श्रीनिवास पेंढारकर - एक बाप - क्रमशः - भाग १८

Submitted by बेफ़िकीर on 13 August, 2010 - 01:23

गट्टू - तुम्हाला कंटाळा नाही आला?
श्री - मला? हा हा हा हा! छे? कसला?
गट्टू - नुसत बसून राहण्याचा?
श्री - नुसता कुठे बसलोय? तुझ्याशी बोलतोय, तुला पाणी देतोय, औषध देतोय, बर्फी मागीतलीस ती आणली. उलट इथे बसून तुझ्याशी भरपूर बोलता येतंय, सगळा वेळ तुझ्याबरोबर घालवायला मिळतोय म्हणून मला आनंदच वाटतोय. नाहीतर नुसता पळत असतोस इकडे तिकडे!
गट्टू - बाबा, तुमची बोटं गेली तेव्हा... मी काहीच मदत केली नाही ना?
श्री - कित्तीतरी मदत केलीस! आणि मुख्य म्हणजे तू केवढासा होतास तेव्हा.. तू काय करणार?
गट्टू - पण... मी.. लक्षच दिलं नाही ना?
श्री - अरे वेडायस का? तू होतास... किती बरं...
गट्टू - आठ..
श्री - हं! आठ वर्षांचा.. मी तुझ्याकडे लक्ष द्यायचं का तू माझ्याकडे? काहीतरी विचार करत बसू नकोस..
गट्टू - बाबा...
श्री - हं..
गट्टू - हे.. हॉस्पीटलचे... किती पैसे होतात हो??
श्री - हा हा हा हा! अरे गट्ट्या, वेड लागलंय का तुला?? हॉस्पीटलच्या बिलाची तुला काय काळजी?
गट्टू - तुमच्याकडे... आहेत तेवढे पैसे?
श्री - गट्टू.. अरे आपण जी बचत करतो ती अशाच प्रसंगांसाठी ना? काही अचानक झालं तर पैसे असावेत म्हणूनच बचत करतो की नाही?
गट्टू - पण आहेत का?
श्री - भरपूर आहेत..
गट्टू - भरपूर?
श्री - चिक्कार आहेत. तू बरा व्हावास म्हणून मी आयुष्यभरसुद्धा पैसे मिळवत राहीन..
गट्टू - बाबा... मी... मी तुम्हाला खूप मोठा होऊन दाखवीन.. खूप पैसे मिळवून दाखवीन.. आणि.. तुमचं सगळं करीन..
श्री - व्वा! तू लहान असतास तर तुला जवळच घेतलं असतं मी...
गट्टू - मी.. तुमच्याकडे कधी लक्षच देत नाही .. तुम्ही सारखे फिस, स्वैपाक, मला हवं ते सगळं आणणं.. यातच गुंतलेले असता... मी मात्र सारखा खेळतो..
श्री - एक प्रकारे बरंच झाल तू पडलास ते म्हणायचं.. त्यामुळे असे चांगले चांगले विचार सुचू लागले..
गट्टू - चेष्टा काय हो करता बाबा?
श्री - चेष्टा नाही अन काही नाही.. आता विश्रांती घे पाहू?
गट्टू - सारखी विश्रांतीच चाललीय.. बाबा? .. सायकल मोडली?
श्री - छे? तुम्हीच दोघे नुसते पडलात.. सायकल आहे तशीच आहे..
गट्टू - नैनाला खरच काही झालं नाही ना?
श्री - नाही रे बाबा.. तीही सारख तुझ्याबद्दल विचारते अन तू तिच्याबद्दल! परवा भेटली ना तुला?
गट्टू - माझ्यामुळे पडली ती..
श्री - हो ना? मग आता डबलसीट जायचं नाही.. पण तिला काही झालेलं नाहीये..
गट्टू - हेअर क्रॅक म्हणजे?
श्री - हेअर क्रॅक म्हणजे... केसाइतकी बारीक क्रॅक..
गट्टू - हाडाला?
श्री - हं!
गट्टू - तसा खरा मी रडलो नसतो.. पण.. नैना पडल्याचं वाईट वाटलं..
श्री - वा वा! शूरच अगदी!
गट्टू - खरच सांगतोय.. भरून आलं मला..
श्री - हा 'भरून आलं' शब्द कुठनं कळला तुला?
गट्टू - वाक्प्रचार आहेत आम्हाला..
श्री - आभाळ भरून आलं आणि मन भरून आलं.. एकच का?
गट्टू - छे! मन भरून आलं म्हणजे गलबललं!
श्री - गलबललं?
गट्टू - हां! म्हणजे असं.. सद्गदीत वगैरे सारखं..
श्री - अरे वा? आणि आभाळ भरणे म्हणजे?
गट्टू - ते एक वेगळंच.. नैना येणारे आज?
श्री - नाही.. उद्या येईल..
गट्टू - उद्या येईल म्हणजे? .. आज सोडणार नाहीयेत?
श्री - सोडणारेत.. उद्या घरी येईल ती तुला बघायला..

'बिल तयार आहे सर' म्हणून एक नर्स आत डोकावून गेली अन श्री लगबगीने उठला. एकवीसशे रुपये! पैसे नव्हते असे नाही. ठेवलेले होते. त्यात पुन्हा सगळा वाडा होताच मदत करायला. पण तरीही.. एकवीसशे रुपये म्हणजे.. श्रीसाठी खूप होते.. पण ते देताना त्याच्या मनात पैसे गेल्याची अर्थातच जराही खंत नव्हती. त्याची इच्छा एकच होती. गट्टूचा उजवा गुडघा पूर्ण बरा व्हावा.

पण या निमित्ताने रिक्षा करायला लागली अन गट्टूच काय, कित्येक महिन्यांनी श्री रिक्षेत बसला. वाड्यात अगदी जोरदार वगैरे नसले तरी प्रेमाने स्वागत झाले गट्टूचे! सगळ्यांच्याच डोळ्यांमधून अगदी आतून आतून आलेले प्रेम बरसत होते. बेरी काकांनी वाड्यात सगळ्यांना कंदी पेढे खायला दिले.

मात्र! ज्या तीव्र भावनिकतेने नैना गट्टूकडे धावली होती.. ते फक्त किरणदादा अन अभ्यंकर आजींनीच पाहिले होते. आणि त्यांना त्यात काहीही विशेष वाटले नव्हते. 'आपण दोघे एकदम पडलो' म्हणून वाईट वाटत असल्यामुळे नैना धावली असावी एवढेच त्यांच्या मनात आले होते. नैनाने धावत येऊन गट्टूच्या खांद्यावर हात ठेवला. तिच्या इवल्याश्या डोळ्यांमधे हसू आणि रडू दोन्ही होते. तिला आत्ताही आठवत होते. खरे तर तिने चुकून पुढचा ब्रेक एकदम दाबला होता. तिला 'हा ब्रेक आहे' हेही माहीत नव्हते. पण त्यानंतर तिला व्यवस्थित समजले होते की आपण ती हँडलच्या खालची काडी जोरात दाबल्यावर क्षणार्धात सायकल पार उलटी व्हायला लागली अन तोल गेल्यामुळे पडली. पडताना आपण पुढच्या दांडीवरून सुटल्यामुळे सरळ महेशच्या उजव्या गुडघ्यावर आपले सगळे वजन टाकून पडलो अन त्यानंतर त्याला जवळपास पाच दिवस हॉस्पीटलमधे ठेवले होते.

हेअर क्रॅक असूनही पाच दिवस ठेवण्याचे कारण केवळ 'काळजी घेतली जाणे' इतकेच होते. पण या पाच दिवसांमधे गट्टूला अनेक नवे अनुभव, जे अगदी मनात खोलवर रुतून बसतील, असे मिळाले.

एक म्हणजे 'आपले बाबा आपल्यासाठी काहीही करतात'! त्याला आजवर त्याने केलेल्या सर्व हट्टांचा अन रुसण्याचा पश्चात्ताप होत होता. यापुढे कसलाही हट्ट करायचा नाही अन बाबांशी कायम हसत खेळत वागायचे हा निर्णय त्याने दुसर्‍याच दिवशी घेऊन टाकला होता.

दुसरे म्हणजे वारंवार त्याला अपघाताच्या रात्रीची डबलसीट राईड आठवत होती. किती मस्त अन शूरपणाचे वाटत होते नैनाला पुढे बसवून सायकल चालवायला. आता ती आपल्याला हसत असेल, की आपण मोठे शहाणपणा करायला गेलो, तिला अगदी डबलसीट वगैरे घेतले अन आपणच पडलो. गट्टूला या विचाराने फार त्रास होत होता. पण त्याचवेळेस ती पुढे बसलेली असताना किती मस्त वाटत होते या आठवणींनी तो व्याकूळही होत होता.

तिसरे म्हणजे समीरदादाने हॉस्पीटलमधे उद्गारलेले बोचरे शब्द! 'मी आईबाबाना सांगत होतो की याला आत्ता नवी सायकल घेऊ नका, महागड्या गोष्टी कशा वापराव्यात हे तुला समजणार नाही'! गट्टूला आयुष्यात पहिल्यांदाच जाणवत होते की समीरदादा बहुधा आपला वेल विशर नाही.

चवथे म्हणजे या निमित्ताने दोन दोन दिवसच का होईना पण उषा आत्या अन तारामावशी येऊन गेल्या अन दोघींनी काही ना काही आणले. पण त्यांच्या येण्याबाबतचा अनुभव हा की त्या एकमेकींशी एक अक्षरही बोलल्या नाहीत. काय बिनसले होते ते गट्टूला माहीत नव्हते अन बाबांना ते विचारण्यची सोय नव्हती.

आणि सर्वात महत्वाचा आणि पाचवा अनुभव म्हणजे का कुणास ठाऊक, पण सतत नैनाला भेटायची इच्छा होत होती. 'ते पिक्चरमधे दाखवतात तसलं प्रेम बिम करतोय की काय आपण?'! अत्यंत अप्रिपक्वपणे हे विचार गट्टूच्या मनात येत होते.

आणि आज एकदम नैना? इतक्या जवळ? असा खाम्द्यावर हात ठेवून? आणि... इतक्या प्रेमाने बघतीय?

गट्टू - तू कशीयस?
नैना - ....
गट्टू - रडू नकोस.. सांग ना.. तू आता बरी आहेस ना?
नैना - .....
गट्टू - अगं रडू नकोस ना..
नैना - माझ्यामुळे तुला केवढं लागलं..
गट्टू -छे? माझ्याचमुळे तुला लागलं!
नैना - नाही.. मी ब्रेक दाबला पुढचा..
गट्टू - हां! म्हणून पडलो होय आपण?

नैना एकदम खुदकन हसली. आता गट्टूही हसायला लागला. त्याला आत्ता घोळ समजला होता.

वीस दिवसांनी गट्टु पूर्णपणे पुर्ववत झाला आणि शाळेत जायला लागला. देवांगला खूप आनंद झाला. सगळ्यांनाच आनंद झाला. महिनाभर तरी श्रीने गट्टूला खेळताना हळू खेळ म्हणून सांगीतले होते.

आठवीच्या सहामाहीत ७४ % पडले अन श्री गट्टूला काहीही बोलला नाही. उलट अपघाताचा विचार करता हे मार्क्स चांगलेच होते. पण गट्टूला गोम माहीत होती. त्याच्या दृष्टीने सहावी व सातवीपेक्षा आठवीची ट्रिग्नॉमेट्री, पायथागोरस वगैरे अन संस्कृत अत्यंत सोपे होते. त्याचे इंग्लीश बरे होतेच. त्यामुळे त्याला चांगले मार्क्स पडले आहेत हे तो जाणून होता. अल्जीब्राचा मात्र त्याला कंटाळा यायचा.

पण! आता त्याच्या आयुष्यात एक नवीन व कायमस्वरूपी विरंगुळा निर्माण झाला होता. नैना राजाराम शिंदे! त्याचे कारणही तसेच काहीसे होते! कालच संध्याकाळी ती खेळायला आली नाही म्हणून तो सरळ तिच्या खोलीत गेला अन ती 'आज नाही येणार' म्हणाल्यावर तो तिला ओढून बाहेर काढण्यासाठी हात लावणार तोच ती एकदम शरमून दूर होत 'मला शिवू नकोस' असे म्हणाली...

... आणि तिची ती एक्स्प्रेशन्स त्याने आजवर पाहिलेल्या सर्व एक्स्प्रेशन्सपेक्षा खूपच वेगळी वाटली त्याला..

त्यात काहीतरी होते खरे! तिच्या चेहर्‍याला लाजणे किती खुलून दिसते हा विचार त्याच्या मनात त्या क्षणापासून रेंगाळत होता. अर्धवट काहीतरी माहिती असल्यामुळे 'तिच्याशी आता आपण फार लगट करणे बरोबर दिसणार नाही' इतकेच त्याला समजले. पण.. नेमकी याच गोष्टीमुळे तिच्या सहवासाची, आजूबाजूला असण्याची ओढ काल होती त्याहून दसपट वाढली. तो तिच्या घराबाहेर पडत असताना नैना अत्यंत लाजून त्याच्याकडे पाहात होती आणि त्यामुळे त्याला 'आपण काहीतरी घोर अपराध केला असावा' असे वाटू लागले होते.

आता जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी त्याच्या डोक्यात नैना हा एकमेव विचार नांदू लागला. शाळेत कुणाचे लक्ष नाही असे पाहून हळूच वहीच्या एका कोपर्‍यात 'नैना' असे लिहायचे अन पटकन तो कोपरा फाडून त्याचे तुकडे करून फेकून द्यायचा ही पहिली पायरी त्याने ओलांडली.

ती दिसावी, तिला आपण दिसावे, काही नवीन घेतले किंवा घातले तर ते तिने पाहावे, वाड्यात खेळताना ती पाहात असेल तर आपण फटका मारल्यावर अगदी षटकार नाही तरी चौकार तरी जावा, तिच्या डोळ्यांमधे आपल्याबद्दलचे कौतूक दिसावे आणि.. सतत काही ना काही बडबड करून तिचे लक्ष वेधून घ्यावे अशा अनेक उर्मी आपोआपच त्याच्या मनात यायला लागल्या.

त्यातच आठवीच्या दुसर्‍या सहामाहीत व संपूर्ण नववी अशी दिड वर्षे शाळेत एन.सी.सी. किंवा स्काऊट यातील एक घ्यायचेच होते. आणि गट्टूने एन्.सी.सी. निवडले! आहाहा! काय पण तो कडक युनिफॉर्म! हिरवा बेल्ट, खाकी शर्ट पँट, चकचकीत बर्गंडी कलरचे शूज, उजव्या दंडावर कॉर्पोरलची रॅन्क मिळाल्याचे दोन पट्टे, एक शिट्टी जिची दोरी शोल्डरफ्लॅपमधून डाव्या खिशात येणारी, स्टार्च केलेले जाडेभरडे कपडे अन त्यांची अत्यंत कडक इस्त्री आणि या सगळ्यामुळे व्यक्तीमत्वात उगाचच येणारा एक डौल! शुक्रवारी संध्याकाळी साडे चार ते साडे पाच आणि शनिवारी दुपारी बारा ते एक असे एन्.सी.सी.चे पिरियड्स होते. कधी एकदा शुक्रवार अन शनिवार येतोय असे वाटू लागायचे गट्टूला! कारण तो शाळेत जात असतानाच्या वेळेस नैना ऑलरेडी शाळेत असायची आणि तो यायच्या वेळेस मात्र ती घरी असायची. त्यामुळे शुक्रवारी अन शनिवारी घरी येताना त्याला हल्ली पुर्वीपेक्षा, म्हणजे 'नुसताच रविवार जवळ आल्याच्या' आनंदापेक्षा अधिक आनंद वाटू लागला होता. त्यातच परवा नैनाने सरळ त्याच्याजवळ येत त्याच्या डाव्या खिशातील शिट्टी काढून, ती नीट निरखून जोरात वाजवली होती आणि त्याला विचारले होते की शिट्टी कशासाठी आहे? त्यावर त्याने डौलात उत्तर दिले होते की युद्धाची वगैरे साधारण सवय असावी म्हणून, त्यात संदेश वगैरे पाठवण्यासाठी विशिष्ट पद्धतीने शिट्टी वाजवतात आणि मी तर कॉर्पोरल असल्यामुळे मला तर वाजवावीच लागणार!

मग कॉर्पोरल म्हणजे काय यावर चर्चा झाली. पुढच्या वर्षी मी प्रमुख होणार आहे असेही त्याने बेधडक सांगीतले. शाळेच्या लेव्हलावरही रॅन्क्सच्या बाबतीत बरंच राजकारण आहे हे नैनाला पटवून दिले.

आणि मागे फिरल्या क्षणापासून ते आत्तापर्यंत त्याच्या डोक्यात तोच एक विषय घोळत होता. 'आपली शिट्टी बघायला ती जवळ आली तेव्हा तिच्या पावडरचा सुवास किती सुंदर आला'!

नैना! मनाचा एक कोपरा वगैरे निव्वळ चुकीच्या कल्पना! अख्खे मनच त्या दोन अक्षरी नावाने व्यापले होते त्याचे!

आता रात्री झोपायच्या आधी तो खिडकीत मुद्दाम उभा राहू लागला. या गोष्टीमुळे श्रीची एक वेगळीच कुचंबणा होऊ लागली. त्याला कळेना हा का इथे उभा राहतोय! 'झोप, झोप' म्हंटले तरी लवकर झोपेना! मग श्री उगाचच 'जेवल्यानंतर शतपावली आवश्यक' म्हणून कॉमन गॅलरीत चालायला लागला. हे दिव्य बाळ खिडकीत उभं! मधूनच नैनाच्या खिडकीतून तिची एखादी झलक! आणि सरतेशेवटी एक... गोड गोड नजरानजर! इकडे पिताश्रींना इंतजार असायचा मधूसूदन कर्वे पान खायला कधी बाहेर पडतात याचा.

बायकांची पुरुषांमधे गुंतण्याची एक विशिष्ट प्रोसेस असते. (व्यक्तीशः मला तसे अनुभव आहेत, त्याशिवाय मी असली धाडसी विधाने करणार नाही.)

त्या प्रोसेसचे अनेक टप्पे असतात. त्यातील पहिला टप्पा म्हणजे अमूक अमूक माणूस आपल्याकडे इंप्रेस होऊन पाहात आहे हे समजणे!

दुसरा टप्पा म्हणजे 'तो तसा पाहात आहे' यावर स्त्रीच्या मनात आपोआप उमटलेला विचार! याचे काही प्रकार असतात. त्यातला कोणता प्रकार होतो यावर पुढे काय होणार हे अवलंबून असते. ते प्रकार असे!

- काय नालायकाची नजर आहे
- बाई बघितली नाही का कधी
- सगळ्यांकडेच असा बघतो की माझ्याकडेच?
- असं सारख बघणं चांगलं का?
- म्हणजे अजूनही लोक माझ्याकडे बघतात तर..
- ह्यांना काही कौतूकच नाहीये माझं! बाकीचे कसे बघतात माझ्याकडे..
- इतका काय हा पाहतोय..
- आज दिवसभरात दिसलाच नाही.. नाहीये की काय घरात..
- अय्या.. आहे की.. उगाच बघितलं मी..
- नुसतं बघितलं म्हणून काही भोकं पडत नाहीत म्हणा..
- तसा देखणाय..
- वा! आज अगदी नटलीय स्वारी..
- नाही बघायचं ठरवलं तरी नजर तिकडेच जाते बाई..
- मी काय म्हणते.. आपण प्रामाणिक आहोत ना आपल्या संसारात.. मग थोड्याश्या मैत्रीने काय होणारे?
- खुळ्यागतच बघतोय माझ्याकडे..
- आज मुद्दाम बोलायला आला होता.. मला काय कळत नाही का?
- आज मी ह्यांना सांगीतलं... हा वाचायला पुस्तक देऊन गेला म्हणून.. माहीत असलेलं बरं बाई!
- आता हे पुस्तक नेऊन द्यायला पाहिजे..
- गप्पा तर अशा मारतो की जणू ...
- दोन दिवस गावाला गेला तर किती चुकल्या चुकल्या सारखं होतं नाही?

वगैरे वगैरे! (विषयाचे भान ठेवायला हवे, त्यामुळे पुढचे लिहीत नाही.)

प्रमिला आत्ता शेवटच्या टप्प्यात होती.

पुरुषांची बायकांमधे गुंतण्याची काहीही प्रोसेस वगैरे नसते. ते बिचारे सरळमार्गाने गुंततात.

त्यामुळे श्री 'मधूसूदन अफरातफरीतून सूटला तेव्हाच्या पार्टीत खीर वाढताना' प्रमिलाचे लाजणे पाहून सरळ आपला गुंतला होता.

तरुण तरुणींचे वेगळे असते. त्यात तरुणींची प्रोसेस विवाहीत स्त्रियांपेक्षा अगदीच वेगळी असते.

- याला पाहिलं की कयामतसे कयामत तक मधला आमीरच आठवतो..
- ही कोण नटवी? बोलतोय कसा तिच्याबरोबर... अगदी जनम जनम का साथी असल्यासारखं..
- मी आता बोलणारच नाहीये..
- पण तेही जमत नाही..
- फूल?
- मला?
- गुलाब?
- लाल?
- इश...
- कॉफी?
- बाग?
- नको
- आत्ता असलं काही नाही हं करायचं?
- आईला आता सांगायलाच पाहिजे.. नाहीतर स्थळं बघत सुटायची..
- मी नाही रे जगू शकणार तुझ्याशिवाय..
- पळून? .. हो.. हो हो हो... मी एका पायावर पळून येईन..

पळून बिळून कुणी जात नाही. पण 'पहिला प्यार वो पहिला प्यार'च! नंतर हजारो 'प्रेमं' केली तरी पहिल्या प्रेमाची लज्जत जात नाही हे खरं!

पण गट्टू अन नैना हे लहान होते. त्यांच्यात केवळ आकर्षण होतं! कळत काहीच नव्हतं!

पण तिच्यायला तिढा असा होता की बाप करतोय शतपावली अन मुलगा खिडकीत उभा! श्रीला अजिबात माहीत नव्हते की गट्टू का उभा आहे.. आणि बाबा हल्लीच का शतपावली करायला लागले आहेत यावर विचार करण्याचे गट्टूचे वयच नव्हते.

मधू - श्री? .. येतोयस का पान खायला?

(अरे बाबा, तू पान खायला कधी एकदा जातोयस याची वाट बघत माझी सहस्त्रपावली झाली इथे...)

श्री - नाही नाही.. ये जाऊन.. मी जरा चालतो इथेच..

आणि मग यथावकाश, म्हणजे मधूला बाहेर जाऊन दहा एक मिनीटे झाल्यावर हळूच प्रमिलाने पडदा सरकवणे.. उगाचच सरकवल्यासारखा.. मग खिडकीत काहीतरी आवराआवर केल्यासारखे करणे.. मग आत असलेल्या समीरला काहीतरी ओरडून सांगणे.. आणि मग.. एक तिरका कटाक्ष!

जाँ निछावर!

या एका कटाक्षासाठी मी पायांचे तुकडे करत की हो होतो..

मग मंद हसून दोघांनी आपापल्या घराची सर्व दारे, खिडक्या बंद करून घेणे! आणि मनातल्या मनात 'गुडनाईट' म्हणणे!

ही निदान वैचारिक पातळीवरची का असेन पण.. प्रतारणाच आहे हे काय त्यांना समजत नव्हते? दोघेही सूज्ञ होते. पण दोन घटक सतत कार्यरत असतात. एक म्हणजे परिस्थितीचा आयुष्यावर पडणारा प्रभाव आणि मन! बायकोबरोबरचे काही सुगंधी क्षण पूर्णपणे विस्मरणात गेलेले नसले तरी त्यांची तीव्रता कमी होण्याइतका काळ रमाला जाऊन निश्चीतच झालेला होता. १४ वर्षे झालेली होती त्या गोष्टीला! १४ वर्षांमधे स्वतःकडे एक क्षणही बघायला श्रीला वेळ मिळालेला नव्हता. स्त्री हा विषयही खरे तर त्याच्या डोक्यातून गेलेला होता. गट्टुसाठी म्हणून स्वातीला प्रपोज करताना तिने होकार दिलेला पाहून क्षणभरासाठी पुन्हा त्याच्या मनात एक सुगंध उफाळून आला होता. पण ती लाटही विरलीच! तसेही, तो काही प्रमिलाशी काही ना काही तर्‍हेने संपर्क वगैरे करायला पाहिजे अशा विचारांचा मुळीच नव्हता. हे रोज घडत असले तरीही फक्त हेच आणि एवढेच घडत होते. हा श्रीच्या कोरड्या आयुष्याने त्याच्यावर टाकलेला प्रभाव होता. आणि त्याचे मन? ते त्याला सांगत होते की हे सगळे चुकीचे आहे. पण त्याच वेळेस तेच त्याला पुन्हा तिकडेच वळवतही होते.

आणि प्रमिला? समीरसारखा दहाव्वीत असलेला मुलगा अन कर्तबगार पती असताना ती का अशी वागत होती? त्याचे कारण फार वेगळे होते. हे प्रमिलाच्याच नाही तर त्या काळातील अनेक विवाहितांच्या आयुष्यात होऊ शकणारे होते, फक्त प्रमिला चारचौघींमधे उठून दिसणारी असल्यामुळे तिच्या बाबतीत ते अधिक शक्य किंवा अधिक चटकन झालेले होते.

स्त्री शेवटी एक माणूस असते. संसाराच्या रामरगाड्यात जीव ओतते अन संसाराला स्वरूप देऊ करते. त्यात खूप सुखदु:खांचे क्षण येतात. अडीअडचणी येतात. त्यामुळे तर पती पत्नीचे नाते अधिकच गहिरे अन घट्ट होत जाते. पण आयुष्यात स्वतःच्या प्रभावी व्यक्तीमत्वाची पुर्वीची ओळख कुणाच्या स्तुतीमुळे पुन्हा झाली तर क्षणभर मन रमणार! ही स्तुती फक्त शब्दांमधूनच होते असे नाही. काही वेळा ती नजरेतून होते, काही वेळा कृत्यातून! नकळत मन पुन्हा त्या कॉम्प्लिमेंटची वाट पाहते. यामुळे नवर्‍यावरचे प्रेम कमी होते असे मुळीच नाही. पण निसर्ग, वय यांचा काहीतरी दोष असतोच की! सुरुवातील कॅज्युअली घेतल्या गेलेल्या या गोष्टी पुढे मनात मूळ धरू शकतात. आणि एका विशिष्ट मर्यादेपर्यंत त्या होऊ दिल्या तर आयुष्यातील स्पाईस वाढू शकतो. मात्र, हे नीतीच्या विरुद्ध आहे अशी आपली संस्कृती आहे.

पण एकंदरीत हे रोज चाललेले होते अन गेली जवळपास पाच वर्षे चाललेले होते.

श्रीनिवास पेंढारकर... रमाच्या फोटोला हार घालताना, तो फोटो स्वच्छ करताना आपण प्रमिलावहिनींची खिडकीत येण्याची वाट बघतो हे आठवून स्वतःलाच मनातल्या मनात नावे ठेवायचे. लज्जित व्हायचे. रमाच्या डोळ्यांमधील ती मिश्कील छटा पाहून ओशाळायचे. पण... रात्री जेवणे वगैरे झाली की पुन्हा प्रमिलाची वाट पाहायचे.

आज झोपताना श्रीने आपल्या डाव्या हाताच्या पंजाकडे पाहिले. तीन बोटे लुळी पडलेली होती. केवळ लटकायची हाताला! त्यांच्यात जीवच नव्हता. श्रीचे मन कळवळले. दोन गोष्टींनी! एक म्हणजे पाच वर्षांपुर्वी झालेली ती वेदना आठवल्यामुळे अन दुसरे म्हणजे तीन बोटे कायमची निर्जीव झाल्यामुळे! स्वयंपाक व इतर अनेक कामे करताना आता त्या बोटांची गरज लागू नये इतका सराव झालेला होता खरा! पण तरीही त्या बोटांकडे लक्ष गेले की मन कळवळायचेच! हातावर पोट असलेले लोक कसे जगत असतील असे काही झाले तर?

त्या बोटांकडे पाहताना श्रीच्या मनात विचार आले. गट्टू आता मोठा झालेला आहे. आपण प्रमिलावहिनींकडे पाहणे आता पूर्णपणे बंद केले पाहिजे. आपल्याला काही लाज वगैरे आहे की नाही? आता गट्टू मोठा झाला की कॉलेजला जाईल, मग नोकरीला लागेल. त्यानंतर जरा बरे दिवस येतील. आपणही जबाबदारीतून मोकळे होऊ. पण मग... नंतर करायचे काय? एखादे काम करत राहावे. स्वतःला कार्यरत ठेवलेले बरे! आपल्याला तर काही छंदही नाही. गायन, वादन, लिखाण, खेळणे.. कसलाच छंद नाही. आपण कुठल्याही मंडळात जात नाही. नोकरी, हा दास्ताने वाडा आणि हा गट्टू! या तीनच गोष्टी आपल्या आयुष्यात आहेत. बाकी काहीच नाही. आपण काहीतरी छंद लावून घ्यायला हवा. पुढे मन रमायची तरतूद आत्ताच केलेली बरी!

श्रीला विचारांमुळे झोप येत नव्हती. तो उठला व दिवा लावून त्याने स्वतःला कपाटावर असलेल्या जुनाट, आग पडलेल्या व काही ठिकाणी फुटलेल्या आरश्यात पाहिले.

श्रीनिवास पेंढारकर! हा? हा मी? असा दिसतो?

कपाळावरून केस मागे मागे जात असलेले, खांदे किंचित लुळे पडलेले, त्वचा रापलेली, फोर आर्म्सच्या शिरा दिसतायत! काय झालो आपण?

श्रीने खाडकन रमाच्या फोटोकडे पाहिले! आपल्या केसांमधून हात फिरवत ती म्हणायची!

'तुमचे केस अगदी मऊ, सिल्की आहेत.. बायकांना हरतर्‍हेने प्रयत्न करूनही केस असे करून घेता येत नाहीत स्वतःचे!'

एक माणूस नाही? एक माणूस नाही जो केवळ आपल्याकडे लक्ष देईल?

श्रीच्या डोक्यातून आता लुळ्या पडलेल्या बोटांचा अन स्वतःच्य बदललेल्या रुपाचा विचार केव्हाच मागे पडला होता. एक फार मोठा, पोकळी निर्माण झाल्याची भावना ठळकपणे जाणवून देणारा विचार आता त्याचे मन व्यापत होता.

रमा बाळंतपणात गेली. गट्टूला आपण आणि सगळ्या वाड्याने मिळून मोठे केले. त्यासाठी आपण जमेल तसे राबलो. स्वतच्या सर्व इच्छा बाजूला ठेवल्या. स्वतःकडे पाहिलेही नाही. तीन बोटे अपघातात गेली. स्वयंपाक नुसता शिकलोच असे नाही तर गेली चवदा वर्षे आपण स्वयंपाक केलाही. गट्टूवर जमतील तितके चांगले संस्कार केले. कर्जे काढली, हप्ते भरले. नोकरीत शिव्या खाल्ल्या. प्रकृतीकडे पुर्ण दुर्लक्ष केले.

एवढे सगळे करताना... रमा नव्हतीच... पण.. आपल्या आयुष्यात असा एकही माणूस नाही जो आपल्याला नुसते असे म्हणेल..

'किती थकतोस श्री.. जरा घोटभर चहा घे... बस इथे'???????

अंतःकरण पिळवटून बंड करून निघालेली दोन आसवे पापण्यांचा आजवरचा विरोध मोडून गालांपर्यंत येऊन थांबली. शर्टच्या बाहीला डोळे पुसत श्री पुन्हा आडवा झाला.

चितळे आजोबांना कुणीही नव्हते. पवार मावशींना कुणीही नाही. मानेकाकांना कुणीही नाही. आपल्या उषाताईला कुणीही नाही. आपल्या गट्टूला जन्मापासून आई नाही..मग.. मग आपण का रडलो?

आपल्याला गट्टू आहे. पवार मावशी आहेत. अख्खा वाडा आहे. थोरली बहीण आहे. मेहुणी आहे. ऑफीसमधले सगळे आहेत.

'श्रीनिवास पेंढारकर.. तुम्हाला रडण्याचे कारणही नाही.. आणि.. परवानगी तर नाहीच नाही...'

श्रीने झोपेत असलेल्या गट्टूच्या उजव्या गुडघ्यावरून अलगद हात फिरवला.

'बिचारा गट्टू! पडला! किती कळवळला असेल! बाप झाल्यावर समजतं, बापाचं मन कसं असतं ते'!

आपणही सेहेचाळीस वर्षांचे झालो की? सेहेचाळीस? कधी गेली इतकी वर्षे? कुठे गेली? एकच तर आयुष्य मिळतं! रमा गेल्यापासून मुळी काही समजतच नाहीये आपण काय करतोय, काय करायला हवं! गट्टूला पुर्वीसारखे मार्क्स दहावीत पडले तर बरे होईल. डिप्लोमाला घालता येईल. नाहीतर डोनेशनचा प्रश्न उपस्थित होईल. किती आहेत आता आपल्याकडे? आहेत म्हणा साठ एक हजार! कोपरकर म्हणतायत एरंडवण्यात फ्लॅट घेऊन ठेवा. पाच लाखाला आहे. बॅन्क कर्जही देतीय. अजून चवदा वर्षे सर्व्हीस आहे. हप्ते कसेही फिटतील. पण! मुळात अ‍ॅडव्हान्स द्यायला पन्नास हजार नकोत का? स्वतःचे घर हवेच म्हणतात सगळे! खरे आहे. पण मी एक साधा बी.कॉम! त्यात मी सिनियर ऑफीसर! कसं जमणार?

आणि हे... गेल्या काही दिवसांपासून.. आपल्याला हे.. दम लागण्याचं काय सुरू झालंय काही समजत नाही. जरा काही केलं की दम लागतो. पण.. बसायला वेळ कुठे आहे?

आता हा सायकलचा एक हप्ता चालू आहे. गट्टू एकदा हाताशी आला की मग जरा तब्येतीकडे पाहूयात. रमा? तू असतीस तर.. निदान रात्री माझी चौकशी तरी केली असतीस.. काय होतंय हो? असे का दिसताय दमल्यासारखे?

असो! मै जिंदगी का साथ निभाता चला गया.. हर फिक्रको .. धुवेंमें? देव आनंदचं बरंय! खोट्या मिशा लावून तळ्याच्या काठी एकटा आपला मस्त सिगारेट ओढत रफीचा आवाज भाड्याने घेऊन काळज्या धुरात उडवतोय! आपल्याला कसलंच व्यसन नाही हे खर असलं तरीही... पिट्याने अन आपण कॉलेजच्या काळात हळूच सिगारेटी ओढलेल्या होत्या तेव्हा कसली धमाल होती! गेले ते दिवस! सगळंच गेलं! पिट्याही हल्ली फक्त पानच खातो. तेही रात्रीचे जेवण झाल्यावर एकच! आपल्याला तर व्यसन परवडणारच नाही. तेही बरंच आहे म्हणा!

कुणासाठी जगतोय मी असा? कशासाठी? पिट्याला सोन्यासारखी बायको आहे! सगळ्यांना असते. संसार असतो. सकाळी ऑफिसला जाताना गॅलरीत उभी राहून बायको हात करते. लवकर या म्हणते.

माझं आयुष्य काय आहे? गट्टू, गट्टू आणि फक्त गट्टू? ....पण...

.. पण तेच बरोबर आहे.. गट्टूला तर आईच नाहीये.. मग आपल्यासारख्या एखाद्या बापाचे आयुष्य मुलासाठी व्यतीत झाले तर काय बिघडले.. बरबादीयोंका शोक मनाना फिजूल था.. बरबादीयोंका जश्न मनाता चला गया...

विचारांत असताना कधी झोप लागली ते श्रीला समजले नाही. आणि सकाळी उठून सगळे आवरून बसस्टॉपवर गेला तर...

पी.एम.टी. चा एक ऑफीसर तिथे उभा!

ऑफीसर - ओ.. पावणे आठच्या बसचं टायमिंग बदललंय.. ती आता सव्वा आठला येणारे..
स्वाती - अहो?.. पण मग... आम्ही कसं जायचं ऑफीसला??
ऑफीसर - सगळ्यांचीच सोय बघावी लागते मावशी...

स्वाती! आता तिला 'ताई' म्हणणे शोभत नव्हते. अतिशय सहजपणे तो अधिकारी तिला 'मावशी' असे संबोधून गेला होता. आणि ही गोष्ट श्रीच काय, स्वातीच्याही ध्यानात आलेली नव्हती. कारण समोर उभा ठाकलेला प्रश्न अधिक मोठा होता.. बसचे टायमिंग बदलले..

स्वाती - काय करुयात?
श्री - अं! ..
स्वाती - कॉर्पोरेशनला जावं लागेल आता रोज..
श्री - हं! ..
स्वाती - चला.. चालत चालत जाऊ बाई पटकन.. ते सप्रे खवळायचे..
श्री - चल..

त्या दिवशी गेले खरे चालत! पण ऑफीसमधे गेल्यावर लंच टाईममधे मैत्रिणींबरोबर डबा खाऊन आल्यावर स्वाती श्रीला म्हणाली..

स्वाती - शुभदा देसाईची स्कूटर आहे.. ती म्हणतीय मी तुला आणत जाईन म्हणून.. पेट्रोल शेअर करूयात..
श्री - .. ...
स्वाती - काय झालं??
श्री - नाही.. काही नाही..

स्वातीनेही मान खाली घातली. श्रीनेही!

वर्षानुवर्षांचा शिरस्ता आजपासून मोडणार होता.. कायमचा!

हे तुटपुंजे पण दैनंदिन सहवास संपताना मन असं तुटल्यासारखं का होतं? एक अबोल दुपार होती ती किर्लोस्कर ऑईल इन्जिनच्या स्टोअरमधली! कामे त्याच वेगाने होत होती. कोपरकर, देशमाने, सप्रे अन चिटणीस तसेच वागत होते.. पण.. काय झाले आहे ते स्वातीला बरोबर समजले होते.. आणि श्रीलाही..

ऑफीसमधून निघाल्यावर दोघे गेटच्या बाहेर आले.

स्वाती - पेंढारकर..
श्री - हं!
स्वाती - आज..
श्री - हो.. आज बसने जाऊयात एकत्र.. वन्स..ओनली वन्स..

स्वातीने घाईघाईने उलट्या दिशेला मान फिरवत पटकन रुमाल चेहर्‍यावरून फिरवला.

स्वाती - तुम्ही.. उद्यापासून..
श्री - ... सायकल..
स्वाती - दम लागतो ना?
श्री - एवढं काही नाही..

बसमधला प्रवास फारच अबोल झाला.

उतरल्यावर पाचच मिनिटांत दिशा बदलणार होत्या.

स्वाती - आय अ‍ॅम सॉरी..
श्री - का?
स्वाती - मी.. फक्त माझी सोय बघितली..
श्री - म्हणजे काय? ऑफीसला आपापलंच जायचं असतं.. वेडी आहेस का?
स्वाती - पेंढारकर...
श्री - ???
स्वाती - आज.. एक .. कॉफी घ्यायची का?

प्रपोज करण्याच्या वेळेस 'कुणीतरी बघेल' या कारणासाठी कित्येक वर्षांपुर्वी श्रीने मांडलेले हेच प्रपोजल स्वातीने लाज वाटल्यामुळे नम्रपणे नाकारले होते. आज तिला 'बघितले तर बघुदेत' एवढाच विचार करता येत होता.

कॉफी घेतानाही अबोलाच होता.

फक्त वाटा वेगवेगळ्या होतात तेथे दोघे क्षणभर थांबले.

श्री - गंभीर काय होतेस? ऑफीसमधे आहोतच की आपण... रोज भेटणार नाही का?

स्वातीने आज स्वतःहून शेकहॅन्डसाठी हात पुढे केला.

विलग झाल्यावर चालता चालता श्रीने मागे वळून पाहिले..

... नेमके त्याच क्षणी स्वातीनेही मागे वळून पाहिले होते..

दॅट वॉझ इट.. अ‍ॅन्ड इट वॉज ऑल ओव्हर...

दुसर्‍या दिवशी सकाळी श्रीने गट्टूच्या वाढदिवसाला गट्टुसाठी आनलेली अन त्यानंतर कधीच सायकल स्टॅम्डमधून बाहेर न काढलेली लेडिज सायकल काढली अन नीट पुसली.

गट्टू - ही सायकल? ही का पुसताय?
श्री - उगीच पडून आहे.. म्हंटलं वापरावी..
गट्टू - म्हणजे?
श्री - आता मी ऑफीसला सायकलने जाणार..
गट्टू - हे.. समीरदादा, नैना, राजश्रीताई, प्रमिलाकाकू.. आमचे बाबा लेडिज सायकल वापरणार.. हा हा हा हा!

गट्टू मनापासून हसत असताना सगळे गोळा झाले होते आणि समीरदादा हसत होता.

श्रीला त्यात काहीच वाटले नाही. तोही कसनुसं हसला. बॅग खांद्याला लावून सायकल वाड्याबाहेर काढताना मागून प्रमिला आली..

प्रमिला - भावजी.. हळू जा हं? तुम्हाला दम लागतो..

हे शब्द! एवढेच शब्द बोलायला आज रमा असती तर? पण श्रीने नुसतीच मान तुकवून प्रमिलाच्या बोलण्याचे आभार मानले.

आणि तेवढ्यात मावशी वरून लगबगीने हातात काहीतरी घेऊन आल्या..

मावशी - अरे? निघालास काय? सांगीतलवतं ना मी रव्याचे लाडू देतीय म्हणून? हे घे.. यात चार आहेत..

श्रीने मावशींकडे बघत ती पिशवी घेतली, सायकलच्या हँडलला लावली अन मावशींच्या पाया पडला. मावशींनी त्याच्या पाठीवर हात फिरवला. श्री सायकल घेऊन, गट्टूला हात करून वाड्याच्या बाहेर पडला.

गट्टू - आज्जी? बाबांना आज लाडू का दिलेस??

.....

मावशी - ..... आज बाबांचा वाढदिवस आहे.. ..

गुलमोहर: 

आज मी पहिली.
खुप सुरेख चालली आहे कथा.
ही अशिच चालु ठेवा.
अस वाटते ह्या कथेचा शेवट कधी होउच नये.
पु.ले.शु.
ह्या भागाला देखिल मनापासुन अभिन्दन

नेहमी प्रमाणेच छान झालाय हा ही भाग.
श्री च्या मनाची अवस्था अगदी अचुक टिपली आहेत.

खरच एक खुप चांगले लेखक आहात तुम्ही .
पु.ले.शु.

छान आहे हा भागही ! मी नेहमी प्रतिक्रिया देत नसले तरी ह्या कादंबरीचे सगळे भाग वाचते आहे आणि गुंतून गेले आहे.
लवकर लिहा पुढचे!

तुम्हि फार अप्रतिम लिहिता. तुम्हला प्रतिक्रिया देन्यासाथि खास मि सदस्य झालो. मरथि बद्दल सोरि. नविन आहे मि अजुन. पुधचे भाग लवकर पोस्त करा. धन्यवाद.

तृष्णा , अनुजय, अश्विनी, वृषा - आपले मनःपुर्वक आभार!

जुयी - आपल्याला माझे कायमचेच मनापासून आभार आहेत.

शिव - (मायबोलीवर स्वागत म्हणण्याइतका मी जुना नाही, पण स्वागत!) आपण मला प्रतिसाद देण्यासाठी सदस्य झालात हे पाहून काही मुठी मांस चढले अंगावर! मनापासून आभार!

-'बेफिकीर'!

बेफिकीर,
लैच बेफिकीर ब्वा तुम्ही.
आम्हाला असं तंगवुन ठेवत जाऊ नका हो. फार वाट बघितली या भागाची.
(अर्थात, ती मनाची तळमळ आहे. तुम्ही तुमच्या सोयीनीच टाकत जा)

आजचा भाग हि मस्त झालाय...

"असो! मै जिंदगी का साथ निभाता चला गया.. हर फिक्रको .. धुवेंमें? देव आनंदचं बरंय! खोट्या मिशा लावून तळ्याच्या काठी एकटा आपला मस्त सिगारेट ओढत रफीचा आवाज भाड्याने घेऊन काळज्या धुरात उडवतोय! "

मस्तच.....तुमच्या लिखाणात एक जादु आहे..कधी खुदकन हसु..तर कधी चटकन डोळ्यात पाणी येते.

फारच सुंदर लिहता तुम्ही
मी तर तुमची एकही कथा सोड्त नाही आणी खरं सांगायच तर तुमच्या कथा वाचल्या शिवाय राहवत नाही.
First preference तुम्हाला असतो.
त्या वाचताना कुठेही अस वाटत नाही की मी कथा वाचत आहे.
हे रोजच आहे जे मी स्वंतः अनुभवते आहे. गट्टू,श्री, पवार मावशी हे सर्व जन इथेच कुठे तरी राहतात,त्याना आम्ही दरोरोज भेटतो, बोलतो असच वाटत ती पात्र आहेत अस वाटतच नाही.
तुम्ही मनाच्या विचारांच पण किती सुंदर वर्णन करता हो... शब्दच नाहीत माझ्या कडे..
बेफिकीर असेच बेफिकीर लिहीत जा.
नविन लेखनासाठी शुभेच्छा

मधुकर, रंगा सेठ, असिमित, रोहित - एक मावळा, आशू चॅम्प व रचु,

आपले सर्वांचे मनःपुर्वक आभार! प्रतिसादांमुळे चढणार्‍या मुठ मुठ मांसामुळे जाड व्हायचो.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

मी माबोची तशी जुनीच सदस्य आहे व तुमच्या कादंबर्‍यांची नियमित वाचकही आहे. पण तुमच्या प्रत्येक कहाणीचा प्रत्येक भाग वाचल्यानंतर मी इतकी भारावुन जायचे कि प्रतिसाद द्यायला मला शब्दच सापडत नसत अन सगळ्यांचे प्रतिसाद वाचुन वाटयचे मी अजुन काय लिहू? कदाचित माझा शब्द्कोष अपुरा पडेल. पण आज धाडस करुन प्रतिसाद देतेय, कारण तुमचं लिखाण, वातावरण- निर्मिती, भाषाशैली, कहाणिची पकड, भावनांची अचूक शब्दात माडंणी, ओघ, व्यक्तिरेषा, सगळच अगदी शब्दांच्या पलिकडलं आहे. You r simply great..... तुमची मीना, साहु, दीपक-काजल,श्री- गट्टु, सगळेच आपलेसेच वाटले. ह्या सर्वान्शी एक हळुवार नातं तयार केलं तुम्ही आमचं. त्यांच्या जगाशी परिचय करुन दिल्याबद्द्ल आभार. तुम्हाला अन तुमच्या कुटुंबियांना सुखी, निरोगी आयुष्य लाभो हिच प्रार्थना...... I salute you..Keep it up.

मीरा, गुड्डू, दीप्ती परब,

मनःपुर्वक आभार! खरच हुरूप आला प्रतिसाद वाचून!

-'बेफिकीर'!

बाप झाल्यावर समजतं, बापाचं मन कसं असतं ते'!>> खुप रडायला आलं हे वाक्य वाचून! खुप खुप आठवण आली बाबांची.. आम्ही फोनवर खूप कमी बोलतो, पण दोघांनाही इव्हन आईलाही माहीतेय माझा जास्त ओढा बाबांकडे आहे ते...

कथा नेहमीप्रमाणेच ओघवती, गुंतवणारी!

स्वप्नसुंदरी, आर.आर.एस.,

मनापासून आभारी आहे.

-'बेफिकीर'!

श्री-गट्टू संवाद वाचून मजा वाटली...विशेषतः हा भाग-
गट्टू - खरच सांगतोय.. भरून आलं मला..
श्री - हा 'भरून आलं' शब्द कुठनं कळला तुला?
गट्टू - वाक्प्रचार आहेत आम्हाला..
श्री - आभाळ भरून आलं आणि मन भरून आलं.. एकच का?
गट्टू - छे! मन भरून आलं म्हणजे गलबललं!
श्री - गलबललं?
गट्टू - हां! म्हणजे असं.. सद्गदीत वगैरे सारखं..
श्री - अरे वा? आणि आभाळ भरणे म्हणजे?

स्त्रियांची आणि तरुणींची 'गुंतण्याची' प्रोसेस वाचून फार गंमत वाटली Lol

श्री आणि स्वातीच्या आकाराला न येऊ शकणार्‍या नात्याशी संबंधित प्रत्येक प्रसंग वाचतांना त्रास होतो....का बिचारे दोघंही विनाकारण एकेकटे जगतायत आणि तिकडे श्री ची प्रमिलाशी असलेली धोकादायक गुंतवणूक...हे असंच चालू राहिलं, तर मार खातील का ही दोघंजणं एकदिवस?? धास्ती वाटते... Uhoh

एकंदरीत भाग मस्त जमलाय. श्री च्या वाढदिवसासाठी माझ्या शुभेच्छा! Happy

पुढच्या भागाची वाट पाहत आहे. लवकर येऊ द्या!!!

श्रींची तीन बोटे तुटली?
त्यांच्या अपघाताबद्दल यापूर्वी कोणत्या भागात लिहिले होते का? असल्यास लिंक द्यावी.
श्रींवर इतका मोठा प्रसंग गुदरला आणि आम्हाला माहितच नाही?
??????????????????? उत्तराच्या अपेक्षेत????????????????