अमेरीकेत मोगर्‍याचे झाड लावण्याची माहिती

Submitted by अंजली on 23 July, 2010 - 12:49

अमेरीकेत मोगरा लावताना तुम्ही कुठल्या 'झोन' मध्ये राहता हे माहिती करून घेणं जरूरीचं आहे. http://www.garden.org/zipzone/ इथे वेगवेगळ्या 'झोन्स' बद्दल माहिती मिळेल. मोगर्‍याला फार थंड हवामान चालत नाही. त्यामुळे '९अ', '९ब', '१०अ', '१०ब', '११' या झोनमधे रहात नसल्यास मोगरा कुंडीत लावावा.

Mogara.jpg

कुंडी 'रूट बॉल' च्या (मुळं आणि त्याभोवतीची थोडी माती) साधारण तिप्पट असावी. प्लास्टिकची असल्यास थंडीत आतबाहेर न्यायला आणायला सोपं जातं. कुंडीला पाण्याचा निचरा होण्यासाठी जागा / holes असावेत. नसले तर करून घ्या.

मोगर्‍याला माती पाण्याचा व्यवस्थित निचरा (well-drained) होणारी लागते. त्यामुळे इथे मिळणारी 'टॉप सॉईल' (Top soil) किंवा 'गार्डन सॉईल' (garden soil) अजिबात वापरू नका. या मातीमुळे मोगर्‍याची मुळं कुजण्याचा धोका असतो. कुठल्याही चांगल्या कंपनीची 'पॉटींग सॉईल' (Potting soil) वापरा. मी मिरॅकल ग्रो या कंपनीची Potting soil वापरते आणि आत्तापर्यंत तरी चांगला अनुभव आहे. त्यात peat moss, perlite या गोष्टी घातल्या तरी चालेल. नसतील तर नुसती Potting soil वापरली तरी चालेल.

मोगर्‍याला खूप पाणी लागत नाही. माती हाताला ओली लागल्यास पाणी घालू नका. थंडीत मोगरा घरात आणाल तेव्हा आठवड्यातून एकदा अगदी थोडं पाणी घाला.

Mogara2.jpg

मोगर्‍याला खत घालताना 'overfeed' होणार नाही याची काळजी घ्या. मिरॅकल ग्रोचं 'All purpose plant food' चांगलं आहे. कमी concentrationचं (पाण्यात dilute केलेलं) खत नियमित देण्याने फायदा होतो. उन्हाळ्यात साधारण २ आठवड्यातून एकदा खत द्या. थंडीत खत घालणे पूर्णपणे बंद करा. मे-जून पासून सप्टेंबर-ऑक्टोबर पर्यंत खत देणं योग्य.

एप्रिल-मे मध्ये 'फ्रॉस्ट' संपला, रात्रीचं तापमान साधारण ५० डिग्री फॅ पर्यंत गेलं की मोगरा बाहेर आणून ठेवा. बाहेर ठेवताना फायरप्लेस, कपड्यांच्या ड्रायरचा 'व्हेंट' समोर नाही ना, तिथून गरम हवा झाडाला लागत नाही ना याची खात्री करा. मोगर्‍याला भरपूर प्रकाश, दमट हवा लागते. ऑक्टोबर मध्ये तापमान कमी व्हायला लागतं तेव्हा घरात आणा, शक्यतो खिडकीजवळ - जिथे भरपूर सूर्यप्रकाश येतो तिथे - ठेवा. परत घरातल्या हिटरची हवा थेट झाडावर येत नाही ना याची खात्री करा.

DSCN0446.JPG

जमल्यास दरवर्षी माती बदला. शक्य नसल्यास २ वर्षातून एकदातरी माती बदलावी. कुंडी बदलताना आधीच्या कुंडीपेक्षा २ ते ३ इंच मोठा व्यास असलेली कुंडी घ्यावी. मुळांचा भरपूर गुंता झालेला असल्यास धारदार सुरीने बाजूनं १/२ इंचाचे 'कटस' द्यावेत. यामुळे नविन मुळे येतात, मुळांची वाढ होते. माती/ कुंडी बदलल्यास २-३ दिवस प्रखर सूर्यप्रकाशात (direct sunlight) झाड ठेवू नका.

मे मधे मोगर्‍याची सगळी पानं हातानं तोडून टाका. फांद्यांची साधारण ५-६ इंच छाटणी करा. साधारण ३-४ दिवस पाणी देऊ नका. नंतर भरपूर पाणी द्या. यामुळे नविन पानं फुटताना प्रत्येक पानाबरोबर कळी येते. भरपूर फुलं येतात.

अमरिकेत मोगर्‍याचे बरेच प्रकार मिळतात. 'Maid of Orleans' (याला Arabian Tea Jasmine पण म्हणतात) हा सगळीकडे मिळणारा प्रकार. 'Belle of India', 'Mysore Mulli' , 'Grand Duke' (बटमोगरा) या बाकीच्या जातीपण मिळतात. 'Mysore Mulli' (याला मराठीत बहुतेक मदनबाण म्हणतात) आणि बटमोगर्‍याच्या फुलांना तीव्र सुवास असतो.

एका पुस्तकात मोगर्‍याला सुवासाची तीव्रता वाढण्यासाठी हिंगाचं पाणी द्यावं असं वाचलं होतं. मी हा प्रयोग करून पाहिला नाही. कोणी केला असल्यास सांगा.

जरः
पानं पिवळी दिसत आहेत: पाण्याचे किंवा खताचे प्रमाण जास्त होत आहे.
कळ्या गळून पडता किंवा लवकर फुलतात: पाण्याचे प्रमाण जास्त
पानं फिकट हिरवी दिसतात, मरगळलेली दिसतात: पाण्याची कमतरता
वर्षभर नविन फुलं किंवा नविन फांद्या येत नाहीत: पाणी आणि खताची कमतरता

झाडांना 'सखे सोबती' म्हटलय ते खरंच आहे. नविन कळी येताना, पानं फुटताना बघणे खरंच आनंददायी प्रकार आहे. झाडांचीही मग सवय होते. मोगरा नीट काळजी घेतली की वर्षानुवर्षे रहातो. झाड जूनं झालं की योग्य ती फांदी कट करून कलमपण करता येतं. Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खत कधी घालू आता? कळ्या असतानाच घातलं तर चालेल की हा बहर संपल्यावर घालू?>>> उन्हाळ्यात १५ दिवसातून एकदा. कळ्या असताना घातलं तरी चालतं.

रूने, मोगरा चांगला हेल्दी आहे. वेल वाढते आहे अजून. अजिबात काही करू नकोस. नियमीत पाणी आणि खत दे मात्र. आणि कुंडीच्या खाली प्लॅटर ठेव. पाणी हार्डवुडवर येईल ना?

अंजली अगं त्या कुंडीला आतून जाळी आहे बुडापासून १ इंच उंचीवर, आणि खाली बुडाला छिद्र नाहीत, जास्तीचे पाणी त्या जाळीतून खाली जाते. त्यामुळे ताटली वगैरे भानगड नाहीये ह्या कुंडीला
वरचा प्रश्न सोहा यांनी विचारला होता तू माझे झाड बघून त्याला उत्तर दिलेस. Happy

.

बीएस
मोगर्‍याच्या झाडाभोवती साप असण्याबद्दल तुम्हीच लिहीले होते का?
माझ्यामते तरी नाही, आमचाकडे माझ्या लहानपणापासून मोगरा, रातराणी अशी झाडे होती, अगदी भरपूर झाडं होती पण कधीही साप आले नाहीत. तुम्हाला अगदी योगयोगाने साप दिसला असावा बागेत.

रुनी हो मीच लिहिल होता. Thanks! तुम्ही म्हणता त्या प्रमाणे योगायोगच असावा. तसेही उसगावात साप प्रकार खूप दिसण्यात येतात especially ज्यन्च्याकडे फळ्-भाज्याची लागवड केली आहे. I guess मी नसताना लेक बाहेर गेली, nannyच attention नसला अणि असा काही दिसल, या विचाराने I panicked. असो अत्ता मुलीला big boots अणलेत Backyard मधे घालायला.

अंजली मोगर्‍याच्या सोबतीला Gardenia आणलाय त्याची पण same काळजी घ्यायची का? काही वेग्ळ्या tips असतील तर नक्की सान्गा. तुमचा हा लेख फार उपयोगी पडला.

गार्डेनिया बाहेर बागेत लावू शकता किंवा कुंडीतही ठेवू शकता. साधारण अशीच काळजी घ्यायची. वेगळ्या टिप्स अशा काही नाहीत.

गार्डिनियाला अ‍ॅसिडिक सॉइल लागते. त्यासाठी माती तीच वापरलीत तरी समरमधे महिन्यातून एकदा अशा (अझीलिया इ.) फुलझाडांसाठी निराळे खत मिळते ते घालावे. तसेच गार्डिनियाला ह्युमिडिटी जास्त लागते, तेव्हा कोरडी हवा असेल तर जवळ पाणी ठेवावे. त्याला ८५च्या वर तापमान सोसत नाही, तेव्हा तसे तापमान गेल्यास गार्डिनिया घरात घ्यावा.

स्वाती,
आमच्या इकडे लोकांनी बाहेरच लावला आहे. जून-जुलै-ऑगस्टमधे ९०-१०० च्या दरम्यान असतं तापमान. पण झाडाबद्दल काही वेगळं जाणवलं नाही.
परत बघते.

अंजली ओके. स्वाती thanks a lot. मी Azalea घरासमोर लावलेत पण त्यान्च्यासाठी निराळे खत नाही घातले miracle-gro च वापरतेय पण एप्रिलमधे २ वीक्स भरभरुन blossom झाले होते. मेधा coffee grounds चा एकून होते, कधी try केला नाही.

अजुन एक प्रश्ण long w/e ला बाहेरगावी जाणार आहोत, त्यामुळे घर आठवडाभर बन्द असणार. मी दोन्ही कुन्ड्या बाहेर ठेवणार होते म्हणजे automatic sprinklers नी पाणि घातल जाइल पण तापमान ९५-१००+ असण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे घरी ठेवल्या कुन्ड्या तर मोगरा अणि Gardenia १ वीक काढतिल का बिनपाण्याच्या? कोणाला self watering glass bulbs चा अनुभव आहे का?

BS,
अझेलीया आणि गार्डेनिया दोन्ही तेवढं तापमान सहज घेऊ शकतात. घरात पाण्याशिवाय १ आठवडा ठेवण्या पेक्षा बाहेर ऑटो स्प्रिंक्लर वर ठेवणं केव्हाही चांगलं. फक्त दोन्हीवर संपूर्ण दिवस ऊन नसेल असं बघा.

स्वाती, अंजली,
गार्डेनीया ला तापमान जास्त चालतं, पण थेट ऊन मात्र चालत नाही. सावलीच्या जागी जिथे थेट ऊन दोनेक तासांच्यावर ( ते देखील शक्यतोवर सकाळचे ) नसेल अशा जागी गार्डेनिया बाहेर राहिला तरी चालतो.

मागे ह्या किंवा बागकाम बीबीवर मोगर्‍याला आता फुलं येत नाहीयेत ह्याबद्दल लिहिलं की विचारलं होतं.
तेव्हा अपडेट्सः रोप आणलं तेव्हा त्याला ८,१० कळ्या, फुलं होती. ती सगळी पडून गेल्यावर तीन, चार आठवडे काहीच प्रगती नव्हती. रोप आणल्यावर साधारण एखाद दोन आठवड्यांनी मोठी कुंडी आणून मिरॅकल ग्रोच्या सॉईलमध्ये हलवलं. वर अंजलीने लिहिल्याप्रमाणे दोन आठवड्यातून एकदा फर्टिलायझर स्प्रे करत होते. रोप आता मस्त मोठं झालेलं तर दिसत होतं. गेल्या आठवड्यात ३,४ नवीन कळ्याही दिसल्या. आधीच्यापेक्षा आकारानेही चांगल्याच मोठ्या होत्या. नवीन आलेली फुलं एकदम गुटगुटीत आहेत. Happy

पूर्वा, वर अंजलीने सांगितलेलं फर्टिलायजर मारते आहेस का?

>>मिरॅकल ग्रोचं 'All purpose plant food' चांगलं आहे. कमी concentrationचं (पाण्यात dilute केलेलं) खत नियमित देण्याने फायदा होतो. उन्हाळ्यात साधारण २ आठवड्यातून एकदा खत द्या>> हे बघ

आणखीन एकः माझ्याकडे पॅटिओमध्ये सकाळ ते दुपार चिक्कार ऊन असतं. आठवड्यातून दोन तीन दिवस बाहेर तर दोन एक दिवस घरात असं मी रोप हलवत असते. कारण मोगर्‍याला कडक ऊन लागत नाही. माझ्याकरता ह्याचा उपयोग होतोय. तू सुद्धा करुन पहा.
तसंच पाण्याच्या स्प्रेच्या बरोबरीने फर्टिलायझर डायल्यूट करुन स्प्रे बॉटलम्ध्ये ठेवलाय त्यामुळे वेळच्यावेळी मारायचा लक्षात रहातो.

मोगर्‍याला कडक ऊन लागतं की नाही ते माहीत नाही, पण वाट्टेल तेवढं कड्क ऊन सहन मात्र होतं. इथे अ‍ॅरीझोनात , माझ्या घरच्या मोगर्‍यावर जवळ जवळ दिवसभर ऊन असतं.( इथल्या ऊन्हाची कल्पना असेलच) मोगरा नुसता बहरलेला असतो. इथे फिनीक्स मध्ये सगळ्या देशी लोकांकडे मोगरा नुसता पीक आल्यासारखा फुलतो.

आज Green Acres मध्ये "Arabian Jasmine Grand Duke" बघितले, वर दिलेल्या माहितीप्रमाणे Arabian Jasmine म्हणजे मोगरा आणि Grand Duke म्हणजे बटमोगरा, तर Arabian Jasmine Grand Duke म्हणजे नेमका कोणता मोगरा हे कोणाला सांगता येईल का?

अंजली,

हे ईथे लिहु कि नको ह्याच विचारात होतो पण वाटले कि आम्हाला जो चांगला अनुभव आला तो तुमच्या बरोबर वाटुन घेतला तर काही वावगे नाही.

( टवाळ्या होणारच म्हणा आमच्या ह्या प्रतिसादाच्या पण no issues . . . . हे करुन पाहाच ).

एका लिटरच्या बाटलीत ती स्वच्छ धुवुन पिण्याचे पाणी संध्याकाळी भरुन त्यात फक्त दोन मोगर्‍याची फुले टाका, बाटली फ्रिज मध्ये ठेवा, दुसर्‍या दिवशी सकाळी उठुन त्यातील पाणी एका ग्लासमध्ये घेऊन प्या.

ईथे सांगत नाही जास्त काही, मला ते पाणी ह्या धरतीवरचं वाटत नाही, ईतकं फ्रेश वाटतं ते प्यायलं कि ?

काही हानी नाही , उलट शरीराच्या फायद्याचेच आहे, आम्ही वाळा टाकुन प्यायचो पाणी, लहानपणी आणी त्यात ही गोष्ट मला माझ्या मावशीने शिकवली होती.

मी नेहेमी पितो असे पाणी.

नमस्कार . . . .

हो पाण्यात मोगर्‍याचं एखादं फूल टाकून खरच मस्त वास येतो पाण्याला. लहानपणी उन्हाळ्यात पान्याच्या माठात कधी वाळा तर कधी मोगरा असायचा.

अरेबियन जास्मिनचाच तर जास्मिन टी बनवतात ,
आता टवाळक्यांची कशाला हो ती चिंता, त्यांना तेच काम असते हो... तेव्हा परब्रम्ह चांगलीच माहिती आहे हि.

मस्त फुलं आहेत स्वाती, अंजली.

माहेरी जितके दिवस माठातलं पाणी पीत असू तेंव्हा त्यात बरेचदा संध्याकाळी मोगर्‍याची फुलं घालत असू.
मोगरा नसेल तेंव्हा वाळा.

शेरटन, हिल्टन अशा ठिकाणी लॉबीमधे थंड पाण्याच्या डिस्पेंसर्स मधे रास्बेरी, लेमन, लाइम, मिंट, पाइनॅपल असलं काही बाही घालून ठेवतात. छान लागतं ते पाणी सुद्धा .

Pages