वानू - थँक्यू - भाग ८

Submitted by bedekarm on 13 April, 2008 - 07:30

वानूचं पायाच ऑपरेशन होऊन आठ दिवस झाले. ऑपरेशनच्या वेळी त्याच्या पायावरचे संपूर्ण केस क्लीन शेव्ह केले होते. पण पायाच्या नाजूक लालसर स्किनवर आता बारीक लव येऊ लागली होती. आधार देऊन त्याला उभं केलं की चारही पायावर भार पेलू शकत होता. पण चालू शकत नव्हता. ढुंगणावर बसून डावा दुखरा पायपुढे करून सरकत असे. बघताना वाईट वाटायचं पण डॉक्टर खुष होते. म्हणायचे चांगली आहे प्रगति. औषध, टॉनिक्स, आयर्न सप्लिमेंट सर्व सुरु होतं.

मी संध्याकाळी आठ वाजता घरी आलो. गाडी आत लावून व्हरांड्यात आलो. कुलुप काढलं. मीना बाहेर गेली आहे हे दिसतच होतं. पण वान्याची चाहूल नाही. बाहेर अंगणात बागेत पाहिलं. हाका मारल्या. चाहुल नाही. लक्षात आलं की फटाके वाजले की हा कॉटखाली लपतो. आत येऊन सगळ्या रूम्समधे, बेडस खाली कोपर्‍यात, स्टोअर टॉयलेट्सह सगळीकडे पुन्हा पुन्हा पाहिलं. जिन्यातून वर जाऊन टेरेसमधेही पाह्यलं. हा नाहीच. माझ्या श्वासोच्छ्वासाची गती वाढली. पुन्हा बाहेर येऊन टॉर्च घेऊन बागेचा कोपरान् कोपरा धुंडाळला. पत्ता नाही. पलिकडे बहीण शालिनीकडे चौकशी केली. थोड्या अंतरावर दादाचं घर, तिथे फोन केला. हा कुठेच हाही. मीनाचा मोबाइल घरीच दिसला. पण ती तर टू व्हीलर घेऊन गेल्याचं दिसत होतं. आणि तसंही ती त्याला कुठे आणि कशाला घेऊन जाईल. मी सैरभैर झालो. हा गेला तरी कुठे? दिसेल त्या प्रत्येक शेजार्‍याला आणि कॉलनीतल्या जाणार्‍या येणार्‍याला विचारलं कुणी पाहिला का. पण काही समजेना. तेवढ्यात समोरची गायत्री म्हणाली की मघाशी सात वाजता मागच्या गल्लीत लग्नाच्या निमित्तानी खूप वेळ मोठ्मोठ्याने फटाके उडत होते. त्याच्या थोडा वेळ आधी काकू वानूला अंगणात ठेवून गेट बंद करून कुठेतरी बाहेर गेल्या. आता मात्र माझ्या काळजात धस्स झालं. त्याच्या मनातल्या फटाक्याच्या आवाजाच्या जन्मजात भितीनंच त्याचा घात केला होता. असे आवाज आले की पळून घरात यायचं. आणि घर बंद असेल तर दादाकडे किंवा त्याला सुरक्षित वाटेल अशा ठिकाणी जाऊन लपायचं, ही त्याची सवय. पण अशा या अवस्थेत यानं कंपाउंडखालून किंवा फटीतून वाट काढलीच कशी असेल. कसा आणि कुठे खुरडत गेला असेल. मला उमगेनाच.

हातात टॉर्च घेतला, साखळी घेतली आणि आजूबाजूच्या आठ दहा बंगल्यांची कंपाउंडस्, त्या पलिकडचे रिकामे प्लॉटस्, झुडपं धुंडाळली. मग स्कूटर बाहेर काढली, कक्षा वाढवली. चहू दिशांना लांबवर गेलो. थांबून्-थांबून हाका मारल्या. माझ्या आवाजाला कंप सुटला, आणि तो रडवेला होत गेला. वानू ..वानू..वानू..सगळे भोवती जमले विचारू लागले. त्यालातर सारेच ओळखत होते. आणि त्याचा आठ दिवसापूर्वीचा अपघात, ऑपरेशन, त्याची स्थिती सगळ्यांनाच माहीत होती. तो जाईलच कसा. आणि लांब तर जाणं शक्यच नाही असच सगळेजण म्हणत होते. मी सतत दोन तास वणवण भिरभिरत मुल हरवलेल्या आईसारखा हिंडत होतो. धावपळीन घाम ठिबकत होता, घशाला कोरड पडली. रस्त्यात कावराबावरा उभा होतो. आमचं घर थोडं गावाबाहेर आहे आणि वस्ती थोडी विरळ आहे. सगळे एकमेकांना ओळखतात आणि वानू तर आमच्यापेक्षा प्रसिद्ध.

तेवढ्यात आमच्याच रस्त्यावर सात आठ बंगले पलिकडे राहणारे गृहस्थ आले आणि अपराधीपणाने म्हणाले-'अहो, सात साडेसातच्या दरम्यान आमच्या कंपाउंडमधे एकदम आठ दहा कुत्री घुसली. ती पलिकडच्या दांडग्या कुत्र्यामागून हिंडणारी टोळी होती. जोरात कलकलाट्-भुंकण्याचे आवाज आले म्हणून मी बाहेर आलो. तर आमच्या मागच्या कंपाउंडमधून एक कुत्र पलिकडे घुसायच्या प्रयत्नात होतं आणि ही कुत्री त्याच्या मागे लागून त्याला ओढून काढायला बघत होती म्हणून मी सर्वांना हाकललं आणि हुसकावून लावलं आणि ते एकटं असलेल कुत्र पुढे गेलं. ती झुंड पुन्हा त्याच्या मागे गेली. आता तुमची शोधाशोध सुरु असताना आमचा मुलगा म्हणतोय की तो वानूच होता असणारं. मला आठवतय की ते पांढरं कुत्र वानूसारखचं होतं. पण मला तेंव्हा खरचं समजलं-सुचलं नाही हो. नाहीतर मीच त्याला त्यांच्या तावडीतून सोडवून आत आणून ठेवल असतं.' ते अगदी कळवळून अपराधीपणानं सांगत होते आणि ऐकता ऐकता माझ्या पायातली शक्तीच गेली. मी रस्त्यातच खाली बसून गुडघ्यात मान घालून सुन्न झालो. तेंव्हा ते म्हणाले, 'चला आपण शोधून तरी बघू.' मी कसाबसा त्यांच्या आधाराने उठलो. आणि त्यांच्या मागून निघालो. त्यांनी दाखविलेल्या ठिकाणी, त्याच्या पुढे-मागे रिकामे प्लॉटस्, खड्डे, झुडपं, काटेकुटे सगळ्यातून ठेचकाळत अनवाणी रात्रीच्या अंधारात टॉर्च घेऊन हिंडत होतो. व रस्त्यात बसकण मारली होती तेंव्हा चपला तेथेच सोडून आलो हे बर्‍याच वेळाने आठवले. तेथल्या पडक्या विहिरीपर्यंत गेलो. झाडंझुडपं सारं पाहिलं, आत पाहिलं, पण वानू नाहीच. आता मात्र आशा सोडली. भयाण चित्र डोळ्यासमोर येऊ लागलं. वानूचा तो खुनशी रक्तपिपासू रायव्हल आणि त्याची टोळी, ती झटापट, दुर्बल झालेला असहाय्य आणि जखमी विकलांग वानू, आणि.........आणि... आणि.. सारं शून्य.

सगळं संपल्याची, असहाय्यतेची जाणीव होऊन खुरडत खुरडत मीच घरापर्यंत आलो. दोन अडीच तास घर तसंच उघडं टाकून मी अंधारात भटकत भटकत होतो. सुन्न होऊन सोफ्यात बसलो तोवर मीना आली ती मैत्रिणीकडे लग्नाच्या कार्यक्रमाला गेली होती. मला असं उद्ध्वस्त पाहून म्हणाली काय झालं. मी सांगितल आणि हमसून हमसून लहान मुलासारखा रडू लागलो. तीही अपराधीपणाच्या भावनेनं -मीच त्याला बाहेर सोडून जायला नको होतं. पण मला वाटलंच नाही की तो कुठे जाईल. आणि तेंव्हा तर सगळं शांत होतं. फटाके वगैरे काहीच नव्हतं. नाहीतर मी त्याला कसं बाहेर ठेवलं असतं. असं म्हणू लागली. माझ्या भयाण भेसूर शांततेनं ती धास्तावली. मी पुरता विदीर्ण झालो होतो. मीना म्हणाली, म्हणून पुन्हा दोघं बाहेर पडलो. बाहेर जीवघेणी शांतता. एरव्ही हीच वेळ आणि शांतता मला आवडायची. याच वेळी मी वानूला घेऊन रोज कॉलतीन याच गल्ल्यांतून फिरायचो. आज या क्षणी कुठे आहे तो

घरात येऊन दोघे बसलो. मी म्हणालो, वान्या तुला किती वेळा लावारिस म्हटलं. तू डोळा चुकवून उडाणटप्पूपणाने भटकायला गेलास की चिडून तुला म्हणायचो, तू तो साला लावारिस की तरह जिएगा और लावारिस की तरह मरेगा. आज असा जाऊ नको रे. तू बेवारस नाहीस रे वानू. ये, असा इथे माझ्या घरात आत ये, असशील तसा, कसाही, कशाही अवस्थेत. मी तुला अलगद तळहातावर घेऊन आत आणीन. तुझी शुश्रुषा करीन. तुला जगवीन-सांभाळीन. फक्त तू त्या लांडग्यांच्या तावडीतून जिवंत राहा आणि मला सापड.

त्या रानटी क्रुर कुत्र्याने आणि त्याच्या टोळीने अखेर दावा साधला. हा विचार अंधारात दबा धरून आपल्या मागावर एखादं श्वापद येत असावं तसा पाठलाग करत होता. तो कुठेतरी जीव वाचवून लपला असेल. सकाळी सापडेल असा आशादायक विचार क्षीणपणे दीनवाण्या आश्रितासारखा मनाच्या दारात आत प्रवेश मिळावा म्हणून ताटकळत होता. पण त्याला आत जागाच शिल्लक नव्हती. डोळ्यासमोर येणारी दुश्चित्र मोठ्या कष्टानं बाजूला सारत होतो आणि तेच तेच; विकलांग, युद्धात जबर जखमी होऊन अंगावरच्या युनिफॉर्मच्या लत्करातून मांसाचे तुकडे लोंबत असलेल्या, एका हातात ओघळणारी गन आणि दुसर्‍या हाताने झाडाची मुळी घट्ट पकडलेल्या, टक्क उघड्या डोळ्यांनी दुपारच्या तळपत्या सूर्याशी नजर भिडवणार्‍या निश्चेष्ट सैनिकासारखं ,घेरून मारणार्‍या शत्रूसैनिकांशी लढता लढता मरणोन्मुख पडलेल्या सैनिकाचं रूपच डोळ्यासमोर येत होतं. वानू-प्लीज असा जाऊ नको. इथे माझ्या अंगणात ये. कसाही ये. मीनाला म्हटलं , तू जा आत झोपायला. मी बंगल्याचं गेट, घराचं दार सताड उघडं ठेवून बसून राहिलो. तो आला तर त्याला उजेड दिसू दे म्हणून सगळ्या ट्यूब्ज लावून ठेवलेल्या; सकाळ होण्याची वाट पहात, बसून, त्याचं मरण मी भोगत होतो.

रात्री दोन वाजता फोन वाजला. शेजारीच बसलो होतो. दुसर्‍याच रिंगला उचलला. पलीकडे बहीण. म्हणाली तू ही अजून जागाच ना. मलाही झोप येत नाहीए. पण तुला फोन केला कारण विहिरीकडून मला कुत्र्यांचे भुंकण्याचे आवाज ऐकू आले म्हणून टेरेसमधे येऊन खात्री करून घेतली. एकदा जाऊन बघतोस का रे? फोनवरच बोलणं ऐकून मीना बेडरूममधून बाहेर आली. म्हणाली मलाही चैन नाही. चला एक चक्कर टाकून येऊ. पायात उठायचं बळच नव्हतं. आणि मनात वान्याला भयाण अवस्थेत बघण्याची भिती वाटत होती. ती चलाच म्हणाली म्हणून उठलो. स्कूटर काढली, मीना मागे. हळू-हळू आशाळभूतपणे इकडे-तिकडे पहात जात होतो. काही तरी दिसेल, पण काही हालचाल नाही. तो वान्याचा क्रुर रायव्हल कुत्रा इतक्या शोधाशोधीत एकदाही दिसला नव्हता. तो आता समोरून धीमेपणानं येतो आहे. भोवती दोन्-तीन कुत्री. तो आरामात जिभल्या चाटतोय असा भास झाला मला. चिडून खाली उतरून त्याला बेभानपणं दगडं मारत सुटलो. तो कधीचाच दृष्टीआड झाला होता. मीनानी मला सावरलं. थोपटलं. मी दबक्या आवाजात वानूला हाका मारल्या. आता अपरात्री मोठ्यानं बोलणं-बोलावणंही शक्य नव्हतं. विहीरीवरून पुढे गेलो. भोवती चक्कर मारली. तर त्याच्याही पुढून मोकळ्या माळावरून कुत्र्यांच्या भुंकण्याचे आवाज दुरुन येत होते. शालिनीने तेच ऐकले असणार. परत फिरलो. आणि घरापाशी आल्यावर मीना खाली उतरली. मन आत यायला तयारच होईना. तिला म्हटलं तू आत हो. मी फक्त एकच चक्कर मारून येतो. वळलो. विहिरीपर्यंत आलो आणि स्कूटर स्टँडवर लावली. याच विहिरीपाशी वान्याला साखळीला बांधलेला उभा करून मी आणि त्यानं किती वेळा सुळसुळणारे छोटे छोटे मासे आणि कडेच्या उतारावर असलेल्या बाभळीच्या झुडपाच्या शेंड्याच्या आधारानी बाया पक्ष्यांनी बांधलेली निमुळत्या टोकांची लोंबणारी घरटी त्यांची पाण्यातली प्रतिबिंब आणि पक्ष्यांचे पाठशिवणीचे खेळ सकाळ संध्याकाळच्या कोवळ्या उन्हात पाहून सृष्टीतला जगण्याचा नवनिर्मितीचा उत्सव पाहिला होता. खाली वाकून मी माझेच गूढ प्रतिबिंब पाहिले. आणि निरुद्देश दबल्या आवाजात क्षीण हाक मारली वानू... आणि....आणि विहिरीच्या विरुद्ध बाजूच्या कोपर्‍यातून एकदम क्षीण कुं -कुं ऐकू आली. बेभान चक्रावलो. भास तर नाही ना. नीट ऐकले पुन्हा एक क्षीण हुंकार. अंगावर सरसरून काटा आला. विहिरीत उतरायला एका बाजूने उताराची पाउलवाट आहे. आणि बाकी सर्व बाजूने खडे चढ -भिंती. त्या उतारानेच दुपारी पाणी पिणारी जनावरे, म्हशी खाली उतरतात. विहिर पडीक वापरात नसलेली. पक्षी, मांजर, कचरा, गाळ याचं वसतिस्थान आणि गढूळ हिरवट पाणी. पण तो वानूच होता. नि:संशय. माझी धावपळ उडाली. तो जीव कोणता धागा पकडून होता, खरोखर अनाकलनीय आहे. जिजिविषा-जगण्याची दुर्दम्य इच्छा एका बाजूला आणि त्याला संपवण्याच्या प्रयत्नात सातत्याने असलेली शक्ती दुसर्‍या बाजूला. विचारशक्ती शून्य झाली. ओरडलो. वानू थांब. मी आलोच. स्कूटर घेवून वेड्यासारखा, तीरासारखा घरी आलो आणि साखळी आणि टॉर्च घेऊन विहिरीकडे निघालो. मीना माझ्या मागे काय काय म्हणत येऊ लागली. तर मी वानू वानू म्हणत पुढे. माझ्या तोंडून एक्साइटमेंटमुळे शब्दच फुटत नव्हता. दोघे स्कूटरवरून विहिरीपाशी पोचलो. विहिर घरापासून पाच्-सहाशे फुटावर, पण जाता येता योजनं दूर आहे अस वाटत होतं. पोचलो. आम्ही दोघे उताराकडून खाली उतरलो. वानू क्षीण प्रतिसाद देत होता. पण दाट अंधारात वानू नक्की कुठे आहे ते समजत नव्हते. विहिरी मागच्या प्लॉटवर की दुसर्‍या बाजूस असलेल्या गोठ्याच्या व विहिरीच्या मधील निरूंद पट्टीत. खाली उतरून टॉर्च टाकून बघू लागलो. त्याच्या अगदी क्षीण प्रकाशात तसे काहीच नीट दिसत नव्हते. तेवढ्यात पाण्यात दोन डोळे चमकले. तो बघा वानू, मीना ओरडली. अन्बिलीव्हेबल. मी पाण्याच्या कडेने विहिरीत जाऊ लागलो. मीना म्हणाली, थांब. थांब कोणाला तरी बोलावू. मी म्हटलं, आपलं मुल पडल असत विहिरीत तर काय इतरांना हाका मारत वाट पहात थांबलो असतो. झरझर खाली उतरलो. आणि अंगावरच्या कपड्यांनिशीच पुढे निघालो. तर्-टु माय ग्रेट सरप्राइज- वानू त्या टोकावरच्या खडकाच्या तुकड्याचा आधार सोडून चुबुक चुबुक आवाज करत पुढे आला आणि क्षीणपणे कुंइ कुंइ करू लागला. लहानपणी करायचा तशी. पुढे झेपावलो. आणि त्याला अलगद मिठीत घेतलं. त्याची अवस्था काय असेल असा अस्पष्ट प्रश्न मनात तरळला. पण आता सगळं मागे पडलं. त्याला हलकेच उचलले. मीना आता विहिरीच्या दुसर्‍या बाजूस असलेल्या खड्या भिंतीवरून, जिथे मी खाली विहिरीत उभा होतो, तिथे वरच्या बाजूस थोड्याशा उतारावरून बसून घसरत निम्म्यापर्यंत आली. मी वानूला उंच करून तिच्या हातात दिले. पुन्हा उताराच्या बाजूस येऊन चढून मी मीना होती त्या बाजूस रस्त्यावर आलो. मीनाने वानूला उंच करून माझ्या जवळ दिले. त्याला आम्ही रस्त्यावर ठेवले. तो निश्चेष्ट पडला होता. त्याला स्कूटरच्या पुढच्या बाजूला ठेवले. पण वानू तिथे मावेना. त्याला घेऊन स्कूटरवरून येणे शक्य नव्हते. मीना तिथेच वानूजवळ थांबली. मी घरी आलो. घरात गादीची जुनी खोळ होती, ती घेऊन मी पुन्हा विहिरीवर गेलो. त्यावर वानूला झोपवून दोघांनी झोळी करून वानूला घरी आणले.

पटकन त्याला धुवून काढले. चिखलानं माखला होता. लोळागोळा होऊन पडला होता. धुता धुता बघितलं तर हातीपायी धड होता. कुठे फाटलं-फाडलं नव्हतं. खरतर काहीही पहायची मनाची तयारी केली होती. आता खरच सांगतो सकाळी उठून आकाशात घिरट्या घालणार्‍या कावळ्या घारींच्या थव्यावरून त्याचा माग काढायचा ठरविले होते. पण आता ते दु:स्वप्न संपले होते. जिवंत संपूर्ण वानू माझ्यासमोर होता. स्वच्छ केला. चावल्याच्या जखमा फारशा खोलही नव्हत्या. बहुतेक गळ्यातल्या मजबूत पट्ट्याने आणि घुंगराने त्याच्या गळ्याचा चावा वाचवला होता असं पट्ट्याची अवस्था पाहून दिसत होत. आठच दिवसापूर्वी केलेल्या ऑपरेशनच्या जागेची लालसर ओलसर जखम उकलल्यासारखी दिसत होती. आत घातलेला स्टीलचा रॉड आणि डॉक्टरांनी दोन तास खपून केलेली जोडाजोड याचं काय झालं हे कळायला मार्ग नव्हता. तो आडवा पडून होता. त्याच्या अंगात शक्ती काहीच नव्हती. लोळागोळा झाला होता. पण तो जगण्याच्या स्थितीत होता नक्कीच. अर्थात रात्रभर विहिरीत राहून त्याचा निभाव लागणे शक्य नव्हते. मधल्या काळात मी त्या भागात असंख्य फेर्‍या मारल्या. तेंव्हा तो कुठे होता. जीव वाचवायला किती दूर आणि कसा खुरडत पण वेगाने गेला होता...आला कसा सगळ्यांच्या तावडीतून वार्‍याच्या दिशेच्या उलट बाजूने आपला वासावरून माग लागू नये अशी काळजी घेत्..कसं चकवलं असेल सगळ्यांना? विहिरीत पळापळीत्-झटापटीत तो पडला असण्याची शक्यता वाटत नव्हती. कारण ते इतक्या उघडपणे घडलं असतं तर त्यांनी पाण्यात उड्या मारून त्याला गाठलंच असतं. त्यांना आपला वासावरून माग लागू नये म्हणून मुद्दाम विहिरीत उतरून पलिकडच्या काठाला जाऊन त्याने पाण्यात स्वत:ला गळ्यापर्यंत बुडवून ठेवलं होतं नक्कीच. तो कुठेतरी जीव वाचविण्यासाठी लांब जाऊन पुन्हा आमच्या ओढीने इथपर्यंत पोचला होता. तशी त्याला पाण्यात पोहण्याची आवड नव्हती, भितीच होती. पण घडलं होतं ते हे असं. आमचं चेष्टेत हुशार वानू, व्हेरी स्मार्ट वानू वगैरे म्हणणं आणि त्या साठीची पोकळ प्रश्नावली निरर्थक होती. त्याची हुशारी, धाडस आणि जगण्याची जिद्द कल्पनातीत होती. त्यासाठी शब्द नाहीत हेच खरं.

वानूला स्वच्छ टिपून कोरडा केला आणि अलगद उचलून आत आणला. शालिनीला एका बाजूला मीना फोनवरून सांगत होती, म्हणाली, आता घाई करू नका,सकाळी बघायला या. सगळं ठीक आहे. मी हाताला लागतील त्या पेनकिलर्स, पॅरासिटामॉल, ब्रुफेन, कफ सायरप सगळ गोळा केलं. त्याचं पाण्यात द्रावण तयार करून त्यात थोडी व्हिस्की, एक अंड, थोड दूध असं काहीही घातलं आणि त्याच्या तोंडात थोडं थोडं घालत राहिलो. तो ही शांतपणे घेत राहिला. त्याच्या अंगात थोडी धुगधुगी, ऊब आणि हुशारी आली. डोळ्यात जीव आला. मंद क्षीण लुकलुक जाऊन थोडी चमक आली. लहानमुलासारखा बेडरूममधे आमच्या पायाशी मऊ पांघरूणात झोपी गेला. त्याच्याजवळ बसून हलकेच त्याच्या अंगावर हात फिरवत हळूहळू चेपत त्याला जवळ घेऊन बसून राहिलो. मला अवर्णनीय समाधानाने मंद हसू येता येताच गळा दाटून रडू येत होतं. डोळे झरझर वाहत होते. म्हटलं वानू थँक्यू. मला आयुष्यभर सल राहिला असता, तू रस्त्यात, खड्ड्यात, झुडपात मेला असतास तर. अश्वत्थाम्याच्या जखमेसारखी ही वेदना वागवली असती. तू माझ्या हाकेला साद दिलीस. माझ्यासाठी. मला मरण जगतं रहायला लागू नये म्हणून तू एवढा मरणाशी झुंजलास कां. तुझं मरण मी आता एकदा भोगलयं. आणि त्यातून बाहेरही पडलोय. आता कधीही तुला नैसर्गिक मरण येऊ दे. माझ्याजवळ, माझ्याशेजारी, माझ्या मांडीवर डोके टेकून. वानू थँक्यू. तुझी माझ्यावर आणखी एक उधारी.

गुलमोहर: 

Pages