श्रीनिवास पेंढारकर - एक बाप - क्रमशः - भाग २२

Submitted by बेफ़िकीर on 27 August, 2010 - 06:18

सॉम, टॉम, एम.डी!

हे तीन शत्रूच इतके मोठे होते की बाबांचे रागावणे क्षुद्र वाटू लागले होते. पण कशी कुणास ठाऊक महेशला तीनही विषयांमधे बर्‍यापैकी गती होती.

सिंहगडावरील सहलीत शिवाने अमाप सिगारेटी ओढल्या हे पाहून महेशला 'आपण यांच्यात उगीचच आलो' असे वाटू लागले. ही वाया गेलेली मुले आहेत, आपल्याला अशा काहीही सवयी नाहीत व लागूही द्यायच्या नाहीत असे ठाम मत झाले होते त्याचे! सिंहगडावरील भन्नाट गार वारा अन मिळालेली एक खोली, त्यात शिजवलेली मुगाच्या डाळीची खिचडी, कांदा आणि चटणी! व्वाह! वेडच लागले महेशला त्या सहलीचे! मात्र मुकूल सतत संगीताबद्दल बोलणार, वामन हिंदी पिक्चरशिवाय काही बोलणारच नाही, शिवा बंडगिरी करणार अन नंदन स्वतःचे पाहणार! यामुळे तो वैतागलाही होता. पण एकंदरीत मजा आली. आणि थकून भागून घरी पोचतोय अन दहा मिनिटे होतायत तोवरच बाबांचा प्रश्न! अत्यंत शांतपणे!

श्री - महेश, मी आता तुला काही बोलणार नाही किंवा रागावणार नाही, पण आजी म्हणत होती की तिच्या पर्समधले पैसेही जातात.

संस्कारांचा भाग होता तो! जो मुळात चांगला असतो तो केव्हाही चांगला विचार करायला पुन्हा सुरुवात करू शकतो. ज्याच्या मनातच मुळात खोट असते तो फारसा कधी बदलत नाही. महेशवर चांगले संस्कार होते. तो सरळ उठ्नन श्रीकडे गेला. श्री खुर्चीवर बसला होता. महेश त्याच्या गुडघ्यांवर आपले दोन्ही हात ठेवून खाली स्वतःच्या गुडघ्यांवर बसला. अत्यंत धीराने एक वाक्य म्हणाला...

महेश - बाबा, खूप खूप, खूप चुका झाल्यात माझ्या! पण मी वचन देतो. हे सगळं संपलं! या क्षणापासून!

दोन तीन क्षण श्री महेशच्या निग्रही चेहर्‍याकडे अन प्रामाणिकपणाकडे लक्षपुर्वक बघत होता.

मग हळूच त्याने आपला उजवा हात महेशच्या डोक्यावरून फिरवला.

श्री - चोरी वाईट, चोरी करून मिळवलेल्या पैशांची काहीच किंमत नसल्यामुळे त्यांचा विनियोग जसा होतो ते वाईट आणि ही सवय वाईट! महेश, तुला काहीही कमी नाही आहे. हवे तितके पैसे मागून घेत जा! आहे कोण दुसरं? मला तू अन तुला मी! एक काळ होता. जेव्हा आपल्याकडे खरच अजिबात पैसे नसायचे. त्या काळात, तेही तुझंच सगळं व्यवस्थित व्हावं यामुळे मला लागलेली काटकसरीची, एन्जॉय न करण्याची सवय आजही टिकून आहे. पण आता परिस्थिती बदलली आहे. आता माझ्या हातात महिना सव्वा चार हजार रुपये येतात. त्यातले वेगवेगळे हप्ते सोडून महिना ३००० रुपये राहतात. घरखर्च अन इतर गोष्टी गेल्या की हजार आठशे तरी बाजूला पडतात. असे गेली दोन वर्षे चाललेले आहे. आता आपली परिस्थिती अगदीच पुर्वीसारखी नाही. पण मी जे तुला सांगत असतो ते यासाठी, की मजा करण्यासाठी सगळं आयुष्य आहे. हीच शिक्षणाची दोन चार वर्षे व्यवस्थित अभ्यास करून काढली की पुढे आयुष्यभर आरामात मजा करता येते. माझच बघ! साधा ग्रॅज्युएट असल्यामुळे मला आयुष्यभर साधी नोकरी करावी लागली. तू इंजिनियर झालास तर तुला आमच्या कंपनीसारख्या कंपनीत ऑफीसर, सिनियर ऑफीसर म्हणून घेऊ शकतील. तुला स्टार्टच कितीतरी मिळेल. माझ्या रिटायरमेंटच्या पगारापेक्षा जास्त! पण आत्ता जर अशा सवयी लागल्या तर त्यांच्यातून पुढे काहीतरी विचित्र, वेगळेच निर्माण होऊ शकते. मी आजही तुला फटके मारले असते. आजही माझा तुझ्यावरचा हक्क पुन्हा प्रस्थापित करून तुला रडवले असते. पण आठ दिवसांनी कदाचित मधू काका मला सांगत आला असता. घरातले पैसे जातात म्हणून! तू त्या पैशांचं काय करतोस, का पैसे घेतोस हे सर्व विषय आधीही बोललेलो आहोत आपण! ते आज बोलून वेगळे काहीच निघणार नाही आहे. पण तुला जर वाड्यात, वाड्यातच काय जगात कुणीही असं काहीही करताना पाहिलं तर काय राहील आपलं? माझं काय नाव राहील? श्रीनिवास पेंढारकरांचा मुलगा चोरटा आहे. कसं वाटतं ऐकायला? आणि कुणाला माहीत? कदाचित मला वाईट वाटू नये म्हणून आजी म्हणाली असेल की तिला कळत नाही पैसे कोण घेतं ते! कदाचित तिला माहीतही असेल ते! माझ्या मनावर सतत टांगती तलवार असते. आज महेशबद्दल कुणी काही बोलणार तर नाही ना? काही ऐकायला तर मिळणार नाही ना? तू हवे तर रोज माझ्याकडून पैसे घेऊन जात जा. माझं म्हणणं एवढच आहे की त्या पैशांचं काय केलंस ते मला सांग! आणि हेही किती दिवस? एकदा तुझी बायको आली की तुमचा तुमचा संसार! मग कोण विचारणार आहे तुला? पण माझ्यावर जबाबदारी आहे. कारण तुझी आई नाही. मी एकटा आहे. जमेल तसं तुला वाढवलंय. कॉलेजला जायला लागशील इतपत शिकवलंय! आता तुझ्या हातात आहे. आपल्या बापाला आपल्याबद्दल काय ऐकावे लागावे ते! पूर्णपणे तुझ्या हातात आहे. तुला योग्य वाटत असेल ते तू कर! मला काय? आधीही काही फार सन्मान होता असे नाही जगामधे! पण आता चिखलफेक होईल. लोक येताजाता टोमणे मारतील. बोचरे बोलतील. घ्यायचं ऐकून! त्यात काय एवढं? मुलावरच्या प्रेमासाठी इतकंही करता येणार नाही एका बापाला? मी म्हणेन त्या लोकांना! तुम्ही म्हणताय ते खर आहे. नाही मला माझ्या मुलाला व्यवस्थित शिकवता आल, मोठ करता आलं! नाही चांगले संस्कार केले मी त्याच्यावर! बोला हवे ते! त्यात काय एवढं? काही वर्षांच तर आयुष्य! नाव खराब झालं काय अन चांगलं झालं काय? लोक तर काही खिशातून काढून आपल्याला जगवत नाहीत ना? मग नुसते बोलले तर काय झालं?

या एकाच संवादाने महेश त्याबाबतीत आमुलाग्र बदलला. त्या क्षणापासून चोरी हा विषय थांबला. कायमचा! आता तो सरळ वडिलांकडे पैसे मागायचा. मला उत्तप्पा खावासा व चहा प्यावासा वाटतो. सहा रुपये द्या! श्रीने एकदोनदा दिले. एकदोनदा 'सारखे असे बाहेरचे खाऊ नये' म्हणून सांगीतले पण मग श्रीने विचार केला. आपण खडकीला! हा स्टेशनपाशी! सायकलवरून जाणार अन येणार! भूक लागत असेलच की! त्यात चार मुले काही ना काही खाताना दिसणार! उलट, एखाददिवशी आपणच त्याला म्हणू शकतो की आज तिकडेच काहीतरी खा! आपल्याला जर डबा करायला वेळ नसेल किंवा काही त्रास होत असेल तर! महेश आता मोठा झालेला आहे. तो सुधारलेला आहे. तो ज्या गोष्टींसाठी पैसे मागत आहे त्याच करण्यासाठी तो न सांगता पैसे उचलत होता. त्यापेक्षा हे कितीतरी बरे आहे. फार तर काय एक दिवसाआड सहा, सात रुपये द्यावे लागतात. म्हणजे महिन्याचे झाले शंभर! आत्ताच्या त्याच्या वयात काटकसरीने वागून वाचवलेले हे शंभर पुढे करन्सी घसरल्यानंतर किती महत्वाचे ठरणार आहेत? दहा वर्षाअंनी कदाचित या शंभराचे पाचशेही होतील. पण तेव्हा पाचशे मधे काहीही येणार नाही. त्यापेक्षा त्याला आत्ता आनंद मिळतोय, तोही फक्त खाण्याचाच! तर काय हरकत आहे?

श्री व महेश यांच्या दोघांच्याही विचारांमधे पडणार्‍या या बदलांना अनेक घटक कारणीभूत होते. श्रीचे अत्यंत चांगले संस्कार असल्यामुळे महेश नुसत्या बोचर्‍या बोलण्यानेच बदलला होता. तसेच, प्रश्न फक्त आपल्याला लोक काय बोलतील असा नसून त्या गोष्टीशी बाबांच्या नावावर चिखलफेक होणेही अवलंबून आहे याची व्यवस्थित जाणीव त्याला झालेली होती.

श्रीचे विचार बदलण्यामागे तयचे वाढते वय होते. खरच काहीवेळा वाटायचे की आज जरा साडे सहापर्यंत पडून राहू. आरामात साडे सहाला उठू, आंघोळ करून, चहा घेऊन ऑफीसला जाऊ. तिकडेच नाश्ता करू. कंपनीत सगळ्यांना नाश्ता, दोन वेळा चहा आणि जेवण मिळायचं! वर्कर्सना कुपन्स होती. ऑफीसर स्टाफला महिना चाळीस रुपये कट करून हे सगळं मिळायचं! श्री सुरुवातीच्या काळात वर्करच होता. मात्र गेल्या दहा वर्षांपासून तो ऑफीसर केडरमधील सर्वात ज्युनियर पदाच्या पुढच्या पदावर होता. सर्वात ज्युनियर पदावर स्वाती होती. स्वाती अन श्रीला सहज कंपनीत नाश्ता करता आला असता. पण दोघांनाही जमत नव्हते. स्वातीला तिच्या आईमुळे अन श्रीला महेशमुळे!

कधीच जरासे आरामात उठता यायचे नाही. कधीच बसने कंपनीत जाता यायचे नाही. बस तब्बल पाऊण तास उशीरा पोचायची. रोज कोण उशीरा येऊन देणार? सायकलिंगने दम लागू लागला होता. आता तर या महिन्याचे औषधही पुढच्या महिन्यावर गेले होते. जरा जपूनच वागायला लागणार होते. कित्येकदा श्री वाकडेवाडीपासून सायकल हातात धरून हळू हळू चालतच घरी यायचा. मॉडर्न कॅफेशेजारच्या अमृततुल्यमधे मधे एक चहा घ्यायचा. त्यामुळे वेळ व्हायचा. काही वेळा महेश खेळून घरी आलेला असायचा अन श्री नसायचा. त्यामुळे महेश वैतागायचा.

परवा असेच झाले. महेश वाड्यातच खेळून वर आला. अजूनही बाबा आलेले नव्हते. आजी आता म्हातारी झालेली होती. तिला 'खायला दे' म्हणणे योग्य नाही इतके महेशला समजत होते. पण त्या घरात त्याचा नातवासारखा हक्क होता. तो सरळ आजीच्या घरात गेला अन डबे हुडकू लागला. आजीने सांगीतले. एका डब्यात दाणे अब दुसर्‍या एका डब्यात गुळ आहे तो आत्ता खा! बाबा आल्यावर स्वयंपाक करतीलच!

"ह्या! मला नको गुळ अन दाणे.. फालतू काहीतरी"

खेळून भूक लागलेली असताना बाबा घरात नसणे याचा आलेला राग आजीच्या सूचनेवर प्रतिक्रिया देताना निघालेला होता. आजी यावेळेस गप्पच बसली.

मग महेश घरात जाऊन बसला. त्याच्या घरात दोन, तीन बिस्कीटे उरलेली होती ती खाऊन पुन्हा श्रीची वाट पाहात बसला.

जवळजवळ अर्ध्या तासाने, म्हणजे आठ वाजता श्री घरी पोचला. त्याला दारात पाहून जोरात ओरडला महेश!

" काय हो बाबा?? भूक लागलीय की.. वाट्टेल तेव्हा काय घरी येता???"

श्रीचा चेहरा पडला.

"अरे? सॉरी हं! लक्षातच राहिलं नाही माझ्या! जरा चालताना वेळ लागला."

"तुम्ही आला असाल काहीतरी खाऊन स्वातीमावशीबरोबर..."

"नाही रे! आता मावशी केव्हापासूनच बसने नाही का जात? मी सायकलने येतो.. त्यामुळे जरा वेळ लागतो. करतो हं लगेच?"

"काय करणार आहात? मला तॉ फ्लॉवर अन बटाटा असली भाजी नकोय.. काहीतरी वेगळं करा.."

"बरं!"

काहीतरी वेगळं करायचं म्हणून श्रीने सकाळीच रात्रीसाठीही केलेल्या पोळ्यांमधे पिठ पेरून केलेल्या भोपळी मिरचीची भाजी घातली अन रोल्स करून तव्यावर भाजायला सुरुवात केली. एका बाजूला चहा ठेवला स्वतःसाठी!

"अहो आता चहा नका ना करत बसू..... भूक लागलीय मला भूक..."

"अरे हे काय? झालंच! एका बाजूला वेगळा ठेवलाय चहा.."

"हो पण लक्ष सगळं चहामधेच आहे"

गंमत वाटल्यामुळे श्री हसला असला तरीही त्याला तीव्रतेने चहा घ्यावासा वाटत होता. औषधे बंद झाल्यापासून खूपच थकवा जाणवायचा. त्याने चहाची शेगडी बंद करून ठेवली अन आधी रोल्स फ्राय केले. पाचच मिनिटात पहिला अन आणखीन काही मिनिटात आणखीन तीन रोल्स तयार झाले. महेशने अडीच खाल्ले अन श्रीने दिड! श्रीला खरे तर भूक होती. पण आता परत काहीतरी करत बसावे लागले असते. म्हणून मग त्याने मगाचचा चहाच आत्ता करून घेतला.

महेश आज बहुधा खेळून दमला असावा. लगेच झोपला. श्री आवराआवर करून गॅलरीत आला. मावशींची रोज विचारपूस केल्याशिवाय तो झोपायचा नाही.

श्री - मावशी? बरं आहे ना?
मावशी - हं!
श्री - जेवलात का?
मावशी - खाल्लं थोडं!
श्री - पडा आता.. मी ही झोपतो..
मावशी - ... श्री..
श्री - ... काय?

मावशींचा स्वर किंचित गंभीर होता.

मावशी - दगदग करत जाऊ नकोस फार...
श्री - छे छे..

'छे छे'! 'छे छे' म्हणून काय होणार आहे? श्रीच्या मनात घरात आल्यावर विचार आला. मावशी म्हणतात हेच काय कमी आहे? कोण विचारतंय आपल्याला? झोपलेल्या महेशकडे प्रेमाने पाहून त्याच्या डोक्यावरून हलका हात फिरवून श्रीने पाठ टेकली. रमाच्या फोटोवर असलेल्या झिरोच्या बल्बमधे तिचा चेहरा स्पष्ट दिसत होता. फोटो काढताना कॅमेर्‍याकडेच पाहिल्यामुळे फोटो बघताना ती आपल्याकडेच बघतीय असा भास व्हायचा. श्रीला आठवलं! याच फोटोत आपणही होतो. तो कट करून घेतला आपण रमा गेल्यानंतर! तिच्या मागे आपण उभे होतो. तेवढा भाग कट करून फोटोग्राफीची तंत्रे वापरून फक्त तिचा फोटो आहे असा भास निर्माण करण्यात आला.

त्या दिवशी तिच्या उजव्या खांद्यावर आपला एक हात आपण ठेवलेला होता याची श्रीला आठवण झाली. म्हणूनच तिच्या डोळ्यांमधे ते मिश्कील भाव होते फोटो काढताना!

पण.... पण... आज ते भाव का दिसत नाही आहेत? काय झालं रमाला?

श्री उठून फोटोपाशी गेला. मनातच म्हणाला...

"काय गं? काय झालं? उदास का दिसतीयस? तुझं बाळ आता मोठं झालंय, जमेल तसं वाढवतोय मी... एकदा त्याचा संसार थाटला की येईनच तुझ्याकडे.. तोपर्यंत काही चुकलं तर रागवू नकोस..."

जणू अगदी कानात, आतमधे, खोलवर कुणाचेतरी शब्द उमटावेत तसा कुजबुजल्यासारखा आवाज आला श्रीला!

"जपा"

बास! बाकी नाही. आवाज रमाचाच! जणू कानात फुंकर मारावी तसा आवाज! अस्पष्ट पण तरीही स्पष्ट!

रमा बोलली? खरच रमा बोलली?

हा एक वेगळाच विषय आहे खरे तर! मन अतिशय स्वच्छ असलेल्या माणसांना आणि एखाद्या गोष्टीवर नितांत श्रद्धा असलेल्या माणसांना असे काही अनुभव येऊ शकतात. रमाच्या फोटोवर श्रीची नितांत श्रद्धा होती. देवपूजा जितकी नियमीत तितकेच फोटो स्वच्छ करणे, त्याला हार किंवा फूल वाहणे! कितीसा सहवास खरे तर? काहीच वर्षांचा! जीवनात रमा होती असं का म्हणायचं तर महेश होता म्हणून! काही कारणाने तोही नसता तर हा इतिहास किती महत्वाचा ठरला असता? ठरलाच असता. काही नातीच अशी असतात की झोपेतही विसरली जात नाहीत.

रमा बोलली. रमा आपल्याबरोबर आहे. संसारात तिचे लक्ष आहे. सगळ्याची तिला काळजी आहे. कुणालाही सांगून हे खरे वाटणार नाही, पण रमा निश्चीतच बोलली आत्ता!

श्रीने अंधारातच तिच्या फोटोवरून आपल्या उजव्या हाताची बोटे फिरवली. काळजाचे कुणीतरी तुकडे तुकडे करून टाकत आहे असा भास झाला त्याला! ही एक... ही एक रमा असती तर? बास! काहीच करावं लागलं नसतं! इतका सुंदर संसार झाला असता की...

झाले जगून ज्याचे... सोडून जात आहे..
मृत्यूस जिंदगी ही अवघी बहाल आहे..

ती रात्र जागे राहण्यातच गेली.

आणि महेशने पुन्हा चमत्कार दाखवला. सेकम्ड इयरच्या पहिल्या सेमिस्टरला आधीचे सगळे विषय व त्या सेमिस्टरचे सगळे विषय नुसतेच सोडवले नाहीत तर या सेमिस्टरला वर्गात नववा आला. सगळे हबकूनच त्याच्याकडे बघत होते. आता नववा आल्यामुळे इतर अनेक गोष्टींकडे दुर्लक्षच होणार होते. हा किती पिरियड्सना बसतो, सबमिशन केव्हा पुरे करतो वगैरे! कॅन्टीनला किती वेळा दिसतो! कशाचाही संबंध नाही.

त्या दिवशी महेश अन श्री दोघेच हॉटेलमधे गेले!

पुरब!

डेक्कनवरच्या मोतीमहलच्या पलीकडे सुरू झालेले नवीन हॉटेल! पुरब! इडली वडा सांबार, व्हेज कटलेट आणि थम्स अप घेताना महेशला कृत्यकृत्य झाल्यासारखे वाटत होते. जाताना चालत आणि येताना रिक्षेन असा प्लॅन होता. खूप मजा आली. आज जेव्हा रिक्षा लकडी पुलावरून नारायण पेठेकडे वळली..

लकडी पुलावर श्री गुणगुणत होता...

'खरा तो एकची धर्म... जगाला प्रेम अर्पावे.. '

भाजीराम मंदिरापाशी श्री गुणगुणत होता.

'राम लक्ष्मण जानकी... जय बोलो हनुमानकी..'

अगदी हळू गुणगुणत होता. त्याचे महेशकडे लक्षही नव्हते. तो पाहात होता रिक्षेतून बाहेर! आणि शेजारी बसलेला महेश...

तो टक लावून बाबांकडे पाहात होता. बाबा गुणगुणताना किती निरागस दिसत होते. ...

'वो जमाना याद आता है'....

खळ्ळ! तोंडच दुसरीकडे फिरवले महेशने! मग? दोन्ही डोळ्यांमधून अचानक सरी ओघळल्यावर माणसाने काय करायचे?

हाच तो रस्ता! कित्ती कित्ती वेळा बाबांनी आपल्याला सायकलवर पुढे बसवून हीच... सगळी हीच गाणी म्हणत इथून शाळेत नेलंय..

काय केलं आपण बाबांसाठी? काय केलं?

एक चहा? एक चहा केला आजवर?

चहा करणे जाऊदेत... चहा शिकलो तरी आपण?

हजारो वेळा बाबांना चहा करताना पाहिलं! ते गॅसपाशी स्वयंपाक करत असताना त्यांच्याशेजारी स्टुलावर उभे राहून आपण फोडणी कशी देतात, कसं चर्र वाजतं, सगळं पाहिलं! साधा चहा तरी शिकलो त्यातला?

आपल्याला सिंहगडवर जायला पाहिजे, मार्क मिळवणे हे आपले एकमेव कर्तव्य आहे, पण ते मिळाले की 'पुरब'ला जाऊन कटलेट खायला पाहिजे, जाताना रिक्षेने जायला पाहिजे, सायकल नवीन पाहिजे, .. सगळं... सगळं आपल्याला पाहिजे...

बाबांना काय पाहिजे?

उद्यापासून... नाही... आजपासून... आत्ता घरी गेल्या गेल्याच.. सुरुवात करायची...

झोपायच्या आधी... बाबांना निदान इतकं तरी विचारायचं...

"बाबा? बरे आहात ना? काही हवंय तुम्हाला? पाणी वगैरे???"

हा प्रश्न प्रत्यक्ष विचारताना मात्र..... !!!!

"बाबा.. .. ब... बरंय नं?? ...काही ... पाणी.. वगैरे.. .. हवंय का?"

मान खाली गेली होती. का कुणास ठाऊक! आज वाटत होतं! अगदी पहिल्यांदाच वाटत होतं! ... आपल्याला...

आपल्याला आई हवी होती... कसं वागायचं असतं हे तिने लक्ष देऊन विचारलं असतं आपल्याला..

महेशला एक क्षण धीर धरवत नव्हता त्या खोलीत आत्ता! आजीची प्रकर्षाने आठवण आली...

आई नाही... आज निदान... आजीच्या घरी झोपुयात का???

स्वतःशीच तो विचार करत होता...

आणि श्री मनात विचार करत होता...

आज याने असं कसं विचारलं आपल्याला...

रमाचे कालचे शब्द आठवले... "जपा"

रमा आली... नक्कीच रमा महेशमधे आलेली आहे.. आता महेश यापुढे आपली नक्की काळजी घेणार...

तेवढ्यात महेशने विचारलं...

महेश - बाबा.... आज... एक दिवस.... मी... आजीकडे जाऊ का ... झोपायला???

कसं उत्तर देणार श्री? काय उत्तर देणार?? उत्तर देण्याची गरजच नव्हती... कारण अजून न लावलेल्या दारात अचानक येऊन पवार मावशी म्हणत होत्या..

मावशी - श्री... महेशला इकडे पाठवतोस का आज झोपायला?? जरा तोल जातोय चालताना...

कित्येक वर्षांनी... अक्षरश: आजीचा उजवा हात आपल्या पाठीवर थोपटून घेत झोपी जाताना...

महेश, श्री अन पवार मावशींच्या मनात वेगवेगळे विचार येत होते...

महेशला गाढ झोप लागत होती...

श्री रमाचा फोटो छातीशी धरून तिच्याशी बोलत जागा होता...

आणि...

मावशी...

'मी का जगतीय? कुणासाठी? का सगळ्यांना शिव्या देते? का अशी वागतीय? आणि.. एवढं सगळं करूनही.. जग माझ्याशी चांगलंच कसं वागतं????'

=============================================

"नैना राजाराम शिंदे"

नैनाने आबासाहेब गरवारेतल्या स्टुडंट सेक्शनमधे आपल्या नावाची एंट्री करणार्‍या कर्मचार्‍याला सांगीतलं अन तिला कॉलजेचे लाईफच नवीन असल्यामुळे सहज तिच्याबरोबर तिच्या वडिलांनी पाठवलेला महेश तिच्या रेशमी केसांकडे बघत मनातच म्हणाला...

'नैना.. महेश... पेंढारकर'

जाताना रस्त्यात काही बोलणेच होत नव्हते. कारण नैना एक नंबरची लाजाळू होती. अन जो पर्यंत मुलगी तोंडच उघडत नाही तोपर्यंत मुलाला बोलायची भीतीच वाटणार! हो! काहीतरी उलटं पालटं बोलून जायचो अन हसायची नाहीतर रागवायची किंवा घरी सांगायची!

डोळ्यांची भाषा अंधुक जाणवत असली तरी तिचा अर्थ अधिकाराने लावण्याइतकं दोघांचंही वय नव्हतं! ७३ टक्के मार्क्स मिळवून नैना एम्.ई.स्.चे आबासाहेब गरवारे कॉलेज येथे दाखल झालेली होती. वाड्यातील फक्त महेशच त्या कॉलेजमधे काही काळ वावरलेला असल्यामुळे त्याच्याकडे आपसूकच 'मार्गदर्शकाची' भूमिका आलेली होती अन तिचा पुरेपूर फायदा घेण्याचे त्याने ठरवून टाकले होते. पण संवाद कौशल्य कितीही असलं तरी जिच्यावर प्रेम आहे व ते प्रेम अजून शब्दांमधून व्यक्तच केलेले नाहीये तिच्यासमोर सगळे संवादकौशल्य निरुपयोगी ठरते अन अशा मुलीच्या फक्त मोहक अदा व विविध विभ्रम बघण्यातच आपला सगळा वेळ जातो हा एक नवीन अनुभव महेशला मिळाला होता.

हे सगळं ठरवलं राजाराम अन श्रीने कालच! या दोघांना विचारलंही नाही. श्रीने तर महेशला सरळ स्वतःचे कॉलेज बुडवून हिला मदतीला जा म्हणून सांगीतले. कारण राजारामच्या ऑफीसमधे ऑडिट होतं अन त्याला खरोखरच शक्य नव्हतं!

या बातम्या आपापल्या मुलांना सांगीतल्यावर रात्री झोपायच्या आधी व्रत असल्याप्रमाणे जे महेश नैनाच्या खिडकीकडे बघायचा तसे त्याने बघितले अन नैनाने लांबवर स्वतःची खिडकीतला पडदा लाजून जोरात बंद करून टाकला.

झालं! ह्याला बसली भीती! ही लाजली ते ठीक आहे. म्हणजे? फारच उत्तम आहे तिचं लाजणं! पण पडदा का असा लावला? नाराज बिराज आहे की काय च्यायला? नाहीतर उद्या काहीतरी बदल व्हायचा. राजाकाका म्हणायचा 'मी काढलीय रजा'! म्हणजे बोंबललं! त्याला कसं सांगायचं? की बाबा रे, तू रजा काढून का उगाच वरिष्ठ अधिकार्‍यांचा रोष ओढवून घेतोयस? तुझ्या नादान कन्येला सुरक्षितपणे नेऊन आणणे व स्टुडंट सेक्शनमधे तिचे रजिस्ट्रेशन करणे या क्षुल्लक कामगिर्‍या माझ्यासारखा शूर पुरुष सहज नाही का करणार?

मधेच एकदा महेशने घरात अभिनय करून पाहिला.

महेश - बाबा, माझं काय म्हणणं आहे? की त्या नैनाच्या कामासाठी मी कॉलेज बुडवण्यात काही अर्थ आहे का?
श्री - कधीतरी असं करावंच लागतं महेश, आता ती लहान आहे, काकाला वेळ नाहीये..
महेश - पण काकू आहे की..
श्री - काकूला त्यातलं काही समजत नाही..

शीला काकूला प्रवेशप्रक्रियेतील काहीही समजत नाही ही वस्तुस्थिती ऐकून आनंदाने तिथेच उड्या माराव्यात असे त्याच्या मनात आले.

महेश - तुम्हाला नाहीये का वेळ उद्या?
श्री - तुला काय आहे एवढं उद्या?
महेश - प्रॅक्टिकल्स आहेत दोन...
श्री - ती कर नंतर.. त्यांनी एवढी विनंती केल्यावर शेजारधर्म नको का पाळायला???

व्वा! असाच मला कायम शेजारधर्म पाळायला सांगत जा सगळ्यांनी! पण फक्त एकाच शेजार्‍याचा! शिंदे! उगाच बाकीच्यांचा धर्म नाही आपण पाळणार!

पण मनात धाकधूक होतीच! अख्खी एक रात्र संपायची आहे. उद्या सकाळी नऊ वाजता निघायचंय वाड्यातून! तोपर्यंत साले काय वाट्टेल ते बदल होऊ शकतील. लक्ष ठेवायला पाहिजे.

झोपच न आलेला महेश सव्वा पाचलाच उठून बसला. आता आपण इतक्या लवकर उठलो बघून बाबांना शंका येईल असे वाटून तसाच पडून राहिला. आज श्री सहाचा सव्वासहाला उठला. कारण आज महेशचा डबा नव्हता. तर त्या पंधरा मिनिटांमधे महेशचा जीव नुसता वर खाली!

'अहो उठा ना आता, नुसते काय वळवळतांय गादीवर' असे विचार मनात येत होते. मात्र श्री उठल्यावर पाच मिनिटांनी अगदी आळस बिळस देत, डोळे चोळत रत्न उठून बसलं.

श्री - काय रे? उठलास इतक्यात?
महेश - कसला आवाज झाला हो?
श्री - कसलाही आवाज झाला नाही.. झोप...

आता आलं का झोपणं? रोज आपण उठतो सातला! आज अगदी सव्वा सहालाच आपण जागे! बरोबर आहे बाबांचं! त्यांच काय चुकलं? आपल्यालाच काहीतरी कारण काढायला पाहिजे.

श्री - अरे कुठे चाललायस?
महेश - बाथरूमला जाऊन येतो..

आला दोन मिनिटांनी!

महेश - ब्रेड आणायचाय का?
श्री - चाललोय मी.. तू झोप..
महेश - नाहीतर म्हंटलं मी आणतो..
श्री - अंहं.. पड तू.. साडे सहा व्हायचेत अजून..
महेश - ते गपचूप सर आहेत ना प्रॉडक्शन इंजिनियरिंगला? ते म्हणतात सकाळी चालायला हवं!
श्री - ते आमच्या वयात.. तू झोप..

श्री गेला ब्रेड आणायला. 'च्यायला, झोप, झोप, झोप! दुसरं काही बोलतच नाहीत. चांगला मुलगा उठलाय भल्या पहाटेचा!' महेशच्या मनात विचार येत होते. श्री गेलेला बघून तो हळूच उठून खिडकीत उभा राहिला.

शिंद्यांच्या घरात एक साधा लाईटही नव्हता.

'जायचंय का नाही? का झालं कॅन्सल? ह्यांचं काही सांगता येत नाही...!!'

दहा मिनिटे तिथेच उभा होता महेश! तेवढ्यात खालून बाबा येताना दिसले. पुन्हा पांघरुणात जाऊन झोपेचं सोंग घेऊन पडला. श्री आल्यावर मात्र 'आवाजाने जाग आली' असं भासवून पुन्हा उठला.

श्री - तोंड धुवून घे..
महेश - हं! .. आज ते.. हे आहे आमचं..
श्री - .. काय?
महेश - .. बॉयलरचं लेक्चर आहे...
श्री - हं! हे घे.. चहा घे.. मी जरा जाऊन आलो..
महेश - कुठे?
श्री - सप्रेंना फोन करून येतो.. बघतो रजा मिळतीय का?

श्री ताडताड बाहेर गेला अन महेशच्या हातातला चहा जवळजवळ सांडलाच!

'हे कशाला रजा घ्यायला गेले? अहो मी उगाच म्हणत होतो. जाईन ना मी तिच्याबरोबर! थोड केलच पाहिजे की शेजार्‍यांसाठी'

त्याच्या मनात विचार येत होते. कसाबसा चहा संपवून दारातच उभा राहिला. बाबांना रजा मिळते की काय या काळजीत!

पाच मिनिटांनी मानेकाकांकडून समाधानी चेहरा करून श्री आला. आपण विचारलं तर संशय येईल म्हणून फाटा फोडत महेश म्हणाला..

महेश - तो नलावडे म्हणून आहे ना? त्याला भेटायचं! तो करतो सगळं..
श्री - कोण नलावडे?
महेश - इन्चार्ज आहे..
श्री - कुठला?
महेश - स्टुडंट सेक्शनचा..
श्री - कसला स्टुडंट सेक्शन?
महेश - गरवारे कॉलेजचा हो...
श्री - मग?
महेश - नाही नाही.. तुम्ही चाललायत म्हणून माहिती सांगीतली..
श्री - मी कुठे चाललोय?
महेश - मग कोण चाललंय?
श्री - कुठे?
महेश - गरवारे कॉलेजला?
श्री - कशाला?
महेश - त्या नैनाच्या रजिस्ट्रेशनसाठी..
श्री - अरे हां! आज तुला तिथे जायचंय नाही का? विसरलोच मी...
महेश - मग तुम्ही कुठे चाललायत?
श्री - रांजणगाव..
महेश - का?
श्री - आजी नवस बोललीवती... तुला चांगले मार्क्स मिळाले तर एकशे एक रुपये ठेवीन म्हणून..
महेश - मग? .. रविवारी का नाही जात?
श्री - आज चतुर्थीय.. पाच चतुर्थी केल्यावत्या तिने.. सहावीला नैवेद्य दाखवायचा होता..
महेश - मिळाली का?
श्री - काय?
महेश - रजा..
श्री - हो..
महेश - ठीक आहे.. आता जावंच लागणार मला असं दिसतंय..
श्री - तुझं अगदीच काही महत्वाच असलं कॉलेजमधे तर सांगतो वहिनींना..
महेश - एकदा हो म्हंटल्यावर मला वाटतं बदलणं योग्य दिसणार नाही..
श्री - हं! जा आजच्या दिवस... पुन्हा नको जाऊस काही लागलं तर..

चला! एक घटक फेवरेबल झाला! बोंबलायचीच वेळ आली होती खरं म्हणजे! आता उगाच नाटकं करण्यात अर्थ नाही.

सकाळी साडे सातलाच महेश आंघोळ बिंघोळ करून तयार! 'किती कपडे धुवायचे राहिलेत' असे पुटपुटत अगदी नाईलाजच असल्यासारखे दाखवत ठेवणीतील कॉर्ड्रॉयची पँट अन एक स्काय ब्लू टी शर्ट वगैरे घालून तयार झाला. मोठ्या माणसासारखा जबाबदार चेहरा वगैरे करून वावरत होता. मधेच बाबांचे लक्ष नाही असे बघून आजीकडे जाऊन तिच्याही नकळत तिची थोडी पावडर वगैरे चोपडून आला. उगाचच 'आपल्याबद्दल कसे मत होत आहे' हे तपासण्यासाठी राजश्रीताईकडे जाऊन आला. तिने ढुंकूनही त्याच्याकडे पाहिले नाही. तिला घाई होती तिच्या कॉलेजची!

कॉमन गॅलरीतून फिरताना सतत त्याचे लक्ष शिंद्यांच्या घराकडे लागले होते. मधेच राजाकाका बाहेर येऊन टॉवेल वाळत टाकून गेला.

'हा कशाला तयार होऊन बसलाय आता?'

महेशच्या मनात विचार आला. 'रोज तर पावणे नऊशिवाय आंघोळ करत नाही, आज पावणे आठलाच टॉवेल वाळत टाकला? हा चालला की काय? विचारावे तरी बरे दिसणार नाही'

उगाचच इकडे तिकडे करून मग बाबांनी आनलेला ब्रेड खाऊन घेतला. आता त्याला खालून राजाकाकाची हाक अपेक्षित होती. 'श्री, महेश येतोय ना?' अशी! त्याऐवजी वेगळाच आवाज आला. आवाज राजाकाकाचाच होता. पण शब्द होते.. 'चल ग नैने.. चिमुरडीला आवरायला दोन तास लागतायत...आई तशी मुलगी'

खाडकन महेश खिडकीत आला. आहाहाहाहाहा!

न्हाऊन पाठीवर मोकळे सोडलेले ओले केस, त्यात सकाळची किरणे पडून परावर्तीत होतायत, अंगावर काळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस, गोरापान रंग... आणि... हेत तिच्यायला...

चालली की ही? बापाबरोबर? मग मला कशाला काल रात्रीपासून आशेच्या बागेत फिरवलं?

म्हणजे काय? नैना काकाबरोबर जाणार आहे? आपण कशाला उठून बसलोयत अन तयार होऊन बसलोयत मग? विरोध! तीव्र विरोध करायला हवा या भामटेगिरीचा! पण कसा करणार? चालली... चालली हो चालली...

आत्ता त्याला 'राजकुमार' पिक्चरमधील शम्मीकपूरच्या गाण्याचा अर्थ नेमका समजला..

'तुमने किसीको जानको जाते हुवे देखा है?...
... वो देखो मुझसे रूठकर... मेरी जान जा रही है...'

काय करावं काय तिच्यायला? एक तर आपला काही हक्क नाही. ही निघाली बापाबरोबर! पण हक्क नाही म्हणजे काय? इथे मी तयार होऊन बसलोय ना? निदान 'मी का तिच्याबरोबर जायच नाही आहे' हे विचारायचा तरी हक्क आहेच आपल्याला!

मनात विचारांची वादळे उठत असतानाच नैनाने वर पाहिले.

खोल, खोल... अगदी खोल गेलेल्या डोळ्यांनी देवदास सारखा चेहरा करून महेश तिच्याकडे पाहात होता. ती हासतच होती. बाबा दोन पावले पुढे गेल्यावर तिने कुणालाच कळणार नाही असा 'बाय' या अर्थी हात नाजूकपणे हलवला अन ती सरळ निघून गेली वाड्याच्या बाहेर!

आता? आता काय करायचं?

महेशने ऑफीसला निघालेल्या बाबांकडे पाहिलं.

श्री - मी निघतो रे..
महेश - हं!
श्री - अन तू आलास की आजीकडे जेव.. आज डबा नाहीच आहे तुझा..

चालले की? बाबाही चालले. आपल्या कुचंबणेची दाद मागायची कुठे आता?

महेश - एक पाच रुपये देऊन ठेवा...
श्री - कशाला?
महेश - आता डबा नाही म्हणजे काहीतरी घ्यायला लागेलच की?
श्री - पण घरीच येतोयस ना अकरापर्यंत?
महेश - छे?
श्री - म्हणजे?
महेश - अहो मी कॉलेजला नाही का चाललो?
श्री - तू नैनाबरोबर नाही जाणारेस का?
महेश - ती गेली की?
श्री - कुठे?
महेश - तिच्या बाबांबरोबर..
श्री - हो का?.. बर... मग हे घे... सात रुपये ठेव.. मावशी... हा नाहीये बर का जेवायला?

बोंबला! यांना काही वाटलंच नाही या सगळ्यात! म्हणे हे घे सात रुपये!

निराश मनाने महेशने पुस्तके वगैरे भरली अन निघाला.

शीलाकाकू - महेश.. झालास का तयार? दहा मिनिटांत निघा दोघं...
महेश - कोण दोघं?
शीलाकाकू - तू अन नैना..
महेश - .....कुठंय ती?
शीलाकाकू - आहे की.. ती तयार आहे..
महेश - होय का? बर ठीक आहे.. आजी... मी आहे गं जेवायला...

आपली कॉलेज बॅग घरात पुन्हा फेकून देत स्वारी गडगडल्यासारखी जिना उतरून खाली आली.

परिपक्व प्रौढ माणसाप्रमाणे म्हणाला..

महेश - चल म्हणावं तिला.. आधीच उशीर झालाय...
शीलाकाकू - हो.. ए... आला गं हा...

'... ओ...हमको तुमसे... होगया है प्यार क्या करे... बोलो तो जिये... बोलो तो... मरजाये.. हमको तुमसे... हो गया है..'

गाणं म्हणून नाचावंसं वाटत होतं महेशला! नैना अगदी मंदपणे हासत, त्याच्याकडे दुर्लक्ष करत, तो आपल्याकडे वेडावल्यासारखा बघत बसलेला असंणार याची खात्री बाळगत, आईकडे पाहात 'जाते' अशा अर्थी माना वेळावत, मिश्कील चेहर्‍याने बाहेर आली.

निघाले. दिंडी दरवाजा ते ओंकारेश्वर... एक अक्षरही कुणी बोलले नाही...

ओंकारेश्वर मागे पडला.

महेश - आधी कुठे गेलीवतीस?
नैना - हरिहरेश्वर...

बोलताना ओठांचा किती कमीतकमी वापर करता येऊ शकतो याचे ज्वलंत उदाहरण होते नैना शनिवार पेठेतील!

महेश - क्का?
नैना - पहिला दिवस म्हणून..

काहीपावले चालून झाल्यावर महेशच्या लक्षात आले. ही स्वतःहून काहीच बोलत नाही आहे. आपल्याला संवाद जरा पुढे नेला पाहिजे.

महेश - तसं साधंच असतं रजिस्ट्रेशन..
नैना - .....
महेश - मी देईन करून सगळं...
नैना - ...
महेश - चांगलंय ते कॉलेज... मी होतो तीन आठवडे..
नैना - ....
महेश - अकरावीला क्लास लावलायस का?
नैना - अंहं!

'अंहं' इतक्या छानपणे म्हणता येतं अन ते म्हणताना मान हा अवयव इतका अप्रतिम वळवता येतो हे नवीन ज्ञान मिळणे हा नवीन मराठीपर्यंत चालण्याचा झालेला फायदा होता महेशला!

आता काहीतरी कॉमन माहितीचा विषय काढलेला बरा पडेल असे त्याला वाटले. पवार आजी हा एक तसा विषय असू शकत होता.

महेश - आजी किती बोलते ना लोकांना? परवा घाटेआजींना म्हणाली की तुमची अर्धी लाकडं पोचलीयत..

खूप वेळ रोखून धरलेलं हसू रोखणे अशक्य झाल्याने माणूस जसा हसेल तशी हसतानाही नैना परीसारखी भासत होती. मान खाली घालून, हात तोंडावर दाबून किणकिणत हसल्यावर रस्त्यावर चांदणं विखुरलं!

दोघांमधेही तीन, चार फुटांच लॅटरल अंतर होतं! मात्र ते पुढे मागे नव्हते, होते समांतरच! त्यामुळे तिच्याकडे बघण्यासाठी महेशला मुद्दाम मान वळवून पाहावे लागत होते अन तिला नुसते डोळ्यांच्या कोपर्‍यातूनच तो आपल्याकडे कधी कधी पाहतोय ते समजत होते.

एक अक्षरही न बोलता सर्व संवादांचं केंद्रस्थान कसं व्हायचं याचं ज्ञान बायकांना जन्मतःच असावं बहुधा!

आता हिला काहीतरी विचारल्याशिवाय ही बोलणारच नाही असा विचार करून महेश म्हणाला..

महेश - श्रीकांतमुळे रॉथमन्स कप जिंकलो आपण.. तुला काय वाटतं?

बोंबला! आता प्रश्नाचं उत्तर द्यायचं तर तिने पाठीवरचे मोकळे केस पुढ घेतले. तेच बघत बसल्यामुळे रॉथमन्स कप कुणामुळे जिंकला हे ठरेनाच!

त्यातच पर्समधून रबर बॅन्ड अन चाप काढून तिने चालता चालताच केसांचा अंबाडा बांधून टाकला.

बहुधा तो निषेध असावा! 'आज मी एवढी तुझ्याबरोबर येणार म्हणून केस सोडून आले तर त्यावर तू काही बोलतच नाहीस' या कारणाने केलेला! पण हे महेशला ध्यानात आले अलका टॉकीजपाशी!

महेश - तसंच चांगलं दिसत होतं की?

आत्ता नैनाला आवाज फुटला.

नैना - काय?

तिने अगदी डोळ्यात डोळे वगैरे मिसळून पाहिल्यामुळे महेशची पाचावर धारण बसली. आता हिला स्पष्ट सांगीतलं तर घरी जाऊन सांगायची हा रस्त्यात छेडतो. नाही सांगीतलं तर आपल्याकडे अशी लाडिक अधिकाराने बघतीय जसं काही उत्तर दिल्याशिवाय सोडणारच नाही आहे.

महेश - ते.. केस..
नैना - अंहं! उडतात...

'आता उडतात हेच तर चांगलं दिसतं न बये' म्हणावेसे वाटत होते महेशला! पण ते फार झाले असते. तिने त्याचा पार बाळू करून टाकला होता. विचारताना चेहरा असा करायचा की 'हेच उत्तर ऐकण्यासाठी मी हा जन्म घेतला होता रे राज्जा' आणि उत्तर दिल्यावर म्हणे 'उडतात'! महेशला 'बघत्यात'ची आठवण झाली. 'एक लाजरा अन साजरा मुखडा' या गाण्यात तो शब्द आहे हे त्याला आठवलं! तसा गाणं बिणं विषयापासून महेश चार हात लांबच! पण लकडी पुलावर मुठेवरून येणारा छेडछाड करणारा वारा, सकाळची वेळ आणि उजव्या बाजूला परी! त्यामुळे सहजच तो गुणगुणू लागला. 'एक लाजरा अन साजरा मुखडा.. चंद्रावाणी खुलला गं'.. अन गुणगुणताना सहजच नैनाकडे लक्ष गेलं तर ती ओढणी तोंडावर धरून लाजून खुसखुसत होती. सूर्याच्या आजच्या नव्या लॉटमधल्या किरणांमुळे की लाजल्यामुळे तिचा रंग बदललाय हे ठरवेपर्यंत महेशला हा प्रताप आपण नको ते गाणं गुणगुणण्याचा हा आहे हे लक्षात आलं! तिथपासून ते कॉलेजमधले काम होईपर्यंत तिच्याशी एक अक्षरही तो बोलला नाही.

आणि परतीच्या प्रवासातही 'स्पेशल' असे काही बोलण्याची हिम्मत होईना! मगाचच्या 'उडतात अन बघत्यात' ला बराच काळा झालेला असला अन त्याचा इफेक्ट कॉलेजमधल्या कामांमुळे निघून गेलेला असला तरी महेशच्या मनात अपराधी फीलिंग होतं! हो! सांगायची कुणालातरी.. हा मला घेऊन गेला होता तेव्हा ते गाणं म्हणत होता.. की डागाळलिच आपली प्रतिमा! त्यामुळे महेश एक तर गप्प तरी होता किंवा आत्ताच केलेल्या कामांबाबत एखादे वाक्य तरी बोलत होता. नैना आपली गप्पच होती. एक मात्र महेशला जाणवलं होतं! की ती कंटाळली अजिबात नव्हती. तो काय बोलतोय याबाबत ती खूप गंभीर होती. फक्त बोलत नव्हती. आता पुन्हा लकडी पूल आला!

काहीतरी तरी बोलायलाच हवं!

महेश - सागर पाहिलास?

'पाहिला हो पाहिला, आता पुढे काय विचारणार आहेस ते माहितीय' अशा सर्कॅस्टिक पद्धतीचे भाव चेहर्‍यावर आणून नैनाने मान हलवली. महेश आणखीनच हादरला.

नारायण पेठ, भाजीराम मंदीर... सगळे विभाग अबोल्यातच मागे गेले.

शेवटी! शेवटी दास्ताने वाडा आला सुद्धा! आता काय बोलणार?

शेवटी वाड्याचा दिंडी दरवाजा अगदी पंधरा फुटांवर असताना महेश म्हणाला..

महेश - काहीही मदत लागली कॉलेजमधे तर केव्हाही सांग हं? माझे खूप मित्र आहेत तिथे...

क्षणभर नैना थबकली.

एका वाक्यात इतिहास सांगण्याची करामत बायकांना येते म्हणतात ते काही खोट नाही.

नैना - नक्की.... आणि... सागरमधे कमल हासनने आधी विचारलं असतं तर.. मोना त्यालाच हो म्हणाली असती... म्हणजे.. ऋषी कपूर नसताच आयुष्यात तर... नाही का????

गुलमोहर: 

हा ही भाग मस्त झालाय बेफिकिरराव झक्कास बाकी श्री च्या एका बोलण्याने महेश सुधारला हे खुपच छान झाल

निवांत पाटील -

१. धन्यवाद!

२. मागील भागातील एका प्रतिसादाबाबत - आपले म्हणणे योग्य आहे. त्या काळात पिक्चर लगेच टी.व्ही. वर यायचे नाहीत. बापाच्या भूमिकेतून काहीतरी कारण सांगायचे म्हणून ते लिहीले. कृपया लक्ष ठेवावेत. मनापासून आभार!

शैलेशराव -

आपल्या प्रतिसादावरून मला काही म्हणायचे आहे. कृपया गैरसमज नसावा.

१. प्रतिसादाबद्दल खरच आभार!

२. श्रीच्या एका बोलण्याने तो सुधारणे - खरे तर आपण योग्य म्हणत आहात. आजवर नाही सुधारला तो एकाच बोलण्याने कसा सुधारला? माझी भूमिका अशी होती की 'वडिलांची नाचक्की होऊ शकते' हे जाणवल्यावर त्याने चोरी न करण्याचा निर्णय घेतला. चर्चा व्हावी. काही चुकत असल्यास मनापासून सांगावेत.

३. आपण सहसा प्रतिसाद दिलेले नाहीत. म्हणजे प्रतिसाद न किंवा सहसा न देणारेही काही कादंबरी वाचक असतील काय? मला हे जाणून यासाठी घ्यायचं आहे की समाजात प्रौढी मिरवण्यासाठी सांगताना मी वाचकांचा काय आकडा सांगावा? शायनिंग मारणे या गोष्टीचा मला खरच छंद आहे. खोटे समजू नयेत.

पुन्हा आभार!

-'बेफिकीर'!

बेफिकिर, काय लिहु यार????????????????

एकच नम्बर. श्रि अनि गट्टू मधला सवाद अगदि खोल भिडला.

झाले जगून ज्याचे... सोडून जात आहे..
मृत्यूस जिंदगी ही अवघी बहाल आहे.. बेफिकिर, काय लिहुन गेलात, खरच ग्रेट.

गट्टु चि मानसिकता अगदि छान माडलित, specially त्याच्या मनातले सवाद. खुप हसु आले ते वाचताना.

खुप खुप छान.

बेफिकिर
नेहमीप्रमाणेच जबरदस्त! तुमच्या तिन्ही कथांना एक 'सिनेम्यटिक' व्ह्यल्यू आहे! प्रत्येकवेळी वाचताना मी मनातल्या मनात ही भुमिका कोण करु शकेल ह्याचा आराखडा बांधत असतो! तुम्ही खरच ह्या तिन्ही कथा एखाद्या निर्मात्याला दाखवा! प्रत्येक कथा अगदी बारकाव्यानिशी लिहिलेली आहे. दिग्दर्शकाला काही कामच उरणार नाही, त्याने फक्त कथा आहे तशी मांडायची, बस्स! जबरदस्त!
पु.ले.शु.... नाही खर तर याची काही गरजच नाही!

बेफिकिर, खरच खुप लोक आहेत जे प्रतिसाद देत नाहित(मि काय सागतोय मि हि त्यातलाच (होतो)),
Majhi team lead jichya mule mala maayboli he website kalali ti ani ticha mumbai cha group khup kahi kahi wachat astat ani mala tya madhuun mala Half Rice ... hi kadambari wachyala milali, pan tya group paike koni hi person cha kontya hi post la kadhi reply disla nahi.

ani kharach ase aste na ki, apan kashya la kunachya, chuka kadhyachya asa baryach janacha (maajhe suddha) view aahe. pan tumhi jo hi kahi reply alay, tyala yogya to nyay detay, manun lok reply ani suggestion sudha detatay. tya baddal tumche kautik

हा खरच संत्या...माझ पण तेच मत आहे...ही कांदबरी सुद्धा सुंदर मांडली आहे.यातले प्रसंग डोळ्यासमोर उभे रहातात.याच्यावर एक छान कलाक्रॄती निर्माण होऊ शकते.

बेफिकीर,
क्या बात है.


झाले जगून ज्याचे... सोडून जात आहे..
मृत्यूस जिंदगी ही अवघी बहाल आहे..
>> लाजवाव.
मला तुम्ही कविता संग्रह देणार होतात, त्याचं काय झालं?.

मस्त चाललीये कथा!!! ह्या एका भागात २ भाग सामावलेले आहेत असे वाटते....

पहिला अगदी सिरियस संवेदनक्षम असा...त्याचा इफेक्ट राहू द्यायला हवा होता असं वाटतं...म्हणजे दुसरा भाग, 'भाग २३' म्हणून लिहिला असता तर जास्त आवडलं असतं...
आणि दुसरा रोमँटिक भाग...दिपू-काजलची डिट्टो आठवण करुन देणारा...ते दोघंजण जत्रेसाठी गेले होते तो आणि काजलला दाखवायच्या कार्यक्रमासाठी दिपू गावी घेऊन गेला होता तो अशा दोन प्रसंगांचे मिश्रण म्हणजे हा भाग होता..

दिपू आणि गट्टू- दोन्हीमधे कोवळ्या वयातल्या पहिल्या प्रेमाची कथा तुम्ही मस्त रंगवली आहे. पण दिपूची वाचनात आधी आल्यामुळे सारखा दिपूच डोक्यात येतो आहे. सारखी तुलना होते आहे मनातल्या मनात....

मधुकरराव,

'श्वासात ताल आहे' या गझलेतील ही द्विपदी आहे. तेव्हा तखल्लुस नव्हते. तुम्हाला आणि परेश यांना ती आवडली म्हणून गझल येथे देत आहे. खूप जुनी आहे. (अर्थात, गझलकार म्हणून मी खूप जुना नाहीच, त्यातल्या त्यात जुनी व माझा 'गझल' रचण्याचा रेट गृहीत धरता फारच जुनी - एक मोठं स्मित हास्य! - मला येथील खाणाखुणा व बाहुल्या देता येत नाहीत.)

प्रत्येक अक्षराचा हेतू जहाल आहे
प्रत्येक शेर माझा जळती मशाल आहे

मदिरा खराब आहे, जो सांगण्यास आला
तोही पिऊन गेला, नुसती धमाल आहे

तलवार चालवावी दुसऱ्या कुणीहि येथे
माझी सदाचसाठी हातात ढाल आहे

भक्ती स्वतःच करता, मूर्तीस जान देता
वरती तिलाच नमता, तुमची कमाल आहे

जितका जमेल तितका उपभोग घेत जावा
होता 'उद्या' जो 'परवा', आता तो 'काल' आहे * (जो - सूट - जुन्या काळची)

'जाणे तिचे नि येणे', सारे थिजून पाही
दुर्मीळ फार हल्ली हंसाचि चाल आहे

भेटो कितीक येथे, पण गीतकार माना
त्यालाच सत्य ज्याच्या, 'श्वासात ताल आहे'

हिरवा गुलाल येथे दंग्यास मूळ होतो
पण रंग दोन्हिकडच्या रक्तास लाल आहे

बाजार हा कवींचा, सवलत हजार टक्के
करणार काय सांगा? बकवास माल आहे

चाळीस वर्ष माझी चालू असे परीक्षा
माहीत ना मलाही, केव्हा निकाल आहे!

या लोचनांत लाली, ओठात धूर काळा
हिरवे विचार, माझा, रंगीन हाल आहे

झाले जगून ज्याचे, सोडून जात आहे
मृत्यूस जिंदगी ही अवघी बहाल आहे

-'बेफिकीर'!

(५ फेब्रुवार५, २००९ रोजी इतरत्र प्रकाशित!)

धन्यवाद....

म्हणजे प्रतिसाद न किंवा सहसा न देणारेही काही कादंबरी वाचक असतील काय?
>>>>>>
तुमचे लिखाण मी नेहमी वाचते. तुमची शैली खूप छान आहे. फक्त लॉगिन करायचा कंटाळा करते. त्यामुळे प्रतिसाद देत नाही.
पुढील लिखाणाला तुम्हाला मनापासून शुभेच्छा.

मीरा, चैत्रगंधा, प्राजक्त,

प्रोत्साहनाबद्दल मनापासून आभार!

-'बेफिकीर'!

'तुमने किसीको जानको जाते हुवे देखा है?...
... वो देखो मुझसे रूठकर... मेरी जान जा रही है...'>>
..................................................................वाssह क्या बात है.

सुंदर!

श्री ने महेशला समजावलं ते तर प्रत्येक पालकाने वाचण्यासारखं आहे. मुलं समजूतदार असतातच, फक्त तुम्ही त्यांना कसं समजावून घेता त्यावर ठरतं ती कशी घडतात ते.

सानी म्हणतेय तसं दिपू-काजलची आठवण येऊन गेली...

बेफिकीर

एक मोठं स्मित हास्य! - मला येथील खाणाखुणा व बाहुल्या देता येत नाहीत.

प्रतीसाद देताना text box च्या खाली "Textual smileys will be replaced with graphical ones."
असे वाक्य आहे त्यातील Textual smileys वर क्लिक करा

म्हणजे प्रतिसाद न किंवा सहसा न देणारेही काही कादंबरी वाचक असतील काय?
>>>>>>
तुमचे लिखाण मी नेहमी वाचतो . Typing in Marathi is very tough for me, so ..... no
पुढील लिखाणाला तुम्हाला मनापासून शुभेच्छा.

बेफिकीर राव,
आता विषय आलाच आहे म्हणून सान्गतो... मी पण तुमचा नियमीत वाचक आहे... तुमच्या प्रत्येक भागाची वाट पाहत असतो.. प्रतिसाद देत नाहि..

प्रत्येक वेळेस नोन्द करायचा कन्टाळा येतो...

पु. ले. शु.

-आनन्दा

म्हणजे प्रतिसाद न किंवा सहसा न देणारेही काही कादंबरी वाचक असतील काय? मला हे जाणून यासाठी घ्यायचं आहे की समाजात प्रौढी मिरवण्यासाठी सांगताना मी वाचकांचा काय आकडा सांगावा?
मला तरी असे वाटते की, प्रतिसाद देणार्‍यांची संख्या हे हिमनगाचे पाण्यावर दिसणारे टोक आहे. त्यावरून पाण्याखाली असलेले (प्रतिसाद न किंवा सहसा न देणारे) किती असतील याचा अंदाज लावता येईल.
आता प्रतिसाद न देण्याबद्दल.....
बाकिच्यांचे मला माहीती नाही. पण मी मनापासून सांगतो कि एवढे सुंदर लिखाण वाचल्यानंतर काय प्रतिसाद द्यावा हे सुचतच नाही. त्यामुळे मी तुमच्या लिखाणाचा नियमित वाचक असूनही फार कमी वेळेस प्रतिसाद दिला आहे. तरीही लोभ असावा ही विनंती...... : स्मित :

ashuchampला अनुमोदन
बेफिकीर जी, हा पण भाग सुन्दर...
'श्वासात ताल आहे' ही गझलही अप्रतिम आहे.
पु.ले.शु.

आपण सहसा प्रतिसाद दिलेले नाहीत. म्हणजे प्रतिसाद न किंवा सहसा न देणारेही काही कादंबरी वाचक असतील काय? मला हे जाणून यासाठी घ्यायचं आहे की समाजात प्रौढी मिरवण्यासाठी सांगताना मी वाचकांचा काय आकडा सांगावा? शायनिंग मारणे या गोष्टीचा मला खरच छंद आहे. खोटे समजू नयेत.>>>>>>>

ऑफीस मधे आम्ही पाच जणी वाचतो आणि त्याचीच print out काढून ट्रेनमधल्या ग्रुपला वाचायला देतो
तुमचा आक्षेप आसेल तर क्रॄपया तसे कळवावे. बाकी तुसी ग्रेट हो!

बेफिकिर,
'श्वासात ताल आहे' खुप सुदर, कहि ओळि मनाला भावून गेल्या.

मदिरा खराब आहे, जो सांगण्यास आला
तोही पिऊन गेला, नुसती धमाल आहे Happy Happy

जितका जमेल तितका उपभोग घेत जावा
होता 'उद्या' जो 'परवा', आता तो 'काल' आहे

'जाणे तिचे नि येणे', सारे थिजून पाही
दुर्मीळ फार हल्ली हंसाचि चाल आहे

हिरवा गुलाल येथे दंग्यास मूळ होतो
पण रंग दोन्हिकडच्या रक्तास लाल आहे (खरच लोक असे का वाग्तात?)

चाळीस वर्ष माझी चालू असे परीक्षा
माहीत ना मलाही, केव्हा निकाल आहे! (माझि २६)

झाले जगून ज्याचे, सोडून जात आहे
मृत्यूस जिंदगी ही अवघी बहाल आहे

Happy

बेफिकिर,
काय प्रतिक्रिया द्यायची हो तुम्हाला....... शब्दच नाहीत.....
मुलांच्या 'मानसिक स्थिती' ची तुम्हाला उत्तम जाण आहे..
तुमच्या या कथेतुन खुप काही शिकायला मिळालय, भावी पालक म्हणून त्या गोष्टी नक्की लक्षात ठेवण्यासारख्या आहेत....
अप्रतिम............................पु.ले.शु...

बेफिकीर जी,
मी पण तुमची नियमीत वाचक आहे...
तुमचे लिखाण मी नेहमी वाचते. तुमची शैली खूप छान आहे. फक्त कंटाळ्यामूळे प्रतिसाद देत नाही.
प्रत्येक वेळेस नोन्द करायचा कन्टाळा येतो...

माफ करावेत, स्वतंत्रपणे नावे लिहीत नाही.

प्रत्येकाच्या प्रेमळ प्रोत्साहनाचे मनापासून आभार! आपला ऋणी आहे.

-'बेफिकीर'!

Pages