भारत व अमेरिका या दोन्ही संस्कृतींमधल्या फरकांची ही कहाणी आहे. अमरिश पुरी ३५ वर्षे अमेरिकेत राहून भारतात येतो व आपल्या अमेरिकन मुलासाठी भारतीय सून पसंत करतो. मग त्यातून होणार्या संघर्षाची, किंवा खरे म्हणजे घातलेल्या अनावश्यक घोळाची ही कथा आहे. ३५ वर्षे अमेरिकेत राहून अमरिश पुरीला दोन्ही संस्कृतींची किती चांगली समज आहे हे स्टार्टलाच कळते. आपल्या बरोबर आलेल्या इतर अमेरिकन टुरिस्टांना "In America, love is give-and-take. But in India loving is only giving, giving, giving" असे तो सांगतो. ते टुरिस्टही याचा नक्की अर्थ काय असेल ते जणू एका मिनीटात कळाल्यासारखे "Unbelievable, unbelievable" म्हणत राहतात. नंतर अमरीश पुरी आलोक नाथ च्या फार्म हाउस वर येतो. जुना मित्र वगैरे. महिमा त्याची मुलगी.
तेथे उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे बरीच लहान मुले असतात. इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांना सुट्टी असल्याने महिमाही असते तेथे. हा यत्तेचा अंदाज "तुमच्या कोटाच्या खिशातून एक चिठ्ठी सापडली, व त्यात औषधाच्या गोळ्या एक सकाळी व एक संध्याकाळी..." वगैरे बोलताना ज्या अॅक्शन्स करते त्यावरून आहे. तिला व इतर लहान मुलांना ज्यांच्याशी बोलायचे आहे त्यांना आधी मैलभरावरून हाका मारत पळत यायची आवड असते व एरव्ही 'सिम सिम पोला पोला सिम सिम पोला' हे म्हणायची सवय असते. हे नक्की काय आहे हे त्यांना कोणीही विचारत नाही.
महिमा लगेच त्याच्या पाया पडते. आलोक नाथची इतर मुले ही मुख्य कलाकार नसल्याने त्यांनी पाया नाही पडले तरी चालते. महिमाशी ओळख आलोक नाथ करून देताना अमरिश पुरी आता यापुढे या चित्रपटात पालकांच्या कौतुकमिश्रित नजरेने तिच्याकडे बघायचे आहे की व्हिलनच्या नजरेने हे एकदा 'मोड सेटिंग' करतो आहे असे वाटते. अमरिश पुरीला म्हणे १८ मुले असतात व ११ मुली (अमेरिकेत ३५ वर्षे काय करत होता ही शंका यापुढे येणार नाही). तरीही नंतर अपूर्व बद्दल बोलताना तो "वो मेरा इकलौता बेटा है" म्हणतो. त्याची बाकी मुले व मुली कोठेच दिसत नाहीत.
तेथे तो आलोक नाथ ला सांगतो की आम्ही आमच्या मुलांना वेस्टर्न कल्चरमधे वाढवलेले असल्याने ते आपली संस्कृती विसरले आहेत (येथे एक डूबता सूरज चा डायरेक्शन शॉट). त्यामुळे आम्हाला महिमा सारख्या सुनांची गरज आहे. महिमा ही आदर्श भारतीय नारी असल्याने तिचे नाव गंगा असते. (नशीब हेच प्रतीक पुढे वाढवून शाहरूख चे नाव बंगालचा उपसागर नाही ठेवले). त्यामुळे हे आंतराष्ट्रीय सामाजिक कर्तव्य करणे ही गंगाची जबाबदारी होते.
तिला पसंत करण्यासाठी शाहरूख आणि अपूर्व अग्निहोत्री ही तेथे येतात. आणि मग नुसते दीड दोन तास दोन्हीकडच्या स्टीरीओटाईप्स चे बुडबुडे हवेत उडत असतात. हर वाक्यागणिक "हम (भारतीय) लोग...", "हिन्दुस्थानी सभ्यता मे...", "हमारी संस्कृतीमे..." ने चालू होणारे संवाद इकडून तिकडे जातात. शेवटी तर आता अपूर्व डोक्यावर दोन्ही पंजे उलटे धरून खाली वाकून "प्लीज, प्लीज! I got it! I GOT IT!!" म्हणेल असे वाटले. येथे भारत व अमेरिकेतील लोकांचे एकमेकांबद्दलचे प्राचीन समज वापरले आहेत त्यावरून सुरूवातीला आर्किऑलॉजिकल सोसायटी ऑफ इन्डिया चे आभार का मानले आहेत ते कळते. पण वरचे ते आं.सा.का. निभावण्याची संधी होणारा नवरा केवळ एक कबड्डीची मॅच हरल्याने हुकेल अशी परिस्थिती निर्माण होते. कारण तेथे एक स्वयंवर सारखी सिच्युएशन निर्माण करून जो जिंकेल त्याचे गंगा शी लग्न होईल असे ठरते. मग गंगाला मॅच कोण जिंकणार याची काळजी दिसते, पण दुसरेच लोक आपले लग्न एका कबड्डी मॅचवर ठरवत आहेत याचे तिला काहीच वाटत नाही.
मधेच तो एक रात्री ग्लासमधे दूध घेउन जाण्याचा पारंपारिक शॉट होतो. (कोण तरूण लोक कधी असे ग्लासभर दूध पितात)? येथे महिमा ते दूध घेउन निघते. तेवढ्यात असे दिसते की अपूर्व त्याच्या खोलीत व्हिडीओ कॅमेरा घेउन काहीतरी रेकॉर्ड करत असतो. (दुसरे कोणी नसते त्या बेडरूम मधे, पण मुळात आपण कशाला खोलात शिरा?) त्यात त्याला स्वतःच्या बेडवर फणा काढून बसलेला नाग दिसतो. तो अमेरिकन असल्याने लगेच त्याला दरदरून घाम फुटतो. मग महिमा तेथे येते. तेथे नाग बघून ती खाली बसून दोन्ही हात त्याच्याकडे बघून जोडते. भावी नवर्याला भेटायच्या रोमँटिक क्षणी सुद्धा तिला साप या गोष्टीची भारताच्या सांस्कृतिक दृष्टीकोनातून मीमांसा करायाच्या आपल्या नैतिक जबाबदारीचे विस्मरण होत नाही. पुन्हा एक "हम लोग साँप को जानवर नही, भगवान मानते है" वाक्य येते. तो साप इच्छाधारी असतो का नाही माहीत नाही. पण आपल्यातून एक सुंदर तरूणी प्रकट करून चार पाच वाईट लोकांचे खून तिच्याकडून पाडण्याएवढा महिमाच्या प्रार्थनेत दम नाही हे लक्षात आल्यावर तो निराश होउन जवळच्या एका कपाटाखाली जातो. साप बेडवरून बाजूच्या कपाटाखाली गेला म्हणजे आता त्या खोलीत झोपायला सेफ झाले ना? अपूर्व ला तरी तसे वाटते.
अपूर्व व महिमा एकमेकांना आवडतात. सगाई च्या गोष्टी सुरू होतात. अपूर्वला घराच्या अंगणात जनावरे आवडणार नाहीत म्हणून शाहरूखने गाई-म्हशी वगैरेंना हलवायला सांगितलेले असते. पण नंतर "हम नये रिश्ते बनाने के लिये पुराने रिश्तोंको नही भूलते" हे शाहरूखला पटवले जाते व जनावरे परत येतात. गाई घरी परत आल्यावर लिटरली त्या गोरज मुहूर्तावर ही सगाई पार पडते. त्या समारंभाला स-गाई नाव तेथूनच पडले असावे.
आता गंगाला अमेरिकेची ओळख होण्यासाठी ती तिकडे येते. येथे अमेरिकन संस्कृतीची सर्व वैगुण्ये आपल्याला दिसतात. अपूर्व सिगरेट व दारू पितो, बार मधे दारू पिउन दंगा करतो. त्याच्या आधीच्या गर्लफ्रेन्ड बरोबर नुसते अफाट फोटो काढतो एवढेच नाही तर ते सहज दिसतील असे ठेवूनही देतो. त्याच्या या कृत्यांमुळे तो गंगाला आवडेनासा होतो. त्याच वेळेस शाहरूख आवडू लागतो.
अपूर्व कोणीतरी मोठा माणूस असतो. इतका की त्याचे घर हॉलीवूड मधे असूनही त्याला 'ओशन व्ह्यू' असतो. त्यांचे लग्न नुसते ठरल्याची न्यूज "लॉस एंजेलिस" शहर के सबसे बडे पेपर न्यू यॉर्क टाईम्स च्या मुखपृष्ठावर येते, पण त्याची एकच कॉपी त्यांना मिळते ("कृपया एकपेक्षा जास्त प्रत मागू नये" अशी पाटी लिहीलेले न्यू.टाईम्सचे कार्यालय नजरेसमोर आले). त्या पेपरच्या त्याच पानात महिमा शाहरूख ला पराठे बांधून देते. नंतर जेव्हा अपूर्व ते पान परत मागतो तेव्हा ते हरवल्याने तो चिडतो, तर बरोब्बर त्याच वेळेला शाहरूख तेथे येतो व सांगतो की हिने मला फ्रेम करायला ते दिले होते. या प्रकाराची तर्कसंगती लावायची म्हणजे - आपल्याला पराठे ज्या कागदात बांधून दिले आहेत त्या कागदाकडे आधी लक्ष गेले पाहिजे (दिसेल तो कागद वाचायला तो काय माबोकर आहे). ह्या फोटोची एकच कॉपी उपलब्ध आहे हे ही त्याला माहीत पाहिजे. हॉलीवूड मधे जवळपास कोठेतरी "पेपरवरचे पराठ्यांचे डाग काढून देनार" चे दुकान पाहिजे (इंग्रजी पेपर ३रू, मराठी २.५० ई.). मग हा फोटो सापडत नाही म्हणून अपूर्व आणि महिमा यांत भांडणे होणार हे ही त्याला माहीत पाहिजे व अशा प्रसंगात एकदम एन्ट्री घेता यावी म्हणून त्याला कायम दाराआड उभे राहून त्याची वाट बघावी लागणार. एवढे सगळे न करता तो त्या प्रसंगात एकदम एन्ट्री कशी मारू शकतो हे घईसाहेबांनाच माहीत. एकूणच कोणाच्याही खोलीत, अगदी बेडरूममधे सुद्धा, कोणीही कधीही दार सुद्धा न ठोठावता घुसत असतो.
अपूर्व ची एन्ट्री त्यामानाने साधी. मात्र हावभाव असे की "अच्च्या अच्च्या माना वेळावून बोलते म्हातारी" या पुलंच्या वाक्याची आठवण येते ("संगीत चिवडा"). "गंगा, अमेरिकामे गर्ल फ्रेण्ड्स के साथ ऐसी बाते हो जाती है" या अफलातून जस्टिफिकेशन ची डिलीव्हरी बघा. महिमा या वाक्याच्या कंटेट वर संतापू की प्रेझेण्टेशन वर या संभ्रमात दिसते.
तो ९० च्या दशकात अमेरिकेत काळी हॅट घालून गाडी चालवतो, तीही ओपन कन्व्हर्टिबल. एकूण हे कथानक कोणत्या दशकात घडले याची घईची काहीतरी गडबड दिसते किंवा कॉस्च्युम डिझाईनरने "द अनटचेबल्स" किंवा "मॅड मेन" समोर ठेउन ते डिझाईन केलेले असावेत. अपूर्व भारतात कधीच आलेला नसतो. आणि तरीही अस्खलित हिन्दी बोलत असतो. एवढेच नव्हे तर अमेरिकेतील सर्व लोक, अगदी चायनीज बार ओनर्स सुद्धा हिन्दीच बोलतात. शाहरूख भर तरूणपणी सस्पेंडर्स असलेले फॉर्मल कपडे घालून भारतात आलेला असतो. त्याचे सूट वगैरे सुद्धा कायम वाढत्या अंगाचे असल्यासारखे ढगळ दिसतात. कदाचित अपूर्व आणि शाहरूख दोघांनाही बसतील अशा मधल्या मापाचे बनवले असावेत. गंगाही दिल्ली ते हॉलीवूड विमान प्रवासात सगाईचे सर्व दागिने, भरजरी ड्रेस घालून बसलेली असते. अपूर्व श्रीमंत असल्याने थीम पार्क मधे सुद्धा सूट, टाय घालून फिरतो.
शाहरूख ला नक्की किती कला अवगत आहेत हे मोजणे अवघड आहे. वेगवेगळे डान्सेस, चित्रकला, पियानो व बासरी वाजवणे, मुर्तिकाम करणे (व का कोणास ठाउक त्यांना घूंघट घालून ठेवणे), कबड्डी खेळणे, कार्स रिपेअर करणे हे तर असतेच. पण त्याचे 'आय लव्ह इंडिया' हे गाणेही गाजत असते. त्याबद्दल मुलाखत सुरू असताना किशोरीलालने बोलावले म्हणून शेवटचा प्रश्नही न ऐकता तो लगेच निघतो. मग मात्र घरी जाऊन कपडे वगैरे बदलून त्याला भेटण्याएवढा वेळ असतो.
मधे एकदा शाहरूखचा वाढदिवस येतो. तेथे महिमा त्याला हॅपीबड्डे करायला जाते. ते त्या खत्रूट भावजयीला आवडत नाही. ती तिला म्हणते "दुनिया हस रही है हमपर!" "दुनिया"! यांच्या घराचा परिसर एवढा मोठा असतो की सख्खे शेजारी सुद्धा मैलभर लांब असतील. त्यात "looks like it's somebody's birthday, some lady is singing there. He looks a little big for the balloons and confetti though" असा विचार ते करणार नाहीत. कारण त्यांना दुसरे उद्योग नाहीत. त्यामुळे "अहो तो त्याचा खरा मुलगा नव्हे, मानलेला आहे. आणि ही बघा तेथे जाऊन नाचते आहे स्वतःच्या नवर्याला सोडून. काय बाई यांना स्वतःच्या सुनासुद्धा सांभाळता येत नाहीत. अशा हलक्या लोकांच्या वाढदिवसाला कधी कोणी जातात का? ही ही ही ही" - असे भारतातील समाजाच्या व यांच्या कुटुंबांच्या सखोल माहितीवर आधारित गॉसिप ते करतील. एरव्ही त्यांना सरदार आणि अरब यातील फरक कळत नसला तरी.
लग्नाला काही दिवस अजून बाकी असताना मग अपूर्व आणि गंगा लास वेगास ला जायचे ठरवतात. मग तेथे लग्नाआधीच "जिन्दगी का मजा" घेण्याची मागणी अपूर्व करतो ("बाकी लोग अपनी अपनी रूम मे जिन्दगी का मजा ले रहे है" असा संवाद आहे. हे संवाद बहुधा त्या जीवनाचा आनंद घेण्यासंबंधीच्या एका उत्पादनाची जाहिरात लिहीणार्याने लिहीले असावेत). ती ते साफ नाकारते आणि तेथून पळून जाते. ती पळाली हे कळल्यावर "पोलिस कमिशनर को फोन लगाओ" असे अमरिश पुरी फर्मावतो. पण अमेरिकेत हे पदच आस्तित्त्वात नसल्याने नक्की कोणाला फोन करायचा हे कोणालाच कळाले नसावे. त्यात शाहरूख चे जासूस चारो तरफ फैले हुवे असल्याने ती "वॉटरफ्रण्ट स्टेशन" वर दिसली हे त्याला कळते. जे व्हँकुव्हर मधे आहे, अंतर सुमारे १३०० मैल. आणि कॅनडात. ही पळाली लास वेगास मधून व शाहरूख सॅन फ्रान्सिस्को मधे आहे. मग तो सॅन फ्रान्सिस्कोहून 'वेस्ट कोस्ट एक्सप्रेस' ने तेथे येतो. जी व्हँकूव्हरची "कम्युटर" रेल सर्विस आहे, मुंबईच्या लोकलसारखी. तो जेथे उतरतो तेथेच समोर ती उभी असते.
मग शाहरूख व ती भारतात पळून जातात. फैले हुवे जासूस इंडस्ट्रीमुळे हे ही कोणीतरी प्रत्यक्ष बघते व अपूर्व ला सांगते. आंतरराष्ट्रीय प्रवासास शाहरूख व गंगा ला पासपोर्ट वगैरेंची गरज पडत नाही. कदाचित "हमारे संस्कृती मे पासपोर्ट नही पूछा करते..." वगैरे वाक्ये सुरू झाल्यावर इमिग्रेशन ऑफिसरने "नको नको, त्यापेक्षा तू जा" म्हणून स्वतःची सुटका करून घेतली असेल.
ते भारतात आल्यावर तिच्या घरचे तिलाच दोष देतात. आपल्या वागण्याचे कारण चित्रपट संपेपर्यंत सांगायचे नाही या हट्टामुळे तिचाच दोष आहे असा समज निर्माण होतो. मग शाहरूख ला हाकलून दिले जाते. नंतर गंगा घरातून पळून जाते. काही वेळ आधी निघून गेलेला शाहरूख, नंतर बर्याच वेळाने घरातून पुन्हा पळालेली गंगा, नंतर अमेरिकेतून आलेला अपूर्व आणि इतर रिकामटेकडी मंडळी हे सर्व कोणत्यातरी पुरातन इमारतीत एकाच वेळेला आपोआप येतात. काळ व दिशा यांची कोणतीही बंधने त्यांच्या आड येत नाहीत.
शेवटी सर्व उघडकीला येते. सर्व म्हणजे ते जिंदगी का मजा प्रकरण. पण यामुळे गंगाने अमेरिकेतून थेट भारतात पळून येणे हे योग्य ठरते. मग शेवटी तिचे शाहरूखशीच लग्न ठरून हा चित्रपट संपतो आणि दोन्ही संस्कृती सुटकेचा निश्वास टाकतात.
एक ब्लूपरः आता या वेगळ्या ब्लूपर ची काय गरज आहे असे आपल्याला वाटेल. पण ते ही आहे. अमरिश पुरी शाह रूख ला दुसरीकडे जायला सांगत असल्याच्या शॉट मधे मागे एक फ्रेम आहे. क्लिंटन व अमरिश पुरी हात मिळवताना. ते नीट बघितले तर लक्षात येते की भलत्याच दोन माणसांच्या फोटोवर क्लिंटन व पुरीसाहेबांचे चेहरे चिकटवले आहेत. आणि ब्लूपर ऑन ब्लूपर हा की हा फोटो फक्त समोरच्या शॉट मधे दिसतो, त्याच चर्चेच्या बाजूने घेतलेल्या शॉट मधे तो कोठेच दिसत नाही.
घई साहेबांनी अमेरिकेच्या
घई साहेबांनी अमेरिकेच्या नावाखाली कॅनडा मधील vancouver दाखवले आहे. महिमा विमानातून येताना मागे दिसणारा निसर्ग, अमरीश पुरीचा बंगला, waterfront स्टेशन वगैरे सगळे vancouver आहे. अपवाद ये दिल दिवाना हे गाणे आणि लास व्हेगास.
अमरिश पुरीला म्हणे १८ मुले
अमरिश पुरीला म्हणे १८ मुले असतात व ११ मुली>>>>how can it be possible?
अपूर्व ची एन्ट्री त्यामानाने
अपूर्व ची एन्ट्री त्यामानाने साधी. मात्र हावभाव असे की "अच्च्या अच्च्या माना वेळावून बोलते म्हातारी" या पुलंच्या वाक्याची आठवण येते ("संगीत चिवडा"). "गंगा, अमेरिकामे गर्ल फ्रेण्ड्स के साथ ऐसी बाते हो जाती है" या अफलातून जस्टिफिकेशन ची डिलीव्हरी बघा. महिमा या वाक्याच्या कंटेट वर संतापू की प्रेझेण्टेशन वर या संभ्रमात दिसते.>..>>पुलं सारखेच तुमच्या वाक्क्या वाक्क्या ला कोट करून तुम्हाला सहानुभूती दर्शवते
अरे हे धागे कोण काढतो रे वर
अरे हे धागे कोण काढतो रे वर.
हापिसात वाचायची सोय नाही.
<<<<अच्च्या अच्च्या माना वेळावून बोलते म्हातारी>>
परत एकदा वाचून परत एकदा हसले
परत एकदा वाचून परत एकदा हसले
लोल... हा चित्रपटपाहिला
लोल... हा चित्रपटपाहिला तेंव्हा शाळेत होतो, तेंव्हा या गोष्टी कळल्या नसत्या, अजूनही कॅनडा पहिला नाहीय अजूनही कळले नसते.
हे मी परत परत वाचून पहील्या
हे मी परत परत वाचून पहील्या इतकाच हसतो.
निव्वळ <<<<अच्च्या अच्च्या माना वेळावून बोलते म्हातारी>> एव्हढ्यासाठी मी हा चित्रपट शोधला.
बाकी महीमा वय उलटलेली लग्नासाठी हापापलेली वाटते. ती जे काही हावभाव करते ते ८० च्या दशकातल्या चित्रपटातले आहेत.
बरं तू माझ्या मुलाला भारतात ने असं अमरीश पुरी सांगतो तेव्हा शहरूख इतका रडवेला का होतो?
तो बर्याच सिन्स मध्ये मुरडा धरल्यासारखा वावरतोय. मोकळ तर व्हायचय पण पादलो तर फजिती असे काहीतरी भाव आहेत.
अरे बापरे
अरे बापरे
@गुगु
@गुगु
(No subject)
वेड
वेड
मस्त
मस्त
कधी कधी दुःखी मू ड असतो,
कधी कधी दुःखी मू ड असतो, नैराश्य येते तेव्हा हे परीक्षण पुन्हा एकदा वाचतो आणि पूर्वपदावर येतो!
अलीकडे आलोकनाथला बघून "क्रीपी
अलीकडे आलोकनाथला बघून "क्रीपी फिलींग" येते. प्रस्तुत कलाकृतीत ताज महालसमोर अमरीशपुरी भारतीय प्रेमाचे सूत्र समजावून देऊन हिअर कम्स अनदर अनबिलिवेबल पर्सन असे म्हणून आलोकनाथाच्या स्वागताला जातो तेव्हा त्या अनबिलिवेबलला एक वेगळाच अर्थ येतो!
आठ वर्षांनी सुद्धा ह्या
आठ वर्षांनी सुद्धा ह्या लेखाची जादू ताजी आहे, हे परदेश चं (अप)यश समजायचं की फारएण्डाचं यश? माझ्या मते later. तुस्सी कमाल कर दित्ता फा!
छान लिहिलंय !!!!
छान लिहिलंय !!!!
एकूणच असंख्य भारतीय चित्रपट पहाताना असा विचार येतो की यांना पैसे कोण देतो हे असले तर्कशून्य चित्रपट बनवायला?आणि थोडा देखील रिसर्च किंवा विचार ते करत नाहीत का? कि आपण हे काय बनवतोय? काय दाखवतोय?
भारी .....
भारी .....
असुफ, परदेस ला तर्कहीन म्हणणे
असुफ, परदेस ला तर्कहीन म्हणणे म्हणजे मेला, मिस्टर या मिस, लक्ष्मणरेखा(याला हिंदी कपडे घातलेला अश्रूंची झाली फुले म्हणता येईल) या चित्रपटांचा मूलभूत हक्क हिरावून घेणे आहे. ☺️
(No subject)
Rofl
Rofl
त्या ' जिंदगी का मजा ले रहे
त्या ' जिंदगी का मजा ले रहे है ' वादावादी नंतर (त्यात अपूर्वाचा मुद्दा खरेतर चांगला आहे) महिमा त्याला जी पाहिली शिवी घालते ती आहे ' निशाचर ', फारच सात्विक.
आज परत एकदा वाचलं हे
आज परत एकदा वाचलं हे
हाहाहा मस्तच!!! ब्लूपरवर
हाहाहा मस्तच!!! ब्लूपरवर ब्लूपर
कधी कधी दुःखी मू ड असतो,
कधी कधी दुःखी मू ड असतो, नैराश्य येते तेव्हा हे परीक्षण पुन्हा एकदा वाचतो आणि पूर्वपदावर येतो! > +१
जुन्या मायबोली वरची परीक्षणे
जुन्या मायबोली वरची परीक्षणे कशी वाचायची?
लिंक वर टिचकी मारली की page not found एरर येते आहे
मस्त पंचेस आहेत एकेक...
मस्त पंचेस आहेत एकेक...
Farend नी माबो सोडले का..
Farend नी माबो सोडले का...दिसत नाहीत आजकाल.
ए अरे!
ए अरे!
या सीनमध्ये महिमा तोंड
या सीनमध्ये महिमा तोंड उघडेपर्यंत आपल्याला वाटते सगळी लहान मुलेच बसली आहेत तिथे. या फोटोत महिमा शोधा!
पवन मल्होत्रा सारख्या गुणी कलाकाराला कसे फडतूस काम दिले आहे कुठे ब्लॅक फ्रायडे मधला टायगर मेमन आणि इथे शाहरुखचा एक दोस्त
पवन मल्होत्रा सारख्या गुणी
पवन मल्होत्रा सारख्या गुणी कलाकाराला कसे फडतूस काम दिले आहे Sad कुठे ब्लॅक फ्रायडे मधला टायगर मेमन आणि इथे शाहरुखचा एक दोस्त Sad
>> डोन मधे पण तोच
Pages