"श्रावण तो आला"

Submitted by निलेश उजाल on 13 August, 2010 - 03:04

मास श्रावण तो आला,घेऊन संगे उत्साहाला
मग उधाण सणांना,फुटे पालवी मनाला____

मास श्रावण तो आला,धरा ल्याली हरा शालू
तिच्या अंगी पिवळ्या झळा,लागल्या उन्हाच्या लोळू___

मास श्रावण तो आला,इंद्रधनु उमटती
सप्तरंगांच्या काठी,मन हेलकावे घेती___

मास श्रावण तो आला,वेड्या सरी पावसाच्या
नवरोमांचीत ताजवा,त्या उरात पात्यांच्या___

मास श्रावण तो आला,व्रतवैकल्यांसहीत
करु भोजन आता,गुळ-साखर,दही-भात___

मास श्रावण तो आला,ह्रिदयात हुरहुर
देवतांच्या चारित्र्याने,उमले भक्तिसागर___

मास श्रावण तो आला,मस्त सरिंना घेऊन
लाऊन डोळे वाटेकडे,दारी बसली बहिण___

मास श्रावण तो आला,हिरवळीस उधाण
अत्तरलेल्या रानफुलांत,मन गेलं ग रमून___

मास श्रावण तो आला,दही-हंडी नटली सुंदर
नजर चुकवून देवकिची,आला नंदकिशोर___

मास श्रावण तो आला,मनगटी बळ मोठं
बहीणीच्या प्रेमापुढं,सारं ठरतंया खोटं___

मास श्रावण तो आला,बैल सुखाचा सण
वर्षभर थकलेले,जाती क्षणात सुखावून___

मास श्रावण तो आला,चला पुजू शंकराला
शुध्द दही-भात आणि दूध,वाहुया तयाला___
वाहुया तयाला___
वाहुया तयाला___

गुलमोहर: 

धन्यवाद सुर्या....................