श्रीनिवास पेंढारकर - एक बाप - क्रमशः - भाग २१

Submitted by बेफ़िकीर on 25 August, 2010 - 05:55

अलंकार टॉकीजला उत्सवची पोस्टर्स लागली अन महेशच्या मनातून अमिताभ बच्चन खर्रकन खाली उतरला अन त्याची जागा भर्रकन रेखा या दाक्षिणात्य एव्हरसुंदरीने घेतली.

ही बाई अशी का वागत असावी हे काही वाडियातील फर्स्ट इयर डिप्लोमाच्या नवतरुणांना समजेना! एकतर डोळे फाडून ती पोस्टर्स धड बघता येत नाहीत, बघितली तर उडत उडत, 'माझे चुकून लक्ष गेले, मी सिग्नलकडे पाहात होतो' असे म्हणत म्हणत बघावी लागायची अन एकमेकांमधे काही बोलताही यायचे नाही त्याबद्दल! हो मग? उगाच कुणीतरी म्हणायचे 'हा मवाली आहे'!

शेखर सुमन हा त्या आठवड्यातच वाडिया कॉलेजमधील यच्चयावत युवकांचा शत्रू बनला. साला! एक साधी फायटिंग करता येत नाही! अन पिक्चर कसे करतो? तर म्हणे... कामाग्नी, अनुभव, उत्सव! वा वा! पद्मिनी कोल्हापुरे ही बाई एरवी सदाशिव पेठी, खाली मान घालून जाणारी वाटायची. एकदम अनुभव? ती रिचा शर्मा का कोण आहे? एकदम आली ती कामाग्नीच! आता रेखा! असेल वयाने वीस वर्षांनी मोठी त्याच्यापेक्षा! पण उत्सव करतीय!

ठिगळे नावाचा सिव्हिलला शिकवणारा एक नवा नवा लेक्चरर काही मुलांना दुपारी एकटाच अलंकारमधे जाताना दिसला होता. च्यायला! आम्हाला शिकवतात अ‍ॅप्लाईड मेकॅनिक्स.. अन ह्यांची अंधारात एकट्यानेच नॉन अ‍ॅप्लाईड मेकॅनिक्स!

'उत्सव या पिक्चरच्या नुसत्या पोस्टर्समधेच बाळबोध मुलांना वयात आणण्याची ताकद आहे याची जाणीव हळूहळू वाडियातील प्रोफेसर्सनाही व्हायला लागली होती.

आता कुजबूज सुरू झाली. एक जरा वरिष्ठ, वयाने व डिप्लोमाच्या अनुभवानेही वरिष्ठ असलेल्या मुलाने 'रेखाचे शॉट्स बाप आहेत' असे विधान केल्यावर सुरुवातीला 'बाप आहेत' या विधानातील अर्ध्या भागावरून भलताच गोंधळ उडाला. 'बाप आहेत' म्हणजे? मग तो कीव करणारे हसून म्हणाला 'तुला नाही समजायचे'! हा आणखीन एक प्रॉब्लेम! अरे मला समजतंय ना? पण बाप आहेत म्हणजे काय असं विचारतोय, हे म्हणता यायचं नाही.

वाडियाच्या 'बारा ते तीन' या कालावधीतील पिरियड्सना असलेली जाणवणारी अनुपस्थिती कशामुळे आहे ते शिक्षकांना समजू लागले. ते होतंय न होतंय तोवर, म्हणजे उत्सव अजून जोरात चालूच होता, तोवरच एम्पायर टॉकीजला (आता जिथे सागर प्लाझा हे हॉटेल आहे तिथे आधी एम्पायर हे एक जुनाट थियेटर होते) 'लव्ह इन जंगल' हा इंग्रजी चित्रपट मॉर्निंगला लागला. इकडून घरी जावं तर रेखा, तिकडून जावं तर ती कोण ती... तिची पोस्टर्स! ती तर रेखापेक्षाही 'बाप' होती हे प्रत्येकाला जाणवलेले होते. आता लव्ह इन जंगल कशाला पाहिजे? लव्ह करायचं तर गप आपल्या घरात करा की? नाही! हे जाणार जंगलात, तिथे हैदोस घालणार अन त्यावर पिक्चर काढणार!

त्यातच सिलॅबसमधे असलेल्या वर्कशॉपच्या तासाला आता फिटिंग या सेक्शनमधील एक जॉब आला त्याचे नांव 'मेल फिमेल'! दोन लोखंडी तुकडे विविध प्रकारांनी घासून, कापून एकमेकात दिलेल्या डायमेन्शनप्रमाणे बसवायचे. 'माझा मेल झाला, फिमेल व्हायचाय', 'फिमेलला सॉ मिळाली नाही' , 'मेलच्या डायमेन्शन्स चुकल्यामुळे नवीन जॉब घ्यावा लागला' अशी विधाने आता सर्रास होऊ लागली व त्यावर चोरून हासणे सुरू झाले. भोपे नावाचा एक मास्तर 'असं घास' वगैरे म्हणाला की पोरे हसायला लागायची. त्यात एक बरं होतं! वर्गात एकशे चोवीस विद्यार्थ्यांपैकी मुली फक्त चार होत्या व त्या आपापसातच बोलायच्या. त्यामुळे त्यांची नजर चुकवून मुले काहीही बोलू शकायची.

फिजिक्सच्या डिसूझाबाईचे ब्लाऊझ बहुतेकदा भलतेच ट्रान्सपरंट असण्यावर काही मुलांचे एकमत झालेले होते. त्यामुळे ती मुले त्या तासाला नियमीत उपस्थित असायची.

त्यातच कॅन्टीन! तास 'बंक' करता येतो हे अगाध ज्ञान नवे नवेच मिळाल्यामुळे महेश आता काही समसुखी मुलांबरोबर कॅन्टीनला जाऊ लागला. आता प्रश्न होता पैशांचा! 'सायकल पंक्चर वगैरे झाली तर' वगैरे कारणांसाठी त्याच्याकडे पाच रुपये दिलेले असायचे. त्या पाच रुपयांचा हिशोब द्यावा लागायचा. हिशोब कसा देणार? चहा प्यायला हे सांगता यायचं नाही. डोसा खाल्ला हा तर मोठा अपराध! मग? मग पाच रुपये खर्च होण्याचे काही कारणच नाही. नुसतेच कॅन्टीनला आपले जाऊन बसायचे. निदान एक सुख हे तरी की मी तास बुडवू शकलो. मला कुणीही प्रश्नही विचारू शकत नाही. बाकीची मुले काही ना काही घ्यायची. मग उगाच एखादा घोट चहा, डोश्याचा एक तुकडा चटणीबरोबर वगैरे खाऊन, आपल्याला हे सगळे यांना कधीच ऑफर करता येणार नाही ही सद्सद्विवेकबुद्धी जागृत असल्यामुळे 'छे छे, आता बास मला' असे म्हणून गप्प बसावे लागायचे.

वामन, मुकूल, नंदन आणि शिवेंद्र उर्फ शिवा हे चार मित्र मिळाले.

वामन हा महेशप्रमाणेच एका पेठेत राहणारा! नारायण पेठ! मुकूल कर्वे रोड, नंदन प्रभात रोड आणि शिवा पिंपरी!

वामन मध्यमवर्गीयांपैकी, मुकूलचे वडील कमिन्समधे सीनियर मॅनेजर, नंदनचा बंगला अन वडिलांची भोसरीत फॅक्टरी अन शिवा तसा गरीब! गरीब म्हणजे आर्थिकदृष्ट्या गरीब! पण एकेक रत्नं होती.

वामन पोरींच्या मागे लागायचा. हिंदी नट्या हा त्याचा सर्वात आवडता विषय होता. त्यावर तो पी.एच.डी. केल्याप्रमाणे तासनतास बोलू शकायचा. मुकूलकडे पैसे असायचे. त्यामुळे तो कॅन्टीनला हवे ते खायचा. इतरांनाही ऑफर करायचा. त्याबाबतीत एकदम दिलदार! मात्र कॉलेजमधली संगीता त्याला पहिल्या दिवसापासूनच भयानक आवडायची. ती दिसली की तो फुलासारखा उमलायचा. ती नाही दिसली तर त्याला आयुष्य बेकार आहे असे वाटू लागायचे. नंदन गर्भश्रीमंत होता. मात्र मुकूलसारखा दिलदार नव्हता. तो आपला स्वतःला हवे ते घ्यायचा अन खायचा. समोरच्याला विचारणे नाही, काही नाही. 'मी का विचारू? त्याला हवं असलं तर घेईल तोही' असा त्याचा सरळ मुद्दा होता. मात्र!

मात्र शिवा हे एक नंबरचं बेणं होतं! तो तालमीत जायचा. कमावलेलं शरीर होतं! प्रोफेसर्सच्या थट्टा करण्याची त्याला भयंकर खुमखुमी होती. लेडिज प्रोफेसर्सना मुद्दाम काहीतरी शंका विचारून हैराण करणे हा त्याचा आवडता उद्योग होता. त्याच्याकडे कायम भरपूर पैसे असायचे. मात्र तो कॅन्टीनमधले खायचा नाही. त्याचा डबा प्रचंड असायचा. तालमीत जात असल्यामुळे अन सायकलवरून कॉर्पोरेशनपासून येत असल्यामुळे त्याचा आहारही भलताच होता. कॅन्टीनच्या खाण्यात दम नसतो हे त्याचे आवडते मत होते. त्याने आपली सायकल एकदा परस्पर विकून टाकली होती. बापाला माहीतच नाही. कारण पिंपरीहून कॉर्पोरेशनपर्यंत बसने यायचा. तिथून सायकलने कॉलेजला. सायकल विकण्याचे कारण म्हणजे त्याला जीन्स विकत घ्यायची होती अन वडील नाही म्हणत होते. त्याने जीन्स विकत घेतली अन शाळेत झालेल्या कबड्डीच्या स्पर्धेत जिंकल्यामुळे मिळालेल्या पैशातून घेतली असे घरी सांगीतले. वडील बिचारे गरीब स्वभावाचे होते. पुढे कधीतरी आठवदाभराची सुट्टी लागल्यामुळे वडिलांनी सायकल घेऊन घरी येण्याचे फर्मान काढल्यावर हा म्हणाला सायकल सहा महिन्यांपुर्वीच चोरीला गेली. तुम्हाला वाईट वाटेल म्हणून सांगीतले नाही. मी चालत जातो कॉर्पोरेशनपासून कॉलेजला. वडिलांना वाइट वाटले. तक्रार केलीस का विचारल्यावर तो म्हणाला त्या भानगडीत पडणे चांगले नाही. वडिलांनी नवीन सायकल घेतली. आता जीन्सही होती अन सायकलही!

वामन, मुकूल, नंदन अन शिवा हे सगळे बारावी करून, तेथे इंजीनियरिंगला जाण्यासाठी आवश्यक असलेल्यापेक्षा मार्क्स कमी पडले म्हणून दोन वर्षे वाया घालवून डिप्लोमाला आलेले होते. महाविद्यालयीन जीवनात आधीच रुळलेले होते. आणि ते तिघेही 'आपल्याला जसे वागावेसे वाटते' तसे वागू शकतात या एकाच आकर्षणामुळे महेशला जवळचे झालेले होते. आजही मॅथ्सचा तास बुडवून सकाळी अकरालाच चौघेही कॅन्टीनला बसलेले होते. मुकूल डोसा खात होता. नंदनने वडा सांबार घेतलेले होते. शिवा डब्यातील काही भाग खात होता. वामन चहा पीत होता. आणि महेश...

आरामात बसून सगळ्यांकडे पाहात होता.

आणि आज'ही' कॅन्टीनमधे येण्याचे अत्यंत म्हणजे अत्यंत महत्वाचे कारण होते...

नटराजला राज कपूरचा... राम तेरी गंगा मैली आणि त्याचवेळेस..

अपोलो, मंगला आणि लक्ष्मीनारायणला ... जवळपास दोन दशकांनी डिम्पलचा सागर... साधारण एकाचवेळेस लागलेले होते..

क्लॅशेस महागात पडतील हे माहीत असूनही सिप्पी अन कपूर घराणी एकमेकांशी लढायला युद्धभूमीत आलेली होती...

आणि... भारतीय संस्कृतीत मुरलेल्या युवकवर्गाने मंदाकिनीच्या हॉट सीन्सना आपली दाद दिलेली असतानाच...

जाणकारांच्या दृष्टीने सागर हा चित्रपट एक महान चित्रपट ठरलेला होता...

वामन - डिम्पल ती डिम्पलच..
शिवा - सरळ आहे.. डिम्पल ती डिम्पलच असणार..
महेश - खी खी खी खी..
वामन - लेका कसली दिसते अजून..
शिवा - मंदाकिनी हिट जाणार पण...
मुकूल - संगीतासारखे डोळे आहेत तिचे..
नंदन - कुणाचे?
मुकूल - मंदाकिनी..
नंदन - लेका मंदाकिनी सारखे तिचे का तिच्यासारखे मंदाकिनीचे..
शिवा - जोक ऐकला का?
महेश - कुठला?
शिवा - जोशी मास्तरला विचारलं तुमची इच्छा काय तर म्हणे मंदाकिनीचं बाळ होण्याची..

नंदनच्या तोंडातले सांबार उडून महेशच्या शर्टवर सांडले.

हसण्याचा एवढा मोठा आवाज कॅन्टीनमधे इतक्या सकाळी आजवर झालेला नव्हता.

गल्यावरच्या काकाने डोळे वटारून पाहिले. त्याला अशी ताकीद होती की विद्यार्थ्यांनी नीट वागावे हे बघणे त्याचे काम आहे. अजून हासणे चालूच होते. विनू नावाचा वेटर टेबलपाशी उभा होता. त्याला जोक समजला नव्हता.

विनू - का?...
शिवा - काय का?
विनू - असं का वाटतं सरांना..
शिवा - काय माहिती तिच्यायला.. ते आले की विचार तूच...

मान हलवून विनू निघून गेला.

तेवढ्यात जोशी मास्तर आले. ते केमिस्ट्री शिकवायचे. वय पंचावन्न! अत्यंत गंभीर होते.

पोरे पटकन उठून पळून गेली. कारण विनू सरांच्या दिशेना जाताना त्यांना दिसला होता. आता बाहेरून खिडकीतून हळूच पोरे पाहू लागली. विनू सरांशी काहीतरी बोलत होता. सर भडकलेले होते. अत्यंत सात्विक भडकलेले होते. विनू हादरला होता. पोरे खिदळत परत गेली. सायकल स्टॅन्डमधे सगळे उभे होते.

महेश - आले की झापतील ते आता..
शिवा - कोण? जोशी मास्तर?
महेश - मग?
शिवा - वर्गात कोण जातंय आता?
महेश - म्हणजे?
शिवा - जुन्या बाजारात चाललोय आता मी...बुधवार आहे आज..
महेश - का?
शिवा - घड्याळ विकायचंय...
महेश - हे?
शिवा - हा!
महेश - का?
शिवा - बाप पैसे देत नाही.. सागर पाहायचाय..
महेश - म्हणून घड्याळ विकणार?
शिवा - का?
महेश - ओरडतील की वडिल?
शिवा - हाताला सुरीने ओरखडा काढून घेणार बारका.. सांगणार.. रस्त्यात चोरलं दोघांनी..

महेश थक्क झालेला होता.

मुकूल - सागर मलाही पाहायचाय..
नंदन - जायचं का आत्ता..
मुकूल - कोणते पिरियड्स आहेत?
नंदन - मेन्टेनन्स अन ड्रॉईंग..
शिवा - काशीत गेलं ड्रॉईंग ... चला..
नंदन - चला..
महेश - मी नाही येणार...
मुकूल - का?
महेश - अंहं!
शिवा - का रे?
मुकूल - मी काढतो तिकीट..
महेश - नको..
शिवा - हे यडंय..
नंदन - घाबरतोय..
महेश - तसं नाही.. पण.... बाबांना कळलं तर..
शिवा - अरे कोण सांगतंय..

महेश गेलाच नाही. दुसर्‍या दिवशी सागरची इथ्यंभूत कहाणी तिघांकडून कॅन्टीनमधे ऐकताना त्याने कानात प्राण गोळा केले होते. कमल हासनने जान ओतली आहे. ऋषी कपूर फिका पडला आहे. सत्तर एम एम वर बघण्याची मजाच काही और! डिम्पलची नुसती एन्ट्रीच भारी आहे. पुढे तर काय नुसती धमालच! छोट्या किसचे ३६५ तर दीर्घ किसचे ६८ रिटेक्स झाले होते म्हणे! पण कपाळावरच्या आठ्या दिसतात. कमल हासनचे काम बघताना रडू येते. 'मोना' आपल्याला मिळणार नसून ऋषी कपूरला मिळणार आहे हे त्याला कळते तेव्हा तो मागच्यामागे कोसळतो ते पाहून मुकूल तर रडलाच! सगळ्यात भारी गाणे 'बस यही प्यार है' वाटते, वगैरे वगैरे!

'सागर' हा चित्रपट बघण्याची तीव्र इच्छा मनात निर्माण झाली. त्याच नशेत महेश घरी आला.

सागर या विषयावरून खूप चर्चा झाली त्याची अन श्रीची! पिक्चर पाहणे वाईट असते. हे वय नाही चित्रपट पाहण्याच! अभ्यासातले लक्ष जाते. एकदा मोठे झाल्यावर मग मजाच मजा आहे. हे असले पिक्चर वर्षभरात टी.व्ही. वर येतात. तेव्हा पाहायला मिळतील. चित्रपटाचे व्यसन लागू शकते. आमच्यावेळेस तर हिम्मतच नव्हती वडिलांना विचारण्याची. तुझी अभ्यासातली प्रगती कमी पडतीय अन तू पिक्चरच्या मागे लागतोयस! आपल्याला एवढं परवडत नाही.

हजार कारणे सांगीतली श्रीने! गट्टू निराश झाला. खरे तर संतापला. आजवर श्रीने स्वतःहून त्याला एकही पिक्चर दाखवलेला नव्हता. जे काय दाखवले ते तारामावशीने किंवा मग वाड्यातले कुणी घेऊन गेले तर! एकाही पिक्चरचे पैसे श्रीला द्यायला लागले नव्हते. खरे तर आजवर गट्टूने पिक्चरच मुळी आठ, नऊ पाहिले असावेत. त्यात आन मिलो सजना, शोले, अमर अकबर अ‍ॅन्थनी, जंजीर, आराधना, शक आणि मुकद्दर का सिकंदर हे होते.

वडिलांवर चिडलेल्या गट्टूने अभ्यासाला सुरुवात केली. अभ्यास कर म्हणताय ना? मग फक्त अभ्यासच करतो. काहीच बाकीचे करणार नाही अन तुमच्याशी बोलणारही नाही.

श्रीचे त्याच्याकडे लक्षच नव्हते. त्याच्या दृष्टीने त्याने मुलावर चांगले संस्कार केले होते. अगदीच पैसे नव्हते असे नाही. पण श्रीचा या गोष्टींना आत्ता विरोध होता. मुलाने नोकरीला लागल्यावर हवी तेवढी मजा करावी असे त्याला वाटायचे. त्याचे कारण होते. महेश कॉलेजला गेल्यापासून त्याचे खर्च अमाप वाढलेले होते. डिप्लोमाला ड्राफ्टर, ड्रॉइंग पेपर्स, जॉमेट्रीची साधने, कॉलेज बॅग, टिफीन, कपडे, शूज हे सगळेच घ्यावे लागले होते. पुस्तकांच्या किंमती बर्‍याच होत्या. त्यात कॉलेजने अनेक गोष्टी खरेदी करायला लावल्या होत्या. डिप्लोमाला दर दोन महिन्यांनी चाचणी परिक्षा अन दोन चाचण्यांनंतर एक सेमिस्टर परिक्षा असे तुडुंब भरलेले शेड्युल होते. अशा सगळ्या ताणतणावाच्या परिस्थितीत इतरत्र लक्ष देणे हे श्रीला वावगे वाटत होते. खरे तर इतका विचारही त्याने केला नव्हता. तो उगीचच 'पिक्चर नाही बघायचा' असे म्हणाला होता.

सागर फारच गाजला. ज्याच्या त्याच्या तोंडी तेच नाव येऊ लागले. सर्वत्र तीच गाणी! पेपर मधे त्यावरच चर्चा! वाड्यातील सर्व मुला मुलींनी सागर पाहिला. अगदी नैनानेही पाहिला.

मात्र... गट्टूने अजूनही सागर पाहिला नव्हता.

एक दिवस सगळी मोठी माणसे मानेकाकांच्या मागे लागली. कशावरून तरी कसलि तरी पैज लागली होती अन मानेकाका ती हारले. दुसर्‍या दिवशी गट्टूची परिक्षा होती. सर्व लोकांना, वाड्यातील जवळपास आठ मोठ्या माणसांना मानेकाका सागर पाहायला घेऊन गेले.

गट्टूने विचारले - मी येऊ का?

श्रीने 'उद्या परिक्षा आहे' असे सांगून टाळले. श्री स्वतःही जाऊन आला.

दुसर्‍या दिवशी संध्याकाळी परिक्षेहून गट्टू अन ऑफीसमधून श्री आल्यावर निरागसपणे गट्टूने विचारले.

गट्टू - बाबा? पिक्चर कसाय?
श्री - अरे! एकदम मस्तय! ती कोण रे काम करणारी??
गट्टू - डिम्पल..
श्री - हां! बॉबीत होती ती.. त्या ह्याचं काम एकदम मस्त झालंय..
गट्टू - कमल हासनचं...
श्री - हां! कमल हासन... मस्त पिक्चर आहे...

'पिक्चर मस्त आहे' यापुढे 'परिक्षा संपली की तुला दाखवेन' हे वाक्य काही येत नव्हते.

कॉलेजमधल्या ग्रूपने आत्तापर्यंत तीन तीन वेळा सागर बघितला होता. वडिलांनी पाहिला होता. वाड्यातील प्रत्येकाने, अगदी लहान मुलानेही पाहिला होता. इतकेच काय पण मानेकाकांनी बोलावल्यामुळे आज्जीनेही सागर पाहिला होता. परवा तारामावशीचा सुमेध फोनवर म्हणाला की त्यानेही पाहिला आहे.

फक्त.... मी सागर पाहिलेला नाही.... फक्त मी!

एक मोठी अढी मनात तयार झाली महेशच्या! आज त्याने बाबांशी भांडणच केले. सतत परिक्षा, प्रॅक्टिकल्स आणि काही ना काही असल्यामुळे पुन्हा श्री नाही म्हणाला. परिणाम व्हायचा तोच झाला.

गट्टूने श्री घरात नसताना काडेपेटी घेऊन स्वतःच्या डाव्या मनगटावर चटका लावून घेतला. काहीही बोलला नाही.

संध्याकाळी जेवताना श्रीने पाहिले.

श्री - हे काय झाले रे?

इतका वेळ याच प्रश्नाची वाट पाहणार्‍या महेशला तो प्रश्न विचारल्यावर मात्र भरल्या ताटावर रडू फुटले.

तो ओरडून म्हणाला..

" का पाहू देत नाही मला पिक्चर? का नाही पाहू देत? नैनाने पाहिला, समीरदादाने पाहिला, राजश्रीताईने पाहिला, सुमेधने पाहिला, वर्गातल्या सगळ्यांनी पाहिला, आज्जीने पाहिला, मानेआजोबांनी पाहिला. प्रमिला काकूने पाहिला... आणि... तुम्ही स्वतः पाहिलात.. मला का पाहू देत नाही? बाकीच्या मुलांना अभ्यास नाहीये का? मला एकट्याला परिक्षा असतात का? एकही पिक्चर दाखवत नाही तुम्ही! सगळे किती वेळा पिक्चरला जातात.. मलाच का एकट्याला त्रास?"

खूप वेळ वैतागून ओरडून बोलत होता महेश! श्रीने मान खाली घातली होती. महेश झोपल्यानंतर श्रीने त्याला हळूवार आवाजात सांगीतले.

"उद्या पिक्चर पाहून ये हं? समीरदादाला बरोबर घेऊन जा.. "

"काही नको" म्हणून महेशने हात झिडकारला.

आज श्रीला खरोखच वाईट वाटले होते. आपणही पिक्चर पाहिलेला आहे आणि याला नाही म्हणत आहोत हे चुकीचे आहे हे त्याला समजत होते. पण ते अनवधानाने झालेले होते. मात्र या अनवधानाने झालेल्या गोष्टीचे काय परिणाम होऊ शकतील याची त्याला कल्पना नव्हती. तो आपला हात झिडकारलेला जात असतानाही महेशच्या मनगटाला बर्नॉल लावत होता आणि मनातच आक्रंदत होता.

दुसर्‍या दिवशी पहाटे नेहमीप्रमाणे श्री उठला. आज का कुणास ठाऊक दूधवाला आलेला नसल्याने तो स्वतःच दुधाची पिशवी आणायला बाहेर पडला. महेश जागा होता. श्री बाहेर पडल्या पडल्या त्याने श्रीच्या तारेवर लटकवलेल्या खिशात हात घातला. त्याला हवे होते फक्त साडे पाच रुपये! ज्यात एक तिकीट येईल अन मध्यंतरात एक समोसा खाता येईल इतके! पण हातात आले नऊ रुपये! क्षणभरच त्याने मनाशी विचार केला. पैसे घ्यायचे आहेत तर.. हातात आलेत तेवढे घेऊयात!

वाडिया कॉलेजमधे आज प्रवेश करताना कॉलेजमधील सर्वात आनंदी मुलगा होता तो!

वर्गात गेला तो मॅथ्सचा पिरियड पाहून अन ग्रूपमधले कुणीच वर्गात नाही हे पाहून तडक कॅन्टीनलाच आला. साडे तीन रुपये अधिक होते जरूरीपेक्षा! दोन रुपयांचा एक साधा डोसा घेतला तर दिड रुपया उरेल अन तीनच चहा मागवता येतील चारजणांमध्ये! त्यापेक्षा दिड रुपयांचा एक वडा पाव घ्यावा अन चार चहा घ्यावेत अन ग्रूपला चकीत अन आनंदी करून टाकावे या हेतूने त्याने स्टायलिशपणे ऑर्डर दिली. सगळे बघतच राहिले. नाही म्हंटले तरी हा चहा पाजतोय म्हंटल्यावर त्याच्याबद्दल जरा आदर निर्माण झालाच!

शिवा - वाढदिवस का?
महेश - अंहं!
मुकूल - मग पेटलायस का एवढा?
महेश - कुठे पेटलोय?
नंदन - मग आल्या आल्या चहा वगैरे?
महेश - घ्यावासा वाटतोय..
वामन - हां राव! मलाही घ्यावासा वाटतोय.. जरा पावसात बरं असतं हय ना?
नंदन - हं!
शिवा - पावसात ससा खायचा ससा..
मुकूल - ससा?

शिवा ससा कसा खातात त्याचे वर्णन करू लागला. म्हणे सशाच्या डोक्यावर मुष्टिप्रहार केला की तो बिचारा मरतो. फार त्रास पडत नाही ससा मारायला. ससा पकडण्यासाठी पिंजरे असतात. त्यात ससा आपोआप जातो. मारलेला ससा सोलायचा त्यात मसाला भरायचा. इतर प्राण्यांप्रमाणे जमीनीच्यावर ससा शिजवायचा नाही. तर मसाला भरलेला ससा जमीनीच्या आत खड्यात ठेवायचा. वरून काय काय, काय काय लावायचं ! अन मग म्हणे त्याच्यावर जाळ करायचा. ही ससा भाजण्याची पद्धत आहे.

ही पद्धत सांगेपर्यंत अन त्यावरच्या शंकांचे निरसन होईपर्यंत अन मी ससा किती वेळा खाल्ला आहे हे सांगून सगळ्यांना चकीत करेपर्यंत महेशने स्वतःसाठी मागवलेला वडापाव अन सगळ्यांचा चहा संपलेलाही होता.

एक भक्क पोकळी निर्माण झाली महेशच्या मनात! काय केलं आपण? काय केलं काय आपण एवढ्या पैशांचं? आता डबा खायचीही भूक उरलेली नाही आहे. वडा पाव खाऊन संपवायला दोन मिनिटे लागली केवळ! सगळ्यांचा चहा संपायला तेवढीच! एकही जण म्हणाला नाही की 'आज महेशने चहा पाजला'! काहीही कौतूक नाही. मग यांच्यासाठी कशाला आपण खर्च केला? फुकट गेले आपले पैसे!

तरीही सगळ्यांबरोबर चालत चालत सायकल स्टॅन्डला आला. सगळे आता अ‍ॅप मेक च्या पिरियडला बसणार होते. कारण हा एक विषय बर्‍यापैकी डोक्यावरून चाललेला होता सगळ्यांच्या!

मात्र! महेश गेलाच नाही. 'मला आज एका लांबच्या काकांकडे असलेल्या फन्क्शनला जायचं आहे' असं सांगून सायकल गेहून बाहेर पडला तो तडक ... अपोलो!

साडे पाच रुपयांपैकी चारच रुपयांचे, खालचे तिकीट काढले. बाल्कनीचे पाच रुपयांचे होते. यात एक स्वार्थ होता. आता दिड रुपया उरणार होता आणि कदाचित एका समोश्यापेक्षा अधिक काहीतरी खाता येणार होतं! आधी त्याने जवळचा डबा रस्त्यातील एका भिकार्‍याच्या ताटात उपडा केला.

आपल्या वडिलांनी स्वतःच्या हाताने बनवलेली पोळी भाजी अशी देऊन टाकताना त्या मागील कष्टांची जाणीव त्याला झाली नाही. भिकारी आनंदला. तोही आनंदला. सत्पात्री दान केल्याचे भाव चेहर्‍यावर आणून थियेटरमधे घुसला. आता मात्र बावरला. सगळीच मोठी मोठी माणसे होती. बरेचजण सिगारेट ओढत होते. एकटाच एवढासा मुलगा, तेही कॉलेजची बॅग वगैरे पाहून निरखून पाहात होते.

यातला एखादा जण बाबांच्या कंपनीतील कामगार वगैरे असला तर? आपल्याला ओळखत असला तर?

महेश पटकन एका अंधार्‍या कोपर्‍यात जाऊन उभा राहिला. जवळपास सगळेच आत गेलेले पाहिल्यावर मग बिचकत बिचकत आत गेला.

आयुष्यात पहिल्यांदाच त्याने स्वतःचे तिकीट बॅटरीवाल्याला स्वतः दाखवून स्वतःची जागा विचारली होती. कोण ते समाधान!

उजव्या बाजूला कुणीतरी अत्यंत जाड माणूस होता. डावीकडे एक तरुण मुलगा होता. महेशपेक्षा बराच मोठा होता. आपल्याला कुणीही ओळखलेले नाही आहे याचे हायसे वाटेपर्यंतच...

पडद्यावर अरबी समुद्राचे विशाल दर्शन झाले. डिम्पलची एन्ट्री, कमल हासनचा लाजवाब अभिनय, लाजवाब गाणी अन स्टोरी!

नुसता खिळून बसला होता महेश! मध्यंतरात आणखीनच भीती वाटू लागली. तरीही बिचकत बिचकत एक गार झालेला समोसा अन एक चहा एवढे त्याने घेतलेच! आता आठ आणे उरलेले होते खिशात! उरलेला पिक्चर पाहताना कमल हासनचा अभिनय पाहून महेश अवाक झालेला होता. आता डिम्पल ही त्याच्या दृष्टीने सौंदर्याचा अंतीम शब्द ठरलेली होती.

नशेतच बाहेर पडला अन सायकल घेऊन ती पिटाळत घरी पोचताना त्याच्या मनावर प्रचंड भीतीचे सावत होते. बाबांना कळले असेल का? पैसे आपण घेतले हे?

चाचरत चाचरत, मात्र काही माहीतच नाही असा चेहरा करून घरात प्रवेश केला. श्री पोळ्या करत होता.

श्री - काय रे? आज उशीर?

रोज पिरियड बंक करत असल्याने तीन, चार वाजेपर्यंतच स्वारी घरी यायची. ऑफ पिरियड होता, माझा वर्कशॉपचा जॉब झालेला आहे म्हणून आलो वगैरे सांगायचा. आज एकदम पावणे सात?

महेश - प्रॅक्टिकल होतं!

श्रीचा चेहरा शांत होता. चोरी झाल्याचे लक्षातच आले नाही की काय?

श्री - चहा करू का?
महेश - नको..

आज त्याला पहिल्यांदाच लाज वाटली. आपण बाबांना आजवर एकदाही चहा विचारला नाही. आपल्याला चहा करताही येत नाही. आणि उलट आपण चोरी मात्र करतो.

श्री - तुझ्यासाठी एक गुड न्युज आहे.
महेश - काय
श्री - आज सकाळी मी अपोलोला अ‍ॅडव्हान्स बुकींग केलंय.. तू आणि समीर सागर पाहायला जा..

पायाखालची वाळू सरकणे म्हणजे काय याचा अनुभव आला महेशला. श्री आता त्याला गट्टू म्हणत नव्हता. महेशच म्हणायचा. पोरगा मोठा झाला होता.

आज सकाळी? आपण तीन ते सहा तिथेच होतो. बाबा दुपारी आले असते तर? अ‍ॅडव्हान्स बुकींग करण्याची वेळ दुपारची असती तर? आपण मॅटिनीला गेलेलो असतो तर?

खिळल्यासारखा श्रीकडे पाठ करून खिडकीतून बाहेर बघत बसला होता महेश!

श्री - काय रे? अजून रागावलायस? खरच काढलीयत रे तिकीटं!
महेश - कशाला उगाच काढलीत?
श्री - म्हणजे काय?
महेश - पाहिला असता कधीतरी...

हे तीन शब्द तोंडातून बाहेर काढताना त्याला असह्य दु:ख झाले.

श्री - चल.. लवक जेवून घे.. आठ वाजताच निघा.. जायला वेळही लागेल.. समीरला सांगीतलंय मी..

महेश जेवायला बसला. एक एक घास घशातून आत ढकलताना मधेच बाबांकडे पाहात होता.

नऊ रुपये गेले तरी यांना कळले कसे नाही?

एकाच दिवसात महेशने लागोपाठ दोन वेळा 'सागर' बघितला.

आणि समीरच्या लुनावरून परत घर येताना त्याला आणखीन एक धक्का बसला.

समीरने 'घरी कुणालाही बोलू नकोस हां' असे म्हणून एक सिगरेट घेतलीअन बिनदिक्क पेटवली.

महेश - वास नाही येत?
समीर - बडिशोप खायची.
महेश - अन पैसे?
समीर - वाचवायचे पॉकेटमनीतून..
महेश - किती मिळतो पॉकेटमनी..
समीर - पेट्रोलसाठी महिना शंभर आणि बाकीचे शंभर.. दोनशे..

महेश विचार करू लागला. पॉकेटमनी आपल्याला का नसावा. आपण आता स्वतंत्ररीत्या कॉलेजला इतक्या लांब जातो. वाटेत काही लागले तर? कुणाकडे मागायचे पैसे?

मात्र! एक गोष्ट नक्की समजली होती. ती म्हणजे बाबांना कळलेच नाहीये आपण पैसे घेतल्याचे किंवा मुळातच पैसे चोरीला गेल्याचे! याबद्दल वाटेत दिसेल त्या देवाला नमस्कार करत तो समीरच्या मागे बसून घरी आला.

दुसरी मुले इतक्या वेळा पिक्चर कशी पाहतात? कॅन्टीनमधे कशी खाऊ शकतात? पॉकेटमनी कसा काय मिळतो? आपल्याला काहीच का नाही? अशा प्रश्नांचे थर मनावर अधिक वारंवारतेने बसायला लागलेले होते.

त्यातच रिझल्ट लागला. दोन विषयांना ए.टी.के.टी. मिळाली. दुसर्‍या सेमिस्टरला जाणे शक्य होते! मात्र हे दोन्ही विषय लाल रंगाच्या रेघा घेऊन मार्कशीटवर विलसलेले होते.

महेश श्रीनिवास पेंढारकर??? नापास???

तोंडही दाखवावेसे वाटत नव्हते कुणाला! आपण नापास? ए.टी.के.टी. असली म्हणून काय झाले? नापासच की! आता मार्कशीट कशी दाखवणार बाबांना?

परिक्षा झालीय, सुट्टी संपलीय, पुन्हा पुढची सेमिस्टर सुरू होऊन पंधरा दिवस झालेले आहेत.

अजून महेश असे कसे म्हणतो की रिझल्ट लागलेला नाही?

श्री काळजीत होता. त्याला फार फार दूरची शंका येत होती. आपला मुलगा... खोटे तर बोलत नसेल?

त्यातच कंपनीतील सुजाता मॅडमने सांगीतले.. रिझल्ट तर केव्हाच लागलाय की???

तिचा मुलगा इलेक्ट्रिकलला होता. फर्स्ट इयरलाच!

ते ऐकून श्री दुपारीच अर्धी रजा टाकून सरळ कॉलेजला गेला. जोशी सरांना भेटला.

आणि निराश होऊन घरी आला. महेश कॉलेजमधे नव्हताच. पण तो आला मात्र श्रीच्या नंतर! त्याला काहीच कल्पना नव्हती.

श्री -महेश? .. जरा इथे बस..

महेशला कल्पना आली. काही ना काही गंभीर बाब असल्याशिवाय बाबांचा स्वर असा होणार नाही. पण 'बाबा फारच पुढे पोचले असतील' असे त्याला अजिबात वाटत नव्हते.

महेश - ... काय?
श्री - रिझल्ट लागला?
महेश - ... .. नाही..
श्री - कधी आहे रिझल्ट?
महेश - ... माहीत नाही.. एखादेवेळेस.. दोन्ही सेमिस्टर्सचा.. एकदमच..
श्री - खरं बोलतोयंस?
महेश - ...

महेशला समजून चुकलं! बाबंना खरे काय ते माहीत आहे. आपण खोट बोलतोय हे त्यांना कसं का होईना, पण समजलेलं आहे. आता लपवण्यात अर्थच नहता.

महेश - खरं म्हणजे.. लागलावता रिझल्ट
श्री - कधी?
महेश - गेल्याच महिन्यात..
श्री - मग?
महेश - खूप कमी मार्क्स होते म्हणून... दाखवला नाही तुम्हाला..
श्री - .. मार्कशीट कुठंय..
महेश - ..... फा.. फाडून .. फेकून दिली...

तब्बल पाच मिनीटे श्री स्वतःची कामे करत होता. महेश खाली मान घालून त्याच जागी बसला होता.

आपल्यावर संस्कार काय, आपण वागलो काय, आपण वागतोय काय! बाबांना किती म्हणजे किती मनस्ताप होत असेल... महेशला आत्ता अक्षरशः बाबांचे पाय धरून रडून त्यांची माफी मागावीशी वाटत होती. पण श्रीने धारण केलेला अबोला त्याच्या रागावण्याहून अधिक बोचरा होता.

महेश - बाबा...
श्री - ...
महेश - बाबा.. मी.. चुकलो..
श्री - एवढंच?
महेश - .....
श्री - मुलाची चप्पल जेव्हा बापाच्या पायाला लागते ना महेश.. तेव्हा बाप आणि मुलगा मित्र होतात..
महेश - ...
श्री - जेवायला बस...
महेश - .... नको...
श्री - जेवणावर राग काढू नकोस.. मी कॉलेजला गेलो होतो... ही घे तुझ्या मार्कशीटची कॉपी..

महेश आता भयानकच हादरला.

महेश - ... कुणाला.. भे..टलात??
श्री - जोशी सर... ते म्हणाले तू खूप तासांना बसतच नाहीस..
महेश - ...
श्री - होय ना?
महेश - .. तसं.. काही नाही..
श्री - ठीक आहे.. माझा तुझ्यावर विश्वास आहे... उद्यापासून बसत जा प्रत्येक तासाला..
महेश - ...

मारणं, ओरडणं दूरच! साधा आवाज वाढवणंही नाही.

पश्चात्तापात जळत होता महेश रात्रभर! जागा तर श्रीपण होता. पण तसं दाखवत नव्हता.

महिना गेला! तीव्रता कमी झाली. अभ्यास जरी थोडासा वाढवला असला तरीही तासांना न बसणे, मित्रांबरोबर कॅन्टीनला गप्पा ठोकणे... आणि मुख्य म्हणजे... जमेल तेव्हा किरकोळ रुपाया, दिड रुपाया उचलण्याचा नाद लागलेला होता गट्टूला..

आता तो आठवड्यातून एखादा पिक्चर बघत होता. सकाळी बाबांच्या आधी तोच पेपर वाचायला घ्यायचा. पिक्चरच्या सगळ्या जाहिराती डोळ्यांखालून घालायचा.

सुपरस्टार अमिताभ बच्चनचा सुपरहिट पिक्चर

धरम हेमा यांचा हिट पिक्चर

सुरुवात चुकवू नका - शेवट सांगू नका

त्रिशुल - अमिताभ संजीवकुमार महानायकांची जुगलबंदी

झीनूची गरम अदाकारी

जंगली शम्मीकपूरचा धुमाकूळ..

वगैरे वगैरे!

आता एक वेगळाच इंटरेस्ट डेव्हलप होऊ लागला होता.

आलतू फालतू डायलॉगबाजी अन लैला-मजनू टाईप पिक्चरच्या जाहिरातींऐवजी आता...

रात की कहानी... शादी के बाद.. सेक्सी पडोसन.. असली नावे आकर्षून घ्यायला लागली होती.

अशा पिक्चरला जावं का आपण? की नको? बघावेसे तर वाटतायत. कसली पोस्टर्स असतात एकेक! काय दाखवत असतील? पण कुणाला सांगायला नको.

इकडे श्रीच्या मनात वादळे सुरू झाली होती. आपला मुलगा आपल्याशी एवढं मोठं खोटं बोलला. जात असेल ना कॉलेजला? कसं लक्ष ठेवणार? रोज थोडीच पाळत ठेवता येते?

तरी श्री कधी तो घरी नसताना त्याची बॅग तपास, वहीत काय काय लिहीलंय आणि त्याच्या तारखा काय काय आहेत ते तपास असं करतच होता. महेश फार काळजीपुर्वक वागत होता. मुळात बॅगेत तपास्न काही सुगावा लागण्यासारखे नव्हतेच. पिक्चरला गेला तरी जाणीवपुर्वक तिकीटाचा अर्धा भाग अगदी तुकडे तुकडे करून रस्त्यावर टाकून मगच घरी येत होता.

नाही म्हंटले तरी थोडासा असंतोष निर्माण झालेलाच होता घरामधे!

त्यातच नैना दिवसेंदिवस अधिकाच सुंदर दिसू लागली होती. महेशचे अर्धे लक्ष तिच्यात अन अर्धे पिक्चर कसा बघता येईल अन कॅन्टीनमधे खायला पैसे कसे मिळतील यात होते.

त्याला नाद लागला होता कॅन्टीनमधे खायचा. आता मित्रांना खायला दिले तर ते आपल्याला त्यांची वेळ येईल तेव्हा देतीलच याची खात्री नसल्यामुळे तो कुणाचे लक्ष नाही असे पाहून एकटाच कॅन्टीनला जाऊन काहीतरी खाऊन यायचा. सायकलींग भरपूर होत असल्यामुळे डबाही खाल्ला जायचा अन कॅन्टीनमधलेही!

अचानक मुकूल सिन्सियर झाला होता. फर्स्ट इयरची पहिली वार्षिक परिक्षा आलेली होती. तिकडे नैनाची दहावीची परिक्षा झलेली होती.

जून महिन्यात एकदा परिक्षा झाली की ऑगस्ट महिन्यात सिंहगडची ट्रीप ठरलेली होती.

या परिक्षेच्या वेळी महेशने केवळ आदला रात्री जमेल तितका अभ्यास केला. त्यातही त्याला मॅथ्स आणि अ‍ॅप मेक सोडले तर सगळे पेपर तसे बरे गेले. तोंडी परिक्षेला प्रॉब्लेम हाच झाला की अनियमीतपणे दिसनारा विद्यार्थी असल्याने शिक्षकांचे मत फारसे चांगले नव्हते. त्यामुळे ते त्याची खेच होते. पण तरी बरी झाली परिक्षा! ड्रॉइंग्ज सबमिट झालेलीच होती कशीबशी! वर्कशॉपचे स्मिदीचे अन कारपेंटरीचे जॉब्ज काही सबमिट होत नव्हते. त्यातल्या त्यात स्मिदीच्या मास्तरांनी कसाबसा तो जॉब मान्य केला अन सही केली. आता परिक्षा झाली अन सबमिशन राहिले अशी परिस्थिती आलेली होती. कारपेंटरीचे सर काही केल्या महेशने केलेला जॉब स्वीकारेनात. त्यात अनेक त्रुटी होत्या.

शेवटी महेशने एक बोल्ड स्टेप घेतली. स्वतःच एका कागदावर जॉबचे चित्र काढून डायमेन्शन्स दिल्या अन चक्क घराजवळच्या एका सुताराकडे गेला. त्याने सहा रुपये सांगीतले. सहा रुपये कुठून आणणार? आजीच्या घरात जाऊन तिचे लक्ष नसताना एक दहा रुपयाची नोट उडवली अन सुताराला सहा रुपये दिले. बाबांनाच कळत नाही तर आजीला काय कळणार असा त्याचा विचार होता. आणि तो खराही ठरला.

दुसर्‍याच दिवशी कॉलेजमधे ते अचूक झालेले जॉब्ज आरामात सबमिट झाले. मास्तराने दिलखुलास कौतूक केले सिन्सिअरिटीचे महेशच्या! सुंदर, सुबक जॉब्ज झालेले आहेत म्हणाला.

आता सगळाच ताण गेलेला होता.

एखाद्याच्या घरात जाऊन त्याचे लक्ष नसताना पाच, दहा रुपये किंवा मिळतील ती नाणी खिशात टाकणे याची सुरुवात झालेली होती. या पैशांचा विनियोग मग हॉटेलमधे जाऊन खाण्यात किंवा पिक्चर बघण्यात व्हायचा. मात्र त्या दिवशी त्याने 'प्यासा बदन' या चित्रपटाची केसरीत आलेली जाहिरात पाहिली अन त्याच्या डोक्यातून तो विषय काही जाईना!

विजयानंद! हे थियेटर कुठे आहे हेही त्याला नीटसे माहीत नव्हते. विचारत विचारत जाऊयात असा त्याने मनाशीच विचार केला. श्री ऑफिसमधे, आजी घरात, काकू घरात! विचारणार कोण? मित्राकडे चाललोय सांगून सकाळी साडे नऊलाच बाहेर पडूयात असा त्याचा प्लॅन होता. कारण पिक्चर साडे दहालाच होता.

पण प्रश्न हा होता की तो प्रौढांसाठी असलेला पिक्चर होता. तिकीत घेऊन बसायचो अन आपल्याला सोडले नाही तर पैसे तर जायचेच उलट कुणीतरी कसलीतरी चौकशी करायचे! काळजीच पडली होती सकाळपासून!

सहा वाजता उठल्यापासून श्रीच्या हालचालींकडे त्याचे सतत लक्ष होते. साडे सहा वाजता ब्रेड आणण्यासाठि श्री 'आलोच रे' म्हणून बाहेर पडला.. आणि...

बाबांच्या खिशातील काळे पेन घेऊन ओठांवर पुसटश्या मिश्या काढाव्यात या विचाराने तो शर्टकडे धावला..

तेवढ्यात.. सावली पडल्यासारखे वाटले.. हात खिशात तसाच ठेवून त्याने मागे पाहिले...

आणि काळजाचे पाणी पाणी झाले त्याच्या...

श्रीनिवास पेंढारकर - एक बाप... दारात उभा होता..

अत्यंत! अत्यंत गंभीर नजरानजर होती ती! दोघांनाही केवळ नजरेतूनच समजले होते.. एकमेकांना काय म्हणायचे आहे ते..

श्री - ... काय हवं होतं????
महेश - ... प.. हे पेन..
श्री - .... की?? ते पाच रुपये?? माझ्या खिशातले??
महेश - काहीतरी काय बोलताय??
श्री - आजचं नाही बोलत आहे मी.. तू अपोलोला दुपारी सागर पाहिलास म्हणून मी रात्रीची पण तिकीटे काढली तेव्हापासूनचं बोलतोय...

इथल्या इथे आपण नष्ट व्हावं असं वाटत होत महेशला!

श्री - गट्टू..

कित्येक... कित्येक महिन्यांनी ती हाक मारली होती बाबांनी.. खळ्ळकन पाणीच आलं डोळ्यांमधून.. वर पाहतो तर.. बाबांच्याही डोळ्यांमधून!

श्री - ... तुझी आई असती तर.. कदाचित .. तू असा झालाच नसतास.. ऐकायचंय का ते? कारण आई चोवीस तास घरात असती. तू काय करतोयस, काय खातोयस, कुठे जातोयस.. सगळं सगळं तिने पाहिलं असतं! तुला आई नाहीये! दुर्दैवाने! मला होती. पण तुला नाहीये! त्यामुळे.. त्यामुळे मी तुझा बाप असूनही.. शक्य तितक्या वेळा आई झालो गट्टू.. शक्य तितक्या वेळा.. पण.. पण काय करणार? आईचं हृदय कुठून आणणार? नोकरी तर केलीच पाहिजे. तुला शिकवलं तर पाहिजेच! जितकं मला जमेल तितकं अन जितकं तू शिकशील तितकं! जमेल तेवढा पैसा शिक्षणाला घातलाच पाहिजे. डोनेशन दिले पाहिजे. फिया भरल्या पाहिजेत. म्हणशील त्या वस्तू, पुस्तके आणलीच पाहिजेत. स्वैपाक केला पाहिजे. डबा दिला पाहिजे तुला. कपडे आणले पाहिजेत. मित्रासारखं वागवलं पाहिजे. पण... पण आईचं हृदय कसं आणता येईल मला?? मी तर एक बाप! तुझ्याशी फार तर गप्पा मारेन! याहून जास्त काय करणार? लक्ष कसं ठेवणार कामावर असताना? रोज रजा काढून तुझ्यामागे कसा फिरणार? तू काय काय करतोस ते बघायला? त्यामुळे मग मी कमी पडतो रे! आई व्हायचा प्रयत्न करत असताना कदाचित बाप म्हणूनही कमी पडत असेन. त्यासाठी मला माफ कर! काही भाग तुझा तुलाच सावरायला हवा. आपल्याला आई नाही.. तर आपण नीट वागायला हवे. चोरी करायला नको..

'चोरी करायला नको' हे शब्द ऐकल्यावर महेश धावत 'बाबा' असे ओरडत जाऊन श्रीला बिलगला. आता श्रीमधला बाप, खराखुरा बाप जागा झाला. त्याने आतून दार लावून घेतले.. अन..

हाताशी आलेल्या मुलाच्या खाडकन कानाखाली आवाज काढला.. किती वर्षांच्या? सोळा - सतरा!

दम लागेस्तोवर श्री त्याच्या पाठीत धपाटे घालत होता. चांगली शिक्षा मिळत होती महेशला! पण मारून झाल्यावर श्रीने रडत रडत त्याला जवळ घेतले.

श्री - का र? का असा वागतोस? काय कमी आहे तुला? का पैसे घेतोस..
महेश - चूक झाली माझी... नाही करणार असं पुन्हा...

प्रसंग पार पडल्यापासून जवळपास आठवडाभार श्री गंभीरच होता घरात. महेश त्याला येन केन प्रकारेण बोलायला भाग पाडत होता. सतत पुढच्या वर्षाच्या पुस्तकांचा अभ्यास करायचा प्रयत्न करत होता. खेळायलाही जात नव्हता. आठवड्याभराने श्री ताळ्यावर आला. पुर्वीसारखा वागू लागला. या कानाचे त्या कानाला कळू दिले नव्हते. मात्र श्रीला मनात धाकधुक मात्र होती. महेश असाच इतर तर कुठे वागलेला नसेल ना?

काही दिवसांनी रिझल्ट लागला. दोन विषय राहिले होते. सेमिस्टर पद्धत होती. ए.टी.के.टी वर पुढच्या वर्षात जाता आले.

सुट्टी चालूच होती. अचानक शुक्रवारी सकाळी मुकून अन नंदन घरी आले. श्री निघायच्या आधी! महेशशी काहीतरी बोलून निघून गेले. महेश तिरक्या नजरेने बाबांच्या हालचालींकडे पाहात होता.

श्री - काय रे? आत्ता का आले होते?
महेश - .. ते.. ट्रेकला जायचंय म्हणतायत..
श्री - ट्रेकला म्हणजे?
महेश - सिंहगड..
श्री - कधी?
महेश - उद्या..
श्री - कुणाबरोबर?
महेश - आम्हीच... मुलं मुलं..
श्री - अन येणार?
महेश - परवा..
श्री - परवा? राहणार कुठे?
महेश - गडावरच...
श्री - गडावर? गडावर कुठे? उघड्यावर?
महेश - नाही.. टिळक बंगलाय तिथे..
श्री - तुम्हाला कसे घेतील आत ते राहायला?
महेश - भरपूर खोल्या आहेत बाकीच्या गडावरही... खूप जण राहतात.. टी.व्ही. सेंटर आहे..
श्री - पण खाणार काय?
महेश - भाकरी पिठलं मिळतं तिथे...
श्री - कुणाला माहिती आहे का पण काही किल्याची? वाट बिट चुकाल..
महेश - नंदन तीनदा जाऊन आलाय..
श्री - रात्रीचे नका राहू...
महेश - एकटा कसा परत येऊ?
श्री - एकटा म्हणजे?
महेश - ते तिथेच राहणारेत..
श्री - मग नको जाऊ तू..
महेश - का?
श्री - अरे काही झालं बिलं म्हणजे? साप बिप असतात...
महेश - काहीतरी फालतू कारणं सांगू नका..
श्री - फालतू काय? जंगल असतं तिथे सगळं..
महेश - चिक्कार माणसं असतात. सगळी सोय असते.
श्री - नको..
महेश - ते खाली थांबलेत दोघं..
श्री - का?
महेश - मी येतोय की नाही ते विचारायला..
श्री - अरे मग वर बोलाव ना मित्रांना.. चहा करू.. बोलव..
महेश - ते नाही येणार..
श्री - का?
महेश - अंहं!
श्री - महेश.. रात्रीचं राहण्याचं कॅन्सल करत असलात तर जा..
महेश - माझ्यासाठी त्यांचं नाही कॅन्सल होणार...
श्री - मग पुढच्यावेळेला जा...

स्फोट व्हावा तसा महेश भडकला.

"पुढच्या वेळी, पुढच्या वेळी, पुढच्या वेळी! काय वेगळं होणारे पुढच्या वेळी? काय वेगळं होणारे? ते सिंहगडाच्या ऐवजी राजगडावर जातील अन रात्रभर राहतील. मी इथेच कुजत अन कुढत बसेन. तुम्हाला तेव्हाही पैशाचाच प्रश्न असेल. तेव्हाही जंगलात साप असतात म्हणाल. मी काय दोन वर्षाचा मुलगा आहे? सगळी मुलं जातायत ट्रेकिंगला कॉलेजमधली. कारणं सांगायची तर काहीतरी काय कारणं सांगता? मित्र हसतील मला. मी जात नाहीये कुठेही आता ट्रेकिंगला... काळजी करू नका."

श्री पुन्हा गंभीर झाला. महेश खाली निघून गेला. बराच वेळ झाला तरी तो वर येईना म्हणून श्री खाली गेला. वाड्याच्या दरवाजाच्या बाहेरच्या, रस्त्यावरच्या एका कट्यावर तिघेही बसलेले होते.

श्री दरवाजात, त्यांना दिसणार नाही अशा पद्धतीने उभा राहिला.

मुकूल - अरे पण घर आहे ना राहायला?
महेश - नाही रे बाबा ऐकत आमच्याकडे.. तुम्ही जा..
नंदन - एवढा कसला प्रॉब्लेम आहे रे?
महेश - पैसे! दुसरा कसला?
मुकूल - असे किती पैसे लागणारेत? सॅकचे तीस रुपये, जुन्याबाजारातली.. अन हंटर शूज वीस रुपये..
नंदन - त्यातली सॅक माझ्याकडे आहेच.. शिवा खिचडी करणार आहे गडावर चुलीवरची..
मुकूल - आता काय राहिलंय? फक्त शूज.. ते नेहमीचे घातलेस तरी चालतील..
महेश - काहीही कारणे सांगतात रे... पैसा काढायचा नाही..
मुकूल - हवं तर तिकीट मी काढतो.. मग झालं??
महेश - मुकल्या.. माझा बाप कंगाल आहे.. कफल्लक आहे.. कळलं का? आता डोकं फिरवू नका..

मुकूल अन नंदन दोघेही निघून गेले.

आणि केवळ दोनच तासांनी महेश घरातून बाहेर पडून नंदनकडे निघाला होता. कारण वर घरी गेल्यावर श्री त्याला 'येड्या मी थट्टा करत होतो, हे घे पैसे.. अन जा.. मस्त धुमाकूळ घाला.. मजा करा' म्हणाला.. क्षणभर विश्वासच बसेना महेशचा.. आणि त्यानंतर त्याने असे काही प्रेमार्द्र नजरेने श्रीकडे पाहिले की श्रीला वाटले 'त्याचे मगाचचे आपण ऐकलेले वाक्य माफ करून टाकावे'. आणि ते पैसे घेऊन तो अक्षरशः उड्या मारत नंदनकडे गेला तेव्हा...

श्री आपल्या उरलेल्या औषधाची बाटली बघत होता. महाग होते ते औषध! दम लागू नये म्हणून घ्यावे लागत होते. मस्क्युलर रिलॅक्सेशनसाठीही होते ते! दोन दिवसांपुरते उरलेले होते. दोनशे तीस रुपयांना एवढीशी बाटली!

थोडक्यात... महिनाभर औषधाशिवाय राहायचे आहे म्हणजे! श्रीच्या मनात विचार आला..

ओके! हळूहळू कामे करत जाऊ! त्यात काय एवढे?

रमाच्या फोटोपाशी गेला श्री!

श्री - इतकी वाईट परिस्थिती नाहीये गं! पण काय आहे नं? की बरेच हप्ते आहेत. डिप्लोमा झाल्यावर इंजिनीअरिंगला जाणार म्हणजे त्याचीही तरतुद करावी लागतीय! विमा काढला नवीन.. दत्त कांबळे गेल्यापासून! माझं काही विशेष नाही. तू काळजी करू नकोस.. आपलं बाळ खुषीत असलं की झालं! काय???

कसे काय कुणास ठाऊक... फोटोमधले रमाचे डोळे.....

.... आज अजिबात मिश्कील वाटत नव्हते...

शनिवारी सकाळी पावणे सहाला गट्टूला भिकारदास मारुतीच्या बस स्टॉपवर मित्रांच्या हवाली करून श्री घाईघाईने ऑफीसला जायचे म्हणून वाड्यात परत आला आणि..

घरात शिरतोय न शिरतोय तोच...

पवार मावशी - श्री... खूप दिवस बोलेन बोलेन म्हणतीय.. पण...

श्री - ... काय झालं मावशी? काही.. त्रास होतोय का???

मावशी - अंहं! पर्समधले पैसे सारखे जातात रे... काही कळत नाही...

गुलमोहर: 

रोहितला अनुमोदन!!!! खरोखर बाप माणूस आहात तुम्ही... मुलाला हँडल करायची श्रीची पद्धत ज्या पद्धतीने तुम्ही मांडलीयेना... अप्रतिम आहे ती...

बेफिकीर,
अतिशय आवडला आजचा भाग!!!! आजच्या भागात फार फार गुंतल गेले...सुरुवातीपासून शेवटपर्यंत...

सुरुवातीला लिहिलेले फिल्मचे प्रसंग, कॉलेजमधल्या मुलांचे ते जोक्स, महेशची घालमेल, त्याचा सततचा घसरणारा आणि सावरणारा विवेक, मनाची आंदोलनं, सगळं सगळं किती उत्कृष्ट मांडलंय तुम्ही..खरोखर कौतुक आहे तुमचं...

तुमचं लिखाण वाचणं आता दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनलंय...प्लिज ते कधीही सोडू नका. अशाच उत्कृष्ट लेखनासाठी अनेक हार्दिक शुभेच्छा!!! Happy

सर्वांच्या प्रेमळ प्रोत्साहनाचे मनःपुर्वक धन्यवाद!

मी बाप नाही! फक्त एक मुलगा आहे.

तरीही हे कथानक रेटण्याचा प्रयत्न करतोय! आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे हुरूप येतोय एवढंच!

हे ऋण असेच ठेवावेत अशी विनंती!

-'एक बेफिकीर'!

बेफीकीर ,

मधले काही भाग वाचायचे राहुन गेले ,,, पण हे २० व २१ वाचल्यावर वाटायला लागलंय की अगदी आवर्जुन ते भाग वाचायला हवेत ..

तुम्ही ...मुलं विशेश्तः एकुलती एक अन single parent कशी मोठ्ठी होतात ते अगदी व्यवस्थीत पकडत आहात ...

काही काही घटना वाचुन तर मलाही माझ्या कॉलेज दिवसांची आठवण आली ..

पुलेशु

बेफिकिर,
खरच शब्द नाहित हो....

सुरुवातीला लिहिलेले फिल्मचे प्रसंग, कॉलेजमधल्या मुलांचे ते जोक्स, महेशची घालमेल, त्याचा सततचा घसरणारा आणि सावरणारा विवेक, मनाची आंदोलनं, सगळं सगळं किती उत्कृष्ट मांडलंय तुम्ही..खरोखर कौतुक आहे तुमचं... >>> सानि याना अनुमोदन.

तुम्हि खुप खुप लिहवे अणि आम्हि खुप खुप वाचावे, बस्स.....
पु.ले.शु.

मी बाप नाही! फक्त एक मुलगा आहे.>> बेफिकीर, प्रत्येकालाच 'बाप' होता येतं असं नाही. मुल फक्त जन्माला घातलं की बाप होता येत नाही... बापाची कर्तव्य असतात... ती कर्तव्य तुम्हाला बाप न होताही खुप चांगल्या प्रकारे माहीत आहेत. तुम्ही तुमच्या मानसपुत्राला खुलवताय, फुलवताय, साम, दाम, दंड ने आकार देताय... खरा बाप हेच करतो नं?

तुम्ही खरंच बापमाणूस आहात.

लिहा... मनापासून लिहीताय. अडनिड्या वयातील मुलाची आकर्षणं, मग त्यासाठी चुकीच्या मार्गाकडे भरकटणं, त्याला आपल्या चुकीची जाणीव होऊनही त्या मोहाच्या गर्तेतून बाहेर येऊ न शकणं...
सहीसही मांडलेय...

मला माझं लहानपण आठवलं... तेव्हा अमची परिस्थिती खाऊन पिऊन सुखी होती. पण वायफळ खर्च कमी करायचे. मित्रमैत्रीणींबरोबर हॉटेल सिनेमे नाही... (हे अगदी डिप्लोमापर्यंत होतं... मग डिग्रीला हॉस्टेलला गेले तेव्हा मैत्रीणी-हॉटेल्-सिनेमे असले षौक केले.)

चौथीला होते तेव्हा. स्कॉलरशीपच्या क्लासला जाताना वाटेत एक छोटी टपरी होती. तिथे चॉकलेट्स, गोळ्या, चिंचा, चणे-वाटाणेच्या छोट्या पुड्या, पेप्सीकोलाच्या स्टिक्स मिळायचे. सोबतच्या सगळ्या मुली घ्यायच्या. फक्त चवीच्या कुतुहलामुळे मलाही घावं वाटायचं. आई खुप स्ट्रीक्ट होती. बाहेरची घाणघूण खायची नाही, घरची भाजीभाकरी खायची. मी त्या मुलीना सांगायचे, हे घाण पदार्थ आहेत, आजारी पडतो आपण. तर मुली हसायच्या. एक दिवस सगळ्यांनी ठरवलं मध्ये काळा रबर लावलेल्या अ‍ॅल्युमिनिअमच्या साच्यातली , वेगवेगळ्या आकाराची गोड गार कुल्फी खायची. सगळे १ रू. आणणार होते. मी मागितला घरी. आई नेहमीप्रमाणेच ओरडली. मैत्रीण म्हणाली घ्यायचे असेच जर देत नाहीत तर. मी उचलला रूपया. आणि आईसक्रीम चोखत घरी येत होते... कुठल्यातरी मुलीने घरी आग लावली.

आई बाबा रिक्शेत बसून आले, मला टाकलं रिक्शेत, घरी आल्यावर बाबा शांतपणे कोचावर बसून राहीले. आईने कालथा लालभडक करून पायाला टेकवला. (नशीब नाहीतर हातावर ती घाणेरडी खूण दिसली असती Happy ) अजूनही तो मोठ्ठा डाग पायावर आहे. त्यानंतर आजातागायत रस्त्यात जरी पडलेले पैसे दिसले तरी पैसे उचलणं लांबची गोष्ट, ती खूण आधी आठवायची. दुर्लक्ष करून जायचं. Happy

प्रत्येकजण त्या टाईमस्पॅन मधून जातो. आज आठवतं हो मी ही लहानपणी चोरी केलेली मुलगी आहे. मी कदाचित माझ्या मुलीला यापेक्षा जास्त समजूतीने घेऊ शकेन पण तरीही मला माझ्या आईचा अभिमान वाटतो की तिने मला "व़ळण" लावलं Happy

dreamgirl, मस्त लिहिलायस गं तुझा अनुभव... मला असा अनुभव कधीच आला नाही म्हणून विचारते, "अशा पद्धतीने" लावलेल्या वळणाने मनात आई-वडीलांबद्द्ल अढी निर्माण होत असेल ना जनरली? त्या पालकांच्या भावना समजून घ्यायला आणि त्यांचा अभिमान वाटायच्या मानसिक अवस्थेला यायला स्वतः परिपक्व व्हावे लागत असेल ना?

प्रसाद, परेश, स्वप्नसुंदरी, श्वे, सुमेधा,

आपल्या सर्वांच्या उदार प्रोत्साहनाचे व प्रेमळ प्रतिसादांचे मनःपुर्वक आभार मानत आहे.

स्वप्नसुंदरी - आपण एवढा मोठा प्रतिसाद दिलात हे मी माझे भाग्य समजतो. आपला प्रामाणिकपणा वाचून माझ्या हयात असलेल्या आई वडिलांची शप्पथ घेऊन सांगतो, की गट्टूतही मी आहे (अगदी चोर्‍यांच्या प्रसंगातही) आणि श्रीमधेही मी आहे, जरी मला मुलगा / मुलगी नसले तरी! मात्र स्वप्नसुंदरी, आपल्याला, जरी योग्यच असले तरीही, आपल्या आईंनी डाग लावला हे वाचताना मी कळवळलो. आपल्याला काय झाले असेल! केवढेसे वय असेल तेव्हा आपले! माफ करावेत, माझ्या लेखनाच्या निमित्ताने तुमच्या त्या जखमेची खपली निघाली.

प्रसाद - आपल्याला आपल्या गत आयुष्यातील काही दिवसांची आठवण होणे हे मी स्वार्थीपणे माझ्या लेखनाचे श्रेय समजतो. खूप आनंद झाला की कुणीतरी या गोष्टीशी आयडेंटिफाय होत आहे.

सानी - आपले अनेक आभार की आपण कौतुक हा शब्द वापरलात, कारण त्यात प्रेमळ अभिनंदनाची झलक आहे.

परेश व सर्वच प्रतिसादक - आपले पुन्हा आभार!

या सर्व प्रतिसादांवरून मला माझा एक जुना शेर आठवला.

वाटले बापास अग्नी देत असता...
चंदनाला जाळले मी चंदनावर

-'बेफिकीर'!

एकदम जबरदस्त....

एक शंका... त्याकाळात " हे असले पिक्चर वर्षभरात टी.व्ही. वर येतात." हे असच होत का? मला आ ठवतयं सागर सिनेमा १९९० ला टी. व्ही. वर आला होता.....

"अशा पद्धतीने" लावलेल्या वळणाने मनात आई-वडीलांबद्द्ल अढी निर्माण होत असेल ना जनरली? त्या पालकांच्या भावना समजून घ्यायला आणि त्यांचा अभिमान वाटायच्या मानसिक अवस्थेला यायला स्वतः परिपक्व व्हावे लागत असेल ना?>> हो सानी, त्यावेळी अढी बसली होती, पण काळ हे सर्व जखमांवरचे औषध आहे. आता वाटतेय, ती त्यांची वळण लावायची पद्धत होती. भले चुकीची... मला आता अज्जिबात अढी नाहीय. Happy
आता पटतंय त्यांनी ते का केलेलं... मी एवढी स्ट्रिक्ट नाही होऊ शकत, पण हो काय चुकलेय ते साम, दाम आणि दंड ने व्यवस्थित पोहोचवू शकते... मला माझं मूल यातील समीर सारखे व्हायला नकोय, मी मुलांच्या चूकांना कधीच पाठीशी घालणार नाही.

माफ करावेत, माझ्या लेखनाच्या निमित्ताने तुमच्या त्या जखमेची खपली निघाली. >> बेफिकीर, खपली त्यावेळेसच धरली होती जखमेवर, मनावर नाही... आईने हवे तेव्हा लोण्याहून मऊ पाषाणाहून कठोर होऊन आम्हाला घडवलं. मातीच्या गोळ्यालाही आकार देण्याआधी तुडवलं जातं, थापट्यांनी आणि चांगलं तिंबून मऊ केलं जातं, आणि मग हलक्या हळूवार हातानी आकारात घेतलं जातं. (हे तेव्हा कळलं नाही, आता समजतंय Happy )

आणि आज मी अभिमानाने म्हणू शकते की मी जी काही आहे ती माझ्या आईबाबांनी घडवलेली आहे. तुमच्यासमोर आहे. चांगली वाईट माहीत नाही... Happy पण चांगलं वाईट निवडण्याची सद्सद्बुद्धी आहे.