अमेरीकेत मोगर्‍याचे झाड लावण्याची माहिती

Submitted by अंजली on 23 July, 2010 - 12:49

अमेरीकेत मोगरा लावताना तुम्ही कुठल्या 'झोन' मध्ये राहता हे माहिती करून घेणं जरूरीचं आहे. http://www.garden.org/zipzone/ इथे वेगवेगळ्या 'झोन्स' बद्दल माहिती मिळेल. मोगर्‍याला फार थंड हवामान चालत नाही. त्यामुळे '९अ', '९ब', '१०अ', '१०ब', '११' या झोनमधे रहात नसल्यास मोगरा कुंडीत लावावा.

Mogara.jpg

कुंडी 'रूट बॉल' च्या (मुळं आणि त्याभोवतीची थोडी माती) साधारण तिप्पट असावी. प्लास्टिकची असल्यास थंडीत आतबाहेर न्यायला आणायला सोपं जातं. कुंडीला पाण्याचा निचरा होण्यासाठी जागा / holes असावेत. नसले तर करून घ्या.

मोगर्‍याला माती पाण्याचा व्यवस्थित निचरा (well-drained) होणारी लागते. त्यामुळे इथे मिळणारी 'टॉप सॉईल' (Top soil) किंवा 'गार्डन सॉईल' (garden soil) अजिबात वापरू नका. या मातीमुळे मोगर्‍याची मुळं कुजण्याचा धोका असतो. कुठल्याही चांगल्या कंपनीची 'पॉटींग सॉईल' (Potting soil) वापरा. मी मिरॅकल ग्रो या कंपनीची Potting soil वापरते आणि आत्तापर्यंत तरी चांगला अनुभव आहे. त्यात peat moss, perlite या गोष्टी घातल्या तरी चालेल. नसतील तर नुसती Potting soil वापरली तरी चालेल.

मोगर्‍याला खूप पाणी लागत नाही. माती हाताला ओली लागल्यास पाणी घालू नका. थंडीत मोगरा घरात आणाल तेव्हा आठवड्यातून एकदा अगदी थोडं पाणी घाला.

Mogara2.jpg

मोगर्‍याला खत घालताना 'overfeed' होणार नाही याची काळजी घ्या. मिरॅकल ग्रोचं 'All purpose plant food' चांगलं आहे. कमी concentrationचं (पाण्यात dilute केलेलं) खत नियमित देण्याने फायदा होतो. उन्हाळ्यात साधारण २ आठवड्यातून एकदा खत द्या. थंडीत खत घालणे पूर्णपणे बंद करा. मे-जून पासून सप्टेंबर-ऑक्टोबर पर्यंत खत देणं योग्य.

एप्रिल-मे मध्ये 'फ्रॉस्ट' संपला, रात्रीचं तापमान साधारण ५० डिग्री फॅ पर्यंत गेलं की मोगरा बाहेर आणून ठेवा. बाहेर ठेवताना फायरप्लेस, कपड्यांच्या ड्रायरचा 'व्हेंट' समोर नाही ना, तिथून गरम हवा झाडाला लागत नाही ना याची खात्री करा. मोगर्‍याला भरपूर प्रकाश, दमट हवा लागते. ऑक्टोबर मध्ये तापमान कमी व्हायला लागतं तेव्हा घरात आणा, शक्यतो खिडकीजवळ - जिथे भरपूर सूर्यप्रकाश येतो तिथे - ठेवा. परत घरातल्या हिटरची हवा थेट झाडावर येत नाही ना याची खात्री करा.

DSCN0446.JPG

जमल्यास दरवर्षी माती बदला. शक्य नसल्यास २ वर्षातून एकदातरी माती बदलावी. कुंडी बदलताना आधीच्या कुंडीपेक्षा २ ते ३ इंच मोठा व्यास असलेली कुंडी घ्यावी. मुळांचा भरपूर गुंता झालेला असल्यास धारदार सुरीने बाजूनं १/२ इंचाचे 'कटस' द्यावेत. यामुळे नविन मुळे येतात, मुळांची वाढ होते. माती/ कुंडी बदलल्यास २-३ दिवस प्रखर सूर्यप्रकाशात (direct sunlight) झाड ठेवू नका.

मे मधे मोगर्‍याची सगळी पानं हातानं तोडून टाका. फांद्यांची साधारण ५-६ इंच छाटणी करा. साधारण ३-४ दिवस पाणी देऊ नका. नंतर भरपूर पाणी द्या. यामुळे नविन पानं फुटताना प्रत्येक पानाबरोबर कळी येते. भरपूर फुलं येतात.

अमरिकेत मोगर्‍याचे बरेच प्रकार मिळतात. 'Maid of Orleans' (याला Arabian Tea Jasmine पण म्हणतात) हा सगळीकडे मिळणारा प्रकार. 'Belle of India', 'Mysore Mulli' , 'Grand Duke' (बटमोगरा) या बाकीच्या जातीपण मिळतात. 'Mysore Mulli' (याला मराठीत बहुतेक मदनबाण म्हणतात) आणि बटमोगर्‍याच्या फुलांना तीव्र सुवास असतो.

एका पुस्तकात मोगर्‍याला सुवासाची तीव्रता वाढण्यासाठी हिंगाचं पाणी द्यावं असं वाचलं होतं. मी हा प्रयोग करून पाहिला नाही. कोणी केला असल्यास सांगा.

जरः
पानं पिवळी दिसत आहेत: पाण्याचे किंवा खताचे प्रमाण जास्त होत आहे.
कळ्या गळून पडता किंवा लवकर फुलतात: पाण्याचे प्रमाण जास्त
पानं फिकट हिरवी दिसतात, मरगळलेली दिसतात: पाण्याची कमतरता
वर्षभर नविन फुलं किंवा नविन फांद्या येत नाहीत: पाणी आणि खताची कमतरता

झाडांना 'सखे सोबती' म्हटलय ते खरंच आहे. नविन कळी येताना, पानं फुटताना बघणे खरंच आनंददायी प्रकार आहे. झाडांचीही मग सवय होते. मोगरा नीट काळजी घेतली की वर्षानुवर्षे रहातो. झाड जूनं झालं की योग्य ती फांदी कट करून कलमपण करता येतं. Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोगरा आणि जास्वंद गॅराजमधे ठेवल्यास थंडीने खराब होईल का? लाईट सुरु ठेवायचा का?

मी कॅलिफोर्नियात आहे, खाली दिलेल्या लिंकवरील ग्रीन हाऊस किट उपयोगी पडेल का?

http://m.homedepot.com/p/FlowerHouse-PlantHouse-5-ft-x-5-ft-Pop-Up-Green...

अंजली, खुप खुप धन्यवाद! माझ्याकडे मोगरा गेली ६-७ वर्षे आहे. त्याला फुले यायची. वर्षातुन एकुण ३०-४० यायची. मी त्यातच सुख मानायची. कारण मी मिशीगन मधे राहाते. मी कधी फर्टिलायझर वापरले नाही. पण या वर्षी तु लिहील्याप्रमाणे केले. ....मे महिन्यात झाडाची पाने काढुन टाकली. ३-४ दिवस पाणी अजिबात दिले नाही. आणि तु सांगीतल्याप्रमाणे प्रत्येक फांदीला कळी आली. या वर्षी खुप फुले आली. धन्यवाद!
पण मला काही प्रश्न आहेत. नेहमी पेक्षा या वर्षी फुलांचा आकार खुप लहान आहे . खुप फुले आली म्हणुन का?
फुले येउन गेल्यावर फुलाचा खालचा हिरवा भाग तो हाताने खुडुन टाकावा का?
एकदा फुले येउन गेल्यावर पुन्हा कळ्या येतील का?

प्राजक्ता मी पण बे एरीयात आहे आणि जास्वंद बाहेर जमीनीवर लावली आहे. काहीही प्रॉब्लेम होत नाही. गराज मधे ठेवायची गरज नाही.
काल होमडेपो मधुन मोगरा आणला. पहील्यांदाच लावतेय. I am so excited! माझ झाड एकदमच छोट आहे पण हे अंजलीचे फोटोज बघुन शेखचिल्ली सारख मी ऑलरेडी मोगर्याचा गजरा लावुन बसलेय Lol

बे(एरिया)कर्स, एक प्रश्नः तुमच्या इथे मोगरा जमिनीत लावला तर विंटरमधे काही प्रोब्लेम येतो का?

तसंच, गार्डेनिया बद्दल पण माहिती हवी आहे.

शुगोल, माझा मोगरा मी आत्ता मे मधे मागवला आहे आणि अजूनही बाळ-कुंडीत आहे. आमच्या इथे तो जमिनीत लावण्याचा काही स्कोप नाही Sad लवकरच मी जरा मोठ्या कुंड्या आणणार आहे. अजून विंटर पाहीला नाहीये त्याने. पण कुंड्या घरात आहेत त्यामुळे प्रॉब्लेम येऊ नये.

माझ्याकडे एक पदरी मोगरा तसेच बट मोगरा व अनंत,सायली.अबोली मोठ्या कुंडीत खुप छान बहरला आहे.थंडी सुरु झाली कि घरात / बेसमेंट मधे ठेवणार. त्यावेळी आणखी काय काळजी घ्यायला हवी.
तसेच बॅक यार्ड मधे गुलाब लावलेले आहेंत. थंडी-बर्फा पासुन बचाव करण्यासाठी काय करावे. मिनेसोटा-झोन -४ मधे येते ना ..

रमड,
http://www.planetnatural.com/pest-problem-solver/houseplant-pests/whitef... इथे माहिती आहे. मी नेहमीच Horticultural oils, डिश वॉशिंग सोप मिक्स्चर करून त्यात पेपर टॉवेल भिजवते आणि त्यानं पानं पूसून घेते. जर झाड लहान असेल तर सरळ उलटं करून पाण्याखाली (माती, मुळं न येता फक्त पानं, देठ, खोड येईल असं) धरायचं त्यानंही फायदा होतो.

विद्याक,
पाणी किंवा खत जास्त झाल्यानं कळ्या लहान येतात. तसंच फुलं मोठी आणि सुवासिक येण्यासाठी भरपूर सूर्यप्रकाश आणि दमट हवेची जरूरी आहे. पाणी देताना जर माती ओलसर लागत असेल तर पाणी देऊ नका. स्लो रीलीज खत मिळते (३ महिन्यातून एकदा द्यावे लागते) ते घाला.

सुलेखा,
आत आणून खिडकी जवळ, जिथे सूर्यप्रकाश येतो तिथे ठेवा. पण हिटरच्या व्हेंटचा थेट झोत येत नाही ना ते बघा. बाकी आठवड्यातून एकदा पाणी देणे आणि कुठलीही किड लागत नाहीयेना याकडे लक्ष ठेवणे याव्यतिरीक्त बाकी काही करावे लागणार नाही. नॉर्थला राहणारे बाकीच्यांनी पण माहिती दिली तर उपयोग होईल.

Pages