मातीत खोल जावे, जमते तसे फुलावे...

Submitted by बेफ़िकीर on 7 August, 2010 - 01:29

मातीत खोल जावे, जमते तसे फुलावे
होईल ते बघावे, झाडापरी असावे

रस्ता नसेल तेथे रस्ता करून जावे
नाहीच साधले तर रस्ता बनून जावे

पापे धुवून देणे इतकेच काम त्यांचे
गंगेमधे नहावे, मदिरेमधे नहावे

हे मोहजाल सुचवे इच्छा घडोघडीला
कोणीतरी बनावे, काहीतरी करावे

दैवात माणसाच्या आहे शरीर होणे
केव्हातरी जगावे केव्हातरी मरावे

मिळतील पंख तेव्हा मुद्दाम सरपटावे
तुटतील पंख तेव्हा या अंबरी उडावे

असते सुदैव तेव्हा हसुनी फकीर व्हावे
नसते सुदैव तेव्हा मी 'बेफिकीर' व्हावे

गुलमोहर: 

अवश्य

मायबोली हे मुक्त व्यासपीठ आहे

परवानगी कसली त्यात?

सर्व प्रतिसादकांचे आभार

-'बेफिकीर'!

Pages