श्रीनिवास पेंढारकर - एक बाप - क्रमशः - भाग १३

Submitted by बेफ़िकीर on 20 July, 2010 - 00:40

बेरी काकूंना मुलगा अन निगडे काकूंना चव्वेचाळीशीत मुलगी झाली. त्यांची सर्वात थोरली मुलगी सत्तावीस वर्षांची होती अन तिला दोन मुले होती. निगडे काकूंना आता नऊ मुली अन एक मुलगा! श्रीयुत निगडे आभाळाकडे बघत प्रार्थना करत बसायचे दिवसा! रात्री करायचे नाहीत हा खरा प्रॉब्लेम होता. आईचे बाळंतपण करायला विद्या ही सर्वात थोरली मुलगी वाड्यात अवतरली अन पहिल्याच दिवशी तिला मानेकाकांचा झटका बरेच वर्षांनी मिळाला. काही नाही, मानेकाकांची बादली बिनदिक्कत बाजूला करून तिने स्वतःची बादली आधी भरली. कॉर्पोरेशनचे पाणी कॉमन नळाला सकाळी दोन तास अन संध्याकाळी दोन तास यायचे. मानेकाका आणि मावशी यांचे तोफखाने ऑलरेडी असल्यामुळे अवांतर भांडणे होऊच शकायची नाहीत. मानेकाका आपली बादली भरायला लावून प्रमिलाकडे चहा प्यायला बसले होते. सहज बाहेर नजर टाकली तर त्यांची अर्धवट भरलेली बादली बाजूला अन निगड्यांच्या दोन बादल्या रांगेत अन विद्या तिच्या दोन वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन निवांत उभी नळापाशी! आले मानेकाका बाहेर!

पवार मावशी मानेकाकांना अन मानेकाका पवार मावशींना वचकून का असतात याचे एक ज्वलंत जिवंत उदाहरण आज दास्ताने वाड्याने पाहिले. मानेकाका तारस्वरात ओरडत होते.

मानेकाका - पेटवून देईन पेटवून! कॉर्पोरेशनचा नळ पेटवून देईन मी! काय गं ए? चिमुरडे? बापाची मालमत्ता वाटली का नळ म्हणजे? आं? मोठी थाटात उभीयस ती कार्ट्याला घेऊन? चल हो बाजूला! दोन घटका चहा काय घ्यावा म्हंटलं पमेकडे, हे आले घुसायला! तुला कुणी अधिकार दिला माझ्या बादलीला हात लावायचा? आं? सहा नातवंड झाली तरी त्यांच्या मावश्या येतायतच जन्माला अजून! इर्रिगेशनला टेबलाखालून मिळतात बापाला त्याचा थाट वाड्यात नाय दाखवायचा! तिकडे टेबलाखालून अन इथे रांगेत घुसून! पिढ्याच्या पिढ्या फुकट खाणार तुम्ही लोक! लायकी नसताना दास्ताने वाड्यात राहतायत! भाडे देताना सूतक लागल्यासारखे चेहरे! पार्टी म्हंटली की यांचे चवदा जण जेवणार! कोण ना कोण सारखी आपली बाळंत!

जवळपास सहा, सात मिनिटे मानेकाका ओरडत होते. वाडा त्यांचे ते रौद्र रूप निवांतपणे बघत होता. कुणालाच त्यात काही विशेष वाटत नव्हते. विद्याचा दोन वर्षाचा कडेवरचा मुलगा रडायला लागल्यावर तिने त्याला अक्षरानेही समजावून वगैरे न सांगता खाली सोडले अन "जा खेळ" म्हणाली. मानेकाकांकडे तिचे लक्षच नव्हते. कॉर्पोरेशनच्या नळाचा सतत येतो तसाच हाही आवाज सतत येणार हे माहीत असल्यासारखी ती तिथेच उभी होती. लहानपणी तिने मानेकाकांचे हे रूप कित्येकदा पाहिलेही होते अन अनुभवलेलेही होते. आपल्या सात पिढ्यांचा उद्धार होण्यामधे तिला काहीही अपमान वाटत नव्हता.

बादली भरल्यावर मानेकाकांचे बोलणे थांबले. रागारागाने विद्याकडे बघत ते पुन्हा प्रमिलाकडे गेले.

संताप झालेला असल्याने व बादली भरल्यानंतर उरलेला संताप कुठे व्यक्तच करता येत नसल्यामुळे ते आता प्रमिलाकडे रागारागाने बघत होते. प्रमिला ढुंकूनही त्यांच्याकडे बघत नव्हती. तिला माहीत होते, आता आपल्याला शिव्या बसणार आहेत. तेवढ्यात मधू आला. मानेकाका आणखीनच भडकले. खरे तर दोघांनाही दिलेल्या कपबश्या सारख्याच होत्या. पण ते मानेकाकांना मान्य नव्हते.

मानेकाका - नवर्‍याला नवीन कप, मला फुटका? याला फुलपँट घालता येत नव्हती तेव्हापासून वाढवलाय!

खरे तर मधूचे आई वडील दोघेही त्यावेळेस हयात होते. मधूला वाढवण्याची जबाबदारी वाड्यातील कुणावरही तशी नव्हती. पण दास्ताने वाड्यात कुणीही काहीही बोलू शकायचे.

मानेकाका - काय रे मध्या? लाजलज्जा वाटत नाही माझ्यासमोर बसून चहा प्यायला??

मधू आत निघून गेला. 'माझेच घर, तुम्ही कोण बोलणारे अन हक्काने चहा पिणारे' हे वाक्य त्याला सुचणेही शक्य नव्हते. आज काहीतरी कारणाने काका भडकलेले आहेत इतकेच त्याला समजले.

प्रमिलाचे घर भर चौकात, नळाशेजारी अन ग्राउंड फ्लोअरला असल्यामुळे कुणीही बिनदिक्कत तिथे चहा प्यायला जाऊन बसायचे. आता घाटे आले.

घाटे - काय रे माने? का गरळ ओकतोयस?
माने - गरळ? तुझ्या बापाचे घर आहे का हे इथे येऊन मला वाट्टेल ते बोलायला?
घाटे - मग? तुझ्याय का?
माने - माझा बाप काढतोस? तू माझा बाप काढतोस? ऊठ...ऊठ इथून.. च्यायला.. भलत्याच्या दहाव्याला ओंकारेश्वरावर जाऊन रडणारे अन प्रसादाचे जेवणारे भटुरडे तुम्ही? माझा बाप काढतोस? ...

मानेंचा भयानक अवतार पाहून घाटे पुन्हा नळावर गेले. आजचा चहा राहिला ही हुरहूर लागली होती त्यांना!

तेवढ्यात गट्टू,राजश्री अन समीर खेळत खेळत आत आले.

माने - ही आली भुतं! कुणाचं कोण आहे ते समजेनासं झालंय! आईबापांना तरी समजतं का आपला दिवटा कुठला ते? काय गं पमे? मुलाला अभ्यासाला बसवता येत नाही तुला?

प्रमिलाचं तर लक्षंच नव्हतं, पण मुलेही त्यांच्याकडे लक्ष देत नव्हती.

माने - एकच कप चहा करायची पद्धत आहे का घरात?

प्रमिलाने पटकन आणखीन आधण टाकलं अन बाहेर उभ्या असलेल्या घाटेकाकांना चहा घेणारात का विचारलं! घाटेंनी 'मानेच्या कटकटीत चहा नको' हे सांगण्यासाठी आत हात दाखवून मग तोच हात स्वतःच्या डोक्यावर आपटून नाही अशी मान हलवली.

माने - त्याला काय भटाला विचारतीयस? त्याचं खानदान येईल धावत! स्वतःच्या घरात मिळत नसल्यासारखं!

आता प्रमिलाही भटच होती. आणि मानेही दुसर्‍याच्याच घरात होते. पण बोलणार कोण?

श्री ऑफीसमधून आला तो गट्टूला प्रमिलाकडे बघून थेट तिथेच!

माने - आलात? या.. कर्व्यांनी खानावळ उघडलीय मोफत ना? या या? बसा? बसा काय! निजा मी तर म्हणतो..

मानेंचा आविर्भाव पाहून श्री परत वळणार तोच प्रमिलाने आतून सांगीतले..

"श्री भावजी चहा ठेवलाय"..

माने - बघा बघा? कशी भावजींना चहा पाजतीय? आम्हाला सांगावं लागतं! अजून एक कप चहा टाक म्हणून..

श्री आलेला पाहून मधू बाहेर आला.

मधू जरा खट्टु दिसला म्हणून श्रीने विचारले..

श्री - काय रे बाबा? तोंड का पाडलयंस?
माने - मग काय करणार? त्याच्या बायकोला संध्याकाळी जे आधण ठेवावं लागतं ते नळ जाईस्तोवर! तुमच्यासारखे येतात ना बागाईतदार चहा ढोसायला.. म्हणून तोंड पाडलंय..

मानेंचं एक होतं! पवार मावशींप्रमाणेच तेही संतापले की ज्याच्याशी भांडण आहे त्याच्याशीच फक्त न भांडता समोर जो येईल त्याची कत्तल करायचे.

त्यांच्या या वाक्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करत व शुन्यात बघत मधू म्हणाला..

मधू - काही नाही रे..
श्री - काही... प्रॉब्लेम??
मधू - अंहं!
श्री - अरे बोल ना पिट्या...

पिट्या हे दोघेही कॉलेजला असतानाचे वाड्यातील नाव होते. या नावाने मधूला फक्त श्री आणि घाटेंचा मुलगा बाबूच हाक मारायचे. बाकी सगळे त्याला मधू किंवा मध्याच म्हणायचे. सगळ्यात शेवटी लग्न श्रीचे झालेले होते. त्यामुळे प्रमिला आणि सुषमा या त्याच्या दोन वहिन्यांचा तो बर्‍यापैकी लाडका दीर होता. आणि रमा तर अत्यंत लाघवी स्वभावाची होती.

माने काका तीव्र संतापाने सर्वत्र बघत होते. तेवढ्यात त्यांच्यासाठी एक्स्ट्रॉ आणि श्रीसाठी पहिला असा चहा घेऊन प्रमिला बाहेर आली.

प्रमिला! एक अत्यंत अगत्यशील वागणूक असलेली प्रेमळी गृहिणी! मात्र! गट्टू तिसरीत पहिला आला होता त्या दिवसापासून श्रीच्या मनात तिच्याशी बोलताना जरा धाकधूकच होती. प्रमिला तशी स्वभावाने मिश्कील किंवा मोकळी होती. कोणतेही पाप कुणाच्याच मनात नसले तरी श्री भावजींच्या वागण्यात त्यांच्याच विवेकबुद्धीमुळे त्यांनी बदल केलेला आहे हे प्रमिलाच्या लक्षात आले होते आणि ती मनातच हसली होती. त्यातच तिला तिच्या आकर्षक दिसण्याची पावती अन श्री भावजींच्या सभ्यपणाचीही पावती मिळालेली होती. त्या रात्रीनंतर जरी तसा प्रसंग पुन्हा कधी उद्भवलेला नसला तरी एकदोनदा असे झाले होते की श्रीची नजर पुन्हा प्रमिलाकडे वळली होती आणि एकदा तर..

तिचीही त्याच्याकडे..

संसार! एक गुंतागुंतीची गोष्ट! हक्काची बायको, हक्काचा नवरा असतानाही लोक निसर्गामुळे इतरत्र आकर्षित होत राहू शकतात. आपापल्या स्वभावानुसार, संस्कारांनुसार ते त्या आकर्षणाला चॅनेलाईझ करतात. पण ती गोष्ट जेवणातील लोणच्यासारखी असते. जरासेच आपले जीभेला 'ट्टॉक' वाटावे इतपत! मनात कुणाच्याच काही नसते.

बरेच दिवसांनी श्री भावजींनी 'ह्यांना' 'पिट्या' अशी हाक मारल्याचे पाहून प्रमिला चहा देऊन तिथेच बसली. तिच्या चेहर्‍यावरून तिला काहीतरी बोलायचे आहे हे स्पष्ट दिसत होते. पण तिला मानेकाकांच्या संतापाची कल्पना असल्यामुळे ती चुळबुळत होती.

श्री - काय झालं वहिनी? काही प्रॉब्लेम?
प्रमिला - संगा ना अहो... श्री भावजींना नाही सांगायचं तर कुणाला सांगणार आपण तरी..??
श्री - काय रे? अरे बोल ना?
मधू - काही नाही रे.. ऑफिसात कुणीतरी अफरातफर केलीय! मी काउंटरवर असल्यामुळे एक रकमी बारा हजार द्यायची वेळ आलीय. नशीब एवढंच की माझ्यावर कुणालाही आरोप ठेवावासा वाटत नाहीये अन नोकरी जाणार नाहीये! पण.. नुकसान मात्र भरून द्या असं म्हणतीय मॅनेजमेंट..
श्री - बारा हजार????

प्रमिलाच्या डोळ्यात पाणी आलं! मानेकाका हा विषय पाण्यापेक्षा गंभीर आहे हे पाहून मूकपणे निघून गेले. श्रीला खूप वाईट वाटलं! मधूसूदन कर्वे हा एक सच्चा माणूस होता. जरी वाड्यात त्याचीच परिस्थिती सर्वांमधे जरा अधिक बरी असली तरी त्यात त्याचा स्वतःचा हात तसा कमीच होता. वडिलांनी जाताना चक्क साडे चार हजार ठेवलेले होते जे त्याने विविध ठिकाणी गुंतवल्यामुळे त्याला व्याज भरपूर येत होते. अर्थात, नवीन, स्वतःची जागा वगैरे घेण्याइतका पैसा त्याच्याकडे नव्हता. पण निदान इतरांपेक्षा जास्त बरे होते इतकेच!

मात्र, एकरकमी बारा हजार दिल्यावर सगळेच धुवून निघणार होते याची श्रीला संपूर्ण कल्पना होती. श्रीच्या क्षमतेत इतके पैसे देणं अजिबात नव्हतं, पण निदान काहीतरी मदत करता येणार होतीच.

श्री - मधू.. एक.. साधारण.. दिड, पावणे दोन हजार.. मी..
मधू - तू देशील हे खरंय रे... पण..
श्री - काय झालं?
मधू - समीरच्या मुंजीसाठी चार हजार वेगळे ठेवले होते... आणि.. सव्वा दोन हजार माझ्याकडे होते..
श्री - ... मग?
मधू - .. स.. सगळेच.. जाणार ना यात??

प्रमिला आता मुसमुसून रडू लागली.

श्री - वहिनी.. पहिल्यांदा तुम्ही रडणं थांबवा.. आपण सगळे असताना या भरल्या घरात रडता कसल्या? पिट्या.. मुंजीचे पैसे तसेच ठेव.. हे बघ.. माझे दोन, तुझे दोन, हे झाले चार! आठ हजार.. त्यांना विचार पगारातून कट...
मधू - नाही ना! तीन दिवसात द्या म्हणतायत एकरकमी.. तोवर यायची गरज नाही म्हणतायत.. एक दिवस जालाही आज..
श्री - म्हणजे.. तू.. ऑफीसला गेलाच नव्हतास?
मधू - अंहं! .. सगळी खाती तपासली.. सगळे मिळून सव्वा सहा हजार.. आणि मग.. मुंज कॅन्सल बहुतेक..
श्री - मधू.. एक काम करायचं?..
मधू - काय??
श्री - म्हणजे वाईट वाटून घेऊ नकोस... पण..
मधू - काय पण?
श्री - समीर अन गट्टूची मुंज..

मधू अन प्रमिला आशेने श्रीकडे बघू लागले.

मधू - काय??
श्री - एकत्र करायची? कुठलाही आहेर नाही, मानपान नाही.. आणि.. कॉमन पानांचा सगळा खर्च माझा.. जी फक्त तुमची काय चाळीस एक पाने असतील तेवढाच तुम्ही करा..

हे वाक्य ऐकून प्रमिला हमसून हमसून रडायला लागली. किती किती प्लॅन्स आखले होते त्यांनी मुंजीसाठी! किती मानपान, किती आहेर, किती थाटमाट! सगळं संपलं होतं! पण.. ते संपता संपता.. त्याहून लाखो पटीनी चांगलं असं एक मन मात्र मिळालं होतं जिवाभावाच मित्र म्हणून.. श्रीनिवास पेंढारकर..

श्री - रडू नका प्रमिला वहिनी.. प्रॉब्लेम सुटलेलाय.. आता कसल्या रडता.. ??
मधू - श्री.. हे सगळं.. तुला एकट्याला...
श्री - काय एकट्याला? तू वाड्यातले सत्तर पान घालणार अन मीही घालणारच होतो.. मग एकच जेवण झालं तर काय बिघडलं??
मधू - पण.. तुला त्रास द्यायला..
श्री - मी पण एक त्रास देणारे तुला..
मधू - ... काय??
श्री - मी.. अजून एक कप चहा पिणारे..

खुदकन हसत प्रमिला आत पळाली आणि मधूने अन श्रीने एकमेकांना मिठी मारली. हे दूष्य पाहायला गट्टू आणि समीर तिथे होतेच. काय झाले आहे ते दोघांनाही माहीत नव्हते. त्यांना इतकेच समजले होते की आपल्या दोघांच्या बाबांपैकी कुणीतरी एकाने दुसर्‍यासाठी खूप काहीतरी केलेले असणार...

त्या रात्री गट्टूला झोपवताना श्रीला खूप बरे वाटत होते. आपल्या गट्टूचे लहानपणापासून सगळे काही करणार्‍या प्रमिला वहिनी अन मधूसाठी आपणही काहीतरी करू शकलो.. रमाच्या फोटोकडे बघताना आज त्याला अभिमान वाटत होता.

दुसर्‍या दिवशी श्रीने रजा काढली. तो आणि मधू सकाळीच बाहेर पडले. श्रीच्या खात्यातील एक हजार काढले. मधूचे सहा हजार आणि घरातले एक हजार असे करून आठ हजार जमा झाले. आता ते दोघे मधूच्या ऑफीसला गेले. 'एवढे आठ हजार सध्या घ्या आणि आणखीन थोडी मुदत द्या, एक आठ दिवसात उरलेले चार हजारही देतो' असे सांगायला मधू असि. जनरल मॅनेजरच्या केबीनमधे गेला आणि काही मिनिटांनी बाहेर आला..

श्री - काय म्हणतायत??
मधू - या म्हणतायत कामाला..
श्री - चला! बरं झालं.. आता फक्त चार हजारांचा प्रश्न उरलाय..
मधू - पण.. श्री.. टोटल.. व्हेरिफाय केली तर.. ओके आहे..
श्री - मग काल काय झोपा काढत होते का? पैसे नाही ना घेतले तुझे?
मधू - नाही.. हे घे..
श्री - चल.. मी जातो.. बरं झालं.. तू लाग कामाला..
मधू - मीही येतो.. माझे मनच लागत नाहीये कामात..

वाड्यात आले तर प्रमिला उदास चेहर्‍याने गहू निवडत दारात बसलेली होती. पटकन उठली..

प्रमिला - काय झालं?? घेतले पैसे??
मधू - अंहं! आज टोटल ओके आहे असे कळले..
प्रमिला - देवा.. पावलास..

वरून गर्जना झाली....

"का गं ए बॉबी.. आं?? दिसला ऋषी कपूर.. धडधडला ऊर.. आं? म्हणे देव पावला.. लाजा वाटत नाहीत का एवढाल्ल्या रकमेकडे दुर्लक्ष करायला कामाच्या वेळेस मध्याला? लाजा वाटत नाहीत?? काय संस्कार करणार मुलांवर तुम्ही? एवढाल्ली वयं झाली तरी अजून हिशोब कसे चुकतात?? मुंजी करतायत मुलांच्या.. खिशात नाही नाणं अन चाललंय नाचगाणं?

अख्खा वाडा उभा राहून मावशींच्या त्या आक्रस्ताळ्या वक्तृत्वाकडे बघत होता. प्रमिला अन मधू आणख्नच दुखावले गेले होते.

"हा उभाय न वरच्या मजल्यावरच्या गॅलरीत डोमकावळ्यासारखा.. त्या समंधाच्या येऊन पाया पडा वर.. याने जाऊन एकरकमी भरले बारा हजार तुझ्या हापिसात.. या वर.."

मानेकाका वरून या तिघांकडे बघत होते. आणि मधू आणि प्रमिलाच्या डोळ्यातून पाण्याच्या सरी वाहात होत्या. दोघेही माने काकांना नमस्कार करायला वर धावले.. आणि ते दोघे जिना चढत असतानाच मावशींच्या आवाजाचे कंत्राट आता मानेकाकांनी घेतले..

"नालायकांनो.. एकत्र मुंजी करून आमच्या तोंडाला पाने पुसता होय रे भटुरड्यांनो.. दास्ताने वाड्यातील प्रत्येकाला समीर अन गट्टूच्या मुंजीचे वेगवेगळे जेवण मिळाले नाही तर मी हा अख्खा दास्ताने वाडा????"

कोरस बरोबरच आज मधूही जोरात ओरडला.. - "पेटवून देईन"

मानेकाकांची दोन्ही पावले भिजली. त्यांनी दोघांना जवळ घेतले.

माने - का गं चिमुरडे? एवढी मोठी झालीस का की घरी मी चहा घ्यायला आल्यावर मला प्रॉब्लेमही सांगायचा नाही? लाज नाही वाटत तुला??

प्रमिला अजूनही रडतच होती.

मधू - पण .. काका...

माने - अरे गप्प बस?? तुम्हाला सगळ्यांना तोंडी लावणं मिळावं म्हणून उगाचच माझ्या मोठ्या भावाला आजवर शिव्या द्यायचो मी.. त्याने केव्हाच माझा वाटा देऊन टाकला होता.. गेल्याचे वेळेस... त्यातूनच दिले हे पैसे.... आणि मुख्य म्हणजे... मी मात्र हप्त्यावर घ्यायला तयार आहे बरं का परतीने? एकरकमीच द्या म्हणायला मी काही तुझं ऑफीस नाही...

मावशी - काय रे समंधा? तुला वाटा मिळाला अन आम्हाला असं सांगतोस? मी जाहीर निषेध करते तुझा! ए चितळे.. बघतोस काय? आण त्या मोतीबागेतले वीर सगळे.. करा इथे निदर्शनं!

चितळे - माने.. आजच्याआज उकडीचे मोदक पाहिजेत..

प्रमिला - मी करते..

चितळे - तू नाही करायचेस.. या मानेला करूदेत..

माने - तू चहा कर सगळ्या वाड्याला..

प्रमिला - लगेच टाकते... अहो दूध आणा.. मावशी.. या नं खाली..

सगळा दास्ताने वाडा चौकात जमला. अर्ध्या तासाने मस्तपैकी चहा अन ब्रेड झाल्यावर चितळ्यांनी पुन्हा विषय काढला..

चितळे - काय रे मधूसूदन? पण ते पैसे गेले कसे?
मधू - तेच समजत नाहीये.. बहुतेक.. कॅपिटॉल इंडस्ट्रीजला एक्स्ट्रॉ क्रेडिट दिलं मी...
श्री - ते आता सावकाश समजेल रे.. काळजी करू नकोस..
चितळे - माने.. मोदकांच काय झालं??
माने - आणायला हवेत... ए 'चेट'.. आपलं.. मावशी.. तू करतेस का मोदक?
मावशी - इस्टेट लागलीय का मला? म्हणे तू करतेस का मोदक?? भटुरड्यांचं काम आहे ते..
नंदा - मावशी.. मग तुम्ही मुर्गमसल्लम करा...
चितळे - निष्पाप जीवांची हत्या करणाच्या या प्रस्तावाचा मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे..
मावशी - ए गप्प बस्स? काही झालं की निषेध!
श्री - मग.. मुंज करायची ना आता?
मधू - हो.. प्रमिला.. मुहुर्त काढायला हवा..
माने - वेगवेगळ्या मुंजी...
सुषमा - मी काय म्हणते..?
मावशी - म्हणा..
सुषमा - जरी ठरलंय की वेगवेगळ्या मुंजी करायच्या.. तरी.. एकत्र केल्या तर नुसती धमाल येईल कीनई?
माने - हे मला मान्य नाही.. दोन जेवणे पाहिजेत..
मधू - अहो जेवणं करू की दोन.. मुंजी एकत्र करायला काय हरकत आहे??
घाटे - मला मान्य आहे..
माने - तुम्हाला असणारच.. तुमचे दोन्ही नातू खर्च वाढवतील म्हणून..
घाटे - हा पर्सनल रिमार्क आहे माने तुमचा..
माने - मग कसला रिमार्क करायचा? हे काय ऑफीस आहे?
चितळे - एकत्र मुंज या प्रस्तावाला मी मान्यता दर्शवत आहे..
माने - तुम्ही आहात कोण मान्यता दर्शवणारे?
मावशी - गप रे मान्या.. दोन मुंजी केल्या तर केवढा घोळ होईल वाड्यात..

शेवटी माने एकटे पडले. दोन जेवणे पण एकत्र मुंज हे ठरले. मुहुर्त निघाला. एक महिन्यानेच मुहुर्त होता. आता नुसता धिंगाणा चालू झाला.

आणि दोनच दिवस झालेले असताना..

देशात आणीबाणी लागू झाली..

आणीबाणीमुळे दास्ताने वाड्याचा चेहरामोहराच बदलला...

कारण.. दास्ताने वाड्यात प्रवेश केल्यावर पहिलंच घर चितळे आजोबांच होतं! त्यामुळे तोच वाड्याचा चेहरा होता... आणि..

आणीबाणीत या चेहर्‍याला अटक झाली होती..

वाड्यातून जाताना चितळे आजोबांचा चेहरा पाहून मावशींनाही वाईट वाटलं होतं..

त्यातल्या त्यात बरं एकच झालं होतं.. मधूच्या ऑफीसमधील एका लेडी क्लर्कने केलेल्या चुकीमुळे तो सगळा घोळ झालेला आहे हे लक्षात आलेलं होतं! बारा हजार मानेकाकांना एकरकमी परत मिळाले होते.

आणि.. गट्टुच्या आयुष्यात एक महत्वाचा फरक त्या दिवशी पडला होता..

ज्या राजेश खन्नाचे गुणगान गाताना वैशाली ताई अन संजयदादा थकत नाहीत त्यांच्यापेक्षा..

भानुविलासला त्यांनीच आपल्याला नेऊन दाखवलेल्या 'शोले'मधील तो उंचच्याउंच अमिताभ बच्चन...

कित्ती कित्ती तरी भारी होता..

गट्टूचा पूर्ण मेंदू आता अमिताभ बच्चनने व्यापलेला होता. शोले हा पिक्चर बॉम्बेत अजून चालतोय, पाच वर्षे झाली तरी, ही अद्भुत माहिती त्याला संजयदादाने दिली होती.

आणि आणखीन दोनच दिवसांनी श्री ऑफीसमधून संध्याकाळी वाड्यात पाय टाकत असताना...

प्रमिला भाजी आणायला नेमकी वाड्यातून बाहेर चाललेली होती...

आणि... मागून गट्टू नावाचे दिवटे समीर आणि राजश्रीबरोबर खेळता खेळता जोरात गाणे म्हणत होते..

गाणे ऐकून प्रमिला पटकन श्रीकडे हसून पाहात चटचट बाहेर गेली होती.. आणि श्री गट्टूच्या या नव्या रुपाकडे बघतच बसला होता...

"कोई हसीना जब रूठ जाती है तो.. है तो.. है तो.. और भी हसीन होजाती है"

गुलमोहर: 

संसार! एक गुंतागुंतीची गोष्ट! हक्काची बायको, हक्काचा नवरा असतानाही लोक निसर्गामुळे इतरत्र आकर्षित होत राहू शकतात. आपापल्या स्वभावानुसार, संस्कारांनुसार ते त्या आकर्षणाला चॅनेलाईझ करतात. पण ती गोष्ट जेवणातील लोणच्यासारखी असते. जरासेच आपले जीभेला 'ट्टॉक' वाटावे इतपत! मनात कुणाच्याच काही नसते.----------------------

वा वा मझा आ गया..................

मस्त..

पुन्हा तोच काय प्रतिसाद द्यायचा हो? मला कंटाळा यायला लागलाय सारखं सारखं म्हणावं लागतय- कित्ती छान लिहिता हो तुम्ही! Happy

संसार! एक गुंतागुंतीची गोष्ट! हक्काची बायको, हक्काचा नवरा असतानाही लोक निसर्गामुळे इतरत्र आकर्षित होत राहू शकतात. आपापल्या स्वभावानुसार, संस्कारांनुसार ते त्या आकर्षणाला चॅनेलाईझ करतात. पण ती गोष्ट जेवणातील लोणच्यासारखी असते. जरासेच आपले जीभेला 'ट्टॉक' वाटावे इतपत! मनात कुणाच्याच काही नसते.----------------------:अओ:

अप्रतिम लिखाण... खुप एन्जॉय केलं. Happy

जीभेला 'ट्टॉक' हा नवीन शब्द आज समजला Proud

दास्तानेवाड्यातले लोक भांडून भांडून मनोरंजन तर करतातच...पण त्यांच्या दिलदारपणाचे किस्से वाचून हा 'एक कुटुंब' असलेला वाडा म्हणजे जणू काही पृथ्वीवरचा स्वर्ग वाटतो. त्याला नजर न लगो ही मनापासून इच्छा...आणीबाणीची झळ आता वाड्याला बसणार असं दिसतंय.... Sad

गट्टूबाळ मोठं झालं... काय पण गाणं म्हणतंय.... Lol

सर्वांच्या प्रेमळ प्रोत्साहनाचे अनेक आभार मनापासून!

सानी व आर्या, आपले विशेष आभार!

-'बेफिकीर'!

बेफिकीर, मुंबईत दास्ताने वाडा असता तर नवर्‍याला तिकडेच जागा घ्यायला लावली असती इतकं अप्रतिम वर्णन केलंय... Happy

गट्टूबाळ मोठं झालं... काय पण गाणं म्हणतंय.... >> सानी अगदी अगदी Lol

,,,,,,,,,,,,कथा पुर्ण झाल्यावरच प्रतिसाद देणार होते पण राहवल नाही तुमच्या ब-याच कथा वाचल्या आणि नेहमीप्रमाणेच ही सुद्धा खूप छान आहे,,,,,,,,,,,,,,