समर्था घरचे श्वान

Submitted by नितीनचंद्र on 4 August, 2010 - 13:14

आयुष्यातल्या काही घटना आपण कधीच विसरु शकत नाही त्या पैकी माझ्या आयुष्यातली ही एक घटना. ऑगस्ट महिना आला की प्रकर्षाने आठवणारी घटना - श्वानदंश.

खरतर कुत्रा हा माझ्या शत्रुपक्षातला प्राणी २००१ सालापर्यत नव्हता. तसे या जमातीशी माझे संबध फारसे चांगले नव्हते पण तसे वाईटही नव्हते. माझ्या सासुरवाडीला एक ल्युसी होती. मी आणि ल्युसी एकमेकांना मान द्यायचो. मी कधी ल्युसीजवळ जायचो नाही आणि ती माझ्या जवळ यायची नाही. त्यामुळे हाड हाड असा अनादरपुर्वक उल्लेख करण्याची माझ्यावर वेळ आली नाही. पुर्वी म्हणे सासुरवाशीण्या सासरच्या कुत्र्याला "अहो हाडा" म्हणायच्या कारण सासरची प्रत्येक गोष्ट आदर व्यक्त करण्याची असे. मी ही हा संकेत बदलत्या काळात पाळत असे.

लहानपणी मी सुध्दा कुत्रा पाळायचा प्रयत्न केला. मी लहानपणी आणलेले कुत्र्याचे पिल्लु रात्री ओरडु लागल्यामुळे वडीलांनी त्याला मुक्त केले. मग हा प्रयत्न चांगल्या कुत्र्याच्या पिल्ला अभावी व नंतर फ्लॅट्मधे रहायला आल्यामुळे मागे पडला. आमच्या लहानपणी कुत्र्याला डॉगी म्हणण्याची प्रथा नव्हती आणि त्यांचे बर्थडे पण नसायचे. बापाला पोरांची नाव आणि इयत्ता पाठ असल्या तरी खुप कुत्र्याचे कौतुक कोण करणार ? जेव्हा लालुप्रसाद यादव क्या आप पाचवी पास से तेज है कार्येक्रमात आपल्या नवव्या मुलीच नावा आठवण्यात गर्क होते तेव्हा जाणवले की अद्याप बापांची ही पिढी संपली नाही.

१९८९ साली मी नवीन फ्लॅट घेतला आणि सोसायटीच्या आवारात दोन भटके कुत्रे रहायला येऊन बरीच वर्ष लोटली होती. आता त्यांनी फक्त पार्किंग मधे आपले ठाण मांडले होते. २००१ साली भलतीच घटना घडली. त्यातला एक कुत्रा पिसाळला. दुसर्‍या कुत्र्याला हे कळल्यामुळे त्याने या पिसाळ्याची संगत आठ दिवस आधीच सोडली होती. सुरवातीला भटक्या गायी, भटकी कुत्री यांच्यावर हा पिसाळ धावुन जाई. हळु हळु त्याचे अन्न कमी झाले. पाणी पिणे थांबले आणि तो जास्तच पिसाळला.

१६ ऑगस्ट २००१ रोजी मी ऑफिसमधुन आलो तो आमच्या गच्चीवर आमच्या सौ. उभ्या होत्या. पार्किंगमधला कुत्रा पिसाळला आहे संभाळुन वर ये हे तिने मला सांगीतले. मी माझ्याच नादात आणि मस्तीत होतो. हातातल्या फोल्डींग छ्त्रीवर विश्वास होता.

पार्किगमधे एक कुत्रा दिसला. मला वाटल हा पिसाळलेला नाही. जोखिम नको म्हणुन मी एक तुटक्या फरशीचा तुकडा उचलला आणि या कुत्र्याला हाड हाड केले. झाले भलतेच. तो नेमका पिसाळ निघाला. त्याच्या भितीदायक डोळ्यामधुन त्याने मला हेरल आणी माझ्याकडे पहात न भिता दात विचकुन गुरगुरु लागला. जो पर्यंत हातात फरशीचा तुकडा होता त्याने माझ्यावर हल्ला केला नाही. मी घाबरुन तो फरशीचा तुकडा त्याला फेकुन मारला. त्याने तो हुकवला आणि माझ्यावर उडी मारली. उजव्या हाताचा कोपरापाशी एक लचका तोडुन तो पुन्हा हल्ला करण्यासाठी मागे जाउन थांबला.

मी जोरात ओरडलो आणि आणि डाव्या हातातली छ्त्री उजव्या हातात घेतली. पिसाळाने माझ्यावर अजुन एकदा हल्ला केला. मी तो छ्त्रीने अडवला आणि आणखी आरडा ओरडा केला त्यासरशी पिसाळ पळुन गेला. मी माझ्या उजव्या हाताच्या कोपराजवळ साधारण एक इंच लांब आणि अर्धा इंच खोल असा त्याचा दात लागुन रक्तस्त्राव सुरु झाला होता.

मी घरात आलो आणि तोच शेजारी आले. त्यांनी मला डॉक्टरांकडे जाण्याआधीचा प्रथमोपचार सांगीतला. जखम कपडे धुवायच्या साबणाने वाहत्या नळाखाली धुणे हा तो प्रथमोपचार. मग आमची स्वारी स्वतः केलेला मुर्खपणा आठवत स्वतःला शिव्या घालत निघाली डॉक्टरांकडे. जाताना केमिस्टकडे रेबीपुर नावाची लस आहे ना याची खात्री करुन मग डॉक्टर पिंगळे आमचे फॅमिली डॉक्टर. जाताना काठी नेण्यास विसरलो नाही कारण पिसाळलेली कुत्री म्हणे दगड आणि काठीला घाबरुन असतात. लिंबु ववीला काठी ( संघाचा दंड ) का घेऊन आले याच कारण हा लेख लिहताना पटल. संघ हा शब्द ऐकला किंवा त्यांच्या कार्यकत्यांना पाहिल की अनेक माणसातले श्वान जागे होतात. संघाचे कार्यकर्ते कोणत्याही सार्वजनीक ठिकाणी आपली संघकार्यकर्ता ही ओळख लपवण्यास तयार नसतात. परिणामी संघर्ष हा अपरिहार्य असावा म्हणुन ही तयारी असावी.

"मला तुझ्या लहानपणी शंका होतीच तु खोड्याळ आहेस म्हणुन. नाकात पेन्सील नाही घातलीस, कानात खडा नाही घातलास आणि आता पस्तीशीत कुत्र्याची खोडी काढलीस काय म्हणाले." डॉ. पिंगळे यांनी विनोद केला.

मी काही न बोलता रेबीज आणायला माझ्या स्नेह्याला खुण केली आणि जखमेवर टाके घालायचे नसतात ह्या शेजार्‍याच्या ज्ञानाची खातरजमा केली. डॉ. पिंगळे यांनी रेबीजची लस टोचली. जखमेतुन रक्त वहातच होते. लहानपणी कुत्रे नचावल्याबद्दल परमेश्वराचे आभार मानले कारण त्या काळी ही लस फक्त सरकारी दवाखान्यात मिळे आणि ती ही बेंबी भोवती लांबलचक सुईने टोचली जायची सलग चौदा वेळा. कुत्रा चावण्याच्या वेदना परवडल्या त्यापेक्षा जास्त भिती या बेंबीवरच्या इंजेक्शनची असायची.

परत येताना आम्ही मोर्चा महानगरपालिकेच्या श्वानप्रतिबंधक कार्यालयाकडे वळवला. उद्देश असा की रात्रीत कुत्र्याचा बंदोबस्त व्हावा. आमच्या सोसायटीत मला कुत्रे चावल्यानंतर अघोषित संचारबंदी झालेली होती त्यातुन जनता मुक्त व्हावी. संध्याकाळचे सहा वाजता हे कार्यालय बंद झाले होते. एक शिपाई बाहेर बसला होता.
" आता उद्याच कारवाई होईल म्हणाला." मी पावण्याची वाट पहात थांबलोय नाहीतर आमच्या भितीने भटकी कुत्री सुध्दा या कार्यालयाच्या आजुबाजुला नसतात. माझ्या ज्ञानात नवीन भर पडली होती.

कुत्र मला चावल पण माझा स्नेही पिसाळला. चल पिंपरी महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात जाऊ. मोठाकुणी अधिकारी असेल तर त्याला सांगुन ह्या लोकांना ओव्हरटाईमवर बोलाऊन त्या कुत्र्याचा रात्रीत बंदोबस्त करु. स्कुटर तिकडे वळवली आणि समजले की रात्री असे कोणी ड्युटी ऑफिसर नसतात. स्नेह्याने फोननंबरची चौकशी केली पण सिक्युरीटीने इमानी ड्युटी बजावत असा नंबर देण्यास नकार दिला. स्नेही आणखीच पिसाळला. आम्ही तडक एका पब्लीक टेलीफोन बुथवर गेलो. तिथल्या डिरेक्टरीमधुन आयुक्तांचा नंबर शोधला आणि फिरवला. नेहमी प्रमाणे ते घरी सुध्दा नव्हते. घरातल्या नोकरमाणासाने आम्हाला माहित नाही असे उत्तर दिले.

स्नेह्याने मग मोर्चा पोलीस स्टेशनकडे वळवला. ठाणे अंम्मलदाराने शांतपणे ही तक्रार कशी घेता येत नाही हे सांगीतले. मला प्रथमच ठाणे अंम्मलदार कोणत्याही अंमलाखाली रात्री सात वाजता सुध्दा नसतात याचा साक्षात्कार झाला. अहो, कुत्रे भटके आहे त्याला कोणी मालक नाही त्यामुळे अज्ञात सुध्दा मालक नसल्यामुळे कोणाविरुध्द तक्रार कशी नोंदवणार असा पवित्रा त्याने घेतला. मीपण एक वकिली पाईंट काढला. पिंपरी चिंचवड महानगर पालिकेविरुध्द अशी तक्रार नोंदवता येईल काय की भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्याने एका जिवाला दुखापत झाली आहे. यावर अशी तक्रार नोंदवता तेणार नाही यावर ठाणे अंम्मलदार ठाम राहिले. कारण विचारायची सोय नव्हतीच. रात्री घरीच झोपायचे होते. सरकारी कामात अडथळा हे कलम लाऊन घेऊन पोलीस चौकीत रहाण्याचा प्लॅन त्या दिवशी नव्हता.

भळभळणार्‍या जखमेतुन अद्याप रक्तस्त्राव होतच होता. आज उजवा हात जायबंदी झाल्याने डाव्या हाताने जेवायची कसरत पाहुन आमच्या सौंना प्रेम दाटुन आले. आई- वडील आणि आता मुलीच्या साक्षीने तिने काही घास चमच्याने भरवण्याचा प्रयत्न करुन गंभीर वातावरण काहीसे उबदार केले.

माझा घरी सोडुन तो स्नेही कुणाकडे लायसन्स बंदुक आहे का शोधायला गेला. कारण चिंचवडात या कुत्र्याने आत्तापर्यत पंधरा वीस जणांना चाऊन दुसर्‍या कुठल्या कुत्र्याच वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्याचा घाट घातला होता. स्नेह्याची खात्री होती की रात्री हा कुत्रा इमानदारीत पुन्हा आमच्याच सोसायटीत झोपायला येईल आणि त्याचा मुडदा गोळी घालुन बसवता येईल. एकाकडे अशी बंदुक मिळाली पण मनेकाजी गांधींच्या भितीने तो बंदुक चालवावयास राजी होईना. त्या वेळेला राज्य भाजपाचे आणि मनेकाजींच्या श्वान प्रेमाने होते. हे श्वान आता भटके असले तरी समर्था घरचे झाले होते. तो बंदुकधारी ते कुत्र ही नको आणि नंतरची केस ही नको या भुमीकेवर ठाम होता.

मला लोकशाहीचे महत्व तेव्हा पटले. लोकाशाही ही फक्त सामान्यांसाठीच निर्मांण झालेली असुन फक्त असामान्य दारु पिऊन गाडी चालवुन सामान्यांना कुत्र्यासारखे गाडीखाली चिरडु शकतात पण सामान्यांना मात्र भटक्या पिसाळलेल्या कुत्र्यांना गोळी घालायची प्राज्ञा नसते.

रात्रभर मी पाठीवरच झोपलो. रक्तस्त्राव टिपण्याकरता सौंनी एक स्वच्छ कपडा हाताखाली ठेवला होता तो भिजुन पलंगपोसावर रक्ताचे डाग आले होते. पहाटे कधीतरी रक्तस्त्राव थांबला पण ठणका अद्याप सुरुच होता. रात्री निट झोपही लागली नाही.

सकाळी आठ वाजता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे श्वान प्रतिबंधक विभागाचे कर्मचारी माझ्या दारात हजर झाले. मी जाम सुखावलो. त्यांचा प्लॅन जिंदा या मुर्दाचा चा होता. माझ्याकडुन रितसर तक्रार नोंदवुन घेऊन मंडळी कामाला लागली. त्यांच्या जवळ कुत्र्याचा गळ्यात घालायचे फास होते. स्वसंरक्षणाकरता काहिंनी हातात दगड घेतले होते.

त्यांचा मुकादम सांगत होता. " जोडी जोडीन राव्हा. येकाच्या हातात दगुड तर दुसर्‍याकड फास हवा. दगुड मारायचा न्हाही. फकस्त दावायचा त्या कुत्र्याला. तो कुत्रा झोपला हाय, त्याला हुसकायचा. हिथ आला की राम्या तु फास टाक. जर हुकला तर तु टाक हनमंता.

गेम प्लॅन झाला. फिल्डींग लागली. कुत्र्याला हुसकला आणि त्यांना पहिजे त्या चिंचोळ्या रस्त्यावर तो आला. कुत्रा हवा त्या ठिकाणी येताच राम्यान फास टाकला आणी तो बरोबर त्याचा गळ्यात बसला. कुत्रा सुटण्यासाठी हिसका हिसकी करु लागला. काही मिनटात शरण येऊन तो राम्याच्या मागे चालु लागला. कुत्र्याला ज्या गाडीत भरतात ती गाडी पुढच्या वळणावर होती . कुत्र्याला ती दिसली नव्हती. गाडी समोर येताच कुत्रा सटकला. राम्याला मागुन चावा घेऊन त्याने फासासकट पळायला सुरवात केली. मंडळी गाडी मध्ये बसुन त्याचा पाठलाग करत नदीपर्यत गेली. नदीजवळच्या दाट झाडीत कुत्रा दिसेनासा झाला.

मंडळी पुन्हा माघारी आली. रामु आधीच प्रथम उपचारासाठी गेलेला होता. मुकादमाने सांगितले जिवंत पकडायचा प्रयत्न फसला आता अक्सीर इलाज एकच. एक घाव दोन तुकडे. त्यांच्या गॅगमधला एक वयस्कर या कामात हुशार होता. मुकादम म्हणाला अर्ध्यातासात कुत्रा परत हित येईल. त्याची कवटी हा सय्यद फोडणार. सोसायटीत गलका करु नका. आम्ही जरा गाडी लपवुन येतोच. एक तास होत आला तरी कुत्र्याचा पत्ता नव्हता.

कोणीतरी मला महानगरपालिकेच्या दवाखान्यात श्वानदंश नोंदवण्याची सुचना केली. मी अशी नोंद करण्याकरता गेलो ऑपरेशन कुत्रा सोडुन मी महानगरपालिकेच्या रुग्णालयात गेलो. हे रुग्णालय शोधायला फारसा वेळ गेला नाही. लांबुनच वेगवेगळ्या वासांची दुर्गंधी येत होती.

परदेशगमन करणारे मित्र मला म्हणतात परदेशात पब्लीक टॉयलेट शोधायला खुप त्रास होतो कारण त्याचा दुर्गंध बाहेर काय आत सुध्दा नसतो. भारतात किती सोप्पे नाहीका ? पब्लीक टॉयलेट नाहीच मिळाले तर होल वावर इज युवर्स.

नेहमी प्रमाणे सकाळी अकरा वाजता सुध्दा लायक अधिकारी जाग्यावर नव्हते. जे कोणी होते त्यांना अशी नोंद करायची असते हे ठाऊक नव्हते. कुठे नोंद करायची हा प्रश्न विचारल्यावर त्याला ह्या माणसाला नक्की कुत्र चावलय याची खात्री झाली. तो मला वैद्यकिय अधिकारी अश्या हुद्याच्या ऑफिसबाहेर बसवुन चालता झाला. बाहेर माझ्यासोबत एक डोक्याला पटका बांधलेला गरीब वाटणारा प्रौढ माणुस बसला होता.

" काय झाल हो हाताला ? " माझ्या उघड्या जखमेकडे पहात त्याने विचारले.
"कुत्रा चावला" मी म्हणले.
" बांधला नव्हता का" ? कुणाघरचा पाळीव कुत्रा चावला अस वाटुन त्याने विचारले बहुतेक.
" नाही हो हा भटका होता त्यातुन पिसाळलेला होता." मी त्याला सांगीतले.
"तुम्ही कशापायी तेच्याजवळ गेला?"
" कस कळणार हा पिसाळलेला कुत्रा आहे का नाही ते ?" मी विचारले
" काय शहरातली शिकलेली मान्स तुमी. तुमाला हेबी ठाव न्हाही ?
मी नकारार्थी मान हलवली. आता तो माणुस रंगात आला. हातातल्या अडकित्याने सुपारीच खांड फोडुन तोंडात टाकुन त्याने मांड पक्की केली.

" त्याच अस असतय, पिसाळलेल्या कुत्राच शेपुट दोरीवानी सरळ असतय. मान जरा कललेली राहती, अन कुत्र लाळ गाळत पाण्याकड पळतय. "

"अहो पण आपण काय करायच अस कुत्र दिसल तर ?"

काय बी करायच न्हाही. गपगुमान उभ राह्यच बाजुला उंच जागी. त्याचा रस्ता रोकायचा न्हाही. हाड म्हणायच न्हाही. छत्री पायली की ते बिगडतय म्हणुन छत्री दावायची न्हाही. जातय की ते आपल्या वाटन. "

मी सगळ उलटच केल होत. जे नको ते केल आणि अडकलो लफड्यात.

तेव्हड्यात पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे वैद्यकिय अधिकारी आले. रितसर माहिती मी दिल्यावर ते म्हणाले रेबीपुर घेतल असेस ना ?

मी हो म्हणल.

रेबिपुर चा परिणाम शरीरावर होऊन अ‍ॅन्टीबॉडीज तयार व्हायला बारा दिवस लागतात. स्वतःला निट ऑब्झर्व्ह करा. काही बदल जाणवल्यास या बारा दिवसात वेगळी ट्रिटमेंट घ्यावी लागेल.

हा बॉम्ब जरा जवळच पडला. मी कावरा बावरा झालो.
"म्हणजे आज पासुन बारा दिवसांच्या आत मला रेबीजची लागण होऊ शकते." मी म्हणालो.
"शक्यता धुसर आहे, पण शुन्य शक्यता आहे असे मात्र नाही. सुदैवाने तुम्ही जखम साबणाने पहिल्या काही मिनीटात धुतली आहे. जखम मेंदुपासुन लांब आहे. कुत्राही जिंवत आहे. त्याला खरच रेबीज झालाय हे त्याला जिवंत प़कडल्यास नक्की समजेल. यावरून तुमची जोखीम किती याचा अंदाज येइल."

"तुम्ही या सर्व माहितीच संकलन करुन काय करता ?"

त्यावर अधिकारी म्हणाले " संसद, विधानसभा इथे प्रश्न विचारले जातात तसेच महानगरपालिकेचे अरोग्य धोरण ठरवायला या आकडेवारीची मदत होते.

पुन्हा माझी खात्री झाली. याला लोकशाही म्हणायच. इंग्रज म्हणे बेवारस कुत्र्यांना बंदुकीच्या गोळीने मारायचे. देश स्वतंत्र झाल्यावर विषारी पेढा आला. आता म्हणे हत्या करायची नाही. धडधाकट माणुस जायबंदी होतो श्वान दंशाने, कामाचे दिवस वाया जातात आणि माहित असुन कायद्याच्या भितीने त्याचे रक्षक गपगुमान रहातात.

साधारण २००१ सालापासुन भारत महासत्ता होणार ही आवई का उठली याच ही कारण समजु लागल होत.

मी बाहेर पडलो. पुन्हा घरी आलो तो खलनायकाची प्रेतयात्रा निघाली होती. नदिवर पाणी प्यायचा जायच, पाणी न पिताच परत यायच या खेळात तो खलनायक दमुन परत आला होता. जेव्हा त्याने नेहमीच्या ठिकाणी दमुन डोळे मिटले काही क्षणात सय्यदबंडा तिथे लोखंडी गज घेऊन आला. एका घावात त्याचा मेंदु फोडुन त्या खलनायकाला त्याने संपवला.

जो खलनायक काही काळ अनभिषीक्त राजासारखा वावरत होता त्याचा क्षणात बेवारस कुत्रा झाला होता. त्याचा गळ्यात फास अडकवुन आता त्याला फरफटत ते महानगरपालिका सेवक आता त्याला घेऊन जात होते.

गुलमोहर: 

भयानक अनुभव!
रेबीजवरचा धागा शोधत होते.
सध्या ते कबड्डीपटुचे प्रकरण गाजते आहे तर काही माहिती मिळते का बघु म्हटले.

डॉ. कुमारांनी या आजारावर लिहिले तर बरे होइल.

Pages