श्रीनिवास पेंढारकर - एक बाप - क्रमशः - भाग १९

Submitted by बेफ़िकीर on 16 August, 2010 - 13:57

आपल्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी आपण बाबांना अन आजीला वाटेल ते बोललो, पण आपल्याला बाबांचा वाढदिवस कधी असतो हेही माहीत नाही? आपल्याला ते कधी विचारावेसेही वाटले नाही?

दिवसभर शाळेत गट्टूला या गोष्टीचा अतीव पश्चात्ताप होत होता. आपल्याला कौतुकाने आणलेली सायकल लेडीज असल्यामुळे व नवीन नसल्यामुळे, केवळ नवीन असल्याचा भास निर्माण करणारी असल्यामुळे आपण ती त्या दिवशी फेकून दिली होती. बाबांना काय वाटले असेल याचा विचारही केला नाही. समीरदादाच्या आई बाबांना परवडते म्हणून त्यांनी नवी सायकल आणली. आणि आपण ती पाहून भाळलो आणि आपल्या बाबांनी आणलेली सायकल पुन्हा हातातही घेतली नाही. त्यावेळी बाबांना काय वाटले असेल? आणि आता बाबांची ऑफीसला जायची बस वेगळ्या वेळी येणार म्हणून बाबा इतके मोठे असूनही तीच लेडिज सायकल चालवणार! का तर त्यांना जेन्ट्स सायकल घेणे परवडत नाही.

आपण काय आहोत? काय आहोत काय आपण? आपला स्वभाव काय आहे?

अंतर्मुख होऊन विचार करण्याचे वय नक्कीच नव्हते गट्टूचे! पण दु:ख मात्र सलत होते मनात! आजच्या आज बाबांना सांगायचे की उद्यापासून माझी सायकल तुम्ही वापरा. मी बसने जाईन किंवा लेडिज सायकल घेऊन जाईन! आणि.. आज आपण आजीला विचारू! आपल्या पार्टीसारखी पार्टी करायची का बाबांच्या वाढदिवसाची असे!

गिरीश अभ्यंकर या वर्गमित्राकडून त्याने एक बाप व एक मुलगा एका घरात खेळत आहेत असे चित्र काढून घेतले. त्या बदल्यात त्याने गिरीशला आपल्याकडचा एक स्टीकर भेट दिला. हे चित्र तो त्यांना भेट म्हणून देणार होता. पण... पार्टी करणार कशी? आपण कसे सगळ्यांना बोलवणार? पैसे तर बाबांकडेच मागायला लागतील. आणि आजीने किंवा काकूने दिले तर नंतर ते बाबांनाच परत करत बसायला लागतील. याचाच अर्थ पार्टी आपण देऊ शकत नाही. मग? आपण काय करू शकतो?

विचारांमधे असतानाच एक पिरियड ऑफ मिळाला. आज हिंदीच्या दाबके बाई आलेल्या नव्हत्या. आणि ऑफ पिरियडला एखाद-दुसरा शिक्षक येऊन नुसताच बसतो तसेही झालेले नव्हते. पोरे धिंगाणा घालत होती. त्यातच देवांगने विषय काढला.

देवांग - मला समोसा नाही आवडत..

खरे तर समोसा आपल्याला आवडेल की नाही हेही गट्टूला माहीत नव्हते. पण देवांगच्या बाजूने बोलणेच बरे पडले असते. नाहीतर त्याने उगाचच चार चौघात खिल्ली उडवली असती.

गट्टू - मलाही..
देवांग - तू कुठले कुठले खाल्लेस समोसे?
गट्टू - आमच्या इथे आहे एक स्टॉल.. तिथले..
देवांग - केवढ्याला?
गट्टू - पन्नास पैसे!
देवांग - रीगलचा बारा आण्यालाय..
गट्टू - खाल्लायस?
देवांग - कित्येकदा.. पण मला आवडत नाही..
गट्टू - का?
देवांग - मला क्रीम रोल आवडतो..
गट्टू - हं!

मनात एक आशा होती. कदाचित आज मधल्या सुट्टीत देवांग क्रीमरोल खाऊ म्हणाला तर? बरे होईल! पण देवांगचा मूड वेगळाच होता.

देवांग - मला थ्रील आवडते.

येथे 'मलाही' म्हणणे जरा अवघड होते. कारण समोसा आणि थ्रील यात थ्रील खूपच महाग होते आणि गट्टूला त्याचे बाबा कधीही फारसे बाहेरचे काही खाऊ देत नाहीत हे माहीत असलेल्या देवांगला एकवेळ समोसा या पदार्थाची थाप पचेल पण थ्रीलची पचेल याचा गट्टूला विश्वास नव्हता.

देवांग - तुला नाही आवडत?
गट्टू - आवडतं तसं! पण..
देवांग - पण काय?
गट्टू - खूप नाही आवडत..
देवांग - प्यायलयस?

आता आला का प्रश्न?

गट्टू - हो?
देवांग - कुठे?
गट्टू - मागे सुट्टीत.. सारसबागेपाशी..
देवांग - कसं लागतं सांग बरं?
गट्टू - गोड, गार...
देवांग - ते कुणीही सांगेल..
गट्टू - मग?
देवांग - लिंबासारखं की संत्र्यासारखं.. ??
गट्टू - जरासं संत्र्यासारखं..
देवांग - म्हणजे तू प्यायलंच नाहीयेस..
गट्टू - का?
देवांग - थ्रील हा कोला आहे.. ते काळं असतं..
गट्टू - हो ना मग?
देवांग - ते लिंबासारख किंवा संत्र्यासारखं नसतंच.. लिम्का लिंबासारखा.. गोल्ड्स्पॉट संत्र्यासारखा..
गट्टू - पण मी एक काळं कोल्ड ड्रिन्क प्यायलंवतं ते तरी तसंच लागत होतं..
देवांग - हॅड.. पुड्या सोडू नको..

गट्टू हिरमुसला. देवांग अजूनही हसतच होता. गट्टू त्याला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत होता की सारसबागेपाशी गेलास तर तुला लिंबासारखं लागणारं एक काळ्या रंगाचं कोल्ड ड्रिन्क मिळेल. मग देवांगने आणखीन काही मुलांना ते सांगीतल्यावर सगळेच हसायला लागले.

आणखीनच हिरमुसलेला गट्टू मग उगीचच वहीत काहीतरी असंबद्ध लिहू लागला. पुन्हा त्याच्या मनात बाबांच्या वाढदिवसाचा विचार आला. त्यांच्यासाठी पार्टी कशी करायची याचा विचार आला.

काही सुचेना! देवांगला विचारले तर तो म्हणाला की त्याच्या बाबांच्या वाढदिवसाला बाबाच पार्टी देतात. सगळे हॉटेलमधे जातात जेवायला. हे तर आपल्याला परवडणेच शक्य नाही. बाबा स्वतःही नेऊ शकणार नाहीत हॉटेलमधे! आपण बाबांसाठी एक साधा केकही घेऊ शकत नाही? ....

.... आपण बाबांसाठी एक साधा... केकही.. घेऊ शकत... ... अरे???

.... शकतो.. घेऊ शकतो...

मधल्या सुट्टीत गट्टू सरळ शाळेच्या बाहेर पडला अन रीगल बेकरीसमोर जाऊन थांबला. हरी अन विद्याधर समोसा खाऊन नंतर कोल्डड्रिंक पीत होते. संध्या आठवलेही कोल्ड ड्रिन्क पीत होती. शाळेतील इतर काही मुलेही काही ना काही घेत होती. काय करुयात?

हळूहळू गट्टू काउंटरपाशी गेला. सेल्समन हाच मालक होता. त्याच्या बरोबर आणखीन एकच मुलगा काउंटरवर होता. ते दोघेही शालेय विद्यार्थ्यांना जे हवे ते देण्यात गुंतलेले होते.

गट्टूकडे कुणाचे लक्ष नव्हते. कारण ज्या मुलांना काही ना काही हवे होते ते आपले पैसे काउंटरवरून त्या माणसाला दाखवत त्याला तो पदार्थ द्यायची ओरडून घाई करत होते. तो माणूस अन बरोबरचा कामाला ठेवलेला मुलगा नुसते धावपळ करत ते सगळे पदार्थ मुलांच्या हातात कोंबत होते. हा त्यांचा प्राईम टाईम होता. रीगल बेकरीचे काउंटर खूप लांबलचक आहे. किमान २४ फूट लांब आहे. त्यामुळे तिकडे चाललेली गोष्ट इकडे लक्षात येणे अवघड आहे.

या गोष्टीचा फायदा घेत गट्टूने 'जणू विकतच घ्यायचा आहे' अशा आविर्भावात एक क्रीमरोल हातात घेतला. नेमके आज केक्स काउंटरवर ठेवलेले नव्हते. क्रीम रोल्स होते. जणू विक्रेत्याची आपल्याकडे यायची वाट पाहतोय अशा आविर्भावात तो काही सेकंद विक्रेत्यांकडे अन इतर मुलांकडे बघत बसला. कुणाचेच लक्ष नव्हते. मात्र! संध्या आठवलेच्या दृष्टीने महेश पेंढारकर स्वतःहून रीगलमधे येणे हे चक्रावणारे दृष्य होते. त्यामुळे ती मधून मधून पाहात होती. आता धड तो क्रीम रोल खिशातही ठेवता येत नव्हता अन काउंटरवर परत ठेवायची बुद्धी तर मुळीच सुचत नव्हती. बर! खाऊन टाकला तर दोन प्रश्न होते. कुणी पाहिले तर पैसे द्यायची वेळ येणार होती अन मुख्य म्हणजे बाबांना काय द्यायचे हा प्रश्न तसाच राहिला असता.

'अतिशय कंटाळलो बाबा, हा विक्रेता कधी येणार इकडे' असा अत्यंत त्रासिक चेहरा करून आता गट्टू उभा राहिला. हळूहळू संध्या आठवले निघून गेली. शाळेची पहिली घंटा झालेली होती. हरी अन विद्याधर प्रभात रोड क्रॉस करून धावत चालले होते. दुसर्‍या घंटेच्या आत वर्गात जाणे आवश्यक होते. दुसरी घंटा आता केवळ पाचच मिनिटांमधे होणार होती. रीगलच्या काउंटरची गर्दी घटत चालली होती. तेवढ्यात मालकाने विचारले.

मालक - क्या चाहिये?

गट्टूने 'काहीही नाही' अशा अर्थाने मान हलवत हळूच उजव्या हातातला क्रीम रोल उजव्या खिशात ढकलला.

मालक - क्रीम रोल चाहिये? सव्वा रुपया..
गट्टू - नही..

गट्टू 'काहीच झाले नाही' अशा थाटात आरामात पावले उचलत निघाला. पळाला असता तर मालकाला संशय आला असता असे त्याला वाटले. इकडेतिकडे पाहात क्रीम रोल चाचपत तो वर्गात पोचला. कुणालाच काहीच माहीत नव्हते.

.... चोरी पचली होती...

आरामात पचली होती. मात्र! आता बाबांना क्रीम रोल भेट देण्यातला महत्वाचा धोका लक्षात यायला लागला होता. पैसे कुठून आणलेस विचारले तर काहीच सांगता येणार नव्हते. कारण दुसर्‍याकडून उधार घेऊन क्रीम रोल आणला तर बाबांना आवडणारच नव्हते. आणि गट्टूकडे तर एक पैसाही खिशात नसायचा. बसने यायचा तेव्हा बसचा पास असायचा. सायकल आल्यापासून तोही प्रश्न उरलेला नव्हता. शर्टचा एक अन हाफ पँटचे तीन अशा चार खिशांमधे मिळून शाळेचे आयकार्ड, एक पेन, एक रुमाल आणि सायकलची किल्ली याशिवाय काहीच नसायचे. खिशातील क्रीम रोलचा धोका अधिकाधिक जाणवू लागला.

शाळा सुटल्यावर 'आपल्या खिशात क्रीम रोल आहे' हे कुणी पाहिले अन कधीतरी चुकून बाबांना सांगीतले तर आपले काही खरे नाही या विचाराने तो क्रीमरोलच्या खिशावर एक हात ठेवूनच निघाला. आज सायकल चालवायची नव्हती. ढकलत न्यायची होती. लकडीपुलावर हळूच क्रीम रोल खाऊन टाकला की झाले!

त्या दिवशी लकडी पुलावर उभा राहून एकट्याने क्रीम रोल खाऊन टाकताना...

... महेश श्रीनिवास पेंढारकर... यांच्यात एक आमुलाग्र बदल झाला होता...

आजवरच्या सर्व संस्कारांना त्यांनी तिलांजली दिलेली होती. स्टॅम्प ढापणे यात काहीच वावगे नसण्याची कबुली निदान देवांगच्या आईने तरी दिली होती. पण कोणत्याही कायद्यान्वये एका दुकानातील क्रीम रोल चोरून खाणे ही पूर्णपणे चोरीच ठरली असती अन ते गट्टूला व्यवस्थित माहीत होते.

मात्र! 'आपणच आपल्याकडे लक्ष न देणे' याचे परिणाम पुढे लक्षात येणार होते.

त्या दिवशी संध्याकाळी 'बाबा, तुम्हाला हॅपी बर्थ डे, तुम्हाला पार्टी कशी देऊ?' असे विचारणारा गट्टू श्रीला निरागस भासला होता. त्याने गट्टूला जवळ घेऊन 'या वयात कसली पार्टी, तू मोठा झालास की दे' असे सांगीतले होते अन वर 'पुढच्या महिन्यात तुझी अन समीरदादाची एकत्र मुंज वाड्यातच आहे' हेही अ‍ॅड केले होते. त्यावर 'माझा चमनगोटा करायचा नाही' असे गट्टूने निक्षून सांगीतल्यामुळे श्रीने ते हसत हसत मान्यही केले होते. आज संध्याकाळपासूनच मधूसुदन कर्व्यांकडे मीटिं'गा' सुरू झाल्या मुंजीच्या! त्यात कर्वे पती-पत्नी, श्री, पवार मावशी, मानेकाका, शीला व राजाराम शिंदे, नंदा, अभ्यंकर आजी, निगडे पती-पत्नी, घाटे पती-पत्नी, बेरी पती-पत्नी, कार्याचा अनुभव आहे या कारणासाठी वाड्यातील पुजारी पती-पत्नी वगैरे सहभागी होऊ लागले. जो तो आपापल्या परीने मतप्रदर्शन करत होता. पहिलीच मीटिंग भन्नाट झाली.

मानेकाका - प्रत्येक मीटिंगला पमेनी चहा करायला हवा नाहीतर हा दास्ताने वाडा..
निगडे - अहो माने... मुंजीची मीटिंग आहे.. पेटवापेटवी काय करताय?
मानेकाका - तत्व ते तत्व..
प्रमिला - पण मी चहा करायला नको म्हणतीय का?
श्री - वहिनी.. दुधाचा खर्च आपण विभागून घेऊ..
मानेकाका - चालणार नाही.. दोन चहा झाले पाहिजेत.. आधीचा पमीचा.. अन दुसरा तुझा..
मधू - दोन चहा करा.. त्यात काय आहे?
घाटे - काही जण चहा घेत नाहीत.. त्यां..
मानेकाका - त्यांना स्वतःच्या घरी बसायला सांगा.. इथे कॉफी बिफी मिळणार नाही..
घाटे - माने.. मी मधूशी बोलतोय..
मानेकाका - मुंजीच्या मीटिंगमधले सर्व संवाद हे माझ्या थ्रू व्हायला हवेत व हे न पाळणारा कुणी असेल तर मी हा दास्ताने वा...
प्रमिला - कॉफी करेन की.. त्यात काय एवढं..
घाटे काकू - पमी गोड आहे..
मानेकाका - नसायला काय झालं? फुकटची कॉफी पाजतीय म्हंटल्यावर गोडच असणार..
घाटे काकू - हे मानेकाका घालून पाडून बोलणार असतील तर या मीटिंगमधे आम्ही..
मानेकाका - चालते व्हा.. कुणीही बोलावले नाहीये..
घाटे - माने.. घर कर्व्यांचं.. तुम्ही कोण हाकलणार..
मानेकाका - मी सव्वा पाच आहेर केलावता यांच्या लग्नात..
घाटे - मी... मी तर..
मानेकाका - अरे हाट? तू काय करणार? तू त्या निगड्यानी दिलेलं दुपटं दिलंस आहेर म्हणून यांना.. ज्या दिवशी लग्न त्या दिवशी दुपटं देतात का आहेरात?
निगडे - ते आम्ही दिलेलं नव्हतं घाट्यांना..
मानेकाका - बरोबर.. तुम्हाला स्वतःच्याच घरात दुपटी पुरत नाहीत.. तुम्ही काय देणार दुपटं?
अभ्यंकर आजी - अजून काही बातमीय की काय गं निगडीण बाई?
निगडे काकू - छ्छे? काहीही काय?
पुजारी - मुंजीला गुरुजी लागतील..
मानेकाका - हे सांगायला तू कशाला पाहिजेस?
पुजारी - पमावहिनी.. हे आम्हाला बोलू देणार आहेत की नाही ते आधी स्पष्ट करा..
मानेकाका - अरे हाट?
पुजारी - दास्ताने वाड्यातील सर्वाधिक कार्ये जवळून पाहिल्याचा अनुभव माझ्या गाठीशी आहे..
मानेकाका - ती मयतीची.. इथे मुंज होणारे..
बेरी काका - मी काय म्हणतो..
माने काका - या बेरीला कुणी बोलवलाय?
मधू - अहो काका.. ते नकोत का मीटिंगला.. ??
बेरी काका - हवं तर मी बोलत नाही... पण मी काय म्हणतो..

इतका वेळ मावशी ऐकत होत्या. आता त्या सुरू झाल्या.

मावशी - ए बेरीटणे.. नवर्‍याला गप्प कर.. त्याला 'मी काय म्हणतो'च्या पुढचं आठवत नाही..
बेरी काकू - अहो.. तुम्ही थांबा जरा.. मोठीमोठी माणसं बोलतायत ना?
बेरी काकू - बरं! .... पण... मी काय म्हणतो...
मानेकाका - अरे गप्प?
पुजारी - एकंदर तीनशे पान होईल..
प्रमिला, मधू व श्री एकदम - (भयानक धक्का बसल्यामुळे) - तीनशे?????
मावशी - काय पूरग्रस्तांच्या वसाहतीत जेवण घालायचंय का?
मानेकाका - हा पुजारी पुन्हा काहीही बोलला तर हा माने हा दास्ताने वाडा...
निगडे काका - दोन कोंबडी कापा...
श्री (ताडकन उभा राहात) - कोंबडी? ... क्का???
निगडे काका - शकुनाला बरी..
मावशी - भटांचं कार्यय निगड्या.. वग नाही तमाशाचा.. म्हणे कोंबडी कापा..
श्री - ती ही दोन?
मधू - अरे श्री! कापलीच तर एक काय अन दोन काय!
श्री - म्हणजे?
मधू - कापायचंच नाहीये ना कोंबडं!
प्रमिला - श्शी! कोंबडं काय?
निगडे काका - माझं पटत नसेल तर हा मी..
मानेकाका - ऊठ... ऊठ लेका.. भटं बाटवतोयस?? ऊठ..

निगडे उठले बिठले नाहीतच..

प्रमिला - पण पानं तीनशे कशी?
पुजारी - आता तुमच्या सासरचे वीस..
प्रमिला - हं..
पुजारी - तुमच्या माहेरचे तीस...
प्रमिला - बत्तीस..
पुजारी - बत्तीस..
प्रमिला - हं..
पुजारी - या पेंढारकरांचे एकंदर चाळीस..
प्रमिला - हं..
पुजारी - कर्व्यांच्या ऑफीसची बारा
प्रमिला - हं..
पुजारी - पेंढारकरांच्या ऑफीसमधली आठ..
प्रमिला - हं..
पुजारी - वाड्यातले अठ्याऐंशी..
प्रमिला - दोनशे झाले..
पुजारी - आणि आमची शंभर..

सन्नाटाच पसरला. या पुजार्‍याने स्वतःची शंभर पाने कशी काय घुसडली हे काही कुणाला समजेना!

नंदा - तुमची कसली शंभर?
मानेकाका - ही पुजारीण बाई गांधारीय का?
पुजारी काकू - इश्य! एकाच्याच वेळेला यांचा दम निघालावता..
अभ्यंकर आजी - शुभकार्यात अश्लील बोलू नका रे मुलांनो..
मावशी - ए म्हातारे.. तुझं शुभ कार्य कधी आहे ते ठरव आता पटकन..
अभ्यंकर आजी - देवा... रामा... मला ने रे...
मावशी - तेच म्हणतीय... गेली दहा वर्ष हेच ऐकतीय.. मला ने... मला ने...
प्रमिला - पण शंभर पानं कसली तुमची?
पुजारी - एक सेफ साईड म्हणून धरलीयत..
मधू - सेफ साइड म्हणून शंभर? ही अनसेफ साईड होतीय..
मानेकाका - अन ती सेफ साइडची माणसे तुझ्याचकडची कशी रे?
घाटे - नाहीतर काय? सेफ साईड म्हणून आमची येतील की पाच पन्नास...
मानेकाका - तुझी न यायला काय झालं? साले शासकीय कार्यालयात टेबलाखालून घेणारे नालायक कर्मचारी तुम्ही... तुमच्यामुळे ब्रिटिश बरे होते म्हणायची वेळ आली आमच्यावर.. साधं एक कनेक्शन द्यायचं तर यांना..
प्रमिला - अहो मानेकाका.. विषयांतर करू नका ना..
मानेकाका - गप गं तू! बाईमाणसाने उगाच जास्त बोलू नये चारचौघात..
मावशी - काय म्हणालास?
मानेकाका - तुला नाही म्हणालो.. बाईमाणसाला म्हणालो..
श्री - मला वाटतं सेफ साईड म्हणून दहा धरा..
निगडे - अन ती या पुजार्‍याकडची नका धरू... हे आले अठ्याऐंशीमधे!
पुजारी - माझ्या अनुभवाचा तुम्हाला फायदा मिळावा या दृष्टीने..
मानेकाका - गाढवाच्या **त गेला तुझा अनुभव..
राजाराम शिंदे - मला वाटत लॅन्ग्वेज पार्लमेंटरीच वापरावी असा एक नियम आधी करूयात..
मानेकाका - ए पार्लमेंटरी.. पार्लमेंटरी वागून झाली असतीका ही नैना तुला?
शीला - मुंजीचं बोला ना?
मानेकाका - मग हे काय बोडणाचं चाललंय का?
प्रमिला - म्हणजे दोनशे दहा पानं..
पुजारी - आणि आदल्या दिवशी सत्तर!
प्रमिला - आदला कुठला दिवस? मुंजय! सीमांतपूजन नाहीये..
पुजारी - अहो पण पाहुणे रावळे..
मावशी - माझ्या घरात एकाने पाय ठेवला तर तंगड्या मोडून हातात देईन मी..
श्री - अहो मावशी.. कोणी नाही येणार हो.. उषाताई एकटीय.. तारा आली तर बघू..
घाटे - मीटिंग भरकटतीय..
मधू - आदल्या दिवशी काय आहे पुजारी?
पुजारी - आता माझ्याचकडची जवळजवळ तीस जणं आहेत.. वाड्यात मुंज म्हंटल्यावर..
मानेकाका - पहिला या पुजार्‍याला हाकला इथून..
पुजारी - माने.. मी सभ्य आहे याचा गैरफायदा..
मानेकाका - घंट्याचा सभ्य तू?
मावशी - पुजार्‍या.. आडनावाप्रमाणे वाग नाही तर करणी करीन..
शीला - ब्बाईईईईई! या असलं करतात?
मावशी - ए भवाने..
मधू - पुजारी.. तुमची इतकी पानं एकट्याची योग्य नाहीत..
पुजारी - मग मी या मीटिंगमधून सभात्याग करत आहे..
अभ्यंकर आजी - भांडू नका..
मावशी - ए म्हातारे.. तू तारे नको तोडूस..
अभ्यंकर आजी - हिल वय बी काही कळत नाही.. नेहमी माझा अपमान करते ही..
घाटे - कार्यात मावशी नकोच.. आमच्याकडच्या लग्नात तर..
मावशी - ए घाट्या.. तुझ्या पोरीचं लग्न होतं भातुकलीचं! ही माझ्या नातवाची मुंजय.. आमंत्रणच देणार नाही तुला..
मधू - पमे.. दोनशे दहा पानं आणि तीस रुपये पान.... किती झाले गं?
प्रमिला - बघा की आता..
मधू - बघ ना.. आधी दोनशे गुणीले दहा..
प्रमिला - दहा कशाला? दोनशे गुणीले तीस..
मधू - सहाशे..
प्रमिला - अन दहा गुणीले तीस...
मधू - तीनशे..
प्रमिला - सहाशे अन तीनशे?
मधू - नऊशे..
प्रमिला - बरं पडतंय नाही पान?
मानेकाका - हिशोब शिकवले नाहीत का आईबापांनी?? म्हणे बरं पडतंय पान!
मधू - काय झालं?
मानेकाका - दोनशे गुणीले तीस सहाशे होतात?
प्रमिला - अय्या सहा हजार होतात..
श्री - त्रेसष्टशे रुपये होतायत जेवणाचे..
घाटे - आहेत का एवढे?
निगडे - सगळे तुमच्यासारखे कफल्लक नसतात घाटे..
घाटे - हे तुम्ही पर्सनल बोलताय..
प्रमिला - आणि आहेर वेगळाच...
अभ्यंकर आजी - काही आहेर वगैरे करू नका.. मी आता सुखी आहे..
मानेकाका - तुला कोण गं म्हातारे आहेर देतंय? आं? मी सव्वा पाच आहेर केलावता मध्याच्या लग्नात..
नंदा - ते पाच हजार वेळा ऐकलंय..
मानेकाका - तू? तू बोलतेस मधे? नालायक? कुठे आपण कुणाशी काय बोलतोय कळत नाही?
नंदा - आहेर नकाच करू मधू अन श्री..
श्री - नाही हो.. एक तर कार्य..
मावशी - आहेर रद्द करणार्‍यांच्या दारांवर फुंकर मारीन मी अमावास्येला..
शीला (घाबरून ताडकन उभी राहात) - करा हो भावजी करा.. करा करा आहेर...
बेरीकाकू - (जोषात) आहेर ... (मावशींकडे पाहात, जीभ चावत) .. कराच म्हणत होते मी..
बेरीकाका - पण मी काय म्हणतो..
मानेकाका - एक मिनीट... एक मिनीट.. हा तुपट माणूस मगाचपासून दहा वेळा 'मी काय म्हणतो, मी काय म्हणतो' एवढंच घोळवतोय.. त्याला काय म्हणायचंय ते एकदा ऐका..
बेरी काका - मी काय म्हणतो..
मानेकाका - आता पुढचं बोलला नाहीस तर साप सोडीन घरात..
शीला - काय वाडाय हा...!
बेरी काका - बोलू का?
माने काका - मग आता तुतारी वाजवू का?
बेरी काका - जाऊदे...
बेरी काकू - अहो.. आता बोला ना.. सगळे म्हणतायत तर...
मधू - बेरी काका? बोला..
बेरी - मला.. मला जरा.. लघ्वीला लागलीय.. येऊ का जाऊन.. ???
मानेकाका - तिच्यायला तुझ्या..
बेरी काकू - हे यांना काय विचारत बसलात? ज्ज्जा..
पुजारी - कार्यात आहेर हवाच...
मानेकाका - हा अजून इथेच?
मावशी - या बाबतीत मी या पुजार्‍याच्या बाजुने आहे... कार्यात आहेर हवाच..
प्रमिला - मग करणारच आहे की?
मावशी - गुलदस्त्यात बोलायचं नाही... काय देणार ते आत्ता ठरवायचं! मला दोन शालू हवेत..
अभ्यंकर आजी - दोन कसले?
मावशी - तू कोण हिशोब मागणारी?
निगडे काकू - पण दोन कसले?
मावशी - एक ह्याचा... अन एक त्याचा..
घाटे - गट्ट्याचं केलंय ठीक आहे.. पमीच्या मुलाचं काय केलं यांनी??
मावशी - तुझा का जळफळाट? हिच्या हातावर एक कवडी टिकवू नकोस गं पमे..
प्रमिला - असं नाही हो.. त्याही आहेतच की वाड्यातल्या..
मावशी - चुरूचुरू बोललीस तर जीभ हासडीन..
घाटे काका - पण मला काय म्हणायचंय! माझ्या मिसेसला काय द्यायचं, काय नाही द्यायचं हे ही बाई कशी काय ठरवते?
मावशी - मुंजीत दिसलास तर हाड मोडीन पायाचं..
अभ्यंकर आजी - भांडू नका रे...
मावशी - तू गप्प.. आयुष्य गेलं भांडण्यात स्वतःचं.. नवर्‍याला छळून जाळलंस शेवटी.. आता सांगतीय..
बेरी काका - मी आलो..
बेरी काकू - मावशी? हे आले..
मावशी - मग? ओवाळू?
प्रमिला - अहो... मावशींचे दोन शालू... लिहा..
मधू - दो.. न.. शा.. लू.. मा.. व... शी..
मावशी - ए मध्या.. शालूमावशीला देशील दोन शालू.. पवार मावशी - दोन शालू.. असं लिहीं..
मधू - पवार मावशी - दो.. न.. शा. लू..
प्रमिला - घाटे काकू.. एक साडी..
घाटे काकू - कांजीवरम..
प्रमिला - काकू... आम्हाला झेपेल तसं आम्ही देणार आहोत...
घाटे काकू - त्यात काय झेपायचंय.. दहा वेळा बागेत जातात, नाटकं बघतात.. हे झेपत नाही का?
मधू - काय लिहू?
प्रमिला - आत्ता साडी लिहा नुसतं..
मधू - सा... डी...
मावशी - अरे पण कुणाला?
मधू - घा.. टे... का... कू..
निगडे काका - मला एक बंडी घ्या.. बाकी काही नको..
मानेकाका - याला झोपेच्या गोळ्या द्या... देशाची लोकसंख्या जरा आटोक्यात राहील..
निगडे - माने! माझ्या मुलींना मी पोसतोय.. तुमचा काय संबंध?
मानेकाका - कुठलंही कार्य घ्या... यांच्याकडची पंधरा पानं आहेतच..
निगडे - अरे सोळा येऊदेत... तुमच्या पैशाने घालताय काय जेवायला?
मानेकाका - मध्या.. या निगड्याला काहीही देऊ नकोस..
मधू - नि ग डे का का.... का ही ही... ना ही..
निगडे - मध्या? नालायक? सरळ 'काहीही नाही' म्हणून लिहितोस? रोज पाणी भरायच्या वेळेला तुझ्या बायकोच्या हातचा चहा पितो मी! हे उपकार तुला आज आठवत नाहीत?
बेरी काका - मी काय म्हणतो..??
मानेकाका - जा जा.. ये पटकन जाऊन.. इथे काही म्हणू नकोस..
मावशी - चहा पितो हे उपकार पमीचे की या निगड्याचे?
पमी - नाही हो.. तसं काही नाही.. सगळे आपलेच आहेत...

या वाक्यावर श्रीने झटकन प्रमिलाकडे पाहिले अन तिनेही!

निगडे काका - लिही... मी... बंडी
मधू - मी... बं.. डी..
निगडे - अरे मी काय मी? माननीय निगडे काका - यांना बंडी
मानेकाका - माननीय? हा माननीय कधी झाला?
पुजारी - पुजारी - चाळीस पाने जेवणार व पाच साड्या...
प्रमिला - अहो पुजारी काका.. तुमची दोनच पाने धरलीयत...
पुजारी - दोन? मी सभात्याग करीन..
मानेकाका - तू थांबलावतास कशाला पण मगाचच्या सभात्यागानंतर..
पुजारी - हा मी चाललो..
पुजारी काकू - पमे? या अपमानाची आठवण माझ्या मनात सलत राहील आयुष्यभर..
प्रमिला - अहो? सांगा ना त्यांना.. कार्यात रुसवे नकोत आपल्याला..
मधू - पुजारी काका.. मी माफी मागतो.. आपण थांबा..
पुजारी - मग लिही.. पुजारी.. चाळीस पाने...
मधू - माझं थोडं ऐकता का? ... आम्हाला खरंच... परवडायचं..
पुजारी - ठीक आहे.. मग.. अडोतीस पाने करायला मी परवानगी देत आहे..
मानेकाका - मध्या.. याला लाथा घाल लाथा...
पुजारी - हे माने जर मुंजीत ढवळाढवळ करताना दिसले.. तर..
मानेकाका - ए मावशी.. गप्प काय बसलीयस? हाकल याला..

'वयं पंचाधिकं शतम' या उक्तीप्रमाणे त्रयस्थ शत्रूसमोर पवार मावशी अन मानेकाका एक व्हायचे.

मावशी - ए पुजारणे.. चल ऊठ.. बसली ठाण मांडून मीटिंगेत.. कसला डोंबल्याचा गं अनुभव तुला? पमे.. हा पुजारी अन ही याची नटमोगरी मुंजीत आढळली तर कणीक तिंबेन मी.. मध्या.. लिही.. पुजारी - कटाप...

पुजारी अन पुजारीण हबकून निघून गेले..

बेरी काका - मी काय म्हणतो..
मानेकाका - ए बेरणी.. याला कॉफी करून दे.. जुलाब थांबतात...
बेरी काका - अहो ऐका ना..
माने काका - पटकन बोल अन जा...
बेरी काका - गणेशही आता... दोन वर्षांचा आहे..
माने काका - मग?
बेरी काका - त्याचंही एकात एक..
माने काका - न्हाव्याचं दुकान आहे का मुंज म्हणजे? दिसला घरातला मुलगा की भादरायला?
बेरी काकू - अहो.. गप्प बसा..गणेश केवढासाय..
बेरी काका - मी आधीपासूनच म्हणत होतो हिला...
प्रमिला - काय?
बेरी काका - की राजश्रीच्या पाठोपाठ गणेश येऊदेत.. आज हा प्रॉब्लेम आला नसता..
बेरी काकू- शी.. कुठे काय बोलावं कळतं का?
बेरी काका- ....नाही... स्सॉरी...!
नंदा - बर बेरींचं काय आहे?
प्रमिला - बेरी... एक साडी.. एक कापड.. राजश्रीला फ्रॉक अन गणेशला डबा..
घाटे - एवढं? आम्हालाही मुलं बाळं आहेत...
प्रमिला - ते बरोबरचेत...
घाटे - कोण?
प्रमिला - समीर, राजश्री अन गट्टू..
घाटे - मग गणेश कुठनं आला मधेच?
प्रमिला - आता तो सख्खा भाऊच आहे की राजश्रीचा..
घाटे - हो पण ती पिढीच वेगळीय..
मधू - मी काय लिहू?
प्रमिला - बेरी.. एक साडी, एक कापड, एक फ्रॉक अन गणेशचं बघू..
मधू - गणेशचं बघू असं लिहू?
प्रमिला - हो! आत्ता तसंच लिहा..
बेरी काका - गणेशचं काय बघणारेत गं हे?
बेरी काकू - आहेराचं!
श्री - आता अभ्यंकर आजी..
अभ्यंकर आजी - मला काही नको..
मधू - का.. ही.. न.. को..
अभ्यंकर आजी - काय लिहिलं ग यानं?
मावशी - तू म्हणलीस तेच... का.. ही.. न.. को..
अभ्यंकर आजी - (डोळे पुसत) कर्वे वाड्यात आले.. तेव्हा मधू चार वर्षांचा होता.. सारखा माझ्याकडे यायचा.. आजी.. मोदक दे .. मोदक दे.. हातावर कधी काही ठेवलं नाही असं व्हायचं नाही..
प्रमिला - अहो.. एक नऊवारी लिहा..
मधू - एक नऊवारी..
अभ्यंकर आजी - काय लिहिलंय गं यानं?
मानेकाका - पातळ.. तुझ्या नावाने..
अभ्यंकर आजी - आणि.. ह्यांच्याकडे सारखा श्रीखंडाची गोळी मागायचा... हेही कधी नाही नाही म्हणाले हो?
प्रमिला - अहो? आजोबांच्या नावाने एक कापड बाजूला काढू... गरीब कुणी दिसला तर देऊ..
अभ्यंकर आजी - कुणी कशाला? माझाच भाऊ येणार आहे की मुंजीच्या दिवसांत.. त्यालाच द्या..
मधू - एक कापड... अभ्यंकर आजींचा गरीब भाऊ दिसला तर..
अभ्यंकर आजी - वहिनी पण येणारे..
मावशी - खिळ्यांनी ठोकीन तिला दिंडी दरवाजावर.. मध्या.. या म्हातारीला एक खण बास झाला..
मधू - म्हा..ता...री..ला...ख...ण...बा...स..झा...ला
अभ्यंकर आजी - खण? मला खण? मी वयाने सगळ्यात मोठी! मानपानाची काही अक्कल आहे का गं पमे? आं? माहेरी शिकवलं नाही?
प्रमिला - अहो.. अभ्यंकर आजी... नऊवारी..
मधू - आजी... नऊवारी..
प्रमिला - नंदाताई.. पाचवारी..
नंदा - मला कशाला?
प्रमिला - हे काय विचारणंय?
नंदा - हिरवं...
मधू - हि...र.. वं..
प्रमिला - शिंदे भावजी.. कापड...
शीला - यांना काही घेऊ नका..
प्रमिला - असं कसं?
मधू - शिं..दे..भा...व..जी..अ..सं..क...सं???
प्रमिला - अहो असं कसं काय? एक कापड..
मधू - ए..क..का..प..ड..
प्रमिला - शीला वहिनी.. साडी..
घाटे काकू - हिला साडी? क्का?
प्रमिला - का म्हणजे?
घाटे काकू - हिला येऊन किती दिवस झाले?
प्रमिला - अहो शेजारी आहेत सख्खे..
घाटे काकू - मोगलाई आहे मोगलाई..
मधू - शी..ला..व... हि.. नी... ए.. क.. सा...डी...
प्रमिला - नैना... एक फ्रॉक..
मधू - नै... ना... ए... क.. फ्रॉ.. क
प्रमिला - श्री भावजी.... एक शर्टाचं कापड..
मधू - श्री..भा...व..
प्रमिला - अहो तुम्ही काय भावजी लिहिताय?
मधू - आपलं! श्री... ए.. क.. का.. प.. ड
श्री - आता माझ्याकडून लिही..
मधू - मा.. झ्या.. क...
प्रमिला - अहो? नांव लिहा त्यांचं! माझ्याकडून काय?
मधू - श्रीनिवास पेंढारकर... हां! बोल..
श्री - मधूसूदन - एक शर्टाचं कापड..
मधू - म..धू..सू.. म्हणजे मला?
श्री - होय..
मधू - म.. ला.. ए...क.. का..प.. ड
श्री - समीरला.. सफारी.... निळा...
मधू - स..मी..र..ला..स..फा..री.. नि... ळा..
श्री - आणि वहिनींना...

कानांत प्राण आणून प्रमिला ऐकत होती. आणि डोळ्यांत प्राण आणून श्री तिच्याकडे बघत होता. डोळ्यातले प्राण श्रीने टेंपररीली घशात शिफ्ट करून विचारले..

श्री - वहिनी?... तुम्हाला काय?

प्रमिलाने जितकी लाडिकपणे मान वळवता येईल तितकी वळवत सांगीतले..

प्रमिला - घरच्या माणसाला कसला आहेर?
श्री - ... तरी..
प्रमिला - .. तुम्हाला काय हवं ते आणा...
श्री - लिही रे... शालू..
मधू - प्र.. मि.. ला..ला..शा..लू..
श्री - हां!
मधू - कोण तू? .. तू देणार?
श्री - का?
मधू - च्यायला मी पण नाही दिला कधी..
श्री - मग दे?
मधू - मी ही लिहीतो.. प्र.. मि.. ला ..ला .. शा..लू..
घाटे - या भवानीला बसल्या बसल्या दोन शालू झाले की?
मावशी - मग तुझं काय बिनसलं?
अभ्यंकर आजी - श्री? बाळा? तू का बरं पमीला शालू घेऊन उगीच नाही ते पायंडे पाडतोयस?
मावशी - ए जख्खड... पमेनी केलय श्रीचं..
अभ्यंकर आजी - श्री चं? क्काय?
मावशी - गट्टूचं किती केलंय..

आत्ता पुन्हा नजरानजर झाली.

आता प्रमिला गालांमधे जीभ घोळवत मिश्कीलपणे मंद हसत दुसरीकडे पाहू लागली.

मधू - झालं का?
प्रमिला - चितळे आजोबांच काढावं लागेल ना मावशी?
मावशी - काढा.. मेला बिचारा..
प्रमिला - आता घरचे लिहा हो..

दोघांच्या मिळून चार घरच्या नातेवाईकांचे अन दोघांच्या ऑफीसमधल्यांचे आहेर लिहून झाले.

आता उलटे आहेर काय करायचे यावरून सुरू झाले.

मानेकाका - माझ्याकडून दोन्ही बटूंना शंभर शंभर रुपये, अन श्रीला अन मध्याला प्रत्येकी दिड-दिडशे रुपये!
प्रमिला - हे क्काय? ... अन मला?
मानेकाका - हिला एक गळ्यातलं लिही रे मध्या माझ्यातर्फे... खोटं! चहा पाजते म्हणून..
मावशी - गट्टूला माझ्यातर्फे दोनशे, समीरला दिडशे, श्रीला तीनशे, मध्याला तीनशे अन या मस्तानीला एक साडी!

प्रमिलाचा उल्लेख मस्तानी असा झाल्यावर पुन्हा नजरानजर झाली.

घाटे काका - माझ्यातर्फे दोन्ही घरांना शंभर शंभर रुपये..
निगडे काका - माझ्यातर्फे दोन्ही घरांना मिळून शंभर रुपये..
मानेकाका - लेको सोळा जण जेवणार होय शंभर रुपयात?
निगडे काका - ते आम्ही बघू..तू लिही रे मधू..
मधू - त्यात काय लिहायचंय? तुम्हाला जे द्यायचं ते द्या.. मुंजीच्या दिवशी..
नंदा - पमीला साडी, समीरला दोनशे, गट्टूला शंभर, मधू अन श्रीला प्रत्येकी शंभर..
शिंदे - आमच्याकडून अडीच अडीचशे प्रत्येकी..
बेरी - रुपीज फोर हंन्ड्रेड इच फ्रॉम मायसेल्फ..
अभ्यंकर आजी - माझा काही घेण्यादेण्यावर विश्वास नाही..
मानेकाका - मधू.. खोड ते नऊवारी...
अभ्यंकर आजी - तरीही मी एकवीस रुपये देणार आहे..
मधू - काका? राहूदेत का?
मानेकाका - बघ बाबा.. मला तर काय परवडणार नाही..
अभ्यंकर आजी - याला काय परवडणार आहे? हयात गेली वाटण्यांच्या मारामारीत..
मानेकाका - ए म्हातारे.. तोंड बंद कर.. नाहीतर हा माने हा दास्ताने वाडा..

आज कोरस आलाच नाही. कारण त्यात अभ्यंकर आजींचा अपमान झाला असता अन तो करण्याचा हक्क फक्त मानेकाका अन पवार मावशींनाच होता.. बाकीच्यांची ती हिम्मतच नव्हती.

प्रमिला - काका? त्या दास्तानेंना बोलवायला लागेलच ना?
मानेकाका - अर्थात.. मालक आहेत ते..
प्रमिला - त्यांची किती पानं?
मानेकाका - चार!
मधू - बर आमंत्रण पत्रिकांचं काय?
श्री - त्या वेगवेगळ्याच छापाव्या लागतील ना?
प्रमिला - हो..
निगडे - आमच्या ऑफीसातला पाचकुडवे छापतो.. रुपयाला एक पडते..
मधू - आपल्या किती?
प्रमिला - तरी दिडशे..
मधू - तुझ्या?
श्री - तेवढ्याच जवळपास...
मानेकाका - पक्वानं दोन पाहिजेत हा? त्या अटीवर एकत्र मुंजीला मी परवानगी दिलीय..
घाटे - प्रत्येक गोष्टीला हे कोण परवानगी देणार हो?
अभ्यंकर आजी - कलियुग आहे बाबा..
मानेकाका - ए म्हातारे? तोंड सांभाळून बोल.. तो म्हातारा उलथलावता तेव्हा खांदा द्यायला हा कलीच धावला होता पहिल्यांदा.. तुझ्या तोंडाळ स्वभावाने चार खांदे मिळाले नसते..
प्रमिला - जेवणाचं कसं करायचंय?
नंदा - मी, शीला, तू अन बेरीवहिनी मिळून करू की?
प्रमिला - किती पडेल तुम्हाला..
नंदा - एक आचारी बोलवू..
श्री - त्या गोडबोल्यांना सांगू सरळ.. सगळेच आरामात बसू शकतील..
मधू - कॉस्टलीय रे ते..
श्री - पानाला दहा रुपयाचा फरक पडतो.. या सगळ्यांना किती त्रास..
शीला - आम्हाला कसला आलाय त्रास? आपलेच आहेत की सगळे..
श्री - नको.. कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकू..
मधू - कितीय पानाला रेट?
श्री - चाळीस म्हणत होत्या..
मधू - मग मगाशी तीसप्रमाणे काय हिशोब केला?
श्री - तो आपण केलं तर..
मधू - म्हणजे आता किती होणार?
श्री - दोनशे दहा गुणीले चाळीस..
मधू - म्हणजे किती?
श्री - बघ की..
मधू - सांग ना..
श्री - आता दोनशे गुणीले चाळीस..
मधू - आठशे..
मानेकाका - तुला बॅकेत कसा घेतला रे? आठ हजार...
मधू - हां! म्हणजे झाले की साडे आठ हजार?
श्री - झाले की मग?
मधू - मग एवढे करायचेत खर्च?
श्री - डोक्याला ताप नाही...
मधू - ठीक आहे.. गोडबोले..
प्रमिला - गुरुजी?
मानेकाका - पुजारी नको..
मावशी - तो नावाचा पुजारीय रे... तो गुरुजी नाहीये..
श्री - आमच्या मोडकांना सांगू का?
प्रमिला - चालेल की..
मधू - मो..ड..क..गु..रु..जी..
प्रमिला - हा दुसरा चहाय हां? श्रीभावजींतर्फे झालेला..
मानेकाका - दे दे दे दे...
अभ्यंकर आजी - हाव हाच माणसाचा प्रमुख शत्रू
मानेकाका - असं का? मग नऊवारी कशाला घेतीयस?
राजाराम शिंदे - झाली का मीटिंग?
प्रमिला - नाही.. लायटिंगचं काय?
मधू - लायटिंग कशाला?
प्रमिला - वाड्याला?
श्री - लायटिंग हवंय का?
प्रमिला - पाहिजेच की?
शिंदे - आमच्या ऑफीसातला रघू करतो स्वस्तात..
मधू - ला..य..टिं.. ग... र.. घू.. स्व..स्ता.. त
श्री - स्वस्तात म्हणजे किती?
मधू - स्व..स्ता..त..म्ह
प्रमिला - अहो? ते विचारतायत..
शिंदे - आठशे रुपये.. फुल्ल वाडा..
शीला - कशावरून? आधी विचारा..
शिंदे - मला माहितीय..
मधू - आ..ठ..शे..
श्री - टोटल किती झाले?
प्रमिला - वरातीचं काय?
श्री - वरात?
प्रमिला - बटूंची वरात काढतातच..
श्री - काढा..
मधू - कुठे काढायची?
प्रमिला - ओंकारेश्वर ते हरिहरेश्वर..
मानेकाका - शंकर बोअर होईल..
प्रमिला - होऊदेत..
घाटे - आमच्या लग्नाच्या वरातीला.. किती गं आलावता खर्च..??
घाटेकाकू - डोंबल.. तुमचे वडील अडलेच लग्नात.. म्हणून काढली..
घाटे - हो पण खर्च किती आला?
घाटेकाकू - अडीचशे..
मानेकाका - तो जमाना गेला..
प्रमिला - हजार धरा हो..
मधू - ह..जा..र..ध...रा... हो..

रात्री अकरा वाजता मीटिंग संपली. खेळून खेळून दमलेली मुले केव्हाच झोपी गेलेली होती. आता फक्त रोज एक मीटिंग होणार होती अन बरोब्बर महिन्याने मुंज!

=============================

प्रत्यक्ष मुंजीच्या दिवशी मात्र याहून जास्त धमाल झाली. मीटिंगा बर्‍या होत्या म्हणण्याची वेळ आली.

गुरुजी - कुर्याद बटोर्मं...
मावशी - ए हडळ...
गुरुजी - या.. या ताई कुणाशी बोलतायत?
मावशी - ताई तुझा बाप... तुझा आजा ताई... तुझा पणजा मावशी.. तुझा खापर..
प्रमिला - या स्वगत बोलतात.. तुम्ही म्हणा मंत्र...
गुरुजी - कुर्याद ब..
मानेकाका - गुरुजीय का रेडिओ?
गुरुजी - अहो? मला म्हणूदेत ना?
मानेकाका - काय म्हणूदेत? तिच्यायला भाडं भरून आणलाय भट! अन आमच्यावरच गमजा?
गुरुजी - म्हणजे?
मानेकाका - म्हणजे काय म्हणजे? उरक!
गुरुजी - अहो उरक काय?
प्रमिला - गुरुजी ... तुम्ही उर.. आपलं.. चालू ठेवा..
गुरुजी - कुर्याद ब...
बेरी काका- मी काय म्हणतो?
माने काका - ए बेरणे... याला वेळच्यावेळी नेऊन का आणत नाहीस?
बेरी काकू - मला वेळच्यावेळी सांगत नाहीत हे काय होणारे म्हणून...
माने काका - तज्ञांना दाखव.. तू म्हण रे पुढचं!

माने काकांच्या दृष्टीने अंत्यविधी अन उपनयन विधी यात एक महत्वाचे साम्य होते. ते म्हणजे 'गुरुजी अनाकलनीय बडबडतो'!.

गुरुजी - कुर...
निगडे - अरारारारारारारा - ए... ही मुतली....
निगडे काकू - ही कुणाचीय?
निगडे - आपलीच... आठवी!
निगडे काकू - हां! मग ठीक आहे...
गुरुजी - अहो?...
श्री - ... काय?
गुरुजी - मी... म्हणू का ? ... पुढचं??
घाटे - याला किती दिलेत?
गुरुजी - हे असं काय बोलतात?
प्रमिला - म्हणा हो..
गुरुजी - कुर...
अभ्यंकर आजी - हा कुरकुरतो फार...
गुरुजी ... याद...
वैशाली - यादमे तेरी जाग जाग के हम.. रातभर करवटे बदलते रहे....
गुरुजी - बटोर...
मावशी - हा तुकड्या तुकड्यातला भटुरडा कुणी आणला?
श्री - मोडक गुरुजीयत ते!
मानेकाका - हा मोडक आहे? की... काय गं ते? ए.. भवाने.. तुला विचारतोय म्हणी येतात म्हणून..
मावशी - हा मोडक आहे? की मोडता?
गुरुजी - अहो.. मुंज लागली...
मावशी - मुंज म्हणजे काय पी.एम.टी. आहे का लागायला? नीट म्हण श्लोक!
गुरुजी - विद्या अनेक भूतपाप हरिणी...
गट्टू - बाबा? .. उकडतंय..
गुरुजी - दोनच मिनिटं हं बाळा?
समीर - विद्या अनेक भूत...
गुरुजी - हां! विद्या.. अनेक.. भूत...
शीला - मी आधीच म्हणत होते... हा वाडा भयंकर आहे... इथे भूतं आहेत...
शिंदे - अग शांत हो! इथे फक्त मावशी अन मानेकाका आहेत...
गुरुजी - माझं झालं!
निगडे काकू - तुमचं काय झालं?
गुरुजी - काम..
निगडे काकू - बघू?
गुरुजी - दाखवण्यासारखं नाहीये ... ते!
निगडे - ए... अगं काय हे या वयात..??? आं??
नंदा - आजी... हे दोघं भर कार्यात अश्लील बोलतात...
अभ्यंकर आजी - नका रे बाळांनो.. नका अश्लील बोलू...
मावशी - ए थेरडे...जा घरी... अख्खा वाडा अश्लील आहे हा.. काय गं ए निगडिणी?
निगडे काकू - काय झालं?
मावशी - तू अश्लील आहेस की नाही?
निगडे काकू - काय बाई आहे ही! चारचौघात बोलवतं कसं काय जाणे...!
मधू - गुरुजी.. तुम्ही मुंज लावा..
गुरुजी - अहो कर्वे...
मधू - ... काय?
गुरुजी - मी दुसरं काय लावणार? .... या वयात?... मुंजीशिवाय???
मानेकाका - ते आम्हाला माहीत नाही... आत्ताच्या आत्ता मुंज लागली पाहिजे.. नाहीतर हा माने हा दास्ताने वाडा..
गट्टू, समीर, राजश्री, नैना - पेटवून देईल..
गुरुजी - पेटवून??????? हे वाडा पेटवणार? .. मी काय केलं काय असं?
मधू - गुरुजी... तुम्ही स्तोत्र म्हणा हो...
गुरुजी - कुर्र र्र र्र र्र...
बेरी - मी काय म्हणतो??
गुरुजी - काय?... काय म्हणताय तुम्ही??? एकदाच सांगा सगळे काय म्हणतायत????
बेरी - भर कार्यात जर....
मानेकाका - जाऊन ये.. जाऊन ये... भर कार्यात जाऊन ये...
गुरुजी - हे कुठे निघालेत?
मानेकाका - तुला काय रे अडचण?
गुरुजी - शुभ कार्यात अशुभ काही होणे हे अधर्मी कृत्य ठरते...
मानेकाका - लघ्वीला लागली तर?
गुरुजी - शुभ शुभ शुभ शुभ.... आता मी पुढचं घेऊ का?
मावशी - कुठलंही घे.. पण घे... अन आटप!
निगडे - लागली का?
निगडे काकू - ... काय?... काय लागली का?
निगडे - गुरुजीला विचारतोय... तू गप्प बस... हिला दुसरं काही सुचतंच नाही..
प्रमिला - कुर्याद बटो..र....
गुरुजी - आता लावू का?
नंदा - मला काय विचारता?
गुरुजी - काय हो? लावू का?
शीला - मला काय विचारता?
गुरुजी - अहो... लावू का?
माने काका - ... काय?
गुरुजी - मुंज?
मानेकाका - मग? त्याचेच तर पैसे दिलेत तुम्हाला...
श्री - लोकहो... आता ऐका.. मुंज लागत आहे...

....

मुंज लागल्यानंतरच्या विधींपैकी एका विधीमधे गट्टू भयंकर लाजत होता. म्हणजे लाजत समीरपण होता. पण गट्टूचे लाजण्याचे कारण फार भिन्न होते.

अंगावर नुसता लंगोट ठेवून वडिलांना अन थोरामोठ्यांना नमस्कार करणे! या थोरामोठ्यांमधे गट्टुसाठी स्वतःचे वडील, मावशी, मानेकाका, प्रमिलाकाकू, मधूकाका अन इतरांबरोबरच शीलाकाकू अन राजाकाकापण होते....

.... अन नेमकी नैना राजाकाकाकडेच होती...

ती मात्र गट्टूला लांबूनच त्या अवस्थेत पाहून वाड्याबाहेर पळून गेली ती डायरेक्ट पंधरा मिनिटांनीच आत आली...

मुलींना जरा जास्तच कळतं!

आहेर झाले. यादीप्रमाणे श्री अन मधूने नातेवाईक, वाड्यातले, ऑफीसमधले, पोरांच्या शाळेतले मित्र, सगळ्यांना यथाशक्ती व यादीत लिहिल्याप्रमाणे आहेर केले.

हा एक मोठाच प्रॉब्लेम झालेला होता. दोघांचे शालेय मित्र यादीत धरलेच गेलेले नाहीत हा शोध मुंजीच्या केवळ आठ दिवस आधी लागला होता. मुंजीचा 'स्वतःचे नातेवाईक' सोडून इतर सर्व खर्च श्री व मधूने अर्धा अर्धा करायचे ठरलेले होते.

उषाताई तब्येतीमुळे अन तारामावशी मुलाच्या शाळेतील बिझी शेड्युलमुळे येऊ शकल्या नव्हत्या. त्यामुळे श्रीच्या नातेवाईकांपैकी कुणीच नव्हते. त्याचे फक्त ऑफीसमधले होते. पण गट्टूचे शालेय मित्र हा नवीन शोधही बराच खर्चिक होता बिचार्‍यासाठी!

आता जानवे घातलेल्या समीर अन गट्टूला पाटावर बसवून ...

... उलटे आहेर झाले...

... पवार मावशी, मानेकाका, निगडे, घाटे, नंदा, शिंदे, पुजारी, अभ्यंकर आजी, ऑफीसमधले, शाळेतले...

सगळे रांगेने येऊन गेले.

ऑफीसमधल्यांनी तर यावेळेस कमाल केलेली होती. चक्क स्टाफबरोबर सप्रेही आलेले होते. आणि सर्वांनी मिळून श्रीला पोषाख व गट्टूला एक शर्ट व शाळेतील नववीचे सर्व साहित्य घेतलेले होते. मोठाच प्रॉब्लेम सुटलेला होता.

जेवणे झाली. मनसोक्त जेवणे, आग्रह, सगळे झाल्यावर मग...

.... एकेक जण पांगू लागला..

जाताना श्री अन मधूचा निरोप घेऊ लागला..

कार्य व्यवस्थित पार पडल्याचे समाधान अन श्रम सगळ्यांच्याच चेहर्‍यावर होते.

आता फक्त वाड्यातले उरले.

प्रमिला - बाई बाई... झालं बाई एकदाचं!
मानेकाका - मग? मी असल्यावर होणारच सगळं व्यवस्थित... ??
निगडे - काही नाही हं? हे माने होते म्हणून काहीही झालेले नाही.. आम्ही पण होतो..
घाटे - नाहीतर काय? हा लेकाचा एकताच क्रेडिट घेणार? काय केलंत हो तुम्ही?
माने काका - अरे गप? साल्यांनो... माझं महत्व कमी केलंत तर हा माने हा दास्ताने..
प्रमिला - काही नाही... सगळ्यांनी मदत केली.. सगळ्यांच महत्व तेवढंच...

एकेक जण 'छान झालं हं कार्य' म्हणत प्रमिला, मधू अन श्रीचा निरोप घ्यायला लागला. सगळ्यात शेवटी मावशी अन मानेकाका उरले. बाकीचे इतरत्र खोळंबलेले होते. काही ना काही बघत होते. आपले काही राहिले वगैरे तर नाही ना वगैरे!

मावशी - श्री... दृष्ट काढलीय हो गट्टूची?... आता छान झोपा दोघेही... तूही रे मधू...

मधू, श्री अन प्रमिला मावशी अन मानेकाकांच्या पाया पडले. दोघांनी तोंडभर आशीर्वाद दिले...

आपापल्या घरी जाताना....

.... मधूला आहेराची यादी सापडली जमीनीवर...

प्रमिला - सगळ्यांचे झाले ना हो व्यवस्थित?
मधू - हं! झाले...
श्री - चला... वहिनी... आरामात झोपा आता... फार सुंदर कार्य झाले...
मधू - श्री...
श्री - हं!
मधू - ....
श्री - ... काय ... काय रे पिट्या???
मधू - श्री.. .. आहेराच्या यादीत...
प्रमिला - ....
श्री - ....
मधू - काका...
श्री - .... म्हणजे????
मधू - ... मानेकाका...
प्रमिला - नावंच...???
मधू - ...... नाहीयेना....

जीवन वाचवायचे असावे अशा गतीने धावत सगळेजण जिना चढून वर पोचले...

मावशी त्यांच्या घराच्या दारातून पाहात होत्या...

घाटे, निगडे, नंदा अन शिंदे कुटुंबीय खाली थांबलेले होते...

श्रीने दार वाजवले..

प्रमिला - .... माने काका.. ... माने काका... मा... दार उ... माने काका दार उघडा... ना

दार उघडले गेले...

मानेकाका - साल्यांनो, आहेर देताना या मानेकाकाला विसरलात तर हा मानेकाका हा दास्ताने वाडा....

घाटे जोडपे, निगडे जोडपे, शिंदे जोडपे, नंदा, मावशी....सगळ्यांचा कोरस...

कोरस - ... दास्ताने वाडा पेटवून देईल..

श्री, मधू अन प्रमिलाच्या अश्रूंचा मानेकाकांच्या पावलांवर होणारा अभिषेक....

... हाच त्यांना केलेला आहेर होता....

... आणि त्याच वेळेस....

......

.....

नंदाआत्याच्या पर्समधून घेतलेले पाच रुपये उद्या देवांगसकट थ्रील पिण्यासाठी वापरता येतील या खुषीत...

... महेश श्रीनिवास पेंढारकर आपल्या खोली छानपैकी झोपलेले होते....

गुलमोहर: 

मस्त,
गट्टु वाट चुकतोय, याला श्री ची गरिबी जबाबदार म्हणावं का ?

मुलांच्या बेसिक ईच्छा पुर्ण होतील एवढातरी पैसा पालकांकडे असावा.

नाहीतर असं होणं सहाजिकच आहे.

मस्त चालु आहे पण एक शंका त्या काळात एक पान ४० रु. होते का? म्हणजे बाकिच्या रेफरन्स प्रमाणे खुपच महाग वाटले म्हणुन......

मस्त झालाय हा ही भाग.
गट्टू चोरी करतोय हे पाहुन खुप वाईट वाटले. श्री ला जेव्हा हे कळेल तेव्हा त्याची अवस्था खुपच वाईट होईल.( अर्थात तुम्हीच ती योग्य शब्दात मांडु शकाल.)
ह्या भागात मुंजीच्या मीटिंग ला तिथे हजर आसल्यासारखच वाटल. Happy

पु.ले.शु.
अनुजय (समिधा)

पण गट्टू तर ८वीत आहे ना? मग त्याची आणि त्याच्या पेक्षा ३ वर्षांनी मोठ्या (११वी) समीरची मुंज? Uhoh
हा फ्लॅशबॅक नसावा, कारण, त्याला सायकल मिळालेल्या वाढदिवसाचा उल्लेख पण आहे.

बेफिकिर,

खुप छान, पण, गट्टु चुकिच्या मागाने जातोय.

बाकि, मिटिग ला मज्जा आलि, अभ्यंकर आजी नविन कळ्ल्या. पुजारि पण ग्रेट आहे, सेफ साईड म्हणून १०० पाने?. श्रि आणि प्रमिला प्रकरण तम्हि खुप छान माडलय.

kahrach, kai kai lihu ase jhalay,
befikir, tumhi kai chan mitting bharawalit hoo, kahup manje khup chan sanwad mandlet. specially mavashi ani mane kaka manje simply great. Itke guntayala hote tumchya kathe madhe ki kadhi ha khudkan hasayala yte(lok bavalat aahe ka ha? ase kahise bhagtat.), Gattu ani Naina che pan chan jamwat anlay tumhi.

marathi madhe lihayala limitations yet aaet, pan me prayatna karat aahe.

राखीला अनुमोदन , मी पण हेच लिहिणार होते की मुंज जरा उशिरा झाली का ?

काही प्रसंगात श्री इतका गरीब वाटत नाही , त्यामुळे गट्टुवर चोरीही वेळ यावी हे जरा पटलं नाही....

मस्त....

सर्वांचे मनःपुर्वक आभार!

अशा प्रोत्साहनाने लिहायला बळ मिळते.

१. मुंज उशीरा लिहीली हे मान्य आहे.

२. गट्टू गरीबीमुळे चोरी करत नसून मोह व चोरीची प्रवृत्ती म्हणून चोरी करत आहे.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

इथे गरीब असण्याचा मुद्दा नाहीये. उलट गरीब घरातील असूनही प्रामाणिकपणा दाखवणारी आणि सधन, सुशिक्षीत कुटूंबात वाढूनही चोर्‍या करणारी अनेक उदाहरणे आजूबाजूला सापडतील.

गट्टू गरीबीमुळे चोरी करत नसून मोह व चोरीची प्रवृत्ती म्हणून चोरी करत आहे

अनुमोदन

आशू चॅम्प व गुड्डू,

मनापासून आभारी आहे.

-'बेफिकीर'!

(राखी व प्राजक्ता शिर्न, कृपया लक्ष ठेवावेत. एखादा संदर्भ किंवा माहिती चुकल्यास कृपया निदर्शनास आणावेत. त्यामुळे कथा दोषरहीत व्हायला मदत होईल. निवांत पाटील, आपली शंका वाचून मलाही प्रश्न पडला. कदाचित माझे ते चुकले असावे. कृपया लक्ष ठेवावेत. धन्यवाद!)

-'बेफिकीर'!

बेफीकीर , मला तुमची कथा नेहमीचं आवडत आल्ये , म्हणून तर जरा संदर्भ चुकला तेव्हा लगेच लिहिलं Happy

आम्ही सुध्दा ती मिटींग अटेंड केली बरं का! मज्जा आली.
चुकीचा सदंर्भ निदर्शनास आणताच चूक मान्य करून, वाचकांच्या प्रतिसादाला न्याय दिलात तुम्ही आणि हेच एका महान लेखकाचं वैश्यिष्ट आहे. पु.ले.शु.

चुकीचा सदंर्भ निदर्शनास आणताच चूक मान्य करून, वाचकांच्या प्रतिसादाला न्याय दिलात तुम्ही आणि हेच एका महान लेखकाचं वैश्यिष्ट आहे. >>>> १००% अनुमोदन Happy
खरे आहे दिप्ती! मलाही बेफिकीरांची ही नम्रता, विनयशीलता फार भावते...बरेच शिकण्यासारखे आहे त्यांच्याकडून.

जुयी, सानी, सुमेधा, स्वप्नसुंदरी, रोहित, परेश, मधुकर व माझ्या सर्व मित्रांनो,

मी मायबोलीवरचे सर्व लिखाण थांबवत आहे.

http://www.maayboli.com/node/18571?page=4#comment-867122

या 'लिन्क' वरील (बहुतेक) १३५व्या, 'असामी' यांच्या प्रतिसादा'मुळे' हे करत आहे.

जाता जाता, आधीच कमीट केल्याप्रमाणे या कादंबरीची स्फुर्ती असलेली कविता येथे देत आहे. आशा आहे की ती आपल्याला आवडावी.

सर्वांच्या आपुलकी, प्रेमाबद्दल आभार मानणे मला शक्य नाही.

'सुमंदारमाला' या वृत्तात रचलेली ही कविता इतरत्र प्रकाशित केलेली होती.

नवे फूल संसारवेलीस आले, मिळाली जशी बातमी, धावला
सुखाला न काहीच सीमा अता बाप वेडावला फक्त वेडावला
तिथे वेगळे दुःख आहे नशीबी जरा कल्पनाही मनाला नसे
नवे फूल देऊन गेली लता, वृक्ष संसाररूपी न फोफावला

अता बाळ आईविना राहिला, त्यास सांभाळले पाहिजे हे खरे
कसे का असेना मुलाला तरी वाढवायास आता हवे हे खरे
'तिचे रूप मानू मुलाला अता' बाप बोले स्वतः शी, धरे धीरही
कसेही असो दैव, मानून ते माणसाने पुढे जायचे हे खरे

घरी बाळ आला, तशी सांत्वनाला किती माणसे लोटली त्या घरी
मुठी चोखता बाळ पाहून घे विस्मयाने घराला कितीदा तरी
रडू येतसे भूक लागेल तेव्हा, नसे त्यास आई, बिचाराच तो
जरी बाप होता, तरी माय ती माय, तृष्णा न भागेल पाण्यावरी

कधी दूध पाजा नि आंघोळ घाला, कधी झोपवा आणि जागे रहा
कशाने रडे, तो न झोपे कशाने, कसे खेळवावे मुलाला पहा
कितीही जरी लोक आले "बघू का" म्हणायास, काही क्षणांचेच ते
असा काळ काढून बाळास आता पुरे होत आलेत महिने सहा

लळा लागला त्यास, बापास त्याचा, अता सर्व मार्गावरी लागले
अता बाप कामासही जात होता, कुणी ना कुणी बाळ सांभाळले
जरा काळ आणीक गेला, अता बाळ बोलायला लागला बोबडे
तरी शब्द पहिलाच 'आई' निघाला, नि ऐकून ते बापही गलबले

अता खेळणी, गोष्ट काऊचिऊची, सुरू जाहली जेवताना मजा
धरा रे, पळा रे, करा गाइ आता, किती यायची खेळताना मजा
कुशीतून बापास तो बोबडे बोल ऐकावयाचा नि झोपायचा
मजा झोपताना, मजा जागताना, मजा सर्व ते पाहताना मजा

हळू काळ गेला जरासा पुढे, चार वर्षे पुरी होत आली अता
अता घातले त्यास शाळेत, इच्छा पित्याची फलद्रूप झाली अता
डब्याला बिचारा स्वतः लाटुनी बाप पोळ्या असे देत बाळास त्या
तसा रोजचाही स्वयंपाक शिकला, घराचा असे तोच वाली अता

कधीही न रागावला बाप पोरावरी, एकदाही न फटका दिला
बघे चित्र तो बायकोचे, रडे आणि सांगे कहाण्या मुलाच्या तिला
वही, पुस्तके, दप्तरे, खेळणी, सर्व संस्कार, अभ्यास चालू असे
कसासा तिच्यावीण तो काळ त्याने स्वतः एकट्याने असा काढिला

"कधीही न नेलेत हॉटेलमध्ये, कधीही न मी चित्रपट पाहिला
कधीही न मी बागही पाहिली, सर्कशीचा तसा योगही राहिला"
"तसा फार पैसा नसे" बोलला बाप "माझ्याकडे बाळ, सांगू कसे?"
बिछान्यात रात्री बिचारा रडे एकटा बाप, अश्रू छुपा वाहिला

उधारी करोनी पुरे लाड केले, कशीशी उधारी पुरी फेडली
स्वतःची दिली चार पैश्यात आणी मुलाला नवी सायकल घेतली
जरा ताप आला मुलाला कधी की पुरी रात्र जागायचा बाप तो
स्वतःची कधी प्रकृती पाहिली ना जरा तापता पाठही टेकली

सफारी मुलाला हवा याचसाठी दिली ट्रंक भगारवाल्यासही
सहल-वर्गणीला करे काम जास्ती पुन्हा येउनी सर्व स्वैपाकही
दहाव्वीस आले बरे गूण आता पुढे शिक्षणाला किती खर्च तो
करे नोकऱ्या तीन, कर्जे करोनी प्रवेशास दे देणगी बापही

कधी ऐकले, पोरगा बोलला वाक्य मित्रांपुढे एक खुश्शालसा
"कसे यायचे आज पार्टीस मी बाप माझा असे यार कंगालसा"
तसे वाक्य ऐकून, वाईट वाटून, पाणावली लोचनेही जरी
स्वतः औषधे टाळुनी देत पैसे मुलाला म्हणे 'जाच खुश्शालसा"

जशी लागली नोकरी त्या मुलाला सुखावून गेला तसा बाप तो
उभा राहिला आपला बाळ आता, जरा आपलाही घटे व्याप तो
म्हणे पोरगा एक मैत्रीण आहे, तिच्याशी अता लग्न लावून द्या
मनाशी म्हणे बाप, हा काय आनंद आहे, मनाला पुऱ्या व्यापतो

जसे लग्न झाले, घराला जराशी कळा चांगली यायला लागली
नवी सून होती किती लाघवी, बाप मानायचा पोरगी आपली
घराला तिने सजविले, सर्व कामे बघू लागली एकट्यानेच ती
मुलाला उरे स्वर्ग बोटांवरी पाहुनी लाडकी बायको आपली

तशातच घरी पत्र आले मुलाला, नव्या नोकरीचे, मनासारख्या
पगारात होती किती शुन्य जाणे, सुवीधा न त्या मोजण्यासारख्या
म्हणे पर्वणी जाहली, बाप बोले, समाधान ती सूनही पावली
पुढे बाळ बोले अशी पाहिजे, नोकऱ्या त्या नको 'भारतासारख्या'

कळेनाच बापास की काय बोलून गेला असे पोरगा आपला
जराश्यात ते स्पष्ट झाले नसे नोकरी येथली, बाप खंतावला
"नको रे मुला, का कशाला उगी जायचे त्या तिथे, काय आहे तिथे?"
परंतू सुनेने मुलाचीच बाजू जशी घेतली, तो म्हणू लागला

"मुलांनो, अरे मी कसे यायचे त्यातिथे, जन्म माझा असे येथला"
मुलाने शिसे ओतले, कान जाळून तो शब्द बापाकडे पोचला
"तुम्हाला कुठे यायचे त्यातिथे, त्यातिथे फक्त आम्हीच जाणार हो"
असे वाक्य ऐकून, आधार शोधायला लागला, बाप तो मोडला

रडू थांबता आज थांबेचना, बाप बोले "नकारे, नका जाउ की"
"कसेही असो आज उत्पन्न, आपण सुखाने घरी आपल्या राहु की"
म्हणे पोरगा "अल्पसंतुष्टता हीच तुमची सदा भोवली आजवर"
तरीही बिचारा म्हणे बाप "जाऊ नका रे, कुठेही नका जाउ की"

"अरे एकट्याने कसे मी जगावे, मला सांग तुमच्यामुळे मी जगे"
"न आई तुझी राहिली, सांग पोरा, कसे एकट्याने जगावे म्हणे? "
मुलाला, सुनेला न काहीच होते, निघालेच ते दूरदेशाकडे
पुरी तीन वर्षे अता जाहली, बाप आता इथे एकट्याने जगे

कधी जाग येते, जणू बाळ रडले, असे वाटते, तो रडू लागतो
कधी घास काऊचिऊचा न चाले, असे वाटते, तो रडू लागतो
कधी सर्कशीला न पैसेच उरले, असे वाटते, तो रडू लागतो
कधी सायकल घेतली, छान झाले, असे वाटते, तो रडू लागतो
कधी घेतलेल्या सफारीत चाले, असे वाटते, तो रडू लागतो
कधी देणगीचे पुरे कर्ज झाले, असे वाटते, तो रडू लागतो
कधी एक पार्टीस पैसे पुरवले, असे वाटते, तो रडू लागतो
कधी वाटते मूल झालेच नाही, असे वाटता तो रडू लागतो

अता प्रकृती साथ देते कुठे, आज कोणीच नाही बिचाऱ्यास त्या
पुरा जन्म वायाच गेल्यापरी भावना व्यापणारी बिचाऱ्यास त्या
कधीही नका यार आधार काढू पित्याचा कुणी, एवढेसे करा
कथा आठवा एवढी, द्या समाधान, आणीक शांती बिचाऱ्यास त्या

बेफिकीर तुम्ही असे नाही करु शकत............
तुम्हाला काहीच अधिकार नाही कि तुम्ही तुमचे लिखाण अर्ध्यावर सोडुन आम्हा मायबोलीकराना दुखवण्याचा.
फक्त एका प्रतिसादा मुळे तुम्हि आम्हा तमाम वाचक वर्गाला असे वार्‍यावर सोडु शकत नाहीत.
तुम्ही एक प्रतिभाव्न्त लेखक आहात हे आम्ही जाणतो.
पण तुम्ही अश्या कथा अर्ध्यावर सोडुन जाणे मला मान्य नाही.
मी स्वतः तुमचा प्रत्येक लेख वाचला आहे. प्रत्येक शब्द खडाखडा सत्य परिस्थितीशी जुळलेला (समान्तर) आहे. तुम्ही नेहमी तुमचे लेख पुर्ण केलात. आजारी असताना. तुमची आई आजारी असताना देखिल तुम्हि लिखाण पुर्ण केले आहे. आणि आता फक्त एका प्रतिसादा मुळे तुम्ही लिखाण थाम्बवुन तुमच्या सर्व मायबोलीकरना का दुखवताय. हे तुम्ही फार चुकिच करताय. मी असहमत आहे तुमच्या या मताशी. कारण आता जर आम्ही तुमच्या लिखाणाशी दुरवलो तर पुन्हा कधीच जवळीक होणार नाही.
निदान अजुनही भारतात प्रत्येकाला स्वतःचे विचार मान्डण्याचा अधिकार आहे हे तुम्हि का विसरताय.
तुम्ही का स्वतःचेच नुकसान करुन घेताय. मला हे मान्य नाही.
जर तुम्ही हे लिखाण थाम्बवलात तर आमच्या डोळ्यावरची असत्याची पट्टी कधी उघडणारच नाही.
मी सर्व मायबोली करा तर्फे विनती करते कि तुम्ही अखन्ड लिखाण चालु ठेवा.
आम्हाला गरज आहे तुमची तुमच्या लिखाणाची.
एक वेगळीच स्फुर्ती निर्माण होते तुमच्या लिहण्याने. कामाचा जोम वाढतो.
खरच आणि please please please तुम्हि सगळ काही विसरा आणि तुमचे लिखाण निरन्तर तसेच ठेवा.
हीच विवेचना.
पु.ले.शु.

पु.ले.शु.

पु.ले.शु.

पु.ले.शु.
............................................................वाट पाहातेय पुढील लिखाणाची.
आताच कविता वाचली.
आता जर लिखाण अपुर्ण सोडलेत ना तर तुम्हाला आम्ही कधीच माफ करणार नाही.

तृष्णा, १००% अनुमोदन..........
बेफिकीर, तुम्ही अस लिखाण थांबवू शकत नाही. या अश्या लोकांना तुम्हि इतक का महत्व देताय... त्यापेक्षा जे तुमच्या लिखाणाला मनापासुन दाद देतात त्यांचा विचार करा.... सो..... आजच्या आज नवीन भाग २० पोस्टावा हि ऑर्डर आहे आणि ती पुर्ण नाही झाली तर...... पेट्वुन देईन(PC पेट्वुन देणं महागात पडेल हो मला त्यापेक्षा तुम्हीच पोस्टा)
आणि दररोज नविन भाग, अगदि दररोज हि तुमची शिक्षा,
<<मी मायबोलीवरचे सर्व लिखाण थांबवत आहे.>> अस लिहिल्याबद्दल....
का अस छळ्ताय.... पोस्टा लवकर.....

तृष्णा, श्वे, monalip, तुम्हाला १००% अनुमोदन!!!!! बेफिकीर, नको त्या लोकांच्या अर्थहिन प्रतिक्रियेबद्द्ल संवेदनक्षम राहून तुमच्या लेखनावर जीव ओवाळून टाकणार्‍या आम्हा सर्वांना सोडून जाण्याचा तुम्ही नुसता विचार करुनच तुम्ही नावाप्रमाणे बेफिकीर आहात हे सिद्ध केलेले आहे. मला तुमचे हे वागणे अज्जिबात आवडले नाहीये... अहो काय हे? असं करु नका ना!!! हवं तर श्री ची कथा लिहू नका पुढे. पण मायबोलीवरचे लिखाणच थांबवणार आहात तुम्ही??? याला काय अर्थ आहे???

तुमची 'सुमंदारमाला' या वृत्तात रचलेली सुंदर कविता वाचली. कमाल आहे बुवा तुमची... कसे हो तुम्ही इतके सुंदर लिहू शकता? तेही वृत्तात!!!! आणि इतक्या ओळी?????? Uhoh मी एक ओळ लिहायचा प्रयत्न केला, इतकी दमछाक झाली, की नाद सोडून दिला Proud
प्रतिभेचे केवढे अफाट दान तुमच्या पदरी पडले आहे, याची क्षणोक्षणी जाणीव झाल्यावाचून राहात नाही... _/\_ तुम्हाला आणि त्या प्रतिभेला मिळालेले इतके सुंदर व्यासपीठ तुम्ही सोडून चालला आहात? काय म्हणावे ह्या अविचारीपणाला?????????????????

असो, तर आता बापाचे पुढे काय होते याची सगळी कथा समजलेली आहे. ती नाही लिहिलीत तरी मला चालेल. पण प्लिज, प्लिज, प्लिज, प्लिज, प्लिज, प्लिज, प्लिज, प्लिज, प्लिज, प्लिज, प्लिज, प्लिज, प्लिज, लिखाण थांबवू नका!!!! मला या क्षणी फक्त तुमचा संताप येतो आहे, बाकी काहीच भावना मनात नाहीये. मी आणि तुमचे बाकीचे फॅन्स असेच तुमच्यावर संतापायला नको असतील, तर पटकन पुढच्या कथा, कविता, कादंबरी लिहायला घ्या बरं....

आणि यापुढे लक्षात ठेवा, मायबोली आपल्या सर्वांची आहे. इथे प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. कुणाच्या मताला असे अवास्तव महत्त्व देऊन उगाच मायबोली सोडून जाणे हा वेडेपणा ह्यापुढे करू नका आणि आम्हाला असे दुखावू नका.....

बेफिकिर,
अहो हे काय लिहिलत, असेच जर करायचे होते, तर कश्याला आम्हाला सवय लावलित?,
असे करु नका हो. Sad Sad Sad
मि दरोरोज किमान ५ वेळा तरि मबो वर येतो तुम्चे लिखान आले असेल म्हनुन.

please dicide one single person or a bounch of readers. mala saglyat pahilyana rag ala ki tumhi as dicision kas kai gheu shakata, amhi lokani kuthe jayache, ani kharokharach jar likhan thambavnar asal tar faqt ek hosting server ghya, baki website karayache kam majhya kade lagale. agdi FUKAT(Free). hi maayboli website Drupal hya frame work madhi bawali aahe, ani me ek Drupal Developer aahe, ani mala website developement cha 5 yrs cha experiance aahe. me he sagale purna shudhit lihato aahe, khote kahi nahi ani maghar tar mulich nahi.

please, tumhich aahe ho, je pratek vishay manje Solapue asu dyat, 203 ..., au de kiwa half rice asu det(he representative examples) kahi kahi lapun thevat nahi agdi nirbhid pane sangata/lihita. ani hya nirbhid pana chich tar amhala sawaj lagliy.

evade darjedar likhanala amhi muknar manje kaljat kase tarich hote, sakali he wachale tya weles tar mala kahi suchlech nahi, manun ata lihele.

तृष्णा, श्वे, monalip, सानी , ani sawv befikir likhan premi tumhala anumodan.

befikir, please thambu naka, please, please, please, please Sad Sad Sad

कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते.
बेफिकीर तुम्ही लिखाण थांबवु नका.हि आम्हा सर्व वाचकांकडुन विनंती...
तुमच्या लिखाणातुन खुप काही शिकायला मिळते.आमचा आनंद हिरावुन घेऊ नका.
तेव्हा ..... वाट पहातोय ..पुढच्या भागाची..

तृष्णा, श्वे, monalip, सानी, परेश, रोहित तुम्हाला १००% अनुमोदन!!!!!
मला तर धक्काच लगला हे वाचून.
बेफिकीर जी, हे मात्र बरोबर नाही ह! तुम्ही प्लिज असल्या गोष्टि मनाला लावून घेऊ नका. तुमच्या सारख्या प्रतिभावंत, संवेदनशील अन सुजाण लेखकाने हा टोकचा निर्णय घेताना आमच्या सारख्या वाचकांचा (especially Befikir fans चा) जरा तरी विचार करायला हवा होता. आम्ही तुमच्या लिखाणाला addict झालो आहोत. तुम्ही माबो वर लिहिण बंद केलं तर आमच कसं होइल्? लवकरात लवकर पुढचा भाग लिहा please please please मनापासून विनंती करतेय.शेवटी लेखक अन वाचक ह्यांच्यातील अतुट नात्याला न्याय दिलाच पाहिजे तुम्ही. पु.ले.शु.

बेफिकीर,
तुम्ही असं नाही करू शकत.
तुमच्या लिखानातुन जी लोकं तुमच्याशी जुडली गेलीत त्याना असं नाहि तोडता येणार तुम्हाला!!!!
आणि आज जर आम्हाला तोडलात, तर जोडण अवघड जाईल बघा!
एखादयाच्या प्रतिक्रियेनी दुखवल्यामुळे एवढं मोठ्ठं पाऊल उचलन तुम्हाला तरी योग्य वाटत का ?
तुम्ही दोन तिन दिवस विकेंड एन्जॉय करा. हवं तर तुमच्या (बहिणीकडे) कुलकर्णी ताईकडे एक फेर फेटका मारुन या. दोन चार दिवसात राग मावळला कि पुढचा भाग नक्की टाका.
तसं उदया आपण भेटल्यावर सविस्तर बोलुया.

अजुन पुढचा भाग नाहि? म्हनजे तुम्हाला १काच अभिप्रायाच महत्व आम्हि काहिहि म्हट्ले तरी तुम्हि नाहि लिहिनार? ओह नो मल १ वाक्य लिहाय्ला इतका त्रास होत आहे. मानल तुम्हाला. तुम्हि एवढ सगळ कस लिहिता हो? बघा हे लिहायला मला १० मिनिटे तरि लागलि. या वेळेचा तरि मान ठेवा.

अजुन पुढचा भाग नाहि? म्हनजे तुम्हाला १काच अभिप्रायाच महत्व आम्हि काहिहि म्हट्ले तरी तुम्हि नाहि लिहिनार? ओह नो मल १ वाक्य लिहाय्ला इतका त्रास होत आहे. मानल तुम्हाला. तुम्हि एवढ सगळ कस लिहिता हो? बघा हे लिहायला मला १० मिनिटे तरि लागलि. या वेळेचा तरि मान ठेवा.

Pages