प्रार्थना

Submitted by harish_dangat on 20 August, 2010 - 18:25

झोळीचे ना ओझे व्हावे
इतुकेच मज देई देवा
मन शांतीने भरुन राहो
कुणाचाही ना वाटो हेवा

दिवसा वर्षावी तू बा
मजवर उन्हाची माया
रात्री डोके ठेवताच क्षणी
निद्राधीन व्हावी काया

आग वैर अन सुडाची
कधीही नकोच पोटी
गाणे फक्त आनंदाचे
सदोदित यावे ओठी

उरात माझ्या वाहत राहो
नित्य चैतन्याचा झरा
नको मुखवटा चेहर्‍यावरी
जो दिला तू तोच बरा

कोणावरती नको असूया
कोणावरती नको रुसावा
लहान वा मोठा कोणी
चेहरा त्यासी हसावा

मरणाची मज नको भीती
पण जगण्याचा ध्यास हवा
नको मज पांडीत्य वेदांताचे
पण जीवनाचा अभ्यास हवा

मज जगण्याचे सामर्थ्य हवे
कुणावर माझा भार नको
पायवर मी उभे रहावे
कुणाचाही आधार नको

पक्वान्नाचे ताट नको
कष्टाचे पुरे दोन घास
नको ऐशारामी जगणे
कष्टाची मी धरावी कास

जेजे मजशी देशी देवा
ते ते इतरांशी द्यावे
सद्गुणाचे हे गुणगाण
एकमुखे सर्वांनी गावे

हरीश दांगट

गुलमोहर: