रावणभोग

Submitted by विजयकुमार on 29 July, 2010 - 03:57

शैशवात, मातीच्या देवघरात
तुझ्या मांडीवर डोके ठेवून
झोपायचो,
देवपूजा करताना तू
रामरक्षा म्हणायचीस,
सारं जगणं कसं तेव्हा
'राम'मय होतं,
आजही तू रामरक्षा म्हणतेस
पण आता
तुझ्या मांडीवर डोके ठेवून मी
झोपू शकत नाही !
माझे रावणभोग मला झोपूच
देत नाहीत गं !
फार असहाय्य होतो मी !

रजतधातूची किनकिन
आळवलेली सारी भजनं
कानात गोळा करते
मी मात्र सा-या प्राक्तनभोगाना
दूर सारत
तुझ्याकड बघत झोपायचा
वृथा प्रयत्न करतो
पण झोप कशी ती येतच नाही !
अन
मिटल्या डोळ्याआड उष्ण आसवं
साचवत तुझी करुण भजनं
कानात भरतो
मग सारं जग सुन्न सुन्न होतं
अन माझं जगण्याच
भानच सुटतं.

तू रेखाटलेल्या उंब-यालगतच्या
रांगोळीवर पाय पडतो
तेव्हा
हजारो व्होल्टची वीज
अंगास झटका देते,
अपराधीपणाची भावना घेवून
मी घर सोडत असताना तू
तुझ्या कृश बोटांनी
विस्कटलेली नक्षी सावरतं असतेस
तेव्हा पुरता विस्कटलेला मी
जड होवून
उंबरा मोडून डोळ्यातलं
धरण जिन्यावर रिकामं करतो,
जाणा-या पाउलखुणा धूत
आसवं परतीचा माग
पुसून काढतात
अन
पोराक्यासाराखा मी
गळणा-या पाण्यासारखा थेंब थेंब होवून
जमिनीवर पसरतं जातो.

अडखळलेल्या पावलांनी जेव्हा
रात्र अंगावर येते तेव्हा
मी
उंब-याच्या आत यायचा प्रयत्न
करतो,
पण प्रखर तेज माझे डोळे दिपवतात
तुझा चेहरा डोळ्यासमोर आणून मी
मणामणाचे ओझे शिरावर घेवून
घरात पाउल टाकतो
तेव्हा
घरातील प्रत्येक फरशी
विस्तव होवून माझे
अस्तित्व नाकारायला लागते.

विजयकुमार..........
२६.१२.२००९, मुंबई

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

!!!

One of my favorite poem!

अर्थात नि:संशय,
निवडक दहात!!

!!!

मस्त.