अमेरीकेत कढिपत्ता लावताना तुम्ही कुठल्या 'झोन' मध्ये राहता हे माहिती करून घेणं जरूरीचं आहे. http://www.garden.org/zipzone/ इथे वेगवेगळ्या 'झोन्स' बद्दल माहिती मिळेल. कढिपत्त्याला थंड हवामान अजिबात चालत नाही. त्यामुळे '९अ', '९ब', '१०अ', '१०ब', '११' या झोनमधे रहात नसल्यास कढिपत्ता कुंडीत लावावा.
कुंडी प्लास्टिकची असेल तर आतबाहेर करायला सोपे जाते. कुंडीला पाण्याचा निचरा होण्यासाठी जागा / holes असावेत. नसले तर करून घ्या.
कढिपत्त्याला माती पाण्याचा व्यवस्थित निचरा (well-drained) होणारी लागते. त्यामुळे इथे मिळणारी 'टॉप सॉईल' (Top soil) किंवा 'गार्डन सॉईल' (garden soil) अजिबात वापरू नका. कुठल्याही चांगल्या कंपनीची - शक्यतो ऑरगॅनिक - 'पॉटींग सॉईल' (Potting soil) वापरा. मी मिरॅकल ग्रो या कंपनीची Organic Potting soil वापरते आणि आत्तापर्यंत तरी चांगला अनुभव आहे. त्यात perlite या गोष्टी घातल्या तरी चालेल. नसतील तर नुसती Potting soil वापरली तरी चालेल.
कढिपत्त्याला उष्ण आणि दमट हवामान लागते. कढिपत्ता बाहेर ठेवायचा असल्यास रात्रीचे तापमान ५५ डि. फॅपेक्षा जास्त असलेले असावे. मोगर्याप्रमाणेच एप्रिल-मे नंतर फ्रॉस्ट संपला की बाहेर ठेवावा. ऑक्टोबर मधे रात्रीचे तापमान ५० पर्यंत जायच्या आधी घरात आणावा. रोप लहान असेल तर यात एक दिवस जरी उशीर झाला तरी रोपाला हानी पोचू शकते. रोप बाहेर ठेवताना सूर्यप्रकाश साधारण ४-५ तास मिळेल अशा ठिकाणी ठेवावं.
कढिपत्ता बिया रूजवून लावता येतो किंवा छोटे रोप मिळाले तर तेही लावता येते.
बिया लावताना पूर्णपणे वाळलेल्या बिया लावू नयेत. अशा बियांमधून अंकुर / रोप येण्याची शक्यता कमी असते. झाडावरच पिकलेल्या / अर्धवट पिकलेल्या बिया मिळाल्या तर त्या लावाव्यात. या बिया छोट्या कुंड्यांमधून किंवा छोट्या प्लास्टिकच्या कपमधे, चांगल्या प्रतीच्या Potting soil मधे लावाव्या. कुंड्यांना पाण्याचा निचरा होण्यासाठी जागा / भोके असावीत. बिया लावण्याआधी त्या भोवती असलेले आवरण, द्रव काढून पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. माती ओलसर असावी पण फार पाणी / चिखल नसावी. पाण्याचा निचरा व्यवस्थित होत असला पाहिजे. घरातच या कुंड्या / कप खिडकीपाशी, उन येते तिथे किंवा उबदार जागेत ठेवाव्यात (तापमान ८०-८५ डि फॅ). साधारण १० दिवसांनी अंकुर दिसू लागतील. रोप २ ते २.५ इंच मोठे झाले की त्या कुंडीतून / कपातून काढून ७-८ इंच व्यासाच्या कुंडीत लावावे. त्यानंतर रोप एक आठवडा घरातच ठेवावे. बाहेर रात्रीचे तापमान ५५ डिग्री फॅ च्या पुढे असेल तेव्हा बाहेर ठेवावे. पण बिया रूजवून लावल्यास 'success rate' जास्त नाही हे लक्षात घ्या. त्यामुळे रोप मिळाल्यास उत्तम.
रोप लावताना मुळं वाढण्यासाठी भरपूर जागा मिळेल इतपत मोठी कुंडी घ्यावी. 'Good thumb of rule' म्हणजे जर रोप ६ इंच उंच असेल तर ८ -९ इंच व्यासाच्या कुंडीत लावावे. रोप लावल्या नंतर ३-४ दिवस कुंडी घरातच असू द्यावी.
हे झाड 'drought tolerant' मानलं जातं. पाणी देताना माती बर्यापैकी ओलसर असेल तर पाणी देउ नका. पण पाणी देताना फारच उशीर झाला तर पानं गळून गेल्यासारखी दिसतात.
कढिपत्त्याला खत घालताना 'overfeed' होणार नाही याची काळजी घ्या. या झाडाला वर्षातून ४-५ वेळा खत दिलं तरी पुरेसं होतं. आपण कढिपत्ता स्वैपाकात वापरतो, त्यामुळे ऑरगॅनीक खत वापरावे. मिरॅकल ग्रोचं Organic Vegetable food चांगलं आहे. कमी concentrationचं (पाण्यात dilute केलेलं) खत नियमित देण्याने फायदा होतो. उन्हाळ्यात साधारण ३ आठवड्यातून एकदा खत द्या. थंडीत खत घालणे पूर्णपणे बंद करा. मे-जून पासून सप्टेंबर-ऑक्टोबर पर्यंत खत देणं योग्य. भारतात आंबट ताक, चहाचा चोथा खत म्हणून देतात. इथे एकदा ताक घालून बघितलं पण मुंग्या लागल्यामुळे नंतर कधी हा प्रयोग केला नाही.
माती २ वर्षातून एकदा बदलावी. कुंडी बदलताना आधीच्या कुंडीपेक्षा ३ ते ४ इंच मोठा व्यास असलेली कुंडी घ्यावी. कढिपत्त्याचे रोप ३-४ वर्षांचे झाले की मुळापासून अजून रोपं उगवतात. अशावेळी ही छोटी पिल्लं ५-६ इंच उंच झाली की वेगळी करून स्वतंत्र कुंडीत लावा. मुख्य झाड / रोप जस जसे मोठे होते तशी भरपूर रोपं/ पिल्लं येतात. मुख्य कुंडीत अशा रोपांची गर्दी होऊ देऊ नये. छोटे रोप वेगळे केले की त्याची मुळं 'root starter mix' मधे बुडवून वेगळ्या कुंडीत लावावे. ही कुंडी एका प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवावी आणि अगदी वर टोकाला बांधून घरात सावलीत ठेवावी. ४-५ दिवसांनी अगदी लहान नविन पालवी दिसेल तेव्हा पिशवीचं तोंड मोकळं करून ठेवावं पण कुंडी पिशवीतच ठेवावी. काही दिवसांनी नविन पालवी थोडी मोठी झाली की कुंडी पिशवीतून बाहेर काढून ठेवावी. छोटी रोपं मुख्य झाडापासून वेगळी करताना मुळांना धक्का बसतो. त्यामुळे रोपं नाजूक झालेली असतात, 'शॉक' मधे असतात. प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवल्याने 'settle' व्हयला मदत होते.
रोप मुख्य झाडापासून वेगळं करताना धारदार सुरी त्या रोपाभोवती १ इंचाच्या अंतराने फिरवावी, सुरी मातीत ४-५ इंच जाईल असे बघावे. कडेकडेने मुळं कापत अलगद रोप वेगळे करावे.
प्रत्येक स्प्रिंगमधे प्रत्येक फांदीचा ३-४ इंच शेंडा खुडावा. त्यामुळे तिथून दोन फांद्या फुटतात. झाड जोमानं वाढतं.
थंडीत झाड घरात आणतो तेव्हा बरीच पानं गळतात. ही पानं वाळवून स्वैपाकात वापरू शकतो. ही पानं खोबर्याच्या तेलात उकळून ते तेल लावल्याने केस काळे होतात असं म्हणतात. मी हा प्रयोग केलेला नाही.
स्प्रिंगमधे परत नविन शेंड्याला नविन पालवी फुटते.
या झाडाला कीड फारशी लागत नाही, पण पानांवर काळे डाग पडू शकतात. 'Scales' ही कीड लागत नाही ना याकडे लक्ष असू द्यावे. जर ही कीड लागलीच तर ताबडतोब झाड बाकिच्या झाडांपासून वेगळे ठेवावे. नीम ऑइल / Insecticidal soap याचे मिश्रण करुन झाडावर फवारावे.
कढीपत्त्याचं झाड चिवट असतं म्हणतात, बरीच वर्ष राहतं.
भाटिया नर्सरी मधून झाड मागवता
भाटिया नर्सरी मधून झाड मागवता येईल कडिपत्त्याचं झाड.
सुमॉ तू डायरेक्ट हाय कमांडकडे
सुमॉ तू डायरेक्ट हाय कमांडकडे (शोनूकडे) मागणी कर मरव्याची.
माझ्या एका मैत्रिणीकडे
माझ्या एका मैत्रिणीकडे कढिलिंबाच्या झाडाला मुंग्या लागल्या. तिच्याकडे नेहमी पूजेचे पाणी, निर्माल्य वगैरे झाडात घालायची पद्धत आहे, याशिवाय ती ताकही घालते. तिला झाड कापून टाकायला सांगितले व कुंडीत मुंग्यांची पावडर घालून रोज पाणी दिले. काही दिवसांनी नवीन फूट आली व झाड छान वाढायला लागले.
याशिवाय ती ताकही घालते.>>>
याशिवाय ती ताकही घालते.>>> माझ्या झाडालापण ताकामुळे मुंग्या लागल्या होत्या. तेव्हापासून हा प्रयोग केला नाही.
शोनू, भाटिया नर्सरीचा माझा अनुभव चांगला नाही.
कढिपत्याचं रोपच लावा शक्यतो. बियां लावून रोपं उगवण्याचा सक्सेस रेट कमी असतो असा माझा अनुभव आहे.
मस्त लेख. उपयुक्त
मस्त लेख. उपयुक्त माहिती.
इंग्लंडात कुठे मिळेल कढीपत्त्याचे रोप?
California madhey Kadi patta
California madhey Kadi patta kothe milel
मी बे एरियात आहे. मला
मी बे एरियात आहे. मला कढीपत्त्याचे झाड/ बीया कुठे मिळतील?
गेल्या डीसेंबर मध्ये अगदी ४
गेल्या डीसेंबर मध्ये अगदी ४ पानांचं एक रोप मिळालं. हिवाळ्यात घरात आणलेलं. सध्या बाहेरच आहे.
आहे त्या मातीत एवढं आलयं. आळशीपणामुळे खतं घातलं नाहिये. आता घालीन, आणि थोडी मिरॅकल ग्रो माती पण घालीन. पण भारी वाटतयं, एवढं तरी झालं म्हणून.
अंजूताई एक प्रश्न आहे: त्याच्या टोकाला जो फुलांचा झुबका आलाय, तो खुडून टाकायचा की तसाच ठेवायचा? काय केलं की खाड वाढेल ? तो आल्यापसून नवीन पानं येत नाहीयेत.
मधुरा, ते शेंडे/ फुलांचा
मधुरा,
ते शेंडे/ फुलांचा झुबका खुडून टाक. फांद्या फुटल्या असतील तर त्या फांद्यांची टोकंपण खुडून टाक.
ओके. आजच खुडून टाकला तो
ओके. आजच खुडून टाकला तो झुबका. फांद्या अजून तरी फुटल्या नाहीयेत.
धन्स
फुलं आलीत. आता बिया होणार
फुलं आलीत. आता बिया होणार काय?
हो.
हो.
कढीलिंबाला 'मिरॅकल ग्रो'चं
कढीलिंबाला 'मिरॅकल ग्रो'चं आफ्रिकन व्हायलेट पॉटिंग मिक्स घातलं. हे pH अॅडजस्टेड आणि अॅसिडिक रेंजमधलं असल्यामुळे झाडाला फायद्याचं असेल असं वाटलं, म्हणून टाकलं. (६.० ते ६.८ रेंजमधलं मिक्स्ड कम्पोस्ट आहे असं पिशवीवर लिहिलंय.) ताकांचं भांडं विसळून पाणी प्रयोग करवले नाही. २ आठवड्यांत झाडाला सुंदर हिरवा रंग आलाय. भरपूर फाटे फुटलेत. एकूण पॉटिंग मिक्स मानवलंय.
मुंबईत कुठे मिळेल कडिपत्त्यचे
मुंबईत कुठे मिळेल कडिपत्त्यचे रोप?
हा कढीपत्त्यावरचा लेख म्हणजे
हा कढीपत्त्यावरचा लेख म्हणजे एक ग्रंथच आहे त्यामुळे मधुनमधुन वाचुन माझ्या ६' झाडाची काळजी घेत असते. अंजली आणि प्रतिसादकांचे मन:पुर्वक आभार.
गेली ३-४ वर्षे घरी कडीपत्ता
गेली ३-४ वर्षे घरी कडीपत्ता आहे. एक फूटाच्या वर वाढला आहे पण सरळ.
दर वर्षी थंडीत सगळी पाने गळून जातात आणि वर टोकाला वाकडा कोंब राहतो.
यावर्षीपण तो कोंब वाढून ३-४ पाने आली आहेत. पण फांदी अज्जिबातच फुटत नाही.
तो वरचा कोंब खुडलाच पाहिजे का? तो खुडला आणि नंतर काहिच आलं नाही तर याची भिती वाटते.
चिऊ,
चिऊ,
तुम्ही कुठे असता?
भारतात असाल तर
पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे दोन चारदा पाऊस पडून गेला की झाड छाटावे. अगदी असलेल्या झाडाच्या अर्ध केलात तरी चालेल. यावेळी मातीला , मुळांना हात लावू नये. आठ दहा दिवसांत खोडावर हिरवे ठिपके दिसतील, आणि पंधरा वीस दिवसात छान नाजूक फांद्या आणि पालवी फुटते. तेवढे दिवस थोडं थोडं पाणी रोज घालावे. छाटलेल्या ठिकाणी ओली माती किंवा ग्रो मिडीयम लावलं तर चांगलं.
कुंडीतलं झाड असेल तर छाटताना एखादी फांदी किंवा कोंब ठेवावा असं वाटलं तरी ठेवू नये नाहीतर त्याच फांदीची वाढ होते, नवीन फांद्या फुटत नाहीत.
फांद्या थोड्या मोठ्या झाल्या की माती सैल करावी आणि खत घालावं (पावसाळा सुरू असतानाच)
हेच सगळे वसंत ऋतू सुरू होतानाही करू शकता. फक्त खत घालू नका त्यावेळी करण बाहेर सगळीकडे उष्ण असतं. गांडूळ खत चालेल. वसंत ऋतूत पाणी थोडं जास्त घालावं लागेल पण दोन्ही ऋतूत जास्तीच पाणी निचरा झालं पाहिजे.
भारतात नसाल तर बहुतेक वसंत ऋतूतच छाटावे लागेल.
धन्यवाद सावली.
धन्यवाद सावली.
पण मी भारतात नाही. इंटरनेटप्रमाणे झोन ७ब आणि ६अ च्या मधे आहे.
इथे इतकी थंडी असते की झाड अजून कधीच बाहेर ठेवले नाही. नेहमी आतच असते. समरमधेही कधी रात्री ५-१० होईल सांगता येत नाही.
यावर्षीच मुळीच स्नो न झाल्याने लवकर कोंब मोठा होतो आहे.
खरंतर कुंडीपण मोठी घेतली पाहिजे. तर कुंडी बदलणे आणि शेंडा खुडणे यातले काय आधी करावे?
लावलेली झाडे ५०%च जगतात. कधी हवामान दगा देते तर कधी अनुभव-हाताळणी.
तेव्हा कडिपत्त्यावर अगदी घाबरत घाबरत प्रयोग करते आहे.
मी भारतात आहे. या धाग्यावर
मी भारतात आहे. या धाग्यावर इथल्या कढीपत्त्याविषयी विचारलेले चालणार नसेल तर नवीन धागा काढेल.
तर
१. मी भारतात आहे.
२. गुढीपाडव्याच्या दिवशी मी माझ्या ओळखीत एकांकडे जमिनीवर आली होती अशी तीन पिटुकली रोपं काढून माझ्या एका जुन्या कुंडीत (ज्यात पूर्वी एक जास्वंदीचं झाड सुकून मरून गेलं होतं) लावली.
३. मला खोदायला जमलं तितकं जास्तीत जास्त मुळापासून काढून लावली आहेत.
४. ही कुंडी मी सकाळी कोवळ्या उन्हात 2-3 तास ओपन टेरेसमध्ये (जिथे अतिप्रचंड ऊन येते) ठेवते. साधारण उन्हाच्या झळा जाणवू लागल्या की मी कुंडी घरात घेते आणि सावलीत ठेवते.
५. रोपांना ऑलमोस्ट रोज ताकाचे आंबट पाणी घालते आहे. जमेल तसे थोडे थोडे साधे पाणी पण घालते (तीन रोपांना पुरलं पाहिजे म्हणून).
६. रोपे तशी टवटवीत दिसतात आणि सुकलेली नाहीत. परंतु त्याची पाने व काहीवेळा पानांसकट काड्या जोरात गळायला लागले आहेत.
७. हे नॉर्मल आहे का? झाड मरत असतं तर पानं वाळलेली आणि मृतवत दिसली असती ना? माझ्याकडे रसरशीत हिरवीगार पानं तिथल्या तिथे कुंडीतच कोणी काही न करताच गळून जात आहेत.
८. आत्ता भारतात झाडं लावायला योग्य सिझन नाहीये का?
९. माझी झाडं / रोपं आतून मरून गेली आहेत का?
१०. त्यांना सूर्यप्रकाश कमी पडतो आहे का? दुपारच्या उन्हात ती पिटुकली रोपं मरून जातील अशी मला भीती वाटते (इतकं प्रखर ऊन येतं टेरेसमध्ये. आणि सध्या कडक ऊन पण आहे इकडे). त्यामुळे रोज 12 पर्यंतच कुंड्या बाहेर ठेवते.
माकाचु? माझा या पिल्लांमध्ये जीव गुंतला आहेत आणि मला ती जगायला हवी आहेत. काय करू?
रोप नवीन लावल्यावर लगेच
रोप नवीन लावल्यावर लगेच उन्हाचा तडाखा द्यायला कुणी सांगितलं?
रोपावर प्लास्टिकची पिशवी उलटी घाला. मातीपर्यंत येऊ द्या काठ. महिनाभर सावलीतच ठेवा.
दररोज तकाचे पाणी घालू नका.
दररोज ताकाचे पाणी घालू नका. कढीलिंबाला असिडिक माती लागते.पण ताक रोज घालू नका.इतर झाडांचे माहीत नाही.
मातीपर्यंत येऊ द्या काठ.
मातीपर्यंत येऊ द्या काठ.
>> म्हणजे?
रोपावर प्लास्टिकची पिशवी उलटी घाला.
>> प्लॅस्टिकची पिशवी कश्यासाठी? उन्हापासून बचावासाठी का? तर मी फक्त कोवळ्या उन्हात ठेवतेय रोपांना. इथलं 'प्रखर ऊन लागतंच' वाचून कडकडीत उन्हात पण ठेवणार होते पण आता तुमच्या प्रतिसादानंतर नाही ठेवणार मोठी होईपर्यंत प्रखर उन्हात.
दररोज ताकाचे पाणी घालू नका.
>> रोज नको घालू का आंबट ताकाचे पाणी? ओके. एक दिवसाआड वगैरे घालेन. मी ते आंबट ताकाचे इथेच वाचले आणि आणल्या दिवसापासून रोज त्याला आंबट पाणी घालते आहे.
दरदिवसाआड पण नको.8 दिवसातून
दरदिवसाआड पण नको.8 दिवसातून एकदा असे घाला.
कढीपत्ता लागवड फॉर बिगिनर्स -
कढीपत्ता लागवड फॉर बिगिनर्स - यावर एक धागा येणे आवश्यक आहे.
कढीपत्ता लागवड फॉर बिगिनर्स -
कढीपत्ता लागवड फॉर बिगिनर्स - यावर एक धागा येणे आवश्यक आहे.
>> हा धागा ऑलरेडी आहे अमेरिकन्स करता. 'भारतात कढीपत्ता लागवड फॉर बिगिनर्स' - यावर एक धागा येणे आवश्यक आहे.
(No subject)
छान माहिती!
छान माहिती!
पिकलेल्या कढीपत्त्याची फळे चवीलाही बरी असतात. फक्त गर खाण्याजोगा असतो. बिया खाऊ नयेत. गोडसर, कढीपत्ता फ्लेवर चव असते.
बिया फार टिकत नाहीत म्हणून बाजारात कधी पाहिलेल्या नाहीत.
झाड किती मोठे झाले की जमिनीत लावलेले चालते? (San Jose भागात)
कढिपत्त्याला भरपुर निचरा
कढिपत्त्याला भरपुर निचरा होणारी माती लागते, खुप कडक उन नको कोवळ उन पुरेसे आहे, माती जर हाताला ओलसर लागत असेल तर रोज पाणी घालायचि गरज नाही.
वर ताकाच साग्नितल आहेच
कढीपत्ता लागवड फॉर बिगिनर्स -
कढीपत्ता लागवड फॉर बिगिनर्स - यावर एक धागा येणे आवश्यक आहे.>>> भारतात राहणार्यांनी हा लेख वाचा. छान माहिती आहे.
https://www.maayboli.com/node/73742
Youtube वर ह्याविषयी काही
Youtube वर ह्याविषयी काही व्हिडिओ आहेत. कुंडीत खाली वाळू घातली तर पाणी साठून राहत नाही आणि कढीपत्त्याच्या झाडाला त्रास होत नाही.
Pages