श्रीनिवास पेंढारकर - एक बाप - क्रमशः - भाग ११

Submitted by बेफ़िकीर on 16 July, 2010 - 03:16

ऑडिटमधे एकही गफलत निदर्शनास न आल्याने प्रत्येकी पंधराशे रुपये व रात्री सर्व एक्साईजवाल्यांना एका हॉटेलमधे मद्य व कोंबडी यावर निभावले. आदल्या रात्री प्रचंड चालल्यामुळे स्वाती आज पुढच्या दोन दिवसांचा रजेचा अर्ज टाकून चार वाजताच निघून गेली. सगळे शांत झाल्यावर विवेकबुद्धी जागृत असलेल्या श्रीने सप्रेंना संध्याकाळी सांगीतले की ती चूक त्याच्याकडून झाली होती. सप्रेंनी त्यालाही झापले पण जरा सौम्यपणे! कारण आता वेळ टळलेली होती. रात्रीच्या पार्टीला कोपरकर, देशमाने अन सप्रे गेले होते.

गट्टूचा ताप कधीच उतरून तो हळूहळू खेळायलाही लागलेला होता. शाळा काही बुडवलेली नव्हती.

पण संध्याकाळी समीरदादाला आणलेला मेकॅनो पाहून मात्र त्याने श्रीला विचारले.

गट्टू - बाबा, आपण आणायचा मेकॅनो?
बाबा - मेकॅनो? मेकॅनो म्हणजे?
गट्टू - ते असे तुकडे बसवले की नवीन नवीन आकार तयार होतात...
बाबा - कुठे पाहिलेस?
गट्टू - समीरदादा..
बाबा - बघू..
गट्टू - वीस रुपयांना असतो..
बाबा - बघुयात.. आत्ता जरा अडचण आहे ना?
गट्टू - बर! मग नंतर घ्यायचा..??
बाबा - हं!
गट्टू - मग बुद्धिबळ? ते स्वस्त असतं! बारा रुपयांना..
बाबा - बुद्धिबळ येतं कुठे पण तुला?
गट्टू - थोडं येतं.. शिकीन..
बाबा - बर.. बघू...
गट्टू - सारखं बघू बघू काय करता?
बाबा - अरे असे सगळे खेळ मिळतात म्हणून घ्यायचे असतात का?
गट्टू - कुठलाच खेळ नाही घेत आपण कधी..
बाबा - का? सापशिडी नाही आणली दोन महिन्यांपुर्वी?
गट्टू - फाटली सुद्धा ती.. सापशिडी सगळ्यांकडे असते..सापशिडी काय!
बाबा - खेळलास का तरी पण तू सापशिडी? आणल्यापासून चार दिवस उत्साह.. नंतर माळ्यावर..
गट्टू - माळ्यावर फाटली म्हणून टाकलीत तुम्ही.. नाहीतर खेळलो असतो..
बाबा - मग नीट नको का वापरायला? मी आता चिकटवणार आहे ती..
गट्टू - काही नको.. आहे राजश्रीताईकडे..
बाबा - मग काय तर? एकेकाने एकेक खेळ घ्यायचा..
गट्टू - मग आपण कुठला घ्यायचा??
बाबा - आपण आता बॉल आणू रबरी..
गट्टू - कधी?
बाबा - आणू उद्या..
गट्टू - मी पण येणार..
बाबा - ठीक आहे.. संध्याकाळी तुळशीबागेतून आणू..
गट्टू - निळा आणू..
बाबा - बरं.. निळा आणू..
गट्टू - कसली भाजीय ही?
बाबा - गवार.. आवडते ना तुला?
गट्टू - मला तुम्ही केलेलं सगळं आवडतं..
बाबा - सगळं?
गट्टू - सगळं!
बाबा - मी काय बाबा.. साधासुधा स्वैपाक करतो.. हो की नाही?
गट्टू - नाही.. कुणाच्याच बाबांना स्वैपाक येत नाही..फक्त तुम्हाला येतो..
बाबा - मग? बाबा राजेश खन्नायत की नाही?
गट्टू - एकदम!
बाबा - आता? हे असं तेल घालायचं..
गट्टू - स्स्स्स्स्स्स्स! कसला आवाज येतो ना?
बाबा - फोडणीय ही.. म्हणजे मग मस्त लागते भाजी..
गट्टू - हे काय आहे?
बाबा - हिंग!
गट्टू - मी घालू?
बाबा - घाल..
गट्टू - स्स्स्स्स..
बाबा - स्स्स्स्स
गट्टू - आजी श्रीमंतय?
बाबा - हं!
गट्टू - आपल्यापेक्षा??
बाबा - अहं!
गट्टू - मग?
बाबा - नुसतीच श्रीमंतय..
गट्टू - मधूकाका?
बाबा - ते पण नुसतेच..
गट्टू - मी ए मधूकाका म्हणतो..
बाबा - अहो म्हणायचं..
गट्टू - आणि ए काकू..
बाबा - काकूला ठीक आहे.. तिने तुला सांभाळलंय ...
गट्टू - आणि कुणीकुणी सांभाळलंय?
बाबा - आज्जी, मानेआजोबा, मधूकाका, चितळे आजोबा, बेरी आज्जी.. सगळ्यांनी..
गट्टू - तुम्ही?
बाबा - मी आपलं थोडं थोडं..
गट्टू - नाही.. तुम्ही पण..
बाबा - बरं.. मी पण..
गट्टू - सचिनच्यापण अंगात ताकद आहे..
बाबा - असूदेत..
गट्टू - पण मी वर्गात दोन नंबरला.. पहिला निलेश.. मग मी..मग सचिन..
बाबा - सारख्या मारामार्‍याच करता का?
गट्टू - नुसती कुस्ती..
बाबा - अन अभ्यास?
गट्टू - अभ्यास पण... कमल घर बघ, छगन नळ बघ..
बाबा - बास बास..
गट्टू - ते लांब पट्टे असलेलं दप्तर घेऊयात का?
बाबा - आहे की दप्तर?
गट्टू - निलेशचं मस्तय..
बाबा - नेहमी माणसाला दुसर्‍याकडे असतं ते हवंसं वाटतं..
गट्टू - बालभारतीवर भाजी सांडली आज..
बाबा - कशी काय?
गट्टू - डबा नीट लागलाच नव्हता..
बाबा - मग?
गट्टू - सगळं पुस्तक पिवळं पिवळं..
बाबा - काय हे गट्टू? नीट नाही का ठेवायचास डबा??
गट्टू - मला काय माहीत?
बाबा - पण मग खाल्लस काय?
गट्टू - पोळी..
बाबा - कशाशी?
गट्टू - ....
बाबा - कशाशी खाल्लीस पोळी?
गट्टू - ....
बाबा - सांग.. खरं सांग.. मला खरं कळायलाच पाहिजे..
गट्टू - नुसतीच..
बाबा - अशी कशी काय नुसतीच खाल्लीस? अशी खाता येते का पोळी?
गट्टू - जयंतने लोणचं दिलं..
बाबा - मग घाबरतोयस काय त्यात? मित्रच आहे ना तुझा? तू पण मदत करत जा मित्रांना..
गट्टू - बाबा?
बाबा - हं..
गट्टू - एक..
बाबा - बोला बोला.. आता काय मागणी??
गट्टू - आपण एक.. सॉसची बाटली आणायची?
बाबा - कसली?
गट्टू - सॉस?
बाबा - म्हणजे?
गट्टू - मस्त असतो.. हेमंत रोज आणतो..
बाबा - अंहं! डब्यात पोळी भाजी नेली की ताकद येते..
गट्टू - आणू की..
बाबा - सॉस म्हणजे काय?
गट्टू - टोमॅटोचा असतो..
बाबा - हां हां! ते होय.. नको.. ते कायच्याकाय महाग असतं..
गट्टू - केवढ्याला?
बाबा - असतं तीस रुपयांना..
गट्टू - मग... हेमंत कसा आणतो रोज??
बाबा - माहीत नाही..
गट्टू - तुम्ही खाल्लायत सॉस?
बाबा - नाही बाबा? आपण आपलं साधं वागावं..
गट्टू - का?
बाबा - त्रास होतो बाहेरचं खाऊन..

"मला तुम्ही केलेलं सगळं आवडतं, तुम्ही पण मला सांभाळलयत, सापशिडी काय, सगळ्यांकडेच असते, त्रास होतो बाहेरचं खाऊन' ही असली वाक्ये श्रीच्या मनात फार राहायची!

"मला तुम्ही केलेलं सगळं आवडतं" म्हंटल्यावर त्याला कोण आनंद झाला. त्या दिवशी तर त्याने चक्क पोळीचे दोन लाडू केले त्या आनंदात! मस्त जेवणे झाली दोघांची..

मग श्रीने माळ्यावरची सापशिडी काढून उरलेल्या पांढर्‍या भाताने चिकटवली. गट्टूला काही ती पुर्वीसारखी वाटेना! पण तरी त्याने ती अ‍ॅक्सेप्ट केली.

बाबांच्या जवळ झोपल्यावर त्याला नेहमीप्रमाणे एक अफझलखान, शाहिस्तेखान, आग्र्याहून सुटका यापैकी एक गोष्ट ऐकायला मिळाली.

झोपताना तो बाबांना मेकॅनोमधून मिळणार्‍या अनेक प्रकारच्या आनंदांचे वर्णन करत होता. बोलता बोलता कधी झोपला हे त्याचं त्यालाच समजलं नाही.

तो झोपल्यावर श्री पुन्हा माळ्यावर चढला. अनेक गोष्टी होत्या तिथे.

गट्टू लहान असताना घेतलेला लाकडी घोडा आता रंगहीन झालेला होता. एका पेटीत रमाच्या सगळ्या साड्या होत्या. एकीत श्रीची अन रमाची सर्टिफिकेट्स, काही कागदपत्रे वगैरे होती. त्याच पेटीत श्रीच्या आईवडिलांचा, श्रीच्या लग्नाचे असे अनेक फोटो होते. एका पेटीत गट्टूच्या बाळंतविड्यापासूनच्या सगळ्या वस्तू अन कपडे होते. चार दुपटी, एक चिमणाळं, कुंच्या, सहा झबली, दोन खेळ, एक बाहुली, एक लाकडी डबलडेकर, एक नुसतीच गाडी! त्यातच गट्टू दोन वर्षांचा झाल्यापासूनची काही चित्रे, आवाज करणारे एक दोन खेळ! आणि.... गट्टूच्या हाफपँटमधे सापडलेले दहा पैशाचे नाणे.. मात्र! त्या सगळ्या गोष्टींपैकी श्रीला ती डबलडेकर सगळ्यात आवडायची! कारण गट्टू रांगायला लागला त्या दिवशी ती आणलेली होती आणि मुख्य म्हणजे.. श्रीने ती स्वतःच्या पैशांनी आणलेली होती! लाल रंगाची, लाकडी, चाकेही लाकडीच असलेली ती डबलडेकर आता धुरकटली होती. रंग उडून गेलेले होते. चाके खिळखिळीत झालेली होती. पण ही गाडी आणली त्या दिवसापासून गट्टू स्वतःच्या स्वतः इकडे तिकडे फिरू लागला ही आठवण गुंतलेली असल्याने व त्या दिवशी रमाचा फोटो गट्टू समोर धरून श्रीने रमाला ती पहिली प्रगती दाखवलेली असल्याने ती डबलडेकर त्याच्या मनात फार खोलवर गेलेली होती.

श्रीने रमाची एक साडी खाली काढून आणली. पिवळ्या रंगाची ही साडी त्याने तिने त्याला दिवस गेल्याची बातमी सांगीतली त्या दिवशी घेतलेली होती. काय दिसत होती त्या दिवशी रमा त्या साडीत! त्या दोघांना त्या दिवशी मुळी एकमेकांना सोडवतच नव्हते.

खूप वेळ श्री ती साडी हातात घेऊन बघत बसला होता. कसा कुणास ठाऊक, माळ्यावरच्या जुनाटपणाच्या एका विशिष्ट गंधातूनही रमाचा सुगंध त्या साडीत त्याला अजूनही जाणवत होता! आणि स्पर्शही जाणवत होता तिचा!

रमा या विषयावर रडण्याचे इतरांना आता काहीच कारण उरलेले नव्हते. मावशी, प्रमिलावहिनी, चितळे आजोबा, उषाताई.. कुणालाही! इतकेच काय गट्टूही दिवसातून दोनदा तिच्या फोटोला नमस्कार करायचा तेवढे सोडले तर त्याच्याही बोलण्यात तिचा काहीही उल्लेख येतही नव्हता अन ते अपेक्षितही नव्हते. पण श्री? श्रीच्या प्रत्येक क्षणावर ती अजूनही व्यापून उरलेली होती. प्रत्येक क्षणाला त्याच्या हृदयातून एक डचमळ वर यायची. प्रत्येक क्षणाला एक आवंढा! प्रत्येक क्षणाला एक हुरहूर!

श्रीने परत ती साडी आपल्या चेहर्‍यावर दाबून धरली. कुणास माहीत? कदाचित त्याचे एक दोन अश्रू मिसळलेही असतील त्या साडीत! मग हळूच त्याने ती साडी गट्टू आणि आपल्या अंगावर अर्धी अर्धी पांघरून घेतली आणि त्या दिवसाला, त्या तारखेला गुडबाय करून तो झोपी गेला.

तो दिवस, ती तारीखच काय! कित्येक वर्षे संपलेली होती. रमा गेल्यानंतर साडे सहा वर्षे श्री रोज असाच झोपायचा. गट्टू झोपला की तिच्या आठवणीत मनातल्या मनात स्फुंदत! या स्फुंदण्याची कुणाला कल्पना येणार? कितीसा सहवास तो? फार तर काहीच वर्षांचा! पण .. असो.. त्या दु:खाला उपमा नाही.

गट्टूचा रिझल्ट लागला आणि दास्ताने वायात जणू जानच आली. शाळेत तिसरा आला होता तो पहिलीत! आणि श्रीने पेढे वाटले. सुट्ट्या लागलेल्या असल्याने सगळी मुले घरीच असायची. नुसते खेळणे, खेळणे आणि खेळणे! काय तो आवाज! जे सकाळी उठल्यापासून चालू व्हायचे ते कुणाच्या ना कुणाच्या आईवडिलांनी झापेपर्यंत रात्री साडे दहापर्यंत चालूच असायचे.

या सुट्टीत राजश्रीताई कर्नाटकात गेली होती आई बाबांबरोबर! समीरदादा वाड्यातच होता.

श्रीने सगळ्या वाड्याला पेढे वाटले. मावशींनी त्या दिवशी खीर बनवली. मानेकाकांनी एक टोपी आणली गट्टूसाठी! निगडेकाकूंनी चॉकलेट्स दिली. मधूकाकाने एक पाटी दिली. चितळे आजोबांनी असेच काहीतरी!

आणि पेढे वाटप झाल्यावर गट्टूला सरप्राईझ म्हणून श्रीने सगळ्यांसमोर त्याला बक्षीस दिले..

मेकॅनो..

समीरदादापेक्षा खूपच लहान आकाराचा.. पण.. पण स्वतःचा.. अगदी आपला असा..

मेकॅनो..

व्वा!

तीन रंगांचे विविध आकाराचे तुकडे एकमेकांत बसवायचे आणि टॉवर, गाडी, घर, इमारत असे काय काय तयार करायचे!

गट्टू तर हरखलाच! आपल्याला ही भेट बाबांनी दिली आहे हेही तो विसरला. हातात ती बॉक्स घेऊन त्याने तिथल्यातिथेच तो खेळ बाहेर काढला. लगेच तीन, चार मुले आणि समीर धावले.

श्रीच्या डोळ्यांमधे एक राजेशाही अभिमान होता. मी असलं काहीतरी घेऊ शकतो अन माझ्या मुलाला अत्यंत आनंदी करू शकतो ही भावना त्याच्या मनाला व्यापून होती.

समीर - अरे? आत्ता आणला मेकॅनो तुला??

गट्टूने अत्यानंदाने समीरकडे पाहिले. 'आत्ता' का असेना.. पण आपल्याकडेही समीरदादासारखा मेकॅनो आहे आणि तोही या वयात.. समीरदादा तर तिसरीत आहे.. काय तो अवर्णनीय आनंद!

समीरदादा निरखून आपल्या मेकॅनोकडे बघत आहे हे गट्टू पाहात होता. समीरदादाचे डोळे आज आपल्याला आणलेल्या खेळण्यात गुंतले आहेत ही त्याच्या दृष्टीने त्याच्या आजवरच्या आयुष्यातील सर्वात मोठी अ‍ॅचिव्हमेंट होती.

समीर - ई.. केवढासाय..

खाडकन गट्टूने आपल्या मेकॅनोकडे पाहिले. अगदीच काही छोटा नव्हता, पण समीरदादाच्या मेकॅनोपेक्षा निश्चीतच छोटा होता. मात्र गट्टूला अजिबात वाईट वाटले नाही. आपल्याकडे खास आपला असा मेकॅनो आहे ही भावना मेकॅनोच्या आकारावरील खुज्या टीकेमुळे निर्माण होऊ शकणार्‍या भावनेला नष्ट करायला पुरेशी होती.

गट्टू - खेळुयात?
समीर - अंहं! नको..
गट्टू - का?
समीर - लहान आहे.. मला नाही आवडत लहान मेकॅनो.. मी माझा खेळतो.. तू तुझा खेळ..

ये भी कम नही! गट्टूला समीरदादाबरोबर मेकॅनो खेळताना 'आपला एक अन त्याचा एक' हे सुखही खूप म्हणजे खूपच होते. मोठी माणसे एकमेकांशी बोलण्यात आणि श्रीचे कौतुक करण्यात गुंतलेली होती. मावशीही आज एकही म्हण न उच्चारता सगळ्यांशी बोलत होत्या. फार प्रेमाने वगैरे नाही, पण निदान खाली येऊन बोलत तरी होत्या! एका लहान मुलाने एका प्रौढ स्त्रीच्या स्वभावात घडवलेल्या अद्भुत बदलाही नोंद नाही म्हंटले तरी सगळ्यांनीच घेतलेली होती.

नाही म्हंटले तरी मावशींचेही या निमित्ताने बरेच कौतूक होत होते. आईविना मुलाला सांभाळले, मोठे केले वगैरे! अगदी मानेकाकाही ओसंडून वाहिल्यासारखे बोलत होते.

मात्र प्रमिलाने सर्वांदेखत समीरला झापले.

प्रमिला - तो शाळेत तिसरा आलाय म्हणून बक्षीस मिळालंय त्याला.. अभ्यास करत जा.. नुसतेच हट्ट.. मेकॅनो पाहिजे, हे पाहिजे.. ते पाहिजे.. नंबर मिळवून मग मागायला पाहिजेत खेळणी..

समीर दुर्मुखला. गट्टूसमोर आपला अपमान झालेला त्याला सहन झाला नाही.

दास्ताने वाड्याचे एक होते. कुणीही कुणालाही झापू शकायचे. कारण ते एकच कुटुंब होते जणू! पण आज प्रमिलानेच समीरला झापल्यावर काही प्रश्नच नव्हता.

गट्टूलाही वाईट वाटले काकू समीरदादाला बोलली हे पाहून तो निश्चल होऊन समीरदादाच्या चेहर्‍याकडे पाहू लागला. समीर आपला गट्टूचा मेकॅनो निरखत बसला होता.

मे महिन्याचा उन्हाळा लागला अन काहीतरी बाधल्याने गट्टूला पुन्हा ताप आला. यावेळेस श्रीने सरळ रजाच काढली. मावशींना तरी किती त्रास द्यायचा!

रात्र रात्रभर गट्टूला मांडीवर निजवून श्री पट्या बदलत होता. त्याला दूध देत होता, पाणी उकळून देत होता. गट्टू मलूल झाला होता. औषधांचा तीन दिवसांनी परिणाम जाणवला. ताप उतरला. पण अजून चार दिवस तरी विश्रांती घ्यायलाच हवी होती.

गट्टू - मला ताप का आला?
श्री - खूप खेळतोस ना?
गट्टू - तुम्ही ऑफीसला नाही गेलात?
श्री - तुला बरे नसल्यावर मी जाईन का ऑफीसला?
गट्टू - नाही..
श्री - मग?
गट्टू - घरात कुणाला बरं नसलं की ऑफीसला जायचं नसतं??
श्री - अंहं..
गट्टू - का?
श्री - मग करणार कोण त्या माणसाचं??
गट्टू - काय काय करावं लागतं??
श्री - औषध द्यावं लागतं, पाणी उकळून द्यावं लागतं, असे हात पाय दाबून द्यावे लागतात, अशी पट्टी बदलावी लागते, सगळं बघाव लागतं!

"घरात कुणाला बरं नसलं की ऑफीसला जायचं नसतं".. गट्टूला हे वाक्य चांगलंच समजलं!

पण श्रीच्या ऑफीसमधले सगळे, अगदी स्वातीही येऊन गेली होती. स्वाती आणि श्रीमधे आता पुर्वीसारखे रिलेशन निर्माण होऊ लागले होते हळूहळू! पण तरी बसमधे वगैरे शेजारी बसल्यावर किंवा कधी घरी सोडायला श्री गेला तर नाही म्हंटले तरी दोघांच्या मनात पुर्वीचे विचार यायचेच! पण आता कृत्रिम हसू चेहर्‍यावर खेळवत ते विचार आलेच नाहीत असे भासवणे जमू लागले होते.

मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात पूर्ण बरा झालेला गट्टू आणखीन एका गोष्टीमुळे आनंदला! कर्नाटकात गेलेली राजश्रीताई आली होती आणि तिला गट्टूलाही मेकॅनो घेतलाय हे माहीतच नव्हतं! ते तिला आज माहीत करून देणं या परमकर्तव्यासाठी गट्टू सकाळी साडेआठ वाजताच तिच्या घरी गेला तर ती समीरदादाकडे गेलीय असे समजले. गट्टू मेकॅनो घेऊन तिथे धावला. आणि दारातूनच ओरडला.

गट्टू - ताई.. मेकॅनो.. माझा.. हा बघ..

राजश्रीताई आतल्या खोलीत होती, तिथून ती बाहेरच्या खोली आली अन निरागस हसली. तिने मेकॅनो हातात घेऊन निरखला.

राजश्री - मस्तय.. कधी घेतला?
गट्टू - तिसरा आल्यावर.. वर्गात..
राजश्री - दुपारी खेळायचा??
गट्टू - हाताला काय लागलंय तुझ्या?? हे पांढरं पांढरं??
राजश्री - खेळतोय.. ये आत..

आतल्या खोलीत गेल्यावर गट्टूला एक अभुतपुर्व दृष्य पाहायला मिळाले. कॅरम नावाचा एक खेळ समीरदादाला आणलेला होता आणि काका, काकू, दादा आणि राजश्रीताई पैसे पैसे खेळत होते.

गट्टू - काय आहे?? हे??
समीर - थांबरे.. तिथे बस.. तुला नाही येणार..
गट्टू - काय आहे हे??
समीर - कॅरम.. हय.. पांढरी मिळाली... बाबा.. आता ही घ्या..
गट्टू - मी पण.. खेळू?
समीर - अंहं.. तुला नाही येणार..

येत कुणालाच नव्हतं! अगदी काका आणि काकूलाही.. पण ते दोघेसुद्धा कॅरम आणून स्वतःच रमले होते खेळात!

गट्टू - दादा..मेकॅनो खेळायचा??
समीर - गप रे.. काहीतरी भिकारडे खेळ खेळतो हा अजून..
प्रमिला - समीर.. असलं बोलायचं नाही..
राजश्री - मी कुठली घेऊ काकू?
समीर - आधी मारता येतंय का बघ! निघाली घ्यायला सोंगटी..

गट्टू - कधी आणलं हे?
समीर - काल..
गट्टू - कुणाला?
समीर - कुणाला म्हणजे काय? मलाच..
गट्टू - ताई.. चल ना आपण मेकॅनो खेळू..
राजश्री - चल.. आमच्याकडे खेळायचा??
समीर - ए.. असं मधेच जायचं नाही हां! पुन्हा घेणार नाही. हरायला लागले की उठतात..
गट्टू - चल ना ताई..
राजश्री - थांब.. दादा ओरडतोय..

गट्टू खूप वेळ निरखत बसला. एखादी सोंगटी गेली की तोही आता जल्लोषात सामील व्हायला लागला. कुणाच्याही बाजूने!

बर्‍याच वेळाने त्याच्या लक्षात आलं! आपण जल्लोषात सामील झाल्याचेही इथे काही कौतुक नाहीये, सोयरसुतकच नाहीये कुणाला...

मग त्याने सगळे चेहरे न्याहाळले. सगळेचे चेहरे समोरच्या कॅरमवर खिळलेले होते.

आपला मेकॅनो घेऊन गट्टू उठला.. एक एक पाऊल उचलत घरातून बाहेर पडला.

वर आजीकडे येऊन स्वतःच आपला मेकॅनो लावत बसला.

पवार मावशी - का रे चिमुरड्या? खेळणं आणलं नवीन अन माझी वापरतोस जमीन? पोरं कुठयत बाकीची.. ??
गट्टू - खेळतायत...
मावशी - कुठे?
गट्टू - दादाकडे..
मावशी - मग?? तू का नाही जातेस??
गट्टू - ....

मावशींनाही काही विशेष जाणवले नाही. झाला असेल काहीतरी रुसवा फुगवा नेहमीप्रमाणेच!

दुपार होईपर्यंत गट्टू मावशींकडेच होता. दुपारी जेवण झाल्यावर त्याने पुन्हा समीरदादाकडे जायचा विचार केला. तिथे गेल्याव्र समजले की राजश्रीताई मगाशीच घरी गेली आहे. कॅरमही आता कुणी खेळत नव्हते.

गट्टू - आपण खेळायचा?? कॅरम??
समीर - अंहं! आता झोपायचं जरा वेळ..
गट्टू - तू झोपणार आहेस?
समीर - हं!
गट्टू - मग आमच्याकडे नेऊ? कॅरम?
समीर - आलास की.. म्हणे आमच्याकडे नेऊ..
गट्टू - कधी खेळूयात?
समीर - तू पहिलीत आहेस अजून.. आधी मेकॅनो शिकून घे..
गट्टू - ताई कुठे आहे?
समीर - गेली घरी..

गट्टू ताईकडे गेला तेव्हा त्याला ताईच्या आईने एक आप्पा खायला दिला. हा पदार्थ त्याला फारच आवडला. पण आता ताईपण झोपणार आहे असेही काकू म्हणाली. त्यामुळे तो पुन्हा आजीकडे आला.

आजीजवळ निजला आणि कॅरमचा विचार करता करता कधी डोळे मिटले हेच समजले नाही.

मात्र त्यापुर्वी खूप खूप विचार केला होता त्याने! समीरदादा मोठा असल्यामुळे त्याला कॅरम आणला. आपल्याला उद्या, परवा कधीतरी घेतीलच खेळायला. सारखा थोडाच मधूकाका अन प्रमिलाकाकू खेळणार आहेत. चार जण लागतातच की चार बाजूंना.. ! कसल्या मस्त सोंगट्या होत्या त्या! सुळ्ळकन जायच्या!

आणि बरोब्बर साडे सहा वाजता कंपनीतले चिटणीस धावत धावत मावशींकडे आले..

"कंपनीतल्या सायकलस्टँडमधे टेंपो घुसला.. पेंढारकरांच्या डाव्या हाताची तीन बोटे चिरडली गेली.. रानडेमधे ठेवलंय.. लगेच चला"

गुलमोहर: 

.

माळ्यावरच्या वस्तूंच्या आठवणींचा भाग झक्कास बनलाय!

Sad शेवटचं वाक्य ... बिच्चारा श्री... काय लागलेय त्याच्या मागे.. !