हितगुज दिवाळी अंक २०१०- घोषणा

Submitted by संपादक on 24 August, 2010 - 23:39

नमस्कार मायबोलीकर रसिकहो,

दरवर्षी हितगुज दिवाळी अंकातून आपण काही आगळेवेगळे देण्याचा आवर्जून प्रयत्न करतो. शब्ददिंडीच्या या उज्ज्वल परंपरेनुसार, यंदा आम्ही घेऊन आलो आहोत 'चार संकल्पनांवर आधारित अंकाचा प्रस्ताव'.
या चारही संकल्पनांची आपण विस्तृत ओळख करून घेऊ या!

poster_updated.png

१. निसर्गायण

आंतरराष्ट्रीय जैववैविध्य वर्षानिमित्ताने ही संकल्पना योजिली आहे. निसर्ग आणि माणसाच्या परस्परसंबंधांवर आधारित कुठल्याही पैलूंवर आपण साहित्य पाठवू शकता. काय म्हणता, नाव ऐकून चक्रावलात? अहो, ऐकून तर घ्या नीट. या संकल्पनेवर आपण कशा प्रकारे काम करू शकता, याची काही उदाहरणं:
- निसर्गाशी जोडली गेलेली माणसाची नाळ यावरील कथा/कविता/ललित/वैचारिक लेख, नैसर्गिक जीवनपद्धतीचा सहज अवलंब आणि प्रयोगांचे अनुभव.
- साहित्य/कविता/कलाकृती यातून डोकावणारी निसर्गसोहळ्याची वर्णनं.
- दर्‍याखोर्‍यारानांतल्या भ्रमंतीचे सचित्र अनुभव.
- विराट नैसर्गिक आपत्तींचे व्यक्तिगत अनुभव.
- कुठल्याही निसर्ग प्रकल्पांची ओळख, पर्यावरणसंवर्धनातील कसल्याही कार्यात व्यग्र असलेल्या व्यक्तींशी संवाद, जल/घनकचरा व्यवस्थापन, नैसर्गिक साधनसंपत्तीच्या समस्या.
- पारंपरिक हस्तकलेतील/ वस्त्रकलेतील/ चित्रकलेतील प्राणी, पक्षी, निसर्गातून आलेली प्रतीकं.
- आपल्या राहत्या देशातील जैववैविध्याचे नमुने, आपली आवडती झाडं निगुतीने जोपासण्याचे अनुभव.
- लहान मुलांसाठी सृष्टीच्या गोष्टी.


२. वेगळ्या वाटा, नवी क्षितिजे

या संकल्पनेअंतर्गत आपण स्वतः अथवा आपल्या परिचयातील कोणत्याही व्यक्तीने निवडलेल्या काहीश्या वेगळ्या वाटांचे अनुभव पाठवू शकता. या वेगळ्या वाटा केवळ व्यावसायिक, शैक्षणिकच असाव्यात असे नाही, एखादा वेगळा छंद जोपासण्याचीही वेगळी वाट असू शकते, एखादा धाडसी निर्णय असू शकतो, एखादे अजून पूर्णत्वात न आलेले पण उराशी धरलेले असे वेगळ्या वाटेचे स्वप्नही असू शकते, एखादा वेगळ्या वाटेवरचा प्रवासही असू शकतो. त्यातील बरेवाईट, कडूगोड, हृद्य-मासलेवाईक अनुभव कथा/काव्य/ललित/ वैचारिक/विनोदी स्वरुपातही लिहू शकता किंवा वेगळ्या वाटा शोधलेल्या व्यक्तींशी संवाद साधू शकता किंवा आपल्या आगळ्यावेगळ्या छंदाविषयी एक छोटी दृकश्राव्यफीतही पाठवू शकता.

३. रंग उमलल्या मनांचे

आंतरराष्ट्रीय युवा वर्षाचे औचित्य साधून ही 'तरुणाई विशेष' संकल्पना घेऊन आलो आहोत. टवटवीत, उत्फुल्ल, प्रीतरंग हळुवार हाताने उलगडणार्‍या कथा/कविता आपण पाठवू शकता. 'उमलत्या' मनाचे तळ्यात-मळ्यात असणे किंवा 'गद्धेपंचविशीचे' साहसी, वेचक-वेधक अनुभव खुसखुशीत शैलीत शब्दबद्ध करू शकता. राजकीय/सामाजिक/कला/क्रीडा क्षेत्रातील तरूण आणि धडाडीच्या व्यक्तींशी संवाद साधू शकता, त्यांच्या कार्यावर प्रकाशचित्रमालिका पाठवू शकता. आपल्या चष्म्यातून आपल्या राहत्या देशातील आजच्या तरूणाईविषयीचे मनोगतही ललित शैलीत व्यक्त करू शकता, तरूण तुर्कांच्या 'फॅशन'वरही सचित्र लेख लिहू शकता.

चला तर मग, तरुणाईच्या अंतरंगी डोकावू या!

४. कला आणि जाणिवा

आता शेवटच्या संकल्पनेकडे वळू या. कलाप्रवास हा मुख्यत्वे जाणिवेचा प्रवास. या प्रवासातील निवडक सौंदर्यस्थानांचा आस्वाद घेऊ या. या संकल्पनेसाठी आपण अशा प्रकारचे साहित्य पाठवू शकता:
- गाजलेल्या साहित्याचे, कलाकृतींचे, कलाकारांचे, लेखक/कवी/चित्रकार/गायक/कालखंड यांचे आपल्या दृष्टिकोनातून रसग्रहण.
- चित्रशैली/नृत्यशैली/वस्त्रशैली/संगीतातील घराणी यावर सचित्र लेखमालिका.
- पुस्तक परिचय, प्रताधिकारमुक्त अनुवादित साहित्य.
- कलाकार आणि कलाकृती यावर आधारित शब्दकोडे, प्रश्नमंजुषा.
- गाजलेल्या/भावलेल्या चित्रपटांवर/संगीतावर लेख.
- गायक/वादक/संगीतकार/लेखक/कवी/अभिनेते/कलाकार यांच्याशी ऐसपैस गप्पा.
- एखाद्या कलाकार/लेखकाच्या शैलीतील विनोदी स्फुट, विंडबनं.


चला, अभिरुची म्हणजे काय ते उलगडून पाहू या!

तर रसिकहो, अशा या चार संकल्पना.
कुठल्याही संकल्पनेसाठी आपण कुठलाही प्रकार पाठवू शकता (कथा,कविता, ललित, वैचारिक लेख, दृकश्राव्य, बालसाहित्य, दिवाळी संवाद, प्रकाशचित्रमालिका, शब्दकोडं, इ.). प्रत्येक संकल्पनेसाठी उदाहरणं फक्त ती संकल्पना कशा प्रकारे फुलवता येईल यासाठीच दिली आहेत. नमनाला घडाभर तेल, केवळ संकल्पना स्पष्ट व्हाव्यात म्हणून!
२०१० हितगुज दिवाळी अंकासाठी, संकल्पनांवर आधारित साहित्याला प्राधान्य दिले जाईल.

विशेष सूचना: दिवाळी अंकाची वाढीव मुदत आता ५ ऑक्टोबर, २०१० पर्यंत. आपले साहित्य पीएसटी प्रमाणवेळेनुसार रात्री १२पर्यंत पाठवता येईल.
संपादकमंडळाशी सदस्यखात्यातून संपर्क करू शकता.
हितगुज दिवाळी अंक २०१०- नियमावली
मालकीहक्क (Copyright)
शुद्धलेखनासंबंधी नियमावली


दिवाळी संवाद साधण्याआधी संपादकमंडळाशी विचारविनिमय करणे अनिवार्य आहे.

लोभ आहेच, तो वृद्धिंगत व्हावा ही विनंती. तुम्ही, आम्ही मिळून यंदाची संकल्पनादिवाळी धडाक्यात साजरी करू या!

आपले नम्र,
संपादकमंडळ
विषय: 

माझं नीरजाला अनुमोदन !
मर्यादित विषायांवर आवडेल वाचायला अंक !
इतर कथा, कविता टाइप साहित्य गुलमोहरावर येतेच कि नेहेमी.

एक प्रमुख विषय असण्याला काही आक्षेप नाहिये.. पण हे चारही विषय/संकल्पना एकेक विशेषांक काढण्याच्या ताकदीच्या आहेत. तर त्यामुळे गिचमिड होईल का असे मला वाटले. तसेच इतर साहित्य गुमोवर येतेच.. पण दिवाळी अंकालासुद्धा लोक पाठवतील. मग ते कितीही उत्तम का असेना त्याला फाटा देणार का? कारण मागच्यावेळी सुद्धा एक थीम असून देखील बरेचसा दिवाळी अंक हा इतर कथा/कविता इत्यादींनी भरलेला होता.. मागच्या अंकाच्या प्रमुख थीमबद्द्ल एक/दोनच विभाग होते..

>>मग ते कितीही उत्तम का असेना त्याला फाटा देणार का? <<
द्यायला हवा असं माझं मत आणि सुचवणी.
>>कारण मागच्यावेळी सुद्धा एक थीम असून देखील बरेचसा दिवाळी अंक हा इतर कथा/कविता इत्यादींनी भरलेला होता.. मागच्या अंकाच्या प्रमुख थीमबद्द्ल एक/दोनच विभाग होते..<<
एकच विषय होता ना. आता चार आहेत.

पण दिवाळी अंकालासुद्धा लोक पाठवतील. मग ते कितीही उत्तम का असेना त्याला फाटा देणार का?
<< जर दिलेल्या ४ विषायात बसत नसेल तर फाटा द्यायलाच हवा खरं तर, बाकी मंडळ ठरवेलच !

>>कारण मागच्यावेळी सुद्धा एक थीम असून देखील बरेचसा दिवाळी अंक हा इतर कथा/कविता इत्यादींनी भरलेला होता.. मागच्या अंकाच्या प्रमुख थीमबद्द्ल एक/दोनच विभाग होते..

आत्तापर्यंत थीम ही एका विभागापुरतीच मर्यादित होती. बाकीचे साहित्य घेता यावे म्हणून. यंदा संपूर्ण अंक (चार) थीमवर आहे.

पाककृतींच्या संदर्भात :

दिवाळी अंकाच्या घोषणेत नमूद केल्याप्रमाणे यंदा संकल्पनाधारित साहित्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे लिखित अथवा दृक्-श्राव्य माध्यमातून सादर केलेल्या पाककृती ‘निसर्गायण’/ '(पाक)कला आणि जाणिवा' या संकल्पनांमध्ये घेण्याचा आमचा मानस आहे. त्यानुसार जैववैविध्य, भौगोलिक परिस्थिती, काहीश्या विस्मृतीत गेलेल्या पदार्थांचा सांस्कृतिक/सामाजिक वारसा या अनुषंगाने महत्त्वाची अशी, आपल्या राहत्या देशातील एखाद्या वेगळ्या पदार्थाची अथवा अस्सल देशी पदार्थाची, सचित्र कृती किंवा दृक्-श्राव्य प्रवेशिका आपण पाठवू शकता. केवळ पाककृती न पाठवता, वर नमूद केलेल्या घटकांचा विचार करुन पाठवलेल्या सादरीकरणाला प्राधान्य दिले जाईल. तसेच, पाककृतींबाबत कुठल्याही सादरीकरणासाठी संपादकमंडळाशी विचारविनिमय करणे आवश्यक आहे.

धन्यवाद.

आधी साहीत्य पाठवा, पुढे त्याचे काय करायचे ते संपादक मंडळ ठरवेल. त्यांनी सल्ला मागितला आहे का कुणाचा? त्यांच काम त्याना करु द्या!

सुरवात छान केली आहे, गुणवंत मायबोलीकरांचा हा अंक देखिल दर्जेदार होईल यात शंका नाही, मस्त!!!

नमस्कार संपादक महोदय,

वेगळ्या वाटा, नवी क्षितिजे - या सदरासाठी एक माहितीपर लेखन इ-मेल ने पाठवले आहे. कृपया पोहच द्यावी.

धन्यवाद.

खालील गोष्टीवर पाठवायचा विचार आहे पण एक गोष्ट नक्की करायची आहे, जैववैविध्य म्हणजे नक्की काय? दोन ठिकाणी उल्लेख आहे त्याचा. हा जेन्युन प्रश्ण आहे. इतर माझे प्रश्ण बोल्ड मध्ये आहेत खाली.

- पारंपरिक हस्तकलेतील/ वस्त्रकलेतील/ चित्रकलेतील प्राणी, पक्षी, निसर्गातून आलेली प्रतीकं. - म्हणजे नक्की काय फॉर्म मध्ये हवे आहे?

- आपल्या राहत्या देशातील जैववैविध्याचे नमुने, आपली आवडती झाडं निगुतीने जोपासण्याचे अनुभव. - आवडत्या झाडाबाबत बरेच लिहु शकते मी. पण परत इथे जैववैविध्य काय?

- पाककृतीबाबत - जैववैविध्य, भौगोलिक परिस्थिती, काहीश्या विस्मृतीत गेलेल्या पदार्थांचा सांस्कृतिक/सामाजिक वारसा या अनुषंगाने महत्त्वाची अशी, आपल्या राहत्या देशातील एखाद्या वेगळ्या पदार्थाची अथवा अस्सल देशी पदार्थाची, सचित्र कृती किंवा दृक्-श्राव्य प्रवेशिका आपण पाठवू शकता.

>>- म्हणजे नक्की काय फॉर्म मध्ये हवे आहे?<<
पारंपरिक हस्तकलेतील/ वस्त्रकलेतील/ चित्रकलेतील प्राणी, पक्षी, निसर्गातून आलेली प्रतीकं म्हणजे परंपरेत, रूढींमधे, धार्मिकतेमधे निसर्गाचा घातलेला मेळ किंवा निसर्गाला अनुसरून चालण्यासाठी परंपरेतून घातले गेलेले दंडक/ समजुती/ विधी/ प्रार्थना/ चिन्हे/ चित्रे इत्यादी. या संदर्भांचा, विषयांचा वापर करून ललित, काव्य, माहितीपूर्ण लेखन.

जैववैविध्य या शब्दाचा अर्थ biodiversity असा आहे. प्रत्येक भौगोलिक प्रदेशात त्या त्या वातावरणानुसार जैववैविध्य म्हणजे biodiversity म्हणजे flora and fauna म्हणजे many different species of living beings - microorganisms पासून मोठ्या आकाराचे सर्व सजीव (झाडे किंवा पशुपक्षी सर्व). या वैविध्यावर नैसर्गिक समृद्धी ठरते त्या त्या प्रदेशाची. आणि हे टिकवून ठेवणे हे निसर्गाचा तोल सांभाळण्यासाठी गरजेचे असते. तर त्या अनुषंगाने/ दृष्टीकोनातून केलेले लिखाण.

पण पाककृतींच्या संदर्भात त्याचा काय अर्थ आहे ते संपादकांनी वरती लिहिलंय त्याहून बरं मलातरी नाही सांगता येणार.

हे माझ्या अंदाजाप्रमाणे मी उत्तर दिलंय. काही बरोबर - चूक असल्यास संपादक मंडळ स्पष्ट करेलच.

विस्तृत उत्तर दिल्याबद्दल नीधप यांना धन्यवाद.
मनःस्विनी, आपणांस सर्व उत्तरे मिळाली का? अधिक माहिती हवी असल्यास संपादकमंडळाशी अवश्य संपर्क साधा.

निधप, धन्यवाद. Happy बराच प्रकाश पडला.
मराठीचे इतके वाचन नाहीच मायबोलीखेरीज त्यामुळे असे जड शब्द कळायला वेळच लागतो.

संयोजक, रोजच्या वेंधळेपणात वरची क्लीप पाहिलीच नाही. त्यातील उदाहरणामुळे कळले.

खूप उशीरा पाहिले त्यामूळे अजुन सुरुवात केली नाहीये, रविवार सुद्धा गेला. शेवटची तारीख ३० सप्टेंबर आहे. आणखी २-३ दिवस नाही का मिळणार वाढवून. हि एक विनंती आहे. मग तसे मिळाले की शुक्रवारी रात्री वेळ मिळेल. मध्ये सलग वेळ मिळणे अशक्य आहे.
मला खालील मध्ये भाग घ्यायचाय,
निसर्गायण - आपली आवडती झाडे
पाकक्रुती.

पाककृतीत फक्त एक नक्की करायचेय की, पाककृतीचा व जैववैविध्य ह्यांचा नक्की संबध कसे काय करायचे कळले नाही अजुन. तुम्हाल authentic अशी रेसीपी हवी आहे का जी हवामानानुसार बनवली जाते त्या त्या प्रदेशात व ती खासियत आहे त्या त्या प्रदेशाची का दुसरा अर्थ आहे?(वरच्या अर्थानुसार हा अर्थ लागतो). व अर्थ मी सांगितलेला तोच असेल तर पुर्वप्रकाशित नकोय.. बरोबर?

३० सप्टेंबर अंतीम तारीख ??!! Sad खूपच उशीर झाला, हे पान उघडायला!
घोषणा आणि संकल्पना आवडली. संपादक मंडळाला मनःपुर्वक शुभेच्छा.

प्रकाश काळेल,

अंकासाठी साहित्य पाठवण्याची मुदत ही ५ ऑक्टोबर, २०१०पर्यंत वाढवली गेली आहे. आपल्याला अंकासाठी साहित्य पाठवायचे असल्यास ते आपण ५ ऑक्टोबर, २०१० रात्री १२ पर्यंत(पीएसटी प्रमाणवेळेनुसार) पाठवू शकता.

वरच्या घोषणेत तारखेचा बदल आज होईल.

आता ६ ला माझी विज जाईल. आणि ती रात्रभर येणारही नाही. लोड शेडींग. त्यामुळे निसर्गायनमध्ये एक मैटर कंपोज केलय. विषय मोठा होता तो थोडक्यात केलाय.

पी एस टी रात्री १२, म्हणजे भारतातले दुसर्‍या दिवशीच्या दुपारचे १२.३०. बरोबर ना संपादकहो?

हो. बरोबर आहे. धन्यवाद प्रसाद.
जागू- प्रसादने लिहील्याप्रमाणे भारतातील उद्या दुपारी साडेबारा पर्यंत.

Pages