वास्तु

Submitted by अमोल परब on 31 July, 2010 - 13:47

फाटकाचं दार हलकेच लोटुन आत शिरलो
तर सगळी बिजागरं एकसाथ कुरकुरली
इतक्या वर्षानीं आज ह्याला आठवण झाली
माझ्यापासुन दूर होत जोरात कुजबुजली

माजलेल्या गवताने घुसखोरी केलेल्या अंगणात
किरकिरत तो स्वतःच स्वता:ला झोके देत होता
"कुठे उलथला होतास? खेळ अर्ध्यातच सोडलास"
पहाताच मला तारलयीत विचारत होता

माडी चढुन वर गेलो तर माझ्या खोलीतल्या
खिडकीची तावदानं तावातावानं आदळत होती
अशा कैक सांजा आई ताटकळली होती तिथे
जणू यांचा हिशेबच उघडझाप करुन देत होती

अचानक छताकडं मान वळवून पाहिले तर
तो म्हातारा वासा शेवटच्या घटका मोजताना दिसला
ओळख लागताच अगदी बाबांच्या आवाजात म्हणाला
"आता माझ्याच्यानं नाही होत रे!! सांभाळ ह्या घराला!!"

तुझी वाट बघता बघता शेवटी बाबांचा धीर सुटला होता
हे आईने कळवळून सांगुन सुद्धा मला तेव्हा पटलं नाही
कितीही उशीर झाला तरी माझ्यासाठी जागणार्‍या आईनेही
मग अखेरच्या क्षणी माझ्यासाठी थांबायची तसदी घेतली नाही

उशीरा उमगले की उतारवयात त्यांची फक्त अवहेलनाच झाली
मुजोरपणामुळे माझ्या, भरल्या घरात एकांतवासाची शिक्षा झाली
त्यांच्या आठवणी डोळ्यांत उतरताच, हलकेच मला कुशीत घेउन
मग ती थकलेली "वास्तु"... तिच्या रिकामेपणातही भरुन आली

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

उशीरा उमगले की उतारवयात त्यांची फक्त अवहेलनाच झाली
मुजोरपणामुळे माझ्या, भरल्या घरात एकांतवासाची शिक्षा झाली
त्यांच्या आठवणी डोळ्यांत उतरताच, हलकेच मला कुशीत घेउन
मग ती थकलेली "वास्तु"... तिच्या रिकामेपणातही भरुन आली..................

खूप छान..................