओसरीवर आले. अभ्यंकर आजी वाट पाहून मुळीच कंटाळल्या नव्हत्या. कारण इतक्या छान वातावरणात त्यांनी प्रथमच जपजाप्य केलेले होते व त्याचा आनंद त्यांच्या चेहर्‍यावर विलसत होता.

आता पिठले, भाकरी, ठेचा, कांदा, दही व नंतर शिरा असे शुद्ध सिंहगडीय जेवण झाले. एकेक जण काय जेवलाय त्या दिवशी! ओ येईपर्यंत खाल्ले सगळ्यांनी!

कुमार आणि कोमलला कृतकृत्य झाल्यासारखे वाटत होते.

साडे तीन वाजत आले. पब्लिक जरा लवंडले. अर्ध्याच तासाने रुमाल पाणी, आंधळी कोशिंबीर अन पत्ते खेळणे झाले. साडे पाच वाजता पुन्हा चहा अन बिस्कीटे आली. स्वर्गीय सुख म्हणतात ते हेच असे प्रत्येकालाच वाटत होते.

नैना आणि महेश यांची नजरानजर आता सततच होत होती. सकाळच्या नाजूक स्पर्शाची धुंद महेशच्या मनावरून अजून उतरलेलिच नव्हती.

प्रमिला मात्र श्रीकडे पाहायला लाजत होती. श्रीलाही जरा अवघडल्यासारखेच होत होते तिच्याशी बोलताना!

भेंड्या सुरू झाल्या...

भेंड्या सुरू झाल्या त्यावेळेस मात्र...... दास्ताने वाड्याला...

बेरी काका हा काय माणूस आहे हे खर्‍या अर्थाने समजले...

काय तो गोड गळा.... अक्षर नुसतं उच्चारलं की गाणं सुरू! केवढी मेमरी, केवढा छंद! काय काय आठवून आठवून गाणी काढत म्हणत होते. त्यांच्याशी टक्कर देण्याची पात्रता फक्त निगडे काकूंचीच होती. शेवटी लेडिज व्हर्सेस जेन्ट्स अशा भेंड्यांच्या टीम्सना बेरी व्हर्सेस मिसेस निगडे असे स्वरूप आले.

सात वाजता मात्र अधिकाराने मानेकाका म्हणाले...

"ए आवरा रे... बाकीच्या भेंड्या आता गाडीत खेळा... "

गाडीचा ड्रायव्हरही सकाळपासूनच सेलेब्रशन्समधे सहभागी झालेला होता. त्याचा मानेकाकांवरचा राग अन त्यांचाही त्याच्यावरचा राग कधीच गेलेला होता.

जायचे म्हंटल्यावर सगळेच निराश झाले.

जी ट्रीप परतीच्या प्रवासातही एन्जॉय करता येते ती खरी चांगली ट्रीप!

पण आता परतिच्या प्रवासात कंटाळा येणार होता इतका चांगला दिवस लगेच संपल्यामुळे!

हे जाणवल्यामुळे नंदाने प्रस्ताव मांडला...

"ए चिठ्या टाका... ज्या दोघांची नावे येतील त्यांनी गाडीत शेजारी बसायचे"

खटकन श्रीने प्रमिलाकडे अन महेशने नैनाकडे पाहिले.

अभ्यंकर आजी - कशाला पण असं?
नंदा - सहज.. मजा म्हणून...

मानेकाका - काही चिठ्या बिठ्या नाहीत...आता उशीर झालाय... जसे आलात तसेच बसायचं अन पटकन घरी जायचं ... चला...

शाळेत बर्‍याच पुर्वीपासून एक वाक्प्रचार महेशला काही केल्या समजलेला नव्हता... तो आज नीटपणे समजला..

'पथ्यावर पडणे'

मानेकाकांच्या स्वरातील जरब जाणवून सगळेच लगबगीने उठले अन ....

'काय.. कुठेतरी बसायचं' असा चेहरा करून श्री प्रमिलाच्या शेजारी...

तर ...

'परत मागचीच सीट मिळाली मला' असा नाराज चेहरा करून महेश नैनाच्या शेजारी बसला...

बस चालू होणार तेवढ्यात फार्म हाऊसवरचा शंकर धावत आला अन खिडकीत बसलेल्या कोमल सानेला म्हणाला..

"ताई, मॅडम आल्यात.. आज रात्री इथेच राहणार आहेत, तुम्हाला भेटायला बोलवलंय"

"मावशी आली? मला काही म्हणालीच नव्हती ती...चल कुम, आपण भेटून येऊ"

आता कोमलची मावशी अचानक फार्म हाऊसवर आली आहे हे पाहून मानेकाका, पवार मावशी, अभ्यंकर आजी, मधूसूदन, प्रमिला, घाटे, निगडे अन श्री या सगळ्यांनाच वाटले की ज्यांच्या फार्महाऊसवर आपण आज इतका धिंगाणा घातला त्यांचे निदान आभार तरी मानायला पाहिजेत.

मुले सोडली तर बाकीचे सगळे पुन्हा फार्महाऊसवर आले. वाटेत श्रीच्या चपलेत काहीतरी गेले म्हणून तो थांबून ते काढायचा प्रयत्न करत होता. मधू त्याच्याबरोबर थांबला. बाकीचे पुढे गेले..

आणि श्री आणि मधू तेथे पोचले तेव्हा... सर्वांशी कोमलची मावशी प्रेमाने बोलता बोलता अचानक धक्का बसल्यासारखी थांबली...

कोमलची मावशी -..... त... तू?????

मधूच्या मनातल्या सर्व आठवणींच्या उलथापालथी होत असतानाच मागून आलेल्या आणि तिला पाहून हादरलेल्या श्रीच्या तोंडातून शब्द गेला....

"कु.....कुम???????"

ताडकन प्रमिला उठून उभी राहिली... . तीव्र भावनांच्या कल्लोळात उठून उभ्या राहिलेल्या कुसूमने जमलेल्या कुणाचीही पर्वा न करता मधूच्या जवळ दोन पावले चालत जाऊन उभे राहिल्यावर मधूने विचारले..

मधू - तू...????
कुसूम - ... मधू.. कसा आहेस??
मधू - ...
कुसूम - ....
मधू - ... तू... लग..
कुसूम - .. छे... मी... मी .... नाहीच केलं... लग्न... !!!

संवाद फार फार गंभीर रूप धारण करू पाहात होते. हे जाणवल्यामुळे श्री मधे पडला...

श्री - ... कुम... मीट मिसेस मधूसूदन... प्रमिलावहिनी....

प्रमिला कसनुसंसुद्धा हसू शकली नाही. तिचा चेहरा खर्रकन उतरला होता. दोघे डायरेक्ट पुर्वायुष्याबद्दलच अन तेही लग्नाबद्दलच बोलले होते. प्रमिला एकदम तिथून निघून गेली. ती गेल्यावर केवळ क्षणभरच कुसुमकडे पाहून मधूसुदन तीरासारखा प्रमिलाच्या मागे धावला. त्या पाठोपाठ सगळेच धावले.

बसमधे बसलेल्या प्रमिलाचे डोळे ओलावले होते. समीरला झालेला प्रकार माहीतच नव्हता. मुलांपैकी कुणालाच माहीत नव्हता. मधू आता श्रीच्या जागी, प्रमिलाच्या शेजारी बसला अन श्री पुढे मधूच्या जागी!

बस सुरू झाली.

मधू कुजबुजला..

मधू - पमे... माझ्या मनात अजूनही काही असतं तर... माझ्या वागण्यातून तुला दिसलं नसतं का??
प्रमिला - तुमचं काही नाही हो... माझा विश्वास आहे... पण तिने... तिने लग्नच नाही केलं....

खूप खूप गंभीर वातावरण होतं बसमधे! मुलेही थकल्यामुळे भेंड्या वगैरे खेळत नव्हती. गाडी सुसाट पुण्याकडे जात असताना.....

सर्वात शेवटच्या सीटवर मात्र....

महेश श्रीनिवास पेंढारकर यांनी... सहवासातील अवघडपणा अनावर होऊन... आयुष्यातील पहिले वहिले... एका सुंदर तरुण मुलीच्या गालाचे... पुसटसे चुंबन घेतले होते....

आणि... त्यावर एक शब्दही न उच्चारता बाहेर पाहणार्‍या नैनाच्या कानात....

गेली किमान दोन वर्षे व्याकुळतेने ज्या शब्दांची ती वाट पाहात होती... ते शब्द सुगंधी झुळुकीसारखे शिरले...

"आय..... लव्ह यू... नैना"

गुलमोहर: 

कथेला सुरुवात झाल्या झाल्या पवार मावशी व निगडेंचा सिन फुल धमाल ..

मावशी 'पारध्याला चिमणी दिसावी' तशा त्यांच्याकडे पाहात होत्या....
भाड्याने कंस आणून याची पोरं जन्माला आल्या आल्या आपटायला हवी होती...
हसुन हसुन डोळ्यात पाणी आले.. ओफिस मधे आहे तेही विसरले..जाम हसले मी..
डोळ्या पुढे केविलवाणा निगडे आले...
लगे रहो बेफिकीर..जियो...

सुजा०२ .... १००% अनुमोदन. पहिलाच प्रसंग इतका रंगलाय! बेफिकीर, जिंकलस भावा!

पुजारी - छे छे.. मला पूजा आहेत चार त्या दिवशी..
मावशी - अमावास्या आहे त्या दिवशी... तू काय अघोरी पूजा करतोस का?

बेफिकीर,

किती वेळा सान्गायचे ... असे सम्वाद लिहीताना धोक्याची सूचना टाका..... क्रुपया एकान्तात वाचावे.....

नोकरी घालवाल माझी एकाध्या दिवशी!!!

आमच्या सोसायटीची ट्रीप आठवली!!!

मस्तच.....

पण तिच्याच काकूच्या फार्महाऊसवर जायचे असल्यामुळे तेही शक्य नव्हते.>>> मावशीच्या

तिला काहीही माहीत नाही असे समजून महेशच्या डाव्या हाताची बोटे आता तिच्या ओढणीवरून फिरत होती. तिच्या ओढणीच्या स्पर्शातही जगावेगळी जादू होती. दोघांच्या मधल्या जागेमधे नैनाने आपला एक हात ठेवला होता. स्वतःच्या मांडीवरचा हात आपण काढला तर ती ओढणी ओढून घेईल असे वाटल्याने सुरुवातीला हात न काढणार्‍या महेशचे लक्ष तिच्या नाजूक उजव्या हाताच्या पंजाकडे गेले अन त्याने मोह होऊन हळूहळू आपला डावा हात तिच्या हाताच्या शेजारी ठेवला. काही मिनिटांमधेच तिच्या पंजाला महेशची दोन बोटे स्पर्शू लागली. गाडीच्या धक्यांमुळे किंचित अधिकच वारंवार! तिने महेशच्या विरुद्ध दिशेला मान कलवून ठेवलेली होती. महेश नैना झोपली आहे असे समजत होता. पण त्याला स्वतःच्या गृहीताला सिद्ध करून बघावे असे सारखे वाटत होते. हळूच मान कलवून त्याने तिच्याकडे पाहिले तर...>>>

बस्स ना आता, आठ्वनींच्या किती खपल्या काढशिल रे बाबा!

पवार मावशी - जीभ हासडून शनिपारावर वाळत घालीन जास्त बोललीस तर...>>>:हहगलो:

आणीबाणी आली नसती तर वाड्यात पहाल तिथे एकेक नागडा निगडे फिरताना दिसला असता.>>> Rofl

सोडत नाही पिच्छा अन पुढे यायची इच्छा?>>> वा वा!!! म्हण आवडली...तार्किकदृष्ट्या बरोब्बर Lol

पवार मावशी मुर्दाबाद अन बाळंतविड्यांनी घर आबाद! देश बरबाद! भाड्याने कंस आणून याची पोरं जन्माला आल्या आल्या आपटायला हवी होती.>>>> बापरे... ह.ह.पु.वा. Rofl

तिची ही अदा पहावी की मावशींवर चिडावे याचा निर्णय न करता आल्यामुळे निगडे कापलेल्या बोकडासारखे मृतवत पडून राहिले. >>> काय पण उपमा आहे!!! Rofl

पण तिच्याच काकूच्या फार्महाऊसवर जायचे असल्यामुळे तेही शक्य नव्हते. >>> 'काकू' नाही हो बेफिकीर, 'मावशी' Happy

एक्स्क्लेम्ड आणि शाऊटेड हे दोन्ही शब्द माहीत नसल्यामुळे 'अच्छा अच्छा' म्हणणेच बरे पडले मानेकाकांना! >>> Rofl

आणि शेवटचं ते "आय..... लव्ह यू... नैना" >>>>> एकदम मुग्ध बनवून टाकलंत तुम्ही वातावरण....बेफिकीर....

नेहमी तुमची कादंबरी वाचत असतांना मूड्स बदलत असतात... पूर्वार्धात वाचलेले, भावलेले उत्तरार्धात विसरले जाते इतका उत्तरार्धाचा इंपॅक्ट जबरदस्त असतो....म्हणून आज आवडलेली वाक्ये आवर्जून कॉपी-पेस्ट करून ठेवली...

खुप आवडला आजचा भाग...एकदम फ्रेश वाटलं...शाळेची ट्रिप आठवली.
'कुम'चा किस्सा मस्त मांडलात... आणि महेश-नैनाची हळूवार कथा तर संपूच नये असं वाटत होतं...

पुढचा भाग लवकर लिहा हं...आता उत्सुकता ताणली गेलीये...

मोठ्ठा आणि सुरस भाग लिहून एवढं मनोरंजन केल्याबद्दल अनेक आभार, बेफिकीरजी तुमचे Happy

सुजा०२ ;सानी १००% अनुमोदन!!
खुप मजा आली!
बेफिकीरराव लगे रहो!!!!

आज मायबोलीकर झाले ते बेफिकिरना प्रतिसाद देण्यासाठीच

तुम्ही काद्ंबरी नक्की छापा.

भाड्याने कंस आणून याची पोरं जन्माला आल्या आल्या आपटायला हवी होती.....
तुम्हालाच असे विनोद लिहीता येतात - हसुन पुरेवाट.

सानी ला १००% अनुमोदन. खुप मजा आली हा भाग वाचताना. Happy
वाचकांना एकाजागी खिळवुन ठेवण्याची कला आहे तुमच्या कडे.
आपण कायम लिहीत रहा.
तुमच्या लेखनाचे व्यसन लागलेले अनेक जण आहेत.
१ दिवस तुमचे लिखाण नसेल तर चुकल्या सारखे वाटते.आणि १० वेळा माबो वर येऊन तुम्ही काही लिहिल आहेत का हे बघितले जाते.

तुम्ही खुपच ग्रेट लेखक आहात बेफिकीरजी.

प्रत्येक प्रेमळ प्रोत्साहनासाठी अनेक आभार मनापासून!

आपल्या सर्वाच्या ऋणात ....

-'बेफिकीर'!

बेफिकिर,
खराच शब्द नाहित हो, छान, मस्त, ग्रेट, अप्रतिम हे खुप खुप कमि वजनाचे शब्द आहेत.

सगळच कोपि पेस्ट करावसे वाट्तय.
गट्टु आणि नेना च झंगाट काय जमवलत हो, अगदि बायकांचा पेटंट असलेला शब्द वापरावासा वाट्तो Blush Happy अगदि मनापासुन आवडल तुमचे लिखान.
काय लिहवे हेच सुचत नाहि. Happy