मखराची बखर : अरुंधती कुलकर्णी

Submitted by संयोजक on 22 August, 2010 - 01:01

2010_MB_GaneshaForK_small.jpg
''सणावाराचे दिवस आले, आत्ता म्हणता गणपती येतील आणि तुम्हाला झोपा सुचतातच कशा!''

''आज घर आवरायला काढणार आहे..... त्या रद्दीतलं तुला जे काय हवंय ते आधीच काढून घे, मग नंतर कटकट केलीस तर ऐकून घेणार नाही!''

''किती रे पसारा घालता तुम्ही! आणि एकदा घेतलेली वस्तू जागच्या जागी ठेवता येत नाही म्हणजे काय? आँ?''

''कोपर्‍यावरच्या फुलवाल्याला सांग, पुढच्या आठवड्यात जरा जास्त दूर्वा, तुळस, फुलं दे म्हणून! आणि हो, उद्या मंडईतून भाजी, फळं, नारळ वगैरे आणायचेत तुला!''

गौरी-गणपतीच्या सुमुहूर्तावर असे संवाद ऐकू यायला लागले की ओळखावे, आता काही आपली धडगत नाही! घरी-दारी हेच संवाद थोड्याफार फरकाने झडत असतात. धुणीभांडी करणार्‍या मोलकरणींपासून ते इमल्यातल्या शेटाणीपर्यंत सर्वांच्या अंगी जणू सणवार घुमू लागतात! घरातील असतील नसतील तेवढी भांडी लख्ख करायची, कानाकोपरा झाडून पुसून स्वच्छ करायचा, कपड्यांची कपाटे उस्तरायची, देव्हारा चकचकीत करायचा, पूजेची सर्व तांबा-पितळ-चांदीची उपकरणी घासून उजळवायची, समया-निरांजने-दिवे -उदबत्तीची घरे यांवरची काजळी काढायची.... कामांची ही लांबलचक यादी न संपणारी!

ज्या ज्या हुशार लोकांना घरकाम टाळायचे असेल, खास करून सणावारांच्या दिवसांत स्वतःकडे कमीत कमी काम कसे येईल हे पाहावयाचे असेल त्यांना सर्वांना माझा ते काम टाळण्यासाठीचा फुकटचा सल्ला : ''कलाकार व्हा!''

असे दचकू नका हो! यात माझा कोणत्याही कलाकारांचा वा कलाकृतींचा उपमर्द करावयाचा हेतू नसून माझ्या दृष्टीने हा एक अतिशय व्यावहारिक व दूरदर्शी सल्ला आहे! गेली अनेक वर्षे त्यानुसार वागून मी घरातील सर्वात कमी कामे माझ्या वाट्याला कशी येतील, अंगभूत आळशीपणाला मुक्त वाव कसा मिळेल ह्यांत पी. एच. डी. कमावली आहे. खोटे वाटत असल्यास आमच्या मातोश्रींना विचारा!

मातोश्रींनी गौरीगणपतींच्या स्वागतासाठी घर आवरायला घेतले की मला हमखास गेल्या वर्षी मखराच्या सजावटीसाठी केलेले कातरकाम शोधायची हुक्की येते. त्या शोधमोहिमेच्या अंतर्गत मग पोटमाळे, कपाटे, पिशव्या, बॅगांमध्ये धुंडाळून झाले की कोठल्यातरी कोपर्‍यात खबदाडीत त्या कातरकामाची पिशवी मला अलगद गवसते. (मधला काळ मी ती पिशवी शोधत असल्यामुळे अर्थातच घरकामाला देऊ शकत नाही हे चाणाक्ष वाचकांना समजले असेलच!) अलीबाबाच्या गुहेतील खजिन्याप्रमाणे मग त्या पिशवीतील साहित्य एकेक करत बाहेर येऊ लागते! ऑरगंडीची फुले, क्रेप पेपर्स, निरनिराळ्या रंगांचे घोटीव कागद, रंगीबेरंगी मणी, वेलवेटचे कापड, सॅटीनच्या रिबिनी, सोनेरी जर, नक्षीदार लेस, आरसे, टिकल्या, विविध डिझाइनचे रंगीत हॅंडमेड पेपर्स, कार्डशीट, जुन्या राख्या, थर्मोकोलचे गोळे, वाळलेले गवत, सुकवलेली फुले इत्यादींच्या जोडीला कधी काळी विणलेले जाडजूड गोफ, गोंडे, अर्धवट कापलेले थर्मोकोलचे पांगळे मखर, निम्मे झाल्यावर कंटाळून सोडून दिलेले मण्यांचे केविलवाणे तोरण, फुलांसाठी कापलेल्या सॅटीनच्या गलितगात्र पाकळ्या असे नजरेस नको असणारे प्रकल्पही आपले अस्तित्व दाखवून देऊ लागतात. त्यावर उपाय एकच - त्यांना न देखल्यासारखे करून पुनश्च पिशवीत ढकलणे!

आता हे साहित्य खोलीच्या मध्यावर सर्वांच्या पायात येईल अशा रीतीने पसरल्यास त्यात जास्त मजा आहे. त्याचा एक फायदा म्हणजे आपण बिझी आहोत व कामात आहोत असे वाटून आपल्याला अन्य जड कामांमधून मिळणारी सूट! आणि जाता-येता घरातील सर्वांना पसार्‍यातून मार्ग काढावा लागल्यामुळे त्यांच्या अंगी बाणणारे चापल्य व लवचिकता अन्य कोठे नाही तरी पुण्याच्या रस्त्यांवरून जाताना तरी त्यांना नक्कीच उपयोगात येऊ शकते! वारंवार दारावरची बेल वाजवून वर्गणीसाठी सतावणार्‍या अनंत गणपती मंडळांच्या कार्यकर्त्यांना वाटेला लावायला, ''दिसत नाही का, बिझी आहे मी आत्ता! नंतर या! ''असे उद्धट उत्तर देण्यासाठीही हा पसारा कामी येत असल्याचा माझा पुणेरी अनुभव आहे!

पुढची पायरी असते आयुधांची जमवाजमव! कात्री, सुरी, टाचण्या, यू क्लिप्स, ब्लेड, गोंद, फेव्हिकॉल, स्टेपलर, फूटपट्टी, पेन्सिली, स्केचपेन्स, मार्कर्स, स्पार्कल्स, सुई-दोरा, चिकटपट्टी इत्यादी विविधगुणी शस्त्रास्त्रांची एकत्र मोळी बांधणे हे तर फार जिकिरीचे काम! अगदी आयत्या वेळी न सापडण्यात त्यांचा हातखंडा! आठवणीच्या जागी अमुक वस्तू ठेवली म्हणता म्हणता ती वस्तू हमखास गरजेच्या वेळेला खो देणार म्हणजे देणारच! मग कितीही धुंडाळा! ''अरे, परवा तर मी अमक्या ठिकाणी पाहिली होती ती वस्तू! '' असे चुटपुटत तुम्ही त्या चुकार वस्तूला 'कुठे कुठे शोधू तुला' करत शोधून दमता, वैतागता. हताश होऊन मग तुम्ही दुसर्‍या कोणत्या तरी वस्तूला हुडकायला लागता मात्र, की ती आधी न सापडणारी वस्तू तिसर्‍याच ठिकाणी आरामात विसावलेल्या अवस्थेत दर्शन देतेच हा माझा संशोधनसिद्ध दावा आहे! सर्व वस्तू एका वेळी एके ठिकाणी जमणे किंवा त्यांचा थांगपत्ता लागणे जवळ जवळ दुर्मिळच असते! तरीही शक्य तितके साहित्य पोटाशी जमा करून मगच पुढची पायरी गाठावी हा माझा अनुभवी फुकटचा सल्ला. कारण एकदा कलाकृतीला सुरुवात केली की तिथून (माझ्यासारख्या आळश्याला) उठणे जीवावर येते. आणि अशा वेळी तुम्ही घरातील कोणाला 'तारणहार' म्हणून एखादी वस्तू आणून देण्यासाठी हाक मारलीत तर आधी कोणी म्हणजे कोणीही तुमच्या हाकांना ढुंकून प्रतिसाद देत नाही आणि जर का चुकून प्रतिसाद दिलाच तर त्या वस्तूला बसल्या जागी हातात मिळण्यासाठी तुम्हाला ज्या काही विनवण्या, मागण्या, धमक्या पुढे कराव्या लागतात त्यांची तर कल्पनाच न केलेली परवडली!!!!

भरपूर वातावरणनिर्मिती करून झाली, आजूबाजूला खाद्यपेयांची सोय करून झाली (महत्त्वाची सूचना : हे पदार्थ/ पेये झाकलेल्या वा बंद भांड्यांमध्ये असावेत! त्यांना नको त्या वेळी सांडून-लवंडून रसभंग करण्याची व उत्साहावर शब्दशः पाणी फिरवायची दांडगी हौस असते!) की ''हॅ हॅ हॅ, ह्याही वर्षी बघा, मस्त होते आहे की नाही आपली सजावट! कशाला बाजारातले ते विकतचे देखावे आणि मखरं आणून पैसे वाया घालवायचे?!! इथे घरात जातिवंत कलाकार मंडळी असताना बाहेरच्या गोष्टींची गरजच काय! '' अशा अर्थाची लांबलचक स्वगते श्रोत्यांची पर्वा न करता झाडावीत. मग शिस्तीत मांडा ठोकून आपल्या बेफाट कलाकारीस आरंभ करावा.

कलाकुसर पूर्ण होईपर्यंत मधल्या काळात आपल्याला अनंत यातनांना सामोरे जाण्यास लागू शकते ह्याची जाणीव असू द्यावी. त्यासाठी जोडीला प्रथमोपचाराची पेटीही जवळपास असू द्यावी. कधी 'आ' करून तोंड वासलेल्या कात्रीवर पाय पडू शकतो. कधी भलत्या ठिकाणी ठेवलेली सुई उत्तमांगी टोचू शकते. कोठेही-कधीही उपटणार्‍या टाचण्या आपल्याला अचानक शरशय्येवर पहुडलेल्या भीष्माचार्यांची आठवण करून देतात. कधी चिकटपट्टीने दोन बोटे एकमेकांना घट्ट चिकटली जाऊ शकतात, कधी आपल्याच बोटाला स्टेपलरने पिन मारली जाऊ शकते. गोंद चुकीच्या ठिकाणी लागल्याने कशालाही काहीही चिकटू शकते. ब्लेड, कात्रीने चुकून आपल्या ड्रेसचाच काही भाग कापला जाऊ शकतो. सुई-दोर्‍याने शिवताना तर विशेष घ्यायची काळजी म्हणजे त्यांना अंगापासून व आपल्या वस्त्रांपासून किमान दोन फुटांवर ठेवावे! हो, एकदा हातातल्या कापडाबरोबर माझा सुंदर कुडताही शिवला गेल्याची आठवण आजही दुखरी आहे! चमचम, थर्मोकोलचे गोळे इत्यादी सूक्ष्म सजावटीचे प्रकार आपल्या वस्त्रप्रावरणांत घुसून आपल्याला नको तेव्हा सतावू शकतात ह्याचीही जाणीव असू द्यावी. गुंतलेले दोरे, जरी, लेस इत्यादी प्रकरणांच्या जाळ्यात तुम्हीही कधी अडकून बसता ते तुम्हालाच कळत नाही. तेव्हा जवळपास किंवा हाकेच्या अंतरावर कोणी असेल तरच त्यांचा गुंता सोडवायला जावा. बाका प्रसंग आल्यास तुम्ही त्यांना ''काका, मला वाचवा!'' च्या धर्तीवर मदतीसाठी आर्त साद घालू शकता. तयार होत आलेली सजावट कायम वेगळ्या पिशवीत ठेवावी. नाहीतर अन्य कोणी अक्कलहुशार जनता त्यास कचरा समजून फेकून देण्याचीच शक्यता जास्त असते! आपल्याला नको असलेला कचरा खुशाल घरातील बच्चेकंपनीस खेळण्यासाठी देऊन ''कचर्‍यातून कचरा'' हा अभिनव उपक्रम राबवावा. एखादा मनाजोगता जमलेला कलाप्रकार राहत्या सोसायटीच्या गणेशमंडळाला उदार अंतःकरणाने वाजतगाजत भेट म्हणून देऊन समस्त बालचमूची खुशी संपादन करावी!

आपली कलाकृती पूर्ण होईपर्यंत आपण नक्की काय साकार करणार आहोत ह्याची कोणाकडेही जाहीर वाच्यता करू नये. अगदी जीवाच्या जीवलगाकडे देखील! हो, कारण भिंतींनाही कान असतात आणि नंतर बदनामीचे भय असते! जर कलाकृतीत कोठे काही विसंगत, बेढब किंवा चमत्कृतीपूर्ण दिसत असेल तर त्याला ''मॉडर्न आर्ट'' किंवा ''मुक्त कलाकारी''च्या नावावर बिनधास्त खपवून द्यावे. आयत्या वेळी घात करणारे गोंद, चिकटपट्ट्या यांसारखे दगाबाज घटक कलाकृतीत वापरले असतील तर त्यांच्या फंदफितुरीचा खाशा समाचार घेण्यासाठी सिद्ध असावे. कलेच्या उत्कर्षासाठी अहोरात्र खपून तयार केलेले मखर, सजावट व कलाकुसर जर बेगुमान वार्‍याच्या किंवा निर्दयी गुरुत्वाकर्षणाच्या जुलुमीपणाला कंटाळून धराशायी झाले तर नाउमेद न होता पुनश्च हरिः ओम करावे! ह्या काळात कोणी असंवेदनशील गृहसदस्याने किंवा भोचक शेजार्‍याने आपल्या कलाकृतीवर मार्मिक टिप्पणी केली तर त्यांच्याकडे तुच्छतापूर्वक कटाक्ष टाकून आपल्या हुंकारांतून व देहबोलीतून आपला निषेध दर्शवावा.

एकदा का मखर सजावट करून झाली की पुढचा भाग येतो कलाप्रदर्शनाचा! आपल्या कलाकृतीला वेगवेगळ्या माध्यमांतून प्रसिद्धी देणे, तिची इतरांकडून स्तुती करून घेणे, त्याबद्दल स्वतःचे कौतुक करवून घेणे ह्यासाठीही अंगी खासे कौशल्य बाणवावे लागते. आधुनिक तंत्रज्ञान त्यासाठी फार कामी येते. सर्वप्रथम आपल्या कलाकृतीचे विविधांगांनी छायाचित्रण करून घ्यावे. ती छायाचित्रे व ध्वनिचित्रफीती सोशल नेटवर्किंग साईट्सवरील आपापल्या प्रोफाइल्स मध्ये डकवून सर्व मित्रमंडळींना त्यावर प्रतिक्रिया देण्याची आग्रहाची दमदाटी करावी. त्यांच्या त्या निवडक, उल्लेखनीय प्रतिक्रिया मग आपल्या ब्लॉगवर छायाचित्रासहित टाकाव्यात. मोबाईलवर आपल्या मखर सजावटीचे फोटो काढून ते लोकांना धाडावेत. घरी आलेल्या अभ्यागत - पाहुण्यांना आपल्या मखर सजावटीचा प्रवास, त्यातील खुबी, वापरलेली कल्पकता जरूर दर्शवून द्यावी. त्यात तुम्ही बनवलेली कलाकृती जर काही ''टाकाऊतून टिकाऊ'', ''कचर्‍यातून कला'' धर्तीवर तयार झाली असेल तर फारच उत्तम! तुम्ही पर्यावरणाविषयीच्या आपल्या मौलिक सूचना, टिप्पण्या, कल्पना समस्त पाहुण्यांना सांगत गेल्याने तुमचा टी आर पी तर वाढतोच, शिवाय बोलायच्या ह्या महत्त्वपूर्ण कामात गढल्याने तुम्ही घरातील इतर, किरकोळ स्वरूपाच्या कष्टाच्या कामांना अजिबातच वेळ देऊ शकत नाही!!

वेळात वेळ काढून बोहरी आळी,रविवार पेठेत साहित्य खरेदीसाठी खेटे घालून घरच्या गौरी-गणपतीला हौसेने घरातच तयार केलेली सजावट, मखर बनविणारे हौशी कलावंत दिवसेंदिवस अस्तंगत होत आहेत. असे असताना त्या जुन्या संस्कृतीला पुनरुज्जीवन दिल्याचा आनंद साजरा करेपर्यंत गणपती-गौरींच्या विसर्जनाची वेळ येते. आपल्या कलाकृतींना आपणच ''आवरावे'' अथवा ''गुंडाळावे''! हीच कला, हीच सजावट पुढील वर्षी नव्या रूपात मांडण्यासाठी बांधाबांध करून ''आठवणीच्या जागी''(!!) अलगद ठेवून द्यावी. आता पुढचे बारा महिने तुम्हाला ह्याच कलाकृतीची पुण्याई घरी-दारी, शेजारी-पाजारी तुम्ही मनस्वी कलावंत असल्याचा डंका पिटण्यात मोलाचा हातभार लावणार असते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

--

विसंगत, बेढब किंवा चमत्कृतीपूर्ण दिसत असेल तर त्याला ''मॉडर्न आर्ट'' किंवा ''मुक्त कलाकारी''च्या नावावर बिनधास्त खपवून द्यावे. donald-duck-022007-3.gif

Happy
वेळात वेळ काढून बोहरी आळी,रविवार पेठेत साहित्य खरेदीसाठी खेटे घालून घरच्या गौरी-गणपतीला हौसेने घरातच तयार केलेली सजावट, मखर बनविणारे हौशी कलावंत दिवसेंदिवस अस्तंगत होत आहेत. >> नाय हाँ. मायबोलीवरचे कलाकार लोकं पाहून complex येतो.

सर्वांचे प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! Happy
दिनेशदा, खरं कधी सांगू नये, खोटं कधी बोलू नये!!! Proud

रैना, हो गं हो....इथले कलावंत पाहिले की जाडजूड ''कॉम्प्लेक्ष'' च येतो मनात! Lol