दारी उभा गे साजण

Submitted by मितान on 5 August, 2010 - 16:01

तो: एक विचारु ?

ती: ह्म्म.. विचार की..

तो: तिच्या गावी जातोय तर एकदा भेटेन म्हणतोय..

ती:( कातर,व्याकूळ झालेले डोळे लपविण्यासाठी मान फिरवून ) बघ. म्हणजे ठरव तूच !

तो: एकदा भेटूनच येतो.

ती: परवा सकाळी येशील नं घरी?

तो: हो.

तो जातो. ही सैरभैर. ही भेटण्याआधी ती याच्या आयुष्यात होती. लाटेसोबत आलेल्या शिंपलीसारखी. दुसर्‍या लाटेबरोबर निघूनही गेली....हिला त्या जखमा दिसल्या तेव्हा दातओठ खाऊन जिवाच्या कराराने त्या पुसण्यासाठी किती झगडली ! आणि आज पुन्हा तो म्हणतोय............

रात्रभर कूस बदलत आभाळातल्या चांदण्या मनात टोचवून घेत राहिली. चांदण्याही मग हक्काने टोचत राहिल्या. पहाटे बागेतल्या गवताबरोबर हिच्या उशीवरही दव पडलं होतं.

आजचा दिवस नि रात्रही जायची आहे अजून.

मनातल्या डोहावर कितीतरी गोष्टी तरंगत राहिल्या. निळसर गुलाबी रंगाचे कागद, अत्तराच्या कुपीचे हरवलेले झाकण, चंद्रलिपीतली अक्षरे नि त्याला चिकटलेली मोरपिसं ...!!!

रात्र पुन्हा गढूळली. क्षितिजावर रेंगाळणारे ढग गाफिल क्षणी मनात वस्तीला आले. आणि तो पण आला....

खात्री नव्हती ? होती की. तरीपण..काय...तिच्या मनात चाललंय तरी काय???

"दारी उभा गे साजण

नको त्याच्यापुढे जाऊ"

दुखले का ? की संताप आहे हा ?

"त्याने यात्रेत भेटल्या

कोण्या पोरीच्या देहाला

दिले आभाळाचे बाहू"

ढग बरसतील नं आता? प्रलय येणार... बघू त्याच्या चेहर्‍याकडे? ऊन असेल की सावली तिथे?

" हात नाहीत गं त्याला

उभा अंधारी साजण "

मी पाऊल टाकू ? पहिलं ?

तोच येतोय पुढे!

मूठीत काय त्याच्या ? ओंजळ पुढे करतेय मी..

चाफा ! पहिल्या भेटीत मी त्याला दिलेला...!!!!

भरून आलेल्या आभाळाला एक गार झुळूक भेटली..पाऊस !

" हात नाहीत गं त्याला

उभा अंधारी साजण

तिने जीव दिला तरी

त्याने वाहत्या पाण्याचे

इथे आणले पैंजण..."

जिंकली की ! आता पाऊस थांबलाय. पहाट केशरी दवात भिजतेय्....चाफा नव्या गंधाने दरवळतोय !

( लेखातील कवितेचे कवी- ग्रेस)

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

रात्रभर कूस बदलत आभाळातल्या चांदण्या मनात टोचवून घेत राहिली. चांदण्याही मग हक्काने टोचत राहिल्या. पहाटे बागेतल्या गवताबरोबर हिच्या उशीवरही दव पडलं होतं.>>> हे वाक्य खूप आवडलं. Happy

पण एकंदर लेखातले संवाद, आलेख मला नीट नाही समजत आहे. (माया रागावली नाहीस ना निगेटिव्ह प्रतिक्रिया दिली म्हणून? रागावली असशील तर तस सांग मनात न ठेवता. मी प्रामाणिक पणे जे मनात आलं ते लिहीलय)

माया, काय सुरेख लिहितेस ग तू! एक एक ओळ तर कवितेसारखीच वाटली मला! पण मलाही काही गोष्टी आकळल्या नाही, जस की तो आला म्हणून ती जिंकली म्हणायची की पहिल्या भेटीतला चाफ्यासकट तो भेटला म्हणून आनंदली, किंचीतसे कळले नाही, बाकी काही ओळी तर अहाहा' अश्या लिहिल्या आहेस!

कविताला माझंही अनुमोदन.
त्याला अजूनही त्या गतप्रेमिकेला भेटावयाचे आहे म्हणून ही आताची प्रेमिका व्याकूळ झाली आहे. दु:खी आहे. आणि मग तिला भीती वाटतेय की तो परत येईल का? पण त्याला परत आलेला पाहून ती नव्याने मोहरून आलीये. असा मला समजलेला अर्थ आहे. बरोबरे का? Uhoh

लेख नाहीच हा.
एक एक ओळ तर कवितेसारखीच वाटली मला! >>> अगदी अगदी. Happy

रात्रभर कूस बदलत आभाळातल्या चांदण्या मनात टोचवून घेत राहिली. चांदण्याही मग हक्काने टोचत राहिल्या. पहाटे बागेतल्या गवताबरोबर हिच्या उशीवरही दव पडलं होतं. <<< माया, एकदम सही.. मान गये.. Happy कुछ खास है ! कुछ बात है !

अजून लिहायला हवं होतं पुढे किंवा हेच अजून जरा खुलवायला हवं होतं.

कविता, निंबुडा म्हणते तसंच आहे ते !
कवितेचा मला लागलेला अर्थ अशा फॉर्ममध्ये पहिल्यांदाच लिहिला.
तो पहिल्या प्रेयसीला भेटून परत येतो तेव्हा तो खरंच 'परत' आलाय नं..अशी भिती तिला व्याकूळ करत असते. 'ती' विरुद्ध 'ही' अशी हिच्या मनातच लढाई चाललेली आहे.
पण जेव्हा तो हिच्या हातात चाफा देतो तेव्हा तो आपलाच असल्याची तिची खात्री पटते. स्वतःच मांडलेल्या खेळात ती जिंकलेली असते.
कवितेत स्पष्ट काहीच न सांगणं ही ग्रेसांची खासियत ! कवितेच्या नादात लेखातही उतरली वाटतं !! मला ही कविता नेहमीच हुरहुर लावते. कसली ती कळत नाही..ती हुरहूर उतरवण्याचा प्रयत्न केला. ( पण फसला बहुतेक Sad )

ओहो. माया, असं आहे तर.

म्हणजे ग्रेस यांच्या कवितेचं रसग्रहण झलं तर हे. आय मीन ती कविता वाचून तुझ्या मनात उठलेले तरंग ओळीओळी बरोबर गद्यात मांडलेस. होय ना. तसं असेल तर फसलं नाहीये हे! Happy

माया.... सुंदर.... खरच सुंदर.
एका "निष्ठूर" प्रियकराचं "आपलं" असणं आहे.... "ती"नं ज्या पाण्यात जीव दिला त्या पाण्याचे पैजण घेऊन आपल्याकडे "परत" आलेला प्रियकर....

<<क्षितिजावर रेंगाळणारे ढग गाफिल क्षणी मनात वस्तीला आले. .... >> बहोत खूब...