टप‌ टप‌ पडती अंगावरती प्राजक्ताची फुले

Submitted by जिप्सी on 8 August, 2010 - 23:09

पारीजातक किंवा प्राजक्त. माझे अतिशय आवडीचे फुल. इतके नाजुक कि आपल्या हळुवार स्पर्शानेही कोमेजून जाणारे, उन्हाचा ताप सहन करायला नको म्हणुनच कदाचित रात्री उमलणारी. रात्री फुलांनी बहरलेला प्राजक्त पाहिलायं?? आकाशात असंख्य प्रकट झालेल्या तारकांसारखा भासतो.
पांढर्‍याशुभ्र पाकळ्या आणि केशरी रंगाचा देठ असलेला निसर्गाचा हा नाजुक अविष्कार मला फुलांचा राजा गुलाबापेक्षाही जास्त भावतो.

प्राजक्त पाहिला कि नकळत आठवतात त्या व.पु.च्या ओळी :
पारीजातकाचं आयुष्य लाभलं तरी चालेल,पण लयलुट करायाची ती सुगंधाचीच

==================================================
==================================================

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

माझीही आवडती फुलं आणि आवडत गाणं
पहिला फोटो मस्त आलाय

कवी: मंगेश पाडगावकर

टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले
भिर भिर भिर भिर त्या तालावर गाणे अमुचे जुळे !

कुरणावरती, झाडांखाली
ऊन-सावली विणते जाळी
येतो वारा पाहा भरारा, गवत खुशीने डुले !

टप टप पडती ....

दुर दुर हे सूर वाहती
उनहात पिवळया पाहा नाहती
हसते धरती, फांदीवरती हा झोपाळा झुले !

टप टप पडती ....

गाणे अमुचे झुळ-झुळ वारा
गाणे अमुचे लुक-लुक तारा
पाऊस, वारा, मोरिपसारा या गाणयातुन फुले !

टप टप पडती ....

फुलांसारखे सर्व फुला रे
सुरात मिसळुनी सुर , चला रे
गाणे गाती तेच शहाणे बाकी सारे खुळे !

टप टप पडती ....

मस्तच.
इथपर्यन्त सुगंध दरवळतोय.

लहानपणी आही खुप वेचायचो ही फुलं आणि मग नंतर त्याचे केशरी दांडे हातावर चोळुन त्याची मेंदी करायचो. Happy

आहा! ताजी फुले!सुंदर प्रचि आणि त्याखालील ओळीही Happy

अंगणी पारिजात फुलला
बहर तयाला काय माझीया प्रीतीचा आला,
हे गीत आठवलं!

सुरेख.....
शेवटच्या प्रचितल्या फुलान्ची माण्डणी मस्त केली आहेस......

वा मित्रा, आज तु नोस्टॅलजीक केलस. लहानपणी ऊन्हाळ्याच्या सुट्टित मी आजोळी जायचो. आमच्या घराच्या मागच्या अंगणात प्राजक्ताचे झाड होते. रोज सकाळी त्याच्या फुलांचा सडा पडलेलला असायचा. रोज सकाळी जेव्हा आजोबा पूजेला बसायचे तेव्हा मी त्यांना प्राजक्ताची फुले वेचुन द्यायचो. त्याची आज प्रकर्षाने आठवण झाली. Happy
फारच सुंदर रे. शब्दच खुंटले..

योगेश, आज वेगळ्या प्रचिंची वाट बघत होतो. हि पण छान आहेत. याची एक डबल जात असते, पण आपल्याकडे फार दुर्मिळ आहे हि.
प्राजक्तांच्या फूलाबाबत फार कथा आणि दंतकथा आहेत.

मस्त फोटू, शेवटचा लै भारी.

पुलंच्या ओळी दिल्यात ते वाचुन सुनिताबाईंच्या आहे मनोहर.. मधले आठवले. त्यांच्या अंगणातही प्राजक्ताचे झाड होते. एकदा सक्काळीच त्या झाडाखाली फुले वेचत असताना पुल आले आणि त्यांनी हळूच झाड हलवुन सुनिताबाईंवर प्राजक्ताचा वर्षाव केला Happy

माझ्या कॉलनीतही झाडे आहेत प्राजक्ताची, त्याची फुले वेचुन हातातुन घरी आणेपर्यंत हाताच्या उष्णतेने कोमेजतात. म्हणुन फुले आणायची असतील तर मी ओला रुमाल घेऊन जाते सोबत. ताटलीत पाणी घालुन त्यात फुले तरंगत ठेवली तर संध्याकाळपर्यंत सुवास देत राहतात.

खुप मस्त योगेश... आमच्या लहानपणी पण घराच्या मागे प्राजक्ताचं झाड होतं मस्त फुलं पडायची... सही वाटलं ही फुलं पाहुन...

प्रतिसादाबद्दल धन्यवाद Happy

योगेश, आज वेगळ्या प्रचिंची वाट बघत होतो.>>>>> दा, दोन तीन दिवसात करतो अपलोड Happy

प्राजक्तांच्या फूलाबाबत फार कथा आणि दंतकथा आहेत.>>> हो, मी सुद्धा कुठेतरी वाचल्याचे आठवत आहे. एक राजकुमारी असते आणि सुर्यावर तीचे प्रेम असते. लग्नाला होकार देऊन, लग्नाच्या दिवशी सुर्यदेव येत नाहीत म्हणुन रागावुन ती होमकुंडातील अग्नीमध्ये स्वतःला झोकुन देते. नंतर तेथे प्रकट होते प्राजक्ताचे रोपटे आणि सुर्यदेवावर राग म्हणुन हि फुले दिवसा फुलत नाहीत.
अशीच काहीतरी कथा होती (नीट आठवत नाही)

योग रात्री का नाही काढलेस फोटो ?? काढुन बघ एकदा >>>>अरे, हो रे Happy खुपच सुंदर दिसेल ना रात्रीच्या वेळी फुलांनी बहरलेले झाड. पुढच्या वेळी नक्की प्रयत्न करेन.

व्वा! लहानपणी ह्या फुलांच्या माळा करून देवाला सजवल्यानंतर उरलेल्या फुलांच्या माळा हातात, गळ्यात घालून मी 'वनदेवी, वनदेवी' खेळायचे! Lol आणि त्याचे केशरी देठ चुरडून केशरी रंग तयार करण्याचा एक धमाल टीपीही चालायचा!

अप्रतिम, स्वर्गीय... आमच्या समोरच्या रस्त्यावर जवळ जवळ अशी दोन प्राजक्ताची झाडं आहेत... सकाळी राधाला बस साठी सोडायला गेलं की तिथे मस्त सडा पडलेला असतो, आणि आसमंतात सुगंध भरलेला असतो.. Happy
मस्तच फोटो रे योगेश Happy

योगेश, अरे सत्यभामेला विसरलास कि. हे झाड तर म्हणे प्रत्यक्ष स्वर्गातून आणलेय.
वर सगळे म्हणताहेत तसे, प्राजक्ताचे फोटो, संध्याकाळीच काढायचे, म्हणजे त्यांचे पुष्पकोश, मूक्या कळ्या, सगळे दिसते (आणि ती खास फळे व पानेही)
या फूलांचे देठ कापून, वाळवून केशरात भेसळ म्हणून वापरतात !
पानांचा उपयोग खोकल्यावरच्या काढ्यात करतात, पण जखमेवरची खपली काढायला, घासण्यासाठी पण वापरतात.

धन्यवाद!!!
झाडावर बहरलेल्या फुलांचा फोटो टाक ना...>>>>पुढच्या वेळी नक्की Happy

दिनेशदा, अधिक माहितीबद्दल धन्यवाद Happy
जितके सुंदर हे फुल तितकेच अनेक त्याचे उपयोगही Happy

आहाहा, फुल पाहुनच सुगंध मनामध्ये दरवळला. आमच्या दारासमोर आहे हे झाड. सतत फुल असतात ह्याला. आता कमी बहर आहे. गणपतीत पुर्ण भरत फुलांनि झाड. माझ्या आईकडेही होत हे झाड. मी लहान असताना ह्या झाडाखाली उभी राहुन झाड हलवायचे आणि फुलांचा पाउस पाडायचे. आमच्याकडे भरपुर देव होते. मी सगळ्या देवांना ह्याचे हार करायचे. आत्ताही जर मला कधी वेळ मिळाला तर हार करुन सासुबाईंना देवपुजेसाठी देते.

छान ! Happy

Pages