मदतीचा हात

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 22 August, 2010 - 08:08

आज मी अचानक लक्ष्मीकडे जायचे ठरविले. खूप दिवसात तिच्या हातचे रुचकर पदार्थ खाल्ले नव्हते, तिच्याशी निवांत गप्पा मारल्या नव्हत्या की तिच्या घरातील देवघरातून येणारा मंदसा चंदन, कापूर, धूप - अगरबत्ती व सुवासिक फुलांचा दरवळ श्वासांत भरून घेतला नव्हता. लक्ष्मी म्हणजे माझी वयाने माझ्यापेक्षा बरीच मोठी असणारी, पण अतिशय बोलघेवडी, माणूसवेडी, अगत्यशील दाक्षिणात्य मैत्रीण! आमची मैत्री खूप जुनी असल्यामुळे तेवढीच अनौपचारिक! तिच्या घरच्या समस्या ती मोकळेपणाने सांगणार, माझ्या टिपिकल मराठी वागण्यावर खळखळून हसणार, कामात असली तर मला तिच्या नऊ वर्षांच्या चिमुरडीच्या - मीनूच्या तावडीत सोडून एकाच वेळी स्वैपाक, फोन, दरवाज्याची बेल, कामाच्या बाईवर देखरेख, वृद्ध सासऱ्यांना काय हवे-नको ते बघणे अशा अनेक जबाबदाऱ्या दशभुजेच्या आवेशात लीलया पेलून चेहऱ्यावरची प्रसन्नता कायम राखणार....

दरवाज्याबाहेर घातलेली सुबक रांगोळी मी कौतुकाने न्याहाळत असतानाच लक्ष्मीने दार उघडले. नेहमी टवटवीत असणारा तिचा चेहरा थोडा काळजीत दिसत होता. मला पाहून तिच्या चर्येवर आनंदमिश्रित आश्चर्य उमटले खरे, पण त्यात एरवीची चमक नव्हती. काहीतरी नक्की बिनसले होते! ती एकीकडे माझ्याशी बोलत होती पण वारंवार तिची अस्वस्थ नजर भिंतीवरच्या घड्याळाकडे व दरवाज्याकडे जात होती. तिची चलबिचल मला पाहवेना. "काय झाले गं? " माझ्या प्रश्नासरशी ती ताडकन उठली व बाल्कनीत जाऊन खालच्या रस्त्यावर एक नजर घालून आली.

"अगं, सांगशील का काय झालं ते? " मी पुन्हा विचारले.

एवढा वेळ आणलेले अवसान गळल्यासारखे ती धपदिशी सोफ्यावर बसली. "मीनू अजून आली नाही परत तिच्या मैत्रिणीकडून! अर्ध्या तासापूर्वीच घरी पोचायला हवी होती. मी फोन केला तिच्या मैत्रिणीला. इथे पलीकडच्या रस्त्यावर राहते ती. चालत घरी यायला जेमतेम दहा मिनिटे लागतात. रस्त्यात कोणी भेटले तरी एव्हाना घरी यायला हवी होती गं ती.... छे! मी तिला एकटं घरी परत यायची परवानगीच द्यायला नको होती!! " लक्ष्मीच्या चेहऱ्यावरचे कावरेबावरे भाव मला अनोखे होते. कायम जिला उत्साहाने खळाळताना पाहिले आहे तिला असे पाहायची सवय नव्हती ना! मी तिचे गार पडलेले हात हातात घेऊन म्हटले, "आपण जायचं का तिला रस्त्यावर शोधायला? कोणत्या रंगाचा ड्रेस घातलाय तिनं? चल, एकीला दोघी असलो की पटापट शोधता येईल... "

माझं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच घरातला फोन वाजला. लक्ष्मीने अक्षरशः फोनवर झडप घातली. पलीकडे मीनूच्या मैत्रिणीची आई होती. थोडा वेळ मला अगम्य भाषेत तिच्याशी बोलल्यावर लक्ष्मीने फोनचा रिसीव्हर जाग्यावर ठेवून दिला.

"ती म्हणते आहे की त्यांच्या सोसायटीच्या चौकीदाराने तिला साधारण पाऊण तासापूर्वी सोसायटीतून बाहेर पडताना पाहिलंय, " लक्ष्मीच्या आवाजात चिंता दाटून आली होती. "कुठे, गेली कुठे ही मुलगी अशी अचानक?"

"अगं, तिची कोणी मैत्रीण-मित्र भेटले असतील रस्त्यात तिला.... त्यांच्याशी गप्पा मारत बसली असेल.... " माझा तिची समजूत काढायचा प्रयत्न. त्यावर मान नकारार्थी हालवीत लक्ष्मीने ती शक्यता फेटाळून लावली.

थोडा वेळ आम्ही दोघी शांत बसलो, आपापल्या विचारात हरवून.

माझ्या नजरेसमोर मीनूचा तरतरीत, गोड चेहरा येत होता. आपल्या आईसारखीच सतत उत्साहाने लवलवणारी, लाघवी, खट्याळ मीनू. आपल्या आजोबांना नीट दिसत नाही म्हणून त्यांना जमेल तसा पेपर वाचून दाखविणारी, घरात आलेल्या पाहुण्यांकडे एखाद्या मोठ्या बाईच्या थाटात लक्ष देणारी, अभ्यासाचा कंटाळा येतो म्हणून कुरकूर करणारी, आइसक्रीमचे नाव काढले की गळ्यात पडणारी....

अचानक लक्ष्मी उठली, आतल्या खोलीतून तिची पर्स व मोबाईल घेऊन आली. मी पण उठले, पर्स काखोटीला मारली. पायात चपला सरकवणार तेवढ्यात आठवण झाली, "अगं, मीनूचे आजोबा कुठं आहेत? " लक्ष्मीने पर्समधून घराच्या चाव्या बाहेर काढल्या होत्या.

"ते माझ्या धाकट्या दिरांकडे गेलेत आठवडाभरासाठी. चल, तू लिफ्ट बोलाव तोवर मी घर लॉक करते, " इति लक्ष्मी.

मी दारातून बाहेर पडून लिफ्टकडे वळणार तोच लिफ्टचा आवाज आला, दारातून बाहेर येणारी मीनूची छोटीशी मूर्ती पाहून किती हायसे वाटले ते आता शब्दांत सांगू शकणार नाही. मीनू बाहेर आली आणि तीरासारखी धावत दार लॉक करत असलेल्या लक्ष्मीच्या गळ्यातच पडली. 'अगं, अगं, अगं... " करत लक्ष्मीने कसाबसा आपला तोल सांभाळला, हातातून पडत असलेली पर्स टाकून लेकीचा छोटासा देह पोटाशी धरला. काही सेकंद मायलेकी काहीच बोलल्या नाहीत. एकमेकींना घट्ट धरून होत्या. शेवटी मीनूची आईच्या मिठीतून सुटण्यासाठी चुळबूळ सुरू झाली. "अम्मा, आता बस्स ना... " लक्ष्मीने काही न बोलता दार पुन्हा उघडले, लेकीला आत घेतले. त्यांच्या मागून मीही लक्ष्मीची विसरलेली पर्स उचलून आत शिरले.

आत गेल्यावर मात्र लक्ष्मीचा एवढा वेळ मनावर ठेवलेला संयम सुटला. तिने मीनूच्या समोरच बसकण ठोकली, लेकीला तिच्या दोन्ही दंडांना धरून स्वतःसमोर उभे केले. दोघींमध्ये पुन्हा मला न कळणाऱ्या खडडम खडडम भाषेत बरेच संभाषण झाले. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव वाचून मी त्या काय म्हणत असतील ह्याचा अंदाज घ्यायचा प्रयत्न करत होते. मीनू बराच वेळ श्वासाचीही उसंत न घेता जोरजोरात हातवारे करून तिच्या आईला घडलेले सांगत होती. सुरुवातीला काहीसा घुश्शात असलेला लक्ष्मीचा चेहरा लेकीच्या स्पष्टीकरणाबरोबर हळूहळू निवळत गेला. पण तरीही तिने मीनूचे बोलणे संपत आले तशी इंग्रजीमिश्रित खडडम भाषेत तिला ताकीद दिली. लेकीने समजल्यागत मुंडी हालविली व आतल्या खोलीत खेळायला निघून गेली.

"काय म्हणत होती मीनू? " मी उत्सुकतेने विचारले.

" आज माझ्या लेकीने खूप चांगले काम केले आहे गं.... " लक्ष्मीचे गोल टपोरे डोळे पाण्याने भरून आले होते. घशाशी आलेला आवंढा गिळून ती म्हणाली, " आज परत येताना रस्त्याच्या बाजूला तिला आमच्या घराच्या कोपऱ्यावर भाजी विकायला येणारी भाजीवाली बेशुद्ध पडलेली दिसली. मीनूने लगेच शेजारच्या एका दुकानात जाऊन त्या दुकानदाराकडे मदत मागितली.

आजूबाजूचे इतर काही विक्रेतेही तोवर जमा झाले. मग त्यातल्याच एका बाईने त्या भाजीवालीला पाणी पाजून शुद्धीवर आणले आणि तिला रिक्शात घालून दवाखान्यात घेऊन गेली. तोवर कोणीतरी त्या भाजीवाल्या बाईच्या मुलाला निरोप धाडला होता. तो मुलगा येईपर्यंत मीनू त्या भाजीवालीची हातगाडी सांभाळत रस्त्यातच उभी होती. मगाशी तो आला म्हटल्यावर ही तिथून निघाली व तडक घरी आली! म्हणून उशीर!!" लक्ष्मीच्या आवाजात लेकीविषयी कौतुक होते, पण काळजीचा स्वर पुरता मिटला नव्हता.

मी तिला म्हटलेही, "अगं, आता आली ना ती परत? मग पुन्हा कसली काळजी करतेस? "

त्यावर लक्ष्मीचे ट्रेडमार्क हसू पुन्हा तिच्या ओठांवर उमटले आणि जणू डोक्यातले विचार झटकत ती पुटपुटली, "कायम मीच तिला सांगत आले आहे की दुसऱ्याच्या उपयोगी पडावं, अडल्यानडल्याला मदत करावी.... आता या बाईसाहेब कोणाकोणाच्या मदतीला अशा धावून जातात ते पाहायचं.... हां! मात्र आता तिला वॉर्निंग मिळाली आहे की असं काही झालं की आधी फोन करून आईला कळवायचं... "

लक्ष्मीच्या उद्गारांवर मी कुतूहलाने विचारले, "म्हणजे त्याने काय साध्य होईल?"

त्यावर खळखळून हसत लक्ष्मीने माझे हात हातात घेतले व आपल्या हसण्याचे चांदणे डोळ्यांतून उधळत उद्गारली, "म्हणजे मग मीपण तिच्या मदतीला जाईन!! "

-- अरुंधती

(ब्लॉगवर पूर्वप्रकाशित)

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

हे वाचतानासुद्धा मीनू लवकर न येण्याचे कारण कळेपर्यंत मनात हजारो वाईट शंका येत होत्या. म्हण्जे तिच्या आईला काय वाटले असेल . कारण कळल्यावर हुश्श वाटले. मस्त!!

सर्वांचे मनापासून धन्यवाद! रेव्यूसाहेब, तुम्ही मला फार मोठे कॉम्प्लिमेन्ट दिले आहेत हो! गाय डी मोपसांच्या कथांची मीही चाहती आहे! तशा कथेच्या जवळपास जरी ही कथा आलेली असली तरी खूप! धन्यवाद! Happy

छानच आहे. मीपण मीनू येइ परेन्त काळजीतच होते. पहिले सुगंधाचे वाक्य म्हण्जे अगदी अगदी.
त्यात तामीळ घरात बॅक ग्राउंड ला सांबार/ कूटू चा वास असतोच. केरळात फ्राइड बनाना चिप्स्चा व आंध्रात गोंगुरा चट्णीचा. उत्तम वातावरण निर्मिती.

कित्ती गोड गं अकु.. लेकीला यायला जर्रासा उशीर झाला तर माझीही अशीच तडफड व्हायची.. अजूनही होते Happy

धन्स सगळ्यांचे! Happy

अश्विनीमामी, अगदी अगदी.... माझ्या समस्त दाक्षिणात्य मित्र-मैत्रिणींच्या घरी कधीही गेलं की ते ते सुगंध हटकून येतातच! सांबारचा घमघमाट तर अहाहा! Happy

डेलिया, मेधा, वर्षा.... आई ही अशीच असते! मुलगी कितीही मोठी झाली तरी तिची काळजी करणारी.... Happy

निंबुडा, तुझी स्मरणशक्ती चांगली आहे! गेल्या वर्षी पोस्ट केली होती ही गोष्ट तिथे मी! काल ब्लॉग चाळताना तिच्यावर पुन्हा नजर गेली आणि मग इथे पोस्ट केली! Happy

किती सुंदर लिहल आहे... खुप आवडल Happy
अगदी छोटी पण बोधपुर्ण Happy

सुरुवातीचे वर्णन तर खासच ... <<मंदसा चंदन, कापूर, धूप - अगरबत्ती व सुवासिक फुलांचा दरवळ , दारासमोरील रांगोळी >> या वाक्यांनीच माझ्यासमोर अगदी मस्त , लांब वेणी घातलेली , डोक्यात मस्त भरगच्च गजरे, रेखीव चेहरा... समोर आला. मस्त प्रसन्न वाटले.

ती हरवल्यापसून खूप शंका येत होत्या मनात... शेवटी मनावरचा डोंगर कमी झाला... कथेत सुध्दा असं काही घडु नये असं वाटत राहतं....यावरून आपलं जगणं किती असुरक्षीत झालं आहे हे लक्षात येतं...
खूप छान लिहीलय.

Pages