ओरिगामी गणेश : सावली

Submitted by संयोजक on 21 August, 2010 - 22:51

Origami_Ganapati.jpg
ओरिगामी ही एक जपानी कला!! कागदापासून वेगवेगळे आकार तयार करणारी. अगदी साध्या बोटी पासून अगदी कठीण अशा ड्रॅगनपर्यंत सगळेच आकार बनवता येतात ओरिगामीने. जपानी मुलांना अगदी दोन वर्षांपासूनच कागद कसा नीट दुमडायचा याची ओळख करून दिली जाते. शाळेतही ओरिगामी हा विषय शिकवला जातो. कधी कधी तर मला वाटतं जपान्यांच्या नीटनेटकेपणामागे आणि काटेकोरपणामध्ये या ओरिगामी शिक्षणाचा फार सहभाग असावा.ओरिगामीमध्ये प्रत्येक घडी अगदी काटेकोर असली तरच शेवटचा आकार आपल्या मनाजोगता येतो.असेही म्हटले जाते कि ओरिगामीमुळे गणिती संकल्पना डोक्यात खूप पक्क्या बसतात. अर्थात ही ऐकीव माहिती आहे.

एवढं असूनही मी कधी ओरिगामी शिकायच्या फंदात पडले नव्हते. नाही म्हणायला एक दोन पुस्तके आणून सुरुवातीची फुलं , बोट असं काहीबाही करून बघितलं पण तेवढच. अलीकडे अचानक मला वाटलं की ओरिगामीमध्ये गणपती तयार करता येत असेल का? आंतरजालावर शोधून बघितलं पण फारसं काही सापडलं नाही. भारताच्या ओरिगामी मित्र वेबसाईटवर गणपती केला आहे अस कळलं पण तो कसा करायचा ते मात्र मिळालं नाही. मग हिरमुसले होऊन ती गोष्ट तशीच राहिली. आपणच प्रयत्न करून बघू असंही वाटलं, पण कसा जमणार म्हणून सोडून दिलं. तरी बहुधा मनाने सोडला नसावा हा विचार. कारण फावल्या वेळात ओरिगामीच्या वेगवेगळ्या घड्या पहात होते. त्यानंतर परत एकदा असंच कागद हातात घेऊन ,बघुया जमतंय का काही असा विचार करत, करून बघायला लागले आणि काय आश्चर्य! चक्क गणपतीचा आकार जमतोय असा वाटलं. मग थोडं अजून शोध घेऊन कागदाला वळण कसं द्यायचं ते शोधलं आणि त्यामुळे गणपतीची सोंडही छान तयार झाली. मग बरेच कागद वापरून, पुन्हा पुन्हा करून एक पद्धत नक्की केली. आता तयार झालेला गणपती बघून आनंद अगदी गगनात मावत नव्हता. अगदी कुणाला सांगू आणि कुणाला नको असं झालं. मी इथे ब्लॉगवर लिहिणार तेवढ्यात इथे मायबोलीवर गणेशोत्सवाची तयारी दिसली. तुम्हा सगळ्यांसमोर ओरिगामी गणपती करायची पद्धत आणायला यापेक्षा योग्य संधी कुठली असणार? बहुधा म्हणूनच गणपती बाप्पा अगदी योग्यवेळी कागदातून अवतरले असावेत.

चला तर मग. एक कागद , कात्री आणि गोंद घेऊन बसा माझ्या बरोबर.
१. लागणारे साहित्य

२. तुमचं काम करायला एक चांगली जागा , टेबल ठरवा. कागद मार्बल पेपर (घोटीव कागद ) किंवा त्याप्रकारचा घ्या. फक्त फार जाड नको आणि अगदी पातळ सहज फाटणारा नको.

३. कागदाची दोन टोके अशा प्रकारे जुळवा.

४. मध्यभागी कर्णावर (digonal) एक घडी घालून घ्या.

५. आता कागद परत उघडा

६. मग एक बाजू कर्णावर जोडली जाईल अशी दुमडा.

७. दुसरी बाजूही तशीच दुमडा.

८ मग परत एकदा नवीन तयार झालेली बाजू कर्णावर दुमडा.

९. दुसरी बाजूपण याच पद्धतीने दुमडा.

१०. तुम्हाला अशाप्रकारचा कोनाकृती आकार झालेला दिसला पाहिजे.

११. त्या कोनाचं टोक घेऊन विरुद्ध बाजूला टेकवा.

१२.दाबून नीट घडी पाडून घ्या.

१३.त्यानंतर या अर्ध्या भागाला परत एकदा दाखवल्याप्रमाणे दुमडा.

१४.हा वर आलेला छोटा भाग उलटया बाजूने परत एकदा दुमडा.

१५.या घडया उलगडल्यावर असे दिसले पाहिजे.

१६.मग पहिली घडी अशी दिसली पाहिजे.

१७.ही पहिली घडी तिथे कात्रीने दाखवल्याप्रमाणे कापा. दोन्ही बाजूला असे कापून घ्या.

१८.कापलेला भाग उघडून एक छोटीशी घडी घालून दाखवल्याप्रमाणे दुमडून घ्या.

१९.दोन्ही बाजूला सारखेच दुमडून घ्या. हा होईल गणपतीच्या कानाचा भाग.

२०.या कानाचे खालचे कोपरे किंचितसे दुमडा म्हणजे मग समोरून छान कानाचा आकार येईल.
<

२१.आता समोरुन बघितल्यावर गणपतीसारखा दिसायला लागलाय ना?

२२.परत एकदा मागच्या बाजूने सोंडेचा भाग असा घडी करा.

२३ व २४. त्यावर उरलेला सोंडेचा भागही तशाच पद्धतीने घडी घालत रहा.

२५.शेवटी असं झिगझॅग दिसलं पाहिजे.

२६.हे असं स्प्रिंग सारखं वाटलं पाहिजे. मग हा सोंडेचा भाग छान दिसतो.

२७. हे झिगझॅग उघडा पण सगळ्यात पहिली घडी (२२ मध्ये घातलेली ) मात्र उघडू नका हं. उघडल्यावर असा दिसतं. पुढच्या पायऱ्या करायच्या नसतील तर इथेच थांबून सुद्धा चालेल. हाही आकार गणपतीसारखा दिसतोच आहे. डोळे काढल्यावर आणि दात लावल्यावर अगदी छान गणपती दिसतो. पण वक्रतुंड गणेश हवा असेल तर मात्र पुढच्या पायऱ्यांकडे वळाच.

२८.या पुढच्या घड्या थोड्या कठीण आहेत. कागद अशाप्रकारे मध्यावर दुमडून घ्या.

२९.सोंडेसाठी आपण आधीच पाडलेल्या आडव्या घड्या परत एकदा दाबून नीट दिसतील अशा करून घ्या.

३०.आता दाखवल्याप्रमाणे प्रत्येक आडव्या घडीसाठी एक तिरकी घडी करा. ही तिरकी घडी करताना लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे जितकी जास्त तिरकी तितकी जास्त वळलेली सोंड. म्हणून कमी तिरक्या करा. घडी करताना त्रिकोणाचे शीर कागदाच्या उघड्या बाजूकडे ठेवा. हे उलटे केलेत तर सोंड बाहेर वळण्या ऐवजी आतल्या बाजूला वळेल.

३१.उघडल्यावर असं दिसलं पाहिजे. ही खूपच महत्वाची पायरी आहे.

३२.त्या घडया अशा त्रिकोणाकार दिसल्या तरच पुढच्या घड्या घालता येतील.

३३.आता फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे आडव्या आणि तिरप्या रेघेवर असं दुमडा. त्यामुळे तिरकी घडी वर येऊन आडवी घडी त्या तिरक्या घडीच्या खाली झाकली जाईल.

३४.वरच्या पायरीमध्ये सांगितल्याप्रमाणे अजून तीन आडव्या घडयांसाठी करा.

३५.शेवटच्या घडीत मात्र अगदी टोक दिसू नये म्हणून थोडं टोक मागच्या बाजूला दुमडून घ्या. आणि शेवटची घडी अशी त्या मध्यकर्णावरच आतल्या बाजूला वळवा.

३६. आता तुमच्या घडया अशा दिसू लागल्या असतील.

३७. मधली कर्णावरची घडी उघडल्यावर छानसा गणेशाकार दिसू लागला असेल नाही? त्याचा वरचा डोक्याचा टोकदार भाग मागच्या बाजूला दुमडून टाका आणि मग गणपतीचा चेहरा बघा किती छान दिसतोय ते.

३८.त्याला सुंदरसे डोळे काढा. गंध काढा. अरे हो दात राहिलाय ना अजून!

३९.आता एक पांढरा २ सेमी x २ सेमीचा तुकडा घ्या.

४०. त्याचा परत ३ ते ७ पायऱ्या वापरून एक कोन करा.

४१. तो मध्यावर दुमडून टाका आणि मग हा चिमुकला कोन दाताच्या जागी गोंदाने चिकटवून टाका.

४२ व ४३ . आता या गणपतीचे काय करणार बरं? बघा, तुम्हाला याचं पॉपअप ग्रीटिंग कार्ड करता येईल.
 

४४. मी हा गणेश असा सोनेरी कागदावर चिकटवून भिंतीवरच लावलाय.

काय मग आता शिकवणार ना हा गणपती आपल्या मित्र मैत्रिणींना आणि आजूबाजूच्या बच्चे कंपनीला? तुम्हाला आणि इतरांनाही आवडला तर मला येऊन सांगायला विसरू मात्र नका.

या इथे तुमच्यासाठी सगळ्या पायऱ्या एकत्र.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इतक्या वर्षांनी हा धागा वर आलाय !
प्रमोद् ताम्बे , नक्कीच. आपल्या भेटीचा योग आला तर नक्की हा गणपती घेऊन येईन तुमच्यासाठी.
तो तुम्हाला भेट म्हणुन मिळालेला गणपतीही सुंदर आहे.

सावली खुप छान बनवलाय गणपती. आमच्या नातींना खुप आवड्ला. सध्या आम्ही येथे निशिकसाइला आहोत. मध्यंतरी इस्कॉन टेम्पल बघायला गेलो होतो तेथेही असा गणपती पाहिला. नातींना खुप आवड्ला .बाकी कलाक्रुती पण छान होत्या. मस्त वाटल.भेट झाली असती तर मुलींची ओळख झाली असती.. आम्ही ५ ता. पर्यंत आहोत. परत एकदा कौतुक करते.

Pages