अवघी विठाई माझी (१५) - चायनीज कॅबेज (नापा कॅबेज)

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

napa cabbage.jpg

पूर्वी अनेक वेगळ्या शब्दांच्या मागे चिनी हा शब्द जोडला, कि त्यापुढे स्पष्टिकरण
द्यावे लागत नसे. उदा, जमिनीलगत पसरत जाणार्‍या एका राणी रंगाच्या फ़ूलाला,
चीनी गुलाब म्हणत असेन. चिनी वैद्यक, चिनी दंतवैद्य, चिनीमातीच्या बरण्या, चायना
सिल्क, असे बरेच काही.त्यांचे वेगळेपण या "चिनी" शब्दातून दिसत असे.

आता तर दुनियाभरचे बाजार, चिनी वस्तूंनी खचाखच भरलेले दिसतात.
तसाच हा एक प्रकार म्हणजे चिनी कोबी किंवा चायनीज कॅबेज. दिसायला देखणी असणारी
हि भाजी, सहज लक्ष वेधून घेते. पोपटी चमकदार रंगांची पाने आणि पांढरेशुभ्र जाड देठ, असे
हिचे रुप असते. या भाजीत गडद हिरवा रंग तसेच चमकदार पिवळा रंगही असतो, हि भाजी
बरेच दिवस आपले हे ताजेतवाने रुपडे टिकवून असते.
याची पाने कोबीच्या पानासारखीच पण जरा सैल बांधणीची असतात. आतली पाने फ़िक्कट
पिवळ्या रंगाची असतात. पाने कच्चीच सलादमधे वगैरे वापरता येतात, तर देठ शिजवून
भाजीत वापरता येतात.

napa chabbage with rice.jpg

मी वरच्या डीशमधे ती जिरा फ़्राइड राईसबरोबर वापरलीय. जिरा राईस करताना, थोडी
हळद वापरलीय, त्यामूळे तो पिवळा रंग आलाय. बाजूने या चिनी कोबीची पाने, बारिक
कापून ठेवली आहेत. भातावर सजावटीसाठी सुकवलेल्या क्रॅनबेरीज आणि कोथिंबीर आहे.
भाताचा मऊ पोत आणि या कोबीच्या पानाचा करकरीतपणा, यांचा एकत्र मेळ छान
जमला होता.

napa stir fry.jpg

या भाजीचे देठ आणि पानेही, इथे स्टर फ़्राय करुन वापरली आहेत. स्टर फ़्राय करताना
सोया सॉस, लसूण, हिंग आणि मिरपूड वापरली आहे. मध्यभागी याच भाजीची आतली
कोवळी पाने, बारिक कापून ठेवली आहेत, वर थोडेसे केचप आणि कोथिंबीरीचे पान आहे.
हि भाजी शिजवून अगदी मऊ करु नये, म्हणजे तिचा स्वाद टिकून राहतो. याबरोबर
टोफू आणि इतर भाज्याही वापरता येतील.

चायनीज कॅबेज म्हणण्यापेक्षा याला नापा कॅबेज म्हणणे जास्त योग्य होईल. (चायनीज
कॅबेज म्हणून आणखी एक भाजी असते, त्याची ओळख पुढच्या भागात.) याचे शास्त्रीय नाव
Brassica rapa, म्हणजे कूळ कोबीचेच. चीन, जपान आणि कोरिया मधे ही भाजी
लोकप्रिय आहे.

याची मोठी पाने, फिश आणि मटणासाठी रॅप म्हणून पण वापरता येतात. याचा स्वाद बराच
सोम्य असतो. पण रंग छान असतो. यात क जीवनस्त्व, कॅल्शियन, मॅंग्नेशियम, सोडीयम
असते.

विषय: 
प्रकार: 

छान आहे हि माहिति. Happy
मी जपान मधे अगदि नविन आल्यावर जपानि लोकांबरोबर पिकनिक ला गेले होते. ते जेवायला चायना टाउन मधे शिरल्यावर मला भयानक टेन्शन आलेल. मी सरळ व्हेजिटेरियन आहे अस सांगितल. (सेफर साईड !)
त्यांनि एक डिश ऑर्डर केली त्यात या चायनीज कॅबेज चि पान कसल्याशा पारदर्शक द्रावात शिजवली होती बस एवढच. लाल मसालेदार न दिसल्याने आणी जपान मधे अगदि नविन असल्याने इतक्या पाणचट चविच कस खाणार हा प्रश्न पडला होता मला. पण खाउन बघितल्या चक्क हि पान गोडसर होती. आणी चांगली लागत होती.
<< फिश आणि मटणासाठी रॅप म्हणून पण वापरता येतात>> मला वाटत कोरियामधे - ते ग्रिल्ड किन्वा शिजवलेल मीट, किंवा शिजवलेला स्क्विड चा तुकडा या पानावर ठेवतात त्यात थोडा तोबान्जान सॉस (भलताच तिखट अस्तो) लावतात. आणि आपण जर पान लावुन खातो तस ते गुंडाळुन तोबरा भरुन खातात.

वा! छान माहिती दिनेशदा.... ही विठाई सिरीजच मस्त आहे! कोबीच्या पानांचा सॅलड बाऊल म्हणूनही छान उपयोग होतो. जरा आकाराने लहान पाने बर्फाच्या पाण्यात गार करुन फ्रीजमध्ये ठेवली की छान बाऊलचा आकार घेतात. मग त्याच बाऊलमध्ये कापलेले/ चिरलेले सॅलड सर्व्ह करायचे! सॅलडबरोबर बाऊलचाही चट्टामट्टा करता येतो! Happy

धन्यवाद दिनेशदा छान माहीतीबद्दल! मला लेट्युस आणि या कॅबेजमधला फरक समजत नाही. की ते एकच आहेत? अकु, परवाच सॅलेड बोल सारखी ही पानं खाल्ली. मस्त लागतात. सॅलेडबरोबरच त्यात अखंड मुगाची उसळ (रस्सा नसलेली) तसेच काळ्या हरबर्याची उसळ पण घातली होती. ही पानं धुवुन बारीक चिरुन त्यात लिंबु पिळुन, मीठ साखर चवीपुरते घातले (चाट मसाला, फळांच्या फोडी ऐच्छिक) की एक साधेसे कोशिंबीर कम सॅलेड होते. तेही छान लागते.

हो वत्सला, चांगल्या आयडियाज आहेत या.
सलाद ग्रीन (ज्यात लेट्यूसचे अनेक प्रकार येतात) हा एम मोठा ग्रूप आहे.
जमले तर त्यावर पण लिहिनच.
बाकी सगळ्यांचे आभार मानायचा उपचार पाळणार नाही, बरं का.