भाग ३ - उत्तर हिंदुस्थानी संगीतातील गायन प्रकार

Submitted by हिम्सकूल on 25 August, 2010 - 10:41

भाग २ - http://www.maayboli.com/node/18136

ख्याल -
हा शब्द मूळ फारसी भाषेतून आला आहे. ह्याचा अर्थ कल्पना किंवा विचार असा आहे.पुरातन काळात धृपद गायकी ही अधिक लोकप्रिय होती. आणि त्यामुळे ती खूप वरच्या दर्जाप्रत पोहोचली होती. सर्व खानदानी घराण्यात जवळ जवळ दीड दोनशे वर्षापूर्वी पासून धृपद गायकीची पद्धत प्रचलित होती. साधारणपणे पंधराव्या शतकात जौनपूरच्या सुलतान हुसेन शराकीने ख्याल गायकीचा आरंभ केला असे समजले जाते. इ.स. १७१९ ते १७४० च्या दरम्यान मुघल बादशहा मोहम्मद शहाच्या दरबारात सदारंग आणि अदारंग नावाचे दोन गुणी गायक होते. त्यांनी हजारों ख्यालांची रचना केली. त्यातले कित्येक ख्याल आजही गायले जातात. ह्यांनी रचलेल्या ख्यालांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या रचनेत त्यांचे नाव हमखास सापडते. सदारंग हे त्यांचे उपनाव होते.त्यांचे खरे नाव न्यामात खाँ असे होते. ख्याल गायाकीचा जोरदार प्रचार त्यांच्या शिष्यांनी केला आणि शे सव्वाशे वर्षाच्या अवधीत ख्याल गायाकीचा अमाप प्रचार झाला. दिल्लीचे सुप्रसिद्ध तानारासाखाँ, ग्वाल्हेरचे बडे मोहम्मद खाँ, हद्दू, हस्सू खाँ हे सर्व ख्याल गाणारे प्रसिद्ध आणि गुणी गायक होते. विलंबित त्रिताल, तिलवाडा, झुमरा आणि आडाचौताल इ. तालांमध्ये बडे ख्याल गायले जातात.
ख्याल गायनात बडा ख्याल व छोटा ख्याल असे दोन प्रकार आहेत. बडा ख्याल अत्यंत विलम्बित लयीत गायला जातो आणि छोटा ख्याल जलद गतीने गायला जातो. साधारणतः चौदाव्या शतकात हजारात अमीर खुस्रो ने कव्वालीच्या आधारावर छोट्या ख्यालाची रचना केली असे म्हटले जाते. छोट्या ख्यालात बोलताना व तयारीच्या ताना अधिक प्रमाणात घेतल्या जातात. छोटे ख्याल शक्यतो द्रुत त्रिताल, द्रुत एकताल आणि झपताल मध्ये गायले जातात.

धृपद -
हा एक वीररस प्रधान गीतांचा प्रकार मानला गेला आहे. केव्हापासून धृपद या प्रकाराची निर्मिती झाली किंवा प्रचार झाला हे निश्चितपणे सांगणे कठीण आहे पण ग्वाल्हेरच्या राजा मानासिंह तुंबर याने ह्या प्रकारास खूपच लोकप्रियता मिळवून दिली. आणि त्यानंतर या गायकीचा प्रचार संपूर्ण देशात झाला. अकबर बादशहाच्या कारकिर्दीत धृपद हा गायनाचा प्रकार अत्यंत उंच शिखरावर पोहोचला होता. अकबराच्या दरबारात तानसेन सारखे विद्वान ध्रुपदगायक पण होते.
धृपदमध्ये बांधलेल्या रचनेचे काव्य हे उच्च प्रतीचे असते. पूर्वकालीन धृपद रचनेत अस्ताई, अंतरा, संचारी आणि आभोग असे चार भाग असत. पुढे पुढे धृपद गायनात फक्त दोनच म्हणजे अस्ताई व अंतरा असे विभाग राहिले. धृपदात तालाला विशेष महत्त्व दिले जाते व गायकी प्रकारात आलाप व बोलातानांना जास्त महत्त्व असते. ह्या प्रकारात ताना फारश्या घेतल्या जात नाहीत. परंतु जेव्हढ्या घेतल्या जातात त्या सर्व गमक युक्त असतात. धृपद गीत ईशस्तवन, युद्धातील पराक्रम किंवा परमेश्वराची लीला इ.चे वर्णन आधाळून येते. ह्यात शृंगार रसांच्या रचना क्वचितच आढळून येतात. खंडारबानी, नोहारंबानी, डागुराबानी आणि गोबरहारबानी अशी ह्या गायकीचे चार प्रमुख घराणी होती.
जो राग गायचा असेल त्याची आलापी नोम तोम या शब्दांचा आधार घेऊन सुरात केली जात असेल आणि त्यातून संपूर्ण रागाचा नियमानुसार अविष्कार केला जात असे. नोम तोम करते समयी कुठलाही ठेका धरला जात नसे. आलापी संपल्यानंतर त्या रागातले एक तालबद्ध गीत गायले जात असे आणि त्यातच दुप्पट, तिप्पट, आड, कुवाड इ. लयींचे आकर्षक प्रकार करून गीताची समाप्ती केली जात असे. धृपद गायकीतील मुख्य ताल म्हणजे चौताल, सुराफाक्ता, तेवरा, झंपा इ. जशी जशी ख्याल गायकीला लोकप्रियता मिळत गेली तशी तशी धृपद गायकीला उतरती कळा लागली.

धमार -
ह्या प्रकाराला होरी अथवा होळी असेही म्हटले जाते. फाल्गुन महिन्यात येणार्‍या होलीकोत्सावातील वर्णन ह्या प्रकारामध्ये असते. धमार तालात ही गीते म्हणली जातात. म्हणून ह्या गीत प्रकाराला धमार हे नाव दिले आहे. धामाराची गायकी पण धृपद सारखीच साधारणपणे असते. परंतु ह्या मध्ये बोला अंगाचा विशेष उपयोग केला जातो. धृपद प्रमाणेच हा प्रकार धीरगंभीर व जोषपूर्ण असतो. गमकयुक्त बोलताना हा या प्रकाराचा महत्त्वपूर्ण भाग आहे. ह्या मध्ये ताना घेत नाहीत.
आधुनिक ख्याल गायक होरी गीत दीपचंदी किंवा त्रिताला हल्ली गाऊ लागले आहेत. अशा गीतांना कच्ची होरी आणि धमार तालामध्ये धृपदच्या अंगाने गायलेल्या होरीला धमार किंवा पक्की होरी म्हणले जाते.

टप्पा -
गुलाब नबी शोरी या गायकाने ह्या गीत प्रकाराला प्रकाशात आणले. ते पंजाबमध्ये येउन राहिले होते.पंजाबी भाषा ह्या गीत प्रकाराला अधिक उपयुक्त आहे हे जाणून ह्या भाषेत त्यांनी टप्पा ह्या गीत प्रकाराची रचना केली. टप्पा गीत हे अगदी थोड्याशा शब्दामध्ये रचले जाते. प्रत्येक शब्दांच्या मध्ये मध्ये तानांच्या लडी गुंफलेल्या असतात. जेव्हा ह्या छोट्या छोट्या आकर्षक ताना घेतल्या जातात तेव्हा श्रोते अवाक होऊन ते ऐकतात. टप्पा गायकाचा गळा खूप तयार आणि तरला असावा लागतो. साधारणपणे हे गीत शृंगाररसात रचलेले असते. गळा तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रथमत: टप्पा शिकवण्याची प्रथा अमलात होती. टप्प्यामध्ये ए विशिष्ठ प्रकारचा ठेका लावण्याची पद्धत आहे. त्रितालाचे नेहामीचे वजन बदलून ठेका लावण्याची रीत अमलात आणतात. व्रजाभाषा, हिंदी आणि बंगाली भाषेत रचले गेलेले आहेत. अनेक टप्पे पण प्रचलित आहेत. लखनौ आणि बनारसच्या बाजूला टप्पा विशेष गायला जातो.

ठुमरी -
लखनौचा बादशहा वाजीद अलीशाहने शंभर वर्षापूर्वी ह्या प्रकाराला प्रोत्साहन देऊन विशेष लोकप्रिय केले. हा बादशहा स्वत: एक उत्कृष्ठ गायक होता आणि त्याने 'अख्तारपिया' ह्या उपनावाने ठुमरीच्या अनेक रचना केल्या. ठुमरी हा एक शृंगार रस प्रधान आणि भावना पूर्ण गीताचा प्रकार आहे. ह्या गीत शब्द थोडेच असतात परंतु या शब्दांना आकर्षक पद्धतीने गाउन त्या मधील आशय स्पष्ट करणे आणि भावपूर्णता निर्माण करणे हे विशेष महत्त्वाचे आहे. ठुमरी विशेष करून खमाज, पिलू, तिलंग, देस, तिलककामोद, काफी, भैरवी इ, विशिष्ठ हलक्या फुलक्या रागातच गायली जाते. ह्याच्यामध्ये गाताना रागाचे काटेकोर बंधन पाळावे लागतेच असे नाही. ह्या मध्ये अत्यंत मधुर, आकर्षक स्वरासमुदाय व नाजूकशा सुरेल हरकती द्वारा शब्दांना विविध ढंगाने श्रोत्यांसमोर मांडणे ही विशेष महत्त्वाची बाब आहे. ख्याल गायक ठुमरी आकर्षक रित्या सादर करू शकतीलच असे नाही. लखनौ व बनारस ही दोन शहरे ठुमारीसाठी प्रसिद्ध आहेत. बंगालमध्ये ठुमरी विशेष लोकप्रिय आहे. आजकाल ठुमरीचा प्रचार सर्व देशभर झाला आहे. पंजाबातल्या वैशिष्ठपूर्ण गायकीचा प्रभाव ठुमारीवर पडल्याने पंजाबी ढंगाची ठुमरी असा एक प्रकार पण प्रचारात आला आहे.

भजन -

प्राचीन काळी मीराबाई, कबीरदास आणि सूरदास आदि संतांनी लिहिलेल्या भक्तीपर काव्य रचना भिन्न भिन्न रागात गायल्या गेल्यामुळे भजन हा प्रकार अस्तित्त्वात आला. निरनिराळ्या छंदामध्ये ही गीते रचलेली असल्यामुळे विभिन्न तालात ती गायली जात. कित्येक गायक भजन रागदारीमध्ये गाता तर काही त्याला आकर्षक चाल लावून म्हणत. ठुमरी गायक जेव्हा भजन म्हणतात तेव्हा त्याला हलक्या फुलक्या संगीताचे स्वरूप प्राप्त होते. भजन गायकी कोणत्या स्वरूपाची असावी ह्या साठी काही खास नियम तर नाहीत पण एवढे मात्र नक्की म्हणता येईल की ते एक ईश्वरभक्ती संबंधी गीत असावे. भजन हे एक शब्दप्रधान गीत आहे. त्यामुळे सहाजिकच त्यात गायकीपेक्षा शब्दांना अधिक प्राधान्य दिले जाते.

गजल -
उर्दू किंवा फारसी भाषेतील हे एक शृंगार रस प्रधान गीत आहे. या मध्ये शब्दांना विशेष महत्त्व दिले जाते. त्यामुळे तो शब्दप्रधान गीताचा प्रकार आहे. गजल गाण्यासाठी एखाद्या आकर्षक चालीची आवश्यकता आहे. साधारणत: त्याचे अंतरे एका पाधातीनेक गायिले जातात. ह्या मध्ये लौकिक अथवा पारलौकिक प्रेमविषयक बाबीचे वर्णन केलेले असते. सामान्य रागातील परंतु आकर्षक चालीमध्ये गाजला गायिली जाते. दीपचंदी, दादरा, रुपक आदी तालांमध्ये ही प्रामुख्याने गायली जाते.

गुलमोहर: 

...

उत्तम माहीती.

टप्पा ह्या प्रकारात वेगवान ताना असतात च पण त्याच्यापेक्षा मुख्य भाग म्हणजे लयीशी खेळ असतो.
एकाच आवर्तनात वेगवेगळ्या लयीत घेतलेल्या ताना हा भाग महत्वाचा असतो. तसेच चमकृतीपूर्ण आणि वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या लयीत समेला येणे हे पण टप्पा गाण्याचे विषेश आहे.

मालिनीताई भैरवीत टपठुमरी गातात ती पण छानच! शिवाय गिरिजा देवींचा टपखयालही आहेच.

तराणा आणि चतुरंग हेही आपल्या शास्त्रीय संगीत प्रकारात येतात ना?>>>> हो, शिवाय त्रिवट, तराणानुमा, ख्यालनुमा आणि सितारखानी हे देखील! Happy

हे वाचायचे राहिले होते माझे.. छानच.
कुलु सविस्तर लिही ना.. त्रिवट मी फक्त पं मालिनी राजूरकरांचेच ऐकलेय. अतिद्रुत लयीत तराणा, पण त्यात तबल्याच्या बोलांचा वापर असे काहीचे.
ख्यालनुमा, वीणा सहस्त्रबुद्धे यांच्याकडून ऐकलाय. तराण्याचे बोल पण ख्यालाच्या लयीत असा प्रकार.
सितारखानी म्हणजे काय ?

मराठी नाट्यगीतात यातले काही प्रकार आलेत. पुष्पपराग सुगंधित .. आणि परमसुवासिक पुष्पे यात टप्प्यासारख्या ताना आहेत.