शेरलॉक होम्सचे जग: भाग १

Submitted by यशवंत कुलकर्णी on 19 August, 2010 - 15:57

शेरलॉक होम्स हा विषय बर्‍याच दिवसांपासून मनात घोळतो आहे. विषय इंटरेस्टींग आहेच; त्याबद्दल असंख्य ठिकाणी छापून, लिहून आलेलं वाचूनसुद्धा शेरलॉकबद्दल मला लिहावं वाटत आहे - सखोल कायसं म्हणतात ते करायचा भुंगा डोक्यात गुईंगुईं करतोय. म्हणजे आंघोळ करताना नाही का एका कानात पाणी जातं आणि कितीही काही केलं तरी कानात सुईंफूईंबीईंईं असा आवाज चालुच राहातो तसं. हो..हो..शू:क्क्क्क..विषय गंभीर आहे..हे आवाज बिवाज बास आता. पण थोडंसं बेअरींग येई पर्यंत असे आवाज काढावे लागतात - तंबोरा तबला जुळवताना ते वाजवणारे पहिल्यांदा अर्धा-पाऊण घंटा बेजार होतात ना तसं. ह्याट!! साला अजून एक किस्सा सुचला या तंबोरा-तबल्यावरून. आज शेरलॉकचा उध्दार होणार नाही असं दिसतंय. पण थोडक्यात आवरतो. बर्‍याच लोकांनी वाचलाही असेल. इंग्रजी अमलात एका नवाबानं व्हाईसरॉयच्या स्वागतासाठी मैफिल ठेवली. ते आले सगळे, वाजणारे - गाणारे आणि सुरू केली त्यांनी आपापली वाद्यं एका ताला-सुरात लावायला. टंग..ठॉक.. ठॉक..दुडडुम्बाक...थँक...ढिगांग...हे चालू असताना नवाबानं व्हाईसरायला सहज अदब म्हणून विचारलं कोणत्या प्रकारचं संगीत ऐकायला आवडेल आपल्याला? व्हाईसरॉय गडबडला. त्याला काही माती कळत नव्हतं भारतीय संगीत काय असतं ते. तो म्हणे हे काय, हे टंग..ठॉक.. ठॉक..दुडडुम्बाक...थँक...ढिगांग... हेच मस्त वाटतंय...हेच वाजवा. आता नवाब तो नवाब. व्हाईसरॉयला जे आवडतं तेच संगीत. त्यानं वाजवणार्‍यांना दिला आदेश - तुमचं हेच चालू राहु द्या. आणि ती मैफिल तंबोरे-तबले लावता लावता निघणारे आवाज ऐकूनच पार पडली.
आता ब्रिटीश कालखंडात झालाच आहे आपला प्रवेश तर याच वाटेनं थोडं पुढं २२१बी, बेकर स्ट्रीट, लंडन इथं जाऊया. जगातील इंग्लिशच्या जवळपास सर्व वाचकांना शेरलॉक होम्स आणि डॉक्टर वॉटसनचा हा पत्ता माहित आहे. सर आर्थर कॉनन डॉयल या लेखकानं १८८७ साली पहिली डिटेक्टीव्ह कथा प्रकाशीत केली. शेरलॉक होम्ससुध्दा स्वत:ला जगातला पहिला "कन्सल्टींग डिटेक्टीव्ह" म्हणवतो. इंग्लंडमधील रेल्वे पटरीवर धावायला लागून पंच्याऐंशी वर्षे उलटली होती, स्टेशनबाहेरच्या दगडी-चिर्‍यांच्या रस्त्‍यावरून व्हिक्टोरिया बग्ग्यांची खडखड करीत ये-जा चालु होती. एव्हाना तारयंत्रेही वेळेवर आणि हव्या त्या माणसाला तारा पाठवू लागली होती, बर्हिवक्र भिंगातुन सुध्दा बरेच काही दिसत होते आणि सॅम्युअल कोल्टच्या रिव्हॉल्व्हर्स वापरून इंग्रजांचा नेमही बराच सुधारला होता. स्कॉटलंड यार्डच्या कर्कश्श शिट्ट्या वेळी अवेळी ऐकू येत होत्या; शिवाय टाईम्स, मॉर्निंग पोस्ट, ऑब्झर्व्हर इ. सारखी वृत्तपत्रेही योग्य त्याच आणि वेळच्या वेळी बातम्या छापत होती. औद्योगिक क्रांतीतून पैदा केलेला माल घेऊन इंग्रजी जहाजं जगाच्या कानाकोपर्‍यात ये-जा करीत होती. जगभरातील छोटे-बडे राजे रजवाडे, राण्या लंडनमध्ये चकरा मारत होत्या; लंडनच्या गुढ गंभीर वाटणार्‍या पेढ्या जगभरातील हिर्‍या-माणकांनी बहरून गेल्या होत्या. सेशन्समध्ये असणारे कोर्ट खून-बलात्कारातील गुन्हेगारांना पंधरा दिवस-महिनाभराच्या आत फासावर लटकावण्याचा हुकूम पास करून कचाकच पेनांची निबं तोडत होते. आर्थर कॉनन डॉयल हा डॉक्टर पहिल्यांदा भारतात येऊन अफगाण युध्दात जेझाईल बुलेट खाऊन लंडनच्या धुकेजलेल्या हवेत परत गेला होता.

शेरलॉक होम्सचे जग: भाग २
मागच्या पोस्टमधील शेवटचा परिच्छेद वाचुन मी इथं शेरलॉक होम्सच्या डिटेक्टीव्ह कथांचे रसग्रहण लिहीत आहे असा समज होण्याची शक्यता आहे. लिखाण पुढे जाईल तसं अगदीच आवश्यकता असेल तेव्हा ते घडेलच; पण रसग्रहण करून देण्यावर माझा विश्वास नाही. रसग्रहण म्हणजे आपल्या वाट्याला आलेल्या रसातून दुसर्‍याला कनेक्शन देण्यासारखे वाटते; तो रस कितपत दुसर्‍यापर्यंत जातो देवजाणे. कदाचित यामुळेच रसग्रहण छाप पुस्तके निरस वाटतात. माझा इंटरेस्ट आहे तो सर ए.सी. डॉयल (अंशत:) शेरलॉक, त्याच्या भोवतीचे जग, त्याकाळची इंग्लिश भाषा, काही प्रमाणात इंग्रजांचे रितीरिवाज यांची उचक-पाचक करणे यात. कारण शेरलॉकच्या सर्व गूढकथा याच जगात उगवल्या होत्या. शेरलॉक हे एक पात्र आहे - त्यात ओतलेला ए.सी. डॉयलचा मेंदू महत्वाचा आहे - यातून निष्कर्ष वगैरे देखील काही काढायचा नाही - मी फक्त शेरलॉक होम्सच्या गूढरम्य रानातून येढा करायला निघालो आहे. येढा करणे म्हणजे सहज शिवारातून आजूबाजूचे पीक-पाणी, पक्षी, झाडे-वेली पाहात-पाहात एक चक्कर टाकणे. तशी ही चक्कर आहे. थोडक्यात शेरलॉकचे जग हे निमित्त आहे आणि मी इथं माझी अक्कल पाजळतोय.

मागच्या पोस्टमध्ये शेवटच्या परिच्छेदात जी शब्दांची जमवाजमव केली आहे ती फक्त त्याकाळच्या सुसंघटीत, सूत्रबध्द आणि फुल्ली नेटवर्क्ड इंग्लिश जगताची एक किंचीतशी झलक आहे. ए.सी. डॉयलने मांडलेले ते पुस्तकी जग वाचताना दुवे कसे फटाफट जुळतात - ए. सी. डॉयलने मांडलेले जग ही त्याकाळच्या इंग्लिश जगताची एक सुंदरशी झलक आहे. हे इंग्लिश लोकच मुळात सुव्यवस्थित, कायदेकानू करणारे आणि केलेल्या कायद्याला सार्थकी लावणारे, शिस्त बाळगणारे. काहीवेळा अतिरेक होतो; पण शिस्त मस्त असते. बोअर झालं. अर्थातच एक किस्सा सांगावा लागणार. टायटॅनिक चित्रपटात जहाज बुडताना लिओ डी’कॅप्रिओला सेलरमध्ये नेऊन पाईपला बांधलेले असते. केट विन्स्लेट त्याला शोधत येते. त्याला हातकडी घालून पाईपला अडकवलेला असतो. केट कुर्‍हाड शोधून आणते आणि हातकडी तोडायला धावते. तो तिला आधी लाकडी टेबलावर कुर्‍हाड सरळ मारण्याची प्रॅक्टीस करायला लावतो. दोन-तीनदाच. तिकडे जहाज फुटलेय. माणसं मेलीत. यांच्याही गळ्यापर्यंत पाणी येतेय आणि हा बाबा तिला म्हणतोय कुर्‍हाड आधी सरळ मारायला शिक, मग हातकडी तोड. ती तसे करते आणि हातकडी तोडते. हे भारतात होणे शक्य नाही! भारतीय माणूस म्हणाला असता - हाण कसाही धडाका, हात तोड! पण लवकर सोडव ! भारतीय (आणि त्यातल्या त्यात मल्लू - मगधीरा!!!) हिरो-बीरो असता तर तो बुडते जहाज घेऊनही आकाशात उडाला असता हा भाग अलाहिदा !
तर पुन्हा एकदा ट्रॅकवर येतो. शेरलॉकच्या कथांतून आपल्या मनाची पकड घेणारे सुसंघटीत, सूत्रबद्ध आणि फुल्ली नेटवर्क्ड जग ही ए.सी. डॉयलची काल्पनिक निर्मिती आहे; पण त्याची ही काल्पनिक निर्मिती हिंदी सिनेमासारखी बेफाट नाही. ती तर्काच्या कसोटीवर खरी उतरूनही सत्य शोधल्यानंतर तर्काला चारीमुंड्या चीत करणारी आहे. शेरलॉकचीच वाक्ये घेतो:-
It was easier to know it than to explain why I know it. If you were asked to prove that two and two made four, you might find some difficulty, and yet you are quite sure of the fact.
(मला कसे समजते हे विश्लेषण करीत बसण्यापेक्षा ते समजण्याची प्रक्रिया सुगम असते. तुम्हाला दोन आणि दोन चारच का होतात हे सिध्द करायला सांगितले तर अवघड होईल, पण दोन आणि दोन चारच होतात हे सूर्यप्रकाशाइतके सत्यदेखील असते - ए.सी. डॉयलच्या कथांचाच नव्हे तर जगातील सर्व गुढातिगुढांचा (यात तथाकथित भारतीय आध्यात्मिक गुढे देखील आली) डोलारा या सूत्रावर उभा आहे - बाकी जे आहे तो सगळा रंगीत, निव्वळ चटकदार तपशील आहे - आणि एका ठराविक मर्यादेनंतर तपशील कितीही रंगीबेरंगी, चटकदार असो तो रंगहीन होतो; निरस होतो )

I never guess. It is a shocking habit — destructive to the logical faculty.
(मी कधीच अंदाज लावत नाही. ती बेकार सवय आहे - ती सरळ सत्यापर्यंत घेऊन जाणार्‍या तर्काच्या मार्गावरून कल्पनांच्या जंगलात घेऊन जाते)

डिटेक्टीव्ह कथांचे सोडा, आपले रोजचे दैनंदिन आयुष्य नुसते अंदाज लावत बसण्यात, आणि आपणच गेस केलेल्या गोष्टींभोवती गोल-गोल फिरण्यात उलटते. कल्पना काहीतरी वेगळीच असते आणि रिअ‍ॅलिटी अगदीच वेगळी - आपण रिअ‍ॅलिटीपासून कोसो दूर - कल्पनांच्या जंगलात वाट चुकलेलो असतो. पुढं मग आपण निर्माण केलेली कल्पना खोटी ठरली की आदळआपट, आपली कल्पनाच कशी खरी आहे हे सिध्द करण्याचा अतोनात आटापिटा - आणि वेळोवेळी सत्यतेच्या आसूडाचे फटके खाणे. एकतर सत्यतेला सिध्द होण्याची काही गरज नसते - जो माणूस सत्यतेला सिध्द करू पाहातो तो अर्थातच भटकलेला असतो - मुळात माणूस सत्यता सिध्द करीत नसतो तर तो स्वत:ला सिध्द करीत असतो. त्यामुळे सत्य स्वयंसिध्दच असते, ते तसेच राहाते आणि माणसे उलटतात - संपून जातात. उदा. आत्ताच माझ्या मैत्रिणीचा एसएमएस आला आहे- "अरे झोपला आहेस का?" आता मी झोपलेलो असेन तर उत्तर देणार नाही आणि ती समजून जाईल की मी झोपलो आहे - हा साधा तर्क आहे, सत्यतेपर्यंत घेऊन जाणारा आहे. पण इथेच जर कल्पना मध्ये तडमडली तर "झोपलाच असेल कशावरून? मुद्दाम उत्तर देत नसेल तर? " की झाली बेजारी सुरू तिकडं. आता मी झोपलेला नसून इथे ही पोस्ट टाईप करतोय ही रिअ‍ॅलिटी आहे. उत्तर आलेले नाही त्याअर्थी झोपला आहे हे समजणे तिच्यासाठी मानसिकदृष्ट्या फायदेशीर आहे. हे विश्लेषण मनोरंजक नाही. थांबतो.

गुलमोहर: 

चांगले लिहिले आहेस रे, यशवंत. पण जरा डिटेलमध्ये नीट लिही की. थट्टामस्करी ठीक आहे, पण विषय चांगला आहे. सविस्तर लिही.

चांगले लिहिले आहेस. हो जरा डिटेल मधे आवडेल वाचायला.
शेरलॉक होम्सच कुठलही पुस्तक हे माझे अत्यंत आवडतं Happy त्याची विचार करण्याची तर्कशुद्ध पद्धत आणि फोन, फोटो, ब्लड टेस्ट अस काहीच उपलब्ध नसताना केलेली डिटेक्टीव्हगिरि बेस्ट Happy

वेगळा विषय आहे. शेवटचा पॅरा आवडला.
मी स्वतः माझं ईंग्लिश वाचन शेरलॉक होम्स पासुनच सुरु केलं, खरच फार छान लिहील्या आहेत सगळ्याच कथा. सर डॉईल वातावरण फार छान उभं करतात. मला कधीही "ईंग्लिश बॅकवुड्स" म्हंटलं की लहान असताना शेरलॉक होम्स च्या कथांमध्ये वाचलेले प्रसंगच डोळ्यापुढे येतात. मुख्य म्हणजे पुढे जेव्हा, शेरलॉक होम्स ची टिव्ही मालिका आणि सिनेमा पाहायला मिळाले तेव्हा पडद्यावर दाखवलेलं वातावरण आजिबात वेगळं वाटलं नाही कारण वाचताना डोक्यात उभं रहिलेलं वातावरण आणि पडद्यावरचे वातावरण अगदी सारखच होतं.

चांगलं लिहीलय तुम्ही, अजून वाचायला आवडेल. Happy

आता जे लिहिले आहे ते आवडले .
मलाही शेरलॊकच्या कथा फारच आवडातात आणि ते इन्ग्लीश कल्चर,बग्गी, त्या काळातली घर, तो काळ वगैरे
पण अजुन विस्ताराने लिहिले असते तर आणखी मजा आली असती वाचायला!

मी, शेरलोक च्या फिल्मच्या शेवटी असलेले व्ह्यायोलीन पिस माझ्या मोबाईलची रिंगटोन म्हणुन सेट केले आहे!!! Happy

फचिन, सावली, वैद्यबुवा, अमि_नव
शेरलॉकचे चाहते इथेही आहेत हे पाहुन आनंद झाला. नक्कीच आता डिटेलमध्ये लिहीतो. मायबोलीवर काही लिहीण्याची माझी ही पहिलीच वेळ आहे - तेव्हा सांभाळून घ्या.
डॉ. ए.सी. च्या शैलीचा मी डायहार्ड चाहता आहे. नंतर ग्रॅनडाची सिरीज, जेरेमी ब्रेटचा होम्स, डेव्हिड बर्क आणि नंतर एडवर्ड हार्डविकचा डॉ. वॉटसन असा जमला होता की क्या कहने!
पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद.

फारच छान. अजून लिही. जेरेमी ब्रेट म्हणजेच होम्स आणि होम्स म्हणजेच जेरेमी ब्रेट! मला फक्त तोच दिसतो. वातावरण, बारकावे, भाषा (सर्वात जास्त परिणामकारक) , अभिनय, सगळंच भारून टाकणारं आहे ग्रॅनडाच्या सेरीजमध्ये... रॉबर्ट डाऊनी आणि जड लॉ नी पण चांगली 'री' ओढली आहे.

रॉबर्ट डाऊनीच्या आयर्न मॅनमुळे तो होम्स वाटला नाही
जेरेमीचं आयुष्य खलास झालं होम्स करता-करता
पण तरी मस्त आहे डाऊनी

सहिये. गुड वन. अजून लिहा. Happy
शेरलॉकचा तो विंग्रजी तुटकपणा, त्याची सतत तर्काधिष्ठित विचारपद्धत, किंचीत विक्षीप्त वागणे एकदम जबरी. त्याला तो जरासा नॉर्मल दोस्त वॅटसन ठेवला ते लई भारी क्येलं डॉयिलने.
पुन्हा काढायला पाहिजे वाचायला. खूप वर्षांपूर्वी वाचलं होतं ते बाड.

मस्तच रे!
डॉयलच्या शेरलॉक सोडून अन्य कथाही भारी आहेत. सत्यजित रेंचा फेलुदा शेरलॉकशी साम्य असणारा आहे.

आवडलं.
>>थोडक्यात शेरलॉकचे जग हे निमित्त आहे आणि मी इथं माझी अक्कल पाजळतोय. Happy
त्याच्या निमित्ताने अजून किती पाजळता येईल याबद्दल उत्सुकता आहे. पुढच्या भागाची वाट पहात आहे. Happy

btw, >> जेरेमी ब्रेट म्हणजेच होम्स आणि होम्स म्हणजेच जेरेमी ब्रेट.
हो.