आणखी किती सतीश शेट्टी आणि अमित जेठवा?

Submitted by विश्वंभर on 23 August, 2010 - 08:04

गुजरातेतील गीर अभयारण्याच्या क्षेत्रात पर्यावरण जागृतीचे काम करणारे अमित जेठवा यांची २० जुलै रोजी निर्घृण हत्त्या झाली त्याला आता एक महिना लोटला आहे. विशेष म्हणजे त्यांची हत्त्या गुजरात उच्च न्यायालयाच्या आवारात, दिवसाढवळ्या आणि ‘सत्यमेव’ नावाच्या इमारती समोर झाली! न्यायालयीन काम आटोपून अमित आपल्या जिप्सीमध्ये बसण्याच्या तयारीत असतांनाच बाईक वरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी point blank range मधून म्हणजे अगदी जवळून अमित जेठवांवर गोळ्या झाडल्या आणि त्यात ते जागीच ठार झाले. ‘कार्यक्षम’ गुजरात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन मारेकरी निसटून गेले असले तरी पोलिसांना जागेवर गावठी पिस्तुल आणि बाईक सापडली. न्यायालयाच्या आवारात पोलीस बंदोबस्त असतांना पोलिसांच्या नाकासमोर हल्ला कसा झाला असले बावळट प्रश्न लोकशाहीत विचारू नयेत. भारतीय लोकशाहीतील नेहमीच्या पद्धतीने “तपास सुरु आहे” आणि किती दशकांनंतर तो संपेल हे अर्थातच सांगता येणार नाही. अमित जेठवा म्हणजे या देशासाठी कोणी अति महत्वाची व्यक्ती नव्हे, तुमच्या माझ्यासारखा तो एक ‘सामान्य’ नागरिक, एका औषध दुकानाच्या आधारे स्वतःचा चरितार्थ चालवीत असतांना पर्यावरणासाठी झगडणारा एक कार्यकर्ता.
गीर अभयारण्यातील प्राण्यांच्या संवर्धनासाठी जेठवांनी वेळोवेळी संघर्ष केला. त्या भागातील खाणसम्राटांच्या हिताआड येणारा हा संघर्ष असल्याने ते अनेकांच्या डोळ्यात सलत होते. त्यांच्या हत्त्येमागे भाजप खासदाराचा हात असल्याचे बोलले जात आहे. असे असेल तर त्यांच्या हत्त्येचा तपास तातडीने आणि निष्पक्ष पद्धतीने करून नरेंद्र मोदींनी ‘राजधर्माचे’ पालन करायला हवे मात्र अद्याप तरी असे काही झाल्याचे दिसत नाही. सतीश शेट्टींची पुण्यात काही महिन्यापूर्वी हत्त्या झाली होती. त्यांच्या हत्त्येच्या मुख्य सुत्रधारांपर्यंत पोचणे अजून महाराष्ट्राच्या ‘प्रगत’ पोलीस दलाला जमलेले नाही. ज्यांनी लोकशाही सांभाळायची ते आमचे राजकीय नेते, नोकरशहा आणि पोलीस भ्रष्टाचारात एवढे आकंठ बुडाले आहेत की त्यांच्याकडून काही चांगले होण्याची कधीच अपेक्षा करता येत नाही.
सतीश शेट्टी असो की अमित जेठवा, पर्यावरण आणि माहिती अधिकाराच्या क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे काम दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे. पहिले म्हणजे सरकारी कायदे सर्वस्वी भांडवलदारांच्या बाजूने आहेत. दुसरे, जर एखादा भांडवलदार अथवा खाण माफिया कायद्याच्या कचाट्यात सापडलाच तर त्याला ‘स:शुल्क’ मदत करायला राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळासारख्या महाभ्रष्ट शासकीय संस्था आहेतच. तिसरे, नाईलाजाने त्यांना कारवाई करावी लागलीच तरी आपल्या न्यायपद्धतीनुसार दाव्याचा निकाल कधी लागेल हे स्वतः ब्रम्हदेव देखील सांगू शकत नाही, चौथे, कित्येक वर्षानंतर खटला निकाली लागला तरी दोषींना शासन किती होईल हे देवाच्या मर्जीवरच अवलंबून आहे (उदा: भोपाळ वायुकांड खटला) आणि समजा योग्य ती शिक्षा सुनावली गेलीच तरी पुन्हा वरच्या कोर्टात अपील करून कालहरणाचा मार्ग मोकळा! सहावे, एवढ्या सगळ्या सुरक्षित कवचातून एखादा बडा मासा अडचणीत येण्याची शक्यता दिसली की हमखास उपाय म्हणजे कार्यकर्त्याचा जीव घेणे! सरकार, पोलीस या सगळ्याच यंत्रणांना ‘मॅनेज’ करण्याची सगळी सोय आपल्या लोकशाहीत उपलब्ध असतांना गुंड, राजकारणी, माफिया, बिल्डर्स यांनी कशासाठी थांबावे?
आणि जनता...ती काय, मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला की मेणबत्त्या लावणार...का? तर ‘निष्पाप’ जीवांची हत्त्या झाली म्हणून पण सतीश शेट्टी किंवा अमित जेठवा यांच्या हत्तेनंतर मात्र काहीच करणार नाही जणू काही गुंडांना काहीही करण्याची जनतेनेच मूकसंमती दिली आहे! जणू काही सतीश आणि अमित स्वतःसाठी या माफियांशी लढत होते, जनतेसाठी नाही!
आणखी सतीश किंवा अमित होऊ द्यायचे नसतील तर लोकांनी पेटून उठायला हवे! गुंड, पोलीस, माफिया, राजकारण्यांना ठणकावून सांगायला हवे कि याद राखा, देश आमचा आहे आणि आमच्या कल्याणासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत. सगळा देश हा काही तुमच्या लुटीचा ऐवज नव्हे, हे एक सार्वभौम कल्याणकारी राज्य आहे. अशा किती कार्यकर्त्यांना माराल? आणि ज्या दिवशी आम्ही नाईलाजाने शांततेचा मार्ग सोडून नक्षलवाद्यांच्या मार्गावर चालू लागू त्यादिवशी तुमचे काय होईल? आम्ही अहिंसेचे पुजारी आहोत म्हणून तुम्ही हिंसा करू शकता. आम्ही भेकड आहोत म्हणून तुम्ही हल्ले करता, पण लक्षात ठेवा, भगतसिंग, चापेकर, गोगटे आमच्यातूनच तयार झाले आहेत!
अमित जेठवा, सतीश शेट्टी आणि आणखी बरेच जण....आता आपणच उठून गुंड, माफिया, राजकारण्यांच्या कंबरड्यात लाथ घातली नाही तर असे कित्येक हुतात्मे होतील आणि राज्यकर्ते आपल्याला सांगत राहतील... तपास चालू आहे!
॰॰॰

गुलमोहर: 

लेख खूप छान आहे, मांडलेल्या मतांना पूर्ण अनुमोदन आहे. सामाजिक कार्यकर्ता बनायचे असेल तर गुंड बनुनच मैदानात उतरावे लागेल अशी परिस्थीती निर्माण झाली आहे.

विश्वंभर,

वाचुन वाईट वाटले. कालच ग्रेट भेट मधे नाना पाटेकर यांची मुलाखत पाहिली. ते म्हणतात तुम्हाला वाटते लोक शांत आहेत. पण ही काहीतरी खदखदत असलेली शांतता आहे. ज्या दिवशी या लोकांचा विस्फोट होईल त्यादिवशी हे सगळे ऐदी , भ्रष्ट राजकारणी याना चांगलाच फटका बसेल. तुम्ही म्हणताय ते होणे अगदीच अशक्य नाही. सवाल आहे..केव्हा?